.

नशिब

Primary tabs

जुना अभिजित's picture
जुना अभिजित in जनातलं, मनातलं
8 Oct 2007 - 1:12 pm

आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्‍या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जात होते.

अभिजित..

तराटः वेगात
वघळः ओघळ

कथा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

8 Oct 2007 - 4:45 pm | लिखाळ

वा वा
केवळ पहिल्या दोन वाक्यात सुंदरवातावरण निर्मिती करुन पुढच्या वाक्यांत कथेची सुरुवात आणि लगेच कथेची कलाटणी आणि सहाव्या सातव्या वाक्यात कथा संपली. मी याला एक उत्तम सशक्त लघुकथा म्हणेन. मला कथा आवडली.
उत्तम प्रयोग.
--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2007 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा विचार फार सुंदर मांडलाय अभी सेठ.
आम्हाला वाटले कथेचा १ला भाग असेल, किंवा काही भाग जोडता-जोडता राहिला असेल,
पण कोंबडीची स्वाक्षरी पाहिली आणि लक्षात आले कथा संपलेली दिसते.

ही कथा आहे का कविता, खरे तर गझलेच्या जवळ जाणारा प्रकार वाटतो. ;)
म्हणजे पहिल्या दोन वळीत प्रस्तावना आणि नंतर त्याची उकल.
पण जो कोणता प्रकार तुम्ही हाताळलाय त्याची साहित्याच्या अभ्यासकांनी नोंद घेतलीच पाहिजे. ;)

अवांतर ;) सिरीयसली कथा तर आहे, पण चोखंदळ ग्राहकांची खेचताय असं तर नाही ना ! :)

वळीत : ओळीत
उकल : उलगडा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकास's picture

8 Oct 2007 - 6:30 pm | विकास

आमचे पण नशीब, दोन ओळीत संपली...मधुअण्णा कुठे धडकला असता तर त्याला पण त्या बिनमाणसांच्या घरात जाऊन राहावे लागले असते :-)

(ह. घ्या.)

विसोबा खेचर's picture

8 Oct 2007 - 9:55 pm | विसोबा खेचर

कथा समजली नाही रे अभिजिता!

तात्या.

राजे's picture

8 Oct 2007 - 10:02 pm | राजे (not verified)

तात्या,
मी देखील वाटाच पाहत होतो की कोण असा प्रतिसाद लिहतो व त्याच्या बरोबर मी देखील म्हणू शकेन की काही कळाले नाही बॉ...

धन्यवाद.

वरील दोन प्रतिसाद [+] मध्ये होते तेव्हा [-] मध्ये प्रतिसाद कसा लिहावा ह्याचा विचार करत होतो कारण मी एकटाच म्हणालो की काही कळाले नाही व येथे डझन भर प्रतिसाद आले की वा.. सुंदर.. कथेमध्ये एकदम नावीन्य आहे.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

लिखाळ's picture

8 Oct 2007 - 10:14 pm | लिखाळ

>>.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;} आता तुमची गोची झाली नाही पण माझी होतेय का ते पाहायचे :)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट's picture

8 Oct 2007 - 10:38 pm | सर्किट (not verified)

हा प्रकार फारच छान आहे. चार ओळीत सगळं जिवंत झालं.

माझाही एक प्रयत्नः (ही गूढकथा आहे ;-)

मधु पहाटेच जागा झाला. कालचा प्रकार आज पुन्हा घडू नये, म्हणून त्याने मनोमन देवाची करुणा भाकली. पाठीला दप्तर लावले, आणि शाळेला निघाला.

- सर्किट

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:13 pm | प्रियाली

आता माझी रहस्यकथा

मध्याने वर्गात पाऊल टाकले तोच गुरुजींनी नेहमीप्रमाणे त्याच्या पाठीवर सपासप २ छड्या ओढल्या. आपल्याला पाहून गुरुजींच्या असे अंगात येते हे एव्हाना मध्याच्या लक्षात आले होते, तो निमूट बाकावर जाऊन बसला.

अभिजीत,

गोष्ट एवढीच होती की चुकून सुपूर्त झाली? तशी शीर्षकाला समर्पक आहे, नशीब संपाचं!

सर्किट's picture

8 Oct 2007 - 11:17 pm | सर्किट (not verified)

मधू, तुला गुरुजींनी खूपच मारले का रे ? ही घे खडीसाखर. बरं वाटेल तुला.

- (अतिलघुकथाकार) सर्किट

राजे's picture

8 Oct 2007 - 11:22 pm | राजे (not verified)

गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली.

राजे
(*हेच राज जैन आहेत व कथा लिहणे हा ह्यांचा प्रांत नाही आहे पण एकाद दुसरी ओळ जरुन लिहू शकतात)
माझे शब्द....

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:28 pm | प्रियाली

>>गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली.

मधूच्या प्रेमात सुनील? सर्किटांच्या प्रेमकथेला आता भलताच अँगल द्यावा लागणार.

"बरी खोड मोडली! अजून दोन चार लाथा घालायला हव्यात." फणकारून मिनू म्हणाली. तिने मध्यासाठी द्रोणभर करवंद सकाळीच गोळा केली होती पण हा सुन्या नेहमीच तडमडायचा. 'याचा एकदा निकाल लावायलाच हवा.' ती मनात म्हणाली.

राजे's picture

8 Oct 2007 - 11:31 pm | राजे (not verified)

सुन्याने मिनूच्या मनातील विचार ओळखले होते व लगेच सद-याला नाक फुसता फुसता दोनचार खडीसाखरेचे तुकडे तीच्या हातावर ठेवले व एकदम भक्कास पणे हसला....

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सर्किट's picture

8 Oct 2007 - 11:32 pm | सर्किट (not verified)

दिनूने करवंदाच्या द्रोणात अंगणातल्या वेलाची विषारी फळे बेमालूम मिसळली होती.

- (सलीम जावेद) सर्किट

राजे's picture

8 Oct 2007 - 11:35 pm | राजे (not verified)

सुन्या ह्याच साठी भक्कास पणे हसला होता, कारण त्याला माहीत होते की द्रोणामध्ये विष आहे पण मीनू मधुला देण्यापुर्वी स्वतः एक- एक करवंद चाखुन बघणार व त्यातील गोड करवंदेच मधूला देणार.... अंत निश्चितच होता एक काटा गेला... वाचला तो दिनू तो गेला की....

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

कोलबेर's picture

8 Oct 2007 - 11:29 pm | कोलबेर

"आई ग ऽऽऽ " - सुन्या.

सर्किट's picture

8 Oct 2007 - 11:33 pm | सर्किट (not verified)

"सुन्या, सुन्या, मैफिलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे..."

- सर्किट भट

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:33 pm | प्रियाली

"गप्प!" -गुरुजी.

सर्किट's picture

8 Oct 2007 - 11:36 pm | सर्किट (not verified)

मग गुरुजींना राक्षसाने डांबून ठेवले, आणि सुन्याला परीराणीने एक चॉकलेट दिले.

- (वय वर्षे ४) सर्किट

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:42 pm | प्रियाली

कसेही झाले तरी ते गुरुजी होते. सर्वांनी मिळून त्यांची सुटका करण्याचे ठरवले. एकीचे बळ मिळते फळ!

कोलबेर's picture

8 Oct 2007 - 11:42 pm | कोलबेर

त्या चॉकलेटला येणारा काहीसा मंद फणसाच्या सालासारखा वास आणि त्याचा डाळींबाच्या दाण्यांसारख्या टपोरा गुलाबी रंग सुन्याच्या चेहर्‍यावर एक निरागस हास्य उमटवुन गेला.

-जी.ए. कोलबेर

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:46 pm | प्रियाली

सुन्या परीराणीकडे पाहून गोड हसला. परीराणीही सुन्याकडे पाहून गोड हसली आणि....

च्यामारी! बाकी सर्वांचं नशिब फुटलं!

राजे's picture

8 Oct 2007 - 11:51 pm | राजे (not verified)

व परीने आपली जादूची कांडी हवेत फिरवली..... व लगेच..

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सर्किट's picture

8 Oct 2007 - 11:53 pm | सर्किट (not verified)

सुन्याची निरागसता भष्ट करणार्‍या ह्या परीराणीला नैतिक दृष्ट्या भष्ट अशा अमेरिकेची फूस असल्याने तिच्याविरुद्ध जगभरातील मशिदींतून जिहाद पुकारण्यात आला आहे.

- सर्किट बिन मुन्नाभाई

प्रियाली's picture

8 Oct 2007 - 11:57 pm | प्रियाली

अमेरिकेनेही लगेच एरिया ५१ मधील आपले जुने सहकारी आणि मूळ अँड्रोमिडा आकाशगंगेतील ग्रहवासीयांना पाचारण केले.

- प्रियाली फॉर्स्टर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2007 - 7:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आकाशगंगेवर वावरणारे शेतकरी सकाळीच भ्रमणध्वनीच्या कोंबड्याच्या बागेच्या आवाजाने जागे व्हायचे.......आज यसोदा जर लवकरच उठली , तीने नव-याकडे पाहिले, पर तुकारामाचं तिच्याकडं काही धेन नव्हतं. त्यो आपला नीघायच्या गडबडीत....त्यो इचार करीत व्हता...भारतात जायाचं म्हणजी लयी कठीण काम...तेनं घर सोडलं ....आजूबाजूच्या घरासमोरच्या सडा, रांगोळीनं तेचं मन प्रसन्न झालं होतं...त्यो इचार करु लागला....... मधुआण्णा सायकल दामटीत भर पावसात उंब्रजला निघालाच कशाला होता....तुकारामाच्या डोळ्यातनं आठवणीचे मधुआण्णा वाह्यला लागले होते....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्किट's picture

9 Oct 2007 - 8:14 am | सर्किट (not verified)

तुकारामाच्या डोळ्यातनं मधुअण्णांच्या शेळ्या काही केल्या सरत नव्हत्या ;-)

- सर्किट

सहज's picture

9 Oct 2007 - 8:17 am | सहज

होली क्रॅप *$%^

---------------
माझ नशीब

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:18 am | सर्किट (not verified)

तथास्तु !!!!
(अद्याप माझी वरची गोष्ट रद्द झाली नाही, याचा अर्थ मिसळपावाला बीस्टियलिटी चालते, होय की नाही रे सहजभाऊ ?)

- सर्किट

चित्रा's picture

9 Oct 2007 - 8:22 am | चित्रा

सर्वांच्या प्रतिभेला आलेला बहर बघून धन्य धन्य झाले.
चालू देत.

पहाट झाली. सर्किट उठला. मिसळपावावर चक्कर मारली. त्याच्या लघुकथेला चित्राताईंनी दिलेला प्रतिसाद बघून धन्य झाला. काल तावातावाने भांडणार्‍या त्या ह्याच का ? मनात हरखला. ह्यांचा आयपी ऍड्रेस शोधून गूगल अर्थ वरून त्यांचे घर शोधायला हवे, मनात म्हणाला.

- सर्किट रामसे

आजानुकर्ण's picture

9 Oct 2007 - 9:14 am | आजानुकर्ण

आजानुकर्ण यांनी खिशातून आयपॉडसारखे दिसणारे एक अत्याधुनिक यंत्र काढले. यंत्राच्या डाव्या बाजूला असलेली कळ दाबली की त्यातून गोळ्यांचा वर्षाव सुरू होई. तर उजव्या बाजूला असलेली कळ दाबली की समोरच्या व्यक्तीला गुदगुल्या होत असत.

- ००७कर्ण

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:16 am | सर्किट (not verified)

गुदगुल्या झाल्या झाल्या आपल्या काखेत काय खाजवते आहे, हे सर्किटाने पाहिले. झोपताना काख मोकळी सोडण्याच्या त्याच्या सवयीविषयी त्याला क्षणभरच वैषम्य वाटले. पण लगेच व्ह्याब्रेट मोडचा क्वाएट मोड केला आणि तो पुन्हा झोपी गेला..

- सर्किट जॉब्ज

चित्रा's picture

9 Oct 2007 - 9:10 am | चित्रा

चित्राने झोपायला जाण्याआधी सर्किटांचा प्रतिसाद आलेला पाहिला. "काय गूगल अर्थ, आय पी ऍड्रेस सारखे सारखे लावले आहे?" ती जरा मोठ्यानेच पुटपुटली. "ही यांची "शैलीच" दिसते", असेही. तिकडे मिसळपाववर ती अक्षरे उमटली आणि सर्किटांनी कावरेबावरे होऊन इकडे तिकडे पाहिले.

विसोबा खेचर's picture

9 Oct 2007 - 9:14 am | विसोबा खेचर

तुम्ही लढाच! आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. या सर्किटची खोड कुणीतरी मोडायलाच हवी..:)

आपला,
शरदतात्या पवार!

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:13 am | सर्किट (not verified)

सर्किटाची खोड कुणीतरी मोडायलाच हवी. तात्या पुटपुटला. पण ही खोड मोडायला चित्रा पुरेशी आहे का ? त्याच्या मनात गोंधळ माजला होता. कारण जी पुरेशी आहे, ती तर ह्या सर्किटालाच सामील झालीय, गुप्तहेर म्हणून. तात्याच्या मनाला चुटपुट लागून राहिली.

- सर्किट काकोडकर

चित्रा's picture

9 Oct 2007 - 6:12 pm | चित्रा

पण तात्याला हे माहिती नव्हते की सर्किट जिच्यावर एवढा विश्वास टाकून आहेत, ती सर्किट एक नसून अनेक आहेत की काय हे रहस्य उलगडण्यासाठीच वरकरणी सर्किटांना सामील झाल्याचे दाखवत होती!

प्रियाली's picture

9 Oct 2007 - 6:22 pm | प्रियाली

अहो देवाने सर्किटांना घडवून साचा मोडून टाकला. सर्किट अनेक असणं केवळ अशक्य!!!! :))))

मागे देवबाप्पाने इमेल पाठवली होती. म्हणाला, "अजून पस्तावतोय असं मॉडेल बनवून आणि लाईफटाईम वॉरंटीही देऊन बसलोय. एकच पीस बनवला म्हणून त्यातल्यात्यात सुखाचा श्वास घेतो."

- प्रियालीगुप्त.

चित्रा's picture

9 Oct 2007 - 6:24 pm | चित्रा

एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-)) बाकी सर्किटांना सामील असलेल्या गुप्तहेर स्त्रीने छडा लावून पूर्ण केलेला दिसतो. तिची सर्किटांच्या साच्याबद्दलची थिअरी थोड्याच वेळात जगभरात मान्य झाली असे समजते.

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 12:23 am | विसोबा खेचर

एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-))

हा हा हा!

नाही हो चित्राताई. जरा अधिक कसून तपास करा. आमचा संजूबाबा 'ऐहिक' या नावाने लिहितो असं लोक म्हणतात! बरं का चित्राताई, हा ऐहिक आहे ना, तो फक्त तात्याच्या विरोधातच लेखणी उपसतो. एरवी तो फार कमी लिहितो!

असो! तात्याने असे कित्येक ऐहिक पचवले आहेत हा भाग वेगळा! :))

आपुन साला हैईच नंगा! और नंगेसे तो खुदा भी डरता है, ऐहिक क्या चीज है! :)

तेव्हा चित्राताई, आपल्या एकच विनंती. हा ऐहिक कोण आहे ते शोधून काढा. त्याबद्दल मी तुम्हाला ५१ रुपयांचे बक्षिस पोष्टाच्या मनीऑर्डरने पाठवीन.. :)

तात्या.

आजानुकर्ण's picture

9 Oct 2007 - 9:12 am | आजानुकर्ण

दिन्याने कोललेल्या विट्टीचा क्याच सुन्याने सोडलेला पाहून मोन्याने त्याला संघाबाहेर काढले.
"बघा आता पोरींच्या टीमला विट्टीदांडू शिकवून कसा वर्ल्डकप आणतो ते. ", सुरवंटाप्रमाणे कपाळावर पसरलेली उजवी भुवई वर आणि डावी भुवई खाली करुन आपले ओठ थरथरवत सुन्या म्हणाला.

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:22 am | सर्किट (not verified)

सुन्या पवाराने दिन्या वेंगसरकरला विटीदांडू संघाची निवड करायला निवडले होते. आपला थरथरणारा ओठ सावरत सुन्या राग आवरायचा प्रयत्न करत होता, एवढ्यात सोन्याने वर्ल्ड कप जिंकला..

सुन्या आणि दिन्याला सोन्याची तारीफ करण्याव्यतिरीक्त काहीही उरले नव्हते...

- सर्किट तेंडुलकर

जुना अभिजित's picture

9 Oct 2007 - 10:54 am | जुना अभिजित

हे नाव आवडलं बघा.

ज्यांना गोष्ट/कथा/असूल कथा समजली नाही त्यांच्यासाठी..

संपा जो आहे त्याला जर मधुआण्णानं हाक मारून थांबवला नसता तर ते झाड त्याच्या डोक्श्यात पडलं असतं. (झाड पडण्याचा वेग, सायकल चालवण्याचा वेग आणि ब्रेक लावल्याने निर्माण झालेल्या मंदनाचा फरक जुळून आला असता हे गृहीत धरू. )

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

अवांतरः संत तुकारामांच्या एका अभंगात आणि दहावीला(?) संस्कृतमध्ये श्लोकरुपात एक अतिसूक्ष्मलघुकथा होती. एक शिकारी पक्ष्यावर नेम धरून आहे. एक ससाणा आकाशात घिरट्या घालत आहे. आता पक्षी उडाला तर ससाणा मारणार आणि नाही उडाला तर शिकारी मारणार. तर पक्षाची सुटका कशी होईल? पुढे कथेत नागाची एंट्री होते. तो शिकार्‍याला चावतो. शिकार्‍याचा नेम चुकतो आणि ससाण्याला लागतो.

कांदेपोह्याऐवजी मिसळपावाचा कार्यक्रम करण्याला पसंती देणारा अभिजित

लिखाळ's picture

9 Oct 2007 - 3:45 pm | लिखाळ

सरते शेवटी ही कथा होती हे जाहिर करुन आपण आमची गोची होवू दिली नाहीत याबद्दल आभार. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहता मधल्या काळात आम्हाला जे वाचायला लागले त्याने आमची वाट लागली ;)

असो. मला तुमची कथा वाचून नववी-दहावीच्या पुस्तकातली आपण वर म्हणता तीच 'मराठीतील सर्वात जूनी लघुकथा' आठवली. पक्षी-पारधी-ससाणा-पक्ष्याची पिले आणि साप !
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

जुना अभिजित's picture

9 Oct 2007 - 4:13 pm | जुना अभिजित

खरंतर हा एक खराखुरा घडलेला प्रसंग आहे. कथा स्वरुपात मांडला आहे.

अवांतरः कलाटणीविषयी
ओ हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता. ऐश्वर्या-अजय देवगणचा रेनकोट चित्रपट (की ओ हेन्री च्या कथेवरच आधारीत) असाच रंगला आहे.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2007 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता.

सहमत !

सर्वात लहान कथा ही डॉ. हेन्री यांनीच लिहिलेली आहे, असे आम्ही वाचलेले आहे.

( दोन प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात, त्यांची चर्चा चालू आहे भुत आहे की नाही आणि थोड्यावेळाने तिथे एकच व्यक्ती प्रवास करत असतो, अशी काही तरी आहे , ती कथा कोणाला सांगता येईल का ? )

अवांतर :-हेन्री बद्दल अधिक वाचायला कुठे मिळेल.( मराठीतून )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवदत्त's picture

23 Oct 2007 - 10:55 pm | देवदत्त

अभिजित, कथा चांगली आहे.
पण मग तुमचा प्रतिसाद येईपर्यंत काय चालू होते त्याचा विचार चालू आहे hypnotized
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

चित्रगुप्त's picture

15 Nov 2012 - 3:44 pm | चित्रगुप्त

ट्याहां...म्हणत त्याने डोळे उघडले आणि 'हे राम' म्हणत मिटले.