द स्केअरक्रो - भाग ‍१०

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
12 Jul 2015 - 8:23 pm

द स्केअरक्रो भाग ९

द स्केअरक्रो भाग १० (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

बुधवारी सकाळी नऊ वाजता मी स्किफिनो अँड असोसिएट्सच्या ऑफिसबाहेर उभा होतो. ऑफिसचा दरवाजा बंद होता. लास वेगासच्या जवळ असलेल्या चार्ल्स्टन नावाच्या छोट्या उपनगरात ही चार मजली इमारत होती. मी आत्ताच मानसिकदृष्ट्या थकलो होतो. इथे कुठेही साधी बसायलाही जागा नव्हती. जे शहर नशीब उजळण्याशी इतकं निगडीत आहे, तिथे मला मात्र मी कमनशिबी असल्याचा अनुभव येत होता.

दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती. मी मंगळवारी रात्री वेगासला पोचलो आणि माझ्या माहितीच्या एका हॉटेलमध्ये चेक इन केलं. रात्री मला झोप येत नव्हती म्हणून मी त्यांच्या कॅसिनोची वाट धरली आणि बरोबर आणलेल्या दोनशे डॉलर्सचे पोकर टेबलावर सहाशे डॉलर्स केले. या कॅसिनोमध्ये दारू फुकट होती, त्यामुळे साहजिकच माझे एक-दोन पेग जरा जास्तच झाले आणि मी ढाराढूर झोपलो. मला जेव्हा रिसेप्शनकडून वेक अप कॉल आला तेव्हा सगळ्या प्रश्नांना सुरुवात झाली. पहिली गोष्ट म्हणजे मी वेक अप कॉलसाठी सांगितलंच नव्हतं. त्यांनी मला कॉल करण्याचं कारण माझं अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड चालत नव्हतं.

“ पण मला समजत नाहीये, “ मी त्यांना म्हणालो, “ मी काल फ्लाईट बुक करताना हेच कार्ड वापरलं होतं. नंतर जेव्हा मी एअरपोर्टवर गाडी भाड्याने घेतली तेव्हाही हेच कार्ड दिलं होतं. तुमच्या हॉटेलमध्ये मी रात्री आलो तेव्हाही हे कार्ड चालत होतं. “
“ बरोबर आहे सर, पण ते फक्त तुमची ओळख म्हणून आम्ही वापरलं होतं. चेक आऊट करण्याच्या दिवशी सकाळी आम्ही कार्डवर चार्ज करतो. आम्ही जेव्हा हे कार्ड आमच्या सिस्टिमवर चेक केलं तेव्हा ते नाकारण्यात आलेलं आहे. तुम्ही प्लीज इथे रिसेप्शनवर येऊन दुसरं कार्ड द्याल का? “
“ नो प्रॉब्लेम! मी तुम्हाला दुसरं कार्ड देतो. “

पण प्रॉब्लेम झालाच होता कारण खाली गेल्यावर मला समजलं की माझं कोणतंही कार्ड चालत नव्हतं. त्यामुळे मला मी जिंकलेल्या पैशांपैकी अर्धी रक्कम हॉटेलला परत द्यावी लागली.

माझ्या भाड्याने घेतलेल्या गाडीने जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मी सगळ्या क्रेडिट कार्ड कंपन्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण एकाही कंपनीला फोन लागू शकला नाही. माझा फोनच बंद पडला होता. आणि असं पण नाही की रेंज येत नव्हती. तो बंदच पडला होता. सेवा खंडित करण्यात आली होती.

मी वैतागलो होतो पण स्किफिनोला भेटणंही गरजेचं होतं, कारण शेवटी माझ्या स्टोरीचा प्रश्न होता.

नऊनंतर थोड्या वेळात एक स्त्री लिफ्टमधून बाहेर येऊन माझ्या दिशेने चालत आली. मी चक्क जमिनीवर बसलो होतो. माझ्याकडे बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले. मी उभा राहिलो.

“ तुम्ही विल्यम स्किफिनोबरोबर काम करता का? “ मी आवाजात बऱ्यापैकी नम्रता आणून विचारलं.
“ हो. मी त्यांची सेक्रेटरी आहे. काय मदत हवी आहे तुम्हाला? “
“ मला मि.स्किफिनोंशी बोलायचंय. मी एल.ए.हून केवळ त्यांना भेटायला आलोय, आणि....”
“ तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? ते अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेटत नाहीत. “
“ माझ्याकडे अपॉइंटमेंट नाहीये आणि मी क्लायंट नाहीये. मी रिपोर्टर आहे आणि मला मि.स्किफिनोंशी ब्रायन ओग्लेव्हीच्या संदर्भात बोलायचंय. त्याला गेल्या वर्षी खुनाच्या आरोपावरून...”
“ मला ब्रायन ओग्लेव्ही कोण आहे ते माहित आहे. ती केस कोर्ट ऑफ अपील्समध्ये गेलीय आता. “
“ हो. तेही माहित आहे मला. माझ्याकडे त्याच संदर्भात काही नवीन माहिती आहे. मि.स्किफिनो मला नक्की भेटतील. “

मी हे बोलत असताना ती दरवाजा उघडत होती. ते करता करता ती थांबली आणि तिने मला एकदा नखशिखांत न्याहाळलं.

