कधी किनारा लिहितो,किंवा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 May 2017 - 12:21 am

कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!

कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!

तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!

कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!

अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!

तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!

तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते
उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते
उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो!

हा आवडला.

सही रे सई's picture

5 May 2017 - 8:24 am | सही रे सई

+१
मलाही शेवटचे कडवे विशेष आवडले

चांदणे संदीप's picture

5 May 2017 - 7:55 am | चांदणे संदीप

सुंदर!

Sandy

संजय क्षीरसागर's picture

5 May 2017 - 11:37 am | संजय क्षीरसागर

कवितेचा मूड बदलू नये अशी व्यवस्था मागच्या कवितेत केली आहे. यशस्वी होईल अशी आशा करतो.

कधी मनाशी मने सांधूनी, तुझ्या मनातही लिहीतो,
प्रारब्धाला कधी झुगारूनी, तुझ्या हातावर लिहीतो |

लगे रहो !

सत्यजित...'s picture

5 May 2017 - 7:43 pm | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
गझलेचा मतला बहुधा नीट पोहचलाच नाही!

संजय क्षीरसागर's picture

5 May 2017 - 10:23 pm | संजय क्षीरसागर

काय म्हणायचंय तुम्हाला पहिल्या कडव्यातून ?

एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुचलेला हा शेर,त्याचा/तिचा लहरी स्वभाव-विशेष (कधी किनाऱ्यासारखा शांत,गूढ ई. कधी शिकाऱ्याप्रमाणे मंद,अस्थिर,वादळात भरकटलेला ई. तर कधी उनाड वाऱ्यासारखा अल्लड,खोडकर ई.)अधोरेखित करता आहे!
शिवाय दुसऱ्या मिसऱ्यात,तुझ्या लहरींना (तरंग) लिहिणारा,उनाड वारा मी स्वतः आहे,असा एक...आणि वर सांगितल्याप्रमाणे,तुझा लहरी स्वभाव त्या उनाड वाऱ्यासारखाही आहे,अश्या दुसऱ्या अर्थाने 'श्लेष' साधत आहे!

असो!बहुधा कुठेतरी व्यक्त होण्यात काही उणीव राहिली असावी!

संजय क्षीरसागर's picture

6 May 2017 - 7:35 am | संजय क्षीरसागर

तुम्ही उत्तम कवी (शायर) आहात. लयीची जाण, कल्पना वैविध्य आणि नेमकं शब्द संयोजन याबाबतीत मी तरी मिपावर तुम्ही अद्वितीय आहात. मिपावर इतक्या चांगल्या कविता यापूर्वी आभावानंच येत. नशीबानं तुमची कविता प्रोटेक्टही होईल त्यामुळे कवितेचा मूड बिघडणार नाही आणि तुमचाही मूड कायम राहील. परिणामी मिपावर दर्जेदार कविता येतील .

मतला पोहोचू शकला नाही कारण तुम्हाला सखीचं मन आणि समुद्र अशी अनन्योक्ती साधायची होती. तुमच्या या थोर कल्पनेला सलाम ! पण तुमचा नेमका शब्द चुकला ' लिहीतो ' हे तुम्ही ' म्हणतो ' अशा आशयानं वापरला . शिवाय 'शिकारा' हा शब्द 'शिकारी'ला पर्यायवाची असू शकत नाही... म्हणून सगळा अर्थ बदलला !

पुन्हा प्रयत्न करून पाहा . काव्य विषय भारी आहे.

यशोधरा's picture

6 May 2017 - 8:42 am | यशोधरा

तुमचा नेमका शब्द चुकला ' लिहीतो ' हे तुम्ही ' म्हणतो ' अशा आशयानं वापरला

सहमत. त्यामुले काही द्विपदी हुकल्यासारख्या वाटतात.

शिकारा - शिकारीला पर्यायवाचक नाहीये तो. माझ्या मते होडी (आठवा, काश्मीरातील शिकारे) ह्या अर्थाने आहे तो. चूभू.

सत्यजित...'s picture

6 May 2017 - 8:44 am | सत्यजित...

धन्स!

संजय क्षीरसागर's picture

6 May 2017 - 11:59 am | संजय क्षीरसागर

लयीची जाण, कल्पना वैविध्य आणि नेमकं शब्द संयोजन याबाबतीत माझ्या दृष्टीनं तरी मिपावर तुम्ही अद्वितीय आहात.

संजय क्षीरसागर's picture

6 May 2017 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

कधी किनारा गमती किंवा, कधी भयावह जलधी
तुझ्या मनाच्या लहरी मजला, उनाड वारा गमती !

कधी मनाची लाही होते, कधी शहारा होती
कधी बरसात्या सरीसारख्या , कधी निखारा गमती!

मला स्वतःला नीट नाही समजली ही गझल. पण ती माझ्या आकलनशक्तीतली उणीव आहे. मला कविता लवकर कळत नाहीत, तुमच्या बाकी रचना समजल्यात, पण या रचनेचा अर्थ नीट लक्षात आला नाही. तुमचा खालचा प्रतिसाद आणि गझल पुन्हा वाचून बघते.

आगाऊ म्हादया......'s picture

9 May 2017 - 8:17 am | आगाऊ म्हादया......

नव्हताच पोहोचला.

किसन शिंदे's picture

5 May 2017 - 10:34 pm | किसन शिंदे

शेवटचे कडवे विशेष आवडले. लिहीत राहा.

पैसा's picture

6 May 2017 - 9:59 am | पैसा

कविता लिहून तुम्ही वाचकांच्या स्वाधीन केलीत. तिचे अर्थ प्रत्येकजण आपापल्या वकुब, कल्पनाशक्तीनुसार लावील. सगळ्यांना एकच एक २+२=४ असे गणितातल्यासारखे उत्तर कवितेत मिळणे शक्य नसते.

कविता लिहीत राहा. लिहून लोकांच्या हाती दिल्यावर असे हवे होते का तसे हा विचार करू नका.

गौरी कुलकर्णी २३'s picture

6 May 2017 - 9:16 pm | गौरी कुलकर्णी २३

लिहीत रहा ....काव्यातून व्यक्त होताना कधी कधी शब्द फितूर होतात असे वाटते पण ते खरेच असते असे नाही ! आपण तेव्हा त्यांना अजून व्यक्त होऊ द्यावे...बस् !!!

सत्यजित...'s picture

6 May 2017 - 11:18 pm | सत्यजित...

रुपी,किसन शिंदे,पैसा,गौरी आपणा सर्वांचे खूप धन्यवाद!

शार्दुल_हातोळकर's picture

6 May 2017 - 11:23 pm | शार्दुल_हातोळकर

सुंदर रचना!!

सत्यजित...'s picture

8 May 2017 - 12:33 am | सत्यजित...

धन्यवाद!