===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...
====================================================================
...लहानसे टपरीवजा स्वयंपाकघर आणि फुटपाथवर टेबले-खुर्च्या असा साधाच अवतार होता. पण ब्ल्यू कॉडच्या खास सिग्नेचर बॅटरसह तळलेल्या तुकड्या आणि स्वतः बनवलेल्या बटाटा चिप्स (होम मेड होत्या, पॅकेटमधून काढून तळलेल्या नाही) लोक मिटक्या मारत खात होते. मीही त्यांच्यात सामील झालो.
आजचा न्यूझीलंडमधला सातवा दिवस प्रवाशांच्या निवडीच्या अतिरिक्त सहली करण्यासाठी पूर्णपणे मोकळा सोडलेला होता. मी आजच्यासाठी 'वाइल्डरनेस सफारी' नावाचा अनेक आकर्षणे मिळून बनलेली सफारी निवडली होती. न्याहारी आटपून साडेसात वाजता लॉबीत आलो आणि नेहमीप्रमाणे ही नवीन वैशिष्ट्यपूर्ण पुष्परचना दिसली...
बस वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवासी जमा करत निघाली. एका ठिकाणी ती थांबली होती तिथले दृश्य पाहून कॅमेरा आपोआप बाहेर आला...
सकाळच्या अंघुक प्रकाशात बस आम्हाला घेऊन वाकातिपू तळ्याच्या काठाने ४५ किमी दूर असलेल्या ग्लेनॉर्की नावाच्या ठिकाणी घेऊन चालली होती. ग्लेनॉर्की हा सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या परिसर, अनेक चित्रपटांमध्ये केले गेलेल्या त्याच्या चित्रणामुळे जगप्रसिद्ध झाला आहे. परंतू त्याच्या फार पूर्वीपासून ग्लेनॉर्की-किनलोख हा भाग बॅकपॅकर्स आणि ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे १२ व्या शतकापासून मावरी लोक त्याचा वाकातिपू तळ्याच्या परिसरात मिळणाऱ्या जेड करिता केलेल्या प्रवासातील थांबा म्हणून करत असत. ग्लेनॉर्कीकडे घेऊन जाणारा रस्ताही काही कमी सुंदर नव्हता. क्विन्सटाउनच्या बाहेर पडल्यावर लगेच पाच मिनिटातच एक फोटो थांबा आला. ढगांमुळे अजूनही सूर्यमहाराज अजून नीटसे दर्शन देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या दृश्याला अजूनच एक गूढगंभीरता आली होती...
.
ग्लेनॉर्कीच्या जवळपास पोचेपर्यंत बऱ्यापैकी उजाडले होते आणि या भागाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले होते...
.
येथून पुढे मोठ्या बसेस जाऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही छोट्या ४X४ बसमध्ये स्थलांतर केले आणि मंतरलेल्या चैत्रबनातून पुढचा प्रवास सुरू केला...
.
.
दूरवर पसरलेली हिरवळ, त्यावरच चरणारी गुरे, हिरवळीच्या कडांना असलेली झाडाची गर्दी आणि त्यापुढे लगेच सुरू होणारे ढगांनी झाकलेली शिखरे असलेले डोंगर... निसर्गाची जादू सुरू होऊ लागली होती...
मधूनच आमची गाडी नदीच्या पात्रातून जात होती...
तर कधी छोट्या पुलावरून...
वाटेत एक छोटेसे जंगल लागले...
ते ओलांडून गेलो आणि आमचा एका वेगळ्या जगात प्रवेश झाला...