“ नक्कीच! “ ती म्हणाली.
“ अर्थात! “ मी म्हणालो.
“ तुम्ही आत येऊन बसू शकता. पण मि.स्किफिनो कधी येतील ते मी सांगू शकत नाही. आज दुपारपर्यंत त्यांना कोर्टात काही काम नाहीये. “
“ तसं असेल तर मग तुम्ही त्यांना फोन करून सांगाल का? “
“ बघू. “

आम्ही दोघेही ऑफिसमध्ये आलो आणि तिने मला एक सोफा दाखवला. फर्निचरवरुन तरी हा चांगला यशस्वी वकील दिसत होता. त्याची सेक्रेटरी तिच्या टेबलामागे जाऊन खुर्चीवर बसली आणि तिने कॉम्प्युटर चालू करून कामाला सुरुवात केली.

“ तुम्ही त्यांना फोन करणार आहात?”
“ जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा. तुम्ही आरामात बसा ना प्लीज! “

सोफा चांगलाच होता पण मी आरामात बसू शकत नव्हतो. मी माझ्या बॅगेतून लॅपटॉप बाहेर काढला आणि चालू केला.

“ इथे वाय-फाय आहे का? “
“ हो, आहे. “
“ मग मी थोडा वेळ ते वापरू शकतो का? मला फक्त माझे मेल्स चेक करायचे आहेत. “
“ नाही. “
“ काय?”
“ नाही. तुम्ही वाय-फाय नाही वापरू शकत कारण त्याचा पासवर्ड मि.स्किफिनोंकडे आहे. “
“ मग तुम्ही जेव्हा त्यांना फोन कराल तेव्हा प्लीज विचाराल का?”
“ माझं बाकीचं काम संपलं की करेन मी फोन. “

तिने माझ्याकडे बघून एक स्मित केलं आणि परत ती तिच्या कामात गर्क झाली. तिने फोन उचलून कोणालातरी कॉल केला. बहुतेक क्लायंट असावा कारण ती त्याला कोणते क्रेडिट कार्ड्स फीसाठी चालतील ते सांगत होती. त्यावरून मला माझ्या क्रेडिट कार्ड्सची आठवण झाली, आणि त्यामुळे येणारे विचार टाळण्यासाठी मी समोर असलेल्या मासिकांपैकी एक उचललं आणि वाचायला सुरुवात केली. अशीच पंधरा-वीस मिनिटं गेली असतील. ऑफिसचा दरवाजा उघडून एक माणूस आत आला. त्याने मला पाहिलं आणि तिच्याकडे प्रश्नार्थक दृष्टीने बघितलं.

“ एक मिनिट होल्ड करा, “ ती फोनवर बोलता बोलता म्हणाली, “ मि.स्किफिनो, यांची कुठलीही अपॉइंटमेंट नाहीये. ते म्हणताहेत की ते एल.ए.हून आलेले आहेत आणि रिपोर्टर आहेत आणि त्यांच्याकडे...”
“ ब्रायन ओग्लेव्ही निर्दोष आहे, “ मी तिचं बोलणं थांबवत म्हणालो, “ आणि मी ते सिद्ध करू शकतो. “

स्किफिनोनेही आता मला आपादमस्तक न्याहाळलं. तो साधारण माझ्याच वयाचा होता. कदाचित एक-दोन वर्षांनी मोठा असेल. त्याचे डोळे भेदक होते आणि त्याने माझ्याबाबतीत लगेचच निर्णय घेतला.

“ मग तू माझ्या ऑफिसमध्ये चल आणि मला सांग. “

मी त्याच्यापाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये गेलो. त्याच्या केबिनमध्ये एक सागवानी लाकडाचं भलंमोठं टेबल होतं. तो त्याच्या मागे जाऊन बसला आणि त्याने मला दुसऱ्या बाजूला बसायचा इशारा केला.

“ तू टाइम्ससाठी काम करतोस? “
“ हो. “
“ चांगला पेपर आहे पण आर्थिक प्रश्न खूप आहेत असं ऐकलंय. “
“ हो. खरं आहे. “
“ मग आता मला सांग की एल.ए.मध्ये बसून तुला हे कसं समजलं की माझा क्लायंट निर्दोष आहे?”

मी त्याच्याकडे बघून माझं ठेवणीतलं स्मित केलं.

“ वेल्, मी ते नक्की सांगू शकत नाही पण तुझी भेट घेण्यासाठी मला तसं सांगणं गरजेचं होतं. आता मी माझ्याकडे काय माहिती आहे ते सांगतो. एल.ए.मध्ये एक अल्पवयीन गुन्हेगार आहे. त्याला खुनासाठी अटक झालेली आहे. मला असं वाटतंय किंवा असं म्हणू शकतोस की माझी खात्री आहे की त्याने तो खून केलेला नाही आणि त्याच्यावर जो खून केल्याचा आरोप आहे त्या खुनाचे तपशील आणि तुझ्या ओग्लेव्ही केसचे तपशील – जे मला पेपर वाचून समजले, यांच्यामध्ये खूप साम्य आहे. फक्त, माझी केस ही दोन आठवड्यांपूर्वी घडलेली आहे.”
“ ओके. म्हणजे जर ते सारखे असतील, तर माझ्या क्लायंटकडे अॅलिबी आहे कारण तो तुरुंगात आहे आणि हे दोन्हीही खून कोणा तिसऱ्याच माणसाने केलेले आहेत. “
“ बरोबर! “
“ ठीक आहे. तुझ्याकडे जी माहिती आहे, ती दाखव मला. “
“ मला वाटतं तुझ्याकडे जी माहिती आहे, ती तू दाखवलीस तर बरं. “
“ हरकत नाही. माझा क्लायंट तुरुंगात आहे आणि जर मी त्याच्याबद्दल माहिती दिल्याने तो तुरुंगातून बाहेर येऊ शकत असेल, तर मला वाटत नाही त्याचीही काही हरकत असेल. आणि मी जे आत्ता तुला दाखवणार आहे ते तसंही कोर्ट रेकॉर्डसमध्ये आहेच. “

स्किफिनोने त्याच्या फाईल्स काढल्या आणि आम्ही ओग्लेव्ही केसची माहिती बघायला सुरुवात केली. ती पाहताना मी त्याला विन्स्लो केसबद्दल सांगितलं. आम्ही दोघेही अवाक् झालो एवढं या दोन केसेसमध्ये साम्य होतं.

पण आम्ही दोघेही हादरलो ते फोटो पाहिल्यावर. स्किफिनोकडे असलेले शेरॉन ओग्लेव्हीचे फोटो आणि माझ्याकडे असलेले डेनिस बॅबिटचे फोटो यांच्यात निव्वळ साम्य नव्हतं तर दोघीही एकमेकींच्या बहिणी असाव्यात एवढ्या दिसायला सारख्या होत्या. कोणालाही वाटलं असतं की एकाच स्त्रीचे हे सगळे फोटो आहेत.

दोघींचेही केस काळ्या रंगाचे होते आणि खांद्यापर्यंत आलेले होते. दोघीही अपऱ्या नाकाच्या आणि पायांतून उंच होत्या. शिवाय दोघीही एकाच व्यवसायात – डान्सर – असल्यामुळे कदाचित, पण सडपातळ होत्या. त्या क्षणी मला जाणवलं की यांच्या खुन्याने त्यांना योगायोगाने मारलेलं नाही तर अत्यंत काळजीपूर्वक त्यांची निवड करून त्यांचा खून केलेला आहे. त्या दोघींचेही खून होण्याचं कारण त्या या खुन्याच्या तावडीत सापडल्या हे नसून त्याने त्यांची शिकार केलेली आहे, हे आहे.

स्किफिनोचीही मनःस्थिती वेगळी नव्हती. त्याने दोघींचे फोटो त्याच्या लॅपटॉपच्या पडद्यावर बाजूबाजूला ठेवले होते आणि तो तुलना करत होता. दोघींच्या घटनास्थळांवर घेतलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या डोक्यावर प्लास्टिकची पिशवी होती. दोघींच्याही बाबतीत ही पिशवी कपडे वाळत घालायच्या दोरीने घट्ट बांधून खुन्याने त्यांना घुसमटवलं होतं. दोघींचेही मृतदेह जेव्हा सापडले तेव्हा नग्नावस्थेत होते आणि त्यांचे कपडे त्यांच्या अंगावर रचून ठेवलेले होते.

“ हे...हे अविश्वसनीय आहे!” तो म्हणाला, “ हे दोन्ही खून इतके सारखे आहेत की ते एकाच माणसाने किंवा माणसांनी केलेले आहेत हे सांगण्यासाठी कुणा तज्ञाची गरज नाही. मला तुला एक सांगायचंय जॅक. जेव्हा मी तुला आधी भेटलो तेव्हा मला वाटलं की तू जरा वेडा आहेस आणि तुझ्याशी गप्पा मारून माझा बऱ्यापैकी टाईमपास होईल. पण ह्या गोष्टीची मी कल्पनाही केलेली नव्हती,” त्याने त्या फोटोंकडे बोट दाखवलं, “ माझा क्लायंट आता नक्कीच तुरुंगाबाहेर येऊ शकेल.” हे बोलताना तो इतका उत्तेजित झाला होता की त्याच्याच्याने आता खुर्चीवर एका जागी बसवत नव्हतं.
“ पण हे झालं कसं?” मी विचारलं, “ पोलिसांच्या हातून हे मुद्दे कसे निसटले?”
“ कारण दोन्हीही वेळेला पोलिसांना संशयित माणूस फार लवकर मिळाला. माझ्या केसच्या बाबतीत तो तिचा माजी पती होता आणि तिने कोर्टातून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश मिळवला होता. शिवाय त्याने तिला धमकी दिली होती. तिचा मृतदेह त्याच्याच घराच्या गॅरेजमध्ये आणि त्याच्याच गाडीच्या ट्रंकमध्ये मिळाला. तुझ्या केसच्या बाबतीत त्याच्या बोटांचा ठसा त्यांना तिच्या गाडीत मिळाला आणि त्याचं बालगुन्हेगार म्हणून रेकॉर्ड होतं. एकदा संशयित मिळाला म्हटल्यावर पोलिसांनी दुसरीकडे कुठेही पाहिलं नाही. त्यांनी या खुनासारखे अजून काही खून घडलेत का हे पहायची तसदीपण घेतली नाही कारण एकदा एका संशयिताला अटक झाली आणि बऱ्यापैकी पुरावे त्याच्या विरोधात आहेत म्हटल्यावर पोलिसांना वाटलं की आपलं काम झालं. “
“ पण शेरॉन ओग्लेव्हीचा मृतदेह तिच्या माजी पतीच्या गाडीच्या ट्रंकमध्ये या खुन्याने टाकलाच कसा? त्याची गाडी कुठे असू शकेल हे त्याला कसं माहित? “
“ ते मलाही समजत नाहीये पण माझ्यासाठी तो मुद्दा महत्वाचा नाहीये. मुद्दा हा आहे की हे दोन्हीही खून इतके सारखे आहेत की ते दोन्हीही ब्रायन ओग्लेव्ही किंवा अलोन्झो विन्स्लो यांनी केलेले असणं शक्यच नाही. जेव्हा पोलिस खऱ्या अर्थाने तपास सुरु करतील तेव्हा बाकीचे तपशीलसुद्धा जुळतील. पण आत्ता माझी खात्री पटलेली आहे की तू एका मोठ्या गोष्टीला हात घातला आहेस. “
“ म्हणजे?”
“ म्हणजे तुला असं वाटतं की हा खुनी फक्त हे दोन खून करून थांबला असेल? नक्कीच दोनपेक्षा जास्त बळी घेतलेले असणार त्याने.”

