पहिला पाऊस
*पहिला पाऊस*
नेहमीच्या दिमाखात तो अवतरलाच. किती दिवस हुलकावण्या देत होता.
संध्याकाळी आकाशात पसरलेल्या संधिप्रकाशानेच तो येतोय हे कळवलं, हलक्या वा-यांच्या गार झुळूकांनीच हळुच कानात सांगितलं 'तो येतोच आहे लवकरच'.हळुहळू मेघ दाटून आले, वारा सुसाट झाला. आणि..आणि...*तो आला*.
ढगांनी आता जोरात नगारे वाजवायला सुरूवात केली, विजांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं..आणि भुईवरची माती तर..आनंदाने त्याच्या टपोरल्या थेंबांच्या गंधाने मोहभरीत होऊन..त्याचा गंध चहुकडे उधळीत सुटली, दिसेल त्याला त्या गंधाने वेडं करून टाकलं तिने..