द स्केअरक्रो - भाग ‍२४

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
6 Sep 2015 - 7:54 pm

द स्केअरक्रो भाग २३

द स्केअरक्रो भाग २४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि त्याच्या समोर असलेल्या मोठ्या स्क्रीनकडे बघत होता. जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रतिमा त्याला समोर दिसत होत्या. इतक्या ठिकाणी त्याने कॅमेरे बसवले होते की त्यामुळे वेस्टर्न डेटाच्या इमारतीच्या आजूबाजूचा भाग आणि तिथपर्यंत येणारा मॅककेलिप्स रोडचा भाग या सगळ्यावर त्याला नजर ठेवता येत होती.

त्यांना शोधायला त्याला वेळ लागला नाही. ते परत येतील याची तर त्याला खात्री होतीच. लोकांचं विचारचक्र कसं चालतं हा त्याच्या खास अभ्यासाचा विषय होता. पब्लिक स्टोरेज सेंटर नावाच्या एका इमारतीजवळ मॅकअॅव्हॉय आणि वॉलिंग यांची गाडी त्याला दिसली. ते वेस्टर्न डेटाच्या ऑफिसवर नजर ठेवून होते, आणि तो त्यांच्यावर. पण त्यांना ते माहित नव्हतं आणि तसा त्यांना संशय येईल याची शक्यताही नव्हती.

कार्व्हरने थोडावेळ विचार केला. एक क्षणभर त्यांना तसंच उन्हामध्ये शिजत राहू द्यायचा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण नंतर त्याने तो विचार बदलला, इंटरकॉम उचलला आणि तीन बटन्स दाबली.

“मिझ्झू, जरा माझ्या ऑफिसमध्ये ये.”

मिझ्झूला यायला अर्धं मिनिट लागलं.

“दरवाजा बंद कर.” कार्व्हर म्हणाला.

मिझ्झूने सांगितल्याप्रमाणे केलं आणि कार्व्हरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, “काय झालं बॉस?”

“फ्रेडीच्या सगळ्या वस्तू असलेला तो जो कार्डबोर्ड बॉक्स आहे तो तू घेऊन जा आणि त्याच्या घरी जाऊन त्याला दे.”

“अरे पण तूच म्हणालेलास ना की फ्रेडी बेपत्ता झालाय म्हणून?”

कार्व्हरने थंडपणे त्याच्याकडे पाहिलं. आजकालची पोरं फार उलटून बोलतात, त्याच्या मनात विचार येऊन गेला.

“मी म्हणालो होतो की अशी शक्यता आहे. ते सोड. आज आपल्याकडे जे क्लायंट भेटायला आले होते, त्यांनी तो बॉक्स पाहिला. त्या महामूर्ख फ्रेडीनेसुद्धा तो इतका सहज दिसेल असा ठेवला होता. त्या दोघांच्या लक्षात आलं की एकतर आपण त्याला डच्चू दिलेला आहे किंवा तो इथून नोकरी सोडून निघून गेलेला आहे. आता कोणीही क्लायंट जेव्हा अॅग्रीमेंट करण्यासाठी जेव्हा इथे येतो, तेव्हा अशा गोष्टी त्यांना दिसता कामा नयेत. आपल्याविषयी त्यांच्या मनात उगाचच शंका निर्माण होते ना त्यामुळे. शेवटी आपला हा सगळा बिझिनेस विश्वासावरच आधारलेला आहे.”

“बरोबर आहे.”

“ठीक आहे. आता तू एक काम कर. तो बॉक्स घे. तुझ्या मोटरसायकलच्या कॅरिअरला नीट बांध आणि फ्रेडीच्या घरी घेऊन जा. तो कुठे राहतो माहित आहे ना तुला?”

“हो. मी गेलोय एकदा त्याच्या घरी.”

“ओके. ये मग तू.”

“पण कर्ट आणि मी सदतिसाव्या टॉवरमध्ये एकदम तापमान का वाढलं ते बघत होतो आणि आम्ही त्याचं कारण शोधून काढलंय.”

“चांगलं आहे की मग. आता कर्ट एकट्याने ते सांभाळू शकेल. तू तो बॉक्स घेऊन जा.”

“आणि तिथून इथे परत येऊ?”

कार्व्हरने त्याच्या घड्याळाकडे पाहिलं. मिझ्झू बहुतेक उरलेला सगळा दिवस कुठेतरी उनाडक्या करायच्या विचारात होता. अर्थात जे कार्व्हरला माहित होतं, ते त्याला माहित नव्हतंच. तो इथे परत येणार नव्हता. निदान आजच्या दिवशी तर नक्कीच नाही.