मी होकारार्थी मान डोलवली. ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. अँजेलाने ब्रायन ओग्लेव्हीची केस शोधून काढली होती पण दोन केसेस इतक्या सारख्या होत्या आणि इतक्या सफाईदारपणे हे खून केलेले होते की या खुन्याने आत्ता सुरुवात केलेली असेल यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्याने नक्कीच याआधीही असे खून केलेले असणार.

“ तू आता काय करणार आहेस?” मी विचारलं.

स्किफिनो त्याच्या खुर्चीवर बसला आणि त्याने थोडा विचार केला.

“मी सर्वप्रथम रिट पिटीशन फाईल करणार आहे – हेबिअस कॉर्पस. ही जी नवीन माहिती मिळालेली आहे ती माझ्या क्लायंटला त्याच्यावर असलेल्या आरोपांमधून पूर्णपणे बाहेर काढणारी आहे. आणि ती मला कोर्टासमोर मांडावी लागेल.”
“पण या फाईल्स माझ्याकडे असणं हे कायदेशीर नाहीये. तू त्या कोर्टात दाखवू शकत नाहीस.”
“ दाखवू शकतो. त्या माझ्याकडे कशा आल्या ते सांगायची मला अजिबात गरज नाही.”

माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. एकदा माझी स्टोरी प्रकाशित झाली की त्याला मी माहिती दिली हे सगळ्यांना समजलं असतं.

“हे सगळं घेऊन तू कधी कोर्टात जाणार आहेस?”
“मला थोडा रिसर्च करावा लागेल. मला वाटतं परवा करू शकेन.”
“पण तू एकदा असं केलंस की एकच खळबळ माजेल. तोपर्यंत माझी स्टोरी तयार झालेली नसेल.”

स्किफिनो जरा वैतागला, “माझा क्लायंट एली तुरुंगात एक वर्षाहून जास्त काळ खितपत पडलेला आहे. तुला माहित आहे का की एलीमधली परिस्थिती इतकी वाईट आहे की तिथे मृत्युदंड झालेलं कोणीही त्याच्याविरुद्ध अपील करत नाही कारण कोणालाही तिथे राहायची इच्छा नसते. तो जर निरपराध आहे तर त्याने तिथे एक दिवस राहणंदेखील बेकायदेशीर आहे.”
“ मला कल्पना आहे त्याची. मी फक्त ....”

मी बोलता बोलता थांबलो. माझी स्टोरी एका निरपराध माणसाला तुरुंगातून बाहेर काढण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हा विचारसुद्धा मनात येणं चुकीचं होतं. स्किफिनो बरोबर बोलत होता.

“ठीक आहे. मग जेव्हा तू हे पिटीशन फाईल करशील, त्या क्षणी मला समजलं पाहिजे,” मी म्हणालो,” आणि मला तुझ्या क्लायंटशी बोलायला लागेल.”
“मुळीच हरकत नाही माझी. तो तुरुंगातून बाहेर आला की तुझ्याशी आणि फक्त तुझ्याशीच बोलेल.”
“ नाही, तेव्हा नाही, आत्ता. मी जी स्टोरी लिहिणार आहे तिचा परिणाम म्हणून तो आणि अलोन्झो विन्स्लो बाहेर येणार आहेत. मला त्याच्याशी आज बोलायचंय. शक्य आहे?”
“ एली हा संपूर्ण देशातल्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या तुरुंगांपैकी एक आहे,” स्किफिनो म्हणाला, “त्याला किंवा कुठल्याही कैद्याला भेटायला जे लोक येतात त्यांची एक यादी तुरुंग प्रशासनाकडे असते आणि फक्त त्या यादीवर असलेल्या लोकांनाच प्रवेश मिळतो. “
“ तू काही जुगाड करून मला आत पाठवू शकतोस का?”

स्किफिनोने यावर जरा विचार केला, “जरूर. मी तुला आत पाठवू शकतो. मला त्यांना एक पत्र फॅक्स करावं लागेल, ज्यात असं म्हटलं असेल की तू माझ्यासाठी काम करणारा एक खाजगी गुप्तहेर आहेस आणि त्यामुळे तुला थेट ब्रायनपर्यंत जाऊन त्याला भेटता येईल. मी त्याच्यासोबत तुला अजून एक पत्र देईन जे तू जो कोणी तुला विचारेल त्याला दाखवू शकतोस. त्यात तू माझ्यासाठी काम करतो आहेस असं स्पष्टपणे म्हटलेलं असेल.”
“पण लायसन्स नाही लागणार मला?”
“ तू जर एखाद्या वकिलासाठी काम करत असशील तर खाजगी गुप्तहेराचं लायसन्स लागत नाही. हे पत्र पुरेसं आहे.”
“ पण मी एल.ए.टाइम्ससाठी काम करतोय.”

स्किफिनोने त्याच्या खिशातून एक डॉलर काढला आणि माझ्या हातात दिला.

“ आता ठीक आहे, “ तो म्हणाला, “आता तू माझ्यासाठी काम करू शकतोस.”

माझं याने समाधान झालं नाही पण तसंही दहा दिवसांनी टाइम्समधून मी बाहेर पडत होतोच.

