किवी आणि कांगारूंच्या देशात १८ : नीलगिरी (Blue Mountains) ची सफर आणि समारोप

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Jun 2013 - 3:24 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

आजचा सहलीचा अठरावा आणि शेवटचा दिवस. दिवस उजाडला तेव्हा मनात हेच विचार आले. अ...ठ...रा दिवस संपले? आणि उद्या परतायचे??? घोर अन्याय!!!... पण आजच्या सफरीची बरीच स्तुती ऐकून होतो. त्यामुळे मनाला आवरून पटापट आवरले आणि लवकर बसमध्ये दाखल झालो. कारण आज सगळ्यात पुढची जागा पकडली तरच सुंदर निसर्गाचे चांगले दर्शन आणि फोटो मिळणार होते.

आज शहराबाहेर दूर हार्बर ब्रिजवरून पलीकडे जायचे होते...

१९३२ साली बांधून पूर्ण झालेल्या या पुलाला त्याच्या बाजूने पाहिले असता दिसणार्‍या त्याच्या आकारामुळे " द कोटहँगर" असे नाव पडले आहे. लांबून हा पूल इतका मोठा असेल असे वाटत नाही. पण याची रुंदी ४८. ८ मीटर आहे आणि याच्यावर चारचाकीच्या आठ लेन, सायकलीची एक लेन आणि रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. याच्या कमानीची उंची पाण्याच्या पातळीच्या १३४ मीटर वर आहे आणि त्यामुळे हा पूल १९६७ पर्यंत सिडनितिल सर्वात उंच बांधकाम होता. अजून गंमत अशी की याच्यावरच्या चारचाकीच्या २. ४ किमी लांबीच्या मुख्य चार लेन मिळून असलेल्या रस्त्याला (इतर दोन लेन प्रथम ट्रॅमच्या होत्या, त्याचे आता चारचाकीच्या रस्त्यात परिवर्तन केले आहे) ब्रॅडफिल्ड हायवे म्हणतात... हा ऑस्ट्रेलियातील सगळ्यात कमी लांबीचा हायवे आहे!

मुख्य शहराचा गजबजलेला भाग मागे पडला आणि हिरवाईने भरलेली सुंदर उपनगरे सुरू झाली... \

.

थोड्याच वेळात पहिला थांबा, "फेदरडेल वाइल्डलाईफ पार्क" आला. एका खाजगी पोल्ट्री फार्म म्हणून सुरुवात झालेल्या या जागेची सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य शैक्षणिक आणि प्राणिसंरक्षण संस्थांत गणना होते. अजूनही पार्कची मालकी खाजगीच आहे तरीसुद्धा तो वर्षाचे सर्व दिवस उघडा असतो आणि प्रवेश विनामूल्य आहे! १९७५ साली सरकारने ही जागा आपल्या आराखड्यात इमारती बांधण्यासाठीच्या जागेत सामील करून टाकली. पण जागरूक नागरिकांनी मुख्य मंत्र्यांना (प्रिमियर ना) हजारो सह्यांचे निवेदन देऊन हा निर्णय परत फिरवायला भाग पाडले होते.

येथे फक्त उडून जाऊ शकतील असेच पक्षी त्यांच्या प्रशस्त पिंजर्‍यात बंद आहेत बाकी प्राणी आपापल्या भरपूर जागांत मुक्तपणे फिरत असतात आणि प्रवाशांना त्या जागांत फिरून त्याची ओळख करून घेता येते. तेथील काही प्राण्यांची चित्रे...

.

हे जोई (कांगारूचे पिलू) आईच्या पिशवीतून उडी मारून बाहेर पडले आणि आई जरा दूर जाताच त्याची इतकी भंबेरी उडाली की सांगता सोय नाही. पण एका सजग वॉर्डनने लगेच तेथे येऊन सगळ्या प्रवाशांना एका बाजूला करून त्याला त्याच्या आईपर्यंत जाण्याची वाट करून दिली...

.

.

.

.

.

.

 ...............

.

.

पार्कमधून बाहेर पडलो आणि सफर पुढे चालू झाली. थोड्याच वेळात शहर मागे पडून जंगली निसर्गाने आपले रुपडे दाखवायला सुरुवात केली...

अजून थोडे पुढे गेलो आणि त्या सौंदर्यात मानवाने आपल्या सौदर्यदृष्टीने घातलेली भर पडून ते अधिकच उजळून आलेले दिसत होते...

यापुढे दिसणारी सगळी पानगळ होणारी रंगीत वृक्षसंपत्ती ही येथील खाजगी आणि सरकारी प्रयत्नाने परदेशांतून आणून वाढवलेली आहे. जंगलातील मूळ झाडांपैकी ९५ टक्के नीलगिरीची आहेत. नीलगिरी आणि येथील इतर मूळ झाडे पानगळी वृक्षांपैकी नाहीत.

वाटेत "बिल्पीन फ्रूट बोल" नावाच्या फळबाग आणि रेस्तरॉमध्ये थांबा घेतला. समोर बनत असलेले गरमागरम अ‍ॅपल पाय आणि मोका... मस्त अल्पोपाहार झाला. ही इथली खासियत आहे असे गाईड म्हणाला ते खरेच होते. अ‍ॅपल पाय ओव्हनमधून काढले की पाच मिनिटाच्या आत संपून जात होते...

परत प्रवास सुरू झाला आणि जसजसे पुढे जात होतो तसे जंगल अधिकाधिक दाट होऊ लागले होते...

.

.

आणि अचानक एका बाजूला सरळसोट कापलेल्यासारख्या दिसणार्‍या कड्यांची रांग दिसू लागली...

येथून पुढे दूरपर्यंत दिसणार्‍या सगळ्या डोंगरांवर नीलगिरीच्या वृक्षांच्या पानावरच्या निळ्या छटेमुळे आलेली निळाई स्पष्ट दिसू लागली... यामुळेच या पर्वतराजीला Blue Mountains हे नाव पडले आहे.

रंगीबेरंगी नजारा दिसू लागला की ओळखायचे की आता कोणते तरी गाव येणार...

.

.

पण जंगलातले रस्तेही फार मागे होते असे अजिबात नाही...

मध्येच एक निसर्गरम्य थांबा घेतला. येथून या भागातल्या जेमिसन दरीचे, तिच्या बाजूच्या उभ्या कड्यांचे आणि नजरेच्या टप्प्याचा पलिकडेपर्यंत असलेल्या दाट नीलगिरी वृक्षराजीने भरलेल्या डोंगरदर्‍यांचे मनोहारी दर्शन होते...

.

दूरवर एका उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा...

नीलगिरीचे नैसर्गिक भव्य सौंदर्य डोळ्यात साठवून परत प्रवास सुरू केला तर परत मानवनिर्मित सौंदर्याचे छोटे छोटे टप्पे त्याच्याशी स्पर्धा करायला लागले...

.

काही वेळ ही गंमत पाहत प्रवास झाल्यावर आमचा दुपारच्या जेवणाचा थांबा आला...

.

ब्लु माउंटन्समधील काटूंबा हे एक रमणीय गाव आहे. तेथील गोल्फ क्लब फारच सुंदर आहेच पण खाणेपिणेही एकदम मस्त होते...

गोल्फ क्लब आणि परिसरराची अगदी मन लावून कलाकारीने निगा ठेवलेली आहे...

.

.

.

पोटोबा करून आमचा निसर्गरम्य प्रदेशातून परत प्रवास सुरू झाला...

थोडा वेळाने आमचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा थांबा आला. ही मोक्याची जागा म्हणजे "सेनिक वर्ल्ड (scenic world)...

येथे वरच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे अनेक आकर्षणे एकामागोमाग एक रांगेत आहेत. आम्हाला येथे सोडून बस एकदम शेवटच्या आकर्षणाकडे निघून गेली. येथून सर्वप्रथम स्कायवे नावाचा ७२० मीटर रोपवे तुम्हाला जंगलाच्या २७० मीटर उंचीवरून एका कड्यावरून दुसर्‍या कड्यावर घेऊन जातो. जंगलावरून तरंगत जाताना सर्व जेमिसन दरी तर दिसतेच पण आजूबाजूचे कडे दरीच्यावरून न्याहाळता येतात. स्कायवेची कार एका मोठ्या बसपेक्षा जास्त लांबरुंद आहे. तिला चारी बाजूंनी काचा आहेत, फक्त मध्यभागी काही भागावर लाकडी तळ आणि बसायला खुर्च्या आहेत. बहुतेक लोक काचांवर उभे राहून चारी दिशांना दिसणारा नजारा भान हरपून बघत होते...

.

.

.

तीन बहिणी (Three Sisters)...

हा प्रवास संपल्यावर सगळ्यांची एकच तक्रार होती, "हे काय. आताच तर मजा यायला लागली होती. एवढ्यात प्रवास संपला? "

पण थोड्या वेळातच केबलवेचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि दरीचे दुसर्‍या दिशेने मनोहर दर्शन करवतो...

.

.

.

इथेही निसर्गाचा पसारा पाहण्यात वेळ असा उडून जातो की अर्ध्या किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास कधी संपला ते कळ त नाही आणि अनेक मुखांत परत तीच तक्रार ऐकू येते! येथे पायउतार झाल्यावर २. ४ किलोमीटर लांबीचा पायरस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूला अतिप्राचीन जुरॅसिक वर्षारण्य आहे...

 ..................

प्राचीन झाडासारखा उंच वाढणारा "ट्री फर्न"...

वाटेत एका जुनी आता वापरात नसलेली काटूंबा कोळशाची खाण लागते...

या भागात पूर्वी कोळशाच्या अनेक खाणी होत्या. आता त्यातील ही एकच फक्त प्रवासी आकर्षण म्हणून जतन केलेली आहे...

हा भाग पण हा हा म्हणता संपतो आणि आपण एका रेल्वे स्टेशनवर पोहोचतो...

.

हा फक्त ३१० मीटरचा रेल्वे प्रवास संस्मरणीय होण्याची अनेक कारणे आहेत, ती अशी
१. हा रेल्वेप्रवास ५२ अंशांमध्ये वर /खाली होतो. अजून धाडसी असाल तर खुर्ची अधिक तिरकी करून तुम्ही ६४ अंशांमध्ये प्रवास करू शकता.
२. वर/खाली जाताना छताच्या आणि बाजूच्या काचांमधून जेमिसन दरीतील निसर्गसौंदर्य पाहता येते.
३. आणि मुख्य म्हणजे वरच्या बाजूला कडा आणि खालच्या बाजूला दरी अश्या अवस्थेत वेगाने धावणार्‍या रेल्वेतील सहप्रवाशांच्या चेहर्‍यावरचे "आता काही खरे नाही. काय दुर्बुद्धी सुचली आणि रेल्वेत चढलो. " असे भाव फुकटात बघायला मिळतात!...

जमिनीवर पाय टेकायला मिळाल्यावर मोठ्या दिव्यातून बाहेर पाडल्यासारखे अनेक सुस्कारे आणि आनंदाचे चित्कार ऐकायला मिळतात... बोनस म्हणून ते वेगळेच!

या ठिकाणी बस आमची वाट पाहत थांबली होती. तिने परत प्रवास सुरू केला...

.

थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या मोक्याच्या जागी पोहोचलो. या स्वतःच सुंदर असलेल्या विस्तीर्ण पठारासारख्या कड्याच्या टोकाला असलेल्या स्थानावरून परत एकदा वेगळ्या दिशेने नीलपर्वताचे मनोहर दर्शन झाले...

.

.

.

.

मागे फिरून परत वस्तीकडे आलो तर ही लंडनची डबल डेकर बस चक्क नीलपर्वताच्या डोंगराळ भागात दिसली...

तिचे थोडे कौतुक करून बाजूच्या मूलनिवासी केंद्रात गेलो. तेथे एका कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली होती...

.

ऑस्ट्रेलिया एक खंड आहे आणि तेथे असलेले मूलनिवासी अनेक जमातीत विभागलेले असणे स्वाभाविकच होते. मात्र इतक्या सगळ्या जमाती त्याच्या भाषा आणि रुढीवैशिष्ट्यांसह तेथे आहेत हे पाहून त्यांच्याबद्दल आपल्याला किती अज्ञान आहे हे उघड झाले!...

तेथील जथाप्रमुखाने आमचे स्थानिक पद्धतीने स्वागत करून कार्यक्रम सुरू केला आणि त्या जमातीच्या शस्त्रांची आणि रीतिरिवाजांची तोंडओळख करून दिली...

 ...............

त्यानंतर संगीत आणि नृत्याच्या आधारे तेथील मूलनिवासींचे दैनंदिन जीवन, आजूबाजूचे जंगल आणि त्यातील प्राण्यांची ओळख करून दिली...

.

.

.

मग आम्हीपण भाला रोखून त्यांच्यासारखी शत्रूला घाबरवणारी मुद्रा करून पोटू काढून घेतले !...

तिथल्या एका दुकानात हे एक लै भारी मशीन लावून ठेवलेले होतं...

किंमत विचारली, पण विकायची नाही म्हणाले म्हणून नाद सोडून दिला ...

परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा बहुतेक सगळेच पेंगायला लागले होते. त्यातच सिडनी जवळ येताच ज्याची ड्रायव्हर सतत धमकी देत होता तो प्रसिद्ध सिडनी ट्रॅफिक जॅम सुरू झाला...

.

.

.

पोहोचेपर्यंत पाच वाजले होते. पुढचा कार्यक्रमासाठी साडेसातला बाहेर पडायचे होते. ताबडतोप मस्तपैकी थकवानिरोधक गरमागरम शॉवर घेऊन सातचा गजर लावून ताणून दिली.

गजराने बरोबर उठवले. तयार होऊन लॉबीत गेलो तर इतर सहप्रवासीही या खास कार्यक्रमासाठी तयार होऊन उरलेल्या दोनतीन जणांची वाट पाहत होते. हॉटेल बाहेर अंधार दाटून आला होता. बस आली आणि आम्ही सहलीच्या शेवटच्या कार्यक्रमासाठी निघालो...

ऑपेरा हाउस या स्टेशनजवळ बांधावे अशी गव्हर्नरची इच्छा होती पण संगीत दिग्दर्शकाच्या आग्रहाने ते बंदराजवळच्या खडकावर बांधले गेले.

सिडनीची सार्वजनिक बस...

बंदरावरच्या "वॉटरफ्रंट रेस्तरॉ" मध्ये आम्हाला ग्लोबसतर्फे निरोपाचे भोजन होते...

.

उत्तम जागा, नावाजलेले रेस्तरॉ, उत्तम जेवण आणि आतापर्यंत सहप्रवासी न राहता मित्र झालेल्यांचा सहवास... हा अनुभव कसा होता हे काय सांगायलाच पाहिजे काय? पार्टी संपेपर्यंत सगळेच भावनावश झाले होते.

===================================================================

माझे विमान सकाळी सहाला निघणार होते. त्यामुळे पहाटे अडीचला हॉटेलमधून बाहेर पडायचे होते. विमानतळावर पोहोचवण्याची व्यवस्था टूर कंपनीकरवी केली होती. टूर निर्देशकाला "काही घोळ झाला तर तुला उठवेन. तुझा फोन नंबर माझ्याकडे आहेच." अशी प्रेमळ धमकी आदल्या दिवशी दिलेली होती. सगळी सगळी व्यवस्था नेटकी झाली आणि आमचे विमानतळाकडे प्रस्थान झाले.

सिडनी शहराच्या नावाला कीर्तीला साजेसा त्याचा विमानतळ आहे...

विमानतळावर सगळ्या गोष्टी बैजवार झाल्या आणि आमचे विमान वेळेवर सुटले. सिडनी ते दुबई चा १२,०६२ किलोमीटर आणि १४:३० तासांचा प्रवास सुरू झाला...

काही वेळाने मध्य ऑस्ट्रेलियाचे वाळवंट दिसू लागले...

.

.

.

एवढ्या मोठ्या भूभागावरचा तो प्रस्तर १० किलोमीटरवरून दिसेल अशी आशाही नव्हती पण तरी देखील डोळे उलुरुला शोधत होते.

ऑस्ट्रेलियाचा पश्चिम किनारा दूर जाऊ लागला आणि डाउन अंडरला अखेरचे पाहून घेतले...

.

त्यानंतर डोळ्यात झोप आणि खिडकीत ढग असाच प्रकार चालू होता. प्रथम जमिनीचे दर्शन झाले ते रामेश्वरमच्या पट्ट्याचे...

.

.

विमान बंगालच्या उपसागरावरून तामिळनाडूच्या किनार्‍यावरून आत येऊन भारताच्या भूमीवरून उडू लागले...

आणि केरळच्या किनारपट्टीवरून पुढे जात अरबी समुद्रावरून उडू लागले...

पुढे परत एका दोन तासांच्या डुलकीनंतर दुबईचा ओळखीचा परिसर दिसू लागला...

विमान दुबई विमानतळावर उतरले आणि तेव्हा ऑकलंडला जाताना झालेल्या घोळाची आठवण झाली आणि गेले अठरा दिवसांत त्या त्रासाची आठवणही झाली नाही याचे आश्चर्य वाटले!

दुबई-दम्माम विमान उडाले...

तासाभरात दम्मामचा किनारा दिसू लागला...

आणि "आता आपण आपल्या गल्लीत पोचलो आहोत, चिंता नाही." हा विचार मनात येऊन गार्गार वाटलं!

(समाप्त)

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Jun 2013 - 3:51 pm | पैसा

मस्त सफर झाली! आता कोणत्या सफरीवर नेताय?

रेवती's picture

14 Jun 2013 - 6:04 pm | रेवती

khoop sundar safar ghaDavaleet. dhanyavaad.

सहल अर्धवट राहिली होती. चला आता नविन सफर, आमचे विमान सुस्थितीत आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2013 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना अनेक धन्यवाद !

दर वेळी 'छान' 'आवडलेच' असे तेच तेच काय लिहायचे म्हणून प्रतिक्रिया दिली नव्हती. पण लेखमालिका खरोखर सुंदर झाली. आम्हाला एका वेगळ्या भूप्रदेशाचे विहंगम आणि भूतलदर्शन तर झालेच पण लेखनाआडून आपली प्रत्येक क्षणातला आनंद लुटण्याची धडपड, साहसी स्वभाव आणि अन्यायाची ताबडतोब तिथल्यातिथे तड लावून घेण्याची वृत्ती हे सतत डोकावत होते तेही मनोज्ञ वाटले. किंबहुना मलातर एकदोन आणीबाणीच्या प्रसंगांवर आपण कशी मात केलीत ते वाचायला अधिक आवडले. सततची सतर्कता आणि भरपूर गृहपाठ, पूर्वनियोजन यांमुळेच इतके मोठे प्रवास यशस्वी होऊ शकतात हेही जाणवले. एक दीर्घकालीन आनंददायी मालिका संपली याची हुरहूर आहे पण त्याचबरोबार आपण एखादी नवी मालिका सुरू कराल ही खात्रीही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2013 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

10 Nov 2013 - 10:11 am | सुधीर कांदळकर

आवडले हे लिहायची गरज नसली तरी लिहिलेच पाहिजे.

कित्येक महिने गावी होतो. महिन्यातून एकदोन वेळा जालावर येणे व्हायचे ते पण अर्धाएक तास. त्यामुळे जालावरचे वाचन जवळजवळ बंदच होते. आता काही कारणाने पुण्यनगरीतला मुक्काम वाढला त्यामुळे वाचन घडले, मुख्य म्हणजे सार्थकी लागले.

काल १६ भाग वाचले. आज उरलेले दोन. खास करून आवडली ती आपण केलेली स्थळांची निवड. मानवनिर्मित स्थळांऐवजी निसर्गाला दिलेले प्राधान्य. झकास, हॅट्स ऑफ्फ.

आता तुमच्याबरोबरच चीनच्या यात्रेला निघतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2013 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

लेखमाला खरंच खूप छान झाली आहे ... हि लेखमाला तिसऱ्यांदा वाचली आहे... तश्याच तुमच्या बाकीच्या लेखमाला सुद्धा ... उत्तर ध्रुवाची सफर ... चीनची सफर ... आणि हि सुद्धा ... खुसखुशीत वर्णन आणि त्या सोबत भरपूर फोटो पाहताना आपण स्वतः तो प्रवास करत आहोत असं वाटत ... ह्या लेखात especially न्यूझीलंड खूपच भावलं ... रोतोरुआ आणि wakatipu lake तर फारच सुंदर ...
तुमचे हे लेख वाचूनच ...नॉर्वे आणि न्यूझीलंड नक्की पाहायचंच असं ठरवलं आहे ... तुम्ही असेच प्रवास करत राहा .... शुभेच्छा !!

लेखमाला खरंच खूप छान झाली आहे ... हि लेखमाला तिसऱ्यांदा वाचली आहे... तश्याच तुमच्या बाकीच्या लेखमाला सुद्धा ... उत्तर ध्रुवाची सफर ... चीनची सफर ... आणि हि सुद्धा ... खुसखुशीत वर्णन आणि त्या सोबत भरपूर फोटो पाहताना आपण स्वतः तो प्रवास करत आहोत असं वाटत ... ह्या लेखात especially न्यूझीलंड खूपच भावलं ... रोतोरुआ आणि wakatipu lake तर फारच सुंदर ...
तुमचे हे लेख वाचूनच ...नॉर्वे आणि न्यूझीलंड नक्की पाहायचंच असं ठरवलं आहे ... तुम्ही असेच प्रवास करत राहा .... शुभेच्छा !!