कोरोना विरूध्द भारताचा लढा

अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?

Primary tabs

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
3 Oct 2011 - 7:33 pm

A Separation - Poster

गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे. अशा परिस्थितीत जर व्यवस्थेवर टीका करायची असेल तर ती कशी करता येईल? असगर फरहादी या दिग्दर्शकानं त्याच्या ‘अ सेपरेशन’ या चित्रपटात यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. या चित्रपटाला नुकतंच बर्लिनमध्ये ‘गोल्डन बेअर’ पारितोषिक मिळालं. इतकंच नाही, तर ‘सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपट’ म्हणून इराण सरकारनं या वर्षी ऑस्करसाठी याचं नाव सुचवलं आहे. असगर फरहादीला हे कसं जमलं याचा शोध घेता घेता चित्रपटात कथेपलीकडे जाऊन आपल्याला हवं ते सूचक पद्धतीनं कसं मांडता येतं, याचाही धडा कदाचित घेता येईल.

नादिर आणि सिमीन या मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन जोडप्याच्या घटस्फोटाची गोष्ट असं वरवर पाहता चित्रपटाचं स्वरूप आहे, पण प्रकरण दिसतंय तितकं सरळसोट नाही याची जाणीव सुरुवातीपासूनच होते. नादिर, सिमीन आणि त्यांची शाळेत जाणारी मुलगी यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळालेला आहे, पण नादिर आपल्या आजारी वडलांना मायदेशी एकटं सोडून परदेशी जायला तयार नाही. त्याच्या या आडमुठेपणापायी माझ्या मुलीचं भवितव्य बरबाद होईल म्हणून मला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे असं सिमीन समुपदेशकाला सांगते. मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परदेशात जायची काही गरज नाही; हे काही घटस्फोटासाठी पुरेसं कारण होऊ शकत नाही; नवरा तुला मारहाण वगैरे करत असता तर गोष्ट वेगळी, असं सांगून घटस्फोट नाकारला जातो.

परदेशात म्हणजे कुठे याचा उल्लेख होत नाही, पण पाश्चिमात्य देश हे त्यात गृहित असावं. म्हणजे नवऱ्याला इराणमध्ये राहायचंय तर बायकोला पश्चिमेकडे जायचंय. त्यात इराण न सोडण्याचं कारण जे आहेत, त्या नादिरच्या म्हाताऱ्या वडलांना अल्झायमर्स झालेला आहे. त्यामुळे ते आपला मुलगा, सून, नात यांनासुद्धा ओळखू शकत नाहीत. हा म्हातारा चित्रपटभर पार्श्वभूमीवर असतो. पितृसत्ताक राजवटीचं प्रतीक म्हणूनच जणू तो आहे. त्याचं चित्रण दुष्ट किंवा त्रासदायक म्हणून मात्र केलेलं नाही. आपल्याच अभिमानास्पद भूतकाळाचं विस्मरण झालेला, ऱ्हासाकडे अपरिहार्य प्रवास सुरू झालेला हा म्हातारा अतिशय करुण वाटतो. चित्रपटात एका टप्प्यावर त्याचं बोलणंही बंद होतं. देश सोडून जाणं आणि म्हाताऱ्याला सोडून जाणं याची आपोआप एक घट्ट, सुसंगत वीण घातली जाते.

कोणत्याही कारणानं का होईना, पण देश सोडून जाणाऱ्या माणसाला सहसा आपल्या देशाबद्दल घृणा वाटत नसते; उलट प्रेमच वाटतं. नवरा वडलांना सोडून येत नसला तरी सिमीनला आपल्या सासऱ्याविषयी चीड वाटत नाही; उलट त्याची काळजी वाटते. इतके दिवस ती त्याची शुश्रूषा करत असते. आता मात्र ती घर सोडण्याचा निर्णय घेते. नादिर दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार म्हणून ती सासऱ्याची काळजी घ्यायला एक बाई आणून देते. म्हाताऱ्याला सिमीन ओळखू येत नाही तरी आपली शुश्रूषा करणारी ही बाई पाहताच तो तिला सिमीन समजतो.

इथे चित्रपट वेगळं आणि महत्त्वाचं वळण घेतो. आतापर्यंत आपण एक सुखवस्तू, सुशिक्षित इराणी कुटुंब पाहत असतो. आता वडलांची शुश्रूषा करायला आलेली रझिया ही एक गरीब, धार्मिक बाई असते. तिला आधीची एक लहान मुलगी असते, शिवाय ती गरोदर असते. तिच्या धार्मिकतेची आपल्याला लगेच चुणूक मिळते. म्हातारा आपली सलवार ओली करतो. परपुरुषाला स्पर्श करून त्याला कपडे बदलायला मदत करणं गरजेचं आहे खरं, पण ते पाप होईल का अशी रझियाला भीतीही आहे. मग ती फोनवर धार्मिक सल्ला घेते. जर मदत करू शकेल असं इतर कुणीही नसेल, तर यात पाप नाही असं तिला सांगितलं जातं. रझिया कुणी क्रूर धर्मांध बाई नाही. तिला आपलं परिस्थितीजन्य कर्तव्य कळतं, पण धर्माची भीतीही वाटते, हे इथे स्पष्ट आहे. माणुसकी आणि धर्म या तिढ्यात अडकलेली रझिया आपल्या परिस्थितीची शिकार आहे. एकटी असली तरीही तिचा देव तिला मोकळं सोडत नाही.

मग रझियाच्या नवऱ्याचं कथानकात आगमन होतं. रझियाचा नवरा होज्जत आणि नादिर यांच्यातला सामाजिक दर्जाचा फरक उघड आहे. होज्जत भडक डोक्याचा आहे; नादिर थंड डोक्याचा आहे. होज्जत पटकन हमरीतुमरीवर येतो, तर नादिर शांत असला तरीही सिमीनला त्याच्या हट्टीपणाचा व्हायचा तो त्रास होतच असतो. सिमीन, तिची मुलगी तरमेह आणि रझिया यांच्यातही शिक्षण, धर्माचा पगडा अशा अनेक बाबींमध्ये फरक आहे. रझिया पूर्ण अंग झाकणारा बुरखा घेते, तर सिमीन जीन्ससारख्या आधुनिक पोशाख घालते आणि फक्त स्कार्फनं डोकं झाकते (तसा कायदा नसता तर कदाचित तिनं डोकंदेखील झाकलं नसतं.) असा फरक असला तरीही पितृसत्ताक पद्धतीत त्या सर्व स्त्रियांचं काय होतं यात साम्य आहे. मग सिमीनला हा देश आणि इथल्या वातावरणात आपली मुलगी कशी वाढेल याची काळजी का वाटते, याचा अंदाज येऊ लागतो. शाळेत जाणारी तरमेह दिसते, तशीच रझियाची लहान मुलगीही आपल्याला दिसत असते. आईबरोबर दिवसभर लोकांच्या घरी राहणाऱ्या मुलीचं शिक्षण कसं होणार? तिचं भविष्य कसं असेल, याविषयी प्रेक्षकांना प्रश्न पडतील अशीच पात्रांची आणि प्रसंगांची रचना आहे.

कथानक अधिक सांगून रसभंग करत नाही, पण रझियाच्या पोटातल्या बाळाचा जीव आणि म्हाताऱ्याचा जीव यांच्यात, म्हणजे एकीकडे समृद्ध भूतकाळ आणि त्याविषयी वाटणारी आत्मीयता, तर दुसरीकडे अनिश्चित भविष्याविषयीची काळजी यांच्यात एक तिढा आहे. धर्माचं ओझं आणि त्यातून येणारी पाप-पुण्याची संकल्पना आणि नैतिक जबाबदारी असाही एक तिढा आहे. धार्मिक असणारी रझिया एका कळीच्या प्रसंगात अनैतिक वागणं सोपं आणि सोयीचं असताना तसं वागत नाही, त्यामुळे धर्म हा यात खलनायक नाही. पुरुष आणि स्त्रिया असा तिढा आहेच, पण त्यातही खलनायक पुरुष आणि परिस्थितीनं गांजलेल्या बायका असं सरळसोट चित्रण नाही. शिवाय उच्चशिक्षित, आधुनिक मध्यमवर्ग आणि कनिष्ठ सामाजिक स्तर यांतही संघर्ष आहे, पण त्यातही दोन्ही स्तरातली माणसं चुकतात, खोटं बोलतात, तशीच प्रसंगी चांगलंही वागतात. म्हणून हा चित्रपट प्रचारकी होत नाही. उलट यातले प्रसंग हाडामांसाच्या माणसांच्या आयुष्यातले खरे कसोटीचे प्रसंग वाटू शकतात आणि त्यांद्वारे अखेर एका देशातल्या व्यामिश्र वास्तवाचा पट उभा होतो. कुटुंब, धर्म, पितृसत्ताक पद्धती अशा अनेक सामाजिक संस्थांचा माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किती खोल परिणाम होतो आणि यांपासून स्वातंत्र्य मिळवणं किती कठीण आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.

चित्रपटातला आशेचा किरण हा मुख्यत: पुढच्या पिढीकडून येतो. सर्व तिढे पाहातपाहात हळूहळू आपल्या डोळ्यांदेखत तरमेह प्रगल्भ होत जाते. सध्याच्या सरकारविरोधी गटातदेखील मोठ्या प्रमाणात तरुणतरुणी आहेत हे इथे लक्षात घेतलं, तर चित्रपट व्यक्तिगत गोष्टी दाखवत दाखवत त्यांतूनच राजकीय भान बाळगणारी एक सूचक चिन्हव्यवस्था कशी उभी करतो आणि ती क्रांतिकारक कशी आहे, हे लक्षात येईल. हेच कदाचित आजच्या अंदाधुंदीतल्या इराणच्या प्रगल्भ भविष्याचं आश्वासक चिन्ह आहे.

मध्यपूर्व म्हणजे मागास आणि आपण म्हणजे महासत्ता असं चित्र रंगवण्याकडे आपल्याकडच्या काही लोकांचा आजकाल कल दिसतो. त्यांच्यासारखे प्रगल्भ चित्रपट आपण का बनवू शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारून पाहिला तर ते कदाचित आपल्या अधिक हिताचं आणि विधायक होईल.

संस्कृतीकलाधर्मसमाजराजकारणचित्रपटप्रतिसादआस्वादसमीक्षालेखशिफारस

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

3 Oct 2011 - 7:57 pm | श्रावण मोडक

उत्तम. पाहतो.

मध्यपूर्वेला मागास आणि आपण महासत्ता असं चित्र रंगवण्याकडे आपल्याकडच्या काही लोकांचा आजकाल कल दिसतो. त्यांच्यासारखे प्रगल्भ चित्रपट आपण का बनवू शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारून पाहिला तर ते कदाचित आपल्या अधिक हिताचं आणि विधायक होईल.

सूर कळला. आपल्याकडे प्रगल्भ चित्रपट बनतच नाहीत, असं आहे का? पुन्हा प्रगल्भता ठरवायची कशी हाही प्रश्न आहेच.

विसुनाना's picture

4 Oct 2011 - 2:39 pm | विसुनाना

+१

फारएन्ड's picture

3 Oct 2011 - 9:03 pm | फारएन्ड

आवडले परीक्षण

पैसा's picture

3 Oct 2011 - 9:47 pm | पैसा

सिनेमा पहायला नक्कीच आवडेल. डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2011 - 7:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी डाऊनलोड केला, पण पासवर्डशी गाडं अडलं आहे.

चित्रपट ओळख आवडली; शेवटचं वाक्य खासकरून. अजून नेटफ्लिक्सात चित्रपट उपलब्ध नाही. वाट पहावी लागेल.

"इराणी लोकंही अरबच ना", असं विधान एकदा ओळखीच्या इराणी मुलीसमोर कोणीतरी केलं; ती गोरीपान मुलगी अचानक लालेलाल झालेली पाहिली होती. माझ्या ओळखीतल्या इराणी लोकांना अर्थातच आपल्या इतिहासाचा, इराणी असण्याचा अभिमान आहे. मराठीत अनेक शब्द पर्शियन भाषेतून आले आहेत हे सांगितल्यावरही त्यांना अर्थातच आनंद होतो. पण सध्याची इराणमधली राजकीय स्थिती, भारतात स्त्रियांना जेवढं स्वातंत्र्य आहे त्यापेक्षाही बरंच कमी स्वातंत्र्य इराणमधे असणं, एकूणच खोमेनींनंतर देशातला इस्लामचा वाढता पगडा या गोष्टींबद्दल त्यांना बर्‍यापैकी चीड आहे असं लक्षात आलं. पुण्यात शिकायला येणार्‍या या इराणी विद्यार्थ्यांशी बोलल्यावर या अनेक गोष्टी जाणवल्या.

इराणी मैत्रिणीच्या खोलीत बसून त्यांची विशिष्ट क्यूब शुगेर तोंडात विरघळवत तासनतास चहा पिणे, तर्‍हेतर्‍हेचे इराणी पिस्ते, शेंगदाणे, कोणत्याशा झाडाच्या चिकापासून बनवलेली मिठाई या सगळ्याची आता आठवण येतेच.

इराणी चित्रपटाचा विशय निघूनही माझिद माझदीचं नाव कसं निघालं नाही. बाप डायरेक्टर आहे तो.

>>"इराणी लोकंही अरबच ना", असं विधान एकदा ओळखीच्या इराणी मुलीसमोर कोणीतरी केलं; ती गोरीपान मुलगी अचानक लालेलाल झालेली पाहिली होती.

येस्स.. तेहेरानच्याच एका सुंदरशा हाटेलात बसून पियानो ऐकताऐकता "वी आर फर्स्ट पर्शीयन देन मुस्लीम्स" असं वारंवार ठामपणानं सांगणारा एक मित्र आठवला आणि हळवा झालो. (अधिक माहीतीसाठी माझी इराणयात्रा.)

सुधीर मुतालीक's picture

6 Oct 2011 - 2:32 pm | सुधीर मुतालीक

पुण्यात FC मध्ये शिकणाऱ्या एका युवतीची माझ्या तेहरान मुक्कामी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तेहरान मध्ये भेट झाली होती. खूप मोकळ्या गप्पा झाल्या होत्या. तिच्या लेखी पुण्यातले तिचे राहणे भीषण आहे. तिच्या सारखीच तिच्या अन्य मित्र मैत्रिणीची अवस्था आहे. त्याना पुणेकर अजिबात सामाऊन घेत नाहीत. वर्गात वा कॉलेज मध्ये ही फारसे मित्र नाहीत. "एका दबावा खाली आम्ही वावरतो. आम्हाला आमच्याच विश्वात वावरावे लागते. पदवी घेतल्यावर पुण्याला कोणतेही कारणास्तव पुन्हा जाणार नाही." अशी या युवतीची मनस्थिती होती. तिच्या बोलण्यावरून मी ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक असावी असे अनुमान काढतो. तिच्या म्हणण्यात सत्य असेल तर ही बाब मला गंभीर वाटते कारण त्याना वाटणारे भय अमानवी कारणासाठी आहे आणि ते नसावे. तुझ्या वरील लिखाणावरून असे वाटते की तु काही इराणी मुलींच्या संपर्कात आहेस. त्यांच्या खऱ्या मनस्थिती ची जाणीव करून घेता आली तर पहा. आवश्यक असेल तिथे मी नक्की मदत करेन. ( sudhirmutalik@gmail.com ) पुण्यात काय, कुठे ही भारतात परदेशी ( आणि देशी ही ) नागरिकांनी निर्भय पणे वावरले पाहिजे हे आपणा सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ( तेहरान मध्ये मला भेटलेली युवती आता पुण्यात उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी आली असेल.)
बाकी इराणच्या परिस्थितीचे वर्णन बऱ्याचदा अतिरंजित होते. वस्तुस्थिती वारंवार पाहिल्यावर आणि अनुभवल्यावर वेगळी आहे, एवढंच. ते जंगल नक्की नाही. त्यांची प्रतिमा जग वेगळीच बनवायचा प्रयत्न करतंय, ते घाण राजकारण आहे.ते राजकारण हा विषय खूप वेगळा. सुधीर मुतालीक

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2011 - 10:09 pm | पिवळा डांबिस

मूळ चित्रपट मिळवून बघण्याचा नक्की प्रयत्न करीन....

...पण ते पाप होईल का अशी रझियाला भीतीही आहे. मग ती फोनवर धार्मिक सल्ला घेते. जर मदत करू शकेल असं इतर कुणीही नसेल, तर यात पाप नाही असं तिला सांगितलं जातं. रझिया कुणी क्रूर धर्मांध बाई नाही. तिला आपलं परिस्थितीजन्य कर्तव्य कळतं, पण धर्माची भीतीही वाटते, हे इथे स्पष्ट आहे. माणुसकी आणि धर्म या तिढ्यात अडकलेली रझिया आपल्या परिस्थितीची शिकार आहे. एकटी असली तरीही तिचा देव तिला मोकळं सोडत नाही.
सुरेख विवेचन!!!

धन्या's picture

3 Oct 2011 - 10:31 pm | धन्या

चित्रपट पाहायला मिळेल का याबद्दल शंका आहे.

परीक्षण झकास जमले आहे. एकदम संतुलीत लिहिलं आहे.

अप्रतिम's picture

3 Oct 2011 - 10:35 pm | अप्रतिम

परीक्षण आवडले.विशेषतः शेवटचा परीच्छेद.

आजच एका इराणी सहकार्‍याशी या चित्रपटाविषयी बोलत होतो. अब्बास कियारोत्सामीचा 'द विंड विल कॅरी अस' हा चित्रपट मला खूप आवडला होता. त्याने इराणी चित्रपटात केलेल्या प्रयोगांविषयी ऐकून थक्क झालो.

इराण व इतर मध्यपूर्व यांच्यात फरक केला जावा असे वाटते. माझे बहूतांश इराणी मित्र उदार विचारांचे आहेत. पण हा सिलेक्शन बायस असू शकेल. इजिप्त व इतर मध्यपूर्वेतील उदार मतांचे लोक अभावानेच भेटलेले आहेत. भारत महासत्ता वगैरे लोकांनी जगात इतरत्रही पाहिल्यास तसेच जमल्यास आत्मपरिक्षण केल्यास राष्ट्रीयत्व ही धर्माइतकीच फुटकळ कल्पना असल्याचे त्यांच्या ध्यानी येईल.