“ हरकत नाही,” मी म्हणालो, “किती दूर आहे एली इथून?”
“तू किती स्पीडने जाशील त्यावर आहे. तसा प्रवास तीन ते चार तासांचा आहे. म्हणजे जाऊन-येऊन आठ तास. पण रस्ता प्रचंड कंटाळवाणा आहे. आजूबाजूला काहीही नाहीये. कुठलीही मानवी वस्ती दिसणार नाही तुला. हा जो रस्ता आहे त्याला अमेरिकेतला सर्वात एकाकी रस्ता म्हणतात आणि तुला ते पाहिल्यावर कळेलच. एलीमधून कुणी पळून न जाण्याचं तेही एक कारण आहे. जाऊन जाऊन जाणार कुठे? जर तुला गाडीने जायचं नसेल तर तिथे एक एअरपोर्ट आहे. इथून चार्ल्स्टनहून तिथे छोटी विमानं जातात.”

मी नकारार्थी मान हलवली. मी अशा विमानांच्या अपघातांबद्दल भरपूर स्टोरीज लिहिल्या होत्या. आणि पैसेही वाचवायला लागणार होते मला.

“ नको. मी गाडीनेच जाईन. ती पत्रं तयार कर तू. आणि तुझ्या फाईलची कॉपी लागेल मला.”
“ चालेल. मी पत्रं बनवतो. अॅग्नेस फाईल कॉपी करून देईल तुला. “

जरूर, मी विचार केला. लाव त्या खत्रूड अॅग्नेसला कामाला.

“ मला एक विचारायचंय तुला,” मी म्हणालो.
“बोल.”
“मी इथे येऊन तुला हे सगळे पुरावे दाखवायच्या आधी तुला काय वाटलं होतं? ब्रायन ओग्लेव्ही दोषी आहे की निर्दोष?”
स्किफिनो विचारात पडला, “ऑफ द रेकॉर्ड?”
मी खांदे उडवले, “जर तुला तुझं मत रेकॉर्डवर नको असेल तर ऑफ द रेकॉर्ड!”
“ओके. जर तुला छापण्यासाठी म्हणून माझं मत हवं असेल तर – मला पहिल्यापासून ब्रायन निरपराध आहे याची खात्री होती. तो इतका घृणास्पद गुन्हा करणं शक्यच नाही.”
“आणि जर मी हे छापणार नसलो, तर?”
“अर्थात दोषी. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटसपैकी ९० टक्क्यांहून जास्तजण हे दोषीच असतात. त्यामुळे मी त्याला दोषीच समजत होतो.”

##################################################################################

एका 7-11 स्टोअरमध्ये जाऊन मी एक प्रीपेड फोन विकत घेतला. त्यावर जवळजवळ १०० मिनिटांचा कॉल टाइम होता. तेवढं झाल्यावर थोडं खाऊन मी उत्तर दिशेला हायवे ९३ वरून एली तुरुंगाच्या दिशेने माझ्या प्रवासाची सुरुवात केली. संपूर्ण रस्ता हा रखरखीत वाळवंटातून जात होता. रस्त्यात जाताना मला अमेरिकन हवाईदलाचा नेल्लीस एअरफोर्स बेस लागला. तो पार केल्यावर थोड्याच वेळात स्किफिनोने केलेलं ‘ अमेरिकेतला सर्वात एकाकी रस्ता’ हे वर्णन किती योग्य आहे ते मला समजलं. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पिवळट नाहीतर राखाडी धुरकट वाळू आणि रखरखाट. अगदी क्षितिजापर्यंत हे वाळवंट पसरलेलं दिसत होतं. धिप्पाड, उघडेबोडके डोंगर अधूनमधून डोकं वर काढत होते. त्यांच्यावर औषधालाही गवताचं पातं किंवा एखादं झाड किंवा झुडूप दिसत नव्हतं. मानवी संस्कृतीचा एकमेव पुरावा म्हणजे वीजवाहक तारा आणि मोठाले पायलन्स. ते तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या ग्रहांवरचे जीव वाटत होते.

मला ती शांतता खायला उठली आणि मी माझ्या नव्या फोनवरून कॉल करायला सुरुवात केली. सर्वप्रथम माझ्या क्रेडिट कार्ड कंपन्यांना मी फोन लावले. माझी कार्ड्स का चालत नाहीयेत ते मला जाणून घ्यायचं होतं. प्रत्येक कॉलमध्ये मला तेच ठराविक उत्तर मिळालं. मी स्वतःच आदल्या रात्री कार्ड चोरीला गेल्याचं सांगून ते बंद करवलं होतं. मी ऑनलाइन गेलो होतो, सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली होती आणि त्यामुळे माझी कार्ड्स बंद झाली होती.
तो मी नव्हतो हे या लोकांना सांगून काहीही फायदा नव्हता. दुसऱ्या कोणीतरी हे केलेलं होतं आणि त्या माणसाला माझे अकाउन्ट नंबर्स माहित होते; माझ्या घराचा पत्ता माहित होता; माझी जन्मतारीख, माझ्या आईचं तिच्या लग्नाआधीचं नाव आणि माझा सोशल सिक्युरिटी नंबर हेही त्याला समजलं होतं. मी माझे अकाउन्टस परत चालू करण्याची त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली पण त्यात एक प्रॉब्लेम असा होता की त्यांच्या नियमांनुसार ही कार्ड्स माझ्या घरी पाठवण्यात येणार होती. म्हणजे आत्ता, या क्षणी मला काहीही करता येणार नव्हतं.

नंतर मी माझ्या बँकेला फोन लावल्यावर मला अजून मोठा धक्का बसला. बँकेने मला चांगली आणि वाईट अशा दोन बातम्या दिल्या. चांगली बातमी ही की माझं डेबिट कार्ड व्यवस्थित चालू होतं आणि वाईट बातमी ही की त्या कार्डाने काढण्यासाठी माझ्या अकाउन्टमध्ये पैसेच उरले नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझे सगळे पैसे माझ्या अकाउन्टमधून मेक-अ –विश फौंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेला दान म्हणून देऊन टाकले होते. मी पूर्णपणे कफल्लक झालो होतो.

मी कॉल कट केला आणि रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून सुन्नपणे बसून राहिलो. हे काय चाललंय? कोण करतंय हे? कशासाठी? पेपरमध्ये मी सायबर गुन्ह्यांबद्दलही लिहिलं होतं. सायबर गुन्हेगार एखाद्याची डिजिटल ओळख घेऊन त्याचा कसा गैरवापर करतात यावर मी स्वतः स्टोरीज लिहिल्या होत्या. पण माझ्या बाबतीत ते कधी प्रत्यक्षात घडू शकेल असा विचारही मनात आला नव्हता.

अकरा वाजता मी टाइम्सच्या सिटी डेस्कला फोन केला आणि तेव्हा तर हा सगळा प्रकार अजून वेगळ्या पातळीवर गेला. मी जेव्हा प्रेन्डरगास्टशी बोललो तेव्हा तो प्रचंड अस्वस्थ झालाय हे मला जाणवलं. त्याच्याबरोबर काम करायचा मला अनुभव होता. अशा वेळी तो एकच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारतो हे मला माहित होतं.

“कुठे,कुठे आहेस, कुठे आहेस कुठे तू? इथे ही प्रीचर ट्रीचरची मोठी रॅली आहे आणि मला कोणीही सापडत नाहीये.”
“ मी बोललो ना तुला. मी वेगासला जातोय म्हणून.”
“वेगास! वेगास? तिथे काय करतोयस तू?”
“तुला माझा मेल नाही मिळाला?काल मी निघालो त्याच्या आधी पाठवला होता.”
“नाही मिळाला कुठलाही मेल मला. तू काल न सांगता गायब झालास. पण ते ठीक आहे. त्याने मला काही फरक पडत नाही. पण आत्ता जे चाललंय त्याने नक्कीच पडतो. मला सांग की तू आत्ता एअरपोर्टवर आहेस आणि एल.ए.ला परत येतो आहेस.”
“नाही प्रेन्डो. मी आत्ता एअरपोर्टवर नाहीये. खरं सांगायचं तर मी वेगासमध्येही नाहीये. मी अमेरिकेतल्या सर्वात एकाकी रस्त्यावर आहे. मी नक्की कुठल्या ठिकाणी आहे ते मला माहित नाहीये. पण ही कुठली रॅली आहे?”
“ रोडिया गार्डन्समध्ये. एल.ए.पी.डी.च्या निषेधार्थ. ही स्टोरी न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टदेखील कव्हर करताहेत. आपल्याला तर करायलाच पाहिजे. पण तू वेगासमध्ये आहेस आणि मी अँजेलाकडूनही काही ऐकलेलं नाहीये अजून. पण तू काय करतोयस तिथे जॅक?”
“तुला मी जो मेल पाठवला होता आणि जो तू वाचला नाहीस त्यात मी स्पष्टपणे लिहिलं होतं की...”
“ मी माझे इमेल्स नित्यनियमाने वाचतो,” माझं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला, “तुझ्याकडून मला एकही मेल आलेला नाही कालच्या दिवसात. तू जो बजेटचा मेल पाठवला होतास तो शेवटचा.”

त्याची चूक होतेय हे मी त्याला सांगण्याच्या बेतात होतो पण मी थांबलो. माझ्या मनात माझ्या क्रेडिट कार्ड्सबद्दल विचार आले. जर कोणी माझं क्रेडिट कार्ड रद्द करवू शकतो आणि माझा अकाउंट रिकामा करू शकतो तर तो मी पाठवलेलं इमेलही मिटवू शकतो.

“हे पहा प्रेन्डो, ही तुझी चूक नाहीये. काहीतरी घडतंय. माझी क्रेडिट कार्ड्स रद्द झालीयेत, माझा फोन चालत नाहीये आणि आता तू सांगतो आहेस की माझं मेल तुला मिळालंच नाही.”
“मी तुला शेवटचं विचारतोय जॅक. तू तिथे नेवाडामध्ये काय करतो आहेस?”

मी एक निःश्वास सोडला आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेरचं दृश्य बहुतेक माणूस पृथ्वीवर आला तेव्हापासून तसंच होतं आणि तो पृथ्वीवरून कायमचा नष्ट झाल्यावरही बहुतेक तसंच राहिलं असतं.

“अलोन्झो विन्स्लोची स्टोरी बदलली आहे, “ मी म्हणालो, “मी शोधून काढलं आहे की त्याने तो खून केलेला नाही.”
“त्याने नाही केलेला? तुझं म्हणणं आहे त्याने त्या मुलीचा खून नाही केलेला? हे काय बोलतोयस तू जॅक?त्याने स्वतः कबुली दिलीय आपण खून केलाय म्हणून. तुझ्याच स्टोरीमध्ये आहे ते.“
“होय, कारण आपल्याला पोलिसांकडून तसंच समजलं होतं. पण मी त्याचा कबुलीजबाब पूर्णपणे वाचलाय आणि त्याने फक्त त्या मुलीची गाडी आणि तिच्या पर्समधली रोकड चोरल्याची कबुली दिलेली आहे. तिचा मृतदेह तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये आहे हे त्याला गाडी चोरताना माहित नव्हतं.
“जॅक....”
“अजून एक. मी वेगासला जाण्याचं कारण म्हणजे इथे एक वर्षापूर्वी घडलेला एक खून आणि अलोन्झोवर ज्याचा आरोप आहे तो खून – या दोन्हीमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे. एका स्त्रीचा खून करून कोणीतरी तिचा मृतदेह गाडीच्या ट्रंकमध्ये टाकला. ती मुलगीपण डान्सरच होती. तिच्या माजी नवऱ्याला पोलिसांनी तिचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केली, त्याच्यावर आरोप सिद्ध झाले आणि तो आता तुरुंगात आहे – अशा गुन्ह्यासाठी जो त्याने केलेलाच नाही. मी आत्ता या क्षणी त्यालाच भेटायला चाललोय. मी ही सगळी स्टोरी गुरुवारी लिहून फाईल करेन. आपल्याला शुक्रवारी ही स्टोरी द्यायलाच हवी कारण या माणसाचा वकील कोर्टात पिटीशन फाईल करणार आहे. आपल्याला त्याच्याआधी ही स्टोरी ब्रेक करायला हवी.”

प्रेन्डो काहीच बोलला नाही.

“प्रेन्डो, हॅलो..”
“आपल्याला याच्याबद्दल बोलायला हवंय जॅक!”
“बरोबर आहे प्रेन्डो. मलाही असंच वाटतंय. बरं, अँजेला कुठाय? आज ती बीटवर असणार होती. ही रॅली तिने कव्हर करायला हवी होती.”
“जर मला ती कुठे आहे हे माहित असतं तर मी आत्ता फोटोग्राफरबरोबर तिला रोडिया गार्डन्समध्ये पाठवलं असतं. ती अजून ऑफिसलाच आलेली नाहीये. काल रात्री घरी जाण्यापूर्वी तिने मला सांगितलं होतं की ती पार्कर सेंटरला जाऊन काही स्टोरी आहे का हे बघून मग ऑफिसला येणार आहे. पण ती अजूनही आलेली नाहीये.”
“ ती कदाचित डेनिस बॅबिटबद्दल माहिती गोळा करत असेल. तू तिला फोन केलास का?”
“अर्थात मी तिला फोन केला. मी फोन केले तिला जॅक. पण तिने माझा एकही कॉल उचललाच नाही. मी मेसेज ठेवले आहेत तिच्या मोबाईलवर पण अजूनतरी तिने कुठल्याही मेसेजला उत्तर दिलेलं नाहीये. कदाचित तिला असं वाटत असेल की ही रॅलीची स्टोरी तू कव्हर करशील म्हणून ती माझ्या कॉल्सना उत्तरं देत नाहीये.”
“वेल्, ही स्टोरी प्रीचर ट्रीचरच्या स्टोरीपेक्षा मोठी आहे प्रेन्डो. ती स्टोरी एखादा जनरल रिपोर्टर पण कव्हर करू शकतो. ही स्टोरी सनसनाटी आहे. ह्या खुन्याबद्दल कोणालाच माहित नाहीये. पोलिस, ब्युरो, सगळेच त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. मी ज्या वेगासमधल्या या वकिलाबद्दल बोललो तुला, तो या शुक्रवारी त्याच्या क्लायंटला सोडावं म्हणून रिट पिटीशन फाईल करणार आहे आणि त्यानंतर ही स्टोरी ब्रेक होईल. त्याच्या आधी आपण बाजी मारायला हवी. मी आत्ता त्याच्या क्लायंटला भेटायलाच चाललोय. त्याला भेटून त्याच्याकडून माहिती घेतली की मी परत येईन. पण सांगू शकत नाही की एल.ए.ला किती वाजता पोहोचेन. इथून वेगास बरंच अंतर आहे. सुदैवाने माझं रिटर्न तिकीट आहे. माझी क्रेडिट कार्ड्स रद्द होण्याआधीच मी ते काढून ठेवलं होतं.”

पुन्हा समोरून शांतता.

“प्रेन्डो?”
“हे पहा जॅक,” तो शांत आवाजात म्हणाला, “आपल्याला दोघांनाही खरी परिस्थिती माहित आहे. तू काहीही बदलू शकणार नाहीयेस.”
“कशाबद्दल बोलतोयस तू?”
“तुझी नोकरी गेलीय त्याबद्दल. जर तुला वाटत असेल की अशी काहीतरी कपोलकल्पित स्टोरी करून तू तुझी नोकरी वाचवू शकशील, तर तसं होणार नाहीये.”

आता मी गप्प बसलो. माझ्या मनात संताप दाटून आला होता.

“जॅक, हॅलो? जॅक?”
“मी ऐकतोय प्रेन्डो. आणि माझं यावर एकच म्हणणं आहे. गेलास भोxxxx. मी काहीही रचून किंवा कपोलकल्पित सांगत नाहीये. हे खरोखर घडतंय. मी इथे भर वाळवंटात उभा आहे आणि हे काय चाललंय ते मला समजत नाहीये.”
“ओके ओके! ठीक आहे जॅक! शांत हो. मी असं अजिबात सुचवत नाहीये की तू....”
“ भोxxx जा बोललो ना मी तुला! तू नुसतं सुचवलं नाहीस, तू बोलून दाखवलंस.”
“हे पहा, जर तुला अशा भाषेत माझ्याशी बोलायचं असेल तर मला काहीच म्हणायचं नाही. आपण सभ्य माणसं बोलतात त्या भाषेत बोलू या का जरा?”
“प्रेन्डो, मला इतर बरेच कॉल करायचेत. तुला जर ही स्टोरी नको असेल किंवा जर तुला वाटत असेल की मी या गोष्टी रचून सांगतोय, तर मी दुसरं कोणीतरी शोधेन जो माझ्यावर विश्वास ठेवेल. टाइम्स काही एकमेव पेपर नाहीये या देशात. माझा एडिटर माझ्याशी असं वागेल याच्यावर मात्र माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी इथे या स्टोरीसाठी माझी xx घासतोय पण कोणालाच काही पडलेली नाहीये!”
“हे पहा जॅक, असं नाहीये. माझं ऐकून घे तू जरा...”
“ सोड रे. काय आहे आणि काय नाही ते बरोबर समजलंय मला आता. मी नंतर फोन करतो तुला.”

