द स्केअरक्रो - भाग ३०
द स्केअरक्रो भाग २९
द स्केअरक्रो भाग ३० (अंतिम भाग) (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
कार्व्हर तिथे असेल असा मला संशयसुद्धा आला नव्हता पण आता तो माझ्या मागे उभा होता.
“तू रिपोर्टर आहेस त्यावरूनच मला समजायला हवं होतं. एक नंबरचे सिनिकल असता तुम्ही लोक. मी आत्महत्या करीन यावर तुझा विश्वास न बसणं साहजिक आहे.”
बोलता बोलता त्याने माझ्या हातातली गन काढून घेतली आणि माझ्या शर्टाची कॉलर धरून माझा चेहरा भिंतीवर दाबला. तो माझी झडती घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं.
“ही गन एजंट वॉलिंगने दिली वाटतं तुला? तुझी स्वतःची गन तर गायब झालीय.” त्याची झडती संपल्यावर त्याने मला दरवाज्याच्या दिशेने ढकललं, “एक काम करू या आपण. एजंट वॉलिंगला भेटायला जाऊ या. आणि मग हा सगळा तमाशा तिथेच कायमचा संपवून टाकू या. दुर्दैवाने या वेळी मी लेडीज फर्स्ट असं म्हणणार नाही. तुला आधी जावं लागेल कारण माझी एजंट वॉलिंगच्या सहवासात थोडा वेळ घालवण्याची इच्छा आहे.”
आम्ही आता त्या दरवाज्यापर्यंत आलो होतो.
“तुझं की कार्ड वापरून दरवाजा उघड,” कार्व्हर म्हणाला.
मी निमुटपणे दरवाजा उघडला. त्याने मला पुढे ढकललं आणि तोही बाहेर पडला.
एकदम त्याची माझ्यावरची पकड ढिली पडल्याचं मला जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर रॅशेल तिथे उभी होती आणि कार्व्हर जमिनीवर पडला होता. तिने तिच्या गनच्या दस्त्याने त्याच्या डोक्यावर मारून त्याला बेशुद्ध केलं होतं बहुतेक.
“रॅशेल? तू कशी काय आलीस इथे?”
“त्याने साराचं की कार्ड ती काम करत होती त्या डेस्कवर ठेवलं होतं. मी तुझ्यापाठोपाठ आले. आता त्याला परत कंट्रोल रूममध्ये घेऊन चल.”
“का?”
“त्याचा हात. त्याचा हात स्कॅनरवर ठेवून आपल्याला सर्व्हर रूम उघडावी लागेल.”
कार्व्हर काहीही हालचाल करत नव्हता. रॅशेलने मला तिने दिलेली गन त्याच्या हातातून काढून घेतली. त्याच्या कोटाच्या खिशात अजून दोन गन्स होत्या. मी त्या काढून घेतल्या आणि माझ्या पँटच्या खिशात ठेवल्या.
“आपल्याला त्याला त्या अष्टकोनी खोलीत न्यायची गरज नाही,” मी म्हणालो, “त्याला या मागच्या दरवाज्याने आपण सर्व्हर रूममध्ये नेऊ शकतो.”
“ठीक आहे. तुला तिथे कसं जायचं ते माहित आहे. तूच पुढे हो.”
कार्व्हरला आम्ही जवळजवळ खेचतच त्या मागच्या दरवाज्याच्या दिशेने नेलं. तो उंच होता पण त्याचं वजन काही फार नव्हतं. त्यामुळे हे मी सहजपणे करू शकलो.
“आपल्याला त्या दोघांना वाचवायलाच हवं,” ती म्हणाली.
“हो. पण आपल्याला उशीर झालेला असला तर?”
“मी असा विचार नाही केला जॅक. चल लवकर!”
शेवटी एकदाचा तो सर्व्हर रूमचा मागचा दरवाजा आला. त्याच्या बाजूला स्कॅनर होताच. मी कार्व्हरला उभं करायला लागलो. मला त्याला वळवायचं होतं, म्हणजे रॅशेलला त्याच्या उजव्या हाताचा तळवा स्कॅनरवर ठेवता आला असता.
त्याच क्षणी कार्व्हरचा पाय उंचावला गेल्याचं मी पाहिलं. त्यामुळे रॅशेलला त्याची लाथ लागली आणि ती मागे कोलमडली. त्याने मला जोराने दरवाज्याकडे ढकललं. माझं डोकं दरवाज्यावर आपटलं आणि एक क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटून आली. त्याने मला दरवाज्यापासून दूर ओढलं आणि फिरवून स्वतःच्या समोर घेतलं. तो काय करतोय हे माझ्या लक्षात आलं. तो मला त्याच्या आणि रॅशेलच्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करत होता. त्याने माझ्या पँटच्या खिशातून गन काढलेली मला जाणवलं आणि तेवढ्यात ....
एक कानठळ्या बसवणारा आवाज आला. माझ्या कानाच्या एवढ्या जवळ की माझ्या दोन्ही कानांना दडे बसले. माझ्या चेहऱ्यावर रक्त उडालं आणि कार्व्हर जमिनीवर कोसळला.
मी एक पाऊल मागे झालो आणि माझे कान दाबून धरले. एखादी ट्रेन बाजूने जावी इतक्या तीव्रतेचा तो आवाज होता. मी समोर पाहिलं तर रॅशेल हातात गन घेऊन फायरिंग पोझिशनमध्ये होती.
“ठीक आहेस तू जॅक?”
“हो.” नशिबाने मला ऐकू येत होतं.
“त्याला उचल. तो जर मेला तर आपल्याला काही करता येणार नाही.”
आम्ही दोघांनी मिळून कार्व्हरला उचललं आणि कसंबसं उभं केलं. रॅशेलने त्याच्या उजव्या हाताचा तळवा स्कॅनरवर ठेवला आणि पाच सेकंदांत आम्हाला दरवाजा उघडल्याचा क्लिक असा आवाज ऐकू आला. रॅशेलने दरवाजा उघडला आणि मी कार्व्हरला दरवाज्याच्या बाजूला ठेवलं. मला बाहेरची हवा आत यायला हवी होती. त्याच्या कोटाच्या खिशात दोन-तीन मास्क्स मिळाले. मी आणि तिने एक-एक मास्क चढवला आणि आम्ही आत शिरलो.
तिथला पांढरा वायू हळूहळू कमी होत होता. आम्हाला जॉर्ज आणि सारा यांना शोधायला लागलं नाही. दोघेही ज्या अवस्थेत आम्हाला दिसले होते, त्याच अवस्थेत होते. आम्ही दोघांनीही आमचे मास्क्स काढले आणि त्यांच्या चेहऱ्यांवर लावले.
“तू जॉर्जला बाहेर ने. मी साराला घेऊन येते,” रॅशेल म्हणाली.
आम्ही तिथून बाहेर पडण्याची घाई करत होतो कारण या दोघांची परिस्थिती नक्की कशी आहे ते मला समजत नव्हतं.
कार्व्हरला ओलांडून मी पुढे गेलो आणि मला जॉर्जच्या खोकण्याचा आवाज आला. तो हळूहळू शुद्धीवर येत होता बहुतेक. रॅशेल माझ्यापाठोपाठ साराला घेऊन बाहेर आली. सारा अजून शुद्धीवर आली नव्हती. रॅशेलने तिला बाहेर आणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि तिला कृत्रिम श्वासोच्छवास द्यायला सुरुवात केली. एक-दोन मिनिटांत आम्हाला तिच्या खोकण्याचा आवाज ऐकू आला.
मी मटकन खाली बसलो. असह्य वाटणारा ताण अचानक संपल्यावर असंच होत असावं. मी बसलो होतो तिथून कार्व्हरला पाहू शकत होतो. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती बहुतेक. मी उठलो आणि त्याच्या जवळ गेलो.
“बॅकअप येतोय. वैद्यकीय मदत पण येतेय.” रॅशेल तिचा फोन बंद करत म्हणाली, “मी बाहेर जाते आणि त्यांच्यासाठी थांबते. त्यांना या भूलभुलैयामध्ये काही समजणार नाही.”
“ ठीक आहे.”
तिची नजर कार्व्हरवर गेली, “ दुर्दैवाने त्याला आपण जिवंत पकडू शकलो नाही. कुरियर गेला. आता कार्व्हरपण गेला. त्यांचं रहस्य त्यांच्याचबरोबर गेलं. त्यांनी हे खून का केले ते आपल्याला कधीच कळू शकणार नाही.”
मी कार्व्हरकडे पाहात होतो. मला त्याच्या मानेवरची शीर हळूहळू थरथरताना दिसली.
“नाही रॅशेल. आपला स्केअरक्रो अजून जिवंत आहे.”
#############################################################
मेसामध्ये घडलेल्या या घटनांना आता सहा आठवड्यांहून जास्त काळ लोटला आहे. पण अजूनही माझ्या डोळ्यांसमोर त्या तेवढ्याच स्पष्ट आहेत.
मी आता लिहितोय. दररोज. आता ऑफिसला जाणं वगैरे फालतू गोष्टी मागे नसल्यामुळे मी दुपारी एखाद्या वर्दळ असलेल्या कॉफी शॉपमध्ये जातो आणि तिथे माझा लॅपटॉप घेऊन बसतो. मी शांत वातावरणात लिहू शकत नाही. गर्दी आणि गोंगाट असलेल्या न्यूजरूममध्ये लिहायची एवढी सवय झालीय की शांततेत लिहिणं जमत नाही. अर्थात, खऱ्या न्यूजरूमची सर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला येऊ शकणार नाही हे माझं मत कायम आहे.
सकाळी मी माझ्या पुस्तकाबद्दल रिसर्च करतो. वेस्ली जॉन कार्व्हर नावाचं गूढ पूर्णपणे उकलणं कठीण आहे पण मी हळूहळू त्याला समजून घेतोय. तो एल.ए.जनरल हॉस्पिटलच्या प्रिझन वॉर्डमध्ये असतो आजकाल. कोमामध्ये.
त्याच्याबद्दल मला असलेली माहिती ही थोड्याफार प्रमाणात एफ.बी.आय.कडून मिळालेली आहे. त्यांचं काम अजूनही संपलेलं नाही. अॅरिझोना, नेवाडा आणि कॅलिफोर्निया या तिन्ही राज्यांमध्ये त्यांचा तपास चालू आहे. पण माझ्या स्वतःच्या सोर्सेसकडूनही मला माहिती मिळालेली आहे.
कार्व्हर हा अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस होता. त्याच्या विषयात – कॉम्प्युटर सायन्समध्ये तर तो जबरदस्त होताच पण त्याचा लोकांच्या मानसशास्त्राचा फार चांगला अभ्यास होता. त्यामुळेच तो त्यांच्या इच्छा आणि आकांक्षांबद्दल जाणून घ्यायचा आणि ते ज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचा. अनेक वेबसाईट्स आणि चॅटरूम्समध्ये तो टोपणनावाने वावरायचा आणि एखादं ‘सावज ’ किंवा ‘ सहकारी ’ हेरायचा. नंतर त्यांचा पत्ता शोधून काढून तो त्यांच्याशी प्रत्यक्षात संपर्क साधायचा आणि नंतर त्यांचा ‘ वापर ’ करून खून करायचा.
हे सगळं तो वेस्टर्न डेटामध्ये येण्याच्या आधीपासून चालू होतं. मार्क कुरियर उर्फ फ्रेडी स्टोन हा त्याचा गेल्या तीन वर्षांपासून सहकारी होता पण त्याच्याआधीही अनेकजण होते. कार्व्हरने त्यांची कशी विल्हेवाट लावली आणि त्यांना कसं गायब केलं ते रहस्य उलगडायला कदाचित बरीच वर्षे लागतील.
कार्व्हरचे गुन्हे लोकांपुढे येणं महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे त्यांच्यामागचं कारण समजणं. माझा संपादक – जेव्हा आम्ही माझ्या पुस्तकाबद्दल बोलतो – तेव्हा मला हेच सांगत असतो. जे घडलंय ते लोकांना माहित आहेच. आपण त्याच्यापलीकडे जायला पाहिजे. ‘का’ या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न मी केलाच पाहिजे. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर विस्तार आणि खोली. टाईम्सप्रमाणेच.
मला आतापर्यंत जे समजलंय ते हे – कार्व्हरला कोणीही भाऊ-बहिण वगैरे नव्हते. त्याने त्याच्या वडिलांनाही कधी पाहिलं नव्हतं. त्याची आई स्ट्रिप क्लबमध्ये डान्सर होती आणि तिच्या कामामुळे त्याचं बालपण हे अमेरिकेच्या एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत फिरण्यात गेलं. जेव्हा त्याच्या आईचा कार्यक्रम असायचा तेव्हा त्याला ड्रेसिंग रूममध्ये डांबून ठेवलं जायचं. त्याच्या आईचा एक ठरलेला कार्यक्रम म्हणजे त्यावेळचा प्रसिद्ध रॉक ग्रुप द डोअर्सच्या गाण्यांवरचा स्ट्रिप डान्स. हा ग्रुप एल.ए.मधला होता आणि त्यामुळे त्याची आई एल.ए.वुमन या नावानेच प्रसिद्ध होती.
या सगळ्या वातावरणात त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले आणि कधीकधी तर त्याची आई जिथे तिच्या गिऱ्हाईकांबरोबर झोपायची, तिथेच त्यालाही झोपावं लागलं.
अजून एक माहिती मला जी समजली ती म्हणजे त्याच्या आईला तिच्या तिशीत एक विचित्र अस्थिविकार जडला होता आणि त्याच्यामुळे तिचं काम कायमचं बंद होण्याचा धोका होता. त्यापासून वाचण्यासाठी तिला डॉक्टरांनी लेग ब्रेसेस वापरण्याचा सल्ला दिला होता आणि छोट्या वेस्लीला बरेच वेळा या लेग ब्रेसेसचे पट्टे बांधावे लागत आणि त्या सांभाळून ठेवाव्या लागत.
कार्व्हरबद्दलची ही सगळी माहिती सुन्न करणारी आहे पण त्याच्यामुळे तो खुनी कसा आणि का झाला या प्रश्नांची निश्चित उत्तरं मिळत नाहीत. हे थोडंफार कॅन्सरसारखं आहे. डॉक्टर तुम्हाला तो कशामुळे होऊ शकतो किंवा झालाय ते सांगू शकतात. पण नेमक्या कुठल्या क्षणी तुमच्या पेशी तुमचा घात करायला सुरुवात करतात ते मात्र ते सांगू शकत नाहीत. कार्व्हरच्या बाबतीतही त्याने खून करण्याचा विचार कधी केला आणि प्रत्यक्ष तसं करायला सुरुवात कशी आणि का केली हे अजूनही अज्ञात आहे. रॅशेल तर मला नेहमी सांगत असते की हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. ते फक्त त्या माणसाला माहित असतं.
मी आता बेकर्सफील्डमध्ये आहे. गेले चार दिवस दररोज सकाळी मी कॅरेन कार्व्हरला भेटतोय आणि ती मला तिच्या मुलाच्या आठवणी सांगतेय. तो वयाच्या अठराव्या वर्षी कुठलीतरी स्कॉलरशिप मिळवून एम.आय.टी.मध्ये शिकायला गेला तेव्हा तिने त्याला शेवटचं पाहिलं. एवढ्या वर्षांत त्याने तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवला नव्हता. पण तिची त्याच्याबद्दल बोलायची आणि माहिती द्यायची इच्छा आहे. तिच्या तिशीत झालेल्या त्या आजाराने आता तिचा पूर्ण ताबा घेतलेला आहे, त्यामुळे ती व्हीलचेअरवरच असते.
उद्या मात्र मी घरी परत जाणार आहे. हो. माझ्याच घरी. ते विकायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. बाकी बरीचशी कामं आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे रॅशेलला भेटणं. मी तिला पाहून पाच दिवस झालेले आहेत आणि आता दूर राहणं कठीण आहे. तिच्या सिंगल बुलेट थिअरीवर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे आता.
दरम्यान, कार्व्हरची परिस्थिती काही फार चांगली किंवा सुधारण्यासारखी नाहीये. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना असं वाटतंय की तो कधीच परत शुद्धीवर येऊ शकणार नाही. रॅशेलने झाडलेल्या त्या गोळीमुळे कार्व्हरच्या मेंदूचा तो भाग कायमचा निकामी झालेला आहे. तो तुरुंगात काहीतरी बोलत असतो, बडबडत असतो. क्वचित गुणगुणतो. पण त्याहून जास्त प्रतिसाद तो देत नाहीये.
ही स्टोरी ब्रेक झाल्यावर अनेकांनी त्याच्यावर या अवस्थेतदेखील खटला भरून त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी केली होती पण त्याला तितकाच तीव्र विरोध झाला. दोन्ही बाजूंचे लोक अधूनमधून एल.ए.जनरल हॉस्पिटलच्या बाहेर मोर्चे वगैरे काढतात. एक गट त्याला विजेच्या खुर्चीत बसवण्याची मागणी करतो. दुसरा त्याचं आयुष्य वाचवण्याची.
कार्व्हरला स्वतःला काय वाटत असेल हा विचार माझ्या मनात नेहमी येतो. दुसरा सतत येणारा विचार म्हणजे अँजेला कुकचा. तिचा तो थिजलेल्या उघड्या डोळ्यांनी गर्तेत कोसळत असणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून कितीही प्रयत्न केला तरी जात नाही. त्यामुळे मला वाटतं, की वेस्ली कार्व्हरवर कुठल्यातरी वरच्या न्यायालयात खटला चालवला गेलेला आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मरेपर्यंत. पॅरोलशिवाय!
#############################################################
कार्व्हर अंधारात थांबलाय. वाट पाहतोय कशाची तरी. त्याचं मन म्हणजे विचारांचा गडबडगुंडा झालाय. इतके विचार. त्यातल्या खऱ्या आठवणी कोणत्या आणि नुसतेच विचार कोणते, त्याला काहीही कळत नाहीये. सगळे विचार एखाद्या धुरासारखे त्याच्या मनातून विरून जाताहेत. तो काहीच पकडून ठेवू शकत नाहीये.
त्याला कधी कधी आवाज ऐकू येतात. पण नक्की कशाचे ते त्याला समजत नाही. लोक त्याच्याभोवती घोळका करून काहीतरी बोलत असतात. पण त्याच्याशी कोणीच बोलत नाही. तो प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही.
त्याचं आवडतं संगीत त्याच्याबरोबर आहे आणि त्याच एका गोष्टीने त्याला शेवटपर्यंत साथ दिलेली आहे. तो गुणगुणायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या तोंडातून आवाज फुटत नाही.
This is the end…..Beautiful Friend …… The End…..
हा ऐकू येणारा आवाज आपल्या वडिलांचा आहे असं त्याला वाटतं. त्यांना कधीच तो भेटू शकला नव्हता.
अचानक त्याच्या डोक्यातून वेदनेची एक तीव्र चमक जाते. कोणीतरी डोक्याच्या मध्यभागी कुऱ्हाड मारल्यासारखी वेदना. कमी नाही होत. कुणीतरी ती थांबवावी म्हणून तो वाट पाहतो. पण कुणी येत नाही.
हळूहळू सगळीकडे अंधार पसरतो.........
समाप्त
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
ता.क.: ही कादंबरी संपवताना मनात संमिश्र भावना आहेत. दर शनिवारी आणि रविवारी एकेक भाग टाकायची आणि आठवडाभर ते लिहायची सवय झाली होती. वाचकांचे प्रतिसाद ही तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. आता पुढच्या शनिवारी सवयीने मिपा उघडलं जाईल, पण लगेचच लक्षात येईल, अरे कादंबरी तर संपली. मूळ कादंबरी इतकी अफलातून आहे, की कोणीही अनुवाद केला असता तरीही तो सुंदरच झाला असता. यातल्या चुका मात्र माझ्या आहेत. प्रिय मिपाकर वाचकांनी त्या मोठ्या मनाने खपवून घेतल्या आणि मला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद कसे म्हणणार? घरातल्या लोकांना कोणी धन्यवाद देतो का?
असाच लोभ असावा ही विनंती.
बोका-ए-आझम
Book traversal links for द स्केअरक्रो - भाग ३०
वर्गीकरण
प्रतिक्रिया
_/\_
+१ अद्द्याला
_/\_
सहमत! बोकोबा एखादी भयकथा शक्य
जबरदस्त अनुवाद. कुठेही
क्या बात है!!! तुमच्या
बोकेराव अनुवाद अप्रतीम झालेला
जबरदस्त
खुप छान झाला अनुवाद
संपली :(!!!!!!!!!
अतिशय सुंदर. दर वेळेस मिपा
क्लास!
गुन्हेगाराला भूतकाळ असतो हे
अतिशय सुंदर.. मधले बरेच भाग
उत्तम अनुवाद
एका सुंदर अनुवादासाठी आपले
परत एकदा
सहमत. आता. रॉबर्ट लुडलुम ची
धन्यवाद बोकेराव
अतिशय सुंदर मुळ कादंबरी आणि
अप्रतिम.
प्रतिक्षा ?
धन्यवाद ह्या सरस मालिकेबद्दल
सुंदर, अप्रतिम अनुवाद. अनुवाद
मस्तच.
प्रत्ययी अनुवाद आहे.
प्रिय बोका-ए-आझम
A1+
धन्यवाद
अतिशय सुंदर अनुवाद!
शेवटचा भाग वाचायची एवढी
बोका भाऊ,
मस्त!!!!!!!! :)
उत्कंठा वाढविणारा व ओघवता अनुवाद +१
_/\_
आपल्या वाचनाच्या आनंदाला स्वतःपर्यंत न ठेवता
ही कथा वाचण्यासाठीच मिसळपाव चे सदस्यत्व काल घेतले
अत्तिशय दर्जेदार अनुवाद.
अप्रतिम अनुवाद!
अप्रतिम! इतका सुंदर अनुवाद
सगळे भाग एकत्र कसे/कुठे
सुंदर आणि खिळवून ठेवणारी
ज ब र द स्त. . .
भन्नाट
बोकाशेठ हे लै जुनं झालंय
एकदम जबरदस्त!
एका बैठकीत संपवले, ऊठवले गेलेच नाही.
सुरेख अनुवाद
थरारक आणि जबरदस्त !
मला २ दिवसांपूर्वी ही कादंबरी