दिव्यांची कहाणी

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 2:51 pm

(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )

ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’

सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही. आमची मुले खेळणार कशी?’

किरणांचे हात जोडून सूर्य म्हणाला, ‘क्षमा करा. पण पावसाळ्यात माझे इकडे काम नसते. तसे विधात्याने ठरवले आहे, तुम्ही जाणता.’

मग चंद्राला बोलावले. चंद्रशेखराने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही. आमची मुले खेळणार कशी?’

चंद्राने आपली कोर विनयाने झुकवली. म्हणाला, ‘मी तर सदैव तुमच्या मस्तकावर विराजमान आहे. महिन्यातून एकाच रात्री माझा प्रकाश विलसावा अशी नियती आहे. माझा नाईलाज आहे.’

सूर्य गेला. चंद्र गेला. उजेड गेला. प्रकाश हरपला. शंकराकडे पार्वतीला देण्यासारखे उत्तर नव्हते.

दुसऱ्याच दिवशी पार्वती मुलांना घेऊन निघून गेली.

इकडे शंकर व्यथित झाले. कैलासावर गौरी नाही, म्हणजे कुडीत प्राण नाही.

दिवसांमागे दिवस गेले. रात्रीपाठी रात्री गेल्या. शेवटी दु:खाची जागा क्रोधाने घेतली. स्वत:वरच्या कोपाने घेतली. तांडव सुरु झाले. कैलासावर बर्फ ठरेना. समुद्राने आकाशी धाव घेतली. आकाश फाटू लागले. पाऊस दोरखंड झाला. शेते नासू लागली. जंगले बुडू लागली. प्राणी सैरभैर झाले. पक्षी दिगंताला जाऊ लागले. माणसे दिसेनाशी होऊ लागली. संहार पाहून देव हलले. लागलीच सगळे कैलासावर धावले. ‘महादेवा, शांत व्हा. काय झाले ते सांगा.’

पण तो आधीच व्योमकेश, त्यात रुद्र झालेला!! थांबेना. बोलेना. मग आकाशातून देवकन्या आल्या. पाताळातून नागकन्या आल्या. त्यांनी घडला प्रकार देवांना सांगितला. पार्वतीस मुलांसह कैलासावर कसे आणता येईल, देव विचारमग्न झाले. तेवढ्यात मेधा आली. म्हणाली, ‘आपण दीप लावू.’

देवांनी सुवर्णसमया केल्या. अप्सरांनी वाती वळल्या. किन्नरांनी तेल आणले. गंधर्वांनी सूर आळवले. तसा एकेक दिवा लागू लागला. बघता बघता लक्षलक्ष दीप उजळले. आसमंत प्रकाशत गेला. तरी मृत्युंजय थांबेना. ऐकेना. हे सगळे दिवे शंकरापाशी पोहचवायचे कसे? देवांना एकदम गंगा आठवली. गंगाधरापर्यंत पोहोचण्याचा तीच एक सरळ मार्ग.

देवांसह सगळे तिच्या किनारी आले. तिची आरती केली. ती प्रसन्नवदना हसून म्हणाली, ‘माझ्या पदरात दिवे माळा. मी उलटा प्रवास करेन. कैलासावर दिवे पोहचवेन.’

पहिला निष्पापतेचा दिवा अनघाने सोडला. दुसरा कमळासारखा दिवा पद्मिनीने सोडला. तिसरा पवित्र दिवा शुचिने सोडला. चवथा लखलखता दिवा हिरण्यमयीने सोडला. पाचवा सूर्याचा दिवा अदितीने सोडला. सहावा शीतल दिवा चंद्रसहोदरीने सोडला. सातवा निरामय दिवा बिल्वनिलयाने सोडला. आठवा देखणा दिवा त्रिपुरसुंदरीने सोडला. आणि नववा जिवंत दिवा प्रसन्नाक्षीने सोडला.

उलट जाताना गंगेला कष्ट झाले. पण कैलासावर जीवन पाहिजे. पार्वती पाहिजे. मुलांसाठी प्रकाश पाहिजे. उजेड पाहिजे. या विचाराने ती आणखी द्रुतगामिनी झाली.

कैलासावर पोहोचली, तेव्हा हीच अमावस्या होती. काळीकुट्ट. गंगेने नीलकंठाच्या पायाला वेढे घातले. तिच्या शीतल स्पर्शाने तांडव थांबले. तिच्या दर्शनाने विरूपाक्षाचे चित्त थाऱ्यावर आले. तशी गंगेने एकएक दिवा कैलासावर ठेवला. त्यांचा प्रकाश दशदिशांत पसरला. कुठे अमावस्या? कुठे अंधार? कुठे निराधार? सगळीकडे पौर्णिमाच पौर्णिमा.

गिरिजा परतली. मुले परतली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. आकाश नीलकांत झाले. समुद्र शांत झाला. सृष्टी परत लयदार झाली. नऊ दिव्यांनी जसा त्यांना प्रकाश दिला, तसा तुम्हालाही मिळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

-शिवकन्या

मांडणीवावरसंस्कृतीधर्मवाङ्मयकथासाहित्यिकसमाजप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

2 Aug 2019 - 2:54 pm | पद्मावति

वाह. सुरेख आणि प्रसन्न लेखन.

जॉनविक्क's picture

2 Aug 2019 - 3:01 pm | जॉनविक्क

गुड़ वन

श्वेता२४'s picture

2 Aug 2019 - 3:01 pm | श्वेता२४

अत्यंत ओघवती कथा. खरेच अशी कथा आहे की तुम्ही लिहीलिय

शिव कन्या's picture

2 Aug 2019 - 4:29 pm | शिव कन्या

मलाच सहज सुचली तशी लिहिली.

श्वेता२४'s picture

2 Aug 2019 - 5:38 pm | श्वेता२४

लिखाणाची पारंपारीक स्टाईल सुरेख जमलीय

जगप्रवासी's picture

2 Aug 2019 - 3:45 pm | जगप्रवासी

सुरेख

यशोधरा's picture

2 Aug 2019 - 3:51 pm | यशोधरा

छान.

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:33 pm | माकडतोंड्या

तरीच दिव्यांच्या उष्णतेने हिमनद्या वितळायला लागल्या.

जालिम लोशन's picture

2 Aug 2019 - 4:51 pm | जालिम लोशन

छान

संग्राम's picture

2 Aug 2019 - 4:56 pm | संग्राम

कथा आवडली ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2019 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान लिहिलंय. अजून लिहा.

प्रसन्न लेखन. भाषाही भारी अलंकारिक !
रच्याकने एवढी यातायात करून उलटी गंगा वाहवण्यापेक्षा एमैसीबीला एक अर्ज टाकला असता तर आम्ही चार डांब टाकून उजेड पाडला असता की !
ह घ्या :)

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2019 - 8:53 am | ज्योति अळवणी

अप्रतिम. भाषा ओघवती आणि पूर्वीच्या काहाण्यांना साजेशी.

माझी आजी आणि आता आई श्रावण शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची काहाणी वाचते. रविवारी आदित्यराणुबाईची काहाणी वाचते. लहानपणापासून ऐकलेल्या या काहाण्यांपाठ झाल्यात. त्यावेळी रविवारी हातात 3तांदळाचे दाणे घेऊन काहाणी ऐकताना काहीतरी वेगळं करतो आहोत हे जाणवायचं.

त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

जॉनविक्क's picture

3 Aug 2019 - 2:52 pm | जॉनविक्क

ऐका अमुक तमुक तुमची कहाणी, आटपाट नगर होतं अशी सुरुवात आणि जसा अमुक तमुक त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हालाही होओ, ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. हा ठरलेला शेवट वाचून एका अदभूत जगाची सफर व्हायची.

मन तल्लीन व्हायचे, आयुष्य अचानक खूप सुंदर व समाधानी वाटायचे. जणू राजू हिरानीचा चित्रपटच बघितला असावा. आवडती नावडतीची कथा तर फेवरीट.

हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी

जॉनविक्क's picture

3 Aug 2019 - 2:57 pm | जॉनविक्क

हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी...

...झालेली आहे. भक्ती करावी आणि सुखाने रहावे. असे वाटे की समाधानी आयुष्यासाठी श्रद्धाळूपणा ही एक गुरुकिल्ली आहे. खूपच मंतरलेला कालखंड या कथांनी दिला :)

ईश्वरदास's picture

3 Aug 2019 - 10:34 am | ईश्वरदास

महादेवाने आधी अर्जच केलेला, पण चिरीमिरी साठी अर्ज फायलीत पडुन आहे अजुन. साहेब म्हणाला एकट्या च्या साठी इतके डांब टाकायचा खर्च करावा तर काही आम्हाला पण मिळुद्या.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Aug 2019 - 11:48 am | अविनाशकुलकर्णी

कथा ढापत आहे-शिवकन्या

शिव कन्या's picture

24 Aug 2019 - 9:50 pm | शिव कन्या

ढापट आहात म्हणजे काय करत आहात? कळू द्या....

मानण्या ऐवजी कशाला प्रश्नपंच सुरू करताय ? उगा प्रतिसादातही चुंबनाचा वर्षाव झाला तर वाचकांची पळता भुई थोडी होईल ;)

गड्डा झब्बू's picture

3 Aug 2019 - 12:17 pm | गड्डा झब्बू

मस्त लिहिली आहे कहाणी! तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम.

नाखु's picture

9 Aug 2019 - 4:19 pm | नाखु

वाचलीच नव्हते हे , मस्त आहे
वाचनखूण साठवली आहे

शिव कन्या's picture

24 Aug 2019 - 9:51 pm | शिव कन्या

श्रद्धाळू वाचकांचे आभार. धन्यवाद. होय, आणखी लिहू.