किवी आणि कांगारूंच्या देशांत ११ : अ‍ॅलिस स्प्रिंग्ज १ - हवाई वैद्यकीय सेवा आणि आउटबॅक डिनर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
17 May 2013 - 1:03 am

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

...आजचे रात्रीचे जेवण भारतीय रेस्तरॉमध्ये घ्यायचे ठरवले होते. पण आता जेवणासाठी भटकायचा उत्साह उरला नव्हता. हॉटेलजवळच्या चिनी रेस्तरॉमध्ये झटपट मिळणारा प्रॉन फ्राईड राईस आपलासा केला आणि खोलीवर परतलो. बिछान्याला पाठ टेकताच निद्रादेवीने कुशीत घेतले.

आज मेलबर्नला टाटा करून अॅलिस स्प्रिंग्ज् ला जायचे होते. विमान सकाळी ८:४५ ला होते. त्यामुळे भल्या पहाटे उठून सर्व आवरून बॅगा ५:३० लाच खोलीबाहेर ठेवायच्या होत्या आणि बस ६:३० ला निघणार होती. बहुतेक हॉटेल्समध्ये न्याहारी ६:३० ला सुरू होते. पण या हॉटेलमध्ये न्याहारी ६:०० सुरू होत असल्याची खुशखबर गाइडकडून मिळाली होती, ही एक जमेची बाजू. सर्वसाधारणपणे सकाळी फार काही खाण्याचा मला कंटाळा आहे. पण प्रवासाचे दिवस याला अपवाद आहेत. प्रवासात सज्जड न्याहारी केली की मी दिवसभर आख्ख्या जगाशी लढाईला तयार असतो... मग दुपारचे जेवण थातूरमातूर झाले तरी काही हरकत नसते... फिरण्यात भुकेने व्यत्यय आलेला मला अजिबात आवडत नाही !

बसमधून जाताना मेलबर्नचे पहाटेचे हवाई दर्शन करवणारे अनेक रंगीबेरंगी हॉट एअर बलून आकाशात दिसत होते...

क्वांटासच्या विमानाने आम्हाला पोटात घेऊन १,८८८ किमी वरील अॅलिस स्प्रिंग्ज् पर्यंतचे उड्डाण २ तास २५ मिनिटात पुरे केले.

हे २५-३०,००० वस्तीचे गाव ऑस्ट्रेलियाच्या बरोबर मध्यभागी आहे. या भागातील अरेंटे नावाचे मूळ ऑस्ट्रेलियन निवासी येथे ३०,००० पेक्षा जास्त वर्षे राहत आहेत. ऑस्ट्रेलियन मूळ निवासी, ज्यांना "अॅबओरिजिनल" म्हणतात, सुमारे ४०,००० वर्षांअगोदर पासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वस्ती करणारे पहिले मानव. त्यामुळे खरं तर त्यांना "ओरिजिनल" म्हणायला पाहिजे आणि नंतर येथे आलेल्या बाकी लोकांना (यांच्यातले कोणीच सन १६०६ पूर्वी येथे आलेले नाहीत) "स्थलांतरित" म्हणायला पाहिजे. पण आता अशी अवस्था आहे की स्थलांतरित मालक बनले आहेत आणि मूळ निवासी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत नगण्य झाले आहेत. असो.

विशाल सुपीक किनारपट्टी आणि अत्यंत विरळ लोकसंख्या असूनसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात खडतर मध्यभागात अ‍ॅलिस स्प्रिंग्ज हे गाव वसले आहे त्यामागे एक कहाणी आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकरीच्या व्यवसायाचे इंग्लंडमधली बाजारपेठ हे मुख्य गिऱ्हाईक होते. पण १९ व्या शतकाच्या काळात तिथले बाजारभाव ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनार्‍यावर समजायला अनेक आठवडे जायचे आणि त्यामुळे बरेचदा व्यापार्‍यांचे नुकसान व्हायचे किंवा कमीतकमी खूप फायदा करून घेण्याच्या संधी हातातून निसटून जात असत. कारण त्या वेळेस टेलेग्राफने होणारे संदेशवहन फक्त इंडोनेशियापर्यंतच पोहोचले होते. ही संदेशवहन साखळी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत वाढवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न झाले. या प्रयत्नांत न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया या त्या काळी वेगवेगळ्या असलेल्या ब्रिटिश कॉलनींमधे चढाओढ होती, कारण यशस्वी कॉलनीचा लोकरीच्या बाजारावर वरचष्मा राहणार होता. सरतेशेवटी १८६१-६२ मध्ये जॉन स्टुअर्ट नावाच्या शोधकाने (explorer) दक्षिण किनार्‍यावरचे अॅडलेड ते उत्तर किनार्‍यावरचे डार्वीन असा सरळ रेषेतल्या मार्गाचा नकाशा बनवला. पुढच्या १० वर्षांत या मार्गावर टेलेग्राफ लाइन टाकण्यात यश आले आणि अॅडलेड-ब्रिटन असे संदेशवहन सुरू झाले. या मार्गावर असलेल्या अनेक टेलेग्राफ रिपीटर स्टेशन्सपैकी असलेले अॅलिस स्प्रिंग्ज या मध्यवर्ती आणि पाण्याची सोय असलेल्या ठिकाणावर प्रथम छोटी वस्ती झाली. नंतर ते नावारूपाला येण्यासाठी तेथून १०० किमी वर असलेल्या अर्लतूंगा या जागी सापडलेल्या अलुव्हियल सोन्याच्या गोल्ड रशने मदत झाली. नंतर त्याच्या मोक्याच्या जागेमुळे (स्ट्रॅटेजीक लोकेशन) दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आणि नंतर आलेल्या रेल्वेमुळे त्याचे महत्त्व वाढतच राहिले. सध्या ते नॉर्दर्न टेरिटरीचे तिसर्‍या क्रमांकाच्या लोकवस्तीचे गाव आहे. अर्थात नॉर्दर्न टेरिटरी या १३,५०,००० चौ किमी (अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या दुप्पट) आकाराच्या भूभागाची एकूण लोकसंख्या जेमतेम अडीच लाख आहे आणि त्यातले साधारण २५,००० लोक येथे राहतात !

अॅलिस स्प्रिंग्ज ला उतरताच मध्य ऑस्ट्रेलियाच्या रखरखाटी भूभागाची ओळख सुरू झाली...

.

ही अॅलिस स्प्रिंग्जची टॉड नदी. हिचे वैशिष्ट्य असे की ही वर्षाचे कमीतकमी ३६४ दिवस कोरडी असते. त्यामुळे तिच्या पात्रात मोठी मोठी नीलगिरीची झाडे आहेत !...

मुख्य गावाच्या भागात असलेल्या पाण्यामुळे तेथे हिरवाई आहे आणि तिचा उपयोग गाव जाणीवपूर्वक सुंदर बनवण्यासाठी केलेला आहे. वाटेत थोडा वेळ ANZAC टेकडीवर थांबा होता. येथे युद्धांत धारातीर्थी पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभ उभारलेला आहे. येथून सर्व गावाचे दर्शन होते...

.

अ‍ॅलिस स्प्रिंगमध्ये एका खास नावीन्यपूर्ण वैद्यकीय सेवेची सुरुवात झाली... रॉयल फ्लाइंग डॉक्टर सर्विस...

ही जगातील सर्वात मोठी वैमानिकी वैद्यकीय सेवा आहे. मध्य ऑस्ट्रेलियातील दूरदराज ग्रामीण भागांतील जनतेसाठी काम करणारी ही विना फायदा सेवा जॉन फ्लीन् नावाच्या ख्रिस्चन मिनशनर्‍याने १९२६ साली सुरू केली ती आजतागायत सुरू आहे. आता तिची व्याप्ती इतकी वाढली आहे की २०११-१२ मध्ये १,१५० कर्मचार्‍यांनी २१ केंद्रे चालवून ६१ विमानांच्या मदतीने "दररोज" केलेल्या कामाची सरासरी पुढील प्रमाणे आहे:
* २०३ उड्डाणे;
* ७२,८७० किमी चा प्रवास;
* ७५० रुग्णांची सेवा आणि
* ११२ रुग्णांची वाहतूक.
* शिवाय ही संस्था हल्ली रेडिओ-इंटरनेट वापरून दूरवैद्यकीय (टेलेमेडिसिन) मदतही पुरवते.

या संस्थेच्या पसार्‍याची थोडीशी कल्पना खालील नकाश्यावरून येऊ शकेल...

आम्ही या असाधारण संस्थेच्या अ‍ॅलिस स्प्रिंग येथील संग्रहालयाला भेट देण्यास गेलो...

.

.

.

नंतर जरा गावात फेरफटका मारला आणि एका मॉलमध्ये दुपारचे जेवण घेतले...

इतके लोक इकडे तिकडे फिरत असतानाही एका ठिकाणी शांतपणे हिरवळीवर आराम करत बसलेल्या मूळ रहिवाशांबरोबर दिमाखाने सायरन वाजवत एका पोलिसाने केलेले वर्तन बरे वाटले नाही...

मूळ रहिवाशांच्या कलेचे काही नमुने...

 ...

.

एक मूळ रहिवासी...

दुपारी तीनच्या सुमाराला हॉटेलमध्ये चेकइन केले. हॉटेल जरा गावाबाहेरच पण छान होते...

त्याच्या आवारातल्या झाडांवर वेगळ्याच रंगाच्या पोपटासारख्या दिसणार्‍या पक्षांची शाळा भरली होती...

.

दोन तास आराम केला. साडेपाचला उठून तयार होऊन लॉबीत आलो आणि "आउटबॅक बार-ब-क्यू डिनर पार्टी" ला जाण्यासाठी जमलेल्या सहप्रवाशांमधे सामील झालो. आम्हाला घेऊन बस गावाबाहेर पडली आणि पार्टीच्या ठिकाणाकडे निघाली...

.

वाटेत मधे मधे गवतात लपलेले कांगारू दिसत होते...

पार्टीचे ठिकाण आता बंद झालेल्या एका दगडाच्या खाणीत होते...

पहिल्यांदा स्वागत, पेयपान, वगैरे झाल्यावर ऑस्ट्रेलियाची खासियत असलेल्या वेगवेगळ्या बूमरँगांचे प्रात्यक्षिक झाले. आपण नेहमी चित्रात बघतो ते फेकल्यावर परतणारे बूमरँग शिकारीसाठी निरुपयोगी असते हा शोध लागला ! ते फक्त झुडुपातले किंवा पाणवठ्यावरले पक्षी उडवायच्या कामाला येते. शिकारीसाठी वापरायचे बूमरँग जरा वेगळ्या आकाराचे, जड आणि प्राण्याला जायबंदी करू शकेल अशी धार असलेले असते... ते खालील चित्रात दिसते आहे...

बूमरँगच्या अनेक प्रकारांची प्रात्यक्षिके बघून बरेच ज्ञान झाले आणि गैरसमजही दूर झाले ! मग 'खरे' पेयपान सुरू झाले आणि पार्टीला रंग भरू लागला...

सगळे जेवण जुन्या ऑस्ट्रेलियन आउटबॅक (लोकवस्तीपासून दूर असलेला वाळवंटी भाग) ची पद्धत वापरून आमच्यासमोरच तयार होत होते...

गोल्ड रश काळातील कामगारांच्या पद्धतीने ब्रेड बनवला गेला... अगदी पीठ मळण्यापासून ते बेक करेपर्यंतची सगळी पाककृती त्या काळच्या खुसखुशीत गोष्टी ऐकत पाहिली...

त्यानंतर एका तज्ज्ञाने आउटबॅकमधे राहणार्‍या मूळ रहिवाश्यांचे समाजजीवन आणि प्रथांची रोचक माहिती दिली...

तोपर्यंत जेवण तयार झाले होते. चांगला अंधारही पडला होता. जेवण सुरू झाले... स्टेक (माझ्याकरता चिकन होते), रशियन सलाद, बेक्ड पोटॅटो, फ्रेश ब्रेड विथ मेल्टेड बटर, अजून एकदोन साइड डिशेस (नावं विसरलो, स्वाsssरी) आणि सगळ्यात शेवटी ब्राऊनी !...

जेवण झाल्यावर आउटबॅकचे खास विनोद आणि संगीत यांचा मस्त कार्यक्रम झाला...

काही प्रवाशांनाही आउटबॅक वाद्यवृंदात सामील करून घेऊन गायकाने धमाल उडवून दिली...

त्यानंतर एका स्थानिक खगोलशास्त्रज्ञाने आकाशात त्या वेळेस दिसणार्‍या ग्रहतार्‍यांची मजेशीर प्रकाराने ओळख करून दिली...

तोपर्यंत साडेदहा अकरा वाजत आले होते. ऑस्टेलियाच्या मध्यभागी अनुभवलेल्या आउटबॅक पार्टीच्या सुखद स्मृती घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

रेवती's picture

17 May 2013 - 2:03 am | रेवती

छान. वाचतीये.

स्पंदना's picture

17 May 2013 - 6:55 am | स्पंदना

मस्त वर्णन!
अ‍ॅलीस स्प्रिंगच्या थोड्या आत गेलं तर तेथील रहिवाशी (अ‍ॅबॉरिजीनल्स) अक्षरशः दगड घेउन मागे लागतात. एकही आउट्सायडर नको असतो त्यांना. एकदा बस मध्ये चढत होते, तेंव्हा बसची ड्राइव्हर एकदम तिरस्काराने फुत्कारली. पाहिलं तर ती अ‍ॅबॉरिजीनल होती, अन त्यांना आपण जे गोर्‍यांपेक्षा किंवा गोर्‍यात भर म्हणुन जे लोक येतो त्यांचा अतिशय तिरस्कार आहे.
या तिरस्काराला तसेच सज्जड कारण सुद्धा आहे. ब्रिटीशांनी त्यांच्या कातडीच्या रंगाच्या जोरावर या लोकांना अक्षरशः जनावरांचे कळप घेरुन मारावेत तसे मारलं. एका एका ठिकाणी चाळीस चाळीस लोकांच्या कबरी असतात. अन हे लोक त्यांच्या पुर्वजांना (आत्म्यांना) पुजणारे. त्यांच्यासाठी ही ठिकाणे फार महत्वाची अन वेदनादायक असतात. अश्या दफन्भुमीवर उभारुन "I can hear my ancestors crying" अस म्हणतात हे लोक. इतकी भावनिक गुंतवणुक आहे या लोकांची. हे मुळचे भारतिय वंशज असलेले लोक आहेत. मला वाटतय साऊथ मोस्ट अथवा श्रीलंका.
तुम्ही दिलेले पोपट "गाल्ला" म्हणुन ओळखले जातात. जोडीच असते त्यांची, एकांडा असा दिसणे मुश्किल. आत्ता या क्षणी बाहेर बागेत गोंधळ घालताहेत.
सुंदर माहिती.
I hope I am not disturbing you by adding a little bit more info. Actually I told my husband that we can follow your info for sight seeing.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर जास्तीची माहिती लिहीत रहा. त्यामुळे सहल अजून माहितीपूर्ण होईल. मूळ ऑस्ट्रेलियन रहिवाश्यांवर गोर्‍यांनी केलेले अत्याचार आणि त्यांच्या हत्या अतिशय निर्धृण होत्याच. आणि अजूनही काही फार मोठा फरक पडला आहे असे नाही. अनेक रिपोर्टांत मूळ निवाश्यांवर खर्च केला आहे असा दाखवलेला बराचसा पैसा सुधारणांऐवजी त्यांच्यावर न्यायीक खटले भरणे आणि त्यांना रिझर्वेशनसारख्या जागांत बंदिस्त ठेवण्यातच खर्च होतो असे दिसते. फक्त जगासमोर मांडताना या गोष्टींना थोडा वरवरचा मुलामा देऊन सोयीस्कर राजकीय दिखावा आणला जातो असे ऐकून आहे.

हे लोक (इतर सर्व मानवांसारखेच) आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीतून निघाले आणि दक्षिण अरबस्थान, दक्षिण भारत / श्री लंका असे करत करत पायी चालत पुढे ऑस्ट्रेलियाला ४२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी पोहोचले. त्याकाळच्या हवामानामुळे बरेचसे पाणी दोन्ही ध्रुवांच्या आसपास बर्फाच्या अवस्थेत होते आणि समुद्राच्या पाण्याची पातळी आताच्या तुलनेने १३० मीटरपेक्षा जास्त खाली होती, त्यामुळे हे शक्य झाले. याचमुळे मुळे अंदमान-निकोबार येथील मूळ निवासी आणि (विशेषतः मध्य) ऑस्ट्रेलियन मूळ निवासी यांच्यात बरेच साम्य दिसते. आता तर जनुकशास्त्रीय पुराव्याने हे सगळे सिद्ध झाले आहे.

नेहमीप्रमआणेच सुंदर फोटो आणि लिखाण.
अ‍ॅलिस स्प्रिंग गाव मोठे टुमदार दिसत आहे.

जॅक डनियल्स's picture

17 May 2013 - 9:48 am | जॅक डनियल्स

नेहमी सारखा उच्च लेख आणि फोटोज.
२००८ साली 'ऑस्ट्रेलिया' नावाचा सिनेमा आला होता, त्या मध्ये या अॅबओरिजिनल लोकांचे त्या वेळच्या परिस्थितीच्या जवळ जाणारे चित्रीकरण आहे. एकदा तरी मोठ्या पडद्यावर बघावा असा चित्रपट आहे.

कोमल's picture

17 May 2013 - 10:59 am | कोमल

नेहमी प्रमाणेच छान वर्णन, आणि फोटू :)

चेतन माने's picture

17 May 2013 - 12:12 pm | चेतन माने

त्यामानाने बरीच हिरवळ आहे या प्रदेशात. कोकणात गर्मीत बहुधा अशीच परिस्थिती असते.
छान माहिती आणि बोलके फोटू, आवडला हा भाग.
पुभाप्र :):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाणी असल्याने हिरवळ या गावापुरतीच मर्यादीत आहे... परंतू बहुतेक सर्वच मध्य ऑस्ट्रेलिया एक रखरखीत आणि कोठे कोठे फक्त छोटी झुदूपे असलेले वाळवंट आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेवती, वल्ली, जॅक डनियल्स आणि कोमल : अनेक धन्यवाद !

