अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत.