किवी आणि कांगारूंच्या देशांत ०५ : औराकी / माऊंट कुक – क्विन्सटाउन

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
7 May 2013 - 1:20 am

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

आजची आमची वस्ती औराकी / माऊंट कुक राष्ट्रीय उद्यानातील हॉटेलमध्ये होती.

काल रात्री जरा उशीराच पोचलो होतो. बाहेर अंधार होता आणि ग्लोबसतर्फे मेजवानी होती म्हणून गडबडीने तयार होऊन जेवायला गेलो होतो. त्यामुळे नेहमीचा खिडकीतून आजूबाजू न्याहाळण्याचा कार्यक्रम झाला नव्हता. सकाळी उठल्यावर पडदा दूर केला आणि बघतो तर काय खुद्द औराकी (माऊंट कुक) समोर उभा !...

.

सकाळच्या काहीश्या अंधुक प्रकाशात ती हिमशिखरे खोलीच्या खिडकीतून एवढ्या जवळून पाहतानाची मन:स्थिती वर्णन करायला शब्द सुचत नाहीत. जाणीवपूर्वक नेमकी हॉटेल्स आणि त्यांच्या नेमक्या खोल्या निवडल्याबद्दल टूर कंपनीचे कौतुक सहलभर होतेच. पण ही खोली मिळाल्याबद्दल टूर कंपनीला मनोमन अजून १०० टक्के गुण जास्त दिले !

जवळच डोंगराच्या कुशीत वसलेले माऊंट कुक गाव दिसत होते...

औराकी (माऊंट कुक) 'हाय', 'मिडल' आणि 'लो' अशा नांवाच्या तीन शिखरांनी बनलेला आहे आणि त्याच्यावर टास्मान आणि हूकर या नावाच्या दोन हिमनद्या आहेत. या आणि त्याच्या आजूबाजूच्या बर्‍याच मोठ्या विभागाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे आणि त्यात औराकी (माऊंट कुक), वेस्टलँड, माऊंट अस्पायरींग आणि फिओर्डलँड या नावांची चार राष्ट्रीय उद्याने आहेत. या सर्व भूभागात २,००० मीटरपेक्षा जास्त उंच असलेली १४० शिखरे आणि नामकरण झालेल्या ६२ हिमनद्या आहेत. आमचे "द हर्मिटेज" हे हॉटेल त्या विभागात अगदी मोक्याच्या ठिकाणी होते.

औराकीचे अजून एक वैशिष्ट्य असे की शेर्पा तेनसिंगसह एव्हरेस्टवर प्रथम चढाई करण्याचा मान मिळालेल्या एडमंड हिलरीने येथेच आपल्या गिर्यारोहण कौशल्याचे धडे गिरवले होते. त्याच्या स्मरणार्थ औराकीमधल्या या हॉटेलच्या एका भागात "सर एडमंड हिलरी अल्पाईन सेंटर" आहे. त्यात संग्रहालय, 2D व 3D चलत्चित्रपटगृह आणि प्लॅनेटोरियम, इत्यादी सकाळी ८ ते रात्री ७ पर्यंत चालू असतात.

शिवाय येथून एक जगावेगळी (न्यूझीलंडने जगाला दिलेल्या अनेक नवप्रवर्तक [innovation] गोष्टींपैकी एक) सफर करता येते. ती म्हणजे बर्फावर घसरायच्या स्की लावून उडणारे-उतरणारे विमान तुम्हाला इथल्या ३,००० मीटर उंचीवरच्या टास्मान हिमनदीवर घेऊन उतरते आणि तिथली सफर करवून परत आणून सोडते. २७ किमी लांब, ०.६ ते ४ किमी रुंद आणि ६०० मीटर खोल अशी ही या विभागातली सर्वात मोठी हिमनदी आहे.

मी या अतिरिक्त सफारीची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो. मात्र ही सफारी अर्थातच उंच बर्फाळ प्रदेशातील हवामानाच्या लहरीवर अवलंबून असते. अशा भागातले हवामान कधी कसे बदलेल हे सांगता येत नाही. काल रात्री झोपण्यापूर्वी आकाशात फारसे ढग नव्हते. पण सकाळी मात्र औराकीच्या डोक्यावर ढगांनी ठाण मांडले होते (वरची सुरुवातीची चित्रे पहा). हॉटेलच्या जेवणाच्या खोलीची रचना मोठी कल्पक होती. केवळ भिंतीच नव्हे तर छपराचा काही भागही काचेचा होता. त्यामुळे न्याहारी करतानाही आजूबाजूचे पर्वत दिसत होते आणि त्यांच्यावर अधिकाधिक पडत जाणारे ढगांचे सावट माझ्या मनावरही पडत होते. तरीही 'इथले वातावरण काय मिनिटामिनिटाला बदलते. हे आता होतील दूर ढग' असे सतत मनाला सांगून त्याची उभारी कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू होता. न्याहारी संपली, आठ वाजले... आणि सहल निर्देशक बातमी घेऊन आला की खराब वातावरणामुळे विमान उडू शकणार नाही. पण नऊ वाजता याबाबत परत निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगून त्याने आशेची ज्योत तेवत ठेवली. चला, जरा परिसराचा फेरफटका मारू असे म्हणून बाहेर पडलो. हॉटेल जवळच्या एका छोट्या उंचवट्यावरून औराकीचे निरीक्षण करण्याची सोय होती...

तेथे पोचतो न पोचतो तेवढ्यात पाऊस सुरू झाला... झाले, आमच्या या बेतावरही हवामानाने पाणी पाडले असे म्हणत परत हॉटेल मध्ये शिरलो. तासभर आहे तेवढ्यात अल्पाईन सेंटर तर बघून घेऊ, होईल तोपर्यंत हवामानात सुधारणा असा विचार केला. ह्या सेंटरमध्ये हिलरीसंबद्धीत अनेक गोष्टी संग्रहीत आहेतच पण एकंदरीत या भागातून तयार झालेल्या अनेक गिर्यारोहकांची माहिती आणि बर्फाळ प्रदेशात वापरायच्या नवप्रवर्तक उपकरणांचाही संग्रह आहे. शिवाय या भागाच्या विकासाच्या इतिहासाचीही रोचक माहिती आहे.

एव्हरेस्टवर चढाई करून परतल्यावर पहिल्या थांब्यावर विश्रांती आणि चहा घेताना शेर्पा तेनसिंग आणि हिलरी...

बर्फात चालणारा ट्रॅक्टर...

द हर्मिटेजमध्ये आलेली पहिली चारचाकी...

औराकी राष्ट्रीय उद्यानाच्या सफरीसाठी कामात आणलेली पहिली बस...

हिमनदी सफरीसाठी वापरलेले पहिले स्कीयुक्त विमान... असलेच एक विमान टास्मान हिमनदीवर घेऊन जाणार होते...

नऊ वाजता बाहेर आलो तरी पावसाची रड चालूच होती :( . आता अजून वाट पाहिल्यास पुढच्या कार्यक्रमाचा खोळंबा झाला असता. मोठ्या जड मनाने औराकीचा निरोप घेऊन बसप्रवास सुरू केला. गंमत अशी की औराकीच्या दरीतून बाहेर पडलो आणि सगळे मळभ दूर होऊन सूर्य ढगांतून बाहेर डोकावू लागला ! वाटेत एका निसर्गरम्य तळ्याच्या काठी फोटो थांबा झाला...

.

आणि परत प्रवास सुरू झाला...

.

वाटेत अल्पोपाहारासाठी एका ठिकाणी थांबलो तेव्हा पैलवानाच्या वट्ट पिळलेल्या मिशांसारखी शिंगे असलेल्या या मरिनो मेंढ्याची भेट झाली...

थोड्याच वेळात सुरुवातीचा हिरवागार प्रदेश सोडून गाडी एकदम रखरखीत करड्या-तपकिरी रंगांच्या डोंगराळ भागात शिरली...

.

फोटोत जरी छान दिसत असला तरी हा या भागात या वर्षी झालेल्या अवर्षणाचा परिणाम होता. अन्यथा हे सगळे डोंगर हिरवळीने भरलेले असते आणि त्यांच्यावर भरपूर मेंढ्या चरताना दिसल्या असत्या. डोंगर उतरून पलीकडे गेल्यावर मात्र परत झाडी आणि नेत्रसुख सुरू झाले...