चेतन माने's picture

17 May 2013 - 1:33 pm | चेतन माने

मी ऱ्हायलो कि !!!!

चेतन माने's picture

17 May 2013 - 1:35 pm | चेतन माने

ह आत्ता दिसली तुमची प्रतिक्रिया :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

मोदक's picture

17 May 2013 - 2:32 pm | मोदक

वाचतोय!!

बा मोदका : अनेक धन्यवाद ! :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठिकाय, ठिकाय, माझ्याकडूनपण अजून एक धन्यवाद. तुम भी क्या याद करोगे की किसी... !

बापु देवकर's picture

17 May 2013 - 3:46 pm | बापु देवकर

सफर मस्तच आहे. पुढचा भाग लवकर येवो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

अनन्न्या's picture

17 May 2013 - 4:43 pm | अनन्न्या

अगदी जवळून आले असते तर .. खूप आवड्तात पक्षी पहायला! बाकी सर्व फोटो अप्र्तिम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 7:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुढच्या भागात इच्छा पुरी होईल, अशी आकाशवाणी झालेली ऐकली आहे :)

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 7:31 pm | बॅटमॅन

अ‍ॅलिस स्प्रिंग्ज आवडले. ब्रिटन ते अ‍ॅडलेडपर्यंत टेलेग्राफचे जाळे विणणार्‍यांचे कौतुक करावे तितके थोडेच. तिथल्या रेसिझमबद्दलही काय बोलावे? असो. पण ते खादाडीचे फटू टाका की हो जरा, जळवायचेच तर नीट तपशीलवार जळवावे ;)

अ‍ॅन्ड्र्यू सायमण्ड्स तिथला मूलनिवासी असावा. उगाचच मांकीगेट प्रकरणाची आठवण झाली.

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 8:42 pm | बॅटमॅन

:D :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन आणि वल्ली : धन्यवाद !

@ बॅटमॅन : जेवढे फोटो काढले तेवढे चिकटवीत आहे. खादाडीवरच्या प्रेमामुळे बर्‍याचदा फोटो काढायला विसरतो. (स्वगत : आता यापुढच्या सहलींमधे न विसरता प्रथम फोटो, नंतर खादाडी. नाहीतर काही खैर नाही ;) )

सुहास झेले's picture

17 May 2013 - 8:49 pm | सुहास झेले

मस्त मज्जा आली.... आता पुढे? :) :)

सानिकास्वप्निल's picture

17 May 2013 - 9:02 pm | सानिकास्वप्निल

मस्तं नेहमीप्रमाणेच :)
पुभाप्र

पैसा's picture

17 May 2013 - 9:06 pm | पैसा

मस्त वर्णन आणि फोटोज! तुमच्या आणि अपर्णाच्या प्रतिक्रियांमधून आणखी माहिती मिळाली. तो मूळ रहिवासी दक्षिण भारतीय आदिवासी किंवा अंदमानातले लोक यांच्यासारखा दिसतो खराच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2013 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले, सानिकास्वप्निल आणि पैसा : अनेक धन्यवाद !

प्यारे१'s picture

19 May 2013 - 1:06 am | प्यारे१

हम्म्म्म्म
म्हणजे माणसाची भटकायची आवड आजची नाही हे पुन्हा पुराव्याने शाबित झालं तर.... !
फिरा फिरा. मजा करा नि आम्हाला पण फिरवा. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2013 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

अहो ही जेनेटीक खोड आहे माणसाची ! साधीसुधी नाही तर तब्बल ६०-७०,००० वर्षे जुनी खोड आहे ही भटकायची. ती नसती तर आपण सगळेच मानव आजही इथिओपियाच्या रिफ्ट व्हॅलिच्या आसपासच घुटमळत राहिलो असतो ! ;)

मॄदुला देसाई's picture

20 May 2013 - 5:37 pm | मॄदुला देसाई

काय ऐश करता हो तुम्ही :) हेवा वाटतो तुमचा :)

उदय के'सागर's picture

21 May 2013 - 10:25 am | उदय के'सागर

पुन्हा एकदा मस्त भाग :)
" फिरण्यात भुकेने व्यत्यय आलेला मला अजिबात आवडत नाही !" >>>
बाकी तुमच्या ह्या मताशी १००००००% सहमत

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2013 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॄदुला देसाई आणि अधाशी उदय : धन्यवाद !