किवी आणि कांगारूंच्या देशांत १७ : सिडनी - ऑपेरा हाऊस, बोंडी क्लब, बंदरातील सफर, हार्बर ब्रिज आणि बॅले

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Jun 2013 - 3:19 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================
अडीच तासाच्या सफरीत चवदार जेवणाने तृप्त झालेले पोट, सुमधुर गाण्यांनी भरलेले कान आणि सिडनी बंदराच्या रात्रीच्या शोभेने निवलेले डोळे घेऊन शतपावली करत हॉटेलवर परतलो.

आजचा सतरावा दिवस जरा लवकर सुरु झाला. कारण सहलिच्या कार्यक्रमात मी अजून काही भर टाकल्याने आज फारच भरगच्च कार्यक्रम होता. शिवाय तो अजूनच अनपेक्षीतपणे कसा लांबला ते पुढे येईलच !

तर सकाळी आमची बस निघाली बोटॅनिकल गार्डन बघायला. जाताना परत सिडनीतल्या नव्या जुन्याच्या सुंदर संगमाचे दर्शन झाले...

.

.

आणि सिडनीची जगातील सुंदर शहरात गणना का करतात तेही दिसते होते...

.

बाग छान आहे पण ती या कारणासाठी मला जास्त आवडली...

बर्‍याच सुंदर बागांमधे "इकडे जाऊ नका", "तिकडे हात लावू नका", "हिरवळिवर चालू नका" अशा अनेक सूचना असतात. येथे चक्क आमंत्रण होते हिरवळिवर चालायला, पिकनिक करायला आणि चक्क झाडांना मिठी मारायला (भारताची चिपको चळवळ ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचल्याचे पाहून समाधान वाटले !) !

दुसरे म्हणजे ही बाग एका टेकडीवर असल्याने आणि बंदरापासून मोक्याच्या ठिकाणी असल्याने येथून सिडनी शहराचे आणि त्याच्या बहुतेक सर्व आकर्षणांचे मनोहर दर्शन होते.

सिडनी आकाशरेखा...

.

ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज...

.

बंदर...

हा सगळा नजारा डोळ्यात आणि कॅमेर्‍यात साठवून झाल्यावर आमची बस ऑपेरा हाउसच्या दिशेने धावू लागली...

हे ऑपेरा हाऊस बांधण्याची कहाणी त्याच्या दिसण्याएवढीच चमत्कारिक आहे. १९४० च्या दशकात युजीन गोसेन नावाच्या एका नावाजलेल्या म्युझीक डायरेक्टरने सिडनीत मोठे ऑपेरा हाऊस असावे म्हणून प्रयत्न सुरू केले. मात्र या कामाला १९५४ मध्ये जोसेफ काहील नावाच्या न्यु साउथ वेल्सच्या प्राईम मिनिस्टरने पाठीबा दिल्यावरच चालना मिळाली. ३,००० आसने असलेला मोठा आणि १,२०० आसने असलेला छोटा असे बहुद्देशिय दोन हॉल बनवायचे ठरले. त्यांचे डिझाइन बनविण्यासाठी एक जागतीक स्पर्धा घेण्या आली. त्यांत १३ देशांतून २३३ प्रवेशिका आल्या. प्रवेशिका तपासणित अनेक गोंधळ झाले, बराच गदारोळ झाला आणि प्रथम नाकारलेल्या ३० प्रवेशिकांपैकी एक अंतीम विजयी म्हणून घोषित केली गेली. गम्मत म्हणजे ही प्रवेशीका शास्त्रीय पद्धतीने केलेले रेखाटन नसून स्पर्धकाने एका कागदावर केवळा हाताने रेखाटलेला आराखडा होता. या डॅनिश स्पर्धकाचे नाव होते योर्न उट्झन. ही निवड झाली तोपर्यंत हा चमत्कारीक आकार जमिनीवर प्रत्यक्षात कसा आणायचा याची कल्पनाही योर्नने केलेली नव्हती ! त्यामुळे १९५७ ते १९६३ पर्यंत फक्त वेगवेगळे १२ प्रयोग झाले होते आणि ते सगळे फसत होते. खूप क्लिष्ट आकार वापरून छत बनवण्याच्या प्रयत्नांनंतर १९६१ मध्ये पुढे आलेल्या "एकाच गोलाचे काप (आर्क) वापरून सगळी छते बनवण्याची" कल्पनेचा विकास करून हे काम पुढे जाऊ लागले. त्यामधेच १९६३ साली न्यु साऊथ वेल्सचे सरकार बदलले आणि नविन सरकारने या पांढर्‍या हत्तीची सखोल चौकशी सुरू केली. कारण केवळ अर्ध्यापेक्षा कमी बांधकाम झाले असतानाच या ७० लाख डॉलर बजेटच्या कामासाठी तोपर्यंत २३० लाख डॉलर खर्च झाला होता आणि पुढे किती खर्च होईल याचा नक्की अंदाज लागत नव्हता ! त्यातच नविन निवडून आलेल्या सरकाराच्या नेत्याला कला, स्थापत्य इत्यादीत फार रस नव्हता त्यामुळे त्याने प्रत्येक गोष्ट रकमेच्या हिशेबात तोलायला सुरूवात केली. या सगळ्याला कंटाळून योर्नने राजीनामा देऊन या कामातून अंग काढून घेतले आणि तो डॅन्मार्कला परतला. यानंतरही मूळ योजनेत अनेक बदल होत होत आणि १०२० लाख डॉलर खर्च होऊन हे ५ हॉल्स आणि इतर सर्व सुविधांसह (कलाकारांसाठी खोल्या, रंगपटांचे सामान ठेवण्यासाठी स्टोअर रूम्स, अनेक रेस्तरॉ, तिकिट विक्रीची व्यवस्था, इ) हे संकूलाचे २० ऑक्टोबर १९७३ रोजी राणी एलिझबेथच्या हस्ते उदघाटन झाले. या समारंभाचे योर्नला अमंत्रण नव्हते आणि समारंभात त्याच्या नावाचा निर्देशही केला गेला नाही.

सिडनी ऑपेरा हाउसच्या ट्रस्टला उपरती होऊन त्यांना आपण केलेल्या अन्यायाची जाणीव झाली. १९९० च्या दशकात त्यांनी योर्न उट्झनशी परत संपर्क चालू केला आणि त्याला १९९९ साली ऑपेराच्या इमारतीच्या सुधारणांसाठी डिझाइन कन्सल्टंट नेमले गेले. २००४ साली योर्नने डिझाइन केलेल्या नव्या जागेला "The Utzon Room" असे नाव दिले गेले. त्यानंतर २००७ मधे उट्झनने अजून एका मोठ्या नविनिकरणाचा मसुदा बनवला पण त्यावर काही कारवाई होण्याआधीच त्याचा २००८ मधे मृत्यु झाला. ऑस्ट्रेलियाचा नागरीक नसलेल्या उट्झनसाठी ऑस्ट्रेलियात राष्ट्रिय मेमोरियल सर्वीस आयोजीत केली गेली.

२००३ मधे उट्झनला आर्कीटेक्चरचे मनाचे Pritzker Prize दिले गेले. त्या बक्षिसाच्या अवतरणात (citation) असे लिहिलेले आहे:
"There is no doubt that the Sydney Opera House is his masterpiece. It is one of the great iconic buildings of the 20th century, an image of great beauty that has become known throughout the world – a symbol for not only a city, but a whole country and continent."

२८ जून २००७ ला सिडनी ऑपेरा हाऊसला "वर्ल्ड हेरिटेज साईट" म्हणून घोषित केले गेले. आपल्या कलाकृतीचा हा सन्मान जिवंतपणी आजपर्यंत फक्त दोनच जणांनी बघितलेला आहे. आजच्या घडीला ऑस्ट्रेलिया म्हटले म्हणजे डोळ्यासमोर उभ्या राहणार्‍या पहिल्या चार गोष्टींत सिडनी ऑपेरा हाऊसचा समावेश आहे.

आपले हे स्वप्न भूमीवर पूर्णपणे उभे राहिलेले प्रत्यक्ष बघायला उट्झनने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर (२८ फेब्रुवारी १९६६ ला राजिनामा दिल्यानंतर) परत पाऊल ठेवले नाही. नंतरचे सगळे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरचे काम त्याच्या वतीने त्याच्या मुलाने जॅन उट्झनने केले.

ही इमारत ४.४ एकरांवर बांधलेल्या या इमारतीची लांबी १८३ मी आणि रूंदी १२० मी आहे. पायाचे खांब सुमुद्रात २५ मीटरपर्यंत खोल आहेत. छपरातील गोलाकार आकारांची त्रिज्या ७५.२ मीटर आहे आणि ते अगोदर कास्टींग करून नंतर जागेवर आणून जोडलेल्या छातीच्या बरगड्यांसारख्या भागांनी बनलेले आहेत. छपरावर १०,५६,००६ ग्लॉस्सी आणि क्रीम रंगांच्या खास स्वीडनहून बनवून आणलेल्या आणी धूळ सहज न पकडणार्‍या टाईल्स आहेत. येथे वर्षाकाठी साधारण ऑपेरा, नाटके, गाण्याच्या कन्सर्टस्, इत्यादीचे साधारणपणे १५०० कार्यक्रम होतात आणि ते अंदाजे १२ लाख लोक पाहतात.

तर चला पाहूया हा मानवनिर्मीत चमत्कार. त्याच्या बाजूला असलेल्या हार्बर ब्रिजमुळे आणि टेकड्यांमुले लांबून ही इमारत जरी लहान भासली तरी तिच्या जवळ आणि विशेषतः आत गेल्यावर तिच्या भव्यतेची खरी कल्पना येते...

सिडनी हार्बर ब्रिज आणि सिडनी ऑपेरा हाऊस ही अगदी जुळी भावंड असल्यासारखी एकमेकाच्या दृश्यांत लुडबुडत असतात...

वरच्या मजल्यावर जाणार्‍या लिफ्टला छतच नाही ! कारण जुन्या मूळ आराखड्यात लिफ्ट ही कलप्नाच नव्हती आणि नंतर लिफ्ट बसवताना घुमटासारख्या छतांचा अडथळा येऊ लागला. मग छताला काट मारून वरचा भाग उघडाच ठेवला आणि मोटर जमीनीखाली ठेवण्याची योजना केली.

इमारतीच्या आतले एक प्रशस्त रेस्तरॉ...

मजले चढून जाण्यासाठी एस्कॅलेटर्स आणि सभागृहांच्या खास "अकॉस्टीक" भिंती.

छपरांची बरगड्यांसारखी केलेली रचना...

भव्य पॅसेजेस आणी जिने...

.

.

आतून दिसणारा छपराचा आणी इमारतीचा इतर भाग...

.

जवळून बघितलेले छप्पर...

.

.

.

अजून काही फोटो...

.

 ...

पटांगणातून दिसणारा पॅनोरामा...

.

इतके बघितल्यावर तेथे एखादा कार्यक्रम बघण्याचा मोह झाला नसता तरच नवल. बाहेर पडतापडता गाईड करत असलेल्या घाईला न जुमानता आमच्यातल्या काही जणांनी एका कॉन्सटची तर आम्ही काही जणांनी सिडनी ऑपेरा हाऊसच्या सिग्नेचर बॅले "Don Quixote" ची रात्रीची तिकीटे काढलीच !

परत मोहनगरी सिडनीतून बस पुढे निघाली...

.

.

पुढचा थांबा होता बोंडी समुद्रकिनार्‍यावर...

बोंडी या शब्दाचा मूलनिवासी भाषेतला अर्थ "कातळांवर आदळणार्‍या पाण्याचा आवाज" असा आहे. बोंडी समुद्रकिनार्‍यावर अनेक चित्रपट आणि टीव्ही सिरियल्सचे चित्रण झाले आहे, उदाहरणार्थ: The Block, Being Lara Bingle, Bondi Rescue, Bondi Vet, Breakers, Scooby-Doo!, Legend of the Vampire, Summer of the Seventeenth Doll, They're a Weird Mob, इत्यादी. हा समुद्रकिनारा ऑस्ट्रेलियन लोकांत कॅलिफोर्नियातील मालिबू आणि सांता मोनीका समुद्रकिनार्‍याप्रमाणे प्रसिद्ध आहे आणि येथे बर्‍याच लोकप्रिय नट-गायकांची घरे आहेत...

आज आम्ही भेट देणार होतो इथल्या प्रसिद्ध सर्फ बेदर्स लाईफ सेविंग क्लबला...

१९०७ साली स्थापन झालेला हा जगातला सर्वात जुना लाईफ सेविंग क्लब आहे. या क्लबने surf reel and line हेब्समुद्रात पोहताना बुडणार्‍या लोकांचा जीव वाचविण्यास उपयुकत असे उपकरण शोधून प्रथम वापरात आणले.

आमचे स्वागत केल्यावर सर्वप्रथम तेथील प्रमुख जीवरक्षकांनी आम्हाला क्लबबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती दिली...

.

आणि आम्हाला समुद्रात शिरण्यास वेळ नव्हता म्हणून वाळूवरच सर्फींगचे प्रात्यक्षिक करुन दाखविले...

.

.

थोडा वेळ समुद्राची मजा बघून होईपर्यंत पोटातल्या कावळ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता तेव्हा मग आम्हाला बसमध्ये बसायला राजी करण्यात गाईडला फार कष्ट पडले नाही...

या चित्रात डावीकडे वर दिसत आहे सिडनीची मोनोरेल... जिने कधीच बाळसे धरले नाही. राजकीय, आर्थिक, तकनिकी, अपघात अश्या अनेक समस्यांमुळे ३० जून २०१३ हा तिचा शेवटचा दिवस असणार आहे.

बस आम्हाला घेउन बंदरावर आलो. धक्क्यावरून समोरच राष्ट्रीय सागरी संग्रहालय (National Maritime Museum) आणि त्याच्यात उभी असलेली छोटी जुनी पाणबुडी, आरमारी व व्यापारी जहाजे दिसत होती...

बंदरातून फेरफटका मारत दुपारच्या जेवणाची व्यवस्था असलेली एम व्ही मॅजिस्टिक २ ही क्रुझ बोट आमची वाट पहात होती...

जेवणाला बसायची प्रशस्त व्यवस्था होती. गाईडने आमच्या जागा राखून ठेवल्या होत्या. जेवण मस्त होते. चक्क बटर चिकन आणि वांग्याची भाजी होती... मुख्य म्हणजे दोन्हीही चवदार होती....

.

.

पेयपान झाले. निगुतीने जेवण झाले. मग वरच्या डेकवर सिडनीचे सौंदर्य समुद्राच्या बाजूने न्याहाळायला सर्वात वरच्या डेकवर गेलो...

.

हार्बर ब्रिजवर चढाई करणारे प्रवासी...

काही पॅनोरामाज...

.

अंटार्क्टीका सफरीसाठी वापरली जाणारी खास बोट, "ओशन शिल्ड"...

खाजगी समुद्रकाठ (बीच) असणारी घरे...

"पार्क" केलेल्या खाजगी बोटी आणि त्यांच्या मालकांची घरे...

गव्हर्नरचे शासकीय वस्तीस्थान...

हार्बर बिजवरचे "गिर्यारोहक"... (आता तिथे जायलाच हवे...)

सिडनीत फिरताना ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज दर वेळेस मला बघा मला बघा अशी आठवण करत पुढे पुढे येत असतात...

सफर संपली आणि परतीच्या रस्त्याला लागलो. मात्र मला हॉटेलवर जाण्याअगोदर अजून एक महत्वाचे काम करायचे होते. न्युझीलंडमध्ये असतानाच मी टूर डायरेक्टरला सांगून हार्बर ब्रिजवर चढाईची व्यवस्था करून ठेवली होती. सहप्रवाश्यांना ओपल फॅक्टरीत सोडून आम्ही दोघेच चालत जवळ असलेल्या हार्बर ब्रिजवर गेलो...

.

गाईडने फोनवर बुक केलेले तिकीट मी ताब्यात घेतले आणि तो इतर प्रवाशांकडे निघून गेला. माझ्या पूल चढाईची वेळ होइपर्यंत तिकीट ऑफिसशेजारी पूलाच्या माहितीचे संग्रहालय आहे त्याला भेट दिली.

ही आहे या पुलाची पीन. प्रत्येक बाजूला एक अशा दोन पिना या सर्व पुलाचा भार सांभाळून आहेत....

आणि ही आहे पुलाची मिरवलेली शेखी...

चढाइबद्दल माहिती आणि खास संरक्षक पोशाख घालणे यात अर्धा तास खर्च करून आमचा बारा जणांचा गट ओळीने निघाला. या उंच पुलावर चढाई करण्यात मजा आहेच पण तेथून दिसणारा नजारा अवर्णनीय आहे. मात्र सुरक्षिततेच्या कारणाकरिता (आणि बहुतेक आर्थिक कारणासाठी सुद्धा, कारण त्यांनी काढलेल्या एका फोटोला २५ डॉलर घेतात) प्रवाश्यांना कॅमेरा बरोबर घेऊ देत नाहीत. त्यामुळे हे त्यांनी काढलेले फोटो...

.

.

.

.

पुलावरून खाली उतरलो आणि ध्यानात आले की आता हॉटेलवर जाण्यात अर्थ नाही. बॅलेच्या कार्यक्रमाला केवळ दीड तास बाकी आहे. आतापर्यंत सिडनी पायाखालचे शहर झाले होते...

फक्त एका गल्लीत थोडे विचारावे लागले. बाकी सगळा रस्ता स्वतः शोधून कार्यक्रमाला ४५ मिनिटे असताना ऑपेरा हाऊसवर पोहोचलो. जाताना एका कार्यक्रमाची नाविन्यपूर्ण जाहिरात चाललेली दिसली...

ऑपेराच्या छपराचा भलामोठ्या पडद्यासारखा उपयोग करूनही जाहिराबाजी चालू होती...

.

ऑपेराच्या अगोदर आणि त्याच्या आवारा रेस्तराँची नुसती गर्दी आहे. पण तेथे खायला येणार्ञाम्ची गर्दी त्यांनाही पुरून उरते. कसेबसे एका रेस्तरॉमधे नंबर लावून खाऊन घेतले आणि कार्यक्रमाची वेळ झाली म्हणून गडबडीत थियेटरवर गेलो.

टिव्हीवर बॅले अनेकदा पाहिला आहे. पण रंगमंचावरचा व्यावसाईक बॅले पहिल्यांदाच पहात होतो. सुरुवात थोडी कंटाळवाणी झाली पण दुसर्‍या भागापासून कार्यक्रमाने रंग पकडला आणी तो शेवटपर्यंत वरवर जात राहिला. एक उत्तम बॅले एका उत्तम कलाकारांच्या संचात एका उत्तम थियेटरमधे बघण्याचे पुरेपूर समाघान लाभले. सभागृहांत कॅमेरे नेण्यास सक्त बंदी होती त्यामुळे कार्यक्रमाचे फोटो नाहीत :(. पण मध्यंतरात प्रेक्षक पेयपान करतानाचा हा फोटो आहे...

परत अर्थातच चालत आणि आजूबाजूची गम्मत पहात आणि क्लिकल्किक करत रमतगमत आलो...

 ...............

.

 ...............

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Jun 2013 - 3:42 pm | पैसा

फोटोज अप्रतिम आहेत, वर्णन सुंदर आहे. ऑपेरा हाऊस ची इतकी डिटेल माहिती प्रथमच वाचली. सुंदर!

अनन्न्या's picture

14 Jun 2013 - 7:40 pm | अनन्न्या

खरच सुंदर वर्णन आणि फोटोही!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2013 - 1:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना अनेक धन्यवाद !

सुहासदवन's picture

22 Jul 2013 - 3:49 pm | सुहासदवन

आपण सारे envy इस्पीकचा एक्का pride :)