किवी आणि कांगारूंच्या देशांत ०८ : क्विन्सटाउन (न्युझीलंड) ते मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
11 May 2013 - 10:49 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

... पण आता पोट भरले असल्याने तसाच पुढे निघून हॉटेलवर पोहोचलो.

आज सहलीचा आठवा दिवस. आ़ज न्यूझीलंडला टाटा करून ऑस्ट्रेलियाची वाट पकडायची होती. विमान सकाळी ९:४० ला होते त्यामुळे बॅगा ६:३० ला खोलीबाहेर आणि सगळे बसमध्ये ७:३० ला असे ठरले होते. एक मात्र छान होते, सगळे सहप्रवासी वेळ कटाक्षाने पाळत होते, त्यामुळे कोठेही निष्कारण खोळंबा न होता सहल चालली होती. क्वचित कोणाला एकदोन मिनिटे उशीर झाला तर त्याचे "गुड मॉर्निंग XXX" असे कोरसने बसमध्ये गमतीने स्वागत होत असे. आणि तसे करताना झालेल्या मिश्किल नजरा टाळताना उशीर केलेल्या व्यक्तीची तारांबळ उडत असे. मात्र हे सर्व खेळीमेळीने होत असे आणि असे प्रसंग सर्व सहलीत अपवादानेच आले. असो.

व्किन्सटाउन विमानतळ छोटेखानी पण नीटनेटका होता...

.

जेटस्टार एअरलाईन्सच्या विमानाने आम्हाला घेऊन मेलबर्नला जाण्यासाठी २,१२५ किमी आणि साडेतीन तासांच्या प्रवासासाठी उड्डाण केले. हे झालेले क्विन्सटाउनचे शेवटचे हवाई दर्शन...

विमानाने वेग पकडला आणि न्यूझीलंडच्या दर्‍याखोरी, हिमाच्छादित पर्वत... गेल्या आठवड्याभरात आपलाच असल्यासारखा सहजपणे भटकत असलेला भूभाग... मागे पडू लागला...

.

आणि थोड्याच वेळात विमान टास्मान समुद्रावरून उडू लागले... आता ऑस्ट्रेलियाचा भूभाग येईपर्यंत तीन तास तरी केवळ अथांग समुद्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे ढगच दिसणार होते. म्हणजे झोपेची कमी भरून काढायची उत्तम संधी.

भल्यामोठ्या आकाराची शेते दिसायला लागली आणि बेटांच्या समूहाने बनलेला एक छोटा देश सोडून एक स्वतंत्र खंड म्हणवून घेणार्‍या देशात आगमन झाले याची खात्री पटू लागली. ऑस्ट्रेलियाचे एकूण क्षेत्रफळ ७६ लाख ९२ हजार चौ किमी म्हणजे भारताच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. मात्र तेथील लोकसंख्या जेमेतेम २ कोटी चाळीस लाख आहे. मेलबर्न हे साधारण ४२-४५ लाख वस्तीचे शहर ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातील सर्वात जास्त लोकवस्तीचे आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियातील दोन क्रमांकाचे शहर आहे.

विमानतळ थोडासा शहराबाहेरच आहे. आम्हाला घेऊन जाणारी बस रस्त्यावरून धावू लागताच ऑस्ट्रेलियाचे वृक्षसम्राट असलेले निलिगिरीचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा दिसू लागले...

जगात नीलगिरीच्या एकूण ७०० पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यातल्या फक्त १५ च ऑस्ट्रेलियाबाहेर आढळतात आणि केवळ ९ च ऑस्ट्रेलियात आढळत नाहीत. नीलगिरी झाडाच्या खोडावर ओरखडा काढला तर त्यातून चीक निघतो, म्हणून या झाडांना येथे गम ट्री असेच संबोधतात.

मेलबर्न शहरात उंच स्तंभ असलेल्या बोल्टं पुलावरून आम्ही प्रवेश केला...

नतर थोड्याच अंतरानंतर एक कलती कमान असलेला जरासा विचित्र पूल दिसला...

थोडे पुढे गेल्यावर युरेका टॉवर या २९७ मीटर उंचीच्या ९१ मजली आणि उंचीत ऑस्ट्रेलियातील दोन क्रमांकाच्या इमारतीचे दर्शन झाले...

