अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता.
२२ जून १८७८ मध्ये फिनीश-स्वीडीश दर्यावर्दी अॅडॉल्फ नॉर्डेन्स्कीओल्ड याने वेगा या जहाजातून स्वीडनमधील कार्ल्सस्क्रोना बंदर सोडलं. रशियाच्या उत्तर किनार्याने बर्फाचा मुकाबला करत जात असताना सप्टेंबरच्या सुरवातीला बेरींग सामुद्रधुनीच्या पश्चिमेला त्याचं जहाज बर्फात अडकलं.