या संपूर्ण उद्यानात एकच एक बांधीव घर आहे. एका ग्रीक माणसाने हे घर हा विभाग राष्ट्रीय उद्यान बनण्याच्या फार पूर्वी लीजवर घेतले होते आणि आता त्याचा मुलगा रिटायर होऊन तेथे राहतो आहे. ते घर इतके मोठे आहे की त्याचा ९० टक्के भाग सतत बंदच असतो. अजून ३ वर्षांनी लीज संपल्यावर ते सरकारच्या ताब्यात जाईल. लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या चित्रणाच्यावेळी ह्या घराचा काही भाग चित्रीकरण करणाऱ्यांपैकी काहीजणांच्या राहण्याच्या सोईसाठी भाड्याने दिला होता. शक्य असते तर तिथे एक दिवस तरी राहणे मला नक्कीच आवडले असते...
.
.
जसजसे आम्ही अजून पुढे जाऊ लागलो तसे निसर्ग अजूनच गुढगंभीर होऊ लागला...
थंडीत आपल्या तोंडातून जशी वाफ येताना दिसते तशी येथे जमिनीवरच्या पाण्याची वाफ होताना दिसत होती... प्रथम वाटले की हा धूर असेल पण जवळ जाऊन बघितले तेव्हा खात्री झाली...
हा भाग चित्रपटात बघितला असल्याचे रसिक प्रेक्षकांना आठवेल... विशेषतः डावीकडची चिमुकली झोपडी आणि उजवीकडचे त्रिकोणी झाड...
येथे थोडावेळ थांबून आमचा प्रवास पुढे सुरू झाला...
.
येथून पुढे आमची पॅरॅडाइज नावाच्या ग्लेनॉर्कीच्या शेजारच्या जंगलाची पायी सफर सुरू झाली. या जंगलात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. त्यापैकी Lord of the Rings ने या भागाला फार प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटात बोरोमीरच्या हत्येचे चित्रीकरण या जंगलात केले आहे... आम्ही त्या वाटेवरून पुढे निघालो...
इथल्या झाडांचे खास विचित्र आकार आणि जंगलाचे सौंदर्य पाहून निर्देशकाने या जंगलाची Lothlórien (Third Age मधल्या Middle-earth मधले Elves वसतिस्थान) म्हणून निवड केली होती...
..................
या झाडांच्या आकारावरून एका अॅनिमेशन फिल्ममध्ये चालू शकणारी झाडे दाखविण्याची कल्पना निर्देशकाला सुचली होती.
झाडावर चढणार्या माकडाचा झालेला आकार...
या जंगलातल्या झाडांचे एक वैशिष्ट्य असे की झाड जसे वयाने मोठे होत जातात तसे त्याच्या खोडाचा मधला भाग सडत जातो आणि त्यात ढोली बनते...
ढोलीच्या आत उभे राहून काढलेला तिची उंची मोजणारा फोटो...
काही वर्षांनी ही ढोली इतकी वाढते की स्वतःच्या भाराने झाड मोडून पडते...
.
.
अशा प्रकारे हजारो वर्षे पडलेल्या झाडांचे अवशेष आणि त्याच्यावर साठलेले मॉस या जंगलातील सहल आपल्याला एका प्राचीन विश्वात घेऊन जातात.
या जंगलात Vertical Limit, X-Men Origins: Wolverine व The Chronicles of Narnia: Prince Caspian ह्या चित्रपटांचे आणि Top of the Lake या टीव्ही सिरियलचेही चित्रण झाले आहे.
अगदी नवीन म्हणजे The Hobbit trilogy चेही चित्रण येथे झाले आहे आणि त्यातील एक प्रॉप तेथे अजून आहे. त्या प्रॉपसह त्या चित्रपटातील मुख्य कलाकार...
(सूचना: हा मुख्य कलाकार अदृश्य पात्राचे काम करत असल्याने मर्त्य मानवांना तो पडद्यावर दिसणार नाही ;) )
त्या मंतरलेल्या चैत्रबनातून आम्ही बाहेर पडून न्यूझीलंडमध्ये विकसित झालेल्या जेटबोट या एका नवप्रवर्तक संशोधनाची मजा घेण्यास निघालो. नेहमीच्या बोटींना असणारे पंख्यांसारखे प्रॉपेलर्स न्यूझीलंडमधल्या उथळ ब्रेडींग असलेल्या नद्यांतल्या दगडगोट्यांना टकरून निकामी होत असल्याने उपयोगी नाहीत. ह्यावर उपाय म्हणून विल्यम हॅमिल्टनने प्रोपेलरच्या ऐवजी बोटीच्या तळांतून पाणी खेचून त्या पाण्याच्या जेटच्या आधारे बोटीला वेग देणारी यंत्रणा बनवली. या तंत्राने अत्यंत वेगवान (९० किमी प्रतितास) जाणारी उथळ तळाची जेटबोट अगदी ४० सेमी खोल पाण्यात पुढे-मागे जाऊ शकते आणि वेगाने वळूही शकते. आजकाल अश्या वेगवान जेटबोटी प्रवासी वाहतूक, बचाव मोहिमा आणि खेळासाठी जगभर वापरल्या जातात.
आमची जेटबोट आम्हाला घेऊन उथळ डार्ट नदीची सफर करायला निघाली...
.
अगदी उथळ पाण्यातून आणि नदीच्या अनेक लड्यांमधून चालक मोठ्या शिताफीने मार्ग काढत ६० ते ९० किमीच्या वेगाने बोट चालवत आमच्या अंगावर शहारे उभे करत होता. या बोटीचे विशेष असे आहे की ही पूर्ण वेगात असताना छोट्या कोनात वळू शकते, स्वतःभोवती पूर्ण गिरकी घेऊ शकते आणि पाच-सात मीटरच्या अंतरात उभी राहू शकते. बोटीच्या या सगळ्या क्षमतांचा पुरेपूर फायदा घेऊन कसलेला चालक प्रवाशांच्या कायम स्मरणात राहील असा थरारक अनुभव देत होता. मध्येच थोडा मोठा पाण्याचा साठा आला की हात वर करून गोल-गोल फिरवीत होता... याचा अर्थ "आता तुमच्या पुढचा संरक्षक रॉड घट्ट पकडा. आपण ३६० अंशाची गिरकी घेणार आहोत !" आणि मग प्रवासी रोलर-कोस्टरसारखा अनुभव घेत तश्याच किंचाळ्या फोडत होते...
मधूनच आम्हाला एका चित्रपटातल्या पात्राने दर्शन दिले (ओळखले कोण आहे ते?)...
४५ मिनिटे आमच्या अॅड्रिनॅलीनची पातळी उंचावून बोट परत ग्लेनॉर्कीला निघाली. वाटेत दुसरी एक जेटबोट वाळूत अडकून पडलेली दिसली...
तिच्या बिचार्या चालकाने त्यातल्या तीन महिलांना पाठंगुळी घेऊन वाळूवर उतरवले आणि आमच्या बोटीपर्यंत आणून सोडले आणि आम्ही त्यांना घेऊन पुढे निघालो...
तेवढ्यात त्या बोटीला परत पाण्यात खेचणारी बोट आली...
आजूबाजूचे सौंदर्य पाहत आम्ही ग्लेनॉर्कीला पोहोचलो...
ग्लेनॉर्कीत दुपारचे जेवण घेतले आणि जेवणानंतरचे गोड म्हणून अर्थातच होकी-पोकी...
.
जेवणानंतर परतीचा प्रवास सुरू झाला...
हॉटेलवर पोचलो तेव्हा चारच वाजले होते. समोरच असलेला टेकडीवर नेणारा गोंडोला (केबल कार) खुणावत होता...
तेथे जाणारा रस्ता शहराच्या मध्यभागातून जात होता. यानिमित्ताने शहराचे जवळून दर्शन झाले...
.
.
.
गोंडोलातून टेकडीवर जाताना दिसलेले क्विन्सटाउन...
.
खालून कल्पना करू शकणार नाही इतक्या अनेक धाडसी खेळांच्या आणि इतर मनोरंजनाच्या सोयी या टेकडीवर आहेत...
बुंजी जंप (दोर ४३ मीटरचा आहे पण उडी शहराच्या ४०० मीटर वर लोंबकळवते)...
लुगं...
शहराचा आणि तळ्याचा नजारा ४५० मीटर उंचीवरून पाहत पोटोबा करण्यासाठी पूर्ण उंचीच्या काचेच्या भीती असलेले रेस्तरॉ...
पॅरॅशूटींग (या खेळाची माहिती फार उशीरा झाली त्यामुळे वेळ संपल्याने हे करता आले नाही :( )...
इतर गंमत संपल्यावर "किवी हाका" हा मावरी कार्यक्रम बघायला टेकडीवरच असलेल्या थिएटरमध्ये गेलो. शंख फुंकून आमचे पारंपरिक पद्धतिने स्वागत झाले...
किवी हाका म्हणजे मावरी लोकांचा युद्धापूर्वी करण्याचा नाच. जर तुम्ही न्यूझीलंडच्या रग्बी संघाचा खेळ पाहिला असेल तर खेळ सुरू होण्या अगोदर त्या संघाने केलेला किवी हाका जरूर पाहिला असेल...
त्यानंतर इतर पारंपरिक नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम झाला...
.
.
कार्यक्रम संपल्यावर गोंडोलाने परत खाली आलो...
परतताना हे भारतीय रेस्तरॉ दिसले...
पण आता पोट भरले असल्याने तसाच पुढे निघून हॉटेलवर पोहोचलो.
(क्रमशः )
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
11 May 2013 - 2:34 am | मोदक
मस्त सुरू आहे सफर!!!!
पु भा प्र.
11 May 2013 - 3:26 am | अर्धवटराव
शब्द नाहित हे सौंदर्य वर्णायला. फोटो इतके सुंदर आहेत... प्रत्यक्ष काय बहार असेल.
अर्धवटराव
11 May 2013 - 4:21 am | निशदे
हा भाग आत्तापर्यंतच्या न्युझीलंड सफरीतला सर्वात सुंदर....... येऊ द्या अजून..... :)
11 May 2013 - 6:32 am | बावळट
आवडले हो आवडले.
11 May 2013 - 8:35 am | मुक्त विहारि
आवडला..
11 May 2013 - 9:09 am | यशोधरा
मस्त आहेत फोटो.
11 May 2013 - 9:59 am | प्रचेतस
सुरेख झालाय हा भाग.
11 May 2013 - 11:14 am | डॉ सुहास म्हात्रे
मोदक, अर्धवटराव, निशदे, बावळट, मुक्त विहारि, यशोधरा आणि वल्ली : आपणा सर्वांना सहलितील सक्रिय सहभागासाठी अनेक धन्यवाद !
11 May 2013 - 12:01 pm | सुहास झेले
मस्तच... पहिले ६-७ फोटो तर निव्वळ अप्रतिम. आता पुढे? :) :)
11 May 2013 - 12:19 pm | प्यारे१
:) :) : )
11 May 2013 - 2:03 pm | चेतन माने
काय लिहू कळत नाहीये…… फारच सुंदर !!!
पुभाप्र :):):)
11 May 2013 - 2:37 pm | गौरव जमदाडे
सहल खूपच छान चालली आहे. आता पुढे काय काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
11 May 2013 - 3:19 pm | स्पंदना
मश्त!
11 May 2013 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुहास झेले, प्यारे१, चेतन माने, गौरव जमदाडे आणि aparna akshay : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !
11 May 2013 - 5:37 pm | कोमल
खुप मस्त सुरु आहे सहल..

अवांतर : तुम्ही तुमच्या फोटुना पाण्याची खुण का नाही लावत बॉ? एवढे छान फोटु आहेत, कुणी स्वतः च्या नावे डकवले किंवा खपवले तर??
11 May 2013 - 8:26 pm | बंडा मामा
वा! क्या बात है! तुमची प्रवास वर्णने आणि फोटो म्हणजे आम्हाला हेवा वाटण्याच्या पलिकडचे प्रकरण आहे. इतकी भटकंती ती ही एकट्याने करायला तुम्हाला कशी काय जमते? कौटुंबिक जवाबदार्या आणि आर्थिक नियोजन ह्यातच आमच्या ९०% सहली खलास होतात. तुम्हाला हे मस्त मौला जगभर फिरणे कसे काय जमते ह्यावरही जमल्यास लिहा.
साधारण ह्या सहलींचा खर्च काय असतो (हेलिकॉप्ट्र दर्शन वगेरे धरुन) हे ही दिलेत तर आम्हाला ही ठिकाणे फोटोतच बघायची का कधी प्रत्यक्षातही बघता येतील ह्याचाही अंदाज बांधता येइल. :)
तुमच्या मुशाफिरीला अनेक शुभेच्छा!
11 May 2013 - 8:38 pm | भडकमकर मास्तर
आज सर्व लेखमाला वाचली. सुंदर प्रवसवर्णन. हेलिकॉप्टर राईड आणि मिरर लेक अवर्णनीय छायाचित्रे...
... वाचतोय.. अजून येउद्यात
11 May 2013 - 10:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोमल, बंडा मामा आणि भडकमकर मास्तर : आपल्या सहिलीतील सहभागासाठी धन्यवाद !
11 May 2013 - 11:47 pm | बॅटमॅन
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
शेवटी लॉर्ड ऑफ द रिंग्ज आलाच तर!!!! गँडाल्फबाबांचे दर्शनही झालेच :) बोरोमीर मरतो ते जंगल आणि बाकी लोथलोरिएनचा भागही अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! यावेळेस मात्र शब्द नाहीत. नुसते नजरेने साठवतोय सगळे.
त्यावरून आमची जुनी जिलबी आठवली. मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने
12 May 2013 - 10:14 am | डॉ सुहास म्हात्रे
हा भाग तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला.
ते काव्य जिलबी नसून सु-संस्कृत पुरणपोळी आहे असं मलातरी वाटतं ब्वॉ !
13 May 2013 - 2:34 pm | झकासराव
स्वर्गीय :)
13 May 2013 - 2:45 pm | सौंदाळा
सही चालली आहे मालिका.
न्यूझीलंडमधली स्वछता आणि प्रगत शेती व्यवसायाची माहिती ऐकुन आहे.
काही वर्षापुर्वी आपल्या लाडक्या भज्जीचे बुट तळाला चिखल / घाण लागली म्हणुन विमानतळावरच जप्त केल्याचे आठवले. ;)
13 May 2013 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
झकासराव आणि सौंदाळा : अनेक धन्यवाद !
@ सौंदाळा :
न्युझीलंडची अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेती (यात मेंढ्या / गुरे पाळणे आले) आणि वनशेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मातीतून संक्रमीत होउ शकणारा जनावरांचा / वनस्पतींचा रोग त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकतो. यामुळेच तेथे (आणि ऑस्ट्रेलियातही) देशात प्रवेश करणार्या सर्व प्रवाशांची (यांत त्यांचे स्वतःचे नागरीकही आले) पादत्राणे तपासली जातात. मात्र पादत्राणे सर्वसाधारण स्वच्छ असली तरी पुरे असते.
15 May 2013 - 5:33 am | रेवती
सुंदर फोटो.
15 May 2013 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
16 May 2013 - 12:32 am | पैसा
विश्वास बसणार नाही इतकं सुंदर आहे सगळं! प्रदूषण अजिबात नसावे बहुधा!
16 May 2013 - 9:32 am | garava
फोटो अप्रतिम आहेत...
18 May 2013 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !