कागदाचे झाड

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
21 Oct 2017 - 8:59 am

प्रिय जिब्रान खलील,

माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही.

आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले.... हे लिहिते फूल माझ्या नशिबात का,असेही विचारले असेल तिने देवाला! पण आईच ती.... त्यात फ्रेंच आणि अरेबिकची उत्तम जाण असलेली! गरिबीने भंजाळली क्षणभर, पण आतले जाणतेपण असतेच! बऱ्याच दिवसांनी तिने कुठून तरी कसेबसे दोनचार कागद अन एक पेन्सिल तुझ्या हातात ठेवली.तू हरखून गेलास.

दुसऱ्या दिवशी आईने विचारले, बघू काय लिहिलेस? तू तिचा हात धरून तिला घरापाठच्या अंगणात घेऊन गेलास. दोनचार खड्डे खणून, त्यात ते कागद तूपेरले होतेस. आई जरा वैतागली. तर तू तिला निष्पापपणे सांगितलेस, ‘आई, तू दिलेले कागद जमिनीत पेरलेत. पुढच्या मौसमात या कागदांची झाडं होतील. त्यांना कागदच कागद लागतील. मग तुला कुणाकडे कागद मागावे लागणार नाहीत!’

तुझा कोवळा हात तिच्या खरबरीत हातावर किती तरी वेळ फिरत राहिला. तिचा जीव तुझ्यासाठी पेरती माती झाला.

तुझी आठवण येते खलील... हातात काहीच नसते, तेव्हा तुझा निष्पाप, कोवळा स्पर्श दिलासा देतो.
तू आहेस अजूनही!

तुझी,
शिवकन्या.

मांडणीसंस्कृतीकलावाङ्मयमुक्तकभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

21 Oct 2017 - 11:33 am | डॉ श्रीहास

....... थेट भिडलं