किवी आणि कांगारूंच्या देशांत ०१ : तयारी आणि ऑकलंडकडे प्रयाण

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
30 Apr 2013 - 10:19 pm

====================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

====================================================================

किवी आणि कांगारू या प्राण्यांची माझी ओळख शालेय पुस्तकात झाली. हे जगावेगळे आणि काहीसे चमत्कारिक वाटणारे प्राणी जर खरोखरच बघायला मिळाले तर किती मजा येईल असे तेव्हा मला नेहमी वाटायचे. लहानपणी एकदा वर्तमानपत्रात कांगारू आपल्या देशात क्रिकेट खेळायला येणार असे वाचून "वा वा. आता आपण या प्राण्यांना इथेच बघू शकू" असे वाटून वडीलधार्‍या मंडळींना मला त्यांना बघायला घेऊन चला अशी गळ घातली होती. त्यांनी मिश्किलपणे हसत सहजासहजी होकार का दिला होता ते दुसर्‍याच दिवशी कांगारूंच्या संघाचा पेपरातला फोटो बघून समजले. नंतर सुरू झालेल्या चेष्टेला उत्तर म्हणून मीही, "मग भारताच्या खेळाडूंना का नाही वाघ-सिंह-मोर अशी आपल्या इथल्या प्राण्यांची नावे देत?" असे विचारून त्यांना बर्‍यापैकी निरुत्तर केले होते. मात्र या विचित्र प्राण्यांमुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांची भटकंतीच्या यादीत नकळत भर पडली होती. शिवाय नंतर या देशांबद्दलचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतशी त्यांची नावे यादीत वरवर सरकत गेली. असो.

जायचे ठरवल्यानंतर नेहमीप्रमाणेच आंतरजालीय शोधमोहीम हाती घेणे आलेच. बर्‍याच जालोत्खननानंतर ग्लोबस नावाच्या कंपनीची "डाउन अंडर डिस्कव्हरी" ही सहल पसंत पडली. कारण त्या सहलीत केवळ वरील प्राण्यांपेक्षा आता जास्त महत्त्वाच्या वाटणार्‍या उलुरू कातळ (आयर्स रॉक) आणि केर्न्सच्या बृहत् रोधक प्रवाळी (द ग्रेट बॅरिअर रीफ) सारख्या आकर्षणांचा समावेश होता. शिवाय ज्या इतर आकर्षणांचा मूळ सहलीत अंतर्भाव नव्हता ती वैकल्पिकररित्या पहाण्या-करण्यासाठी पुरेसा मोकळा वेळ ठेवलेला होता. या निवडलेल्या सहलीच्या मार्गाचा आराखडा ग्लोबसच्या सौजन्याने मिळालेल्या खालील नकाश्यात आहे:

चीनच्या सफरीत भेटलेल्या ऑस्ट्रेलियन सहप्रवाशाकडून या देशांना भेट देण्यासाठी मार्च हा महिना सर्वोत्तम असे कळले होते. याचे मुख्य कारण असे की या महिन्यात दक्षिण गोलार्धातला उन्हाळा संपून थंडीचा मोसम सुरू होतो पण थंडीचा कडाका सुरू होण्यास अजून काही अवधी बाकी असतो. त्यामुळे वातावरण गुलाबी थंडीचे आणि सुखद असते. तसेच हा मोसम पानगळीच्या दिवसांचा म्हणजे वृक्षांच्या रंगीबेरंगी पानांनी सजलेल्या निसर्गाचा काळ... अर्थातच डोळ्यांना मेजवानी. तर मग याच बेताने सुरुवात केली. पण काही कारणांनी तारीख पुढे जात जात ६ ते २५ एप्रिल असा बेत पक्का झाला. प्रथम जरा विरस झाला कारण आंतरजालावर एप्रिल महिन्याचे तापमान न्युझीलंडमध्ये ५ ते १० अंश सें. आणि ऑस्ट्रेलियात १० ते २० अंश सें. असे दिसत होते. पण प्रवासाचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसे कळू लागले की त्या वर्षी ऑस्ट्रेलियात उष्म्याची लाट चालू होती आणि एप्रिल महिन्यात तापमान सरासरीपेक्षा पाच एक अंशांनी जास्तच असणार होते. मार्चचे तापमान एप्रिलमध्ये सरकवल्याबद्दल निसर्गाचे मनोमन आभार मानले आणि प्रवासी बॅगेतला गरम कपड्यांचा भार कमी केला ! मात्र थर्मलवेअरचा एक संच मात्र तसाच ठेवला त्याचे कारण आताच सांगून पुढची मजा कमी करत नाही. सब्र का फल मीठा होता है... है की नै? ;)

आता व्हिसाची तयारी सुरू झाली. आजपर्यंत सर्वसाधारणपणे सगळे पर्यटन व्हिसा एक दोन आठवड्यात मिळाले होते त्यामुळे जरासा निर्धास्त राहिलो. पण तेथेच घोळ झाला. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडच्या व्हिसा देण्याच्या पद्धती इतरांपेक्षा एकदम वेगळ्या निघाल्या. पहिले तर गल्फ आणि उत्तर आफ्रिकेत वास्तव्य असणार्‍यांसाठी (अगदी नागरीक असणार्‍यांनाही) दुबईच्या एंबॅसीतच अर्ज करावा लागतो. त्यासाठी अर्ज, पासपोर्टची प्रत (मूळ पासपोर्ट नाही) आणि इतर कागदपत्रे पाठवावी लागतात, इथपर्यंत ठीक होते आणि ती जमवाजमव केलीही. नशिबाने ऑस्ट्रेलिया एंबॅसीतर्फे कागदपत्र स्वीकारण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचे एक ऑफिस दम्माममघ्ये होते हे ही फार छान होते. मात्र ऑस्ट्रेलिया व्हिसा फी केवळ डिमांड ड्राफ्टने घेणार असे त्यांच्या वेबसाइटवर कळले. पण माझे खाते असलेल्या बँकेने "आम्ही युएई मघे वटणारा डीडी देत नाही" असे सांगितले. सौदिमधल्या सर्वात मोठ्या खाजगी बँकेकडून असे काही ऐकावे लागेल असे वाटले नव्हते. इतर बँकाही आमच्याकडे खाते असेल तरच डीडी देऊ अन्यथा नाही असे म्हणू लागल्या. एजन्सीच्या ऑफिसमध्ये मुलाखतीची वेळ घेऊन नकद रक्कम भरावी या हेतूने गेलो. तेथे त्यांनीही डीडीला पर्याय नाही असेच सांगितले. शेवटी एका स्थानिक मित्राला गाठून त्याच्या बँकेतून डीडी घेतला आणि परत वेबसाईटवर मुलाखतीची वेळ घेऊन व्हिसाचा अर्ज देऊन आलो. पण या सगळ्या सोपस्कारात एक आठवडा खर्ची पडला. अर्ज स्वीकारताना एजन्सीतील ऑफिसरने, "अहो तुमची सहलीची तारीख फक्त पाच आठवड्यानंतर आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाला सहा आठवडे सहज लागतात." असे म्हणून सज्जड धक्का दिला !

या सगळ्यात न्यूझीलंडच्या व्हिसाचे काम मागेच राहिले होते. कारण पहिला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा स्टँप करून घेऊ व मग न्युझिलंडचे काम करू असा सोपा हिशेब मनात होता. दरम्यान रियाधच्या न्यूझीलंड एंबॅसीमध्ये फोन करणे चालू होतेच पण स्वयंचलित यंत्रणेवर 'प्रथम हा नंबर फिरवा मग तो नंबर फिरवा' असे करत करत मध्येच फोन बंद होत होता. नंतर आंतरजालावरून कळले की न्यूझीलंडच्या व्हिसालाही मूळ पासपोर्ट लागत नाही आणि दम्माममध्ये त्यांची कोणतीही एजंसीपण नाही. अर्ज आणि इतर कागदपत्र क्रेडिट कार्डच्या डिटेल्ससह थेट दुबईच्या व्हिसा ऑफिसमध्ये पाठवायचे असतात आणि तेच प्रथम फी वसूल करून मग व्हिसाची कारवाई सुरू करतात. ताबडतोप कुरियरने सर्व कागदपत्र पाठवून दिले. त्यांची दोन दिवसांनी ईमेल आली की "तुमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड आमची सिस्टीम स्वीकारत नाही". झाले, दुष्काळात तेरावा महिना ! शेवटी परत स्थानिक मित्राला पकडून त्याच्या क्रेडिट कार्डाचे डिटेल्स ईमेलने पाठवले. मग मात्र त्याच दिवशी अर्ज दाखल करून घेतल्याची ईमेल आली... पण "तुमच्या सहलीची तारीख फारच जवळची आहे. त्या मुदतीत व्हिसा देण्याची खात्री देऊ शकत नाही. आमच्या ऑफिसमधून व्हिसा ऑफिसरतर्फे तुम्हाला संदेश येईल." अश्या प्रेमळ इशार्‍यासकट!

मी तर विमानाचे तिकीट काढून आणि सहलीची सर्व फी भरून मोकळा झालो होतो. जीव टांगणिला लागतो म्हणजे नक्की काय होते याचा प्रदीर्घ अनुभव सुरू झाला होता! कामाच्या गडबडीत गुंतलेला नसेन तेव्हा मला सारखे 'सहलीचा दिवस उलटून गेला तरी व्हिसा आला नाही आणि सगळे पैसे पाण्यात बुडाले' असे भास व्हायला लागले !

दोन आठवडे उलटले तरी दोन्ही एंबँसींमधून काहीही संदेश आला नाही. त्यातच ग्लोबसने २६ पानी फायनल कन्फर्मेशन दस्तावेज पाठवून 'आता सहलीत काहीही बदल केला तर मजबूत दंडास तयार राहावे' असा वैधानीक इशाराही दिला ! मग राहवेना. न्यूझीलंड व्हिसा ऑफिसने सांगितल्याप्रमाणे अपेक्षीत असणारी ईमेल आली नव्हती या काडीचा आधार (बुडत्याला काडीचा आधार या चालीवर) घेऊन "आपली ईमेल अजून मिळाली नाही म्हणून चौकशी करत आहे. त्याचबरोबर हे आताच हाती आलेले टूर कंपनीचे फायनल कन्फर्मेशन दस्तावेज आपल्या माहितीसाठी जोडत आहे." अशी ईमेल पाठवली त्यांना पाठवली. दोन दिवसांनी ईमेल आली की, "तुमचा व्हिसा मंजूर झाला आहे. व्हिसा लेबल चिकटवायला पासपोर्ट कुरियरने ताबडतोप पाठवून द्या." लगेच आमच्या हॉस्पीटलच्या कुरियरला फोन फिरवला. तर त्यांच्या कंपनी पॉलीसीप्रमाणे ते पासपोर्ट स्वीकारू शकत नाही असे कळले. अनोळखी कुरियरच्या हाती पासपोर्ट देणे जिवावर आले. एंबॅसीच्या वेबसाइटवरील एका विधानाचा आधार घेऊन व्हिसा ऑफिसरला 'ईमेल व्हिसा एंडोर्समेंट' ची विनंती केली. पलीकडचा बाईसाहेबांनी साफ नकार दिला, पण त्याचबरोबर एका कुरियर कंपनीचे नावही सुचवले. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. सरळ त्याच दिवशी त्यांनी सुचवलेल्या कुरीयरबरोबर पासपोर्ट पाठवून दिला.

एक प्रकरण जरा रुळावर आले होते पण दुसरे घोंगडे अजून भिजतच पडलेले होते. मग ऑस्ट्रेलियन व्हिसा ऑफिसलाही वरच्या सारखीच ईमेल पाठवली आणि ग्लोबसच्या दस्तऐवजासोबत न्यूझीलंड एंबॅसीतून आलेली व्हिसा कन्फ़र्मेशनची ईमेलही जोडून दिली. अहो आश्चर्यम्! दुसर्‍याच दिवशी ईमेलमध्ये ऑस्ट्रेलियाची 'व्हिसा ग्रँट नोटिस' आली!! आणि तीही शुक्रवारी, जो इथला आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असतो !!! व्हिसा लेबल चिकटवण्याची सक्ती ऑस्ट्रेलिया करत नाही... केवळ व्हिसा ग्रँट नोटीस पुरेशी असते. नंतर अनुभव आला की ती नोटीसही केवळ आपल्या माहितीसाठीच असते. ऑस्ट्रेलियात प्रवेश करताना मी ती नोटिस येवढ्या कौतुकाने पुढे केली पण इमिग्रेशन ऑफिसरने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही :( त्याने पासपोर्ट संगणकात स्वाईप केला आणि मॉनीटरवर पाहून दहा सेकंदात शिक्का मारून वेलकम म्हणाला. (ही काय वागण्याची पद्धत झाली !? केवढ्या कौतुकाने ती नोटीस घेऊन मी हजारो किलोमीटर दूर प्रवास केला होता !)

आता फक्त न्यूझीलंड व्हिसासकट पासपोर्ट हातात येण्याची वाट पहायची होती. मात्र इतक्या सगळ्या गोंधळामुळे 'अजून काही घोळ बाकी राहिला तर नाही ना?' अशी शंकेची पाल चुकचुकत राहिलीच. पासपोर्ट पुढच्या चार-पाच दिवसात हाती आला आणि मग मात्र टांगलेला जीव खाली येऊन भांड्यात पडला. हुश्श्य !

====================================================================

सहलीचा दिवस उजाडला आणि आम्ही दम्माम - दुबई - मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) मार्गे - ऑकलंड (न्यूझीलंड) अशा १४,८६१ किलोमीटरच्या आणि साडेअठरा तासांच्या प्रवासाला घरातून भल्या पहाटे एक वाजता बाहेर पडलो. दम्माम-दुबई हा सव्वा-दीड तासाचा प्रवास अंगवळणी पडलेला होताच. दुबई-मेलबर्न हा प्रवास मात्र आतापर्यंत केलेल्या सलग विमांप्रवासातील सर्वात मोठा म्हणजे ११,६५६ किमी आणि साडेतेरा तासांचा होता. पण ए-३८० हे एअरबसचे अत्याधुनिक विमान असल्याने बसायची आसने जरा सुटसुटीत होती आणि पाय पसरायला जागाही छान होती. कधी डुलक्या घेत, मधूनच खिडकीतून डोकावत (दीड महिना अगोदर बुक केलेली खिडकीवाली खुर्ची होती राव !) आणि कधी चित्रपट पाहत वेळ घालवला... लाईफ ऑफ पाय, हॉबीट आणि एक (नाव विसरलो) असे एकूण तीन चित्रपट पाहून झाले +D ! या प्रवासातले हे काही क्षण...

दुबई विमानतळाचे टर्मीनल ३...

प्रवासाची सुरूवात...

.

भारतावरून उड्डाण...

मेलबर्नला उतरताना त्याचे झालेले पहाटेचे दर्शन...

मेलबर्नच्या थांब्याला (स्टॉपओव्हर) १ तास ३५ मिनिटे विमानातच बसून रहायला लागणार होते. मेलबर्नची पाशिंदरं उतरली आणि ऑकलंडला जाण्यारी नवीन पाशिंदरं गाडीत चढली की तेच विमान पुढे जायला उडेल असा आराखडा होता. पण विमान मेलबर्नला उतरायला उंची कमी करू लागले तेव्हाच कप्तानाने "प्रवाश्यांनी आपला सगळा बाडबिस्तरा घेऊन खाली उतरावे आणि ४५ मिनिटात १४ नंबरच्या निर्गमन द्वाराजवळ यावे" असे सांगितले. एवढ्या लांबच्या प्रवासात विमानात खूप कचरा साठतो त्यामुळे नीट सफाई करण्याकरिता बर्‍याच वेळा असे करतात. शिवाय ऑस्ट्रेलियाचा बहुप्रवेश व्हिसा हाती होताच त्यामुळे निर्धास्त होतो. जरासे रमत गमत विमानतळावर इकडे तिकडे फिरत ४५ मिनिटाने निर्गमन द्वाराजवळ पोहोचलो. अर्थातच आधिचे आणि नवीन असे मिळून साधारण ५००+ प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. प्रवासाची वेळ होऊन ३० मिनिटे अधिक लोटली तरी विमानात बसण्याची घोषणा झाली नाही तेव्हा मात्र सर्व प्रवाशांत चलबिचल सुरू झाली आणि विमानकंपनीला माहिती देण्यासाठी घोषणा करणे भाग पडले... पण त्या घोषणेनंतरही 'विमानात काही तांत्रिक बिघाड आहे आणि तो केव्हा दुरुस्त होईल हे माहीत नाही' याच्या पलीकडे काहीच माहिती मिळाली नाही.

विमानकंपन्यांच्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे उशीराचे चार तास झाले तसे सर्वांना उपहाराची कूपने देणे सुरू झाले. माझी मात्र जेवणावरची वासनाच उडून गेली होती. माझी सहल २९ प्रवासी आणि एक सहल निर्देशक अशी तीस जणांची एकत्र सहल होती. नशिबाने तो पहिला दिवस ऑकलंडमधल्या वस्तीचा होता पण दुसर्‍याच दिवशी बसने पुढच्या ठिकाणी जायचे होते. त्यामुळे जर आज रात्रीपर्यंत ऑकलंडला पोचलो नाही आणि माझ्याविना सहल पुढे गेली तर काय करावे लागेल अश्या विवंचनेत मी पडलो होतो. विमानकंपनीच्या कर्मचार्‍यांची तुटपुंजी आणि उडवाउडवीची उत्तरे रागात आणि त्यापेक्षा जास्त काळजीत सतत भर टाकत होती. पण त्यांच्याशी भांडूनही काही फायदा नव्हता. कारण पर्यायी विमानाची सोय करण्याची वेळ आली तर एखादा तुसडा ऑफिसर जाणूनबुजून सगळ्यात शेवटच्या विमानात जागा देवून उट्टे काढेल ही भिती होती. (आणि तिथला मुख्य ऑफिसर तर एकदम खडूस होता... त्याच्या वागण्याबाबत मी सहलीवरून परत आल्यावर विमानकंपनीकडे तक्रारसुद्धा केली.)

वाट पाहत कंटाळलेल्या प्रवाशांनी गट करून 'विमानात तांत्रिक बिघाड' म्हणजे नक्की काय यावर चर्चा सुरू केली. कोणाच्या मते विमान उतरताना धावपट्टीवर जरा जोरातच आदळले होते त्याचा हा परिणाम होता तर काहींनी कॉकपिटमध्ये धूर झाल्याची हवाईसुंदऱ्यांमध्ये चाललेली चर्चा ऐकल्याचे सांगितले. इतका उशीर होऊन बिघाड ठीक होत नव्हता म्हणजे प्रकरण नक्कीच गंभीर होते. त्यामुळे पर्यायी विमानाची व्यवस्था आणि तीही लवकरात लवकर करतील तर बरे असे वाटत होते. कारण आता याच विमानातून उडणे कोणालाच बरे वाटत नव्हते.

हेच ते मेलबर्नचे निर्गमनद्वार १४... हे कायमचे स्मरणात राहील... आयुष्यात कोणत्याच दारासमोर इतका वेळ कधीच उभा राहीलेलो नाही !

पाहता पाहता सहा तास झाले तरी दोष दूर होईना तसे मग प्रवाशांची पर्यायी विमानातून जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी घोषणा झाली. पण हे कामही तितके सोपे नव्हते. कारण ऑकलंड हे जरी न्यूझीलंडमधले सर्वात जास्त लोखसंख्येचे शहर असले तरी मेलबर्न-ऑकलंड या मार्गावर काही फार वर्दळ नसते. सगळी मिळून संपूर्ण न्यूझीलंडची लोकसंख्या ४५ लाख. असे असताना त्याच्या कोणत्याच शहराच्या मार्गावर काही तासांत ५००+ अतिरिक्त प्रवासी वाहून नेण्याएवढी विमानांची फार मोठी वर्दळ कशी असू शकेल? असो. नवीन विमानांत जागा मिळालेल्या प्रवाशांची नावे पुकारली जाऊ लागली. माझी अडचण सांगूनही माझे नाव पहिल्या यादीत नव्हतेच! सात तासांचा उशीर झाला होता आणि आता मात्र माझी काळजी कळसाला पोचली होती. दुसर्‍या यादीतही नाव नव्हते. आता काहीतरी हालचाल करणे भागच होते. शेवटी एका ऑफिसरला गाठून परत एकदा सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. तो जरा सहृदय निघाला. त्याने बर्‍याच वेळा पुकारूनही न आलेल्या पहिल्या यादीतील एका प्रवाशाच्या जागी माझे नाव टाकले आणि मला बोर्डिंग कार्ड दिले. सुटकेचा निःश्वास टाकून धावतच नवीन निर्गमन द्वार गाठले. चेकईन करताना पूर्वीच्या विमानात चेकईन केलेल्या बॅगेबाबत चौकशी केली तर तिथल्या बाईसाहेबांनी सांगितले की, "काळजी करू नका मी तुमच्या बॅगेचा क्रमांक नोंदवला आहे, बॅग विमानाबरोबर येईल." चला, सुटकेचा निःश्वास सोडून विमानात बसलो.

मेलबर्न-ऑकलंड हा प्रवास २,६२९ किलोमीटरचा आहे आणि उडून जायला तीन तास लागतात. कर्मधर्मसंयोगाने खिडकीजवळची जागा मिळाली...पण जागा मिळाली हेच खूप होते! विमानाने आकाशात झेप घेतल्यावर झालेले हे मेलबर्न आणि त्याच्या परिसराचे झालेले दर्शन...

.

.

अगोदरच्या कटकटींमुळे थकवाही आला होता. सरळ ताणून दिली. अल्पोपाहार देण्यासाठी हवाईसंदरीने एकदा जागे केले तेव्हाची पंधरा मिनिटेच ती काय जागा होतो. तसा सगळा प्रवास समुद्रावरून असल्याने विमान उडता-उतरतानाच काय तो शहरांचा नजारा दिसणार होता म्हणा. प्रवास ठीकठाक झाला. इमिग्रेशनचे सोपस्कार आटपून बॅग घ्यायला गेलो तर तिथे पुकारा सुरू होता की, "दुबईहून आलेल्या प्रवाशांनी आपल्या चेकईन केलेल्या सामानाची नोंदणी 'बॅगेज सर्व्हिसेस' वर करावी". थोडक्यात आमच्या मूळ विमानातील कोणाच्याही बॅगा नवीन विमानातून आणल्या नव्हत्या! त्या कधी आणल्या जातील याची कल्पना नाही पण उद्या मिळतील असे कळले. मग परत चारदा विचारल्यावर नाईलाजाने माहिती दिली गेली की बॅगा रात्री बारापर्यंत पोचतील, त्यानंतर कस्टमतपासणी होऊन नंतर प्रत्येकाने लिहून दिलेल्या पत्त्यावर पोचविणारी बस सहा वाजता विमानतळाबाहेर पडेल. आमच्या सहलीची बस तर सकाळी सात वाजता हॉटेलच्या बाहेर पडणार होती. शेवटी थोडी हुज्जत घालून कबूल करवून घेतले की बॅगा आल्यावर मला हॉटेलमध्ये फोन करून कळवले जाईल आणि मी स्वतः विमानतळावर येऊन माझी बॅग ताब्यात घेईन. यात मला त्रास आणि खर्च सोसावा लागणार होता. पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता... कारण बॅगा घेऊन येणारी बस माझ्याच हॉटेलवर पहिल्यांदा आणि तीही सातच्या आत येण्याची शक्यता नगण्यच होती म्हणा.

हॉटेलवर येऊन प्रथम सहल निर्देशकाला गाठले. त्याच्याकडे माझ्या या विमानप्रवासाची माहिती होतीच आणि मी वेळेवर न पोचल्याने विमानतळावर चौकशी करून मला का उशीर झाला याची माहिती त्याने काढली होती. त्यामुळे एकमेकाला प्रत्यक्ष भेटल्यावर दोघांनाही तितकाच आनंद झाला! रखडलेल्या बॅगेबाबत चर्चा करून मी ठरवलेला मार्गच ठीक आहे अशी आमची संमतीही झाली.

स्थानिक वेळेप्रमाणे रात्री ९ वाजता म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा मी ८ तास उशीरा पोचलो होतो. त्यामुळे मी ठरवलेल्या ऑकलंडच्या स्काय सिटी टॉवरची खाजगी भेट आणि त्याच्यावर असलेल्या फिरत्या रेस्तरॉमधील जेवणाच्या बेताचा खेळखंडोबा झाला होता. शिवाय कॅमेर्‍याचा बॅटरी चार्जर मी चेकइन केलेल्या बॅगेतच ठेवला. त्यामुळे तो ताब्यात येईपर्यंत फोटोही जपूनच काढावे लागणार होते.

खोलीत जाऊन एक दीर्घ शॉवर घेतला तेव्हा जरा हुशारी आली पण काळजी तशीच कायम होती. न राहवून साडेदहा वाजता विमानतळावर फोन केला. आता मात्र जरा एका समजूतदार बाईसाहेबांनी फोन उचलला. माझी कर्मकहाणी ऐकून त्यांना माझी कणव आली असावी. त्यांनी सविस्तर माहिती दिली की रात्री १२ वाजता सगळ्या बॅगा येणार आहेत आणि कस्टम्स तपासणी झाली की माझी बॅग त्या चार वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचवण्याची सोय करतील. पण आतापर्यंतच्या अनुभवाने यावर पटकन विश्वास बसणे जरा कठीणच गेले! साडेचार वाजताचा गजर लावून झोपलो. हो, सामान आले नाही तर विमांतळावर जाऊन ते वाटप करणार्‍या बसमध्ये चढवले जाण्याअगोदर त्यावर कब्जा करून सातच्या आत परत हॉटेलवर येणे फार जरूरीचे होते ना !

इतका थकवा आला होता तरी झोपण्याची केवळ धडपडच चालू होती. दर तासाला झोपमोड होत होती. सव्वाचार वाजले तरी हॉटेलच्या रिसेप्शनवरून काही फोन येत नाही असे बघून स्वतःच फोन फिरवला. विमानतळावरून बॅग आली का म्हणून चौकशी केली तर बेलबॉय म्हणाला, "हो आलीय, घेऊन येतो". बॅग खोलीत ठेवताना म्हणतो कसा, "साडेतीनलाच बॅग आली पण उगाच कशाला तुमची झोपमोड करायची म्हणून फोन केला नाही." आता याचे मी काय करू? इकडे मी बॅग आली नाही म्हणून तळमळतोय आणि हा झोपमोड करायला नको म्हणून बॅग घेऊन बसला होता ! मात्र बॅगेला बघूनच इतके भरून आले की त्याला मनोमन माफ करून टाकले !

(क्रमशः )

====================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

====================================================================

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2013 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी

काय म्हणावे, या सर्व सहलींसाठी पुन्हा एकदा दंडवत स्वीकारा...

विमानबिघाडामुळे घडणार्‍या विलंबाचा थरार फारच त्रासदायक असला तरी तुमच्या शब्दांमध्ये रोचक वाटतो.

शेवटचे वाक्य फारच भावले.

या लेखनप्रपंचासाठी अनेक धन्यवाद. पुभाप्र.

सुहास झेले's picture

30 Apr 2013 - 10:39 pm | सुहास झेले

वाह... मस्त सुरुवात. चला या निम्मिताने आमचीही भटकंती :) :)

सूड's picture

3 May 2013 - 2:06 pm | सूड

+१

चाणक्य's picture

30 Apr 2013 - 10:44 pm | चाणक्य

नुसता फिरत असतो हा माणूस..... (ह.घ्या. हो)
तुमच्या लेखमाले मुळे आम्हालाही पुष्कळ माहिती मिळते. तुमची प्रवासवर्णनं म्हणजे एकदम लाजवाब.... नविन प्रवासासाठी उत्सुक आहे....

मुक्त विहारि's picture

30 Apr 2013 - 10:47 pm | मुक्त विहारि

मस्त लिहित आहात..

आतिवास's picture

30 Apr 2013 - 10:48 pm | आतिवास

तुमच्या वर्णनशैलीमुळे आपण स्वतः प्रवास करत आहोत असं वाटतं.
ही मालिकाही वाचनीय असणार यात शंका नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2013 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनशैली सुरेख असल्यामुळे लेखन सहज वाचून होते आणि आपल्या सोबत आमचाही प्रवास चालू आहे, असे वाटू लागते.
विमानाची बिघाड, ताटकळत बसणे, ब्यागांची हुरहुर उत्तम उतरली आहे.

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

यात्रीयोंसे निवेदन है कृपया अपनी सीट की पेटी बांध ले!
हमारे कॅप्टन इस्पिकचा एक्का आपको एक बडी दिलचस्प सफर का एहसास कराने वाले है.
धन्यवाद....

(सीट की पेटी साठी भा.षांतरकाराला एक 'जादू की झप्पी' ;) द्यावीशी वाटते. पण सध्या ते महत्त्वाचं नाही)

"कुर्सी" की पेटी रे... सीट की पेटी नाही.

वाचतोय..

प्यारे१'s picture

1 May 2013 - 12:53 am | प्यारे१

तेवढं चालतं रे. नेमकं पेटी कशाला म्हणतात ते समजत नाही.

एक्काशेठ, माफी द्या अवांतरासाठी.

मला सकाळी कोणती भाजी केली होती ते संध्याकाळी नक्की सांगता येत नाही!

प्यारे१'s picture

1 May 2013 - 12:16 am | प्यारे१

प्रतिसाद १. स्वतः बनवूनही?
२. सौ.ना विचारा. पुन्हा विसरणार नाही.
३. भाजीचा भासच तो. लक्षात राहिलं काय नि नाही राहिलं काय!
४. आश्चर्य काय? मला तर १९८५ साली मी युगांडाला जाताना विमानात शेजारी बसलेल्या क्रोएशियन यना घेऊन्जा च्या अंगठ्याचं नेलपॉलिश पण आठवतं.

.... सध्या घाईत आहे म्हणून एवढंच.
(प्रतिसाद किती वेळात उडेल? ;) )

प्यारे काका.. स्कोर सेटल करत आहात का..? ;-)

मुळात स्कोर सेटल करण्यासाठी मैदानात स्पर्धेत उतरावं लागतं. आमची तेवढी तयारी नि पात्रता नाही.
आपुलकीने केलेल्या चौकशीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. ;)

बॅटमॅन's picture

1 May 2013 - 12:24 am | बॅटमॅन

खतरनाक सफर होणारे एकूण!!! लैच किरकिर सोसावी लागलेली दिसतेय, सहलीत भरपाई सव्याज होऊन जाईल असा अंदाज आहेच :)

कोमल's picture

1 May 2013 - 12:52 am | कोमल

चान चान फोटु :)

पु.भा.प्र..
लवकर येऊद्या..

पुढील देशाची भटकंती सुरु झाल्याने हरखून गेले आहे. फोटू नेहमेप्रमाणेच! टर्मिनल ३चा फोटू गोड आहे.
ते सामान न येण्याचे वर्णन वाचून काळजी वाढलेलीये. माझ्या परवाच्या प्रवासात दोन फ्लाईटांमधील अंतर फक्त दोन तास आहे. आधीच्या विमानाला थोडा जरी उशीर झाला तरी पुढचे वेळापत्रक मोडकळीला येणार आहे. अगदी रोज हाच विचार मनात येत आहे, त्याचे तंतोतंत वर्णन वाचून आता देवाचा धावा करण्यावाचून गत्यंतर नाही. ;) समानही लगेच आले पाहिजे असे आहे. देवाऽऽऽ....

राघवेंद्र's picture

1 May 2013 - 2:10 am | राघवेंद्र

मित्रा, मस्त सुरुवात आणि लेखमालेला शुभेच्छा !!!

जुइ's picture

1 May 2013 - 5:15 am | जुइ

पुढील भाग लवकर येउद्यात

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी, सुहास झेले, चाणक्य, मुक्त विहारि, आतिवास, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, प्यारे१, संजय क्षीरसागर, बॅटमॅन, कोमल, रेवती, राघव८२ आणि जुइ : आपणा सर्वांना सहलीत सक्रिय सामील झाल्याबद्दल अनेक धन्यवाद ! तुमच्या सहभागाने सहलीत धमाल येईल असेच वाटते आहे.

गौरव जमदाडे's picture

1 May 2013 - 2:31 pm | गौरव जमदाडे

झालेली आहे. आमचीपण सीट बुक आहे बरंका . आपल्या ओघवत्या लेखनशैली आणि छायाचित्रामुळे हि सहल देखील रोमा॔चक होणार . पु.भा.प्र.

काहिशी दमछाकही होतेय. जबरा आहे राव. इथे २ दिवस जरा हिकड तिकडं फिरणं झालं तर तिसर्‍या दिवशी उताणं पडायला होतं. खरोखर कमाल आहे तुमच्या उत्साहाची.

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2013 - 6:26 pm | जयंत कुलकर्णी

अफाट ! तुमच्यबरोबर येऊन फोटो काढायला हात शिवशिवताएत नुसते ! :-)

पैसा's picture

1 May 2013 - 6:31 pm | पैसा

तुमच्या लेखमालिका म्हणजे आम्हाला पर्वणीच! हा भाग मस्तच! पुढचा भाग लवकर येऊ द्या!

nishant's picture

1 May 2013 - 6:53 pm | nishant

सुर्वात आवडली :)
पु.भा.प्र..

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदक (जरासे उशीराच), गौरव जमदाडे, सिवाजी-द-बॉस, जयंत कुलकर्णी आणि पैसा : सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा.

प्रवासाने माणसाला चातुर्य येते म्हणतात ते उगाच नाही. नाहीतर एखादा नवशिका विसाची किंवा ब्यागेची वाटच पाहात बसला असता आणि पुढच्या प्रवासाला मुकला असता.
संदर्भः मी पहिला प्रवास केला तेव्हा भारतात येताना माझी ब्याग आली नाही. त्याची तक्रार नोंदवून झाली पण ब्याग एका महिन्यानंतर उगवली!

सानिकास्वप्निल's picture

1 May 2013 - 9:50 pm | सानिकास्वप्निल

लेखमालेला सुरुवात छान झाली आहे
भन्नाट :)
पुभाप्र

किसन शिंदे's picture

1 May 2013 - 9:57 pm | किसन शिंदे

हेच म्हणतो. लेखमालेची सुरूवात तर जाम भारी झालीय.

प्रचेतस's picture

2 May 2013 - 1:48 pm | प्रचेतस

नवी सफर, नवी मेजवानी.
पुभाप्र.

मस्त सुरवात.. आता पु.भा.प्र. :)

दिपक.कुवेत's picture

2 May 2013 - 2:17 pm | दिपक.कुवेत

आणि प्रवासवर्णन कस खुलवायच हे तुमच्याकडुन शीकावं. मालीका उत्तम होणार ह्यात वादच नाहि. सहल १९ दिवसाची आहे म्हटल्यावर चंगळच.

धनुअमिता's picture

2 May 2013 - 2:28 pm | धनुअमिता

सुरुवात तर खुपच छान झाली आहे. पुलेशु

स्मिता.'s picture

2 May 2013 - 2:34 pm | स्मिता.

सुरुवात छान झालीये. आता आणखी एका सफर कम् मेजवानीकरता तयार होवून बसले आहे :)

यशोधरा's picture

2 May 2013 - 2:42 pm | यशोधरा

वा, वा आली का पुढची सफर! :) तुम्हांला व्हिसा मिळाल्याचे वाचताच जीव पासपोर्टात पडला! व्हिसाच मिळाला नसता तर आम्ही काय वाचणार होतो! आणि बॅगाही मिळाल्या एकदाच्या सगळ्या गोंधळानंतर! हुश्श!

आता येऊदेत आरामात पुढचा सफर वृत्तांत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2013 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हांला व्हिसा मिळाल्याचे वाचताच जीव पासपोर्टात पडला! :)

अनिरुद्ध प's picture

2 May 2013 - 4:40 pm | अनिरुद्ध प

प्रवासात एव्हड्या हाल अपेक्शा सहन करुन्सुद्धा पुढिल मार्गक्रमणास प्रफ्फुल्लित व्रूत्तीने सामोरे जाण्याच्या आत्मविश्वासाला सलाम (Hats Off),पुढिल वर्णनाची वाट पहात आहे.

चेतन माने's picture

2 May 2013 - 5:12 pm | चेतन माने

मलां वाटतं मागच्या जन्मी तुम्ही घोर तपश्चर्या वगैरे करून कुठल्या तरी देवाकडून सहलीचा वर मिळवला असावा!!! कारण सुरवातीलाच इतक्या गडबडी होऊनसुद्धा तुमची सहल प्लान प्रमाणेच सुरु झाली.
सुंदर पुभाप्र :) :) :)

मिसळ's picture

2 May 2013 - 8:48 pm | मिसळ

वाचत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2013 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मराठे, सानिकास्वप्निल, किसन शिंदे, वल्ली, Mrunalini, दिपक्.कुवेत, धनुअमिता,स्मिता., यशोधरा, अनिरुद्ध प, चेतन माने आणि मिसळ : आपणा सर्वांना सहलीतील सक्रीय सहभागासाठी अनेक धन्यवाद !

