'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?"
ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत.