किवी आणि कांगारूंच्या देशांत १४ : केर्न्सची बृहत् रोधक प्रवाळी (Great Barrier Reef) आणि जापुकाई (Tjapukai) मूलनिवासींबरोबर एक संध्याकाळ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
28 May 2013 - 10:14 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

...एका अतीप्राचीन संस्कृतीची ओळख, आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी वाळवंटात विनावेतन काम करणारे निवृत्त टेलिग्राफ कर्मचारी आणि भारतापेक्षा जास्त क्षेत्रफळावर विखुरलेल्या १३८ मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहणारी संस्था... एका दिवसात इतकी वैविध्यपूर्ण आकर्षणे कधीच पाहिली नव्हती. केर्न्सला जाणारे विमान पकडायला निघालो तेव्हा मनांत अनेक उलट-सुलट विचारांची गर्दी झाली होती.

आजचा सहलीचा चौदावा दिवस. आज जाग आली ती अ‍ॅलिस स्प्रिंग्जच्या १,४५० किमी उत्तरपूर्वेस असलेल्या केर्न्समधे. येथून बृहत् रोधक प्रवाळी (Great Barrier Reef) बघण्यासाठीच्या सफारी सुरू होतात. माझ्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीच्या सर्वोत्तम तीन आकर्षणांपैकी हे एक. त्यामुळे मी टूर कंपनीचा वैकल्पिक प्रस्ताव स्वीकारून पूर्ण दिवसाचा कार्यक्रम घेतला होता. सकाळी ७:५० ला सर्वजण चालत हॉटेलपासून पाच मिनिटावर असलेल्या बोटींच्या धक्क्यावर गेलो. तेथे लहान मोठ्या प्रवासी बोटींची नुसती गर्दी झालेली होती...

एका प्रवाश्याने स्वतः चालवून स्वतंत्र सहल करण्यायोग्य बोटीपासून १५०-२०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या बोटीपर्यंत सर्व प्रकारच्या बोटी एकाच मोठ्या धक्क्याच्या आजूबाजूस तरंगत होत्या. आम्ही प्रथम हरितद्वीप (Green Island) या केर्न्सपासून २७ किमी दूर असलेल्या प्रवाळी बघायच्या पहिल्या थांब्याकडे जाण्यासाठी एका मोठ्या बोटीतून निघालो...

केर्न्सची बृहत् रोधक प्रवाळी (Great Barrier Reef) हा जगातला सर्वात मोठा प्रवाळसमुह आहे. ३,४०,००० चौ किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या अगडबंब प्रवाळसमुहात २,९०० पेक्षा जास्त उपप्रवाळी आणि ९०० पेक्षा जास्त लहान मोठी बेटे आहेत. प्रवाळी म्हणजे कोरल पॉलिप नावाच्या अनेक शतकोटींच्या संखेतील छोट्या सागरी प्राण्यांचे जितेजागते समूह असतात. त्यांनी पाण्यात बनवलेल्या या पर्यावरणात हजारो जातींचे छोटेमोठे मासे, स्टारफिश, ऑक्टोपस, इ. इतर सागरी जीवही घर करून असतात. त्यामुळे केर्न्सची बृहत् रोधक प्रवाळी हा जगातील सर्वात मोठा जीवसमुह मानला जातो. तिच्या प्रचंड आकारामुळे ही प्रवाळी अवकाशातूनही दिसू शकते. सी एन एन वाहिनीने तिला जगातल्या सात नैसर्गिक आश्चर्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. प्रवाळी त्यांच्यातल्या चमकदार रंगीबेरंगी कोरल पॉलिप, मासे व इतर प्राण्यांमुळे डोळ्यांना एक चमत्कारपूर्ण मेजवानीच असतात. येथे भेट देणार्‍या प्रवाशांमुळे ऑस्ट्रेलियाला दरवर्षी १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.

पर्यावरणाच्या होणार्‍या र्‍हासाचा प्रवाळींवर फार लवकर परिणाम होऊन त्यांतील प्राणी मरून जातात आणि त्यांचे पांढर्‍या रंगाच्या लवणक्षारांच्या घरांचे पट्टेच ते काय मागे राहतात. गेल्या वर्षी (२०१२ मधे) केलेल्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की १९८५ सालाच्या तुलनेने येथील अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाळी नष्ट झाली आहे. असो.

केर्न्सला टाटा करून निघाल्यावर खुल्या समुद्रातून साधारण ४५-५० मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही हरितद्वीपावर पोहोचलो. भर समुद्रात असलेले हे नावाप्रमाणेच हिरवे असलेले बेट खूप दुरून दिसायला लागते...

बेट जसजसे जवळ येऊ लागले तसे समुद्र उथळ होऊन त्यातील प्रवाळीमुळे पाण्याचा रंग गर्द निळ्याऐवजी आता हिरव्या रंगाच्या अनेक छटांकडे झुकू लागला होता...

बोट बेटापासून १००-१५० मीटर लांब धक्क्याला लागते. पुलासारख्या त्या धक्क्यावरून बेटाकडे जाताना दोन्ही बाजूंना उथळ पाण्यांतली प्रवाळी आणि रंगीबेरंगी मासे दिसत होते...

.

हरितद्वीपावर येताना बोटीतल्या स्वागतिकेकरवी मी स्कूबा डायव्हिंगचे बुकिंग केले होते. तिने मला बेटावरच्या केंद्रात ९:३० ला आवश्यक प्रशिक्षणासाठी हजर रहा असे सांगितले होते. बेटावर उतरल्यावर नेमकी तीच वेळ आमच्या गटाकरिता काचेचा तळ असलेल्या बोटीतून प्रवाळी बघण्याच्या सफरीसाठी दिली असल्याचे कळले. आमचा गाइड म्हणाला की मी प्रथम प्रशिक्षण घेणे बरे पडेल आणि तो माझ्यासाठी १० वाजताची प्रवाळी सफर बुक करेल. प्रशिक्षणाला गेलो तर तेथे कुणालाच काही पत्ता नव्हता. नशिबाने थोड्या वेळाने जिच्याकडे बुकिंग केले होते ती मुलगी दिसली. तिने एका ठिकाणी बसवले व प्रशिक्षक थोड्या वेळात येतोच आहे असे सांगितले. मी तिला माझ्या १० वाजताच्या सफारीची कल्पना दिली तर म्हणाली, "नो वरीज. सगळे ठीक होईल". पुढच्या पंधरा मिनिटांत दोनदा आठवण केली तरी काहीच हालचाल झाली नाही. तेव्हा जरा जोरात तक्रार केली तरीसुद्धा पाचेक मिनिटानंतरच प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला.

स्कूबा डायव्हिंगचे उपकरण...

प्रशिक्षण मुख्यतः स्कूबा डायव्हिंगचे उपकरण कसे वापराचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांबद्दलचे होते. ते संपल्यावर जेव्हा मी धावतच प्रवाळी सफरीच्या जाग्यावर गेलो तेव्हा मला वाटत असलेली भिती खरी ठरली. ती बोट दोनतीन मिनिटे अगोदरच सुटली होती. परत बेटावर येऊन गाइडकरवी चौकशी केली तर कळले की १० वाजताची बोट शेवटची होती आणि संचालकानेही अगदी मख्खपणे "सॉरी. आता काहीही करणे शक्य नाही" असे म्हणून सरळ हात वर केले. मग माझाही थोडा पारा चढला, म्हटले, "मी तुमच्या सगळ्या वेळा पाळल्या आहेत. माझी काहीच चूक नाही. तुम्ही वेळेत प्रशिक्षण आटपले असते तर सगळे नीट झाले असते. असे असताना १२-१५,००० किमी लांबून इथे आलेल्या प्रवाशाला असे धुडकावताय म्हणजे हद्द झाली. हीच काय तुमची क्वालिटी ऑफ सर्विस ? तुम्ही माझ्या जागी असता तर ही अशी सॉरी ऐकून काय वाटले असते?" माझा आवाज नकळत बराच वर गेला असावा. "थांबा जरा काय करता येते ते बघतो" असे म्हणून तो आमच्या गाइडला बरोबर घेऊन गेला आणि मी धुमसत बाजूच्या बेंचवर बसून राहिलो. माझ्या यादीतल्या पहिल्या तीनपैकी एक आकर्षण पूर्ण पहायला मिळणार नाही ही कल्पनाच खूप अस्वस्थ करणारी होती.

ऑस्ट्रेलियामध्ये दोन गोष्टींचा वारंवार अनुभव येऊन आश्चर्य वाटत राहिले. पहिले तर विकसित म्हणवणार्‍या या देशातील सेवा क्षेत्रातील व्यवस्थापनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधील मोठ्या मोठ्या उणीवा. आणि दुसरे म्हणजे बेपर्वाई... ही बेपर्वाई काही ठिकाणी अगदी भेदभाव ठळकपणे दिसेल अशी असते. मेलबर्नमधे १२ अपॉस्टल्स पहायच्या हेलिकॉप्टर सफरीतही असाच अनुभव आला होता. त्या वागणुकीबद्दल त्यांच्या ऑफिसात जाऊन तेथल्या व्यवस्थापकाला याबाबतीत सुनावल्याशिवाय राहवले नव्हते. तो सरळ सरळ बाष्कळ दिसणारी कारणे सांगून दुर्लक्ष करू लागला तेव्हा त्याला "नॉट व्हेरी सिव्हिलाइज्ड्, आर वी?" असे सांगितल्यावर आणि आजूबाजूच्या इतर गोर्‍या प्रवाशांच्या चेहर्‍यावरचेही "हा फारच जास्त करतो आहे" असे भाव पाहून त्याने नाईलाजाने कसेबसे सॉरी म्हटले होते. अगोदर घोळ करून वर "नो वरीज" अशी मखलाशी करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे हे न कळण्याइतकी असंवेदनशील सवय तर सगळीकडे कायमचीच दिसली. केर्न्सला हॉटेलवर चेकइन केले तेव्हा दिसून आले की रूममघे पिण्याचे पाणी ठेवायला विसरले होते आणि रूममधली तिजोरीही बिघडलेली होती. रिसेप्शनला फोन केला तर उत्तर, "नो वरीज. मी बघतो." अर्धा तास झाला तरी हालचाल नाही म्हणून परत फोन केला तर उत्तर, "नो वरीज. पण आमचा टेक्निशियन आता घरी गेला आहे. तिजोरी उद्याच ठीक केली जाईल. तुम्ही तुमचे किंमती सामान रिसेप्शनमधल्या (१२ मजले खाली येऊन) तिजोरीत ठेवा." पाण्याचे काय असे विचारले तर म्हणे, "नो वरीज. येईल थोड्या वेळात". जेव्हा ४५ मिनिटांनंतरही पाणी आणून दिले नाही आणि वर "नो वरीज " ऐकले तेव्हा कहरच झाला आणि मग त्या शिफ्ट मॅनेजरला माझे एक पाच मिनिटाचे व्यवस्थापनावरचे बौधीक फोनवर ऐकावे लागले +D. नशीब त्यानंतर तो नो वरीज न म्हणता सॉरी म्हणाला आणि पाच मिनिटात पाणी पोचविण्याची व्यवस्था झाली. असो.

थोड्या वेळाने गाइड गालांत हसत आला आणि म्हणाला, "१०:३० ची बोट आहे. लगेच धक्क्यावर जा. वेळ होत आली आहे." गडबडीत धक्क्यावर आलो. एक दोन मिनिटात काचेच्या तळाची बोट आली. पण मी एकटाच प्रवासी रांगेत उभा असलेला बघून तिथल्या व्यवस्थापकाला काहीतरी घोळ असल्याचा संशय आला. माझ्या तिकिटावरची वेळ पाहून त्याने परत एकदा मोबाइलवर खात्री करून घेतली आणि म्हणाला, " बसा. या सफरीत तुम्ही एकटेच आहात." मी ही चकीत ! पण त्याने बोट सुरू करायला सांगितले आणि मी नि:श्वास सोडला. कप्तान आणि मी एकटा प्रवासी अशी आमची काचेच्या तळाच्या बोटीने प्रवाळसफर सुरू झाली एकदाची ...

.

.

.

.

.

.

.

.

.

.

४५ मिनिटे सफर झाली... भरपूर प्रकारची प्रवाळे पाहिली. सोबत कप्तानाची माहितीपूर्ण कॉमेंट्री होती. ही सफर चुकली असती तर ऑस्ट्रेलियाच्या भेटीत नक्कीच मोठी उणीव राहिली असती याची खात्री पटली. मात्र काहीश्या गढूळ पाण्यामुळे आणि काचेवरून प्रकाश परावर्तित होत असल्याने प्रवाळ डोळ्यांनी जेवढे चांगले आणि रंगीत दिसते तेवढे चांगले ते फोटोत दिसत नाहीत :(

परत आल्यावर हरीतद्वीपावर कॉफीपान झाले आणि आमच्यातल्या ज्यांनी पूर्ण दिवसाची सफर घेतली होती त्यांना घेऊन एक कॅटॅमरान पँटूनकडे निघाली. पँटून म्हणजे भर समुद्रात जेथे प्रवाळ जास्त प्रमाणात आणि जास्त सुंदर आहे तेथे २००-३०० प्रवाशांची व्यवस्था असलेला भलामोठा सुसज्ज तराफा. असे अनेक पँटून्स एकमेकापासून दहा पंधरा किलोमीटर दूर अंतरावर उभे होते.

हा एक पँटून आणि त्याच्याबाजूला उभी असलेली कॅटॅमरान प्रकारची बोट...

आणि हा आमचा पँटून...

आम्ही ज्या पँटूनवर गेलो त्यावर स्नॉर्केलींग, स्कूबा डायव्हींग, अर्धपाणबुडीतून प्रवाळसफारी, तळघरात उतरून आजूबाजूचे प्रवाळ बघण्यासाठी व्यवस्था आणि आमच्या दुपारच्या पोटोबासाठी बुफे जेवणाची व्यवस्था होती. हे सगळे त्या एका दिवसभराच्या सफारीत सामील असते. मात्र ते सगळे तीन साडेतीन तासांत कसे करायचे याचे गणित प्रत्येक प्रवाश्याने स्वतः करायचे असते... त्यांबद्दल नीट माहिती देणे आणि प्रवाश्यांना सगळे नीट बघता-करता येईल याची काही व्यवस्था करणे ही आपली जबाबदारी नाही अशी पँटूनवाल्या टूर कंपनीची ठाम समजूत होती. त्यामुळे एखाद-दुसरे आकर्षण चुकले म्हणून नाराज झालेले बरेचजण दिसले. पण त्याबाबत कंपनीच्या कर्मचार्‍यांना फार फिकीर आहे हे जाणवले नाही. स्कूबा डायव्हींग आणि अर्धपाणबुडीतून प्रवाळसफारीच्या वेळांचे गणित जमवताना माझी जी धावपळ झाली तिने झालेला मनस्ताप दूर लोटून आकर्षणांचा आनंद घेण्यासाठी बरीच मानसिक शक्ती खर्च पडली.

अर्धपाणबुडी ही एक पाण्यावर तरंगणारी बोटच असते. मात्र ती जेवढी पाण्याच्या वर दिसते त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त पाण्याखाली बुडालेली असते. तिच्या तळात चारी बाजूंना काचेच्या खिडक्या असतात आणि त्यांच्याकडे तोंड करून बसायची व्यवस्था असते. ही अर्धपाणबुडी आजूबाजूच्या समुद्रात फिरून तेथील रंगीबेरंगी प्रवाळ, मासे आणि इतर प्राण्यांचे मनोहर दर्शन करवते...

.

.

स्नॉर्केलींग...

प्रवाळाचे अजून काही फोटो...

.

.

.

.

पाण्याखालचे काचेतून काढलेले फोटो खर्‍या प्रवाळ दुनियेची मजा नीट टिपू शकत नाही. त्याकरिता खास अंडरवॉटर कॅमेरा लागतो आणि नंतर ते फोटो खास प्रकारे प्रोसेस केल्यावर त्यातले रंग उजळ दिसायला लागतात. सफारीवाल्यांनी प्रवाळाचे खास फोटो असलेली एक सिडी भेट दिली. त्यातील हे निवडक फोटो...

.

.

.

.

.

मनसोक्त जलक्रीडा करून थकून भागून आम्ही चार साडेचारपर्यंत केर्न्सला परतलो. त्यानंतरचा संघ्याकाळचा कार्यक्रम होता इथल्या जापुकाई (Tjapukai) मूलनिवासींबरोबर एक संध्याकाळ व्यतीत करण्याचा. त्याची वाट बघत असताना हॉटेलच्या खोलीतून झालेले हे केर्न्सचे विहंगम दर्शन...

.

.

.

संध्याकाळच्या या कार्यक्रमाबद्दल मला खूप उत्सुकता होती. एकदाची आमची जाण्याची वेळ झाली आणि आम्ही बसने जापुकाई जमातीच्या सांस्कृतिक केंद्रात गेलो...

प्रथम जापुकाईंच्या संस्कृतीची, शस्त्रांची आणि कलेची ओळख करून देण्यात आली...

.

.

  ...............

नंतर आम्हाला एका मोठ्या सभागृहात नेण्यात आले. त्याच्या मध्यभागी एक ३०-४० सेमी उंचीचे छोटे स्टेज होते आणि प्रेक्षकांनी त्याच्या सर्व बाजूला जमिनीवर बसून अथवा उभे राहून कार्यक्रम बघायचा अशी व्यवस्था होती...

.

चारी बाजूंच्या भिंतींवर सामाजिक प्रतिकांची चित्रे होती. यातल्या दर सजीव अथवा निर्जीव आकृतीमागे लोककथा आणि परंपरांवर आधारीत आशय असतो. जापुकाई ही चित्रे दर नविन पिढीला आपली परंपरा समजावून सांगण्यास आणि परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी वापरतात...

थोड्याच वेळात कलाकारांचे आगमन झाले आणि त्यांनी नृत्य आणि गायनाच्या मदतीने त्यांच्या भाषेत आणि इंग्लिशमध्ये खुसखुशीत पद्धतीने जमातीची माहिती सांगायला सुरुवात केली. या जमातीला जरी आपल्या जमातीसंबद्धीच्या गोष्टींबद्दल आदर असला तरी ते खूप हळवे नाहीत आणि माहिती सांगताना त्यांनी विनोदाचा भरपूर उपयोग करून कार्यक्रम मजेशीर बनवला...

.

अग्नी प्रज्वलन समारंभाला या जमातीत फार महत्त्व आहे आणि तो त्यांनी बराच विस्तारपूर्वक दाखवला...

.

अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्याला समारंभाने प्रेक्षागृहाबाहेर एका खास तयार केलेल्या जागेवर नेऊन त्याच्या भोवती फेर घालून पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम केला. त्यांत प्रेक्षकांनाही सामील करून त्यांचे "अग्नीचे मंत्र" म्हणायला... नव्हे, नव्हे, उच्चार नीट झाला नाही तर चार चार वेळा घोकायला लावले. अमेरिकन मंडळींना उच्चार अवघड पडत होते, त्यांची भरपूर मापे काढली ! ... पण ते सगळे अश्या प्रकारे की सर्वांनी हसत हसत या सगळ्या नाच-गाण्यात स्वखुशीने भाग घेतला...

.

.

या जमातीच्या लोकांची चेहेरपट्टी आणि बांधा पाहिल्यास ते भारतीय म्हणून सहज खपून जातील असेच दिसतात...

नंतर आम्ही आत येऊन पोटोबाची व्यवस्था केली. बुफे पद्धतीच्या जेवणात सर्व जगभरचे जवळ जवळ २५-३० सामिष व शाकाहारी पदार्थ होते. त्यामुळे प्रत्येकाची आवड भागून सर्व खूश ! जेवण संपल्या संपल्या जेवणाच्या खोलीतच एका बाजूला बनवलेल्या स्टेजवर जापुकाईंचा विविध कला दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला...

.

.

.

.

या कार्यक्रमाने दिवसभरच्या धावपळीमुळे आलेला थकवा आणि अव्यवस्थापनामुळे झालेली चीडाचीड विसरायला लावली आणि सर्वजण खुशीत गप्पा मारत हॉटेलवर परतलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

मोदक's picture

28 May 2013 - 11:12 pm | मोदक

वाचतोय!!!

नेहमीप्रमाणे भारी फोटो..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2013 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्धपाणबुडीतील प्रवाळसफर, जलक्रिडा, जापुकाई जमातीच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि वृत्तांतातले फोटो सुपर्ब.
बाकी, वेळेच्या बेपर्वाईबद्दल वाचतांना बरे वाटले. माणसं सगळीकडे सारखेच. :)

हेवा वाटावी अशीच सफर.. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 May 2013 - 9:08 am | प्रचेतस

समुद्रसफर एकदम खासच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे

मोदक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आणि वल्ली : प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे :

बाकी, वेळेच्या बेपर्वाईबद्दल वाचतांना बरे वाटले. माणसं सगळीकडे सारखेच.

ऑस्ट्रेलियातली मी लिहिलेली ही बेपर्वाई केवळ वेळेची नाही किंवा आळसाने झालेली नाही तर गोर्‍या ऑस्ट्रेलियन लोकांचा सर्वच व्यवहार बर्‍याच वेळेला उद्धटपणाकडे झुकताना दिसला... अगदी ज्यांच्या पैश्यांमुळे त्यांच्या नोकर्‍या शाबूत आहेत अशा कस्ट्मर्सना देण्याच्या आवश्यक सेवेबाबतसुद्धा. मी पाहिलेल्या २४ देशांतला अजून एकच देश या अनुभवाच्या थोडसा जवळपास येतो... पण ऑस्ट्रेलिया याबाबत नंबर एक.

माझा स्वतःचा अनुभव फक्त पर्यटनाशीच संबद्धीत होता त्यामुळे माझी टिप्पणी मी त्यापुरतीच ठेवली आहे. पण असाच अनुभव प्रवासात भेटलेल्या आणि तेथे मास्टर्स करणार्‍या एका विद्यार्थिनीने सांगितला... तिच्या मते हे सगळ्याच ठिकाणी बघायला मिळते. अगदी माझ्या सहप्रवाश्यांतल्या काही गोर्‍या अमेरिकन लोकांना सुद्धा "They have attitude problem." अशी टिप्पणी केल्याशिवाय राहवले नाही. ऑस्ट्रेलियात शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल बर्‍याच बातम्या आपण ऐकतो. अगोदर त्यांत मेडियाने टाकलेल्या मसाल्याचा बराच भाग असावा असे वाटत होते. पण आता मसाला कमी, खरेपणा जास्त असेच वाटते.

याविरुद्ध दोन देश सोडता इतर सगळिकडचा अनुभव बहुतांशी अगदी मैत्रीपूर्ण किंवा कमीतकमी व्यावसाईक होता... आणि अर्थातच ते देश याबाबतीत ऑस्ट्रेलियाच्या फार फार पुढे आहेत. इतकेच काय ५ डॉलर टिप दिली तर न्यु यॉर्कचा टॅक्सी ड्रायव्हर (जो जगातला सर्वात उर्मट म्हणून कुप्रसिद्ध आहे) एकदम आदराने वागू लागतो असा अनुभव आहे ;)

मृत्युन्जय's picture

29 May 2013 - 1:32 pm | मृत्युन्जय

मी पाहिलेल्या २४ देशांतला ......

२४ देश. मेलो च्यामारी. आम्ही भारतातली २४ गावे नाही हो पाहिली अजुन.

चेतन माने's picture

29 May 2013 - 1:35 pm | चेतन माने

अगदी खरय…. १००% सहमत !!!

स्पंदना's picture

31 May 2013 - 6:14 am | स्पंदना

लेड बॅक अ‍ॅटीट्युड म्हणतात याला.
म्हणजे कस? सकाळी ऑफीसला यायच, १२ वाजता जे लंच करता बाहेर पडायच ते डायरेक्ट ३ वाजता परत.
मग ४ वाजता ऑफीस रिकाम व्हायला सुरु.
ऑस्सी टेंपरामेंटस तर विचारुच नका.
ड्रायव्हर्स तर मधल बोट दाखवतच गाडी चालवत असतात.
सर्वीस इंडस्ट्री चालवायला यांना जमण शक्यच नाही. बस ड्रायव्हर, ट्रेन स्टेश्न्स. स्गळीकडेच हे पहाता येतं.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2013 - 12:10 pm | संजय क्षीरसागर

चालू ठेवा.

चेतन माने's picture

29 May 2013 - 1:15 pm | चेतन माने

काय झक्कास फोटू आलेत, खास करून त्या माश्यांचे फोटू तर अद्भूत आहेत.
बाकी रद्द हा शब्द तुमच्या प्रवास डायरीत नाहीच!!!

चेतन माने's picture

29 May 2013 - 1:16 pm | चेतन माने

काय झक्कास फोटू आलेत, खास करून त्या माश्यांचे फोटू तर अद्भूत आहेत.
बाकी रद्द हा शब्द तुमच्या प्रवास डायरीत नाहीच!!!
पुभाप्र :):):)

गोर्‍या ऑस्ट्रेलियनांचं 'मूळ' हे उद्धटपणं वागण्याचं कारण असावं. (इंग्लंडातल्या अट्टल गुन्हेगारांना शिक्षेसाठी पाठवून नंतर त्यांनी तिथेच राहणं. ह्यावरुन श्रीलंकन रणतुंगा काही म्हणाला होता.)
तो त्यांचा 'नैसर्गिक स्वभाव' झाला आहे. :)
एखादा नरमून वागला तरच नवल.

मृत्युन्जय's picture

29 May 2013 - 1:34 pm | मृत्युन्जय

पहिल्या भागापासुन प्रतिक्रिया द्यावी म्हणत होतो. पण काहितरी पिराब्लेम होता मराठी टंकण्यात.

खुपच सुंदर लेखमाला. आणि तुमच्या पर्यटनकौशल्याचा हेवा वाटतो. :)

फोटोज एकदम भारी. अप्रतिम.

शेवटून ६ व्या फोटो मधला माणुस ओबामा सारखा दिसतो आहे. :) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2013 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

संजय क्षीरसागर, चेतन माने, प्यारे१, मृत्युन्जय आणि अजो : सहलीतील सहभागासाठी धन्यवाद !

सुहास झेले's picture

30 May 2013 - 9:43 am | सुहास झेले

सरांनू, आता शब्द नाहीत हो कौतुकाचे... अगदी स्वप्नवत सफर सुरु आहे आमच्यासाठी.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2013 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

नानबा's picture

31 May 2013 - 11:12 am | नानबा

अप्रतिम. कोरल्सचे फोटो बघितल्यावर बर्‍याच वर्षांपूर्वी अंदमानच्या रॉस बेटावर केलेलं स्नॉर्केलिंग आणि प्रवाळदर्शनाच्या आठवणी जाग्या झाल्या. अर्थात तुमचे फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर...

या भागातली समुद्रसफर विशेष आवडली.

बाकी तुम्ही पाहिलेल्या देशांपैकी अजून कुठला देश ऑस्ट्रेलियाइतका उद्धट आहे?

(आम्ही महाराष्ट्र सोडू की नाही ते एकवेळ सोडा, पण उत्सुकता ;) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2013 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम फडणीस आणि बॅटमॅन : धन्यवाद !

@ बॅटमॅन : त्या दुसर्‍या देशाचे नाव आताच सांगून पुढच्या एका सफरीतील गुपित उघडे होईल ना ! सबर का फल मीठा होता हय. हय के नय ? ;)

बॅटमॅन's picture

31 May 2013 - 6:12 pm | बॅटमॅन

हय हय :D

नेहमी काय कौतुक करायचे असे वाटते पण प्रतिसाद दिल्याशिवाय राहवत नाही. सुंदर फोटू व माहिती. ऑस्ट्रेलियातील बेपर्वाई हा नवीन प्रकार समजला. हे माहित नव्हते. क्रिकेट खेळताना ते अचरटपणा करतात, अपमान करतात हे ऐकून होते पण हा त्यांचा आगाऊपणा सगळीकडेच दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 10:29 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पैसा's picture

1 Jun 2013 - 8:12 pm | पैसा

एकूण वर्णन आणि फोटो खासच आहेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2013 - 10:52 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !