"बडा घर पोकळ वासा ", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा ", "वरून कीर्तन आंतून तमाशा " अशा "दिसतं तसं नसतं " या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं
यातला विरोधाभास दाखवणार्या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे " ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता दर्या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल दर्या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खोर्यांबरोबर कां घालावी? खोर्यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात.