दश्त-ए-तनहाई में - तृप्ती आणि हुरहूर
दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं. वार्यावरून पीस उडत यावं, तसं माझ्यापर्यंत आलेलं दश्त-ए-तनहाई, हे फैझ अहमद फैझचे शब्द आणि इकबाल बानोच्या आवाजातील गाणं याच जातकुळीतलं.