“ठीक आहे,” त्याने हे आपण आपल्या मनाविरुद्ध करत असल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणले, “उरलेला दिवस तुला सुट्टी. पण आता निघ.”

मिझ्झूने ऑफिसबाहेर जाऊन दरवाजा लोटला. कार्व्हरने परत स्क्रीनकडे पाहायला सुरुवात केली. मिझ्झू एकदा का त्याच्या प्रिय मोटरसायकलवर बसून आपल्या रस्त्याला लागला, की मग कार्व्हर त्याच्या मागावर जाणार होता. अर्थातच ऑफिसमधून.

कार्व्हरच्या नकळत त्याने गुणगुणायला सुरुवात केली.

मिझ्झू बराच वेळ घेत होता. शेवटी तो स्क्रीनवर आला. त्याच्या हातात तो बॉक्स आणि दोन मोठ्या रंगीत दोऱ्या होत्या. त्याने तो बॉक्स त्याच्या बाईकच्या कॅरिअरला बांधला. हे करत असताना तो सिगरेटही ओढत होता आणि कार्व्हरला दिसलं की त्याने ती अगदी फिल्टरपर्यंत ओढलेली आहे. अच्छा. म्हणून याला वेळ लागला. बहुतेक तो इतरांना भेटून आणि थोडंफार त्यांना जळवूनही आला असावा.

शेवटी एकदाचं मिझ्झूने सिगरेटचं थोटूक तिथे असलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात फेकलं, डोक्यावर हेल्मेट चढवलं, बाईकवर बसून इग्निशन चावी फिरवली, बाईक चालू केली आणि तो गेटबाहेर गेला.

त्याने रस्ता पार केल्यावर कार्व्हरने लगेच पब्लिक स्टोरेज सेंटरकडे मोर्चा वळवला. मॅकअॅव्हॉय आणि वॉलिंग यांच्या गाडीसमोरून मिझ्झूची बाईक गेल्यावर त्यांनी ताबडतोब त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली, हे त्याने पाहिलं.

#######################################################################

“त्या बॉक्सच्या मागावर राहा,” रॅशेल मला म्हणाली. समोरची बाईक म्हणजे नवीकोरी दणदणीत हार्ले डेव्हिडसन किंवा त्यासारखी कुठलीतरी होती. तिचा माझ्या टिनपाट गाडीने पाठलाग करणं हा माझा प्लॅन नव्हता, पण आता इलाज नव्हता. ही संधी अचानकपणे आमच्यासमोर चालून आली होती आणि तिचा फायदा उठवायलाच हवा होता. मी अॅक्सिलरेटर जीव खाऊन दाबला आणि त्या बाईकच्या जवळजवळ शंभर यार्ड जवळ आलो.

“जास्त जवळ जाऊ नकोस!” रॅशेल ओरडली.

“तू शांत हो जरा. मी जवळ जात नाहीये. फक्त तो निसटून जाऊ नये आणि त्याला संशय येऊ नये एवढं अंतर ठेवतोय.”

ती पुढे झुकून डॅशबोर्डच्या आधाराने जवळजवळ उभी राहण्याच्या बेतात होती, “हे काही बरोबर वाटत नाहीये मला. बाईकचा पाठलाग करणं ही महाकठीण गोष्ट आणि हा तर पळवतोय त्याची बाईक.”

हे खरं होतं. कितीही वाहतूक कोंडी असली तरी बाईक्स त्यातून सहज सटकतात. जवळपास सगळ्या बाईकवाल्यांना वाहतुकीचे नियम हा जुलूम वाटतो आणि त्यामुळे रस्त्यांवर लेनची शिस्त पाळणं वगैरे गोष्टींशी त्यांचा सुतराम संबंध नसतो. हा बाईकवाला तसाच होता.

“मी रस्त्याच्या बाजूला थांबवतो. तू चालव.”

“नको. तूच चालव. फक्त त्याला निसटू देऊ नकोस.”

पुढची दहा मिनिटं मी माझा एल.ए.मध्ये गाडी चालवण्याचा सगळा अनुभव पणाला लावला आणि त्या बॉक्सवरून माझी नजर हटू दिली नाही.

आमचं नशीब जोरावर होतं कारण त्याने फिनिक्सकडे जाणारा फ्रीवे पकडला. इथे त्याच्या मागावर राहणं हे तुलनेने सोपं होतं. फ्रीवे असल्यामुळे तो जरी वेगात चालवत होता, तरी मी त्याच्या मागावर राहू शकत होतो. जवळजवळ पंधरा मिनिटं असं चालवल्यावर त्याने इंटरस्टेट १० वरून गाडी इंटरस्टेट १७ वर घेतली आणि फिनिक्स शहरात प्रवेश केला.

इतका वेळ बेचैन आणि अस्वस्थ असलेली रॅशेल आता तिच्या सीटमध्ये व्यवस्थित मागे रेलून बसली होती.

“हा मिझ्झू आहे,” ती म्हणाली, “त्याच्या कपड्यांवरून सांगू शकते मी.”

मला ते काहीच आठवत नव्हतं. एखादा माणूस अनसब आहे की नाही हे पाहण्यात मी एवढा गुंग झालेलो होतो की हे तपशील माझ्या नजरेतून निसटले होते. पण रॅशेलसारख्या प्रशिक्षित आणि अनुभवी एजंटच्या नजरेतून ते निसटणं शक्यच नव्हतं.

“जर तू म्हणत असशील तर असेल. तो काय करतोय पण?”

मी गाडीचा वेग थोडा कमी केला. आमच्यात आणि त्याच्यात आता सत्तर यार्ड एवढं अंतर असेल.

“तो फ्रेडला त्याचा बॉक्स नेऊन देतोय.”

“ते कळलंय मला पण आत्ताच का?”

“कदाचित त्याचा लंच ब्रेक झाला असेल किंवा त्याचं आज दिवसभराचं काम संपलं असेल. अनेक कारणं असू शकतात.”

मला हे थोडंसं खटकलं होतं, पण त्याच्यावर विचार करायला माझ्याकडे वेळ नव्हता. तो जो कुणी होता त्याने त्याची बाईक सराईतपणे इंटरस्टेटच्या चार लेन्समधून काढली आणि तो पुढच्या एक्झिटच्या दिशेने गेला. मी त्याचं अनुकरण केलं आणि त्याच्या पाठोपाठ त्या एक्झिटजवळ गेलो. आता आमच्यामध्ये एक दुसरी गाडी होती. तिथे हिरवा दिवा मिळाल्यावर बाईक थॉमस रोड नावाच्या रस्त्यावर वळली. मीही त्याच्या मागे गेलो.

या भागात सगळी औद्योगिक गोदामं दिसत होती. मध्ये मध्ये छोटी दुकानंसुद्धा होती. एक आर्ट गॅलरीसुद्धा दिसली मला.

विटकरी लाल रंग असलेल्या एका एकमजली इमारतीसमोर बाईक थांबली आणि ती चालवणारा उतरला. त्याने हेल्मेट काढल्यावर तो मिझ्झू आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी थोडा लांबच थांबलो होतो. एकतर इथे तुरळक वाहनं होती आणि रस्त्यावर फारशा गाड्याही पार्क केलेल्या नव्हत्या. त्यामुळे कोणीही पाहिलं असतं, तर आम्ही कुणावर तरी पाळत ठेवलेली आहे हे पाहणाऱ्याच्या लक्षात आलं असतं.

मिझ्झूला मात्र कुठलाही संशय आलाय असं मला वाटत नव्हतं. त्याने बॉक्सला बांधलेल्या दोऱ्या सोडल्या आणि बॉक्स हातात घेऊन तो त्या विटकरी रंगाच्या इमारतीच्या एका बाजूला गेला. तिथे एक सरकता दरवाजा होता. त्याच्या हँडलला एक साखळी लटकत होती आणि तिच्या टोकाला एक छोटं डंबेल टांगलेलं होतं. मिझ्झूने ते पकडून साखळी जोराने दरवाज्यावर आपटली. तिचा आवाज मला मी गाडी जिथे पार्क केली होती तिथपर्यंत ऐकू आला.

तो थांबला आणि आम्हीही थांबलो पण कुणीही दरवाजा उघडला किंवा सरकवला नाही. मिझ्झूने परत एकदा दरवाजा वाजवला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो बाजूलाच असलेल्या एका मोठ्या खिडकीपाशी गेला. या खिडकीवर इतकी धूळ साठली होती की आतमधल्या माणसांना पडद्याची गरज नव्हती. मिझ्झूने त्याच्या हाताने थोडी धूळ पुसायचा आणि आत पहायचा प्रयत्न केला. त्याला आत कोणी दिसलं अथवा नाही, हे मी उभा होतो तिथून कळत नव्हतं. तो परत दरवाज्याजवळ गेला आणि त्याने परत एकदा दरवाजा वाजवला. नंतर त्याने दरवाज्याचं हँडल पकडलं आणि ओढलं. दरवाजा अगदी आरामात सरकला. त्याला आणि आम्हाला, दोघांनाही आश्चर्य वाटलं. कोणी कुलूप लावलं नव्हतं बहुतेक.

मिझ्झू थोडा घुटमळला, आणि एवढ्या वेळात पहिल्यांदा त्याने आजूबाजूला पाहिलं. पण आमची गाडी त्याच्या लक्षात आल्यासारखं वाटलं नाही. त्याने दरवाज्यातून थोडं आत झुकून हाक मारली. आतून प्रत्युत्तर आलं की नाही ते मला समजलं नाही. तो आतमध्ये गेला आणि त्याने दरवाजा बंद केला.

“काय करायचं?” मी विचारलं.

“आत जायला लागेल आपल्याला,” रॅशेल म्हणाली, “फ्रेड आतमध्ये नाहीये आणि मिझ्झूने इथे कुलूप लावलं किंवा आपल्या तपासामध्ये अत्यंत महत्वाची अशी एखादी गोष्ट आतमधून उचलली तर? आपण इथे उभे राहून फक्त अंदाज करू शकतो. त्यापेक्षा आत जाऊ या.”

मी गाडी त्या इमारतीसमोर आणली. मी ती पार्क करण्याच्या आत रॅशेल गाडीतून बाहेर पडून दरवाज्याच्या दिशेने धावली होती. मीही गाडी पार्क करून तिच्यामागे गेलो.

रॅशेलने दरवाजा अगदी थोडासा सरकवला, जेमतेम आम्ही जाऊ शकू एवढा. आतमध्ये अंधार होता आणि माझे डोळे त्याला सरावेपर्यंत एक अर्धा मिनिटाचा वेळ गेला असेल. जेव्हा मला नीट दिसायला लागलं तेव्हा मी पाहिलं की रॅशेल माझ्या जवळजवळ वीस फूट पुढे होती आणि तेव्हा मी आजूबाजूला पाहिलं. हे एक मोठं गोदाम होतं. पार्टीशन वापरून त्याचे वेगवेगळे भाग केलेले होते. एक वेगवेगळ्या प्रकारच्या डंबेल्सचा रॅक होता आणि आणि एक बास्केटबॉल रिंगपण होती. त्याच्याच थोडं पुढे एक कपड्यांचं कपाट होतं आणि एक अस्ताव्यस्त पलंग होता. एका पार्टीशनच्या जवळ रेफ्रिजरेटर ठेवला होता आणि त्याच्याच बाजूला एक टेबल होतं. त्यावर एक मायक्रोवेव्ह ओवन ठेवलेला होता. मिझ्झूने आता आणलेला बॉक्स त्या मायक्रोवेव्हच्या शेजारी ठेवला होता. इथे किचन वाटावं असं काहीही नव्हतं. मिझ्झू कुठेही दिसत नव्हता.

मी आणि रॅशेल एका पार्टीशनला ओलांडून पुढे गेलो आणि मला एक ऑफिससारखी बनवलेली जागा दिसली. एक डेस्क होतं आणि त्याच्यावर तीन स्क्रीन्स ठेवलेले होते. त्यांच्या खाली एक कॉम्प्युटर होता. पण कीबोर्ड मात्र नव्हता. आजूबाजूला थोडीफार पुस्तकं होती.

“गेला कुठे हा?” मी कुजबुजत्या आवाजात बोललो.

रॅशेलने मला शांत राहायचा इशारा केला आणि ती त्या कॉम्प्युटरपाशी गेली. ती जिथे कीबोर्ड असायला हवा होता तिथे बघत होती.

“कीबोर्ड गेलेला आहे. याचा अर्थ या माणसाला माहित आहे की पोलिस....”ती कुजबुजत्या आवाजात म्हणाली, आणि थांबली. आम्हाला दोघांनाही बाथरूम फ्लशचा आवाज ऐकू आला. एका कोपऱ्यातून आला होता. त्याच्याच पाठोपाठ दरवाजा सरकवल्याचा आवाजही ऐकू आला. रॅशेलने इकडेतिकडे पाहिलं तेव्हा तिला एका पुस्तकावर कॉम्प्युटर केबल्स बांधायला वापरतात तसा केबल टाय दिसला. तिने तो उचलला आणि आम्ही दोघेही त्या पार्टीशनला पाठ लावून दबा धरून बसलो.

