ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे
मी आधी म्हटल्याप्रमाणे पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. आणि ही ठिकाणे पाहण्यासाठी स्थानिक गाडीच करावी लागते. तेव्हा आम्ही आमच्या गाडीने पेहेलगाम टॅक्सी स्टॅंडवर आलो. स्थानिक स्थलदर्शनासाठी मारूती इकोपासून सुमो, स्कॉर्पिओ ते इनोव्हा अशा अनेक गाड्या उपलब्ध होत्या. आम्ही मारूती इको गाडी ठरवली. एक पोरगेलासा तरूण आमचा चालक होता. “प्रत्येक ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास मिळेल” आम्ही गाडीत बसताच त्याने तुटकपणे सांगितले. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे, तो त्या गोष्टीसाठी फारसा उत्सुक दिसला नाही.