द स्केअरक्रो - भाग २५

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
12 Sep 2015 - 12:25 am

द स्केेअरक्रो भाग २४

द स्केअरक्रो भाग २५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

रॅशेलने फोन केल्यापासून अर्ध्या तासाच्या आत एफ.बी.आय.च्या एजंट्सनी फ्रेडी स्टोन जिथे राहात होता ती नुसती इमारत नाही, तर ती संपूर्ण गल्ली आपल्या ताब्यात घेतली. आम्हाला दोघांना अलग करून प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी बाहेरून मोठाल्या बसेससारख्या दिसणाऱ्या मोबाईल इंटरॉगेशन रूम्स आणल्या होत्या. अर्थात, एफ.बी.आय. त्यांच्याबाबतीत कधीच असा शब्दप्रयोग करत नसे. मी एकदा त्यांच्यावर स्टोरी केली होती आणि त्यात या बसेसना ग्वान्टानामो एक्स्प्रेस असं नाव दिलं होतं, ते मला आता आठवलं.

मी ज्या खोलीत होतो, ती एक खिडक्या नसलेली, दहा फूट बाय दहा फूट एवढी खोली होती. जॉन बँटम नावाचा एजंट मला प्रश्न विचारत होता. नाव जरी बँटम असलं तरी तो आकाराने एवढा प्रचंड होता, की त्याच्या अस्तित्वानेच ती खोली भरल्यासारखी वाटत होती, आणि तो मुद्दामहून मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. एफ.बी.आय. इथे येण्याआधी रॅशेलने मला एक सूचना केली होती, की एफ.बी.आय.शी खोटं बोलणं हा गुन्हा आहे, आणि त्यामुळे जे खरं आहे, ते सगळं सांगून टाक. एकदा का त्यांना कळलं की तू खोटं बोलला आहेस, की मग ते तुझी वाट लावतील. त्यामुळे मी बँटमच्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं दिली, पण आपणहून कुठलीही माहिती त्याला सांगायच्या फंदात पडलो नाही.

त्यामुळे तो वैतागला होता, हे मला कळत होतं. तो तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. बहुतेक माझ्यासारख्या एका सामान्य रिपोर्टरने वेस्टर्न डेटा आणि खुनी यांच्यातला संबंध शोधला आणि एफ.बी.आय.ला तो शोधता आला नाही याचा त्याला संताप आला असावा.

शेवटी मीही वैतागलो आणि माझ्या खुर्चीतून उठून उभा राहिलो.

“हे पहा, मी तुला सगळं सांगितलेलं आहे. मला आता ही स्टोरी लिहायची आहे.”

“खाली बस. आपलं काम संपलेलं नाहीये अजून.”

“ एक मिनिट. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. तू मला सांगू शकत नाहीस की तुझं काम संपलंय किंवा नाही. मी मला जे सांगायचं ते सगळं सांगितलेलं आहे. आता तू एक क्षणही मला इथे डांबून ठेवू शकत नाहीस. आता निव्वळ एक शिष्टाचार म्हणून मी विचारतोय तुला. मी जाऊ शकतो का?”

“मी आत्ता या क्षणी तुला दुसऱ्याच्या घरात विनापरवानगी घुसण्याच्या आणि आपण एफ.बी.आय. एजंट आहोत असं खोटं बोलण्याच्या आरोपांवरून अटक करू शकतो.”

“ते तू वाट्टेल त्या आरोपांवरून करू शकतोस. पण मी विनापरवानगी कोणाच्याही घरात घुसलो नव्हतो. आम्ही दोघांनी एका माणसाला त्या घरात घुसताना पाहिलं आणि तो जर एखादा गुन्हा करणार असेल तर त्याला थांबवण्याच्या उद्देशाने आम्ही आत गेलो. आणि मी एफ.बी.आय. एजंट आहे असं कुठेच आणि कोणालाही सांगितलेलं नाही. त्या मुलाला तसं वाटलं असेल, तर त्याला मी जबाबदार नाही.”

“खाली बस. अजून माझे प्रश्न संपलेले नाहीत.”

“ठीक आहे. यापुढे जे काही बोलायचं आहे, ते माझ्या वकिलाशी बोल तू.”

आता बँटम उभा राहिला आणि दरवाज्याकडे गेला आणि मग परत वळला, “तुझी स्टोरी तुला होल्ड करायला लागेल.”

अच्छा. म्हणजे हा डाव आहे तर यांचा.

“हेच जर तुम्हाला हवं होतं, तर सरळ सांगायचं होतं. हे प्रश्न विचारणं आणि घाबरवण्याचा प्रयत्न करायचं नाटक करण्याची गरज नव्हती.”

“असलं काहीही आम्ही केलेलं नाही. तुला अटक केलेली नाही आम्ही. अटक केलेल्यांना आम्ही कसे प्रश्न विचारतो ते तू पाहिलेलं नाहीयेस अजून.”

“जे काही असेल ते. मी स्टोरी थांबवू शकत नाही. एकतर हा खूप मोठा ब्रेक आहे या संपूर्ण प्रकरणातला. आणि दुसरं म्हणजे जर फ्रेडी स्टोनचा चेहरा सगळ्या जगापुढे आला, तर तुमचंच काम सोपं होणार आहे.”

त्याने नकारार्थी मान हलवली, “आम्हाला पुढच्या चोवीस तासांमध्ये आमच्याकडे काय पुरावे आहेत ते पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे, आणि त्याला काय चाललंय हे समजण्यापूर्वीच आम्हाला त्याला उचलायचंय. त्याच्यानंतर त्याचा चेहरा लोकांपुढे आला तर चालेल. आधी नाही.”

मी विचारात पडलो. स्टोरी कधी ब्रेक करायची याचा निर्णय माझ्या एडिटर्सशी बोलून घ्यावा लागणार होता. पण मी आता या सगळ्याच्या पलीकडे गेलो होतो. ही माझी स्टोरी होती, मी शोधून काढलेली होती आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही निर्णय मीच घेणार होतो.

बँटम त्याच्या खुर्चीवर बसला. तो मी काय बोलतोय याची वाट पाहात होता. मी माझ्या घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे चार वाजले होते. एल.ए.मध्ये आमच्या एडिटर्सनी उद्याच्या बातम्या ठरवण्यासाठी जी मीटिंग असते, ती चालू केली असणार.

“मी एक करू शकतो,” मी म्हणालो, “आज मंगळवार आहे. मी ही स्टोरी थांबवेन आणि गुरुवारच्या पेपरसाठी लिहीन. म्हणजे उद्या. आम्ही वेबसाईटवरही ती आणणार नाही, कारण बहुतेक वेळा बाकीचे पेपर्स तिथून स्टोरी उचलतात. म्हणजे तुमच्याकडे तब्बल छत्तीस तास आहेत.”

“ठीक आहे. मला वाटतं, पुरेसे आहेत.” असं म्हणून तो उठला.

“एक मिनिट. एवढंच नाही. मला याच्या मोबदल्यात काही गोष्टी हव्या आहेत.”

त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं, “बोल तू. मी ऐकतोय.”

“मी सोडून दुसऱ्या कुठल्याही पत्रकाराला तुम्ही माहिती देणार नाही. ही माझी स्टोरी आहे. ही स्टोरी तुमच्याकडून इतर कोणालाही कळली, तर मग मला हे छापावंच लागेल. त्यामुळे माझी स्टोरी टाईम्सच्या पहिल्या पानावर येईपर्यंत कोणतीही माहिती एफ.बी.आय.कडून बाहेर जाता कामा नये. तुम्हाला जर प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायची असेल, तर ती माझी स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर घ्या.”

“ठीक आहे.”

“अजून माझं संपलेलं नाही. मला तुमचा तपास कसा चाललाय ते समजायला पाहिजे. त्यामुळे मला तुमच्याबरोबर...”

“सॉरी. ते शक्य नाही. आम्ही सामान्य नागरिकांना, आणि पत्रकारांना आमच्या तपासात सहभागी करून घेत नाही. एकतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो आणि दुसरं म्हणजे ते कायदेशीर नाहीये. नंतर प्रॉसिक्युशनमध्ये असंख्य प्रॉब्लेम्स येतात.”

“ठीक आहे. मग मी आत्ताच माझ्या एडिटरला फोन करतो. जर मला जे हवं आहे, ते तुम्ही देत नसाल, तर तुम्हाला जे हवं आहे, ते देण्याची मला काहीही गरज वाटत नाही.” हे बोलून झाल्यावर मी ताबडतोब माझा मोबाईल फोन बाहेर काढला.

“ओके ओके. तू असलं काहीतरी करशील हे माहित होतं मला. पण हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये. मला माझ्या वरिष्ठांशी बोलायला लागेल. तू इथेच थांब.”

तो खोलीतून बाहेर निघून गेला.

त्याने दरवाजा बंद केल्यावर मी तिथे जाऊन नॉब फिरवायचा प्रयत्न केला पण तो फिरत नव्हता. या लोकांनी मला नामोहरम करायचा चंग बांधला होता बहुतेक.

अर्धा तास मी तसाच बसून राहिलो. कोणाचाही पत्ता नव्हता. पोलिस स्टेशनमध्ये पोलिस संशयितांकडून गुन्हा कसा कबूल करून घेतात ते मला माहित होतंच. पूर्ण दुर्लक्ष. चार-पाच तास एखादा माणूस असा ‘ मुरवला ’ की तो आपसूक बोलायला लागतो.

माझ्या डोक्यात एक एक कल्पना आली. मी माझा फोन घेतला आणि या खोलीच्या एका कोपऱ्यात गेलो, आणि कोणालातरी फोन लावल्याचं नाटक केलं, आणि मग पलीकडे माझा एडिटर असल्याप्रमाणे या स्टोरीबद्दल बोलायला सुरुवात केली. एक-दोन मिनिटं बोललो आणि थांबलो आणि परत माझ्या जागेवर येऊन बसलो.

पाच मिनिटांत दरवाजा उघडला आणि रॅशेल आत आली. मला हे अपेक्षित नव्हतं. मी एकदम उठून उभा राहिलो.

“बस ना जॅक!” ती म्हणाली.

ती माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसली. मी छताकडे बोट केलं.

“हो. आम्ही आपली ही बातचीत रेकॉर्ड करतोय. पण तू मोकळेपणाने बोलू शकतोस जॅक!”

आम्ही हा शब्द तिने ज्या पद्धतीने उच्चारला त्यावरून मला एकदम एक गोष्ट जाणवली, “तुझं वजन वाढलंय ना रॅशेल?”

तिने प्रश्नार्थक चेहरा केला.

“तुझी गन आणि बॅज परत मिळाल्यावर तुझं वजन वाढणारच ना.”

तिने होकारार्थी मान डोलावली, “अजून ते माझ्या हातात मिळालेले नाहीयेत पण मिळतील.”

“अच्छा. म्हणजे तू ग्रिफिथ पार्कमध्ये लपलेला ओसामा बिन लादेन शोधून काढलास तर!”

“अगदीच तसं नाही म्हणता येणार.”

“पण त्यांनी तुला ब्युरोमध्ये परत घेतलंय.”

“माझ्या राजीनाम्यावर अजून डायरेक्टरची सहीच झालेली नव्हती. सरकारी काम म्हटलं की वेळ हा लागायचाच. तुला तर माहिती आहेच. मला त्यांनी माझा राजीनामा मागे घ्यायला सांगितलं आहे.”

मी पुढे झुकलो आणि दबत्या आवाजात विचारलं, “मग त्या जेटचं काय?”

“तू मोठ्याने बोलू शकतोस जॅक! जेटचा प्रॉब्लेम निकालात निघालाय.”

“तुला हे सगळं लेखी स्वरुपात मिळालंय का पण त्यांच्याकडून?”

“मला जसं पाहिजे तसं मिळालंय.”

याहून जास्त ती सांगणार नाही हे मला अनुभवाने माहित होतंच.