मिझ्झूच्या पावलांचा आवाज आमच्याच दिशेने येत होता. रॅशेल पार्टीशनच्या अगदी कडेला उभी होती. मिझ्झू पार्टीशन ओलांडून पुढे गेल्यावर तिने पाठीमागून त्याच्यावर झेप घेतली, त्याची मानगूट धरून त्याला पलंगाच्या दिशेने ढकललं, त्याला धक्का देऊन गादीवर तोंडघशी पाडलं आणि ती त्याच्या पाठीवर बसली.

“हे काय...” मिझ्झूने बोलायचा प्रयत्न केला.

“गप्प बस. काहीही हालचाल करू नकोस!” ती कडाडली.

तिने त्याचे हात पाठीमागे खेचले आणि त्याची मनगटं त्या केबल टायने बांधली.

“काय चाललंय हे?मी काय केलंय?”

त्याने मान वळवून पाठी बघायचा प्रयत्न केला पण रॅशेलने त्याचं डोकं परत गादीत दाबलं.

“मी विचारतेय त्या प्रश्नांची उत्तरं दे. काय करतोयस तू इथे?”

“मी फ्रेडीचं सामान परत करायला आलो होतो आणि बाथरूममध्ये गेलो होतो.”

“दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीशिवाय घुसणं हा गुन्हा आहे हे माहित आहे ना तुला?”

“मी घुसलो वगैरे नाहीये. आणि मी काहीही चोरलेलं नाहीये. तुम्ही फ्रेडीला विचारलं तर तो मला काही म्हणणार नाही.”

“फ्रेडी कुठे आहे?”

“मला नाही माहित. तू कोण आहेस पण?”

“ते सोड. फ्रेडी कोण ते सांग.”

“तो इथे राहतो.”

“कोण आहे तो पण?”

“आता कोण ते मला काय माहित? फ्रेडी स्टोन. मी त्याच्याबरोबर काम करतो. करायचो. एक मिनिट! मी तुला आज आमच्या ऑफिसमध्ये पाहिलंय. क्लायंट म्हणून. तू इथे काय करते आहेस?”

रॅशेल त्याच्या पाठीवरून उतरली. आता तिची ओळख लपवण्याचं काही कारण नव्हतं. तिचं वजन पाठीवरून उतरल्यावर मिझ्झूने लगेच उठून बसायचा प्रयत्न केला. मी पुढे आलो. तो आळीपाळीने आमच्याकडे बघत होता.

“फ्रेडी कुठे आहे?” रॅशेलने तिचा खास ठेवणीतला एफ.बी.आय.आवाज लावला.

“मला...मला नाही माहित. त्याला शेवटचा कोणीच पाहिलेला नाहीये.”

“कधीपासून?”

“आता कधीपासून ते मी काय सांगणार? तो सोडून गेला तेव्हापासून. काय चाललंय काय इथे?आधी एफ.बी.आय.वाले आले. आता तुम्ही. तुम्ही कोण आहात पण?”

“त्याची काळजी तू करू नकोस. फ्रेडी जर गायब झाला असेल तर तो कुठे जाऊ शकतो?”

“मला नाही माहित. मला कसं माहित असणार?”

मिझ्झू एकदम उठून उभा राहिला. रॅशेलने त्याला परत पलंगावर ढकललं.

“तू असं करू शकत नाहीस. मला तर वाटतं तुम्ही दोघे पोलिस वगैरे काही नाही आहात. मला माझ्या वकिलाशी बोलायचंय.”

रॅशेल थंडपणे त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या डोळ्यांत पाहिलं, “जर आम्ही पोलिस नाही, तर तुझ्या वकिलाला आम्ही का बोलवू?”

मिझ्झूच्या डोळ्यांत अचानक भीती दाटून आली.

“मी मला माहित आहे ते सगळं तुम्हाला सांगतो,” तो परत आळीपाळीने आमच्याकडे पाहात होता. मी हे सगळं चालू असताना शांतपणे हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभा राहिलो होतो.

“मी सांगितल्यावर तुम्ही मला जाऊ द्याल का?” त्याने माझ्याकडे पाहात विचारलं.

“बघू. तू काय सांगतो आहेस त्याच्यावर ते अवलंबून आहे.” मी म्हणालो.

“मला फ्रेडी कुठे सापडेल?” रॅशेल परत एकदा ओरडली.

“मी बोललो ना तुला,” मिझ्झू हताश स्वरात म्हणाला, “मला नाही माहित. मला माहित असतं तर नक्की सांगितलं असतं.”

“ फ्रेडी काय करतो?तो हॅकर आहे का?” तिने त्या कॉम्प्युटरकडे इशारा केला.

“हो, पण तो जास्त करून ट्रोलिंग करतो. त्याला लोकांच्या खोड्या काढायला आणि त्यांना त्रास द्यायला आवडतं.”

“तुझं काय?तू पण त्याच्याबरोबर असल्या गोष्टी केल्या आहेस?खोटं बोलू नकोस.”

“एकदा. पण मला काही कारणाशिवाय लोकांना त्रास देणं आवडत नाही.”

“तुझं खरं नाव काय?”

“मॅथ्यू मार्सडेन.”

“ओके. मॅकगिनिसचं काय?”

“त्याचं काय?”

“तो कुठे आहे?”

“मला माहित नाही. त्याने आजारी असल्याचा आणि घरी विश्रांती घेत असल्याचा मेल पाठवला होता असं मी ऐकलं होतं.”

“तुझा त्याच्यावर विश्वास आहे? तो खरंच आजारी आहे? ”

“मला नाही माहित. असू शकेल.”

“तू त्याच्याशी बोलला आहेस का?”

“नाही. माझा त्याच्याशी क्वचितच संबंध येतो. माझा बॉस कार्व्हर आहे.”

“ठीक आहे. याहून अधिक काही तुला आम्हाला सांगायचं आहे का?”

“नाही.”

“ठीक आहे. आता उभा राहा”

“काय?”

“उभा राहा आणि वळ.”

“तू काय करणार आहेस?”

तिने न बोलता त्याला उभं केलं आणि वळवलं.

“मी तुम्हाला खरंच मला माहित होतं ते सगळं सांगितलंय.” तो अगदी अजीजीच्या स्वरात बोलला.

रॅशेलला फ्रेडीच्या बॉक्समधल्या मगमध्ये एक कात्री सापडली होती. ती घेऊन ती मिझ्झूच्या जवळ आली.

“जर मला तू खोटं बोलला आहेस हे समजलं तर मी तुला असशील नसशील तिथून शोधून काढीन.” ती त्याच्या कानात कुजबुजली.

तिने कात्रीने त्याच्या हातांना बांधलेला केबल टाय कापला.

“आता इथून चालता हो आणि कोणाला काही सांगितलंस तर खबरदार. जर तू बोललास तर आम्हाला समजेल.”

त्याने निमुटपणे मान डोलावली आणि तो जवळपास पळतच तिथून निघून गेला. आम्हाला मोटरसायकलचा आवाज ऐकू आला.

“रॅशेल, तो पोलिसांकडे जाऊ शकतो. आपल्याला इथून बाहेर पडायला पाहिजे.” मी म्हणालो.

“फक्त दहा मिनिटं. आपण इथे फ्रेडीबद्दल काही मिळतंय का ते बघूया. तुझ्या बोटांचे ठसे कशावरही सोडू नकोस.”

“हे कसं करायचं आता?”

“तुझं पेन असेलच ना तुझ्याकडे? ते वापर.”

आम्हाला दहा मिनिटांची गरज नव्हती. फ्रेडी स्टोनच्या कुठल्याही व्यक्तिगत वस्तू किंवा गोष्टी इथे दिसत नव्हत्या. त्या घेऊनच तो गायब झाला होता बहुतेक. मी रेफ्रिजरेटरमध्ये पाहिलं. तोही जवळपास रिकामा होता. दोन-तीन फ्रोझन पिझ्झाचे बॉक्सेस होते आणि एक बर्फाचा ट्रे होता. कपड्यांचं कपाट, पलंग, गादी – कुठेही काहीही नव्हतं. कचऱ्याचे डबेही रिकामे होते.

“चल, निघू या,” ती म्हणाली.

मी पलंगाखाली काही सापडतंय का ते बघत होतो. तिचा आवाज ऐकून मी वर पाहिलं तर ती दरवाज्याच्या दिशेने चालली होती. मला एकदम आठवलं की मिझ्झूने जो बॉक्स आणला होता, त्यात काही पेन ड्राईव्हज होते. कदाचित त्यांच्यातून आम्हाला माहिती मिळू शकेल. मी तिला हे सांगायला तिच्यामागे धावलो आणि दरवाज्यातून बाहेर आलो. पण ती आमच्या गाडीपाशी नव्हती. मी वळलो आणि मला ती इमारतीच्या मागच्या बाजूला जाताना दिसली. मीही धावत तिथे गेलो.

रॅशेल कुठे चालली होती ते मला समजलं. या इमारतीच्या मागे दोन मोठे कचऱ्याचे डबे होते.

“फ्रेडीच्या घरात तीन कचऱ्याचे डबे होते,” ती मला म्हणाली, “आणि तिन्ही रिकामे होते.”

तिने त्या दोन्ही मोठ्या डब्यांची झाकणं उघडली. आतमधून एकच भपकारा आला.

“तू फ्रेडीच्या घरातली सगळी कपाटं पाहिलीस ना?” तिने मला विचारलं.

“हो.”

“कचरा ठेवायला वापरतात त्या प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या होत्या का?”

मी जरा स्मरणशक्तीला ताण दिला, “हो. सिंकच्या खाली असलेल्या डब्यात एक पिशवी होती.”

“काळी की पांढरी?”

“काळी. आणि मला वाटतं तिला लाल कॉर्ड होती.”

“ओके. मग शोधणं सोपं आहे.”

ती आता त्या मोठ्या डब्यातल्या वस्तू इकडेतिकडे करून काही मिळतंय का ते पाहात होती. सुदैवाने तो अर्धाच भरलेला होता पण त्याच्यातून येणारी दुर्गंधी भयानक होती. बराचसा कचरा हा प्लास्टिक पिशव्यांमध्ये नव्हता तर सरळ इथे टाकण्यात आला होता.

“इथे काही नाहीये. दुसरा डबा बघू या.”

आम्ही हा डबा बंद केला आणि दुसऱ्या डब्यात बघितलं. इथला भपकारा तर डोकं उठवणारा होता. एक क्षणभर मला आतमध्ये फ्रेडी स्टोनचं प्रेत असल्याचा संशय आला होता.

“काळजी करू नकोस. इथे कुणाचंही प्रेत वगैरे नाहीये,” रॅशेल म्हणाली, “कुजलेल्या प्रेताचा वास कसा येतो ते मला माहित आहे.”

मी नाकावर रुमाल दाबत आत पाहिलं. इथे कचरा पिशव्यांमध्ये ठेवलेला होता. फारच थोडा कचरा पिशव्यांच्या बाहेर होता. पण बऱ्याचशा पिशव्या फाटल्या होत्या आणि आतमधला कचरा बाहेर आलेला होता.

“तुझे हात लांब आहेत. या पिशव्या बाहेर काढ.” ती म्हणाली.

“नवीन शर्ट आहे माझा,” मी कुरकुर केली, पण तिच्यासमोर इलाज नव्हता. न फाटलेली प्रत्येक प्लास्टिक पिशवी मी बाहेर काढली. रॅशेल कात्री घेऊनच बाहेर आली होती. तिने त्या पिशव्यांच्या तोंडाजवळ कापून आतल्या गोष्टी बघायला सुरुवात केली. जवळपास बारा-तेरा पिशव्या होत्या. एका पिशवीत एक पिझ्झा बॉक्स होता. मी तो ओळखला.

“ही पिशवी त्याच्या घरातून आलेली आहे. त्याच्या फ्रीजमध्ये हाच बॉक्स होता.”

“ग्रेट. काहीही व्यक्तिगत स्वरूपाचं मिळतं का ते बघ.”

ती बाकीच्या पिशव्या बघण्यात गर्क झाली. मी त्या पिशवीतल्या गोष्टी बाहेर काढल्या. सगळा कचरा खाण्याशी संबंधित होता. संत्र्यांच्या आणि केळ्यांच्या साली, पिझ्झा बॉक्स, सॉफ्ट ड्रिंक कॅन्स, सँडविच कार्टन्स. या बॉक्सच्या अगदी तळाला एक वर्तमानपत्र होतं. मी ते बाहेर काढलं आणि तारीख पाहिली. मी ज्या दिवशी लास वेगासमध्ये होतो त्या दिवशीची म्हणजे गेल्या आठवड्यातल्या बुधवारची तारीख होती. हा पेपर प्रवासी करतात तसा घडी करून ठेवलेला होता. मी नाव पाहिलं – लास वेगास रिव्ह्यू जर्नल.

मी घडी उघडली आणि पाहिलं. पहिल्याच पानावर एका माणसाचा फोटो होता आणि त्याला कोणीतरी पेनाने दाढीमिश्या आणि सैतानाला असतात तशी शिंगं काढली होती. त्याच फोटोवर पेनाने काहीतरी लिहिलेलं होतं, पण कॉफीच्या डागाने ते नीट दिसत नव्हतं. मी वाचायचा प्रयत्न केला.

“काय करतोयस तू?”रॅशेलने विचारलं.

“मला एक लास वेगासचा पेपर सापडलाय. त्याच्यावर कोणाचं तरी नाव लिहिलंय बहुतेक.”

“कोणाचं नाव?”

“नीट दिसत नाहीये. कॉफीचा डाग पडलाय त्याच्यावर. कोणीतरी जॉर्जेट आहे. आणि आडनाव B ने सुरु होतंय आणि शेवटची अक्षरं MAN आहेत.”

ती माझ्याजवळ आली. मी तिला तो पेपर दाखवला. तिने त्याच्याकडे एक क्षणभर पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत ती नेहमीची चमक आली. ती उठून उभी राहिली.

“ग्रेट. सापडलं.”

“काय?”

“मी तुला सांगितलं होतं ते आठवतंय तुला? तू एलीमध्ये ब्रायन ओग्लेव्हीला भेटायला जाणार होतास पण त्याला ठार मारू असा धमकीचा मेल आला म्हणून तू भेटू शकला नाहीस.”

“हो. तो एलीच्या वॉर्डनच्या सेक्रेटरीच्या इमेल आयडीवरून पाठवला होता, बरोबर?”

“हो. तिचं नाव आहे जॉर्जेट ब्रॉकमन.”

माझ्या डोक्यात आता या सगळ्या गोष्टी जुळून यायला लागल्या. फ्रेडीच्या घरातल्या कचऱ्यात सापडलेल्या पेपरवर एलीच्या वॉर्डनच्या सेक्रेटरीचं नाव असण्याचं एकच कारण असू शकत होतं. त्यानेच माझा पाठलाग केला होता. त्यानेच माझी क्रेडिट कार्ड्स आणि माझा फोन निकामी केला होता. मला एलीमध्ये जाऊ न देता हॉटेल नेवाडामध्ये राहायला भाग पाडणारा तोच होता आणि हॉटेल नेवाडामध्ये माझ्या मागावरही तोच आला होता. एल्विस. फ्रेडी स्टोन. आमचा अनसब!

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

वेल, वेल, वेल! यांचा संशय आता फ्रेडीवर आलाय. कार्व्हर पुढे काय करेल? तो संशय बळावण्यास हातभार लावेल का? पुभाप्र!

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 9:04 pm | अद्द्या

कीप गोइंग

आता पुढे? जाऊन सांगू का त्यांना हा नाही तो कार्व्हर आहे खूनी! पुढचा भाग आठवड्याने येणार त्यापेक्षा जाऊन सांगितलेलं बरं ;)

गामा पैलवान's picture

6 Sep 2015 - 9:57 pm | गामा पैलवान

आता खरी गोष्ट सुरू होत्येय. तिसरा भाग टाकला होता तेव्हा पहिले तीन भाग वाचले. मग राहवलं नाही म्हणून इंग्रजी पीडीएफ मिळवून पूर्ण कादंबरी वाचली. :-)
-गा.पै.

आठवडाभर थांबु नका हो. असं कसं फसले पण हे दोघं सुद्धा.

नाखु's picture

7 Sep 2015 - 8:14 am | नाखु

काश हप्तेमे दोन शनीवार होते!

खयाली नाखु

कोमल's picture

7 Sep 2015 - 11:33 am | कोमल

अस पाहिजे होतं

भन्नाट मजा येतेय वाचतांना

राजाभाउ's picture

7 Sep 2015 - 12:04 pm | राजाभाउ

भारीच !!!
आयला कार्व्हरचा काय डाव आहे. कशाला लीड दिलय ? हे फसणार बहुतेक.
पुभाप्र

गुत्ता हाय समदा. लौकर उकल करा ओ.

मास्टरमाईन्ड's picture

7 Sep 2015 - 12:59 pm | मास्टरमाईन्ड

फक्त आठवड्यातून २ वेळा टाकता आलं तर पहा

पैसा's picture

7 Sep 2015 - 3:57 pm | पैसा

आता नेक्श्ट, फ्रेडचं प्रेत कुठेतरी सापडणार आणि हे दोघे अडकणार बहुतेक!

मोहनराव's picture

7 Sep 2015 - 6:40 pm | मोहनराव

मस्त भाग

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 6:55 pm | शाम भागवत