आमचे गोंय - प्रास्ताविक (१)

टीम गोवा's picture
टीम गोवा in जनातलं, मनातलं
4 Apr 2011 - 12:33 am

***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा

***

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'!

बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं.

बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच.

साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही.

पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये.

माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले.

माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायावर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा.

असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.)

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला.

गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे.

असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये.

काही दिवसांपूर्वी 'प्रीत-मोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'पैसा'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण पैसा आणि प्रीत-मोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. पैसातैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली.

या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला!

या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा!

- बिपिन कार्यकर्ते

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

संस्कृतीइतिहाससमाजप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

योगप्रभू's picture

4 Apr 2011 - 1:34 am | योगप्रभू

पैसा, प्रीत-मोहर आणि बिपिन,
आधी मिपाचे आणि तुमचे अभिनंदन. सुंदर विषय.
अधिरता जास्त न वाढवता भाग टाका, ही विनंती.

गोमंतक कधीचा मनात रुतून बसलाय! :)

मुक्तसुनीत's picture

4 Apr 2011 - 8:03 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. उत्तम दर्जाचा प्रकल्प. वाचण्यास उत्सुक आहे.

छोटा डॉन's picture

4 Apr 2011 - 1:29 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

पुढील लेखांची वाट बघत आहे, स्तुत्य उपक्रम :)

- छोटा डॉन

गोवा पहाण्याचा योग लहान पनीच म्हणजे ७-८ वीतच आला होता फॅमिली ट्रिप बरोबर गोवा मस्त एन्जॉय केला होता ,खूप सुंदर चर्चेस ,मंदिर,बीचेस पाहिली
वास्को द गामा ,पणजी, म्हापसा म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्य !
तिथे एक चर्च पाहिले होते खुप जून आणि खुप सुन्दर !
त्याचे नाव "संत जेविअर चर्च" तिथे संत जेविअरचे शव काचेच्या पेटित ठेवले आहे आणि दर १० वर्षानी ते दर्शनासाठी बाहेर काढले जाते
तिथल्या लोकानी सांगितलेली कथा अशी होती की ,
"या संत जेविअर यांचा मृत्यु सुमारे ५५०-६०० वर्षापूर्वी मायदेशी परतताना झाला होता आणि त्यांच्या इतर सहकर्यानी त्यांचे प्रेत चुन्यात पुरून ठेवले होते की जेणेकरून जेव्हा ते ६ महिन्याचा जहाज प्रवास करून परत येतील तेव्हा "धर्मगुरू झेविअर "यांच्या अस्थि परत मायदेशी नेता येतील ५-६ महिन्यानी ते जेव्हा प्रवासवारून परत आले तेव्हा ते प्रेत जसेच्या तसे होते ,त्याना आश्चर्याचा धक्का बसला कि हा नक्की दैवी चमत्कार आहे त्या नन्तर संत जेविअरने एका धर्मगुरूच्या स्वप्नात येउन सांगितले की," मला कुठेही नेऊ नका ,इथेच गोव्यात राहू दया " त्यामुळ त्यांचे शव पुन्हा गोव्यात आणले त्यांच्या चमत्कारमुळे त्यांना संत पदवी मृत्यू नन्तर बहाल करण्यात आली .
त्यांच्या केवळ दर्शनासाठी दुरून दुरून भाविक येतात ,आणि त्यांचे दर्शन आम्ही घेतले हा एक "अलभ्य लाभ" होता
आमच्यासाठी !

संदीप चित्रे's picture

4 Apr 2011 - 6:47 pm | संदीप चित्रे

वाट बघतोय !

विकास's picture

4 Apr 2011 - 8:28 pm | विकास

पहीला भाग आवडला. पुढचे भाग जास्त खंड न पडता लवकर येउंदेत!

पिंगू's picture

4 Apr 2011 - 6:55 am | पिंगू

>>> अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!

हे वाचून मात्र मनात वेदना झाल्या. च्यायला इथे पण हा प्रकार आहेच ना. मग उपयोग वांझ धर्मसंस्थेचा.

माफ करा. पण हे जरा अवांतर आहे.

बाकी आठवणी आवडल्या. सुशेगातील गोव्याचे वर्णन वाचायला उत्सुक.

- पिंगू

धनंजय's picture

4 Apr 2011 - 8:16 am | धनंजय

गोव्यातील घर सोडून आता १५-२० वर्से झाली. आता गोव्यात जाणे हवे त्यापेक्षा कमीच होते.

मालिका वाचायला उत्सूक आहे.

राजेश घासकडवी's picture

4 Apr 2011 - 8:37 am | राजेश घासकडवी

सुरूवात छानच झाली आहे. पुढचं वाचण्यास उत्सुक.

सूर्यपुत्र's picture

4 Apr 2011 - 9:40 am | सूर्यपुत्र

बिपीन कार्यकर्ते, पैसा ताई आणि प्रीत-मोहर यांचे मनापासून अभिनंदन. :)
वाचनोत्सुक.

-सूर्यपुत्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2011 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.......!

’गोमंतकी बोली’ बद्दल काही विशेष माहिती जसे भाषेच्या लकबी, शब्दांमधे झालेले बदल वगैरे
असे काही लेखनात आलेच तर तेही वाचायला आवडेल. :)

-दिलीप बिरुटे

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!!

याबाबत थोडेफार ऐकलेले आहे. म्हणजे, कित्येक पिढ्यांअगोदर बाटण्यापूर्वी जी कुटुंबे ब्राह्मण होती ती आजही आपली ओळख अभिमानाने 'क्याथलिक ब्राह्मण' अशी सांगतात, आणि (बहुधा साधारणतः त्याच काळात) इतर जातींतून बाटलेल्या कुटुंबांशी त्यांचा रोटी- माहीत नाही, पण बेटीव्यवहार तर निश्चित होत नाही, इतपत ऐकून आहे. आणि तज्ज्ञांना तर गोवन क्याथलिक आडनावांवरून बाटण्यापूर्वीची हिंदू कुलनामे आणि जातपातही कळते म्हणे. खरेखोटे तेच जाणोत, पण एकंदर मानवी स्वभाव इकडूनतिकडून सारखाच म्हटल्यावर हे सहज शक्यही आहे.

माझा यात थोडा गोंधळ आहे तो तपशिलाबाबत. म्हणजे, क्याथलिक ब्राह्मण हे मूळचे 'ब्राह्मण' होते असे जे म्हणतात, ते नेमके कोणते 'ब्राह्मण' म्हणायचे? थोडक्यात, 'ब्राह्मण' या शब्दाची नेमकी कोणती व्याख्या येथे लागू होते? कारण, विशेष करून गोव्याच्या संदर्भात 'ब्राह्मण' आणि 'भट' या दोन शब्दांच्या अर्थच्छटांत बराच फरक आहे, आणि 'ब्राह्मण' या शब्दातून महाराष्ट्रात प्रथमदर्शनी जो जातिसमूह सर्वसाधारणतः अभिप्रेत होतो त्यात आणि गोव्यात याच शब्दातून सर्वसाधारणतः अभिप्रेत होणार्‍या जातिसमूहात फरक आहे*, असेही ऐकलेले आहे. (अर्थात या बाबतीतील माझी सर्व माहिती ही ऐकीव असल्याकारणाने अंशतः किंवा पूर्णपणे चुकीची असण्याची शक्यता अजिबात नाकारत नाही.)

* महाराष्ट्रात याबद्दलचे कन्वेंशन थोडे वेगळे आहे असे वाटते. म्हणजे, महाराष्ट्रात 'ब्राह्मण' या शब्दाच्या वापरातून सर्वसाधारणतः तो शब्द वापरणाराच्या किंवा ऐकणाराच्या मगदुराप्रमाणे आणि दृष्टिकोनाप्रमाणे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या परिस्थितींत वेगवेगळे जातिसमूह अभिप्रेत होऊ जरी शकत असले, तरी साधारणतः 'ब्राह्मणां'विषयी सरसकटपणे काही निंदात्मक, टीकात्मक किंवा एकंदरीत वाईट स्वरूपाचे असे काही बोलायचे झाल्यास त्यांपैकी काही किमान विशिष्ट समूहांना 'ब्राह्मणां'च्या व्याख्येतून निदान तेवढ्यापुरते तरी आपोआप वगळण्यात यावे, असा एक सर्वपक्षी सर्वमान्य अलिखित संकेत आहे, आणि तो सर्वपक्षी काटेकोरपणे पाळला जातो, असे एक निरीक्षण आहे. अशा परिस्थितीत, हे वगळण्याचे किमान समूह कोणते याबाबत सर्वपक्षी दुमत असल्याचे जाणवत नाही. गोव्यातील या बाबतीतील परिस्थितीबद्दल काही विदा मिळू शकल्यास तुलनात्मक अभ्यास करणे कदाचित रोचक ठरू शकेल असे वाटते.

बाकी, माहितीच्या दृष्टीने उर्वरित लेखमाला वाचायला उत्सुक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2011 - 10:18 am | llपुण्याचे पेशवेll

थोडक्यात, 'ब्राह्मण' या शब्दाची नेमकी कोणती व्याख्या येथे लागू होते? कारण, विशेष करून गोव्याच्या संदर्भात 'ब्राह्मण' आणि 'भट' या दोन शब्दांच्या अर्थच्छटांत बराच फरक आहे, आणि 'ब्राह्मण' या शब्दातून महाराष्ट्रात प्रथमदर्शनी जो जातिसमूह सर्वसाधारणतः अभिप्रेत होतो त्यात आणि गोव्यात याच शब्दातून सर्वसाधारणतः अभिप्रेत होणार्‍या जातिसमूहात फरक आहे*, असेही ऐकलेले आहे. (अर्थात या बाबतीतील माझी सर्व माहिती ही ऐकीव असल्याकारणाने अंशतः किंवा पूर्णपणे चुकीची असण्याची
शक्यता अजिबात नाकारत नाही.

सहमत आहे. गोव्यामधे सारस्वतांना (कुडाळ देशकर?, गौड सारस्वत? ) ब्राम्हण म्हणतात. पुलंनी म्हटल्याप्रमाणे हे गौड सारस्वत मूळचे बंगालातले गौड प्रांतातले तिथून इथे स्थायिक झाले म्हणून गौड सारस्वत. पण आमच्या देसायाला (आमचा सारस्वत मित्र) हे मान्य नाही. तो म्हणतो "सारस्वत देखील इतर सर्व ब्राम्हणांप्रमाणे वेदांचे अधिकारीच. १५ व्या शतकात पडलेल्या दुष्काळामुळे आम्ही मासे खायला लागलो. आमच्यातील काही सारस्वत तर अजूनही केवळ खार्‍या पाण्यातील मासेच खातात. बाकी काहीही नॉनव्हेज खात नाहीत." ;)

पंगा's picture

4 Apr 2011 - 10:31 am | पंगा

अवांतर माहितीबद्दल अतिशय आभारी आहे. पण "कित्येक पिढ्यांअगोदर बाटण्यापूर्वी जी कुटुंबे ब्राह्मण होती ती आजही आपली ओळख अभिमानाने 'क्याथलिक ब्राह्मण' अशी सांगतात, आणि (बहुधा साधारणतः त्याच काळात) इतर जातींतून बाटलेल्या कुटुंबांशी त्यांचा रोटी- माहीत नाही, पण बेटीव्यवहार तर निश्चित होत नाही" या बाबीच्या संदर्भात - आणि विशेषतः गोव्याच्या पार्श्वभूमीवर - 'ब्राह्मण' या शब्दाची नेमकी कोणती व्याख्या येथे लागू होते, या माझ्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने काही प्रकाश टाकू शकाल काय?

पुनश्च आभारी आहे.

पैसा's picture

4 Apr 2011 - 10:56 am | पैसा

गोव्यात साधारण पौरोहित्य आणि देवळात पूजा करणार्‍या ब्राह्मणाना 'भट' म्हणण्यात येतं. बोलताना कोकणस्थ, कर्‍हाडे आणि पद्ये याना भट म्हटलं जातं, तर सारस्वत लोकांना 'बामण' अशी संज्ञा आहे. पण सारस्वतांपैकी काही कुटुंबं, जी देवळात पूजा अर्चा करतात आणि पौरोहित्य करतात, त्यांनाही भट म्हणण्यात येतं. अशी कुटुंब बहुतांशी मंगलोर कडून गोव्यात आलेली आहेत, आणि त्यांच्याही घरात (कोकणस्थांप्रमाणेच), मासेच काय कांदा लसूण सुद्धा खाल्ला जात नाही.

सारस्वतांच्या बर्‍याच उपजाती आहेत. गोव्यातील बारदेश तालुक्यातले 'बारदेशकर'. कुडाळचे ते 'कुडाळदेशकर'. राजापूर-भालावलीचे ते 'भालावलकर'. आणि मंगलोरचे ते 'गौड सारस्वत ब्राह्मण' असं म्हटलं जात असे. आता हे भेद कमी होत आहेत, पण पूर्वी यांच्यात सुद्धा बेटी-व्यवहार होत नसे. पण एकूणच या सगळ्याना आता 'गौड सारस्वत ब्राह्मण' असं म्हटलं जातं, आणि हे सगळे सरस्वती नदीच्या काठी रहात असत म्हणून 'सारस्वत' आणि नंतर बंगालमधे राहिलेले असल्यामुळे 'गौड सारस्वत' असा समज आहे.

हे सगळेच सारस्वत वेदाध्ययन करू शकतात. गोव्यात अशा अनेक पाठशाळा आहेत. एवढंच की वेदाध्यन करणारे आणि पूजा-पौरोहित्य करणारे सारस्वत पूर्ण शाकाहारी असतात. पण मासे खाणार्‍या घरातला एखादा मुलगा पुरोहित होऊ शकतो. अर्थात तो नंतर मासे खायचं सोडून देतो. जुन्या वळणाचे सारस्वत फक्त मासे खातात, चिकन नाही!

ख्रिश्चनांबद्दल तुमची माहिती बरोबर आहे. बहुतांश ख्रिश्चनाना आपली बाटवाबाटवी पूर्वीची नावे-जाती नीट माहिती असतात, आणि त्यांच्यात लग्नसंबंध करताना या जाती कटाक्षाने पाळल्या जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्या काही 'बामण किरिस्ताव' मैत्रिणी केवळ मी उच्च जातीची असल्यामुळे इतर 'खारवी किरिस्ताव' मैत्रिणींपेक्षा मला जास्त जवळची समजत असत!

पुन्हा, माहिती रोचक आहे, पण...

"कित्येक पिढ्यांअगोदर बाटण्यापूर्वी जी कुटुंबे ब्राह्मण होती ती आजही आपली ओळख अभिमानाने 'क्याथलिक ब्राह्मण' अशी सांगतात, आणि (बहुधा साधारणतः त्याच काळात) इतर जातींतून बाटलेल्या कुटुंबांशी त्यांचा रोटी- माहीत नाही, पण बेटीव्यवहार तर निश्चित होत नाही" या बाबीच्या संदर्भात - आणि विशेषतः गोव्याच्या पार्श्वभूमीवर - 'ब्राह्मण' या शब्दाची नेमकी कोणती व्याख्या येथे लागू होते?

किंवा, थोडक्यात, "क्याथलिक ब्राह्मण" हे मूळचे नेमके कोणते "ब्राह्मण"?

किंवा, कदाचित मीच उत्तर नीट वाचलेले नसू शकेल.

त्यांच्यात लग्नसंबंध करताना या जाती कटाक्षाने पाळल्या जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्या काही 'बामण किरिस्ताव' मैत्रिणी केवळ मी उच्च जातीची असल्यामुळे इतर 'खारवी किरिस्ताव' मैत्रिणींपेक्षा मला जास्त जवळची समजत असत!

या वाक्यातील 'बामण किरिस्तांव' या उल्लेखाच्या संदर्भात, 'बामण' या शब्दाचा आपण वर दिलेला अर्थ अभिप्रेत आहे काय?

शिवाय, लग्नसंबंधांच्या बाबतीत जाती कटाक्षाने पाळल्या जाणे हे साधारणतः दोन वेगवेगळ्या कारणांस्तव होऊ शकते. एक म्हणजे रीतिरिवाजांमधील तफावती, किंवा दुसरे म्हणजे जातींसंबंधी उच्चनीचतेच्या संकल्पना. (दोहोंपैकी एक किंवा क्वचित दोन्ही.) क्याथलिक ब्राह्मणांच्या बाबतीत ब्राह्मणेतर क्याथलिकांशी बेटीव्यवहार नसण्यामागे यांपैकी नेमके कोणते कारण असावे?

"त्यांच्यात लग्नसंबंध करताना या जाती कटाक्षाने पाळल्या जातात." आणि "तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्या काही 'बामण किरिस्ताव' मैत्रिणी केवळ मी उच्च जातीची असल्यामुळे इतर 'खारवी किरिस्ताव' मैत्रिणींपेक्षा मला जास्त जवळची समजत असत" या दोन वाक्यांच्या एकत्र मांडणीतून (juxtaposition अशा अर्थी) यांपैकी दुसरे कारण या प्रक्रियेत कार्यरत होत असावे असा अर्थ मला अभिप्रेत होत आहे. यात काही तथ्य असावे काय?

पंगा's picture

4 Apr 2011 - 11:37 am | पंगा

तर सारस्वत लोकांना 'बामण' अशी संज्ञा आहे.

"बामण" ही संज्ञा क्याथलिक ब्राह्मणांकरिता आहे अशी माझी समजूत होती. मुंबईला अंधेरीजवळ चकाला सिगरेट फ्याक्टरीच्या आसपास "बामणवाडा" नावाची एक ख्रिश्चन वस्ती आहे.

शिवाय, या ठिकाणीही असा संदर्भ सापडतो. (या संदर्भाच्या विश्वासार्हतेबाबत मात्र - विकीवरील असल्यामुळे - लवणस्फटिकन्याय लावलेला आहे.)

किंवा कदाचित आपण म्हणता त्याप्रमाणे 'बामण' ही संज्ञा 'सारस्वत ब्राह्मण' अशा अर्थानेच असावी. पण मग त्या अनुषंगाने कदाचित 'क्याथलिक ब्राह्मण' हे मूळचे 'बामण' म्हणजे सारस्वत ब्राह्मण असावेत (आणि म्हणूनच धर्मांतर होऊन कित्येक पिढ्या उलटल्यानंतरसुद्धा ते स्वतःला याच संज्ञेने ओळखत असावेत) अशी शंका येते. यात काही तथ्य असावे काय?

पैसा's picture

4 Apr 2011 - 11:52 am | पैसा

निदान गोव्यातले 'कॅथॉलिक ब्राह्मण' हे बाटलेले सारस्वत ब्राह्मण आहेत. बाटलेले कुणबी हे 'ख्रिश्चन गावडे' तर बाटलेले मराठे हे 'ख्रिश्चन चाड्डे' या नावानी गोव्यात ओळखले जातात.

सगळ्या ख्रिश्चनांमधे खाण्या पिण्याच्या बाबतीत फारसा फरक नसला तरी राहणीत फरक असतोच आणि जातींच्या उच्च नीचतेच्या कल्पना गोव्यात अगदी घट्ट मूळ धरून आहेत. ख्रिश्चनांमधे 'जातीबाहेर' लग्न न होण्याचं हे दुसरं कारण जास्त महत्त्वाचं असावं असं मी आतापर्यंत पाहिलेल्या/ऐकलेल्या गोष्टींवरून वाटतं.

पंगा's picture

4 Apr 2011 - 12:06 pm | पंगा

माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर नि:संदिग्धपणे मिळाले. शिवाय इतरही बरीच रोचक माहिती मिळाली.

मनःपूर्वक आभारी आहे.

लेखमालिकेचे यापुढील भागही वाचण्यास उत्सुक आहे.

गौड सारस्वत मूळचे बंगालातले गौड प्रांतातले तिथून इथे स्थायिक झाले म्हणून गौड सारस्वत.

श्री गौडपादाचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान मानतात ते गौड सारस्वत.

टारझन's picture

4 Apr 2011 - 10:15 am | टारझन

व्वा !!

- टिम वा

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2011 - 10:21 am | llपुण्याचे पेशवेll

गोव्यातील मंदीरे खरोखरच फार फार फार सुंदर आहेत. कवळ्याची शांतादुर्गा, रामनाथी, बांदिवड्याची महालक्ष्मी, नागेशी, मंगेशी, म्हार्दोळची महालसा अशी देवस्थाने अधाशी पणे एका दिवसात फिरून आलो होतो ते आठवले. आणि वेलिंगची शांतादुर्गा, पेडण्याचा रवळनाथ पाहून यायचे राहीले याची खंत मनाला लागून राहीली.

ही सर्वसामान्यपणे केली जाणारी देवस्थानं. यात थोडीशी भर :

कोरगांवचं कमलेश्वर महारूद्र संस्थान.
केप्यातलं चंद्रेश्वर भूतनाथाचं देऊळ - हे गोव्यातल्या सर्वात उंच शिखरावर वसलेलं आहे. त्यामुळे अर्थातच अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. इथं जाऊन बरीच वर्षं झाली त्यामुळे पुसटशी आठवते त्या माहितीप्रमाणं हा धनगरांचा देव. त्यामुळे देवाला धनगराच्या रूपात नटवलं जातं. देवळाजवळच सुंदर आश्रम आहे. एकूणच सुखानुभव!
नार्व्यातला सप्तकोटेश्वर - या देवळाचा परिसर म्हणजे गोमंतकाचं वैभवच!
सांखळीजवळ हल्लीच योगेश्वरीचं देऊळ स्थापित केलं आहे! थोडंसं आडबाजूला आहे मात्र सुरेखच आहे!
हरवळ्यातलं रूद्रेश्वराचं देऊळही सुंदर आहे! खाली उतरावं लागतं. जवळच जलप्रपात आहे. आणखी एक नयनरम्य परिसर! एकदा येथल्या शिवरात्रीच्या जत्रेला उपस्थित राहण्याचा योग आला होता! झकास अनुभव!
भारतातल्या मोजक्याच ब्रह्मदेवाच्या देवळांपैकी एक गोव्यात ब्रह्मकरमळी गावात आहे. हे गाव आमचं आजोळ असल्याने लहानपणापासूनच इथे जाणं होतं! :D
शिवाय अनेक आहेतच. आठवेल तशी लिहीन नाहीतर कुणीतरी भर घालेलच.

बाकी टीम गोवाचं मनःपूर्वक अभिनंदन आणि विशेष कौतुक वाटले.. पुभाप्र!

ब्रह्मकरमळी गाव फार मस्त आहे.

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2011 - 10:04 am | प्रीत-मोहर

ब्रह्मकरमळी च आधी च नाव चांदर होत ..पणजीनजिकच्या करमळीचा ब्रह्मदेव तिथे नेला म्हणुन ती ब्रह्मकरमळी :)

बिपिनजी,

सर्वप्रथम "नूतन वर्षाभिनंदन!"

तुमच्या या गोव्याच्या टीमचा प्रकल्प खरंच स्तुत्य आहे आणि ही लेखमाला चांगलीच होईल यात शंका नाही. गोव्याचा भाषिक, सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहास समजून घेण्याची संधी या प्रकल्पाद्वारे दिल्याबद्दल 'टीम गोवा'चा अत्यंत आभारी आहे.

तुमचे प्रास्ताविकही फर्मास उतरले आहे. आता पुढल्या लेखांबद्दल खूपच उत्सुकता दाटली आहे. तेव्हा अधिक विलंब न करता करून टाका, "हरी ॐ".

पैसातै नि प्रीत-मोहोर,

हार्दिक शुभेच्छा! आता गोव्याबद्दल वाचण्यास उत्सुक.....

शिल्पा ब's picture

4 Apr 2011 - 11:50 am | शिल्पा ब

मस्त प्रस्तावना...मी अजुनही गोवा पाहीलेले नाही..भविष्यात कधी योग आलाच तर काय पहायचे, कधी पहायचे आणि काय अन कुठे खायचे ते सांगा...बाकी बीचबद्दल वगैरे मला फारशी उत्सुकता नव्हती आणि नाही.

नंदन's picture

4 Apr 2011 - 11:59 am | नंदन

प्रकल्प! पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.

बिपिनदा,
फारच छान प्रस्तावना व उत्तम उपक्रम.
पुढे वाचण्यास उत्सुक.

अभिज्ञ.

५० फक्त's picture

4 Apr 2011 - 12:28 pm | ५० फक्त

उत्तम मालिका,

बिपिनदा, पैसाताई आणि प्रिमो एका अतिशय छान लेखमालेबद्दल धन्यवाद आणि संपुर्ण लेखमालेसाठी हार्दिक शुभेच्छा.

मागच्या वर्षी दिवाळिच्या सुट्ट्यात गोव्याला आलो होतो, सगळ्यात जास्त भावलं ते शांतादुर्गेचे मंदिर, आणि बाहेर मिळणारी कमळाची फुलं.

भन्नाट कल्पना. टीम गोवाचे अनेक आभार.
मालिका उत्तम रंगणार हे नक्कीच.
वाचनखुण साठवली आहे.
(अजुन गोवा न पाहिलेला) गणा.

श्रावण मोडक's picture

4 Apr 2011 - 2:36 pm | श्रावण मोडक

चांगला, भरीव उपक्रम.
या संस्थळाचे सक्रिय सदस्य बौद्धीक बद्धकोष्ठी किंवा अतिसाराने ग्रस्त नाहीत याचा आणखी वेगळा पुरावा लागू नये.

सुनील's picture

4 Apr 2011 - 5:32 pm | सुनील

फादर थॉमस स्टीवन हा गोव्याचा नव्हे. मूळचा ब्रिटिश. गोव्यात स्थायिक झालेला. ख्रिस्तपुराण मराठी आणि कोंकणी दोन्ही भाषांतून लिहिले. (तोवर इंग्लंड प्रॉटेस्टंट झाले नव्हते).

गोव्यातील किरिस्ताव राजकारण्यांपैकी विल्फ्रेड डिसूजा आणि फ्रांसिस्को सार्डिन्हा हे "बामण" तर चर्चिल आलेमाओ हा बहुजन समाजातील (बहुधा गावडा).

कोंकणी-मराठी वादाने पुढे क्रिस्ती-हिंदू असा धार्मिक रंग जरी घेतला असला तरी, प्रखर कोंकणीवादाची सुरुवात शणै गोयंबाब (वामन रघुनाथ वर्दे-वालावलीकार) यांनी केली. आयुष्यभर पार्ल्यात राहणार्‍या गोयंबाबानी चुकुनही मराठी शब्द तोंडातून काढला नाही!

तीच परंपरा (थोड्याफार फरकाने) रविंद्र केळेकार (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते) आणि उदय भेंब्रे (राजकारणी आणि सुनापरांत ह्या कोंकणी दैनिकाचे चालक-संपादक) यांनी चालवली.

१९६७ साली गोव्यात मतदान घेतले गेले - महाराष्ट्रात विलीन व्हायचे की स्वतंत्र रहायचे - गोव्याने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर लगोलग झालेल्या निवडणूकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवून दिले! तेही तब्बल पंधरा वर्षे, सलग!

वेळेअभावी तूर्तास इतकेच. टीम गोवाकडून खूप अपेक्षा!

पंगा's picture

4 Apr 2011 - 8:16 pm | पंगा

कोंकणी-मराठी वादाने पुढे क्रिस्ती-हिंदू असा धार्मिक रंग जरी घेतला असला तरी, प्रखर कोंकणीवादाची सुरुवात शणै गोयंबाब (वामन रघुनाथ वर्दे-वालावलीकार) यांनी केली. आयुष्यभर पार्ल्यात राहणार्‍या गोयंबाबानी चुकुनही मराठी शब्द तोंडातून काढला नाही!

'काळ बदलला' एवढेच निरीक्षण या निमित्ताने नोंदवू इच्छितो.

(अतिअवांतर:

शणै गोयंबाब

यावरून आठवले: शणै-शेणई-शेणॉय-शेणवी हे सर्व शब्द साधारणतः एकाच जातकुळीतले, नाही का?)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 5:57 pm | llपुण्याचे पेशवेll

फादर थॉमस स्टीवन हा गोव्याचा नव्हे. मूळचा ब्रिटिश. गोव्यात स्थायिक झालेला. ख्रिस्तपुराण मराठी आणि कोंकणी दोन्ही भाषांतून लिहिले. (तोवर इंग्लंड प्रॉटेस्टंट झाले नव्हते).

याबाबत महत्वाचे एक मत 'महाराष्ट्र सारस्वत' (मराठी साहीत्य या अर्थाने सारस्वत ब्राम्हणांशी याचा संबंध नाही) या ग्रंथात वि.ल. भाव्यांनी मांडलेले आहे. त्यातल्या क्रिस्तपुराण बद्द्ल त्यांनी म्हटले आहे की "एकूण भारतातील लोकांचा देवभोळेपणा, भजन कीर्तनार रमण्याची आवड, पुराणकथा ऐकण्याची प्रचंड आवड हे सारे बघून चर्चेसनी मुद्दाम असे ग्रंथ लिहून घेतले असावेत. अन्यथा फादर स्टीफन्ससारखा जाणत्या वयात धर्मप्रचाराचे शिक्षण घेऊन भारतात येऊन इथली भाषा इतकी चांगली आत्मसात करेल हे केवळ अशक्यच वाटते. स्टिफन्सने भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवून नंतर स्थानिक कविंकडून हे लिहवून घेतले असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याकाळात असे 'व्यावसायिक' कविदेखील पुष्कळ होते. अर्थात असे काव्य लिहवून घेऊन मग त्याला स्वतःच्या नावाने सादर करणे तेव्हाच्या धर्मप्रचाराच्या दृष्टीने साहजिक आणि अत्यंत उपयोगीही होते. "

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2011 - 6:16 pm | प्रीत-मोहर

स्थानिक लोक धर्मांतरानंतर हिंदु दैवतांना भजु शकत नसत. व त्यांना येशु ख्रिस्ताला भजण्याची सक्ती असे. पण त्याला भजणे म्हंजे नक्की काय करावे?हिंदु धर्मात प्रार्थनेचे अनेक मार्ग आहेत.मग त्या ओव्या,अभंग असो वा कथावाचन असोत वा भजन कीर्तन असो. आम्हास असे साहित्य द्या . ह्या मागणीवरुन त्याने ख्रिस्तपुराण रचवुन घेतले असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते...

डिटेल्स उद्या पर्वा देते

विनायक प्रभू's picture

4 Apr 2011 - 5:41 pm | विनायक प्रभू

आठवड्यापुर्वी नागेशी ला गेलो होतो.
गेल्या चार वर्षातगोव्यात बदल होत आहेत.
असो.
तो एक मोठा लेख होइल.
गाडीत भेटलेल्या एक गोयंकारा चे दु:ख
"पणजीचो मेयर गुजराती रे पात्रांव"

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2011 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच उपक्रम आहे.

सुंदर लेखन आणि रोचक प्रतिक्रीया.

रामदास's picture

4 Apr 2011 - 6:02 pm | रामदास

टिम गोवाचे अभिनंदन.

चित्रा's picture

4 Apr 2011 - 6:08 pm | चित्रा

खूप छान प्रकल्प. मुख्यत्वे हे आवडले की बिका, प्रीतमोहर, आणि पैसा तिघांनी एकत्र येऊन हा प्रकल्प करायचे ठरवले आहे. आणि टीम गोवा हे नावही आवडले! हे खूपच छान झाले.

आता प्रकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत आणि या पहिल्याच भागाने मने जिंकली आहेत हे स्पष्टच दिसते आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

आळश्यांचा राजा's picture

5 Apr 2011 - 8:16 pm | आळश्यांचा राजा

अगदी असेच म्हणतो.

आयडिया अतिशय आवडली आहे. अपेक्षा वाढलेल्या आहेत!

टीम गोवा चे कौतुक वाटले.
छान लेखन.
पुढील लेखाची वाट पाहते आहे.

अत्युत्तम!

बिपीन्दा प्रीम्मो अन पैसा अभिनंदन. एकाच लेखात एव्हढी काही माहिती मिळाली तर पैसा अन प्रीमो या अस्सल गोयकरनी तर काय काय आणतील या कल्पनेनच अतिशय आनंद झाला.

पुष्करिणी's picture

4 Apr 2011 - 8:28 pm | पुष्करिणी

अत्यंत छान उपक्रम, पुढील लेखांबद्दल खूप उत्सुकता आहे, प्रतिक्षेत.

टीम गोव्याचे मनःपूर्वक आभार.

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 8:51 pm | धमाल मुलगा

येणार येणार करत गाजलेला हा प्रकल्प आलाच तर गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून!

उत्तम.

वाट पाहतो आहेच.

-धम्याबाब.

विलासराव's picture

5 Apr 2011 - 12:03 am | विलासराव

सुंदर लेखन आणी नावीण्यपुर्ण माहीती मिळतेय.
मी १९९० ला प्रथमच गोव्याला १० दिवसासाठी गेलो होतो. कारण 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा!
१९९७-२००१ सलग पाच वर्ष गोव्याला जायला मिळालं. दोन कारणांमुळे. १- प्यायचा छंद आनी दुसरे माझे तिघे मित्र गोव्यात होते. दोघे जेटीओ पैकी एक बांबुर्लीला रहायला , त्याचे ऑफीस होते अल्टीनो टेलीफोन एक्स्चेंज. दुसर्या मित्राचं ऑफीस होतं कलंगुट बीच जवळचं टेलीफोन एक्स्चेंज. तिकडे जवळच तो रहायचा. तिसरा मित्र मड्गावला रहायचा.
मी दिवा-मडगाव पॅसेंजरने जायचो. सकाळी ६ ला निघाली की संध्याकाळी ६ ला मडगाव. ति़कीट ६७ रुपये असं काहीसं होतं. रहायची सोय होती त्यामुळे ८-१० दिवस रहायचो .पहील्या वेळेस उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा अशा टूर घेतल्या. नंतर स्वतःच बसने फिरायचो. मनसोक्त प्यायची आन बीचवर डुंबायचं. गोवा हे एकच असं ठीकाण आहे जिथे मी परत परत गेलो.
तुमचा लेख वाचला आनी रहावलं नाही म्हणुन हा अवांतर प्रतिसाद.
पण तरीही तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे.
धन्यवाद टीम गोवा.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2011 - 1:05 am | पिवळा डांबिस

हार्दिक शुभेच्छा!!
लेखनाबरोबरच गोव्यातल्या ठिकाणांचे हल्लीचे फोटो वर्णनासकट टाकले तर अधिक मजा येईल. शक्य असेल तर सूचनेचा विचार व्हावा...
-पिडांबामण

प्रियाली's picture

5 Apr 2011 - 1:11 am | प्रियाली

पुढला भाग येऊ द्या!

मी आतापर्यंत गोव्याला किंवा कोकणात कधीच गेलो नाही.
गोव्याबद्दल मित्रांकडून खूप ऐकलं आहे. चित्रपटातून थोडंफार पाहिलं आहे. गोव्याबद्दल मनात एक आकर्षण आहे, परंतू अजून जायला जमलेले नाही. आता तुमच्या लेखणीतून गोव्याची अजून चांगली ओळख होणार ह्याबद्दल नक्कीच उत्सूक आहे.
जमल्यास भाग लवकर लवकर आणि सचित्र टाकता आले तर बघा.

आनंदयात्री's picture

5 Apr 2011 - 2:34 am | आनंदयात्री

छान. पहिला लेख आवडला. टिम गोवा मोठ्ठी व्हावी, तुम्ही तिघे तसेच इतर गोमंतक मिपाकरांनी देखील टिम गोवासाठी भरभरुन लिहावे अशी शांतादुर्गेचरणी प्रार्थना.

सखी's picture

5 Apr 2011 - 9:42 pm | सखी

छान. पहिला लेख आवडला. टिम गोवा मोठ्ठी व्हावी, तुम्ही तिघे तसेच इतर गोमंतक मिपाकरांनी देखील टिम गोवासाठी भरभरुन लिहावे अशी शांतादुर्गेचरणी प्रार्थना. -- हेच म्हणते

नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणांची माहीती मिळेल असे वाटतेय, सचित्र माहीती आली तर दुधात साखरच. तसेच मिपाकरांनी गोव्याची ट्रिप केली तर तुम्हा तिघांपैकी कोणाकडे उतरायचे तेही कळवा, हॉटलेपेक्षा घरचा पाहुणचार कधीही चांगलाच. :)
;)

पंगा's picture

5 Apr 2011 - 9:53 pm | पंगा

लेखमाला आतापर्यंत उत्तम चाललेली आहे. बरेच पोटेन्शियलही आहे, त्यामुळे अर्थातच अपेक्षा खूप आहेत. त्यामुळे ती यशस्वी व्हावी, त्यातून काहीतरी चांगले यावे याबद्दल शुभेच्छा आहेतच.

पण...

टिम गोवा मोठ्ठी व्हावी

हे पटले नाही.

माझ्या मते 'टीम' सध्या आहे तशीच उत्तम आहे. कदाचित एखाददुसर्‍या जाणत्या मेंबराने वाढ इथवर ठीक राहू शकेलही, पण खूप मोठ्ठी वगैरे झाली तर सुसूत्रता न राहण्याची, दिशा भरकटण्याची, कदाचित विसंवाद होण्याची शक्यता निर्माण होते. लेखमालेच्या यशासाठी 'टीम' खूप मोठ्ठी न होणेच हितावह राहील, असे वाटते.

बाकी चालू द्या.

आनंदयात्री's picture

6 Apr 2011 - 9:27 pm | आनंदयात्री

बरोबर आहे तुमचे, मान्य.

(अवांतरः ओक्के !! बिकाशेट, पंगाशेटला नका देउ अ‍ॅडमिशन टिम गोवात ;) )

पंगा's picture

6 Apr 2011 - 9:34 pm | पंगा

मी कधी बरे म्हटले "मला घ्या" म्हणून?

शहराजाद's picture

5 Apr 2011 - 7:36 am | शहराजाद

व्वा! पुढील भागाची वाट बघत आहे.
टीम गोवा नाव आवडलं.

शक्य झाल्यास उपक्रमात भाग घेता येईल का?

मनराव's picture

5 Apr 2011 - 4:47 pm | मनराव

मस्त.... !!! येऊ देत अजुन....

सविता००१'s picture

6 Apr 2011 - 1:55 pm | सविता००१

खूप उत्सुक आहे पुढील भाग वाचण्यास.

वहिनी's picture

6 Apr 2011 - 2:51 pm | वहिनी

मस्त मस्त मस्त ?

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 8:26 am | पक्का इडियट

मस्त लेखन.

मन१'s picture

12 Apr 2011 - 6:06 pm | मन१

अप्रतिम, अत्युकृष्ट!

वाचतो आहे.

--मनोबा.

प्राजु's picture

13 Apr 2011 - 2:17 am | प्राजु

टीम गोवा! जिंदाबाद!

जयंत कुलकर्णी's picture

4 May 2011 - 9:17 pm | जयंत कुलकर्णी

प्रिया टीम गोवा,

पहिल्यांदा हे आत्तापर्यंत वाचले कसे नाही असे वाटून वाईट वाटले. गोवा म्हणजे बीर, मासे, चर्च, इत्याई.... असे वाटणार्‍या अनेक लोकांनी ही लेखमालिका जरूर वाचावी. मी तर माझ्या सर्व मित्रांना गोव्याला जायच्या अगोदर ही लेखमालिका वाचावीच असा आग्रह धरणार आहे. ज्या ठिकाणी जायचे त्याच्याशी एकरुप होऊन ती जागा बघणे फारच अविस्मरणीय असते.... मी हंपीला गेलो होतो तेव्हा असाच त्याचा पूर्ण आभ्यास करून गेलो होतो... त्या अनुभवावरून सांगतोय.

आपण एक चांगली लेखमालिका लिहीत आहात यासाठी आपले अभिनंदन....
आणि अर्थातच धन्यवाद !

सुनील's picture

4 May 2011 - 9:36 pm | सुनील

सोमवारच्या (२ मे) च्या हेरल्डच्या अंकात (गोव्यातून प्रकाशित होणारे दैनिक) प्रख्यात कोंकणीवादी उदय भेंब्रे यांचा लेख वाचावा.

विषय वेगळा आहे पण, गोव्यात मराठी रुजण्यास पोर्तुगीजच कारणीभूत ठरले आणि परिणामस्वरूप हिंदू गोवेकर मराठीच्या कसे जवळ आले, हे दिसून येईल.

(पोर्तुगिझांनी कोंकणी शिक्षणावर बंदी आणली. त्यांनंतर शिक्षणासाठी ख्रिस्ती मंडळींनी पोर्तुगिझ तर हिंदूंनी मराठी जवळ केली . जर पोर्तुगिझांनी कोंकणीवर बंदी आणली नसती तर, चित्र कदाचित वेगळे दिसले असते का, असा प्रश्न पडतो!)

उपेक्षित's picture

22 Apr 2017 - 5:52 pm | उपेक्षित

अतिशय सुंदर लेखमाला नवीन सदस्यांसाठी वर काढत आहे...

गेले २/३ दिवस परत गुंगून गेलो होतो या निराळ्या गोव्यामध्ये.

तेजस आठवले's picture

22 Apr 2017 - 7:56 pm | तेजस आठवले

गोव्यात जायचा चांगला काळ कोणता? मला देवळे बघण्यासाठी गोव्याला जायचे आहे. मंगेशी, शांतादुर्गा, महालसा हे मुख्य. चर्चेस लहान असताना बघितली आहेत त्यामुळे त्यात एवढा रस नाही. मुख्य म्हणजे शुद्ध शाकाहारी असल्याने ही ट्रिप नक्की कशी प्लॅन करावी हे समजत नाहीये. खायचे प्यायचे हाल होऊ नये ही इच्छा आहे.

पैसा's picture

22 Apr 2017 - 10:09 pm | पैसा

@उपेक्षित, धन्यवाद!
@तेजस आठवले, सध्या खूप उन्हाळा आहे. समुद्रकिनार्‍यावर वारा असतो. पण खारट पाण्यामुळे जास्त चिकट वाटत रहाते. डिसेंबरमधे गोव्यात यायला चांगले वातावरण असते. पण तेव्हा गर्दी जास्त असते.

कधीही आलात तरी शाकाहारी जेवणार्‍यांना काही प्रॉब्लेम नाही.

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2017 - 8:47 am | प्रीत-मोहर

+१
देवळं कधीही बघु शकता. तुम्ही कोणत्या भागात रहायचा विचार करत असाल त्यावर तुम्हाला त्या भागातली शुद्ध शाकाहारी ठिकाणं सुचवता येतील.

गोव्यात शाकाहारी मिळत नाही हा एक गैरसमज आहे. बिनधास्त जावा! हॉटेल्स ना शोधता रेंट होम्स शोधा स्वस्त मध्ये ट्रिप होते व सामान कमी बाळगा.

उपेक्षित's picture

25 Apr 2017 - 6:17 pm | उपेक्षित

जल्ला मेला जागूताईच्या माशाच्या रेशिप्या बगून बगून शाकाहार सोडून वषाट चालू कराव का ? या विचारात असलेला एक उपेक्षित :)