“अच्छा. म्हणजे एका रिपोर्टरने आणि बडतर्फ एफ.बी.आय.एजंटने या केसमधला गुन्हेगार शोधून काढला अशा हेडलाईनपेक्षा एका एजंटने त्याला शोधून काढलं अशी हेडलाईन वाचायची इच्छा आहे त्यांची, बरोबर?”

“तसं समज. माझ्याकडे आत्ता तुझ्याबरोबर ‘समन्वय साधायची ’ जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, कारण
कुठल्याही परिस्थितीत ते तुला या तपासाचा भाग होऊ देणार नाहीयेत. पोएट केसच्या वेळी काय झालं ते तुला आठवत असेलच.”

“त्याला बारा वर्षे होऊन गेलेली आहेत.”

“तरीही.”

“ओके. मी काय म्हणतो, आपण या खोलीतून बाहेर पडलो तर? मला जिथे आपली बातचीत रेकॉर्ड होत नाहीये अशा ठिकाणी जाऊन बोलायची इच्छा आहे.”

“हरकत नाही.”

आम्ही दोघेही बाहेर पडलो. फ्रेडी स्टोन राहात असलेलं गोदाम आणि त्याच्या पुढचा आणि मागचा रस्ता अजूनही एफ.बी.आय.एजंट्सनी भरलेले होते.

“आपण न शोधून काढलेलं असं काही या लोकांना सापडलंय का?” मी विचारलं.

ती हसली, “नाही.”

“एजंट बँटम माझ्याशी बोलत होता तेव्हा तो म्हणाला होता की एफ.बी.आय.एजंट्स इतर अनेक ठिकाणांवर नजर ठेवून आहेत. कशाबद्दल बोलत होता तो?”

ती वळली आणि माझ्यासमोर येऊन उभी राहिली, “आपण पुढे काहीही बोलण्याआधी काही गोष्टी आपल्याला स्पष्ट करून घ्यायला लागतील जॅक. मी तुझ्याबरोबर आत्ता बोलतेय त्याचा अर्थ असा नाही की तुला तपासकामात सहभागी करून घेतलेलं आहे. माझं काम तुझ्याशी संपर्कात राहणं आहे. तुलाही फक्त माझ्याशीच संपर्क साधता येईल. जर तू तुझी स्टोरी एक दिवस थांबवलीस तर.”

“मी एफ.बी.आय.ची ऑफर फक्त एका अटीवर मान्य केली होती. माझा तपासात सहभाग.”

“कम ऑन जॅक. ते शक्य नाहीये. पण मी तुझ्याशी संपर्कात राहीन आणि तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. तू आता एल.ए.ला जा आणि उद्या तुझी स्टोरी लिही. मला जे सांगता येईल ते सगळं मी तुला सांगेन.”

“त्याचीच तर काळजी वाटते ना मला. तू जे सांगू शकशील ते सगळं तू मला सांगशील. पण तू मला काय सांगू शकशील हे कोण ठरवणार?”

“मला माहित असलेलं सगळं मी तुला सांगेन.”

“पण तुला सगळं माहित असेल का?”

“हे पहा जॅक, हे असं भाषिक कीस काढणं सोड. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही?गेल्या आठवड्यात मला नेवाडाच्या वाळवंटातून फोन करताना तू असंच म्हणाला होतास.”

मी तिच्याकडे पाहिलं, “माझा तुझ्यावर विश्वास आहे. स्वतःपेक्षाही जास्त.”

“ठीक आहे. मग मी सांगते म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि एल.ए.ला परत जा. उद्या दर तासाने तू मला फोन केलास तरी चालेल. मी तुला आम्हाला काय सापडलंय ते सगळं सांगेन. तुझी स्टोरी छापून येईपर्यंत. आणि ही माहिती फक्त तुला मिळेल, दुसऱ्या कोणालाही नाही. माझा शब्द देते मी तुला.”

मी काहीच बोललो नाही. नुसताच त्या एजंट्स आणि फोरेन्सिक तंत्रज्ञांकडे बघत राहिलो. आता ते कचऱ्याच्या डब्यांमध्ये सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद करत होते.

“काय ठरलंय तुझं मग?” रॅशेलच्या या प्रश्नाने मी भानावर आलो.

“ठीक आहे.”

“माझी एक विनंती आहे तुला. तू जेव्हा तुझ्या स्टोरीमध्ये माझा उल्लेख करशील तेव्हा एफ.बी.आय.एजंट म्हणून कर. मी राजीनामा दिला आणि मग मागे घेतला वगैरे लिहू नकोस.”

“ही तुझी विनंती आहे की ब्युरोची?”

“त्याने काही फरक पडतो का?”

“नाही रॅशेल. काही फरक नाही पडत. मी नाही लिहिणार त्याबद्दल.”

“थँक्स.”

“बरं, आता मला सांग की बँटम जे म्हणाला, त्याचा अर्थ काय?”

“आम्ही वेस्टर्न डेटा आणि डेक्लॅन मॅकगिनिसचं स्कॉटसडेलमधलं घर या ठिकाणी एजंट्सना पाठवलंय.”

“मॅकगिनिसचं काय म्हणणं आहे याबद्दल?”

“ते तो सापडल्यावरच कळेल आपल्याला.”

“तो अजून बेपत्ता आहे?”

तिने होकारार्थी मान डोलावली, “ आता तो स्वतःहून बेपत्ता आहे की अजून काही, ते आपल्याला माहित नाहीये सध्यातरी , पण तो आणि त्याचा कुत्रा हे दोघेही गायब आहेत. असंही असू शकतं की त्याने शुक्रवारी एफ.बी.आय.एजंट्स तिथे गेल्यावर स्वतः काही शोधून काढायचा प्रयत्न केला असेल. त्यामध्ये स्टोनचं नाव त्याला सापडलं असेल आणि स्टोनने मग त्याला गायब केलं असेल. तात्पुरतं किंवा कायमचं. आणि अजून एक शक्यता आहे.

“ते दोघेही यात सहभागी आहेत?”

“हो. आणि दोघेही गायब झाले आहेत आणि एकत्र आहेत.”

मी यावर जरा विचार केला. मॅकगिनिस आणि स्टोन हे दोघेही खुनी? अर्थात असं घडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. बरेच गुन्हेगार जोडीने गुन्हा करतात, अगदी सीरियल किलर्ससुद्धा. बिटेकर आणि नॉरिस यांची नावं पटकन डोळ्यांसमोर येतात. या जगातले दोन अत्यंत भयानक आणि पाशवी खुनी. ते योगायोगाने एकत्र आले आणि मग त्यांनी कॅलिफोर्नियात तरुण मुलींचं अपहरण, लैंगिक छळ आणि खून यांचं सत्र चालू केलं. ते जेव्हा त्यांच्या बळींवर अत्याचार करायचे, तेव्हा त्यांचं किंचाळणं आणि गयावया करणं रेकॉर्ड करायचे. त्यांना अटक केल्यावर कोर्टात जेव्हा त्यातली एक टेप ऐकवली गेली तेव्हा ज्युरी आणि प्रेक्षक तर सोडाच पण दोन्ही बाजूंचे वकील, जज, आणि पोलिस ऑफिसर्सही कोर्टात ढसाढसा रडले असं मी ऐकलं होतं.

“आता तुला कळलं असेल जॅक की आम्हाला हे मीडियापासून का लपवायचं आहे ते? दोघांकडेही स्वतःचे लॅपटॉप होते आणि तेही गायब आहेत. पण त्यांचे वेस्टर्न डेटामधले कॉम्प्युटर्स आमच्या ताब्यात आहेत आता. आता क्वांटिकोहून एक इइआर टीम येतेय...”

“काय?”

“इइआर. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स रिट्रीव्हल टीम. त्यांचं विमान तिथून निघालंय. ते वेस्टर्न डेटामध्ये जाऊन तिथल्या कॉम्प्युटर्समधून माहिती खणून काढतील. शिवाय आज आपल्याला शॅवेझने सांगितलं ना की ४५ दिवसांचं रेकॉर्डिंग ते ठेवतात. तेही बघता येईल.”

मी अजूनही मॅकगिनिस आणि स्टोन हे दोघेही खुनी आहेत आणि एकत्र काम करत आहेत यावर विचार करत होतो.

“तुला काय वाटतं,” मी तिला विचारलं, “हा एकच खुनी आहे की दोघे आहेत?”

“मी खात्रीलायक काही सांगू शकत नाही. पण मला वाटतंय की दोघे असावेत.”

“का?”

“तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं की आपला अनसब एल.ए.ला आला, त्याने तू घरी नाहीस हे पाहिलं, मग तो तुझ्या घरात घुसला, त्याने तुझ्या मेल आयडीवरून अँजेलाला मेल पाठवलं आणि तुझ्या घरी बोलावलं, ती आल्यावर मग तिचा खून केला आणि मग तो तुझ्यामागे वेगासला आला. विमानाने.”

“हो.”

“आम्ही लॅक्स आणि बरबँक इथून वेगासला त्या संध्याकाळपासून गेलेल्या प्रत्येक फ्लाईटच्या प्रवाशांची नावं पाहिली. फक्त चार जणांनी त्या रात्री आयत्या वेळी तिकिटं विकत घेतली होती. बाकी प्रत्येकाने आधीच तिकिट घेतलं होतं. एजंट्सनी यातल्या तिघांना शोधून काढलं आणि त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली. ते निर्दोष आहेत. चौथा तू.”

“मग त्याने गाडी नेली असेल एल.ए.हून वेगासला.”

तिने नकारार्थी मान डोलावली, “ जर तसं केलं असेल त्याने तर मग ते गो पॅकेज पाठवायची काय गरज होती? आपण असा अंदाज बांधलाय की त्याने तुझी गन गो पॅकेजने पाठवली. तो जर गाडी घेऊन वेगासला जाणार होता, तर त्याने तुझी गन गाडीतून स्वतःबरोबर नेली असती. समजलं आता? गो पॅकेज पाठवण्याचं कारण तो विमानाने जाऊन वेगासला ते उचलणार होता किंवा मग दुसरं कोणीतरी त्याच्या वतीने ते वेगासला उचलणार होतं.”

“ओके. म्हणजे अँजेला त्या trunkmurder.com साईटवर गेली आणि त्यामुळे यांची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी टाईम्सची सिस्टिम हॅक करून माझा मेल वाचला. आणि मग त्यातला एक एल.ए.ला तिच्यामागे गेला आणि दुसरा वेगासला माझ्या मागे आला.”

“बरोबर.”

“पण मग तिच्या फोनचं काय?मला अनसबने फोन केला होता, तो तिच्या मोबाईल फोनवरून केला होता, आणि तू मला म्हणाली होतीस की त्याने तो फोन वेगासच्या एअरपोर्टवरून केला होता. तिचा फोन त्याच्याकडे कसा पोचला?”

“सोपं आहे. त्याने तुझी गन आणि तिचा फोन अशा दोन गोष्टी गो पॅकेजमार्फत पाठवल्या असणार. तुझ्याविरुद्ध त्यांना पुरावा तयार करायचा होता. त्यांच्या मूळ योजनेनुसार तू हॉटेल नेवाडामध्ये आत्महत्या करणार होतास. पोलिसांना तुझी गन आणि तिचा फोन तुझ्या खोलीत सापडले असते आणि अँजेलाचा मृतदेह तुझ्या घरी. पोलिसांनी तिचा खून तू केलास असाच निष्कर्ष काढला असता. पण जेव्हा हे होऊ शकलं नाही तेव्हा स्टोनने तुला एअरपोर्टवरून फोन केला. बहुतेक आपली दिशाभूल करणं आणि एकाऐवजी दोन खुनी आहेत या सत्यावरून आपलं लक्ष विचलित करणं हा त्याचा हेतू असेल.”

“अच्छा. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मॅकगिनिसने एल.ए.मध्ये अँजेलाचा खून केला आणि स्टोन वेगासला माझ्या मागे आला.”

“हो. तू म्हणाला होतास की एल्विस – जो तुला हॉटेल नेवाडामध्ये भेटला होता, तो जास्तीत जास्त तीस वर्षांचा असेल. स्टोन सव्वीस वर्षांचा आहे आणि मॅकगिनिस सेहेचाळीस. सव्वीस वर्षांचा माणूस तिशीचा दिसू शकतो पण सेहेचाळीस वर्षांच्या माणसाला तसं दिसणं किंवा तसं वेषांतर करणं खूपच कठीण आहे. जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे स्टोन एल्विस आहे असं म्हणायला हरकत नाही.”

तिचं म्हणणं बरोबर होतं.

“शिवाय अजून एक गोष्ट आहे. अगदी आपल्यासमोर. इतक्या दिवसांपासून. त्यावरून तर हे स्पष्ट होतं की खुनी एक नाहीये, तर दोघे आहेत.”

“काय?”

“डेनिस बॅबिट. तिचा मृतदेह तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये होता पण तिची गाडी दक्षिण एल.ए.मध्ये रोडिया गार्डन्सच्या बाहेर सोडून दिलेली होती. अलोन्झो विन्स्लोने तिथूनच ती उचलली.”

“हो. मग?”

“मग जर हा खुनी एकटाच असेल तर मग तिची गाडी दक्षिण एल.ए.च्या मध्ये सोडल्यावर तो तिथून बाहेर कसा पडला? रात्रीच्या वेळी, ड्रग्जसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि ९९% काळ्या लोकांची वस्ती असलेल्या भागात एक गोरा माणूस सहज उठून दिसला असता आणि पोलिसांना त्याबद्दल कुठूनतरी समजलं असतंच. जरी तो बसने गेला किंवा त्याने टॅक्सी बोलावली, तरी त्याला तिथे थोडा वेळ तरी थांबावं लागलं असतं. मेट्रोचं जवळचं स्टेशनसुद्धा तिथून एक मैलावर आहे. शिवाय इतका योजनाबद्ध रीतीने खून करणारा माणूस या इतक्या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करेल असं मला तरी वाटत नाही.”

“बरोबर.”

मी आता मला समजलेल्या आणि आधी माहित असलेल्या माहितीची मनातल्या मनात तुलना करत होतो. तिच्या बोलण्याने मी भानावर आलो, “मला आता परत जायला लागेल. मी तुझ्याबरोबर हॉटेलमध्ये परत नाही येऊ शकणार.”

“ओके. तू काय करणार आहेस इथे?”

“मी त्या इइआर टीमबरोबर काम करणार आहे. सुदैवाने तुझ्याबरोबर आल्यामुळे मला वेस्टर्न डेटाची माहिती आहे, आणि या केसबद्दलही. त्यामुळे मला मेसाला जाऊन सगळं बघावं लागेल.”

“म्हणजे वेस्टर्न डेटा...”

“हो. एजंट्सनी संपूर्ण ऑफिस सील केलंय आणि लोकांना घरी जायला सांगितलंय. अगदी थोडे लोक आहेत. होस्टिंगमधला ओ’कॉनर आणि बंकरमध्ये आपला मित्र कार्व्हर हे दोन कंपनीमधले वरिष्ठ अधिकारी ब्युरोला काही मदत लागली तर म्हणून थांबणार आहेत.”

“पण वेस्टर्न डेटाला त्यांचा गाशा गुंडाळावा लागेल. त्यांचा बिझिनेस बंद होईल.”

“त्याला इलाज नाही. जर कंपनीचा संस्थापकच लोकांनी विश्वासाने सोपवलेल्या माहितीचा गैरवापर करून खुनासारखे गुन्हे करत असेल, तर अशी कंपनी बंद होणं हेच चांगलं.”

“बरोबर.”

“मला आता जायला लागेल जॅक. तुला एकदा घट्ट मिठी मारायची इच्छा आहे मला पण तसं नाही करता येणार आता. निदान सगळ्यांच्यासमोर तरी नाही. तू काळजी घे. आणि मला फोन कर. जर तुला स्टोनचा परत फोन आला किंवा मॅकगिनिसबद्दल काही समजलं तर मला कळवायला विसरू नकोस. आणि हो, माझ्या बॅग्ज खाली रिसेप्शनवर ठेव. मी मेसा वेर्डे इनमध्येच राहणार आहे, पण एफ.बी.आय. माझ्यासाठी वेगळी रूम घेईल. मला तिथे चेक-इन करावं लागेल.”

“ओके.”

दहा मिनिटांनी मी एकटाच माझ्या गाडीतून मेसाच्या दिशेने चाललो होतो. फ्रेडी स्टोनचं गोदाम मला माझ्या बाजूला असलेल्या आरशात लहान होताना दिसत होतं, आणि माझ्या मनात सकाळी शॅवेझने वापरलेला एक शब्द घुमत होता – डार्क फायबर. एखाद्याच्या मनात एवढा अंधार असू शकतो हा विचारच थरकाप उडवणारा होता.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

एस's picture

12 Sep 2015 - 1:14 am | एस

अजून थरारक, अजून गुंतागुंतीची!...

पुभाप्र!

स्रुजा's picture

12 Sep 2015 - 1:37 am | स्रुजा

होस्टिंगमधला ओ’कॉनर आणि बंकरमध्ये आपला मित्र कार्व्हर हे दोन कंपनीमधले वरिष्ठ अधिकारी ब्युरोला काही मदत लागली तर म्हणून थांबणार आहेत.”

कार्व्हर - १, आपला हीरो -०.

रातराणी's picture

12 Sep 2015 - 8:06 am | रातराणी

प्रचंड सहमत! सुरुवातीला स्मार्ट वाटलेला नायक आता एकदम येडचाप वाटतोय :)

नाखु's picture

12 Sep 2015 - 8:36 am | नाखु

कदाचीत नायीकेने खेळलेली चाल असू शकते (माईंड गेम)

थरारक वेगवान आणि अतर्क्य ( शब्दशंपदा संपली)
आ$$$$$$$$$$$$$$$$$$चंबीत नाखु

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 1:54 am | प्यारे१

यासाठी समाप्त असा भाग आल्याशिवाय वाचत नाही मालिका.
बा द वे कार्व्हर लोक चांगले असतात असा समज झाला होता एक होता कार्व्हर वाचल्यापासनं.
(आमटे आडनाव असलेला गुंड असू शकतो असा विचार डोक्यात येत नाही. तसं कार्व्हर म्हणजे जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर आणि कार्व्हर घरातला म्हणून माणूस चांगला असणार असा 'माझा' समज झालाय.)

सामान्य वाचक's picture

12 Sep 2015 - 7:51 am | सामान्य वाचक

आता भाग वाचणार

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Sep 2015 - 8:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास.

अजया's picture

12 Sep 2015 - 9:50 am | अजया

किती तो गोंधळ घालताएत.मला जावेच लागणार बहुतेक ;)
रच्याकने,या कादंबरीवर चित्रपट काढला इंग्रजी हिंदी मराठी तर कास्टिंग कोणाचे काय करता येईल विचार करतेय!

नाखु's picture

12 Sep 2015 - 1:51 pm | नाखु

सहय्यक दिग्दर्शक क्र ५ साठी आम्चा विचार करणे.

लोभ आहेच लक्ष्यात रहावा म्हणून आठवण

नाखुस विसरभोळे.

१ नंबर ! थरार वाढतच चाललाय !!! येवू द्या लवकर लवकर भाग २६.

santosh mahajan's picture

12 Sep 2015 - 11:45 am | santosh mahajan

मस्तच

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Sep 2015 - 6:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

पुभाप्र !

आज एका बैठकीत २५ भागांचा फडशा पाडला! पहिल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमात वाचताना पेपरबॅक आवृत्ती मधली कादंबरी वाचताना येतो तसला फील आला!

कलमनवाज़ शान ए मिपा बोका-ए-आझम!!

भन्नाट मालिका, भन्नाट अनुवाद.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 6:57 pm | शाम भागवत