आमचे गोंय - भाग ३ - पोर्तुगिज (राजकिय आक्रमण)

टीम गोवा's picture
टीम गोवा in जनातलं, मनातलं
25 Apr 2011 - 3:13 pm

***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा

***

पोर्तुगिजांचा गोव्यात शिरकाव


व्हाश्कु द गामा (आंतरजालावरून साभार)

युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८). व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला. कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहून तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबारच्या हिंदुंना घेउन गेला, (आता तिकडे नेलं म्हणजे त्यांना ख्रिस्ती बनवणं हे तर ओघाने आलंच) आणि मग परत पाठवुन दिले. (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती.) तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजं / गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.


व्हाश्कु द गामाचे जहाज (आंतरजालावरून साभार)

इ. स. १५०३ च्या ६ एप्रिलला पोर्तुगालच्या राजाने, अल्फान्सो दे आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फे तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ्रांसिस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्याला तशी योग्य भूमी मिळत नव्हती.

ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हणजे हिंदु स्त्रिया व मुसलमान पुरुष यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर. भटकळ, होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागात त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्तानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दशः पाळला. जवळ जवळ दहा हजाराहून अधिक नायट्यांना ठार मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर साम्राज्याला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी वेर्णेच्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले. पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत. तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय पण विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होईल व आपण सुभेदार बनू अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती कारण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले.

पण झाले भलतेच.

--------------

गोवा जिंकल्यानंतर


अफोंसो द आल्बुकर्क (आंतरजालावरून साभार)

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे, जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटवाबाटवी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष छळ वगैरे सगळं राजरोस सुरू झालं. १ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झालं नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिनचा होता. दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे दोन प्रयत्न इ. स. १५१६ व इ. स. १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे तीन महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजांना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इ. स. १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता.

याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

संस्कृतीइतिहाससमाजप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

25 Apr 2011 - 3:40 pm | पियुशा

सुन्दर लेखमाला :)
पु.ले.शु.

बराच मोठा होता. त्याचा ब्याक अपही घेतला नव्हता. उणीतरी तो परत आणायला मदत करेल का?
गूगल कॅश मधुन मिळेल का?

सुनील's picture

1 May 2011 - 5:37 pm | सुनील

केवळ तुमचाच नव्हे तर, सगळेच (जवळपास १५-१६) प्रतिसाद उडालेले दिसत आहेत.

आनंदयात्री's picture

1 May 2011 - 7:03 pm | आनंदयात्री

छे छे. माझ्या मते तांत्रिक सुधारणा चालु असल्याने हे घडत असावे, थोडक्यात हा प्रॉब्लेम तात्पुरता असावा.

सुनील's picture

25 Apr 2011 - 4:25 pm | सुनील

लेखमाला उत्तम होत आहे.

तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.
येशूचा शिष्य सेंट थॉमस इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळात आला होता असे मानले जाते. केरळातील सिरियन ख्रिश्चन हे तेव्हापासूनच ख्रिस्ती झाले आहेत.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे दोन प्रयत्न इ. स. १५१६ व इ. स. १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे तीन महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजांना द्यावे लागले
पैकी फोंड्याबद्द्लची माहिती खरी नसावी. फोंडा पोर्तुगिझांनी १७९१ साली जिंकून घेतला, असे मानले जाते.

टिम गोवा, एका छान लेखमालेचा छान पण छोटासा भाग. पुलेशु.

प्रदीप's picture

25 Apr 2011 - 8:22 pm | प्रदीप

माहितीपूर्ण लेखमाला. वाचतोय.

प्रियाली's picture

25 Apr 2011 - 8:53 pm | प्रियाली

लेखमाला चांगली होतेच आहे. रोचक आहे.

व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला.

वास्को द गामा हा खलाशी होता तर बाटवाबाटवी वगैरे करण्याचे आदेश त्याला होते काय? बहुधा असावेत. सोबत तो धर्मोपदेशक वगैरेही घेऊन आला होता अशी काही माहिती मिळते का? तसेच त्याच्या मार्गात त्याने कुठले छोटे देश लुटले, लुटालूट केली याची अधिक माहिती आहे का?

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हणजे हिंदु स्त्रिया व मुसलमान पुरुष यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर. भटकळ, होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागात त्यांचे वास्तव्य असे.

यांच्या टोळ्या/टोळी होती का? त्यांचा प्रमुख/ राजा असा कुणी होता का? राज्य होते का? की भटके होते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला तो "रास्त्यांचे पेठे झाले" त्याप्रमाणे "काट्यांचे नायटे होणे [काट्याचा नायटा होणे]" हा वाक्प्रचार या नायट्यांवरून तर नाही पडला? ;) असो. नायटे या शब्दाला काही अर्थ आहे का असा खरा प्रश्न आहे.

दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

ओल्ड गोवा चर्च ही वास्तु नव्याने बांधण्यात आली की मंदिर/ मशिद पाडून? या चर्चबद्दल भारी आख्यायिका ऐकल्या होत्या. :प

पैसा's picture

27 Apr 2011 - 12:29 am | पैसा

वास्को द गामा १४९७ आणि १५०२ साली भारताच्या सफरीवर आला होता. पहिल्या सफरीत त्याच्याबरोबर ४ जहाजे आणि १७० खलाशी होते, तर दुसर्‍या सफरीत १५ जहाजे आणि ८०० खलाशी होते. प्रत्येक जहाजावर एक धर्मोपदेशक असायचा.

भारतात येताना त्याने पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍यावरच्या मोझांबिकसारख्या लहान देशांकडे दृष्टी वळवली होती. पहिल्या सफरीवरून झामोरिन राजाने परत पाठवताच व्हास्को द गामा याने काही नायर आणि मुक्कवा कोळ्यांना पकडून आपल्याबरोबर परत नेले.

दुसर्‍या सफरीवर जेव्हा व्हास्को द गामा भारतात कालिकतला पोचल तेव्हा त्याने कालिकतवर तोफगोळ्यांचा वर्षाव केला. अरबांच्या जहाजांकडे त्याचं विशेष लक्ष होतं, याची २ कारणे म्हणजे धर्मप्रसार आणि व्यापार दोन्ही ठिकाणी त्याची स्पर्धा अरबांशी होती. या सफरीत त्याने मक्केला जाणार्‍या ४०० मुस्लिमांना (त्यात ५० स्त्रिया होत्या) एका जहाजावर कोंडले आणि त्यांचं सगळं जडजवाहिर, सोने नाणे काढून घेऊन जहाजासकट त्या मुस्लिमांना भस्मसात केलं. जहाज जळत असताना व्हास्को द गामा स्त्रियांचा आक्रोश पहात होता. ही क्रौर्याची परिसीमा होती. व्हास्को द गामा तिसर्‍यांदा गव्हर्नर म्हणून इ.स. १५२४ मध्ये भारतात आला, पण तेव्हा त्याचा मृत्यु झाला.

नायट्यांबद्दल लिहायचं तर ते मुस्लिम बाप आणि हिंदू आया यांची संतती. 'नायटे' हा शब्द 'नवायत' वरून आलेला आहे. होन्नावर भटकळ भागात त्यांची वस्ती सुरुवातीला होती. अरब देशातून येणारे घोडे हे नायटे लोक मधल्या मधे घेऊन मुस्लिम सताधीशांना विकत. त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्याचा करही बुडत असे, आणि त्याना अरबी घोडे मिळत नसत. उलट त्यांच्या शत्रूना अरबी घोडे आयतेच मिळत. याला कंटाळून विजयनगरच्या मांडलिक होन्नावरच्या राजाने नायट्यांविरुद्ध शस्त्र उपसताच ते तिथून पळून इ.स. १४७९ मध्ये मलिक हुसेनच्या नेतृत्त्वाखाली गोव्यात जाऊन राहिले, कारण तेव्हा गोव्यात बहामनी सत्ता होती. गोव्यात येताच त्यानी त्यांचे घोडे विकत घेणे-विकणे निर्वेधपणे सुरू केले तसेच मुस्लिम सत्ताधार्‍यांच्या आशीर्वादाने हिंदूना जमेल तितका त्रास द्यायलाही सुरुवात केली. मांडवी नदीच्या किनारी, आताच्या ओल्ड गोवा इथे एळा गावात त्यांची वसाहत होती.

दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

ओल्ड गोवा इथे Se Cathedral, Church of St Francis of Assisi, Church of St. Cajetan, Church of St. Augustine, Chapel of St. Catherine इ. लहान मोठी १३ चर्चेस आहेत. इथे उल्लेख केलेलं चर्च म्हणजे Chapel of St. Catherine. हे तुलनेने एक लहान चर्च आहे, आणि सध्या वापरात नाही.

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2011 - 12:00 am | पिवळा डांबिस

लेखमाला चांगली पुढे जाते आहे...
एक स्पष्टीकरण...
अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८).
माझ्या माहितीप्रमाणे भारताचे पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांचे भारताबरोबर व्यापारी संबंध अगोदरपासूनच होते. पण ते खुश्कीच्या मार्गाने होते. पण तुर्कांनी पुढे इस्तंबूलवर (कॉन्टंटिनोपल) कबजा मिळवल्यानंतर युरोपीय व्यापार्‍यांना खुष्कीच्या मार्गाने दळणवळण करणे अडचणीचे जाऊ लागले. त्यामुळे भारताकडे जाण्यासाठी तुर्कांचा ताबा नसलेल दुसरी वाट शोधणे निकडीचे होऊन बसले. त्यातून पोर्तुगाल आणि स्पेन हे देश आरमारी कलेत त्याकाळी अत्यंत प्रगत असल्यामुळे ही वाट समुद्रमार्गे असेल तर उत्तम, कारण मग युरोपीय देशांना त्यावर कंट्रोल ठेवता येईल असाही विचार त्यामागे होता. त्याप्रमाणे वास्को द गामा पोर्तुगालहून निघाला आणि कालिकतला येऊन पोहोचला. आणि स्पेनहून कोलंबस निघाला पण तो अमेरिकेला जाऊन पोहोचला!!:)

वरील विवेचन हे या लेखावर टीकात्मक नसून वाचकास संपूर्ण माहिती मिळावी आणि ही लेखमाला परिपूर्ण बनावी ह्याच उद्देशाने दिलेले आहे. तरी चूभूद्याघ्या...

सुनील's picture

26 Apr 2011 - 1:38 am | सुनील

माझ्या माहितीप्रमाणे भारताचे पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांचे भारताबरोबर व्यापारी संबंध अगोदरपासूनच होते. पण ते खुश्कीच्या मार्गाने होते.
ह्यात खुश्कीचा मार्ग फारच थोडा होता. व्यापारी मार्ग साधारणतः असा - भूमध्य सागर - नाईल नदी - इजिप्त मध्ये जमीनीवरून लाल समुद्र - अरेबियन सागर - भारताचा पश्चिम किनारा. सोपारे, कल्याण आणि चौल ही त्याकाळातील गजबजलेली बंदरे होती.

इथेच ब्रिटीशांनी १९ व्या शतकात सुवेझ कालवा बांधला.

बाकी पूर्ण खुश्कीचा मार्ग होता तो म्हणजे रेशीम मार्ग पण त्याचा पश्चिम किनार्‍याशी संबंध नाही.

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2011 - 3:21 am | पिवळा डांबिस

माझा संदर्भ हा आशियातून युरोपात प्रवेश करण्यासाठी ज्या इतंबूल शहरातून जमीनमार्गे जावं लागत असे त्या सदरहू जमीनमार्गाशी होता. सिल्क राऊटशी नव्हे आणि इस्तंबूल शहराच्या आधीच्या वा नंतरच्या मार्गाशीही नव्हे.
माझं मुख्य प्रतिपादन युरोपीयनांच्या व्यापारी मार्गावरचं महत्वाचं ठाणं शत्रूच्या ताब्यात गेल्यावर नवा मार्ग शोधण्याची निकड पडली हे आहे.
तरीही खुश्की या शब्दाचा काटा खूप टोचून जीवन मुश्कील करत असल्यास तो उपटून टाकण्यास माझी हरकत नाही...
:)

असेच लिहित रहा.. मनापासुन वाचत आहे ....

शहराजाद's picture

27 Apr 2011 - 9:27 am | शहराजाद

असेच ओघवते लेख आणखी लवकर येऊद्या.

वाचते आहे. खूप नव्या गोष्टी समजताहेत तर काही जुन्या गोष्टी पुन्हा नव्यानेच समोर येत आहेत.
:)

मन१'s picture

30 Apr 2011 - 4:48 pm | मन१

पण गोव्याबद्दल वाचताना एक गोष्ट नेहमीच बुचकळ्यात टाकते.
तिथं जबरदस्तीनं धर्मांतर केल जायचं ना? म्हणजे एक पाव टाकला विहिरित की आख्खं गाव बाटलं वगैरे.
मग सगळाच्या सगळा गोवा ख्रिश्चन कसा झाला नाही? म्हणजे, १००% जनता (किंवा बहुसंख्या) कशी काय बाटवली गेली नाही. कितीही नाही म्हटलं तरी त्या भागावर त्यांची घट्ट पकड साडे तीनशे वर्षे तरी होतीच.(आगमनाची काही वर्षे सोडली तर.) इतक्या वर्षात जगभरातले इतर कित्येक देशच्या देश, लाखो करोडोंच्या संख्येनं धर्मांतरित झालेत.
साडे तीनशे वर्षे होउनही गोव्यात पोर्तुगीज्-पूर्व राहणीमान दिसतं, ते का?कसं?

वेर्णेचे सरदेसाई ह्यांचा उल्लेख केलात, ते कोण होते? स्वतंत्र (छोटसं का असेना) असं राज्य असणारे सत्ताधीश की मुस्लिम किंवा विजयनगरचे मांडलिक?
शिवाजी-संभाजी आणि पेशवेकालीन इतिहास वाचताना ह्यांचा थेट असा राजकिय उल्लेख कुठेच दिसला नाही, तो कसा? त्यांची सत्ता केव्हा लोप पावली?(जशी कदंबांच्या सत्तेला उतरती कळा यादवी आक्रमणानंतर लागली, व ती संपली ते तुघलकाच्या काळात.)
एक भर घालु इच्छितो:-
तिमोजाच्या निमित्तानं पोर्तुगीजांशी विजयनगरने प्रथमच हात मिळ्वणी केली असेल, पण त्यानंतर मात्र विजयनगर- पोर्तुगीज संबंध सलोख्याचेच राहिलेले दिसतात.
त्याचं मुख्य कारण व्यापार असाव. तुम्ही म्हणता तसे सागरी व्यापारातुन अनेकानेक गोष्टी पोर्तुगीजांनी विजयनगरला उपलब्ध करुन दिल्या, पुरवल्या.(अरबी घोडे, लांब तलवारी, नौकायाने वगैरे).
अगदि महत्वाची गोष्ट म्हणजे पोर्तुगीजांनी त्या काळात विजयनगरला बंदूक व तोफा उपलब्ध करुन दिल्या असं वाटतं.
(भारतात तोफांचा वापर प्रथमच बाबराने १५२७ला पानिपतच्या पहिल्या लढाईत केला असं मानतात. अगदि त्याच सुमारास.) पण हे खात्रीशीर सांगण्याइतका संदर्भ आत्त्ता हाताशी नाही. नंतर आल्यास इथेच अपडेत करेन.

एक शंका :- पोर्तुगीज व सिद्दी ह्यंचे संबंध कसे होते? दोघे अगदिच जवळच्या भागात (अलिबाग्-मुरुड जंजिरा ते गोव्यापर्यंतची किनारपट्टी) एकाच काळात होते, वृत्तीने आक्रमक होते असं दिसतं.दोघांनाही पश्चिम किनारा हवा होता. त्यांच्यात कधी झगडे झाले नाहित का? ह्या लेखात कधी त्यांचे उल्लेख कसे दिसले नाहित?

बाकी, पोर्तुगीज खरच इतके भयानक असतील तर छत्रपती, संभाजी ह्यांनी केलेल्या तुफानी हल्ल्यांनीं तरी ह्या परकियांचं कार्यक्षेत्र मर्यादित करुन किती मोठे उपकार महाराष्ट्रावर केलेत हे ध्यानात येतं.

--मनोबा

पंगा's picture

1 May 2011 - 11:07 am | पंगा

तिथं जबरदस्तीनं धर्मांतर केल जायचं ना? म्हणजे एक पाव टाकला विहिरित की आख्खं गाव बाटलं वगैरे.
मग सगळाच्या सगळा गोवा ख्रिश्चन कसा झाला नाही? म्हणजे, १००% जनता (किंवा बहुसंख्या) कशी काय बाटवली गेली नाही. कितीही नाही म्हटलं तरी त्या भागावर त्यांची घट्ट पकड साडे तीनशे वर्षे तरी होतीच.(आगमनाची काही वर्षे सोडली तर.) इतक्या वर्षात जगभरातले इतर कित्येक देशच्या देश, लाखो करोडोंच्या संख्येनं धर्मांतरित झालेत.
साडे तीनशे वर्षे होउनही गोव्यात पोर्तुगीज्-पूर्व राहणीमान दिसतं, ते का?कसं?

तसेच बघायला गेले तर इतर समकालीन युरोपीय सत्तांनी हिंदुस्थानात पाय ठेवण्याआधी हिंदुस्थानाच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पोर्तुगीजांची घट्ट पकड होतीच की! गेला बाजार साष्टी, वसई आणि (इंग्लंडच्या राजाला आंदण देईपर्यंत) मुंबई परिसरात पोर्तुगीजांचा थेट अंमल किंवा किमानपक्षी प्रभाव बर्‍यापैकी होता, नाही का?

याही भागांत धर्मांतरे अर्थातच झाली, परंतु १००% जनता काही बाटवली गेली नाही. (विकीवर चटकन केलेल्या शोधाशोधीत सापडलेल्या सनावळींवरून मुंबईवर पोर्तुगीज अंमल सव्वाशे वर्षांहून अधिक काळ, तर वसईवर जवळजवळ दोनशे वर्षे असल्याची अटकळ बांधता येते.)

आख्ख्या मुंबई शहरात या काळात असूनअसून किती विहिरी असतील?

बाकी, पोर्तुगीज खरच इतके भयानक असतील तर छत्रपती, संभाजी ह्यांनी केलेल्या तुफानी हल्ल्यांनीं तरी ह्या परकियांचं कार्यक्षेत्र मर्यादित करुन किती मोठे उपकार महाराष्ट्रावर केलेत हे ध्यानात येतं.

अशाच प्रकारे, इंग्लंडच्या तत्कालीन राजाने हुंडा घेऊन मुंबईकरांच्या समस्त पुढच्या पिढ्यांवर किती उपकार केलेत याची मोजदाद करता येणार नाही. हुंडाविरोधी चळवळवाले कृपया दखल घेतील काय?

नितिन थत्ते's picture

1 May 2011 - 12:58 pm | नितिन थत्ते

>>इंग्लंडच्या तत्कालीन राजाने हुंडा घेऊन मुंबईकरांच्या समस्त पुढच्या पिढ्यांवर किती उपकार केलेत याची मोजदाद करता येणार नाही.

त्याचप्रमाणे मुंबई बेट हुंड्यात देऊन ख्रिश्चन धर्माचे जे अपरिमित नुकसान केले त्याबद्दल "अंतिम निवाड्याच्या दिवशी" राजकुमारी कॅथरीन दा ब्रागान्झा हिचे वडील चौथे जॉन यांना जाब द्यावा लागेल.

पंगा's picture

4 May 2011 - 6:24 pm | पंगा

१ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!!

शक्यता क्रमांक १: १ एप्रिल १५१२... कदाचित हा थेट राजावर खेळलेला 'एप्रिल फूल'चा विनोद असू शकेल काय?

'ऑपरेशन विजय'च्या काही दिवस अगोदरची एक वदंता१ ऐकलेली आहे. भारतीय सैन्याचे तुलनात्मक संख्याबळ आणि शस्त्रास्त्रसज्जता लक्षात घेता, भारतीय सैन्यासमोर आपला टिकाव लागणे शक्य नाही, हे तोवर गोव्यातील पोर्तुगीज लष्करी अधिकार्‍यांना पक्के कळून चुकले होते. पण गोव्याचा२ (शेवटचा) पोर्तुगीज गवर्नर जनरल मानुएल आंतोनियो वासालो ए सिल्वा३ यास खास पोर्तुगीज हुकूमशहा आंतोनियो द ऑलिवेरा सालाझार४सायबाकडून आदेश होता की गोवे कमीतकमी आठ दिवस लढवावे, (गोव्यातील सर्व पोर्तुगीज मनुष्यबळाची कत्तल झाली तरी हरकत नाही, पण) कोणत्याही परिस्थितीत 'शत्रू'ला शरण जाऊ नये, आणि वेळ पडली तर गोवे स्वतः उद्ध्वस्त करावे पण 'शत्रू'च्या हातात पडू देऊ नये. (मा. आं. वासालो ए सिल्वाने तो आदेश न पाळण्याचे ठरवले ही गोष्ट वेगळी.)

आता गोवे लढवायचे म्हटले, तर गोव्यातील पोर्तुगीज सुरक्षादळांचे संख्याबळ तर पुरेसे नव्हतेच, पण शस्त्रास्त्रांची, दारुगोळ्याची परिस्थितीही दयनीय होती. अशा परिस्थितीत, बाकी काही नाही तरी निदान पुरेसा दारुगोळा तरी जवळ असावा, म्हणून गोव्यातील पोर्तुगीज लष्करी अधिकार्‍यांनी लिस्बोआंकडे दारुगोळ्याची मागणी करणारा कूटसंदेश पाठवला. आणि 'कूटसंदेश' म्हटल्यावर सरळसरळ 'बाँब पाठवा' असे न म्हणता 'सॉसेजे पाठवा' असा संदेश पाठवला.

आणि काय आश्चर्य! गोव्याचा पाडाव अगदी तोंडावर आलेला असताना संदेशाच्या उत्तरार्थ लिस्बोआंवरून रसद घेऊन येणारे एक विमान गोव्यात येऊन उतरले. त्यात पोर्तुगालमधील उत्तमोत्तम सॉसेजांचा पुरवठा होता५.

सारांश, पोर्तुगीजांना विनोदबुद्धी असावी.

दुसरी शक्यता: कदाचित हे (जास्त झालेल्या) फेणीच्या अमलाखाली लिहिलेले असू शकेल, अशी अटकळ बांधता यावी काय?

पत्रातील संबंधित वाक्याअगोदर 'सायबा, हांव सांगतां तुका' अशी प्रस्तावना, आणि संबंधित वाक्यानंतर 'पात्रांव, दे टाळी' असा काही उल्लेख संबंधित पत्रात आढळतो किंवा कसे, याबद्दल काही खात्रीलायक माहिती आहे काय?

अन्यथा, 'कोठल्यातरी मूठभर गोंयकारांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला' या बातमीत - आणि त्यातही त्यांच्या जातीपातींच्या तपशिलांत - थेट पोर्तुगालच्या राजाला वैयक्तिक रस असावा हे गमतीदार वाटते.

तळटीपा:

१ 'वदंता' म्हटल्यावर तीत तथ्य आहे की नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर तपासून पहावे.

२ खरे तर पोर्तुगीज़ हिंदुस्थानाचा किंवा 'एस्तादो दा इंदिया पोर्तुगेज़ा'चा गवर्नर जनरल.

३ वास्तविक, गोव्याचा शेवटचा पोर्तुगीज गवर्नर जनरल जो कोणी होता, त्याच्या नावाने या वदंतेत काहीही फरक पडू नये. मग तो मानुएल आंतोनियो वासालो ए सिल्वा असो, की पाउलो बेनार्द ग्वेदेस असो, की अफोंसो द अल्बुकर्क असो. तसेही ही वदंता वाचून झाल्यावर हे नाव कोणाच्या लक्षात रहावे, ही अपेक्षा नाही, किंवा त्यावर परीक्षाही घेतली जाणार नाही. पण (मूळ लेखातून प्रेरणा घेऊन, आणि) 'जेथेतेथे नावे फेकल्याने - खास करून फिरंगी पूर्ण नावे मूळ उच्चारास शक्य तितकी अनुसरून फेकल्याने - कथेला भारदस्तपणा येतो' या तत्त्वास अनुसरून हे नाव 'फॉर वॉटेवर इट इज़ वर्थ' तत्त्वावर फेकण्यात आलेले आहे. (वरील २मधील 'एस्तादो दा इंदिया पोर्तुगेज़ा'च्या उल्लेखाबद्दलही हेच. तसेच, प्रतिक्रियेत लिस्बनचा उल्लेख कटाक्षाने 'लिस्बोआं' असा केलेला आहे, हेही चाणाक्षांच्या नजरेतून सुटू नये.)

४ वरील ३करिताची टीप पहावी.

५ आधी सांगितल्याप्रमाणे, ही वदंता आहे. अन्यथा, सॉसेजे पाठवण्यामागचे 'अधिकृत कारण' हे विनोदबुद्धी अथवा खवचटपणा नसून काही वेगळे - काही खरोखरीची अडचण - असल्याचे कळते.

प्रीत-मोहर's picture

4 May 2011 - 10:54 pm | प्रीत-मोहर

पंगासाहेब पोर्तुगालच्या राजाची पत्रे अजुनही सरकारकडे आहेत व ती पत्रे व मिळालेले सगळे कागदपत्र यावरुन गोवा सरकारने एक पुस्तक प्रकाशित केले होते. आज हे पुस्तक दुर्मिळ पुस्तकांच्या श्रेणीत आहे. मिळाल्यास पहा.

पुस्तकाचे नावः गोवा, दमण, दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास.

आंसमा शख्स's picture

19 Jun 2011 - 4:36 am | आंसमा शख्स

गोव्यातील इन्क्विझिशन हा भयंकर भाग होता.
त्यात तुम्ही हिंदुंवर काय अत्याचार झाले हे घेतले आहे. पण हा इन्क्विझिशन चा एक भाग झाला.
एक लक्षात घ्या हे इन्क्विझिशन फक्त हिंदुंविरुद्ध नव्हते. यात इस्लामी लोकांवरही मोठे अत्याचार केले गेले आहेत. हिंदु लोकांची मोजदाद तरी राहिली. या इन्क्विझिशन चे ध्येय इस्लाम धर्मीयांना ख्रिस्ती करणे हे ही होते. मुसलमानांचे तर नामोनिशाण मिटवले गेले. आणि ते जर परत मुसलमान झाले किंवा आपल्या नातेवाईकात परत गेले तर तर त्यांच्यावर अत्याचार केले जात असत.
यात (संत?)फ्रांसिस झेवियर हा भामटा लुटारू पुढे होता. त्याच्या सैतानी कृत्यांनी गोव्याचा विध्वंस झाला.
खुदा करो आणि असे लोक परत येथे कधी न येवोत.

इन्क्विझिशनच्या पूर्वीच म्हणजे पोर्तुगीजानी गोव्यात पाय ठेवला तेव्हा सुरुवातीला मुस्लिमांचा संपूर्ण विनाश केला. आदिलशहाच्या राजवाड्यात इन्क्विझिशनचं कार्यालय सुरू केलं. त्यातून जे मूठभर मुस्लिम वाचले ते फोंडा, आणि कारवारच्या दिशेने पळाले. आणि मुस्लिमांचं शिरकाण होताच पोर्तुगीजानी आपली वक्रदृष्टी हिंदूंकडे वळवली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2011 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेख मालिका.

-दिलीप बिरुटे

आळश्यांचा राजा's picture

19 Jun 2011 - 8:50 pm | आळश्यांचा राजा

"काट्याचा नायटा झाला" याचा अर्थ आज समजला. मी नायट्याला रोग समजत होतो.