(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )
ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’
सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही. आमची मुले खेळणार कशी?’
किरणांचे हात जोडून सूर्य म्हणाला, ‘क्षमा करा. पण पावसाळ्यात माझे इकडे काम नसते. तसे विधात्याने ठरवले आहे, तुम्ही जाणता.’
मग चंद्राला बोलावले. चंद्रशेखराने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही. आमची मुले खेळणार कशी?’
चंद्राने आपली कोर विनयाने झुकवली. म्हणाला, ‘मी तर सदैव तुमच्या मस्तकावर विराजमान आहे. महिन्यातून एकाच रात्री माझा प्रकाश विलसावा अशी नियती आहे. माझा नाईलाज आहे.’
सूर्य गेला. चंद्र गेला. उजेड गेला. प्रकाश हरपला. शंकराकडे पार्वतीला देण्यासारखे उत्तर नव्हते.
दुसऱ्याच दिवशी पार्वती मुलांना घेऊन निघून गेली.
इकडे शंकर व्यथित झाले. कैलासावर गौरी नाही, म्हणजे कुडीत प्राण नाही.
दिवसांमागे दिवस गेले. रात्रीपाठी रात्री गेल्या. शेवटी दु:खाची जागा क्रोधाने घेतली. स्वत:वरच्या कोपाने घेतली. तांडव सुरु झाले. कैलासावर बर्फ ठरेना. समुद्राने आकाशी धाव घेतली. आकाश फाटू लागले. पाऊस दोरखंड झाला. शेते नासू लागली. जंगले बुडू लागली. प्राणी सैरभैर झाले. पक्षी दिगंताला जाऊ लागले. माणसे दिसेनाशी होऊ लागली. संहार पाहून देव हलले. लागलीच सगळे कैलासावर धावले. ‘महादेवा, शांत व्हा. काय झाले ते सांगा.’
पण तो आधीच व्योमकेश, त्यात रुद्र झालेला!! थांबेना. बोलेना. मग आकाशातून देवकन्या आल्या. पाताळातून नागकन्या आल्या. त्यांनी घडला प्रकार देवांना सांगितला. पार्वतीस मुलांसह कैलासावर कसे आणता येईल, देव विचारमग्न झाले. तेवढ्यात मेधा आली. म्हणाली, ‘आपण दीप लावू.’
देवांनी सुवर्णसमया केल्या. अप्सरांनी वाती वळल्या. किन्नरांनी तेल आणले. गंधर्वांनी सूर आळवले. तसा एकेक दिवा लागू लागला. बघता बघता लक्षलक्ष दीप उजळले. आसमंत प्रकाशत गेला. तरी मृत्युंजय थांबेना. ऐकेना. हे सगळे दिवे शंकरापाशी पोहचवायचे कसे? देवांना एकदम गंगा आठवली. गंगाधरापर्यंत पोहोचण्याचा तीच एक सरळ मार्ग.
देवांसह सगळे तिच्या किनारी आले. तिची आरती केली. ती प्रसन्नवदना हसून म्हणाली, ‘माझ्या पदरात दिवे माळा. मी उलटा प्रवास करेन. कैलासावर दिवे पोहचवेन.’
पहिला निष्पापतेचा दिवा अनघाने सोडला. दुसरा कमळासारखा दिवा पद्मिनीने सोडला. तिसरा पवित्र दिवा शुचिने सोडला. चवथा लखलखता दिवा हिरण्यमयीने सोडला. पाचवा सूर्याचा दिवा अदितीने सोडला. सहावा शीतल दिवा चंद्रसहोदरीने सोडला. सातवा निरामय दिवा बिल्वनिलयाने सोडला. आठवा देखणा दिवा त्रिपुरसुंदरीने सोडला. आणि नववा जिवंत दिवा प्रसन्नाक्षीने सोडला.
उलट जाताना गंगेला कष्ट झाले. पण कैलासावर जीवन पाहिजे. पार्वती पाहिजे. मुलांसाठी प्रकाश पाहिजे. उजेड पाहिजे. या विचाराने ती आणखी द्रुतगामिनी झाली.
कैलासावर पोहोचली, तेव्हा हीच अमावस्या होती. काळीकुट्ट. गंगेने नीलकंठाच्या पायाला वेढे घातले. तिच्या शीतल स्पर्शाने तांडव थांबले. तिच्या दर्शनाने विरूपाक्षाचे चित्त थाऱ्यावर आले. तशी गंगेने एकएक दिवा कैलासावर ठेवला. त्यांचा प्रकाश दशदिशांत पसरला. कुठे अमावस्या? कुठे अंधार? कुठे निराधार? सगळीकडे पौर्णिमाच पौर्णिमा.
गिरिजा परतली. मुले परतली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. आकाश नीलकांत झाले. समुद्र शांत झाला. सृष्टी परत लयदार झाली. नऊ दिव्यांनी जसा त्यांना प्रकाश दिला, तसा तुम्हालाही मिळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
-शिवकन्या
वाचने
11712
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह. सुरेख आणि प्रसन्न लेखन.
यो
मस्त लिहीलिय
श्वेता
In reply to मस्त लिहीलिय by श्वेता२४
मग तुमचं विशेष कौतुक
In reply to श्वेता by शिव कन्या
सुरेख
छान.
तरीच दिव्यांच्या उष्णतेने
+1
आवडली
छान लिहिलंय. अजून लिहा.
प्रसन्न लेखन. भाषाही भारी
अप्रतिम. भाषा ओघवती आणि
+1
In reply to अप्रतिम. भाषा ओघवती आणि by ज्योति अळवणी
हे व्रतवैकल्ये वाचून असं
In reply to +1 by जॉनविक्क
महादेवाने आधी अर्जच केलेला
कथा ढापत आहे-शिवकन्या
अविनाश कुलकर्णी
In reply to कथा ढापत आहे-शिवकन्या by अविनाशकुलकर्णी
इतरांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी तुमची निवड केली याचे कौतूक
In reply to अविनाश कुलकर्णी by शिव कन्या
मस्त लिहिली आहे कहाणी!
गदारोळात
सर्व