१८५४ साली सोन्याच्या खाणींतील मजुरांनी केलेल्या वसाहतीच्या शासनाविरुद्ध केलेल्या उठावाला युरेका बंड असे म्हणतात. त्याच्या स्मरणार्थ या इमारतीला हे नाव दिले आहे. सोन्याचे प्रतीक म्हणून या इमारतीचे वरचे काही मजले सोनेरी रंगात रंगवलेले आहेत आणि बंडात मृत पावलेल्या २७ मजुरांच्या स्मरणार्थ त्यावर एक लाल रंगाची उभी रेषा काढली आहे. मेलबर्नच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून वाट काढत आमची बस त्या इमारतीकडेच चालली होती...

.

युरेका टॉवरच्या तळमजल्यावर रोल्स रॉइसचे शोरूम आहे...

तेथे फार वेळ रेंगाळण्याचा मोह आवरून आम्ही सरळ लिफ्टकडे निघालो. ही लिफ्ट आम्हाला ८८ व्या मजल्यावरच्या निरीक्षण मनोर्‍यावर (स्कायडेकवर) घेऊन गेली...

तेथून सर्व मेलबर्न शहराचे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे मनोहर विहंगम दृश्य बघण्यात सर्वजण रंगून गेले...

.

.

.

.

.

या मजल्यावर एक "द एज" नावाची काचेची खोली आहे. ती प्रवाशांना घेऊन इमारतीच्या तीन मीटर बाहेर सरकते आणि अधांतरी उभे असल्याचा भास निर्माण करते...


थे सगळे वर्णन वाचून मोठ्या उत्साहाने तिकीट काढून गेलो पण खोलीचा लहान आकार, फक्त ३ मीटर इमारतीबाहेर येणे आणि यात भर म्हणजे फोटो काढायला बंदी... या सगळ्यामुळे भमनिरासच झाला. शांघाईच्या पर्ल टॉवरवरच्या विस्तीर्ण काचेच्या जमिनीवरून चालण्याच्या अनुभवापुढे याला मी फक्त १% च गुण दिले!

तेथून हॉटेलवर जाण्याचा रस्ता चायनाटाउनमधून होता...

.

वाटेत मेलबर्नची प्रसिद्ध रेस्तरॉवाली ट्रॅम दिसली...

हॉटेलवर पोहोचलो तेव्हा दीड दोन वाजले असावे. भूक लागली होती आणि आजचा उरलेला सगळा वेळ स्वतंत्र भटकायला मोकळा ठेवलेला होता. बॅगा खोलीवर आल्यावर लगेच लॉबीत थांबलेल्या सहल निर्देशकाकडून माहिती घेऊन बाहेर पडलो. पहिला थांबा पोटोबाचा. हॉटेल जवळच दोन तीन चौक सोडून असलेल्या भारतीय रेस्तरॉच्या शोधात बाहेर पडलो. बरोबर भारतीय खाण्याची चव घेण्यासाठी सामील झालेले एक अमेरिकन दांपत्य होते.

मेलबर्न हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र आणि ऑस्ट्रेलियातले कलेचे माहेरघर समजले जाते. वाटेच याची चुणूक जाणवली. रस्त्याच्या पादचारी मार्गांवर चित्रे काढून बसलेले आणि जादूचे खेळ करणारे कलाकार दिसले...

.

त्यावेळी तेथे वार्षिक मेलबर्न विनोदोत्सव (कॉमेडी फेस्टिवल) चालू होता...

निर्देशकाने रस्ता सांगताना थोडीशी गडबड केलेली होती. पण आम्ही थोडेच असे हार जाणार? दोन दुकानांत विचारीत माग काढत ते रेस्तरॉ शोधून काढलेच! मस्तपैकी समोसे, दही पापडी, छोले भटोरे आणि गुलाबजामून असा बेत जमवला. बरोबरची अमेरिकन मंडळी आयडाहोच्या ग्रामीण भागातली होती. त्यांनी भारतीय पदार्थ अगोदर कधीच चाखले नव्हते. आता कधी भारतीय रेस्तरॉ दिसले तर सोडणार नाही असे म्हणाले! मात्र त्यांना समोसे, दही पापडी, छोले भटोरे, गुलाबजामून आणि मेन्युकार्डावरचे इतर पदार्थ म्हणजे नक्की काय हे समजावून सांगताना तारांबळ उडाली आणि फोटो काढायचे राहूनच गेले!

भरल्या पोटावर हात फिरवत आम्ही आजून दोन चौक ओलांडून व्हिक्टोरिया राज्याच्या लोकसभेजवळ पोहोचलो. ऑस्ट्रेलिया हा देश पूर्वी वेगवेगळ्या असलेल्या ब्रिटिश कॉलन्यांचे संघराज्य आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या विधानभवनाला लोकसभा (पार्लमेंट) असेच म्हणतात... म्हणजे प्रत्येक राज्याची वेगळी लोकसभा आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियाची एक सांघिक लोकसभा (फेडरल पार्लमेंट) असा प्रकार आहे.

.

लोकसभा स्टेशनवर आम्ही सिटी सर्कल रूटवरून जाणारी ट्रॅम पकडली... ही ट्रॅम चौकोनी मार्गावरून धावते आणि तिच्यातल्या स्वयंचलित यंत्रणेवरून दोन्ही बाजूला येणार्‍या महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि आकर्षणांचे वर्णन करते. ही सफारी मोफत आहे आणि मेलबर्नचे एक आकर्षण म्हणून ओळखली जाते. मेलबर्न ट्रॅमचे २५० किमी लांबीचे मार्गांचे जाळे हे जगातील सर्वात मोठे आहे.

सिटी सर्कल रूट ट्रॅममधून फिरताना घेतलेली मेलबर्नची काही चित्रे...

.

.

.

.

.

परतेपर्यंत संध्याकाळ झाली होती. बरेच थकायलाही झाले होते. हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका रेस्तरॉला राजाश्रय देऊन खोलीवर परतलो आणि निद्रादेवीच्या आधिन झालो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... ===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

===================================================================

...परतेपर्यंत संध्याकाळ झाली होती. बरेच थकायलाही झाले होते. हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका रेस्तरॉला राजाश्रय देऊन खोलीवर परतलो आणि निद्रादेवीच्या आधिन झालो.

आज जरा आरामात उठायला मिळाले कारण आज सकाळी मेलबर्न मध्येच भटकंती करायची होती म्हणून बस जरा उशीरा म्हणजे नऊ वाजता निघणार होती. त्यामुळे उशीरा उठून आरामात आटपून सवाआठला न्याहारीला गेलो. न्याहारीच्या जागेवरून दिसणार्‍या गल्लीत कोणत्याही महानगरात होते त्याप्रमाणे सकाळची लगबग सुरू झाली होती...

बस निघाली आणि थोड्याच वेळात एक ब्रिटिश जमान्यातली आणि काहिशी ओळखिची वाटावी अशी इमारत आली...

हे फ्लिंडर्स रेल्वे स्टेशन. याचा आकार थोडासा ओळखीचा वाटेल. कारण हे मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे) आकाराने लहान आणि कमी कलाकुसर असलेले छोटे जुळे भावंड आहे. याबाबत आमच्या सहल निर्देशकाने सांगितलेली कहाणी ही अशी... या दोन इमारतींचे आराखडे एकाच वेळेला तयार करण्यात आले आणि त्यातला मोठा आराखडा त्याकाळी सोन्याच्या शोधामुळे (गोल्ड रशमुळे) महत्त्व आलेल्या मेलबर्नला पाठवायचे ठरले होते. मात्र इंग्लंडच्या बाबू लोकांनी घोळ करून मोठा आराखडा मुंबईला आणि छोटा मेलबर्नला पाठवला. त्याकाळच्या (१९व्या शतकाचा दुसरा भाग) संथ बोटींनी होणार्‍या पत्रव्यवहारांमुळे दोन्हीकडे आराखडे वापरून बरेच बांधकाम झाल्यानंतर हा घोळ ध्यानात आला. पण तेव्हा खूप उशीर झाला होता आणि मुंबईला मोठे रेल्वे स्टेशन मिळाले.

फेडरेशन चौकातला SBS टीव्ही स्टुडिओ...

मेलबर्नच्या भटकंतीत काढलेली अजून काही चित्रे...

.

.

मेलबर्नला गार्डन सिटी असे का म्हणतात याचे उत्तर वारंवार मिळत होते...

.

मेलबर्नची ट्रॅम...

या ट्रॅमचे जाळे शहरभर आहे आणि ट्रॅमचे रूळ अगदी रस्त्यांच्या मध्यभागी आहेत...

शहरातला फेरफटका संपवून सेंट पॉल्स कॅथिड्रल हे गोथिक शैलीत बांधकाम केलेले एक भव्य चर्च बघायला गेलो...

.

.

तेथून पुढचा थांबा होता फिट्झरॉय बाग...

.

.

.

बागेच्या सौंदर्याबरोबर या बागेत अजून दोन खास गोष्टीं पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तेथे असलेले इंग्लिश एल्म जातीचे वृक्ष. एकेकाळी इंग्लंड आणि सर्व युरोपभर पसरलेले हे वृक्ष डच एल्म रोगाच्या साथीचे शिकार बनून जवळ जवळ नष्ट झाले आहेत आणि युरोपात काही ठिकाणीच आणि तेही मुख्यतः छोट्या झाडांच्या स्वरूपात शिल्लक आहेत. मात्र फिट्झरॉय बगिचा युरोपपासून दूर असल्याने येथे ह्या दुर्मिळ वृक्षांच्या रांगा अजून शिल्लक आहेत...

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि हवाई बेटांची सर्वप्रथम सफर आणि नाविक पाहणी करणार्‍या कॅप्टन जेम्स कुकचे खानदानी घर (Cooks' Cottage)...

खरेतर हे घर ग्रेट आयटन (नॉर्थ यॉर्कशायर, इंग्लंड) या गावी कुकच्या वडिलांनी बांधले होते. कुक लहाणपणीच घरातून बाहेर पडला होता आणि त्याचे बहुतेक सगळे आयुष्य समुद्रसफरी करण्यात गेले. त्यामुळे तो या घरात फार काळ राहिला नसावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे घर इतर कोणाच्या तरी मालकीचे झाले होते. १९३३ साली रसेल ग्रिमवाल्ड नावाच्या एका ऑस्ट्रेलियन माणसाने हे घर ८०० पौंडांना विकत घेतले आणि त्याची वीट न वीट मोकळी करून, बोटीत भरून, मेलबर्नला आणून, ते तेथे परत जसे होते तसे उभे केले ! अगदी त्याच्यावर असलेली आयव्हीची वेलसुद्धा मूळ वेलीच्या छाटून आणलेल्या तुकड्यापासून वाढवलेली आहे !

तेथून पुढे परत बसची सफर सुरू झाली. काही वेळाने वाटेत हे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे मेलबर्न फुटबॉल मैदान दिसले...

मग आम्ही मेलबर्नच्या फॉर्म्युला वन रेस ट्रॅकवरून बसने सफर केली !!!...

.

.

मेलबर्नमध्ये राखीव कार रॅली ट्रॅक नाही. कार रॅलीच्या वेळेला हा रस्ता खास पद्धतीने बदलून त्याचे ट्रॅकमधे रूपांतर केलेजाते... आणि रॅली संपली की परत त्याचा सर्वसामान्य रस्त्यासारखा उपयोग करतात !

पुढे बंदरावर थोडा फेरफटका मारला..

यानंतर पुढचे खास आकर्षण होते मेलबर्नच्या जगावेगळ्या "कोलोनियल ट्रॅम कार रेस्तरॉ" मधले दुपारचे जेवण...

१९८३ पासून सुरू झालेले हे नावीन्यपूर्ण रेस्तरॉ जुन्याकाळच्या ट्रॅमच्या डब्यांबरहुकूम बनवलेल्या आणि खर्‍याखुर्‍या ट्रॅमच्या रुळांवरून जाणार्‍या ट्रॅममध्ये आहे. उत्तम जेवणाचा आस्वाद घेत असताना ते आपल्याला मेलबर्न आणि त्याच्या काही उपनगरांतून फिरवून आणते. आतापर्यंत बोटीवरच्या जेवणाची, फिरत्या रेस्तरॉमधली मजा ऐकली/अनुभवली होती. पण ट्रॅममध्ये बसून गावभर फिरत जेवायची ही पहिलीच वेळ होती !

.

जेवणही फाकडू होते... शँपेनने सुरुवात, चिकन लिवर अ‍ॅन्ड कोनॅक पॅटे अपेटायझर, सियर्ड कांगारू एन्ट्री, ग्रील्ड चिकन ब्रेस्ट मेन आणि शेवटी शेफ्स सिलेक्शन ऑफ लोकल चीज. जेवण अंगावर आले नसते तरच नवल होते. हॉटेलवर आल्यावर तासभर आडवे होणे साहजिक होते !

पण फार उसंत होती कोणाला? तासानंतरचा गजर लावून थोडीशी डुलकी घेतली इतकेच. तीन वाजता निघणार्‍या "पेंग्विन परेड" नावाच्या सफारीला बाहेर पडलो. मेलबर्नच्या रंगीबेरंगी उपनगरांतून मार्ग काढत बस फिलिप बेटाच्या दिशेने निघाली...

.

दीड तासांच्या बसप्रवानानंतर आम्ही फिलीप बेट या प्राणिसंरक्षक क्षेत्रात पोहोचलो. हे बेट मुख्य भूमीला एका पुलाने जोडलेले आहे. पोचेपर्यंत बराच काळोख दाटून आला होता. त्यामुळे आणि गाडीच्या वेगामुळे रस्त्याच्या बाजूने दिसणारे कांगारू आणि स्थानिक पक्षी कॅमेर्‍याने टिपू शकलो नाही :( .या बेटावर एका लहान आकाराच्या पेंग्विन्सची मोठी वस्ती आहे. हे पेंग्विन सकाळी मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात आणि रात्र झाल्यावर घोळक्याने परतात आणि अंग वाळवीत बेटावरच्या जमिनीवरच्या बिळांसारख्या आपल्या घरट्यांत जातात.

संशोधनकार्याचा भाग म्हणून काही घरटी जरा जास्त चांगली बनवून त्यांना क्रमांक दिलेले दिसले....

पेंग्विन्सचा परतीचा मार्ग ठरलेला आहे आणि त्याच्या बाजूला प्रेक्षकांना बसून बघण्यासाठी बैठका व पेंग्विनच्या बरोबरीने चालत जाण्यासाठी लाकडी मार्ग केलेला आहे.

.

अंधार झाला की पेंग्विन झुंडीने येतात आणि हाता दोन हातावर असलेल्या प्रेक्षकांकडे ढुंकूनही न पाहता आपल्या साथीदारांशी हितगुज करत, कोणी मागे पडले तर त्याच्याकरता थांबत, आपल्या डुगूडुगू चालीत घरट्यांकडे जातात. पेंग्विनना इतक्या जवळून बघताना प्रवश्यांना काय करू आणि काय नको असे होऊन जाते. मात्र फ्लॅशने पेंग्विनना त्रास होऊ नये म्हणून कॅमेर्‍यास सक्त मनाई आहे आणि त्याची अंमलबजावणी तेथील वॉर्डन्स मोठ्या सजगपणे करत असतात. त्यामुळे या एका अत्यंत मनोहारी आणि आनंददायक निसर्गोत्सवाचे फोटो नाहीत... असं वाटलं की डोळ्यांनी साठवलेल्या स्मृतींचे फोटो काढायची काहीतरी सोय हवी होती.

मात्र प्रत्येक पेंग्विन दररोज परततोच असे नाही. काहीजण आठवडा दोन आठवडॅ समुद्रातच राहतात. तेथे होत असलेल्या संशोधनकार्याचा भाग म्हणून दररोज परतणार्‍या पेंग्विन्सची मोजदाद केली जाते. आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी १४९० पेंग्विन परत आले होते. तेथल्या एका वॉर्डनच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या दिवशी त्यापेक्षा थोडे जास्तच परत आले असावेत... अर्थात त्या मोजणीपेक्षा पेंग्विनच्या झुंडी, त्यांचे डुगूडुगू चालणे, एकमेकाला समजून घेणे, दुसर्‍यासाठी थांबणे आणि अंधारात न चुकता बरोब्बर आपापल्या घरट्यांकडे जाणेच जास्त मोहवून गेले !

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 May 2013 - 11:17 pm | मुक्त विहारि

आवडला..

राही's picture

11 May 2013 - 11:30 pm | राही

आतापर्यंतचे सर्वच लिखाण आणि फोटो उत्तम उतरले आहेत. पण नेहेमी नेहमी तोच तोच प्रतिसाद कसा द्यायचा म्हणून फक्त शेवटीच लिहायचे ठरवले होते. पण रहावले नाहीच. तुम्हाला असेच प्रवास घडोत आणि आम्हांला अशीच सुंदर लिखाणाची आणि फोटोंची मेजवानी मिळत राहो. आमेन.

तुमचे सगळेच फोटो व प्रवस वर्णन खुपच छान असतात.
आम्हाला जाउन आल्याचा आनंद मिळतो

मोदक's picture

11 May 2013 - 11:36 pm | मोदक

आ व ड ला.

(च्यामारी.. प्रतिक्रियेमध्ये वैविध्य आणायचे कुठून..?????)

सुहास झेले's picture

11 May 2013 - 11:42 pm | सुहास झेले

ब्येस... आता पुढे? :)

चला, आष्ट्रेलियात कै कै दिसतं बघू आता. आंदो :)

प्यारे१'s picture

12 May 2013 - 3:00 am | प्यारे१

आले ऑस्ट्रेलियाला!

नेहमीप्रमाणेच सुरेख वर्णन आणि फोटो.
बहुत काय लिहिणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2013 - 10:27 am | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, राही, प्रकाश जनार्दन तेरडे, मोदक, सुहास झेले, बॅटमॅन, प्यारे१ आणि वल्ली : धन्यवाद ! असाच सहलीत सहभाग असू द्या.

भडकमकर मास्तर's picture

12 May 2013 - 11:38 am | भडकमकर मास्तर

वा.. आता ऑस्ट्रेलिया.. मस्त .. वाचतोय ..

दिपक.कुवेत's picture

12 May 2013 - 1:49 pm | दिपक.कुवेत

छे! प्रत्येक वेळि काय आणि कसं वेगळं म्हणु?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2013 - 3:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

भडकमकर मास्तर आणि दिपक्.कुवेत : धन्यवाद !

श्रिया's picture

12 May 2013 - 9:59 pm | श्रिया

वाचतेय, मस्त चालू आहे सफर!

स्पंदना's picture

13 May 2013 - 6:25 am | स्पंदना

पुढे कुठे जाणार आहात? हॉल्स गॅपला गेलात तर तेथले फोटोज येतीलच.
ती नदी आहे यारा.
ब्रिजच नाव आहे वेस्टर्न गेट ब्रिज.
मी पहिल्यांदा या रस्त्यावरुन येत होते तेंव्हा ट्रॅमचा ट्रॅक आपण शेअर करतोय या कल्पनेने घाबरले होते. टॅक्सीड्राइव्हर हसुन हसुन मेला. ट्रॅम ब्रेक लावुन थांबते गो बाय म्हणुन सांगता येत नव्हत त्याला. हुच्च मलंग!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे

श्रिया आणि aparna akshay : धन्यवाद !

@ aparna akshay : हॉल्स गॅपला गेलो नाही. इतर ठिकाणच्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट्स् आणि रॉक फॉर्मेशन्सनना प्रायॉरिटी यादीत जरा वरचा क्रमांक मिळाला. ११-१२ दिवसात खंडप्राय देश बघायचा म्हणजे नाइलाजाने असे करायलाच लागते.

शिद's picture

13 May 2013 - 6:26 pm | शिद

अगदी असाच चायना टाऊन तुम्हाला सिडनीला आल्यावर जॉर्ज स्ट्रीटला समांतर असा दिसेल. बाजुलाच पॅडि'ज मार्केट आहे; त्यामध्ये बर्‍याच अश्या आकर्षक अश्या भेटवस्तू अगदी स्वस्त व वाजवी दरांत मिळ्तील.
बघू, आता तुमच्यामुळे सिडनीच्या किती आठवणींना ऊजाळा मिळतो ते. :)

अनन्न्या's picture

13 May 2013 - 6:46 pm | अनन्न्या

गुगल क्रोमवर टायपिंग नीट करता येत नाहीय. मी तुमच्या बरोबर नि:शब्द फिरते आहे. हुश्श!! एक वाक्य तरी न चुकता टाईप करता आले.

वाचते आहे आंणि सहलीचा आनंद घेते आहे :-)

पैसा's picture

13 May 2013 - 8:57 pm | पैसा

शब्द संपले. पुढच्या वेळी प्रतिक्रिया दिली असे समजून घ्या!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिद, अनन्न्या, आतिवास आणि पैसा : सहलीतील सहभागाबद्दल धन्यवाद !

आता मेलबर्नसफारीचा आनंद घेताना अपर्णाची आठवण येत राहणार. नेहमीप्रमाणेच प्रतिसाद समजून घ्यावा ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2013 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मॄदुला देसाई's picture

20 May 2013 - 4:31 pm | मॄदुला देसाई

@इस्पिकचा एक्का, लेखमालिका मस्तं चालली आहे. नेहमी प्रतिसाद देतेच असं नाही पण आवर्जून वाचत असते. दोन दुकानांत विचारीत माग काढत ते रेस्तरॉ शोधून काढलेच! मस्तपैकी समोसे, दही पापडी, छोले भटोरे आणि गुलाबजामून असा बेत जमवला. रेड पेपरमधे जेवलात का? बाकी कसे वाटले आमचे गाव?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2013 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे गाव फार सुंदर आहे. आवडले.

हॉटेलचे नाव नक्की लक्षात नाही. स्वान्स्टन स्ट्रीटवरच्या आमच्या हॉटेलवरून पार्लमेंटकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे.

सहलीत असाच सहभाग असू द्या.