मालोजीराव's picture

3 May 2013 - 12:43 am | मालोजीराव

बर झालं विसा झाला एकदाचा…म्हंजे आमीबी सीट-बेल्ट बांधाय मोकळे…त्याच्या मायला त्या विजावाल्यांनी विजा दिला नसता तर एंबॅसी चे नंबर मी 'रात कि कालिया','मुझसे दोस्ती करोगे','Call me to have fun' च्या पोस्टर वर चिटकवले असते :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा यवढा जंक्शन पाटिंबा असल्यावर काय बिशाद होती विसावाल्यांची नाय म्हनायची +D

तुमच्या लेखमालांबद्दल समस्त मिपाकरांतर्फे तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. इतक्या नेटकेपणाने ही प्रवासवर्णनं लिहून आमच्यासमोर आणत आहात. आता तर प्रवास या विषयावर लिहीण्याचा न्यूनगंड यायला लागलाय्..तुमच्या या अफाट पृथ्वीप्रदक्षिणासदृश सफरींपुढे आमच्या किरकोळ सफरी म्हणजे एकदम चौधरी यात्रा कंपनीच्या अष्टविनायक यात्राच..

रुस्तम's picture

3 May 2013 - 2:16 pm | रुस्तम

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

गवि व निलापी : अनेक धन्यवाद !

@गवि :
अशी सहलींची तुलना करता येत नाही हो. प्रत्येक सहल तिच्या वैशिष्ट्यासह आपल्या जागी महत्वाची असते. माझ्या भारतातील सहलींच्या आठवणीही मला तितक्याच महत्वाच्या वाटतात. पण ते कागदी फोटो आता जुने आणि फिक्कट झाले आहेत त्यामुळे त्या सहलींबद्दल लिहीत नाही. मिपावरची अनेक माहितीपूर्ण प्रवासवर्णने वाचून मी नोंदवलेल्या मुद्द्यांमुळे आतापर्यंत न पाहिलेल्या भारताच्या (आणि काही बघितलेल्या भागांच्याही परत) सहली अधिक रसपूर्ण होणार आहेत याची खात्री आहे.

माझ्या आरखड्यात जेवढा वेळ मी इतर जगाला दिला आहे तेवढा केवळ एकट्या भारताला देण्याचा मानस आहे. आपल्याकडे बरेच काही आहे आणि त्यातले बरेच जगातले एक क्रमांकाचे होण्याच्या लायकीचे आहे. मात्र आपण त्याची जपणूक करण्यात आणि पर्यटन व्यवसायाच्या व्यवस्थापनात खूप कमी पडतो आहोत.

महेश नामजोशि's picture

3 May 2013 - 3:34 pm | महेश नामजोशि

तुमची लेखनशैली अतिशय उत्तम व प्रवाही आहे. कुठेही कंटाळवाणे न होता सतत पुढे वाचावे अशी उत्कंठा लागून राहाते. पुढील भाग लवकरच मिळो हि विनंती .

धन्यवाद

महेश नामजोशी

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 2:40 am | डॉ सुहास म्हात्रे

सहलीत असाच सहभाग असू द्यावा.

धमाल मुलगा's picture

4 May 2013 - 5:12 am | धमाल मुलगा

मजाय बुवा तुमची! (आणि अशी झकास प्रवासवर्णनं वाचायला मिळताहेत म्हणून आमचीही. :) )

ते बाकी सगळं जाऊद्या. मला दोन प्रश्न पडलेत त्यांची तेव्हढी उत्तरं द्या-
१.तुमच्या तळपायावर भाकरीएव्हढा तीळ आहे का?
२.सहलीला जायचं ठरल्यानंतर ज्या-ज्या देशात जायचं त्यांच्या एंबसीतल्या म्हसोबाला आणि ठरवलेल्या विमानकंपन्यांना एकेक कोंबडं का नाही कापत तुम्ही? :)

- (विकांतापुरता प्रवासी) धम्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

१.तुमच्या तळपायावर भाकरीएव्हढा तीळ आहे का?
आता एवढा मोठा तीळ असण्याइतका पाय मोठा असता तर विमानाचे तिकीट कशाला काढले असते... बटूसारखी एक नाही पण काही पावलातच 'चकटफूमध्ये' पृथ्वी पादाक्रांत केली नसती काय? ;)

२.सहलीला जायचं ठरल्यानंतर ज्या-ज्या देशात जायचं त्यांच्या एंबसीतल्या म्हसोबाला आणि ठरवलेल्या विमानकंपन्यांना एकेक कोंबडं का नाही कापत तुम्ही? हे असं करायला गेलो आणि कोंबडं कापताना गैरसमजाने त्यांनी अतिरेकी म्हणून पकडून पोलिसांकडे दिले तर मग कसची सहल आणि कसचे काय, नाही का? +D

असाच सहलभर लोभ असू द्या.

स्पंदना's picture

4 May 2013 - 7:14 pm | स्पंदना

वाच्ल्याची पावती.
माझ विमान जरा वेळाने निघतय पण पोहोचेल कधी ना कधी मुक्कामाला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2013 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे

आपलं विमान पेशल हाय. प्रत्येक प्रवाश्याच्या सोईने उडवता-उतरवता येतं आणि मिपावर अगदी '२४ X ७' चालू असतं. त्यामुळे अज्याबात काळजीचे कारण नाही... सगळी सहल आपल्या सोईने करा :)