***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
कोंकणी भाषा – इतिहास आणि आज
गोव्यात आल्यानंतर अगदी ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे बोलली जाणारी गोड काहीशी सानुनासिक कोंकणी भाषा. १९९२ साली तिला राजभाषेचा दर्जा मिळाला. पण ती मराठीला इतकी जवळची आहे की अजूनही कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे की नाही यावरून वाद होतात. खरं पाहता, मराठी ज्याला कळते त्याला जरा सावकाश बोललेली कोंकणी कळते. आपण सर्वांनीच मुंबई आकाशवाणीवरील 'कोंकणीतल्यान खोबरों' कधीतरी ऐकल्या असतीलच. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यात महाराष्ट्रात विलीनीकरण आणि त्याच्या अनुषंगाने कोकणीचा स्वतंत्र चर्चा याबद्दल जोरात चर्चा सुरू झाल्या. यावरून हिंसक आंदोलनं सुद्धा झाली पण शेवटी १९७५ साली साहित्य अकादमीने कोंकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला. आणि नंतर १९८७ साली गोव्यात कोंकणीला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला.
कोकणी ही इंडो युरोपियन समूहातली इंडो आर्यन भाषा आहे. मराठी आणि कादोडी या तिच्या अगदी जवळच्या भाषा आहेत. मालवणी आणि कुडुंबी या भाषा सुद्धा कोंकणीच्याच गटात वर्गीकृत केल्या जातात. 'कोंकण' हे नाव कोकणे या आदिवासींवरून या प्रदेशाला मिळालं असावं असा अंदाज आहे. आता हे आदिवासी नासिक, डांग ठाणे या प्रदेशात मुख्यत्वेकरून आढळतात, पण प्राचीन काळात त्यांची वस्ती रत्नागिरीच्या आसपास होती असं म्हणतात. त्यांच्या भाषेचं कोंकणीशी काही साधर्म्य दिसतं. संस्कृत आधी वापरात आली की प्राकृत याबद्दल वाद आहेत, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण प्राकृत ही मराठी आणि कोंकणी दोन्हीची जननी अहे अस एक समज आहे. परंतु, कोंकणीत काही शब्द संस्कृतमधून थेट आलेले आजही वापरात आहेत, ते मराठीत फार प्रचलित नाहीत, जसे की, 'उदक' म्हणजे पाणी 'हांव' म्हणजे मी हा तर सरळ अहम ला जवळचा आहे. आपय (आव्हय) म्हणजे बोलाव, रांध म्हणजे शिजव वगैरे.
संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा इ.स. २०० ते ४०० च्या आसपास कोकणात रहात असलेल्या लोकांच्या भाषा होत्या. पैकी संस्कृत ही पूर्णपणे नियमानी बांधलेली, तर प्राकृत ही सगळ्या लोकांच्या बोलण्यात असलेली. प्राकृतच्या अनेक उपशाखा होत्या. यातल्या शौरसेनी प्राकृत आणि महाराष्ट्री प्राकृत या दोन्हींचा कोंकणीवर खूप प्रभाव दिसून येतो. इ.स. ८७५ च्या आसपास महाराष्ट्रात महाराष्ट्री वापरात होती, या महाराष्ट्री प्राकृतमधून अपभ्रंश भाषा उदयाला आली. तिच्यात कोंकणीची काही बीजं दडलेली आहेत. सातवाहनांचं साम्राज्य गोव्यातही होतं हे लक्षात घेतलं तर प्राकृतमधून कोंकणीचा विकास झाला असावा असं मानण्याला जागा आहे. कारण सातवाहनांचा सर्व कारभार 'महाराष्ट्री मधून चालत असे. प्राकृत भाषेत लिहिलेल्या 'गाथा सप्तशती' मधे 'ण' चा वापर सढळ हस्ते होतो. गाथा सप्तशतीमधली णई म्हणजे नदी कोंकणीत येते ती न्हई होऊन. कोंकणीत नऊ ला "णव" म्हणतात आणि 'ण' या अक्षरापासून सुरू होणारे शब्द इतर कोणत्या भाषेत जवळ जवळ नाहीतच! शौरसेनीचा कोंकणीवरचा प्रभाव 'दांडो' 'सुणो' अशा 'ओ'कारान्त शब्दातून दिसून येतो, याच कारणाने म्हणजे शौरसेनीच्या प्रभावामुळे गुजराती आणि बंगाली भाषांमधे असे 'ओ'कारान्त शब्द सापडतात.
महाराष्ट्री मधून मराठी आणि कोंकणी भाषा वेगवेगळ्या विकसित झाल्या असाव्यात, मराठी आणि कोंकणीमधे लक्षात येण्यासारखा ठळक फरक म्हणजे “मी येतो” आणि “मी येते” या दोन्हीसाठी कोँकणीत आहे “हांव येतां”. भूतकाळ आणि भविष्यकाळाची रूपे करताना मात्र “आयलो/आयले” आणि “येतलो/येतले” हे दोन्ही भाषांत सारखंच आहे. काही ठिकाणी 'आसा' म्हणजे 'आहे' याचा उच्चार 'आहा' असा करतात. यावरून मराठी आणि कोंकणीत किती थोडा फरक आहे हे लक्षात यावे. पण या दोन्हीं भाषांच्या मधला दुवा म्हणजे 'पैशाचिक प्राकृत'. गोव्यात कोंकणी भाषेत उपलब्ध असलेलं पहिलं लिखाण म्हणजे 'कृष्णदास शामा' याने १५ व्या शतकात लिहिलेले गद्य महाभारत आणि रामायण. यांची भाषा खूपशी पैशाचिक प्राकृतला जवळची आहे असं वि. का. राजवाडे यांनी म्हटलं आहे. ही पुस्तके पोर्तुगालमधे संग्रहालयात आहेत असे म्हणतात, पण त्या भाषेचा नमुना सध्या उपलब्ध नाही. आजच्या काळातली मालवणी बोली सुद्धा मराठी आणि कोंकणी यांच्या अधेमधे कुठेतरी येते. चक्रधरस्वामींनी आपल्या शिष्यांना उपदेश केला, "कर्नाटकदेशी न वचावे" हे 'वच' म्हणजे 'जाणे' कोकणीत जसेच्या तसे आहे.
ज्ञानेश्वरांनी आपल्या रचना 'अमृतानुभव' आणि ज्ञानेश्वरी' प्राकृतात केल्या असं म्हटलं जातं. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दोन्हीत कोकणीला जवळचे अनेक शब्द आहेत. त्यांची उदाहरणं इथे देण्याचा मोह आवरत नाही. 'नेणों' म्हणजे "माहिती नाही", बाईल म्हणजे स्री, राति म्हणजे रात्र, दिवो म्हणजे दिवा, नीद म्हणजे झोप, मसी म्हणजे शाई, सोयरिक म्हणजे नातं, आणि असेच कितीतरी शब्द! 'निदेचे जाउपे' ही शब्दयोजना म्हणजे निद्रेचे अपत्य, अर्थात अशा तर्हेची शब्दयोजना कोकणीत आजही आहे, ती 'करप म्हणजे करणे, 'खावप' म्हणजे खाणे इ. ज्ञानेश्वरीत शब्दांची 'ठावो' 'दिवो" अशी 'ओ'करान्त रूपे येतात ती तशीच्या तशी आजच्या कोंकणीतही वापरात आहेत. किंबहुना कोंकणी नीट बोलता यायला लागली त्यानंतरच ज्ञानेश्वरीचा अर्थ सोपेपणाने समजायला लागलाय.
काळाबरोबर गोव्यातले राज्यकर्ते बदलत गेले तसे, कोंकणी भाषेत आणखी अनेक शब्दांची भर पडत गेली. शेतीशी संबंधित शब्द गोव्यातल्या मूळ रहिवाशांच्या बोलीतून कोंकणीत आले, जसे की, कुमेरी, मेर, खाजण. तसंच तांदूळ, नाल्ल (नारळ) ढोल इ. शब्दांचा उगम द्रविड लोकांकडे आहे. इतिहासात कधीतरी सुमेरियन लोक कोंकणात आले असावेत असा एक कयास आहे. कोंकणीतले काही शब्द सुमेरियन भाषेतून आलेले आहेत असे श्री अनंत शेणवी धुमे यांचे म्हणणे आहे. मूळ कर्नाटकातल्या कदंबांचं गोव्यावर राज्य होतं, तेव्हा काही कन्नड शब्द कोंकणी भाषेत येणं अपरिहार्यच होतं! जसे भांगर म्हणजे सोनं, तांती म्हणजे अंडे, मॉड म्हणजे ढग. तसेच अरब व्यापार्यांनी आपल्याबरोबर दुकान, जवाब. कबूल, चाबूक असे शब्द आणले ते मराठीतही त्याच अर्थाने वापरले जातात. पोर्तुगीज भाषेतले अनेक शब्द कोंकणीत सामावून गेले, जसे, जनेल म्हणजे खिडकी, कदेल म्हणजे खुर्ची, आलमारी म्हणजे कपाट, कोपेल म्हणजे चॅपेल, पाव म्हणजे पाव वगैरे.
पोर्तुगीजांच्या स्थानिक भाषा नाहीशा करण्याच्या धोरणामुळे कोंकणीत असलेलं प्राचीन साहित्य नाहीसं झालं. पोर्तुगीजांच्या अमदानीत संस्कृत, मराठी किंवा कोंकणी पुस्तक जवळ बाळगणं हा गुन्हा समजला जात असे, आणि जी पुस्तकं जप्त होत ती पोर्तुगीजानी नष्ट करून टाकली. आजही गोव्यातले अनेक लोक पंढरीची वारी करतात, पूर्वीही करत असत, त्यामुळे मराठी संतसाहित्य मौखिक स्वरूपात गोव्यात जिवंत राहिलं. कृष्णदास शामाची कोंकणी कृती 'महाभारत' पोर्तुगालमधल्या एका संग्रहालयात राहिली त्यामुळे त्याचं नाव तरी राहिलं. मराठी आरत्या ज्याच्या नावावर प्रसिद्ध आहेत तो 'विष्णुदास नामा' याच्या नावावर काही कोंकणी रचना आहेत. पोर्तुगीज काळात कोंकणी ही फक्त बोलीभाषा राहिल्यामुळे कोंकणीला स्वतःची अशी लिपी विकसित करता आली नाही. कदंबांच्या काळात 'गोंयकानडी' नावाची एक लिपी वापरात होती, आता ती अस्तित्त्वात नाही. साधारणपणे देवनागरी ही नंतरच्या काळात कोंकणीची लिपी म्हणून प्रामुख्याने वापरली गेली. काही पोर्तुगीजानी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कोंकणी भाषा शिकून घेतली. मग फादर स्टीव्हन्स याने कोकणी व्याकरणाची आणि कोंकणी भाषेवरच्या ग्रंथाची रचना रोमन लिपीत लिहिलेल्या कोंकणीत केली. १६२२ साली प्रकाशित झलेलं हे पहिलं कोंकणी भाषेतील पुस्तक. सध्या कर्नाटकाच्या किनारी भागात कोंकणी लिहायला कानडी लिपी वापरली जाते तर केरळच्या किनारी भागात मल्याळम लिपी. अगदी थोड्या प्रमाणात अरेबिक लिपीही कोंकणीसाठी वापरली जाते.
पोर्तुगीजांच्या अत्याचारांनंतर २० व्या शतकाच्या सुरुवातीला कोंकणीभाषिकांची अस्मिता जागृत झाली. कोंकणी भाषेच्या संवर्धनासाठी मोठं कार्य केलं ते शणै गोंयबाब अर्थात वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर (१८७७-१९४६) यानी. त्यानी कोंकणीच्या संदर्भात मुंबईत राहून फार मोठं कार्य केलं पण त्याचा पाया मराठीचा द्वेष हा होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि आयुष्य मुंबईत गेलं पण त्यानी आयुष्यात कधी एकही मराठी शब्द उच्चारला नाही असं म्हणतात. त्यांच्या नावावर २९ कोंकणी पुस्तकं जमा आहेत. कोंकणी भाषेच्या संदर्भात आणखी मोठं कार्य करणारे लेखक म्हणजे माधव मंजुनाथ शानभाग यानी कारवारला राहून आपलं कार्य चालवलं. यानी १९३९ साली कारवार इथे पहिली अखिल भारतीय कोंकणी परिषद भरवली. शब्दप्रभू बा. भ. बोरकर म्हणजे बाकीबाब यानी आपल्या काही कविता कोंकणी भाषेत लिहिल्या आहेत. ‘सासय’ या कोंकणी कवितासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. हल्लीच्या काळात मनोहरराय सरदेसाय, शंकर रामाणी, नागेश करमली, जे बी मोराईस इत्यादीनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती कोंकणीत केली आहे पण यावर कळस चढवला तो रवीन्द्र केळेकराना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने.
१९६१ साली पोर्तुगीजांच्या पराभवानंतर गोवा हे स्वतंत्र राज्य ठेवावं का या प्रश्नावरून आणि भाषेच्या प्रश्नावरून खूप राळ उडाली. १९६६-६७ आणि १९८६ मधे भाषिक दंगलीही झाल्या. पैकी १९८६ ची दंगल राजभाषेच्या प्रश्नावरून झाली होती. शेवटी राजभाषा म्हणून कोंकणी आणि मराठीला समान दर्जा अशी तोड निघाली. राज्यव्यवहाराची भाषा म्हणून कोंकणी कधीच फार वापरात आली नाही. या पार्श्वभूमीवर अज कोंकणी कुठे उभी आहे? २००१ च्या जनगणनेमधे गोव्याची लोकसंख्या सुमारे १३.४८ लाख होती. यापैकी गोव्यात ७.७० लाख लोकांची मातृभाषा कोंकणी म्हणून नोंदली गेली तर ३.०४ लाख लोकांची मातृभाषा मराठी नोंदली गेली. कोंकणी भाषा बोलणारे ७.६८ लाख लोक कर्नाटकात होते तर ६.५८ लाख महाराष्ट्रात. याचाच अर्थ हा की कोंकणी मातृभाषा असणारे लोक गोव्यापेक्षा इतरत्रच जास्त आहेत! कोंकणी भाषेची चळवळ खरं तर कर्नाटकातून जास्त प्रमाणात चालवली गेली. केरळच्या किनारपट्टीवरही सुमारे ६१००० लोकांची मातृभाषा कोंकणी आहे. गमतीची गोष्ट ही की या जनगणनेमधे भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ०.२४% लोकांची मातृभाषा कोंकणी होती तर सिंधी ०.२५% आणि नेपाळी ०.२८%
पूर्वापार, म्हणजे पोर्तुगीज अमदानीतच गोव्यात मराठी भाषेतल्या शाळा सुरू झाल्या होत्या. या शाळानी गोव्यात भारतीय संस्कृती टिकवायला मोठा हातभार लावला. स्वातंत्र्यानंतर या शाळांना सरकारी अनुदाने सुरू झाली. काही शाळा अनुदान मिळवण्यासाठी नावापुरत्या कोंकणी भाषेच्या माध्यमात सुरू झाल्या. प्रत्यक्षात त्यांचं काम इंग्लिशमधूनच चालत असे. गोव्यातल्या याआधीच्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या एका गटाने इंग्लिश माध्यमाच्या शाळाना अनुदान देण्यासाठी सरकारवर दबाव आणला. पण त्याबरोबर सरकारने असा निर्णय घेतला की नवीन शाळाना अनुदान देणार नाही, तर आता आहेत याच शाळातील मुलांच्या पालकांनी आपल्याला कोणतं माध्यम पाहिजे ते लिहून द्यावं. जी भाषा १० पेक्षा कमी पालक एखाद्या वर्गासाठी मागतील, ती भाषा बंद करण्यात येईल.
यानंतर भाषिक सार्वमताच्या वेळी झाली तशी मोठी रणधुमाळी उडाली. तत्कालीन सरकारचं म्हणणं असं होतं की सर्व पालकांना फक्त इंग्रजीच माध्यम म्हणून हवं आहे. एका धार्मिक संस्थेच्या एकूण १७७ शाळांपैकी सर्व शाळांमधे इंग्रजी माध्यम म्हणून लिहून द्यावं असं फर्मान काढण्यात आलं. प्रत्यक्ष आकडे जेव्हा आले, तेव्हा असं लक्षात आलं की इंग्रजी माध्यम म्हणून एकूण २९५५७ पालकांनी मागितलं, मराठी ३१७५९, तर कोंकणी फक्त २५०२!! कन्नड माध्यम मागणार्यांची संख्या कोंकणी मागणार्यांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ३००० होती. सरकारच्या या निर्णयाची अम्मलबजावणी झाली तर कोकणी भाषेवर दूरगामी परिणाम होतील हे सांगायला कोणी तज्ञ नको. आधीच्या सरकारने या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्यामुळे आताचे पर्रीकर सरकार पेचात सापडले आहे कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान बंद केले तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा आहे.
गोव्यात रोजच्या वापराची भाषा मुख्यतः कोंकणी आहे, पण मराठी भाषिकही पूर्वापार आहेत. आता त्यात कन्नड, आणि मल्याळम तसंच हिंदी भाषिकांची मोठी भर पडत आहे. याला कारण म्हणजे गोव्यात रेल्वेबरोबर मोठ्या प्रमाणात येणारे कामगारांचे आणि बेकारांचे लोंढे. त्यातून राजकारण्यानी आपल्या स्वार्थासाठी या सर्व विस्थापिताना गोव्यात रहाणारे म्हणून सामावून घेतलंय. याबद्दल कोणाचा विरोध नाही पण या सगळ्या प्रकारात गोव्यातल्या स्थानिक संस्कृतीचं रूप धूसर होत चाललंय. बरं कोंकणी माणूस कमालीचा सहिष्णु. तो सगळ्यांनाच आपल्यासारखे समजतो. आताच बाजारात, बसमध्ये, सगळीकडे सर्रास हिंदी वापरली जाते. २०२० साली गोव्यात भूमीपुत्र अल्पसंख्य असतील असा अंदाज आहे. त्यामुळेच कोंकणी भाषेचं भविष्य खूपच खडतर दिसतंय. मराठी मातृभाषा म्हणणारे सुमारे ७ कोटी लोक असताना मराठीची दुरवस्था झाली असं आपण म्हणत असतो. तिथे जेमेतेम २५ लाख लोक बोलतात त्या लहानसा जीव असणार्या कोंकणीने कोणाच्या तोंडाकडे पहावं?
क्रमशः
**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )
प्रतिक्रिया
18 Feb 2013 - 10:11 am | प्रचेतस
कोकणी भाषेचा घेतलेला आढावा अतिशय सुरेख मांडलाय.
या निमित्ताने मालवणी, चित्पावनी आणि कोकणी भाषेतील फरकांबद्दल अधिक माहिती मिळाल्यास उत्तम.
18 Feb 2013 - 10:29 am | पैसा
यशोधरा कोंकणी आणि मालवणी यांत प्रवीण आहे तर प्रीतमोहर कोंकणी आणि चित्पावनी यांमधे. चित्पावनीबद्दल माहिती करून घ्यायला मलाही आवडेल. ही बोली मुख्यतः गोव्यातल्या चित्पावन कोकणस्थ मंडळींच्या बोलण्यात जिवंत राहिली आहे. परंतु ती कोंकणीची थेट बोली नसावी. तर मालवणीसारखी मराठी आणि कोंकणीच्या अधेमधे कुठेतरी येणारी एक वेगळी बोली असावी.
18 Feb 2013 - 11:44 am | बॅटमॅन
एक शंका. चित्पावन ऊर्फ कोकणस्थ ही जमात गोव्यात आहे? मला तर वाटायचं त्यांचं आद्य वसतिस्थान रत्नांग्री, अन वरचेखालचे १-२ जिल्हे. गोव्यात ते गौडसारस्वतच जास्त आहेत ना? की मी म्हणतोय ते चूक आहे?
18 Feb 2013 - 11:50 am | प्रचेतस
तुझ्या प्रतिसादातच त्याचं उत्तर आहे की रे.
आद्य वसतीस्थान रत्नागिरी-चिपळूण परिसर मानला जातो.
चित्पावन मंडळी नंतर सगळीकडे पसरली. पेशवेकाळात तर बरेच चित्पावन पुण्यात स्थलांतर करते झाले.
18 Feb 2013 - 12:00 pm | बॅटमॅन
ते आहे रे, मी काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांकडून ऐकलं होतं की सौथ ऑफ सावंतवाडी, देअर आर इन जण्रल नो चित्पावन्स बट जीएसबीज. म्हणून विचारलं.
18 Feb 2013 - 12:00 pm | पैसा
गोव्यात, फार काय कर्नाटकातही कोकणस्थ जमात फार थोड्या प्रमाणात आहे. गोव्यात पैंगिणी येथे परशुरामाचे देऊळ आहे. परशुरामाची पूजा बहुतांश कोकणस्थ करतात. गोव्यात गौड सारस्वत समाज मोठ्या प्रमाणात आहे खरे. पण गोव्यातील गौड सारस्वत हे पौरोहित्य फारसे करताना दिसत नाहीत. कोकणस्थ, कर्हाडे आणि पद्ये ब्राह्मण गोव्यात पौरोहित्याचे काम करतात. तसेच मूळ गोव्यातले पण नंतर मंगलोरकडे स्थलांतर केलेले गौड सारस्वत मात्र पौरोहित्याचे काम करतात.
18 Feb 2013 - 12:04 pm | बॅटमॅन
माहितीकरता धन्यवाद. आता कन्फ्यूजन क्लीअर झालं.
बाकी हे "पैंगिणी" पणजीपासून ८-१० किमी दूर आहे काय? की ते "बैंगणी"? अंमळ घोळ अन उत्सुकता.
कर्नाटकातले कोकणस्थ बहुतेक पटवर्धनांबरोबर पसरले असावेत असे वाट्टे . जमखंडी संस्थान तर त्यांच्याकडेच होते.
18 Feb 2013 - 12:16 pm | पैसा
पैंगिण हे काणकोण तालुक्यात आहे. पणजीपासून ५०/६० किमी असेल. मडगाव आणि कारवारच्या मधे.
18 Feb 2013 - 12:20 pm | बॅटमॅन
ओह ओके. थन्क्स फोर थे च्लरिफिचतिओन. ;)
18 Feb 2013 - 12:21 pm | राही
गोव्यातल्या चित्पावनांच्या भाषेसंबंधी आणि एकूण जगण्यासंबंधी बरेच काही ह.मो.मराठे यांच्या बालकाण्ड (आणि आणखी एक पुस्तक,नाव आठवत नाही)मध्ये पुष्कळ तपशिलाने आले आहे.यातल्या सुरुवातीच्या प्रकरणांतली संवादांची भाषा चित्पावनी आहे.मराठीहून थोडीशी वेगळी,कोंकणीहून जरा जास्त वेगळी अशी ती वाटते. महादेवशास्त्री जोशी यांच्या आत्मचरित्रातही गोव्यातल्या ब्राह्मणांच्या तत्कालीन जगण्याचे सुंदर चित्रण आहे.
18 Feb 2013 - 12:25 pm | बॅटमॅन
+१११११११११११११११.
बालकांडातली अन आत्मपुराणातली भाषा खूपच सुंदर आहे. दोन्ही पुस्तके भारीच, बालकांड फारच जास्ती करुण आहे. आत्मपुराण पण काही कमी नाही म्हणा.
18 Feb 2013 - 12:28 pm | प्रचेतस
दुसरे पुस्तक बालकाण्डचा उत्तरार्ध 'पोहरा' हे आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे बालकाण्ड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (गाव बहुधा झोळंबा) बालपणीच्या आठवणींविषयी आहे. त्यात गोव्याचा उल्लेख बहुधा नाही.
पण त्यात ह. मों. नी चित्पावनी बोलीत बरेचसे लिखाण केले आहे.
18 Feb 2013 - 4:58 pm | यशोधरा
ज्योताई, मी वाचलेल्या माहितीप्रमाणे परशुरामांनी जेह्वा ही भूमी वसवली तेह्वा गौड सारस्वत ब्राह्मणांना ह्या भूमीमध्ये गुरुगृहे वसवण्यासाठी पाचारण केले होते. तेह्वापासूनच ते गौड सारस्वत गोव्यात आहेत.
18 Feb 2013 - 5:07 pm | पैसा
गौड सारस्वत सुद्धा बाहेरून गोव्यात आले असेच ना? त्यांचे मूळ बंगाल/काश्मिर असे काहीसे वाचलेले आठवते खरे. गौड सारस्वत ही सुद्धा अध्ययन-अध्यापन करणारी जमात. पण गोव्यात त्यांच्यापैकी फार कोणी पौरोहित्य करत नाहीत. याचे कारण म्हणजे ते बहुतांशाने मासे खातात हे असावे. गोव्यातले गावडे लोक हे बहुधा इथले मूळ रहिवासी असावेत.
18 Feb 2013 - 5:25 pm | यशोधरा
तू मला टाईप करायला लावणार गं :)
प्राचीन काळी सरस्वती नदीच्या काठी राहणारे व सारस्वत मुनी, ज्यांची देवी सरस्वतीची उपासना होती त्यांना गुरुस्थानी मानणारे ते सारस्वत. गौड सारस्वत म्हणजे गौडपादाचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान मानणारे. ऋग्वेद हा त्यांचा वेद. प्राचीन काळी जरी त्यांचा व्यवहार संस्कृतमधून चालत असे, तरी त्या जोडीला ब्राह्मणी ही भाषा ते बोलत, जे संस्कृतचं सोप रुप होतं, त्यातूनच पुढे कोकणी निर्माण झाली, असं वाचलेलं आहे.
पुढे जेह्वा सरस्वतीच्या प्रदेशात दुष्काळ पडला, तेह्वा सारस्वतांनी हळूहळू स्थलांतर करण्यास सुरुवात केली. काश्मीर, बंगाल, बिहार, गोवा आणि इतरत्र कोकणामध्ये, राजस्थान, कर्नाटक, केरळ असे ते पसरले. बिहारमधूनही तिथल्या एकूणच परिस्थितीला कंटाळून तिथूनही ते पुढे अजून इतरत्र पसरले.
सारस्वतांच्या कवळे मठामध्ये बराच इतिहास वाचता येतो.
18 Feb 2013 - 5:32 pm | पैसा
कवळे मठात काय मिळतंय ते पहाते लवकरच! या ब्राह्मणी भाषेबद्दल आणखी काही वाचले आहेस का? मला खरेच हे नवीन आहे. फक्त महाराष्ट्री आणि इतर प्राकृतबद्दल वाचले आहे तेवढेच! पण विषय निघाला ते बरं झालं असं वाटतंय. नवीन माहिती मिळते आहे! खरेच धन्यवाद!
18 Feb 2013 - 5:34 pm | यशोधरा
व्य नी बघणे :)
4 Mar 2013 - 11:07 am | सुबोध खरे
ज्योती ताई,
गौड सारस्वत ब्राम्हण या बद्दल गोव्यात असताना वाचनालयात वाचलेले आठवत आहे ते असे.(दुर्दैवाने मला त्याचा संदर्भ आठवत नाही)
जी एस बी हे मूळ बंगाल मधील गौड जिल्ह्यातील(मालदा हे गाव राजधानी असलेले रेल्वे मंत्री अब्दुल घनी खान चौधरी यांचे)
(हा जिल्हा बंगाली जादू टोणा/ तंत्र मंत्र साठी प्रसिद्ध आहे म्हणून मराठीत गौड बंगाल हा शब्द रूढ झाला.)
बंगाल मध्ये सलग ११ वर्षे दुष्काळ पडला.(दुर्गादेवीचा दुष्काळ/कोप). तेंव्हा जी एस बी हे शुद्ध शाकाहारी होते. या काळात जीव जगवावा कसा असा विचार येत असता एका मूळ पुरुषाच्या स्वप्नात दुर्गादेवी आली. त्याने तिला साकडे घातले कि आई आम्ही जीव कसा जगवावा त्यावेळी दुर्गादेवीने त्यांना सांगितले कि नदी ची फळे म्हणजे मासे ते खून जीव जगवावा. म्हणून त्यांनी(बंगाल मधील ब्राम्हणांनी मासे खायला सुरुवात केली. आजही फक्त बंगाली आणि जी एस बी हेच ब्राम्हण मासे खातात.पण दुष्काळ काही संपेना त्यामुळे गौड जिल्ह्यातील जी एस बी चे मूळ पुरुष हे कुटुंब जगवण्यासाठी सरस्वती नदीच्या काठी स्थलांतरित झाले हि नदी तेंव्हा राजस्थानात होती आणि ती खंबात च्या आखातात समुद्राला मिळते.(पुढे ती लुप्त झाली) त्यामार्गाने ते नदीतून अरबी समुद्रात आणि काठाकाठाने सरकत शेवटी गोवा आणि आजूबाजूचा परिसर(महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारा )येथे आले. हा भाग दुष्काळी नव्हता आणि येथे येउन त्यांनी आपली वस्ती केली.
मूळ मासे खाणे हे त्यांनी चालू ठेवले पण मासे खाणार्या ब्राम्हणांना पौरोहित्य करण्याचा अधिकार नाही म्हणून बर्याच देवस्थानात इतर ब्राम्हण पुजारी आहेत.गौड सारस्वत ब्राम्हण यांची मूळ कुटुंबे तिसवाडी( तीस) आणि साष्टी (सहासष्ट)अशी शहाण्णव कुटुंबे आली आणि त्यांना शेणवी असे नाव आहे.(यात तथ्य किती आहे ते मला माहित नाही.)
वरिल सर्व तपशील मी माझ्या स्मरणशक्ती नुसार लिहिला आहे
4 Mar 2013 - 4:20 pm | यशोधरा
गोव्यातील देवळांमध्ये सारस्वत ब्राह्मणही आहेत पौरिहित्य करणारे. शांतादुर्गेकडे आहेत, मंगेशीकडेही आहेत.
मासे खात होते म्हणून पौरोहित्य करत नाहीत ह्या म्हणण्याला अर्थ नाही. मुळात कोकण प्रांतात पौरोहित्य करणार्यांना भट म्हणतात, ब्राह्मण वा बामण नव्हे. पौरोहित्य करणे म्हणजे भटगिरी करणे. तेह्वा कोकणस्थ, कर्हाडे वगैरेंना भट म्हणून ओळखतात.
सारस्व्त समाजात भटगिरी नाही कारण ते अध्यापनाचे काम करीत. अद्वैत धर्माचे पालन करीत आणि त्याचे अध्ययन करीत. अद्वैत तत्वज्ञानाचे अर्ध्वयू गौडपादाचार्य ह्यांचे अनुयायी म्हणून ते गौड. हे वरही कुठेतरी मी लिहिलेले आहे. मासे खात म्हणून पौरोहित्य करत नाहीत, हे अतिशय चुकीचे आहे.
4 Mar 2013 - 4:42 pm | बॅटमॅन
कृपया खुस्पट समजू नये. एक शंका आहे.
मुळात ट्रॅडिशनली बंगालातही जे पौरोहित्य करतात ते मांस-मासे खात नाहीत असे निरीक्षण आहे. त्यामुळे तसा परस्परसंबंध असणे नाकारता येत नाही. तुम्ही म्हणता तो प्रकार "भटगिरी नै तर दुसरी कामे करू" असाही असला पाहिजे कदाचित. तुम्ही म्हणता तसे असेल तर मग मच्छीखाऊ पुरोहित कुठे दिसल्यास सांगा (चोरून खाणारा नव्हे राजरोस उघडपणे ;) ), मग बरोबर म्हणता येईल, नै का?
4 Mar 2013 - 5:07 pm | यशोधरा
तुम्ही म्हणता तो प्रकार "भटगिरी नै तर दुसरी कामे करू" असाही असला पाहिजे कदाचित.> असंच असणार असं असेल तर ठीके :) माझ्या वाचनानुसार सारस्वतांना भटगिरी करण्यासाठी नव्हे तर अध्यापनासाठी आणले, तेह्वा भटगिरी नै तर.. हे जरा पटत नाही.
मुळात ह्याला अनेक फाटे फुटतील हेठाऊक होते त्यामुळे फारसे लिहायला उत्सुक नव्हते. सारस्वत पौरोहित्य करताना सापडत नाहीत, हा मुद्दा होता ना? तर त्याची कारणमीमांसा मी माझ्या वाचनानुसार दिली आहे.
अर्थात, तुम्हांला otherwise च बरोबर म्हणायचे असेल तर तसे. :)
ट्रॅडिशनल बंगाल्यातच देवीला सामिष नैवेद्यही असतो बहुधा, नाही?
4 Mar 2013 - 5:34 pm | बॅटमॅन
हरकत नाही. गोव्यातल्या सारस्वतांपुरते हे म्हणणे खरे आहे असे मानून चालू. बाकी प्रदेशांत इन जण्रल काय सीन होता, याबद्दल म्हणतोय.
सारस्वतांना मासे खात असल्याने त्यांच्या वरिजिनल प्रदेशातही भटगिरी ब्यान असेल, काय सांगता येतंय नैका. तर्क लढवतोय इतकंच.
आणि मला अदरवाईजच बरोबर म्हणायचे आहे हा शोध कुठे लागला तुम्हाला?
बाकी बंगाल्यात देवीला सामिष नैवेद्य असतो की नाही? मी तरी पाहिला नाही. पण मजा म्हंजे मुंजीला मात्र मटणाचा मेनू होता हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेय, त्या पंगतीत जेवलोसुद्धा आहे ;) पण पुरोहितांबद्दल नॉनव्हेज ब्यान असेच इन जण्रल ऐकलेय. पण कन्फर्म नाही. आमच्या एका सीनियर वंग मित्रांना विचारून सांगतो.
4 Mar 2013 - 5:40 pm | यशोधरा
बाकी बंगाल्यात देवीला सामिष नैवेद्य असतो की नाही? मी तरी पाहिला नाही.> वंग मित्राकडच्या घरचे पाहूनच सांगत आहे. :)
4 Mar 2013 - 5:43 pm | बॅटमॅन
मुंजीत मटण ठेवणारे देवीला वशाट नैवेद्य ठेवू शकतीलच :) लॉजिकल आहे.
4 Mar 2013 - 5:54 pm | यशोधरा
>>पण मजा म्हंजे मुंजीला मात्र मटणाचा मेनू होता हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेय, त्या पंगतीत जेवलोसुद्धा आहे >> म्हणजे जो द्विजत्वाचा संस्कार मानला जातो, तिथे मटणाचा मेनू होता :) मुळातच देवाकडे जाताना सामिष निषिद्ध वगैरे हे कधीतरी नंतर घुसडलेले गेलेल्या पद्धती असाव्यात, जशा इतरही काही प्रथा घुसडल्या गेल्या, जसे स्त्रियांना वेदपठणाचा अधिकार नाही, जन्मावरुन जाती व्यवस्था वगैरे. असो. ते अवांतर आता नको.
4 Mar 2013 - 4:33 pm | पैसा
यशोधराने सारस्वतांच्या मुळाबद्दल माहिती दिलेली काहीशी अशीच आहे. सरस्वती नदीच्या काठचे म्हणून ते सारस्वत. परंतु पौरोहित्य करण्याबद्दल थोडी वेगळी माहिती आहे.
18 Feb 2013 - 7:24 pm | राही
भाषेसंबंधीच्या लेखात ज्ञातिविषयक माहिती कदाचित अवांतर ठरेल पण गोवा आणि गोव्याचा इतिहास म्हटले की जी एस बींना वगळता येत नाही. मुळात गौड सारस्वत ब्राह्मण ही संज्ञा फार पुरातन नसावी. म.टा. किंवा लो.स.मध्ये अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अत्यंत माहितीपूर्ण अशा एका लेखमालेची कात्रणे मजजवळ (कुठेतरी पण नक्कीच) आहेत. त्यातील एका लेखात असे लिहिले आहे की एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात (बहुधा इं. नॅ. काँ.च्या स्थापनेनंतर)मुंबईत गौड ब्राह्मण आणि सारस्वत ब्राह्मण या दोन ज्ञातीतील धुरीण एकत्र आले आणि त्यांनी सारस्वत सदृश सर्व ज्ञातींचे एकत्रीकरण करून सर्वांनी गौड-सारस्वत ब्राह्मण हे नामाभिधान घ्यावे असा ठराव पसार केला.आपापसांत बेटीव्यवहार करण्यासही उत्तेजन दिले.
हे जर खरे असेल तर गौड सारस्वत ब्राह्मण ह्या संज्ञेचा उल्लेख १८७५ सालाच्या आधी कुठे सापडतो का ते पहावे लागेल.
अवांतरासाठी क्षमस्व.
18 Feb 2013 - 7:22 pm | यशोधरा
पण गोव्यात त्यांच्यापैकी फार कोणी पौरोहित्य करत नाहीत. याचे कारण म्हणजे ते बहुतांशाने मासे खातात हे असावे >> नाही, मासे खाण्याचा काही संबंध नाही. शांतादुर्गेकडे दुभाषी हे सारस्वत आहेतच की पौरोहित्य करणारे. मुळात पौरोहित्य हा सारस्वतांचा व्यवसाय नव्हता, आणि अध्ययन - अध्यापन हाच त्यांचा पिंड आणि त्यांच्या ज्ञान निपुणतेमुळेच परशुरामांनी त्यांना कोकणात वास्तव्य करण्यासाठी पाचारण केले.
सरस्वती नदीतीराकाठी राहताना एकदा खूप दुष्काळ पडला व ते अवर्षण बर्यापैकी लांबले व जगणे कठीण होऊ लागले तेह्वा सारस्वत मुनींनी आपल्या समुदायाला नदीमध्ये मिळणारे मासे खाऊन राहण्याची परवानगी दिली. तेह्वापासून सारस्वत मासे खातात आणि सुखाने, सुशेगात जगतात! :)
18 Feb 2013 - 7:30 pm | राही
सारस्वत, सरस्वती नदी,तिचे पाणी आटणे किंवा दुष्काळ पडणे आणि सारस्वतांनी मासे खायला सुरुवात करणे ही आख्यायिका इतिहास म्हणून लोकांच्या इतकी हाडीमासी खिळली आहे की ती केवळ आख्यायिका आहे, इतिहास नाही असे म्हणणारा माणूस वेडाच ठरायचा! नदीत पाणीच नाही तर मासे कुठून असणार!
18 Feb 2013 - 7:38 pm | यशोधरा
जे काही असेल ते राही. एक दिवसात अवर्षण वा दुष्काळ पडत नाही. सुरुवातीला सहज मिळणारं धान्य हळूहळू कमी झालं असेल, त्यानंतर मासे उपलब्ध असतील तेही कधी ना कधी संपले असतील. आज सर्व धान्याची/ मांसाची इत्यादि उपलब्धता आणि उद्या एकदम काहीच नाही, असं बहुधा होत नसावं असं आपलं मला वाटतं. ह्या परिस्थितीमुळे म्हणून तर सारस्वत लोक इतरत्र पांगले ना?
बाकी तुमचं चालू द्या. :)
18 Feb 2013 - 4:28 pm | पिशी अबोली
पैसाताई, चित्पावनीवर एक अक्खा पीएच्.डी. प्रबंध आहे वसुधा भिडेंचा. त्यांनीच यावर पुस्तकही लिहिलय एक.त्यांच्या कॉर्पसमधे गोव्यातील चित्पावनी अंतर्भूत नव्हती,पण गोव्यात चित्पावनी नक्की बोलली जाते. खास करून वाळपई भागात. याबद्दल अर्थात तुम्हीच जास्त सांगू शकाल.गोवा पिंजून काढलाय्त सगळा.. :)
18 Feb 2013 - 4:39 pm | पैसा
गोव्यात पूर्वीच्या काळी येऊन स्थायिक झालेले कोकणस्थ चित्पावनी बोलतात. मी खूप जणांकडून चित्पावनी ऐकलेलं आहे. एवढंच काय, आपली प्रीतमोहर उत्तम चित्पावनी बोलते. हल्ली कुठे उलथलीय कार्टी देवजाणे! पण ती ऑर्कुटवर चित्पावनी कम्युनिटीच्या मॉडरेटर्सपैकी एक आहे.
वसुधा भिडेंचा प्रबंध जालावर उपलब्ध आहे का?
18 Feb 2013 - 7:09 pm | राही
चित्पावनांविषयी अनेक लेखांचे एक पुस्तक मला वाटते 'चित्पावन' याच नावाखाली प्रसिद्ध झालेले आहे.(पुन्हा मला वाटते )त्याचे संपादक/संकलक पुरुषोत्तम धाक्रस असावेत. सर्व पुस्तके फार पूर्वी वाचली असल्याने संदर्भांच्या अचूकतेबद्दल खात्री नाही,माहितीच्या अचूकतेबद्दल मात्र आहे.या पुस्तकात चित्पावनी बोलीचा नमुना म्हणून एकदोन उतारे दिले आहेत. याच पुस्तकात वि.का.राजवाडे यांचाही एक लेख आहे जो आज गंमतीदार वाटतो.
18 Feb 2013 - 8:33 pm | पिशी अबोली
प्रबंध जालावर नसावा.पण पुस्तकाचं नाव शोधून सांगते. ते सहज असेल उपलब्ध.. :)
4 Mar 2013 - 10:19 am | पिशी अबोली
वसुधा भिडेंचे पुस्तक. खूपच उशिरा लिंक देतेय.पुस्तकाचं नक्की माहीत नाही कारण ते वरवर बघितलंय, पण त्यांचा प्रबंध भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून चित्पावनीबद्दल बोलतो हे नक्की(मी तो वाचून बघितलाय)
http://www.bookganga.com/eBooks/Book/5258036945380289009.htm
4 Mar 2013 - 10:23 am | पैसा
धन्यवाद! अजून एक अतिशय जुनं पुस्तक मिळालं.
http://www.new1.dli.ernet.in/ डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया यी वेबसाईटवर हजारों पुस्तके स्वॅन करून ठेवली आहेत. तिथे १८६० सालचे ना. गो चापेकर यांनी लिहिलेले चित्पावन हे पुस्तक सापडले.
chitpaavana., 5010010089205. naaraayand-a goovin'da chaapekara. 1860. marathi. Literature. 317 pgs.
4 Mar 2013 - 4:49 pm | बॅटमॅन
त्या वेबसाईटवरून पुस्तके उतरवून घेणे म्हंजे एक दिव्य आहे. एकेक पान डौन्लोड होतं, लै डोकं फिरतं. जर पूर्ण पुस्तक एका खेपेत डौन्लोड करायचे असेल, तर ही वेबसाईट पहा. एक डाउनलोडर अॅप्लिकेशन आहे. ते आपल्या कंप्यूटरवर इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केले, की मग सुरू करून त्यात त्या पुस्तकाचा बारकोड क्रमांक टाईप करा. तो वेबसाईटवर आधीच दिलेला असतो तो फक्त कॉपी करायचा.
झालं मग! हळूहळू पूर्ण पुस्तक पीडीएफमध्ये डौन्लोड होईल. कंप्यूटरवर "DLID Books" म्हणून एक फोल्डर आपोआप तयार झालेला असेल त्यात या पुस्तकाची पीडीएफ सेव्ह होईल. एकदा डाउनलोड झालं की मग एंजॉय!
4 Mar 2013 - 5:00 pm | पैसा
किती चांगला मुलगा आहेस तू!
4 Mar 2013 - 5:34 pm | बॅटमॅन
तो तं मी आहेच! धन्यवाद ओळखल्याबद्दल ;)
18 Feb 2013 - 10:19 am | अँग्री बर्ड
टिम गोवाचा अजून एक भन्नाट लेख ! कोकणी भाषा बोलायला छान वाटते, ऐकायला देखील गोड आहे. कोकणी भाषेशी संबंध येण्याचे मुख्य कारण म्हणजे रविवारी मी किरीस्ताव वाडीत फिरायला जायचो, चर्चच्या इमारतीचे आकर्षण. त्यांची प्रार्थना संपली कि आत घुसून त्यांच्या प्रार्थना पुस्तकांची पाने टरकावून घरी आणायचो. आमच्या बाजूला एक शिक्षिका होत्या त्या गोव्याला ८ वर्ष राहिल्या होत्या. काकू त्या पानांचा अर्थ उलगडून सांगायचा तो ऐकायला जाम मजा यायची. ते सानुनासिक स्वर ऐकून खिदळायचो देखील. कोकणी बोलताना शब्द समजून उपयोगी नाही, तो हेल देखील अगदी सहजगत्या उच्चारता यायला हवा. मला मालवणी झकास बोलता येते पण कोकणी नाही. :( पण कोकणी भाषांमधून बनलेल्या इतर बोलीभाषा बोलणारी संख्या देखील धरली तर ती ५० लाखाच्या वर जाईल असे वाटते.
18 Feb 2013 - 10:40 am | चावटमेला
मराठी मातृभाषा म्हणणारे सुमारे ७ कोटी लोक असताना मराठीची दुरवस्था झाली असं आपण म्हणत असतो. तिथे जेमेतेम २५ लाख लोक बोलतात त्या लहानसा जीव असणार्या कोंकणीने कोणाच्या तोंडाकडे पहावं?
खरंय. वाईट वाटलं वाचून :(
असो, लेख मात्र नेहमीप्रमाणेच छान. अशीच अजून माहिती येवूद्या.
18 Feb 2013 - 12:56 pm | सूड
पुभाप्र !!
18 Feb 2013 - 3:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
मराठी मातृभाषा म्हणणारे सुमारे ७ कोटी लोक असताना मराठीची दुरवस्था झाली असं आपण म्हणत असतो. तिथे जेमेतेम २५ लाख लोक बोलतात त्या लहानसा जीव असणार्या कोंकणीने कोणाच्या तोंडाकडे पहावं?
हे एकदम खरं आहे. सद्द्या आपल्याकडे सज्जड आर्थिक अथवा राजकीय (म्हणजे शेवटी आर्थिकच) फायदा असल्याशिवाय कोणत्याच गोष्टींबद्दल आपुलकी न वाटण्याची परिस्थिती आहे.
पुभाप्र.
18 Feb 2013 - 4:14 pm | मन१
लेखमाला उत्तम सुरु आहे.
फुरसतीत परतून अधिक शंका टंकेन.
18 Feb 2013 - 4:30 pm | पिशी अबोली
कोंकणीच्या उगमाबद्दल अभ्यासकांनी मांडलेली ही केवळ मतं आहेत. ठोस निष्कर्ष नाहीत असा उल्लेख व्हायला हरकत नसावी.
18 Feb 2013 - 4:41 pm | पैसा
किंबहुना कोणत्याही भाषेच्या उगमाबद्दल ठोस निष्कर्ष काढणे कठीणच आहे. कोंकणीला वेगळी भाषा समजायला सुरुवातच मुळी २० व्या शतकात झाली. त्यामुळे कोंकणीच्या बाबतीत तर हे फारच कठीण आहे.
18 Feb 2013 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक भाग आवडला. लेख भाषाविषयक असल्यामुळे तर सुप्पर लाईक.
गोवा टीमचे खूप खूप आभार. लेख बूकमार्क्स करुन ठेवला आहे.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2013 - 7:47 pm | प्रीत-मोहर
आबोल्या, आणि यशोताई
चित्पावनी / मराठी/ कोकणी ह्यामधे बरेच शब्द जसेच्या तसे वापरले जातात. अर्थात हे शब्द वेगळ्या वेगळ्या प्रांतात ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांच्या प्रभावातील असतात. आम्ही गोव्यात बोलतो तर आमच्या भाषेवर कोकणीचा जास्त प्रभाव आहे, तर उत्तर कन्नड जिल्ह्यात बोलल्या जाणार्या बोलीवर कन्नडचा, पण मूळ गाभा एकच :)
आज चित्पावनी रत्नागिरीत कितपत बोलली जाते हे काही ठाउक नाही, कारण आमच्या मुळ ठिकाणी चिपळुणला तरी कुणाला बोलता येत नव्हती. पण गोव्यात आणि कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कोकणस्थ ही भाषा बोलतात.
आज भारताच्या विविध राज्यात राहणारे चित्पावन ही भाषा पुनरुज्जीवीत करायचा प्रयत्न करताहेत हे खूप आनंददायी आहे.
चित्पावनी महादेवशास्त्र्यांच्या आत्मचरित्रात तसेच ह. मो. मराठे यांच्या बालकांड या पुस्तकात सापडेल. आमच्या श्रीधर फडके काकांनी चित्पावनी शिकवणारे एक पुस्तकही लिहिले आहे.
आता ही भाषा मराठी ,कोकणी ह्यांच्या मधे आहे किंवा नाही हे मी नाही सांगु शकत, पण हो दोन्ही भांषांच्या काही काही वैशिष्ट्यांना ह्या भाषेने आपलेसे केले आहे हे नक्की.
मी येतो किंवा मी येते चित्पावनीत " में येसा " बनते.
कोकणीप्रमाणेच मराठीतील दिवा चित्पावनीत दिवो बनतो.
मी येतो/ मी येते ==> हांव आयलो / हांव आयले ==> में येसां
उदाहरणार्थ तो दिवा घेउन ये हे हे वाक्य "तो दिवो घेवनी ये. " असे बनते.
मला अजुन सुचत नाहीये. सुचेल तसे लिहिते
18 Feb 2013 - 7:49 pm | यशोधरा
:)
18 Feb 2013 - 8:31 pm | पिशी अबोली
'केंकिता'. ;)
18 Feb 2013 - 8:07 pm | सुनील
18 Feb 2013 - 8:10 pm | प्रीत-मोहर
ही चित्पावनी नाहीये हो सुनीलजी.
18 Feb 2013 - 8:14 pm | सुनील
मग कुठली आहे? धड ना कोंकणी धड ना मराठी!;)
18 Feb 2013 - 8:22 pm | प्रीत-मोहर
फारतर मराठी शब्द पेरलेली कोकणी म्हणेन मी
18 Feb 2013 - 8:07 pm | प्रीत-मोहर
इथे मला मराठीच्या अजुन एका बोली भाषेचा उल्लेख करावासा वाटतोय. गोव्यात पद्ये व कर्हाडे ब्राह्मण ही बोली बोलतात ब ह्या बोलीला भटी भाषा म्हणतात.
उदा. मला समजले नाही. ==> मज समज्लें नाय
बाबा अंघोळीला गेले आहेत ==> बाबा न्हावयास/ न्हावया गेले हाय.
18 Feb 2013 - 8:27 pm | पिशी अबोली
प्रीत-मोहर,बरें केलें हां बाय तुवें येथे सांगून..खुब्ब जणां खबरच नसते ही अजुन एक बोली हाय म्हणून.. त्यांस बरी मज्जा दिसणा..तशें भटीतय खूप रस घेवपासारके हाय म्हटल्या.. :)
पद्ये बोली खूप गोड आहे.पण गोव्यातील कर्हाडे मात्र मराठीच बोलतात.किंवा अगदी जुने कर्हाडे 'कर्हाडी'बोली बोलतात. कर्हाडी जवळपास नामशेषच होत चालली आहे म्हणा..
18 Feb 2013 - 8:36 pm | यशोधरा
सामके कोकणीं उलयतानाही पळयलां हां कर्हाड्यांक.:)
18 Feb 2013 - 8:42 pm | पैसा
बघता बघता आणखी ४ बोलींची नावे आली! चित्पावनी, भटी, कर्हाडी आणि ब्राह्मणी.
18 Feb 2013 - 8:56 pm | पिशी अबोली
:)
18 Feb 2013 - 8:49 pm | पिशी अबोली
हे थोडं कठीण वाटतय पचणं..कर्हाडे आवर्जून मराठी बोलतात घरात..
यशोताई तुला भट्टप्रभूंबद्दल बोलायचय का?ते कोंकणी बोलतात अगदी अस्सल..
18 Feb 2013 - 8:54 pm | प्रीत-मोहर
जितक्या कर्हाडे ब्राह्मणांना मी ओळखते ते सगळे भटी भाषा विथ कर्हाडी वेरियेशन बोलतात. भटप्रभू मात्र कोकणी बोलतात
18 Feb 2013 - 8:56 pm | यशोधरा
नाही. आमचं पौरोहित्य करतात ते कर्हाडे आहेत. व्यवस्थित कोकणीच बोलतात घरी दारी. :) गोव्यात बर्याच देवळांमधून सहसा कर्हाडेच पौरोहित्य करतात आणि त्यांना नेहमीच कोकणी बोलताना पाहते आहे.
18 Feb 2013 - 9:02 pm | पिशी अबोली
आश्चर्य आहे. भट्टप्रभू साधारणपणे असंच सांगतात की ते कर्हाडे आहेत.एका मोठ्या ग्रुपशी आयडेन्टिफाय होणे असाही भाग असतो त्यात.असं काही नाहिये ना?काही मुख्य देवळांची नावं सांगितली तर कदाचित काय ते कळू शकेल.. :)
18 Feb 2013 - 9:12 pm | यशोधरा
नाही गं, कर्हाडेच आहेत आमचे पुरोहित. आता ह्या वेळी जाईन तेह्वा त्यांना विचारेन माहिती म्हणून. इतका घरोबा नक्कीच आहे. :)
19 Feb 2013 - 1:54 am | पिशी अबोली
नक्की:)तेवढी माहितीत भर माझ्या.. :)
18 Feb 2013 - 8:49 pm | प्रीत-मोहर
अगो तुज्या खवत लिहलें हाय. मात्शी खव बघ बघुया.
18 Feb 2013 - 8:58 pm | पिशी अबोली
:)
18 Feb 2013 - 8:19 pm | रेवती
वाचले. हा भाग समजायला जरा वेळ लागला पण आवडला. प्रतिसादही तितकेच वाचनीय आहेत.
19 Feb 2013 - 12:13 am | अभ्या..
छान आलाय हा भाग पण. बरीच माहीत नसलेली माहीती पण कळली.
ह्या सगळ्या कोंकणी तायाबायांनी गप्पा मारत मारत सुध्दा बरेच अपडेट केलेत.
20 Feb 2013 - 11:50 pm | राही
आधुनिक चित्पावनीचा एक नमुना थोडीशी शोधाशोध करून मिळाला,तो देत आहे. ही चित्पावनी मला मराठीळलेली वाटली. पन्नास-साठ वर्शांपूर्वीची भाषा आणि आजची भाषा यात फरक पडणे नैसर्गिक आहे. असो
मी तुम्हाला चित्तपावन बोलीचा एक नमुना दाखवतो.--मँ तुमला चित्तपावन भाशाचो एक नमुनो दाखयसां.
माझा मुलगा आय.टी शिकतो.--मझो बोड्यो आय टी शिकसे.
त्याला ही आमची चित्तपावनी अजिबात येत नाही.--तेला ही आमची चित्तपावनी भाशा अजिबात येत नाय.
पुढच्या मुलांना कळायला हवी म्हणून चित्तपावनी बोलीतली काही वाक्ये लिहून ठेवायला हवी.--पुढले भुरगेंना कळे हवी म्हणी चित्तपावनीत्लीं थोडींतरी वाक्यां लिवनी ठेंवें हवीं.
माझी आई चित्तपावनी भाषा चांगली बोलते.--माझी आई चित्तपावनी बरीsssबोलसे.
माझ्या बायकोलासुद्धा चित्तपावनी बोलता येते.--माझ्या बायलालासुद्धा चित्तपावनी बोले येसे.
आम्ही तिघे चित्तपावनीत बोलू लागलो की मुलगा आ वासून आमच्याकडे बघत रहातो.--आमी तिघांय चित्तपावनी बोलों लागलों की मझो बोड्यो तोंण उघडां घालनी आमचेकदे बघीतच र्हेसे.
ही भाषा ऐकायलाही गोड आणि समोरच्याला भावणारी आहे.--ही भाशा आय्केय बरी अणी पुढेंत्लेलेला आपलोसो करणारी अशी से.
ही भाषा आता कुठेतरी लोप पावत चालली आहे म्हणून हा माझा प्रपंच.--ही भाशा ऐतां केतरी नायशी होत चायलीसे असां माला दिसलां म्हणीनच माझो हो वावर.
तसे बघायला गेले तर ही भाशा कठीण नाही.थोडीशी मराठी भाषा ज्याला येत असेल त्याला ही पटकन कळेल.--तसां बगे गेले ही भाशा तितलीशी कठिण नाय.ईवळी मराठी भाशा जेंनां येत सयेल तेंनां ही भाशा रोक्डीच कळेल.
21 Feb 2013 - 12:20 am | पैसा
ही बोली मराठीला जास्त जवळची आहे. अर्थात भुरगे, रोकडीच, बरी, तितली, इवळी (इल्ली) हे कोंकणी शब्द आहेत.
दाखयसां = दाखयतां आसा, शिकसे = शिकत असे अशी मूळ रचना असावी. मधल्या अक्षराचा लोप होऊन दाखयसां, शिकसे अशी रूपे झाली असावीत. तसे पाहिले तर कोंकणी आसां हा शब्द काही लोक आहां असाही उच्चारतात. म्हणजे बोलताना स चा ह किंवा ह चा स होतो. ग्रेट! असा तंजावर मराठीचा नमुना कुठे बघायला मिळेल?
21 Feb 2013 - 12:47 am | अभ्या..
चांगली गोड आहे तर बरी म्हणता. मग बरी असेल तर काय म्हणायचे?
21 Feb 2013 - 12:59 am | पिवळा डांबिस
कोकणीत काहीच नुसतं 'ब'रं नसतं. तो एक भुक्कड मराठी शब्द आहे!;)
कोकणी माणूस एकतर जयजयकार करी करतो नायतर सामको धिक्कार तरी!!
(आणि धिक्कार करतांना आधी अँख! असा मराठीला माहीत नसलेला आवाज काढतो, माहितीये!!!)
21 Feb 2013 - 8:54 am | पैसा
=)) पाड पडू! ;)
21 Feb 2013 - 1:13 am | पिशी अबोली
'बरी' च्या वेगवेगळ्या डिग्री आहेत.
नुसतं 'बरी' म्हणजे बरी.
'बssरी' म्हणजे चांगली.
आणि 'बsssssरी' म्हणजे उत्तम.. :)
21 Feb 2013 - 1:41 am | अभ्या..
बsssssरी :)
21 Feb 2013 - 9:11 am | राही
ईवळी हा शब्द कोंकणीत इल्ली तर मराठीत इवली असा होतो.कोंकणीतला इल्लीशी मराठीत इवलीशी,उलूशी होतो.रोकडे हा शब्द हा शब्द सध्याच्या बोलभाषा मराठीत वापरात नसला तरी जुन्या ग्रांथिक मराठीत आहे. तो थेट,लगोलग,समोरासमोर, ताबडतोब अशा अर्थछटांनी वापरला गेला आहे. उदा. रोकडा प्रत्यय.(व्युत्पत्तीकोशात शोधायला वेळ मिलाला नाही पण रोकड म्हणजे नगद पैसा हा विद्यमान मराठी अर्थसुद्धा लागलीच मिळणारा पैसा,थेट पैसा, बार्टर नव्हे, या अर्थाने गेल्या तीनचारशे वर्षांत म्हणजे नाणी वापरणे तळागाळात पोचल्यावर प्रचारात आला असावा.)
भुरगें,बुरगें हे मराठीत पोरगें बनून येते. माझ्या आठवणीप्रमाणे याचे मूळ कानडीत आहे.
21 Feb 2013 - 9:17 am | पैसा
कानडीत 'भुरगा' शब्द "हुडगा-हुडगी" असा आहे. म्हणजे पुन्हा मुलगा-मुलगी याला जवळचा.
21 Feb 2013 - 9:37 am | राही
पोर,पोरगे,पोरटे,पोरटी,पोट्टी,पोट्टा या शब्दांचे मूळ एकच असावे.मलयालीत-विशेषतः क्रिस्टिअन मलयालीत मुली साठी मोळ्ळे,मोळ्ळी अशी संबोधने आहेत. इंग्लिश मध्ये त्याचे मॉली केले जाते. हिंदी ज्यूली चित्रपट ज्यावरून निघाला त्या मूळ मलयाली सिनेमाचे नाव चट्टाकारी(मला वाटते त्याचा अर्थ खालच्या/क्रिस्टिअन जातीची मुलगी,पोरी असा होता) होते. चट्टा,चट्टी,चेडूं,चडूं,चलो,चली हे शब्द एकाच कुळातले असावेत.
21 Feb 2013 - 9:44 am | पैसा
तसाच मालवणीतला "झील"
21 Feb 2013 - 11:34 am | बॅटमॅन
बंगालीत मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे छेले आणि मेये असे शब्द आहेत. तेदेखील इथे उल्लेखिलेल्या शब्दांशी तसे थोडेफार जवळचेच वाटतात.
21 Feb 2013 - 12:17 am | पिवळा डांबिस
हो अकरावो भाग बोअरिंग वाटलो.
(म्हणान आम्ही जुनो दहावो भाग जावंन पुन्हां एकदा वाचलो!!! :))
असो. बाराव्या भागासाठी शुभेच्छा!!
21 Feb 2013 - 1:08 am | पिवळा डांबिस
बाकी 'टीम गोवा'साठी एक शंका आहे...
म्हणजे पैसा आणि प्रिमो यांच्यासाठी, बिकाला याचं उत्तर येणार नाही याची खात्री आहे!!!:)
कोकणीत एक 'इकाळ्या पावसाचो' आशी एक फ्रेज आशील्ली.
आमी न्हान आंसतेवेळी आमची आज्जी आमकां नेहमीच तसां म्हणी...
तेंचो मराठीत नेमको अर्थ काय?
21 Feb 2013 - 12:25 pm | पैसा
तर माका म्हायत नाय! पण संदर्भ बघता "अवकाळी" किंवा वळवाचा पाऊस म्हणजे बेभरवशी माणूस असा काहीतरी अर्थ असावा.
31 Aug 2013 - 12:09 am | रघुनाथ.केरकर
नक्कि कित्या हुन्तता म्हायत नाय...पन पयल्या पावसात इकाळे मान्डके भायर पडतत..इक म्हनजे सुध मर्हाटीत विष. तेच्याचवर्सुन काय तरी अस्ताला..फाल्या आमच्या आयेक इचारुन सान्गतय..
बाकी तळ्कोकणातली माल्वणी वाय्च वाय्च कोन्कणी वाटता.....
21 Feb 2013 - 1:27 pm | राही
मराठीत सुक्काळीच्या अशी एक सौम्य शिवी आहे्. हे प्रकरण देखील तसेच काहीसे विकाळीच्या किंवा अवकाळीच्या स्वरूपाचे असावे. कोंकणी आणि मालवणीत ओसाड पडो,ओसाडी येवो या अर्थाने वशाड, वशाडी अशा गाळी आहेत.वशाडीचो असेही कधी कधी ग्राम्य भाषेत म्हटले जाते.
21 Feb 2013 - 1:35 pm | प्रीत-मोहर
राहीजींनी चित्पावनीचो बरोच नमुनो दिलोन से. आमचेत्त्यां अशीच बोलसत
ईकाच्या पावसाचो आमच्याकडे कमीच वापरतात. पण आमच्या कामवाल्या काकुंना शिवी म्हणुन वापरताना पाहिलय.
4 Mar 2013 - 11:15 am | सुबोध खरे
सुक्काळीच्या हि सौम्य शिवी नाही. सुक्काळी म्हणजे जी फक्त चांगल्या काळाच्या लोकांशी संबंध ठेवते.म्हणजेच गणिका आणि तिचा पुत्र म्हणजे वरील शिवी(पत्नी हि पतीला बर्या किंवा वाईट दोन्ही काळात साथ देते) (याचा अर्थ शिंच्या या शिवी सारखाच आहे (शिं म्हणजे शिंदऴकी करणारी आणि तिचा पुत्र म्हणजे शिंच्या)
4 Mar 2013 - 1:51 pm | राही
प्रतिसाद लिहिताना अगदी हाच शब्द सुचला होता.पण 'फोडिले शिव्यांचे भांडार' असे व्हायला नको म्हणून त्याचा उल्लेख केला नाही.शिंचा किंवा शिंदळीचा म्हणजे शिंदळकी करणारीचा ही शिवी सौम्यच नाही तर काय.एक तर ती कोंकणात आणि इतरत्रही सररास,मुलाबाळांसमोर वापरली जाते आणि आई,बहीणीचा उल्लेख असणार्या 'अमुक ठि़काणी गमन करणारा' अशा अर्थाच्या शिव्यांच्या मानाने सौम्यच. रांx ,रांxचा',रांxरू'हे शब्दही सौम्यच म्हटले पाहिजेत.तेही असेच उघडपणे वापरात असलेले आणि वापरून वापरून झणझणीतपणा घालवून बसलेले.विधवांना वेश्येसमान लेखणे हा आपल्या गतजीवनाचा एक अविभाज्य भाग होता याची दु:खद आठवण करून देणारे हे शब्द. अवकाळी पावसामुळे अशी परिस्थिती आली की गणिकेलाही कोणाहीबरोबर संबंध ठेवणे भाग पडले. अशा संबंधातून जन्मलेला तो अवकाळीचा असा अर्थ असावा.
21 Feb 2013 - 8:16 pm | यशोधरा
>>'इकाळ्या पावसाचो' >> :)) :))