निनाद's picture

4 Oct 2011 - 5:35 am | निनाद

इराण व इतर मध्यपूर्व यांच्यात फरक केला जावा असे वाटते. सहमत आहे! इराण म्हणजे अरेबिया नव्हे हे खरे आहे. तसेही भारता विषयी त्यांना काहीशी जास्त आस्था असते असा माझा अनुभव आहे.

सौप्र's picture

4 Oct 2011 - 7:20 pm | सौप्र

>>इराण व इतर मध्यपूर्व यांच्यात फरक केला जावा असे वाटते.
या मताशी सहमत आहे. पर्शिअन संस्कृती इतर मध्यपुर्वेतील देश व संस्कृतींच्या तुलनेने अधिक समृद्ध वाटते(वैयक्तिक मत)
बाकी परिक्षण आवडले.

निनाद's picture

4 Oct 2011 - 5:39 am | निनाद

सुंदर परिक्षण! आवडले. इराणे सिनेमाचा जागतिक ठसा निराळ आहे हे निश्चित. कथा आणि समकालीन चित्रण यात इराणी चित्रपट उजवा वाटतो.

आपण म्हणजे महासत्ता असं चित्र रंगवण्याकडे आपल्याकडच्या काही लोकांचा आजकाल कल दिसतो. हे सर्वत्रच असते त्यात मला तेव्हढे गैर वगैरे वाटत नाही पण त्या धुंदीत इतर सर्व त्याज्य किंवा कमी प्रतीचे असे मानले जात असेल तर ते चूक. इराण हा अरबात गणण्याची चूक करू नका.

छान परीक्षण. हासुद्धा यादीत टाकते. क्रेमर यांनी त्यांच्या प्रतिक्रीयेत सांगितलेला सुद्धा बघते.
इराणी पिक्चर्स साधारणपणे उत्तम दर्जाचे (कथा, सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन)असतात असाच अनुभव आहे.

चित्रगुप्त's picture

4 Oct 2011 - 9:44 am | चित्रगुप्त

चित्रपटाचा सुरेख, समतोल परिचय करून दिल्याबद्दल आभार.

ऋषिकेश's picture

4 Oct 2011 - 9:56 am | ऋषिकेश

विवेचन चांगलं आहे. मुळातच अनेक इराणी चित्रपट म्हणजे एकापेक्षा एक सुरेख मौक्तिके आहेत.
हा ही चित्रपट डाऊनलोडायला लावतो.

मात्र शेवटच्या ओळींतील भारतीय चित्रपटसृष्टीवर (काहिसं विनाकारण) केलेलं शरसंधान खटकलं

सुनील's picture

4 Oct 2011 - 10:00 am | सुनील

सुरेख परीक्षण.

चिंतातुर जंतू's picture

4 Oct 2011 - 2:51 pm | चिंतातुर जंतू

वर आलेल्या काही मुद्द्यांना प्रतिसादः

आपल्याकडे प्रगल्भ चित्रपट बनतच नाहीत, असं आहे का? पुन्हा प्रगल्भता ठरवायची कशी हाही प्रश्न आहेच.

इराण व इतर मध्यपूर्व यांच्यात फरक केला जावा असे वाटते.

इराण हा अरबात गणण्याची चूक करू नका.

शेवटच्या ओळींतील भारतीय चित्रपटसृष्टीवर (काहिसं विनाकारण) केलेलं शरसंधान खटकलं.

पर्शिअन संस्कृती अरब संस्कृतीहून वेगळी आहे हे खरंच आहे, पण माझा मुद्दा हा केवळ चित्रपट माध्यमाच्या संदर्भात होता आणि त्या परिप्रेक्ष्यातून पाहता या सर्व भूभागात बनणार्‍या चित्रपटांमध्ये साम्यस्थळं आढळतात. गेल्या काही वर्षांत इराणव्यतिरिक्त मध्यपूर्वेतल्या अनेक देशांतून उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती होत आहे. तुर्कस्तान, लेबनॉन, सिरीआ, पॅलेस्टाईन, ट्युनिशिआ, अल्जेरीआ अशा अनेक देशांचे चित्रपट कान, बर्लिन किंवा व्हेनिससारख्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांत स्पर्धात्मक विभागात सातत्यानं निवडले जातात आणि बक्षिसंही मिळवून जातात. गेल्या दहा वर्षांत ज्यांचे चित्रपट कान महोत्सवासाठी अधिकृतरीत्या निवडले गेले (Official Selection) अशा काही दिग्दर्शकांची यादी (इराण सोडून) संदर्भासाठी खाली देत आहे. एकाच महोत्सवातली ही यादी अर्थातच अपुरी आहे.

 1. नुरी बिल्ज सेलान (तुर्कस्तान)
 2. फतेह अकीन (तुर्कस्तान-जर्मनी)
 3. एलिया सुलेमान (पॅलेस्टाईन)
 4. आनमारी यासिर (पॅलेस्टाईन)
 5. हिनीर सलीम (कुर्द-इराक)
 6. बहमान घोबाडी (कुर्द-इराण)
 7. अतिक राहिमी (अफगाण-फ्रान्स) - (याची गंमत म्हणजे हा उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे आणि लेखकही. 'गोन्कूर' हा फ्रान्सचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार याला मिळालेला आहे.)
 8. अमोस गिताई (इस्राईल)*
 9. युसुफ सेदार (इस्राईल)
 10. एरन कोलीरीन (इस्राईल)
 11. रशीद बुखारेब (अल्जेरीआ)
 12. राबा आमिर झेमेश (अल्जेरीआ)
 13. यामिना बशीर शुईख (अल्जेरीआ)
 14. जोआना हाजी थॉमस (लेबनॉन)
 15. खलील जोरेगे (लेबनॉन)
 16. लैला माराकेशी (मोरोक्को)
 17. फौझी बेन सायेदी (मोरोक्को)
 18. ओसामा मोहम्मद (सिरीआ)

* इस्राईली सिनेमा उत्तम आहे, पण इस्राईलसारखा देश सांस्कृतिकदृष्ट्या युरोपच्या खूप जवळ आहे म्हणून मध्यपूर्वेत गणता येईलच असं नाही. तरीही संवेदनांच्या पातळीवर इस्राईलचं मध्यपूर्वेशी असलेलं अतूट नातं अनेक चित्रपटांत दिसतं हेही खरं.

या तुलनेत भारतीय सिनेमा कुठे आहे असा विचार केला, तर परिस्थिती खूप लाजिरवाणी आहे हे उघड व्हावं. मुंबई-पुण्याचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे काही कान वगैरेंच्या दर्जाचे नसतात; तरीही इथे स्पर्धात्मक विभागासाठी येणारे मध्यपूर्वेतले चित्रपट पाहता त्या दर्जाचे भारतीय चित्रपट फारसे बनत नाहीत हे दरवर्षी पदोपदी दिसत (आणि खुपत) राहतं. दरवर्षी भारतात एकूण किती सिनेमे बनतात त्या तुलनेत हे पाहिलं तर ते अधिकच खुपतं. हे आपलं दाहक वास्तव आहे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2011 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर

इराणी चित्रपट पाहण्याचा अजून तरी योग आलेला नाही. तसे म्हंटले तर इराणी हॉटेल आणि इराणी बेकरीच्या पलिकडे इराणशी काही संबध आला नव्हता. पण पुढच्या काळात अनेक इराणी तरूण नागरिकांच्या भेटीचा आणि संवादाचा योग पुण्यातच आला.

पुण्याच्या सिंबॉयसीसचे कँटीन चालवत होतो तेंव्हा इराणी विद्यार्थ्यांशी संवाद होत असे. एका विद्यार्थिनीने सांगितलेले कि तिला शिक्षणासाठी युरोप आणि भारत अशा दोन्ही देशातून संधी चालून आली होती. घरची आर्थिक परीस्थितीही सधन म्हणावी अशी. पण दोन्हीतील एक पर्याय निवडताना तिला तिच्या वडीलांनी सांगितलं,' युरोप जरी आर्थिक दृष्ट्या पुढारलेला असला तरी भारत हा संस्कृतीच्या दृष्टीकोनातून पुढारलेला आहे. भारतिय संस्कृती ही इराणच्या संस्कृतीच्या जवळीची आहे.' तेंव्हा तिने शिक्षणासाठी भारताची निवड केली.

धनंजय's picture

4 Oct 2011 - 6:59 pm | धनंजय

बघायला पाहिजे.

(मला वाटते की एका विशिष्ट प्रकारची सूचकता फक्त एका विशिष्ट प्रकारच्या सेन्सॉरशिपमधूनच येत असते. त्यामुळे नेमक्या अशा प्रकारची सूचकता असलेला चित्रपट भारतात तयार होणार नाही.)

क्रेमर's picture

4 Oct 2011 - 7:15 pm | क्रेमर

कंसाशी सहमत आहे.

चिंतातुर जंतू's picture

4 Oct 2011 - 11:09 pm | चिंतातुर जंतू

एका विशिष्ट प्रकारची सूचकता फक्त एका विशिष्ट प्रकारच्या सेन्सॉरशिपमधूनच येत असते. त्यामुळे नेमक्या अशा प्रकारची सूचकता असलेला चित्रपट भारतात तयार होणार नाही.

नेमकी अशीच सूचकता असावी असा आग्रहही नाही. उदा: इस्राईलमध्ये इराणसारखी सेन्सॉरशिप नाही, पण अनेक चित्रपटांमध्ये असं आढळतं की वरवर पाहता व्यक्तिगत (पर्सनल) गोष्ट सांगणार्‍या सिनेमात पार्श्वभूमीवरचे संदर्भ हे त्या गोष्टीमागे असणारा राजकीय आशय सूचित करतात (इस्राईल-पॅलेस्टाईन प्रश्नाबद्दलचा). ही सूचकता सेन्सॉरशिपमुळे आलेली नसल्यामुळे इराणी चित्रपटांहून वेगळी असते. पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे युसुफ सेदारचा 'कॅम्पफायर'.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 3:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'कॅम्पफायर'ही यादीत टाकला आहे. सुदैवाने हा चित्रपट नेटफ्लिक्सकडे आहे.

चित्रा's picture

5 Oct 2011 - 3:04 am | चित्रा

बघण्याच्या लिस्टमध्ये टाकते.

चिंतातुर जंतू's picture

5 Oct 2011 - 11:27 am | चिंतातुर जंतू

इस्राईलमध्ये इराणसारखी सेन्सॉरशिप नाही, पण अनेक चित्रपटांमध्ये असं आढळतं की वरवर पाहता व्यक्तिगत (पर्सनल) गोष्ट सांगणार्‍या सिनेमात पार्श्वभूमीवरचे संदर्भ हे त्या गोष्टीमागे असणारा राजकीय आशय सूचित करतात (इस्राईल-पॅलेस्टाईन प्रश्नाबद्दलचा). ही सूचकता सेन्सॉरशिपमुळे आलेली नसल्यामुळे इराणी चित्रपटांहून वेगळी असते. पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे युसुफ सेदारचा 'कॅम्पफायर'.

कालच्या प्रतिसादात टंकलेला थोडा मजकूर (बहुधा माझ्याच चुकीमुळे) गायब झाला म्हणून तो इथे देत आहे:

विधवा आई आणि तिच्या वयात आलेल्या दोन मुली अशा एका कुटुंबाची गोष्ट 'कॅम्पफायर'मध्ये (वरवर पाहता) सांगितली आहे. मुलींना निकोप आणि सकस जगता यावं यासाठी आई आपल्या परिसरातल्या सुशिक्षित, सुसंस्कृत इस्राईली लोकांशी नातं जोडू पाहते आहे. पण या प्रयत्नात इस्राईली राष्ट्रवाद (आणि पॅलेस्टिनी जनतेविषयी बेपर्वाई) असणार्‍या लोकांत तिचा वावर वाढतो आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये त्यांचं जवळून दर्शन तिला घडतं. मग तिढा असा निर्माण होतो की नक्की कोणत्या प्रकारे जगल्यानं आपल्या मुली खर्‍या अर्थानं निकोप आणि सकस जगू शकतील? आर्थिक स्थैर्य किंवा कुटुंबात एक कर्तृत्ववान पुरुष कुटुंबप्रमुख असणं अशा गोष्टी किती महत्त्वाच्या मानाव्यात? समष्टीची जीवनदृष्टी आणि व्यक्तिगत मूल्यव्यवस्था यांच्यातला हा संघर्ष आहे. युरोपमध्ये आता हा फारसा जाणवत नाही, पण मध्यपूर्व आणि आपल्याकडेदेखील तो जाणवत राहतो. मग गोष्ट फक्त एक कुटुंब, किंवा इस्राईल-पॅलेस्टाईन प्रश्न एवढ्यापुरतीच राहत नाही. मग इस्राईलचं मध्यपूर्वेशी (आणि पर्यायानं आपल्याशीही) कसं नातं आहे हे लक्षात येतं.

जाताजाता: ज्यांना 'सेपरेशन' पाहायचा आहे त्यांसाठी - हा चित्रपट इराणतर्फे ऑस्करसाठी पाठवलेला असल्यामुळे सध्या तो अमेरिकेतल्या विविध महोत्सवांमध्ये दाखवला जात आहे. गेल्याच आठवड्यात तो न्यू यॉर्कमध्ये दाखवला गेला. मुंबई-पुणे-गोवा अशा भारतातल्या काही चित्रपट महोत्सवांतही हा दाखवला जाईल अशी शक्यता आहे. ऑस्करसाठी आलेले चित्रपट अमेरिकन महोत्सवांत दाखवून नंतर अमेरिकेत निवडक शहरांत प्रदर्शित केले जातात आणि ऑस्कर सोहळ्याच्या आत त्यांची डी.व्ही.डी. / स्ट्रीमिंग आवृत्ती उपलब्ध होते (म्हणजे नामांकन मिळालंच तर मग लोकांना तो पाहता येईल अशी साधारण व्यवस्था असते). एकदा डीव्हीडी उपलब्ध झाली की मग टॉरंटवर चांगली प्रत सहज उपलब्ध होते.

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:16 pm | आण्णा चिंबोरी

परीक्षण चांगले आहे. चित्रपटही चांगला असावा.

एक शंकाः

सरकारी सेन्सॉरशिप व हुकूमशाहीचा सूचकतेने किंवा थेटपणे विरोध करणारे चित्रपट संपादकांसह अनेकांनी मिपावर वाखाणले आहेत.
काही सदस्यांनी मिपाच्या न पटणाऱ्या धोरणाच्या विरोधात सूचक विधाने केल्यास वागण्याबोलण्यात कन्सिस्टन्सी असू द्यावी म्हणून संपादकांनी त्यांच्यावर कारवाई करू नये असे वाटते.

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 2:15 am | क्रेमर

Consistency requires you to be as ignorant today as you were a year ago.
-Bernard Berenson*

Consistency is contrary to nature, contrary to life. The only completely consistent people are dead.
-Aldous Huxley*

मिपाचे संपादक इग्नोरंट (बिनडोक) नसल्याने आणि मृतही नसल्याने त्यांच्याकडून कन्सिस्टन्सीची अपेक्षा केली जाऊ नये, असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

*दोन्ही उद्धरणे येथून चोप्य पस्ते. या लोकांनी खरेच असे म्हटले होते का याविषयी अनभिज्ञ आहे.

आण्णा चिंबोरी's picture

6 Oct 2011 - 3:18 am | आण्णा चिंबोरी

कंसिस्टंसीऐवजी सुसंगती हा शब्द हवा होता. थोडक्यात पोटात एक आणि ओठात एक असे नको.

नंदन's picture

6 Oct 2011 - 10:41 am | नंदन

परीक्षण. 'अ सेपरेशन' आणि 'कँपफायर' - दोन्हींची पाहण्याच्या यादीत भर घातली आहे.

मेघवेडा's picture

6 Oct 2011 - 4:08 pm | मेघवेडा

उत्तम परीक्षण जंतुबुवा! पाहण्याच्या यादीत भर.

चिंतातुर जंतू's picture

27 Feb 2012 - 6:09 pm | चिंतातुर जंतू

'अ सेपरेशन' या चित्रपटाला आतापर्यंत अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. त्यात आज आणखी एकाची भर पडली - सर्वोत्कृष्ट परकीय चित्रपटाचं ऑस्कर त्याला मिळाल्याचं आज जाहीर झालं आहे. त्या निमित्तानं धागा वर आणत आहे.

सुधीर मुतालीक's picture

28 Feb 2012 - 4:53 pm | सुधीर मुतालीक

हा सिनेमा नेट वर कुठे पहाता येइल ? कसा ?

सहज's picture

22 Apr 2012 - 5:12 pm | सहज

परीक्षण नेहमीप्रमाणे उत्तमच!

चित्रपट पाहिला व आवडला.

अपूर्व कात्रे's picture

28 Nov 2012 - 9:05 pm | अपूर्व कात्रे

या चित्रपटाची कथा यावर्षीच्या "मेनका" या दिवाळी अंकात आलेली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Nov 2012 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'नेटफ्लिक्स'वर कालच 'द सेपरेशन' बघितला. प्रचंड आवडला. दुष्ट वृत्तीची माणसं नसूनही सामान्य आयुष्यात तिढे निर्माण होणं आणि ते आपापल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न बघताना फारच त्रासदायक वाटलं.

संदिग्धता हा साहित्यगुण असतो का? या चर्चेची आठवण झाली. चित्रपट सिमीन-नादिरच्या नात्यातून सुरू होतो आणि रझियाच्या बाळाभोवती फिरत रहातो. त्या नात्याचं आणि या बाळाचं काय असे प्रश्न बिनमहत्त्वाचे वाटतात. सांगायचं आहे तेवढं चित्रपटातून समजतंच.

असगर फरहादीचे About Elly आणि Fireworks Wednesday हे दोन चित्रपट नेटफ्लिक्सवर डीव्हीडीवर उपलब्ध आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Nov 2012 - 11:51 pm | निनाद मुक्काम प...

हा सिनेमा पहायला हवा.
अश्या सिनेमांचे रिमेक आपल्याकडे कोणी करत नाही ,
येथे रिमेक म्हणजे अगदी कॉपी नाही तर मूळ मुद्दा घेऊन त्याला भारतीय रंगत रंगणे