.

.

वाटेत क्रॉमवेल नावाच्या छोट्या गावात थांबलो. इथले "होकी-पोकी" आइसक्रीम फार प्रसिध्द्द आहे त्याची चव घ्यायची होती !

इवल्याश्या गावातही "ऑथेंटिक इंडियन कुसिन" वाले रेस्तरॉ पाहून उडालोच !

येथून पुढे निसर्ग आपले रुपडे परत दिमाखाने दाखवायला सुरुवात करू लागला...

आणि द्राक्षांच्या मळ्यांचा प्रदेश सुरू झाला...

.

पुढचा थांबा होता जगप्रसिद्ध बंजी / बंगी उडीच्या जन्मस्थळाचा...

.

बूंगी उडी हा न्यूझीलंडने जगाला दिलेला नवप्रवर्तक खेळ आता सर्व जगात पसरला आहे. या धाडसी आणि काहीश्या माथेफिरू खेळाची सुरुवात १९८८ साली वरच्या चित्रातल्या कावाराउ पुलावरून पहिली उडी मारून झाली. ४३ मीटर उंचीच्या या उडीचे अनेक प्रकार आहेत... कोरडी , पाण्यात डोके बुडणारी, एकट्याने, जोडीने, इ...

 ..................

.

 ..................

आता इतर अनेक ठिकाणी खेळात अजून नावीन्य आणण्यासाठी केबलकार वापरून १३४ मीटर उंचीवरून उडी, पर्वतावरचा गोंडोला वापरून ४७ मीटर लांबीचा दोर पण शहराच्या वर ४०० मीटरवर लटकवणारी उडी, ७० मीटर लांबीचा दोर + ३०० मीटर परिघाचे झोके देणारी उडी असे अनेक चित्तथरारक प्रकार उपलब्ध आहेत... निवडा तुम्हाला हवा तो ! आमच्यातल्या एका अमेरिकन नवदांपत्याने जोडीने उडी मारली आणि बाकीच्यांनी त्यांची चित्रे काढली +D

पुन्हा आमचा सौंदर्याने रसरसलेल्या निसर्गातून प्रवास सुरू झाला...

.

.

क्विन्सटाऊनला पोहोचलो तेव्हा चार वाजले असावे. साडेसहा वाजता पुढचा कार्यक्रम होता. हॉटेल गाठले तसे पहिला नेहमीच्या रिवाजाप्रमाणे गरमागरम शॉवर घेऊन तरतरी आणली. सहल निर्देशक तासभर आराम करा म्हणाला होता पण अश्या सुंदर ठिकाणी जायचे आणि लोळात रहायचे हे काही पटले नाही. क्विन्सटाऊनचे प्रसिद्ध वाकातिपू तळे हॉटेल शेजारीच होते. ते खिडकीतून खुणावत होते...

अर्थातच पावले तिकडे वळणार नाहीत तर काय ! ...

तळ्याच्या किनार्‍यावर हिरवळ आणि पादचार्‍याच्या रपेटीसाठी प्रशस्त व्यवस्था केली आहे. या तळ्यावर अनेक प्रकारच्या पाण्यातील मनोरंजक खेळ व सफारींची व्यवस्था आहे...

.

.

अर्धा तासच भटकलो असेन, लगेच पाऊस सुरू झाला आणि लगबगीने हॉटेलवर येणे भाग पडले. तोपर्यंत लॉबीत सहप्रवासी जमायला सुरुवात झाली होती. साडेसहापर्यंत पावसाचा जोरही कमी झाला होता. सर्वजण पायीच निघालो. आम्हाला शहराजवळच्या वॉल्टर पीक हाय कंट्री फार्मवर डिनरपार्टीसाठी जायचे होते. तेथे न्यायला "टि एस् एस् एर्नस्लॉ" नावाची वाफेवर चालणारी व्हिंटेज बोट आमची बंदरावर वाट पाहत होती...

बोटीतून पेयपान करीत आणि आजूबाजूचे सौंदर्य पाहत तासाभरात आम्ही फार्मवर पोहोचलो. बोटीचे इंजिन प्रवाशांना बघता यावे यासाठी बंदिस्त न ठेवता शिवाय त्याच्या वरून व बाजूंनी पाहण्याची खास सोय केलेली होती. त्यामुळे आता जवळ जवळ नामशेष झालेल्या या बोटीच्या वाफेच्या इंजिनाचे चालू अवस्थेत निरीक्षण करण्याची संधी मिळाली...

फार्मवर प्रथम जेवण झाले. गुरुवार होता पण बुफेमध्ये बरेच शाकाहारी पदार्थ असल्याने काही त्रास झाला नाही. त्यानंतर येथील सिग्नेचर मेंढी भादरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतरचा कुत्र्यांचा कार्यक्रम मात्र मागच्यापेक्षा जास्त चांगला होता. शेतकरी आणि त्याचे कुत्रे दोन्हीही कसलेले होते. तो कार्यक्रम सुरू होता होता धो धो पाऊस सुरू झाला होता. पण तरीही शेडमध्ये उभे राहून आमच्याशी संवाद करता करता प्रदर्शकाने दिलेले हुकूम कुत्रे अंधार्‍या रात्रीत आणि भर पावसात १०० ते १५० मीटरवरूनसुद्धा बरोबर पाळत होते !

रात्री हॉटेलवर परत येईपर्यंत अकरा वाजले होते. असाच पाऊस पडत राहिला तर या धाडसाची राजधानी (adventure capital) म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्विन्सटाउनमधल्या कार्यक्रमांचे काय होईल याची काळजी करतच झोपी गेलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

वाचतिये. सुरेख वर्णन आणि चित्रे. बंजी जंपींग हा प्रकार निदान मला तरी अनैसर्गिक वाटतो.

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 1:41 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम निसर्गसौदर्य, साहसी खेळ व गिर्यारोहणातील ऐतिहासिक व्यक्तिंसंबंधी ठिकाणांची सफर घडवणारा हा भाग खूप आवडला.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 1:55 am | प्यारे१

:) :) :)

आम्हाला जाग्यावर बसवून तुम्ही सार्‍या जगाची सफर घडवताय...... :)
मनापासून धन्यवाद...... अजून असेच येऊ द्यात. :)

प्रचेतस's picture

7 May 2013 - 9:29 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच उत्तम भाग.
आमची अगदी फुकटात न्युझीलॅंड सफर होतेय.

पु.भा.प्र.
लवकर येउद्यात..
जेव्णाचे फोटु नै बै टाकले तुम्ही.. (जिभ्लीमाता स्माइली)

यशोधरा's picture

7 May 2013 - 11:08 am | यशोधरा

आईसक्रीमचा फोटो कुठेय? तो हवाच होता!
मस्त चालली आहे सफर..

एकदम मस्त....नेहमीप्रमाणेच छान वर्णन आणि फोटो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेवती, श्रीरंग_जोशी, प्यारे१, निशदे, वल्ली, कोमल, यशोधरा आणि अस्मी : आपणा सर्वांना सुंदर प्रतिक्रियांअसाठी अनेक धन्यवाद !

नेहमीप्रमाणे उत्तम भाग. या भागातील निसर्गसौंदर्य पाहून लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील रोहान आणि गाँडॉर यांच्या प्रदेशांची प्रकर्षाने आठवण झाली. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

येणार, येणार, लवकरच येणार... हा प्रदेश क्विन्सटाउनच्या आसपासच आहे आणि त्याची सफर केल्याशिवाय आपण क्विन्सटाउनवरून हालणार नाही याची खात्री देतो ;)

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 12:42 pm | बॅटमॅन

वा वा सहीये!!!! अ‍ॅरागॉर्न, फ्रोडो, गँडाल्फ, गिमली-लेगोलास यांच्या "मध्यदेशा"च्या प्रतीक्षेत :)

स्पा's picture

7 May 2013 - 12:11 pm | स्पा

हा भाग वाचून प्रचंड जळजळ झालेली आहे ;)

प्रत्येक फटू नीट पाहून , आपण तिथे असल्याची कल्पना करून समाधान मानून घेतल्या गेले आहे :D

मस्तच

सुहास झेले's picture

7 May 2013 - 12:26 pm | सुहास झेले

निव्वळ अप्रतिम..... आता पुढे कुठे? :) :)

अफलातून.. नवीनच प्रदेशाची ओळख. वाचतो / पाहतो आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

बाकी एक मधला फोटो ताम्हिणी घाटाची आठवण करुन देणारा आहे..

A

अनिरुद्ध प's picture

7 May 2013 - 1:00 pm | अनिरुद्ध प

विन्टेज बोटिचे छायाचित्र अजुन बघायला आवडले असते कारन टायटेनिकचि आठवण झालि,असो वातावरणातिल बदलाने सहल यश्स्वि होण्याचि हुरहुर काळ्जाचा ठाव घेवुन गेलि,पुढिल भागाची प्रतिक्शा करत आहे.

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 2:04 pm | दिपक.कुवेत

आणि वर्णन. बंगीजंपींग बद्द्ल रेवतीजी शी सहमत....पण अर्थात आवड आपली आपली

झुळूक's picture

7 May 2013 - 2:15 pm | झुळूक

खूपच छान!!!
पन "होकी-पोकी" आइसक्रीम खाल्लेकी नाही?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पा, सुहास झेले, गवि, अनिरुद्ध प, दिपक्.कुवेत आणि झुलूक : आपल्या सक्रिय सहभागाने सहलीची मजा अधिकच वाढतेय !

@ झुळूक : तर तर... तो तर माझ्या खास आवडीचा फ्लेवर आहे आणि त्याच्या जन्मस्थानी त्याला सोडेन काय ?!

मुक्त विहारि's picture

7 May 2013 - 3:12 pm | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

ज्योत्स्ना's picture

7 May 2013 - 4:33 pm | ज्योत्स्ना

फार छान लिहीता तुम्ही. आधीच्या दोन सफरींसारखेच रंजक प्रवासवर्णन. पु.भा.प्र.

विसोबा खेचर's picture

7 May 2013 - 5:55 pm | विसोबा खेचर

अतीव सुंदर...!

कदाचित काही निमित्ताने भविष्यकाळात इथे जाण्याचा योग येऊ शकतो. तसं झालंच तर तिथे स्वतःहून ड्राईव्ह करण्याची टूर करायला फार आवडेल. त्या अनुषंगाने काही प्रश्नः

१. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधे अशी सेल्फ ड्रिव्हन कार सहज मिळते हे खरे का?
२. भारतीय लायसेन्स थेट चालते का? की काही कन्व्हर्जन किंवा एन्डॉर्समेंट वगैरे?
३. फोटोंवरुन रस्त्याची "डावी बाजू वापरा" अर्थात भारतीय संकेत (ब्रिटिश?!) दिसतो आहे. त्यामुळे फार फरक पडू नये. पण चालकत्वासाठी भारतातल्यापेक्षा वेगळे काही कौशल्य अपेक्षित आहे का? (वेग/कंट्रोल/ अति कडक वाहतूक नियम / बेशिस्त चालक वगैरे)?

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधे अशी सेल्फ ड्रिव्हन कार सहज मिळते हे खरे का?

मी तिथे स्वतःचारचाकी चालवलेली नाही. पण सर्वसाधारणपणे सर्वच देशांत रेंट-अ-कार मिळतात त्यामुळे स्वतः गाडी चालवून सहल करण्यास काहीच अडचण वाटत नाही. खालील जोडांवर बरीच माहिती आहे:
http://wikitravel.org/en/Driving_in_New_Zealand
http://wikitravel.org/en/Driving_in_Australia

परंतू अधिक विश्वासू आणि अद्ययावत माहिती खालील स्त्रोतांकडून मिळेलः

अ) रेंट-अ-कार कंपन्यांच्या संस्थळांवर. तेथे गाडी राखून ठेवताही येईल जी अगदी विमानतळावर ताब्यात मिळू शकते. हॉटेल व स्थानीक आकर्षणांचे आरक्षण स्वतः आंतरजालावरून करता येते हे काय सांगायला नकोच. यात थोडे श्रम असतात पण हा पर्याय आर्थिक दृष्ट्या फायद्याचा होऊ शकतो.

आ) विकसित देशातल्या अनेक सहल कंपन्याच्या सेल्फ-ड्राइव्ह सहलीही असतात, त्यांत तुम्हाला हवी ती गाडी निवडण्याची मुभाही असू शकते (अर्थात निवडीप्रमाणे सहलीचा दर बदलतो, हेवेसांनल). अशा सहलीत चालक व गाईड सोडून इतर सर्व सोय (हॉटेल, इ ची) व्यवस्था सहल कंपनी करते. यात खर्च थोडा अधिक येतो किंवा कधी थोडा कमी. कारण कंपनीला हॉटेल व कार सवलतीच्या दरात (बिझनेस रेटने) मिळतात आणि कधी कधी त्यातला काही फायदा ती गिर्‍हाईकाला पास-ऑन करते.

तेव्हा दर सहलीस दोन्ही पर्यायांचा अभ्यास करून मगच निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.

२. भारतीय लायसेन्स थेट चालते का? की काही कन्व्हर्जन किंवा एन्डॉर्समेंट वगैरे?

अ) या दोन्ही देशांत इंग्लीश्मध्ये असलेले परदेशी लायसेन्स पहिले तीन महिने चालते असे ऐकून आहे.
आ) सर्वसाधारणपणे बहुतेक सर्व देशांत इंटनॅशनल ड्रायव्हींग लायसेन्स पहिले तीन महिने चालते. हे मूळ लायसेंसच्या आधारावर भारतात सहज मिळते.
इ) तीन महिन्यांनंतर सर्वच देशांत स्थानीक लायसेन्स आवश्यक असते.

३. फोटोंवरुन रस्त्याची "डावी बाजू वापरा" अर्थात भारतीय संकेत (ब्रिटिश?!) दिसतो आहे. त्यामुळे फार फरक पडू नये. पण चालकत्वासाठी भारतातल्यापेक्षा वेगळे काही कौशल्य अपेक्षित आहे का? (वेग/कंट्रोल/ अति कडक वाहतूक नियम / बेशिस्त चालक वगैरे)?

या दोन्ही देशांत भारतासारखीच रस्त्याच्या डावीकडून गाडी चालवत असल्याने भारतातला पुरेसा अनुभव असल्यास काही अडचण येऊ नये. मात्र रस्त्यावर नियम काटेकोरपणे पाळले जातात (अगदी बसमध्येही पट्टा वापरण्यापर्यंत). सर्व चालक नियमाबरहूकूम गाड्या चालवतात. नियम मोडल्यास कडक दंड आहेत आणि ते चिरीमिरीने टाळता येत नाहीत ;) .

मात्र सगळे चालक नियमानुसार गाडी चालवत असल्याने गाडी चालवणे आडवत असल्यास तो एक आनंददायक अनुभव होऊ शकतो.

हुश्श्य ! फार लांबलचक उत्तर दिले असे दिसते... तेव्हा इथेच थांबतो.

परत एकदा, तुमच्या डाउन अंडर भेटीला शुभेच्छा !

nishant's picture

7 May 2013 - 8:05 pm | nishant

मोह्क छायाचित्र आणि वर्णन... पु.भा.प्र.

सानिकास्वप्निल's picture

7 May 2013 - 8:16 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम फोटोज आणी सुरेख वर्णन
पुभाप्र :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, ज्योत्स्ना, विसोबा खेचर, nishant आणि सानिकास्वप्निल : आपण सर्वांना सुंदर प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

पैसा's picture

8 May 2013 - 9:57 am | पैसा

फोटो इतके सुंदर आहेत तर प्रत्यक्ष निसर्ग तिथे किती सुंदर वाटला असेल!

चेतन माने's picture

8 May 2013 - 4:33 pm | चेतन माने

वाटेत थांबलात ते तळे खरच फार सुंदर आहे बाकी सर्वच फोटू अप्रतिम.
पुभाप्र :):):)

मॄदुला देसाई's picture

8 May 2013 - 6:22 pm | मॄदुला देसाई

अप्रतिम :)

साऊ's picture

8 May 2013 - 7:04 pm | साऊ

फार छान फोटो आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2013 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा, चेतन माने, मॄदुला देसाई आणि साऊ : अनेक धन्यवाद !

जुइ's picture

9 May 2013 - 1:18 am | जुइ

:) :) वाचत आहे. नवीन माहिती मिळत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

बहोत बोले तो बहोत चलेगी.