आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
मराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येलाआहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत.या डोंगर दर्यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.
सत्तरी प्रदेशात राणे राजासरखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.
सन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिश्कोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्यार्या पुरुषांना व चोळी न घालणार्या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपटले.
दीपाजीनी म्हादई नदीच्या किनार्यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले. सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजीनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या.
इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.
दीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. इथे सुखवस्तु , श्रीमंत लोकांची वस्ती होती. केंकरे, धुमे,सरदेसाई, भांडारे, घोडेकर, खाजनिये यांचे मोठमोठे वाडे तिथे होते. कुंभारजुवे हे छोटे बेट राजधानीजवळ असल्याने बंडखोर इथे येणर नाहीत अशी त्यांची समजूत होती.
२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.
सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.
अश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. पोर्तुगीज सैन्यातील एक माजी अधिकारी जुझे पावलु द ओलिव्हैर पेगादु दीपाजींचा मित्र होता. सन १८५४ च्या मार्च महिन्याच्या सुरवातीला त्याला विजेरईने दीपाजींकडे पाठविले. त्याने विजेरईचा निरोप दीपाजींना पेश केला. विजेरई ने त्यांना पणजीच्या भूशिरावरील काबो राजप्रासादात भेटायला येण्याचे आमंत्रण दिले होते. दीपाजींनी आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेउन घेतले. त्यापैकी एक सैन्यात होता. . ४ मार्चला ते राजनिवासात जाणार होते. ११ पर्यंत पोचले नाहेत तर त्या तिघांनाही प्राण गमवावे लागले असते.
दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.
प्राणाचार्य दादा वैद्य.
एवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ओक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.
मुष्टीफंड संस्थेची जुनी इमारत.
मुष्टीफंड संस्थेची आत्ताची इमारत.
गोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.
मुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.
सांस्कृतिक संस्थांचे कार्य
पुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व राष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.
१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन काणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.
गोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.
हुकुमशहाचा उदय
पोर्तुगालातील पर्यायाने गोवा, दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते. कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळॅ होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.
Book traversal links for आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
आवडेश
छान. आवडले.
निवांतपणे वाचण्यासारखा धागा.
उत्तम माहिती. बाकी शणैं
पुढे
धन्यवाद.
आमचे गोयं हि लेखमालिका पुन्हा
टिम गोवा.
ही लेखमाला परत सुरु झाल्याचे
ओपिनियन पोल
:)
उत्तम!!!
+१
+१
धन्यवाद!
चांगली माहिती. धन्यवाद.
सुंदर लेखमाला !