पहिला पाऊस

अमलताश's picture
अमलताश in जनातलं, मनातलं
19 Jun 2017 - 8:53 pm

सूर्य मावळून गेला आहे.. पाखरे घरट्याकडे परतत आहेत.. आजूबाजूचा भवताल दिवसभरात जणू भाजून निघाला आहे.. त्याचा खरपूस वास घेऊन वारा वाहतो आहे.. मी गच्चीवर उभा.. आजूबाजूला यंत्रयुगाची साक्ष देत उभ्या ठाकलेल्या कंपन्यांच्या चिमण्या.. झाडांचा, पर्यावरणाचा गळा घोटून उभं राहत असलेलं लोखंडी जंगल.. जून केव्हाचा सुरु झालाय.. कधी येणार पाऊस?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

...सुट्टीचा महिना सरत आला आहे.. लपाछपी च्या सगळ्या जुन्या जागा अन् या उन्हाळ्यात शोधून काढलेल्या नव्या जागा पालथ्या घालून झाल्या आहेत.. घरात फिरणाऱ्या मुंग्यांचा पाठलाग करून झाला आहे.. एकूणएक झाडावरच्या पक्ष्यांची घरटी माहित झाली आहेत.. आंब्याच्या रसाने हात कोपरापर्यंत भरवून आईची बोलणी खाल्ली आहेत.. लोकांच्या दुपारच्या झोपा मोडतो म्हणून प्रत्येकाने किमान चारदा मार खाल्ला आहे.. क्रिकेट च्या खेळत हिरोगिरी करून ढोपरं फुटली आहेत.. महिनाभर मामाच्या गावी उन्हात फिरून रंग काळवंडला आहे..२ रुपयाच्या आईस फ्रूट साठी भांडणे करून झाली आहेत.. आता सुटीचा कंटाळा यायला लागला आहे.. पण तरीही एक निराळा घमघम वास सगळीकडे भरून राहिला आहे.. उन्हाचा वास.. सुट्टीचा वास..

एखाद्या संध्याकाळी आकाशाच्या पोटात गुडगुड वाजायला लागतं अन् आमची फौज पुन्हा एकदा मोकाट सुटते.. ग्रीष्माचे दोन महिने एखाद्या स्थितप्रज्ञा सारखा समाधी लावून बसलेला वारा नवजात वासरासारखा भरारतो.. जमिनीवरचा पाचोळा गरागरा फिरवत आभाळाला नेऊन टेकवतो.. मोठ्या माणसांची धावपळ उडते.. कौलांवर, पत्र्यांवर प्लास्टिक टाकण्याची लगबग.. एका रांगेत वाळत असलेले कपडे घरात जाऊन धप्पकन ढीग होऊन पडतात..

कुठेतरी अत्तराचा फाया सांडतो.. मातीचा सुगंध दरवळतो.. रानाचा गंध घेऊन टपोऱ्या थेंबांची टपटप पानांवर वाजू लागते.. थेंबांच्या धारा होतात.. आमच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं.. ते पाहून तो अजूनच चेकाळतो.. मोठ्या-मोठ्याने गर्जत आम्हाला भिववू पाहतो..
कडाऽऽऽड कडऽऽकड.. लख्खकन् वीज चकाकते..

मोठ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.. तेवढ्या पुरते भेदारल्यासारखे करून आम्ही कावरेबावरे होतो.. पण आमचा धिंगाणा काही थांबत नाही.. आकाशात वीज कडाडू लागते अन् घरातली गायब होते.. सदानकदा आमच्यावर डाफरणारा शेजारचा खडूस दादा सुद्धा बाहेर येतो.. कुणी पाहत नाही बघून हळूच बायकोला ‘भिजायला ये’ म्हणून खुणावतो.. ( अर्थात, हे आता आठवतं.. तेव्हा ही दिव्यदृष्टी नव्हती आम्हांस.. ) पागोळ्यांच्या धारा आधी काळसर मातकट अन् नंतर पांढऱ्याशुभ्र पडू लागतात.. पाण्याच्या ओघळात घोटे बुडू लागतात.. आपल्या आगमनाची सणसणीत खबर देऊन पाऊस थोडा सैलावतो.. आम्ही सर्व घराकडे निघतो.. बोलणी खाण्यासाठी..
घरात येऊन पहावे तर जुन्या ट्रंकेतल्या सतराशे अठ्ठावन्न गोष्टी आईने काढून ठेवलेल्या दिसतात.. त्यातला रेनकोट, गमबूट, ओळखीचं हसतो..

पाऊस येतो आणखी एक वार्ता घेऊन.. नवी इयत्ता.. शाळा सुरु होणार.. (उगीच नाही पावसाळे पहिल्याने शहाणपण येतं असं म्हणतात..) दोनेक दिवसातच पहिल्या पावसाचं अप्रूप ओसरू लागतं.. सरणारी सुट्टी हुरहूर लावत निघून जाते.. नवा वर्ग, नवे शिक्षक, नव्या पुस्तकांचा कोरा वास... बालभारतीच्या पुस्तकातल्या गोष्टी.. भूगोलातले नकाशे.. इतिहासातले महापुरुष.. ओळखीचे होतात.. सोबतीला पाऊस असतोच.. कधी कशाचीही पर्वा न करता मुसळधार बरसणारा तर कधी मंद मंद गात सुखद रिमझिमणारा.. हळू हळू पाऊसही रंग-रूप बदलतो.. एक आगळीच नजागत घेऊन बरसात राहतो.. शांत.. अखंड.. सृजनाचं लेणं धरित्रीला बहाल करत.. श्रावण येतो.. आषाढातला धसमुसळेपणा टाकून पाऊस अगदी हळवा होतो.. अवघ्या महिन्याभरात उमलून आलेल्या पोपटी गालिचावर भुरभुरतो.. तृणपात्यांना गोंजारतो..

पाऊस पडतो आहे... घराच्या वळचणीला ओल्या चिमण्या आपल्या नाजूक पंखांची थरथर करत बसून आहेत.. मी खिडकीचे थंडगार गज हातात घट्ट धरून पावसाच्या धारा पाहतो आहे..

...सकाळपासून पागोळ्यांचा आवाज कानात वाजतो आहे.. कानातलाच असल्यासारखा.. मस्तपैकी अंधारून आलंय.. मी गारगार फरशीवर पालथा पडून पुस्तक वाचतो आहे.. पाडगावकरांच्या ओळी..

“भित्र्या चिमणीपरी ढगांच्या,
वळचणीत मिणमिणे चांदणी..
मळक्या काचेवरी धुक्याच्या
वारा मिचकावतो पापणी!”

...दारातल्या वेलीला आधार म्हणून बांधलेल्या दोरीवर थेंबांचे मोती लगडले आहेत.. त्यातला एक लबाडपणाने समोरच्याला ढुशी देतो अन् पाठोपाठ ते सर्व खालच्या चिखलात धप्पकन पडून खट्याळपणे हसतात..

..पाण्याने तुडुंब भरलेले मेघ पाणी वाहताना जणू दमल्यामुळे डोंगरमाथ्याला टेकले आहेत..

..अशा कितीतरी आठवणी.. पाऊसवेडा मी..

लहानपणी “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा” म्हणत सुरु झालेला हा प्रवास आता “पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली...” इथवर येऊन थांबला आहे.. यापुढेही चालत राहणार आहे..
------------------------------------------------------------------------------------------------------------

...सूर्य मावळून गेला आहे.. पाखरे घरट्याकडे परतत आहेत.. आजूबाजूचा भवताल दिवसभरात जणू भाजून निघाला आहे.. त्याचा खरपूस वास घेऊन वारा वाहतो आहे.. मी गच्चीवर उभा.. पाहता पाहता कुठूनतरी ढगांची आकाशात गर्दी झाली आहे.. ढोल-नगारे आभाळात वाजू लागले आहेत.. तोच मातीचा सुगंध दरवळू लागला आहे.. टपोऱ्या थेंबांची टपटप सुरु झाली आहे.. तोच पहिला पाऊस पुन्हा नव्याने आला आहे..

(पूर्वप्रकाशित)

लेख

प्रतिक्रिया

छान लिहिलय, अजुन पावसाने तोंड दाखवलेले नाही, लेख वाचूनच समाधान मानायचे

फारएन्ड's picture

20 Jun 2017 - 5:29 am | फारएन्ड

जबरी आहे!

ज्योति अळवणी's picture

20 Jun 2017 - 8:55 am | ज्योति अळवणी

अप्रतिम... आता पाऊस येण्याची हुरहूर वाढली...

पुंबा's picture

20 Jun 2017 - 5:23 pm | पुंबा

वाह!!!

पद्मावति's picture

20 Jun 2017 - 5:27 pm | पद्मावति

खूप छान लिहिलेय.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 3:53 pm | धर्मराजमुटके

मस्त लिहिलय ! अजुन लिहा !