किवी आणि कांगारूंच्या देशांत १५ : कुरांडा - निसर्गरम्य रेल्वे, वर्षारण्य (rainforest) आणि रज्जूमार्ग (skyrail)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
31 May 2013 - 2:14 am

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

...या कार्यक्रमाने दिवसभरच्या धावपळीमुळे आलेला थकवा आणि अव्यवस्थापनामुळे झालेली चिडाचीड विसरायला लावली आणि सर्वजण खुशीत गप्पा मारत हॉटेलवर परतलो.

आजचा पूर्ण दिवस प्रत्येक प्रवाशाच्या आवडीच्या गोष्टी करायला सोडलेला होता. पर्याय होते संपूर्ण दिवस आरामात लोळणे आणि केर्न्समघे भटकणे किंवा डेंट्री वर्षारण्याची सफारी अथवा कुरांडा वर्षारण्याची सफारी. पहिला पर्याय माझ्या स्वभावात बसणारा नव्हता. इतर दोन मधली कुरांडाची सफारी तिच्यातल्या वैविध्यामुळे (रेल्वे + पायी + केबलकार) जास्त आवडली होती म्हणून तीच निवडली.

साडेसात वाजता आमची बस निघाली. केर्न्स हे उष्णकटीबंधात आहे. त्यामुळे तेथे भरपूर पाऊस पडतो आणि सर्व परिसर हिरवागार आहे. केर्न्सच्या रम्य उपनगरांतून प्रवास करताना घेतलेले हे काही फोटो...

.

.

.

बसने आम्हाला केर्न्सच्या बाहेरच्या एका "फ्रेशवॉटर" नावाच्या रेल्वे स्टेशनवर सोडले. कुरांडा माथेरानसारखे हिरव्यागार वनामधल्या एका झाडीने भरलेल्या डोंगरावर वसले आहे. केर्न्सहून तेथे जाण्यासाठी माथेरानसारखीच रेल्वे आहे. मात्र ही माथेरानसारखी छोटी नसून मोठ्या आकाराची रेल्वे आहे.

थोडा वेळ इकडे तिकडे करत आणि कुरांडा रेल्वेसंबद्धिचे एक छोटे संग्रहालय बघण्यात वेळ घालवल्यावर गाडीचे आगमन झाले आणि आम्ही निघालो...

शहर मागे पडले...

आणि चक्क उसाची शेती सुरू झाली...

नंतरचा सगळा प्रवास निसर्गरम्य हिरव्यागार वनराईतून होता...

कधी कधी कोंकणाची आठवण यावी असा परिसर दिसत होता...

थोड्याच वेळात डोंगराळ भाग सुरू झाला आणि वळणावळणाचा चढा मार्ग सुरू झाला...

.

.

.

दूरवरून दिसणारे केर्न्स आणि दूर क्षितिजाजवळ दिसणारा कोरल समुद्रकिनारा...

स्टोनी क्रीक धबधबा...

या ३७ किलोमीटर लांब रेल्वेमार्गावर एकूण ३७ पूल आणि १५ बोगदे आहेत. त्यातला शेवटचा बोगदा ४९० मीटर लांब आहे. हे सगळे काम झाले त्या काळात (१८८२ -१८९१) आजच्या सारखी प्रगत उपकरणे नव्हती आणि सगळे काम मनुष्यबळ वापरून केलेले आहे.

हा अवघड लोहमार्ग प्रतिकूल परिस्थितीत बांधणार्‍या रॉब नावाच्या स्थापत्यशात्रविषारदाचे नाव दिलेला एक नैसर्गिक स्तंभ... रॉब्ज मॉन्युमेंट... वाटेत लागतो...

बॅरन धबधबा... हा समुद्रसपाटीपासून ३२९ मीटर उंच आहे आणि त्याच्या पाण्याच्या धारेची उंची २६५ मीटर आहे. याच्या पाण्याच्या शक्तीवर १९३२ सालापासून वीजनिर्मिती केली जात आहे...

आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य पाहता पाहता कुरांडाला केव्हा पोचलो ते कळलेच नाही...

.

कुरांडा गाव आणि त्याचा परिसर त्यांचे "उष्णकटिबंधीय नंदनवन (Tropical paradise)" हे नाव खरंच सार्थ करतात. गावात आणि आजूबाजूच्या जंगलात (खरं म्हणजे गावच जंगलात वसलेले आहे) फिरण्यासाठी अडीच-तीन तास दिलेले होते. प्रवासी आपापल्या आवडीप्रमाणे छोटे समूह बनवून गावाची सफर करायला निघाले...

.

.

डोंगरावरचे छोटेसे गाव असले तरी पोटोबासाठी आणि प्रवाशांच्या खरेदीसाठी भरपूर व्यवस्था होती...

.

गावाच्या आजूबाजूला अनेक उत्तम निगा ठेवलेल्या आणि मार्गदर्शक पाट्या असलेल्या निसर्गरम्य पायवाटा (walking tracks) आहेत. बहुतेक जणांना फक्त गावाच्या रस्त्यांवरून फिरून पोटोबा करणे (इथेही होकी-पोकी होतेच !) आणि खरेदी करणे जास्त पसंत दिसले. त्यामुळे पोटोबा झाल्यावर एकटाच वर्षारण्यात भटकायला निघालो...

.

.

.

 ......

.

.

वाटेत ही (बहुतेक जंगली टर्की) भेटली. तेव्हा तिला हॅलो म्हणायला गेलो तर लगेच पळून गेली...

पाच-साडेपाच किमीच्या पदभ्रमणानंतर परत गावाकडे परतलो...

.

.

आता पुढचा टप्पा होता रज्जूमार्ग (skyrail) वापरून डोंगर उतरायचा...

.

हा साडेसात किमी लांबीचा रज्जूमार्ग उंच वृक्षांनी भरलेल्या घनदाट जंगलावरून जातो. वाटेत दोन थांबे आहेत. तेथे उतरून आपल्याला मोक्याच्या ठिकाणांवरून जंगलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो.

सुरुवातीला हा मार्ग बॅरन नदीवरून जातो...

थोड्याच वेळात आपण उंच जात जात उंच वृक्षांच्या वरच्या टोकांच्याही वर पोहोचतो...

.

आणि मग सगळे जंगल आपल्या पायतळीच नाही तर पायतळीच्या वीस तीस मीटर खाली असते...

नजरेच्या टप्प्यापर्यंत चारीबाजूला पसरलेल्या उंचच उंच आणि घनदाट जंगलावरून तरंगत जातानाचा अनुभव काही वेगळाच !...

वेगवेगळ्या प्रकारची गर्द वनराई आणि त्यातली काही अनोळखी मोहराने भरलेली झाडे बघताना भान हरखून जाते...

.

साधारण दहा पंधरा मिनिटाचा वेळ कधी संपला ते कुरांडा पासून १.७ किमी वर असलेले बॅरन फॉल स्टेशन आले तेव्हाच कळले...

येथे येथे काही काळ थांबून बॅरन धबधब्याचे आणि त्याच्या परिसराचे मोक्याच्या जागांवरून दर्शन करता येते...

.

उताराचा प्रवास परत सुरू केला की हा हा म्हणता आपण परत वृक्षराजीच्या शेंड्यांच्या वर पोहोचतो...

.

.

.

रज्जूमार्गाचा दुसरा थांबा आहे रेड पीक स्टेशन. हे येथील सर्वात उंच ठिकाण समुद्रसपाटीपासून ५४५ मीटर उंच आहे. येथे एक १७५ मीटर लांबीचा जंगलातील पदपथ आहे. त्याच्या बाजूला काही भलेमोठे वृक्षराज आहेत...

या स्टेशनवरून शेवटचा टप्पा केर्न्सकडे घेऊन जातो...

.

.

हॉटेलवर परतेपर्यंत तीन वाजत आले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन दीड तास ताणून दिली. जाग आली तेव्हा बाहेर अंधार पडला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. गाईडकडून रॉयल इंडिया नावाच्या भारतीय रेस्तरॉचा पत्ता काढलेला होताच. ते जवळच दोन चौक सोडून समुद्रकिनार्‍यावर होते. रमत गमत त्याचा शोध काढत गेलो आणि त्याला राजाश्रय दिला. जेवण झाल्यावर समुद्रावर रपेट मारायला बाहेर पडलो. रात्रीच्या प्रकाशात केर्न्स मोहनगरीच वाटली...

खाण्यापिण्याची दुकाने गिर्‍हाईकांच्या गर्दीने गजबजली होती...

समुद्रकिनार्‍यावरच्या तलावांत दिव्यांच्या प्रकाशात अजूनही काही लोक जलक्रीडा करत होते...

आणि बहुतेक 'हे अजून का घरी जात नाहीत?' असाच विचार करत एक लाईफ गार्ड त्याच्या उच्चस्थानी बसलेला होता...

ही सगळी गंमत पाहत समुद्र किनार्‍यावरून फिरत फिरत हॉटेलवर परतलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 May 2013 - 2:56 am | पाषाणभेद

व्वा! सुंदर सफर

मोदक's picture

31 May 2013 - 3:15 am | मोदक

पुभाप्र.

स्पंदना's picture

31 May 2013 - 5:58 am | स्पंदना

धन्यवाद.
आता कुरांडाला जायलाच हवे.

प्रचेतस's picture

31 May 2013 - 8:38 am | प्रचेतस

मस्त सफर.
अगदी हिरवाकंच निसर्ग आहे. नदी, जंगलावरून जाणार रज्जुमार्ग खासच.

कोमल's picture

31 May 2013 - 11:26 am | कोमल

आत्ताचे भाग पटापट आले त्यामुळे लै लै खुश झाले.. धन्स एक्का काका,
दोन्ही भागांवरचा हा प्रतिसाद गोड मानून घ्या..

कोरल्स मधून फिरतांना सारखाच नेमो आठवत होता, आणि अचानकच त्याचा सीडी मधला फोटो दिसला :-D
बाकी प्रवाळ आणि हरितबेटाचे फोटो छानच.

मूळरहिवाश्यांबद्द्ल अजून माहीती कळाली तर भारी होइल. म्हणजे साधी माहिती नाही, ती तर गूगलवून पण मिळेल, तुमचे त्यांच्या बद्द्लचे अनुभव वगैरे आले तर...

वर्षारण्याचे फोटू आवडेश. सर्किट वॉकचा बोर्ड पाहुन कळालं की बोर्डांवर गिरगटण्याची टगेगिरी तिकडेही चालते म्हणायची.. ;)

आणि पुन्हा एकदा नेहमी प्रमाणे पुभाप्र :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2013 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाषाणभेद, मोदक, aparna akshay, वल्ली आणि कोमल : अनेक धन्यवाद !

@ aparna akshay :
कुरांडाला जरूर भेट द्या. मस्त जागा आहे. कुरांडा गावात कमीतकमी चार पाच तास थांबता येईल अशी रेल्वे / स्कायवेची बुकींग्ज करा. म्हणजे तेथील जंगलात नीट फिरता येईल... फारच सुंदर अनुभव होता तो. मात्र पायवाटांचा एक चांगला नकाशा बरोबर ठेवा कारण एकदोन मार्गदर्शक पाट्या जरा कन्फ्युजींग आहेत. आमच्या सहलीच्या वेळेच्या बंधनामुळे माझी ती जंगलफेरी जरा गडबडीतच झाली... अजून वेळ असता तर बरे झाले असते असे वाटत राहिले.

@ कोमल :
मूलनिवासींचा अनुभव फार मैत्रीपूर्ण होता. फक्त सुरुवातीला (त्यांना नेहमी मिळणार्‍या वागणूकीमुळे बहुतेक) सहाजिकपणे ते अपल्याकडे जरा संशयाने पहातात. पण जरा ओळख झाली आणि आपण मित्राच्या नात्याने वागतो आहोत हे कळले की मग एकदम खुलेपणाने मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. अ‍ॅलिस स्प्रिंग्जमध्ये (मगरीचे कातडे टांगले होते त्या) पबमधे दोन मूलनिवासी गृहस्थांशी बसून बियर पित हसत खेळत गप्पा मारल्या होत्या. मजा आली. त्यांच्या जागोजागच्या सांस्कृतिक केंद्रातल्या कार्यक्रमातही त्यांची वागणूक मैत्रीपूर्ण आणि व्यावसाईक होती.

बोर्डांवर गिरगटण्याची कामगिरी बर्‍याच ठिकाणी दिसली :).

अनिरुद्ध प's picture

31 May 2013 - 12:52 pm | अनिरुद्ध प

अतिशय सुन्दर वर्णन तसेच छायाचित्रे तर अप्रतिम.

सुहास झेले's picture

31 May 2013 - 2:03 pm | सुहास झेले

भारीच.... तो रेल्वेचा सफर तर एकदम सुहानाच !!

चेतन माने's picture

31 May 2013 - 5:12 pm | चेतन माने

"तो" फोटू खरच कोकणातलाच वाटतोय!
आणि मंद गतीच्या ट्रेन मधून निसर्ग न्याहाळताना काय जाम मज्जा आली असेल… [अजून माथेरान च्या ट्रेन मध्ये पण नाही बसलो :( ] पण सोल्लिड अनुभव दिलात तुम्ही …. धन्स :)
बाकी फोटू काहीतरीच सुंदर आलेत.
पुभाप्र :):):)

प्यारे१'s picture

31 May 2013 - 5:27 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणेच!

रेवती's picture

31 May 2013 - 7:42 pm | रेवती

नेहमीप्रमाणेच! तुमच्या लेखनाच्या निमित्ताने माझे जुने केबलकारचे फोटू बघून झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प, सुहास झेले, चेतन माने, प्यारे१ आणि रेवती : सर्वांचे सहलितील सहभागाकरिता धन्यवाद !

नवीन जग तुमच्यामुळे बघायला मिळत आहे. दर वेळी कौतुकाचे नवीन काय शब्द आणायचे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2013 - 10:52 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !