250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
6 Sep 2023 - 11:53 am

PBG1

राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना. त्यानंतर काही वर्षांनी राष्ट्रपती भवनातील गार्ड बदली (Change of Guard) समारंभ बघतानाही या घोडेस्वार दलाचं पुन्हा एकदा जवळून दर्शन झालं होतं. राष्ट्रपतीच्या अंगरक्षकांना त्याआधी फक्त दूरदर्शनवर पाहिलं होतं, पण खरंच, ज्या रेजिमेंटबद्दल मला कायम कुतुहल वाटत राहिलं आहे, तिला प्रत्यक्ष पाहिलं तो अनुभव अवर्णनीयच होता.

आज राष्ट्रपतीचे अंगरक्षक (President’s Bodyguard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेजिमेंटची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये झाली. बंगाल प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्ज यानं सप्टेंबर 1773 मध्ये आपल्या खासगी सुरक्षेसाठी बनारसमध्ये पायदळातील मुघल हॉर्स रेजिमेंटमधील निवडक 50 घोडेस्वारांच्या मदतीनं एक दल स्थापन केलं. त्यावेळी ती तुकडी Governor’s Troop of Mughals म्हणून ओळखली जायची. स्थापनेनंतर लगेचच बनारसच्या महाराजा चैत सिंह यांनीही आपल्या घोडदळातील 50 घोडेस्वार या तुकडीकडे सोपवले. त्यावेळी त्या तुकडीत सेवा बजावण्यास मिळणं हे अतिशय मानाचं मानलं जायचं. या रेजिमेंटवर प्रामुख्यानं गव्हर्नर-जनरलची खासगी सुरक्षा पाहण्याची जबाबदारी सोपवलेली असल्यानं 1784 मध्ये त्याचं नामकरण Governor-General’s Bodyguard असं केलं गेलं. जसजसा काळ पुढे जात राहिला, तसतशी या रेजिमेंटनं वेगवेगळी नावं धारण केली.

1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्याद्वारे (The Queen’s Proclamation, 1858) भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश राजमुकुटाच्या हातात आला. त्यानंतर भारतातील ब्रिटिश प्रशासकीय प्रमुखाला व्हाईसरॉय म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळं 1859 मध्ये या रेजिमेंटचं नामकरण Viceroy’s Body Guard असं झालं. पुढं 1944 मध्ये 44th Divisional Reconnaissance Squadron, 15 ऑगस्ट 1947 ला परत Governor-General’s Bodyguard असं या दलाचं नामकरण झालं. Governor-General’s Bodyguard या रेजिमेंटचे ऐतिहासिक महत्व आणि उच्च परंपरा विचारात घेऊन स्वातंत्र्यानंतरही या रेजिमेंटला मानाचं स्थान दिलं गेलं आहे. 26 जानेवारी 1950 ला स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर या रेजिमेंटचं अखेरचं नामांतर राष्ट्रपतीचे अंगरक्षक (President’s Bodyguard/ PBG) असं झालं.

PBG

आज भारतीय भूदलातील ही सर्वात जुनी आणि वरिष्ठतम रेजिमेंट आहे. PBG मध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले आहेत. 1845 पर्यंत या रेजिमेंटमध्ये 1900 पेक्षा जास्त घोडेस्वार होते. त्यावेळी युद्धभूमीवरही गव्हर्नर-जनरलच्या खासगी संरक्षणाची जबाबदारी ही रेजिमेंट पार पाडत असे.

PBG मध्ये भारतीय भूदलातील निवडक, उमद्या जवानांचा समावेश होतो. यातील जवानाची उंची किमान 6 फूट असणं बंधनकारक असतं. त्याचबरोबर केवळ जाट, राजपूत आणि जाट-शीख यांच्यातूनच या रेजिमेंटमध्ये जवान म्हणून भरती केली जाते. प्रजासत्ताक दिन, बीटिंग रीट्रिट, राष्ट्रपतींचं संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोरचं अभिभाषण, परदेशी राष्ट्रप्रमुखाचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातील स्वागत समारंभ, नव्या सरकारचा शपथविधी, भारतात नियुक्ती झालेल्या राजदुतांकडून आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे सोपवण्याचा समारंभ, लष्करी आणि नागरी पुरस्कार प्रदान सोहळे अशा प्रकारच्या अनेक विशेष प्रसंगी राष्ट्रपतीचे अंगरक्षक आपल्या पारंपारिक वेशभूषेत राष्ट्रपतींच्या सोबत असतात.

भारतमाता की जय असं घोषवाक्य असलेल्या राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंटमधील घोडेस्वार युद्धप्रसंगी सीमेवरही कर्तव्य बजावत असतात. ते पॅराटृपर्स, कुशल जवान अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. स्वातंत्र्यानंतर 1965च्या भारत-पाक युद्धात पश्चिम आघाडीवर, तसेच 1988-89च्या सियाचीनमधील कारवाईतही त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. अँगोला आणि सोमालियातील संयुक्त राष्ट्रे संघाच्या (UNO) शांतिदलातही ही रेजिमेंट सहभागी झाली होती.

प्रत्येक राष्ट्रपती आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अंगरक्षक दलाला चंदेरी तुतारी आणि पताका (Silver Trumpet and Banner) प्रदान करत असतात. त्यासाठीचा विशेष समारंभ राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित केला जात असतो. (त्या समारंभावरील माझा सविस्तर लेख https://avateebhavatee.blogspot.com/2022/11/silver-trumpet-and-trumpet-b... या लिंकवर वाचता येईल.)

राष्ट्रपती भवनाच्या बाहेर होणाऱ्या औपचारिक समारंभांच्या ठिकाणी जाताना हे घोडेस्वार राष्ट्रपतींच्या वाहनाबरोबर असतात. या रेजिमेंटमध्ये एका बग्गीचाही समावेश आहे. सहा घोड्यांची ही ऐतिहासिक बग्गी पूर्वी भारताचा व्हाईसरॉय वापरत होता. स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती या बग्गीचा वापर करू लागले. त्यावेळी त्यावरील ब्रिटिश राजमुद्रा आणि अन्य चिन्हांच्या जागी सोनेरी रंगातील भारताची राजमुद्रा लावली गेली. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत प्रजासत्ताक दिनाचें संचलन, बीटिंग रीट्रीट आणि संसदेतील राष्ट्रपतींचे अभिभाषण, नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी यावेळी ही बग्गी वापरली जात होती. पण पुढे सुरक्षेच्या कारणास्तव या बग्गीची जागा अत्याधुनिक, बुलेटप्रुफ मोटारीनं घेतली आणि बग्गी राष्ट्रपती भवनातील काही औपचारिक समारंभांपुरतीच वापरली जाऊ लागली. पण प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना या बग्गीचा वापर पुन्हा एकदा सुरू झाला होता.

https://avateebhavatee.blogspot.com/2023/09/250.html

संस्कृतीकलाइतिहासमुक्तकसमाजप्रवासप्रकटनआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख.
यातील काहीच माहित नव्हते.
'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती