मर्त्य
तू नाहीस मुळी मर्यादापुरुषोत्तम वगैरे,
तरीही प्रत्येकीला हवाहवासा साताजन्मांचा हक्काचा सखा!
रथाचाच काय, महाभारताच्या भाग्याचाही सारथी,
शपथेवर जरी असलास, तुझ्या शस्त्रांना पारखा!!
तुझ्या ओठांवर बासरी, किरीटाला मोरपीस,
प्रेम उत्कट जगण्यावर, चैतन्याचा झरा मनी
देणारा संधी, भरेपर्यंत घडा पापांचा
आवेशानं लकाकत्या सुदर्शनचक्राचा, तूच संयमी धनी
तुझ्या रासलीला, बाललीलांइतक्याच मोहक, मधाळ
निरागसतेचं खट्याळपळाशी, जणू झालेलं एकजीव रसायन
तुझा मार्ग घडवणारे तुझेच मापदंड,
कधी दुभंगून नदीपात्र, प्रसंगी सोडून रण!!