फोन बंद केल्यावर तो उद्वेगाने मी जवळजवळ फेकूनच दिला होता पण त्या क्षणी मी भानावर आलो. माझ्याकडे नवा फोन घ्यायला पैसे नव्हते. मन परत ताळ्यावर आणण्यासाठी मी गाडी चालू केली. मला आता जो कॉल करायचा होता त्यासाठी मन शांत ठेवणं गरजेचं होतं. थोडावेळ मी बाहेरच्या रौद्र आणि भीषण निसर्गाकडे पाहिलं, धैर्य गोळा केलं आणि माझ्या बंद पडलेल्या फोनचं कॉन्टॅक्ट बुक उघडलं. त्यात एफ.बी.आय.च्या एल.ए. ऑफिसचा नंबर होता. तो मी माझ्या प्रीपेड फोनवरून फिरवला. ऑपरेटरने फोन उचलला. मी स्पेशल एजंट रॅशेल वॉलिंगशी बोलायचं आहे असं सांगितलं. तिने माझा कॉल जोडून दिला.

“इंटेलिजन्स,” एक पुरुषी आवाज आला.
“रॅशेल वॉलिंगशी बोलू दे जरा.” मी म्हणालो. मी मुद्दामहून स्पेशल एजंट म्हणालो नाही कारण जर त्याने मी कोण बोलतोय वगैरे चौकशी केली असती तर कदाचित मला रॅशेलशी बोलता आलं नसतं.

“स्पेशल एजंट वॉलिंग!”

तिचाच आवाज होता. मी तिचा आवाज शेवटचा ऐकल्याला बरीच वर्षे लोटली होती. पण मी तरीही तो लगेच ओळखला.

“हॅलो, स्पेशल एजंट रॅशेल वॉलिंग बोलतेय.”
“रॅशेल, मी बोलतोय. जॅक.”

शांतता.

“कशी आहेस तू रॅशेल?”
“तू का मला फोन केलास जॅक? मला वाटतं आपण ठरवलं होतं की आपण जर बोललो नाही तर दोघांसाठी चांगलं होईल. “
“मला माहित आहे रॅशेल, पण मला तुझी मदत हवी आहे. मी एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडलोय रॅशेल.”
“आणि तुझी अशी अपेक्षा आहे की मी तुला मदत करावी? काय प्रॉब्लेम झालाय?”
माझ्या बाजूने एक गाडी जवळजवळ शंभरच्या वेगाने निघून गेली. मला एक क्षणभर स्तब्ध उभं राहिल्यासारखं वाटलं.
“बरीच मोठी गोष्ट आहे ती. मी आत्ता नेवाडामध्ये आहे. वाळवंटात. मी एका स्टोरीच्या मागावर आहे. एका खुन्याचा शोध घेतोय. त्याच्याबद्दल अजून कुणीच ऐकलेलं नाहीये. मला अशा एखाद्या व्यक्तीशी बोलायचंय जी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेईल, माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मला मदत करेल.”
“ आणि तुला वाटतं ती व्यक्ती मी आहे? तुला माहित आहे जॅक. मी तुला कुठलीही मदत करू शकत नाही. तसंही मला भरपूर काम आहे.”
“रॅशेल, प्लीज. फोन ठेवू नकोस. माझं ऐकून घे.”

ती काहीच बोलली नाही पण तिने फोनही ठेवला नाही.

“जॅक, तू कुठल्यातरी दडपणाखाली वाटतो आहेस. काय झालंय?”
“मला माहित नाही. कोणीतरी माझ्याशी खोडसाळपणा करतंय. माझा फोन, इमेल, माझे बँक अकाउंटस् – मी आत्ता नेवाडाच्या वाळवंटात एकटाच गाडीने चाललोय आणि माझं एकही क्रेडिट कार्ड काम करत नाहीये.”
“ कुठे चालला आहेस तू?”
“एली.”
“तुरुंग?”
“ हो.”
“ का? कुणीतरी तुला फोन करून आपण निर्दोष आहोत असं सांगितलं आणि तू परत एकदा पोलिसांना चुकीचं ठरवण्यासाठी धावत चालला आहेस?”
“नाही, तसं काहीही नाहीये. हे पहा रॅशेल, हा जो खुनी आहे, तो स्त्रियांना घुसमटवून मारतो आणि त्यांचे मृतदेह गाड्यांच्या ट्रंक्समध्ये ठेवतो. मला वाटतं किमान गेली दोन वर्षे तरी तो हे करतोय.”
“मी तुझी स्टोरी वाचली. त्या मुलीचा मृतदेह पोलिसांना तिच्याच गाडीच्या ट्रंकमध्ये मिळाला. कोणीतरी गँगमधला पोरगा आहे ज्याने हा गुन्हा कबूल केलाय.”

अरे वा! तिने माझी स्टोरी वाचलीय हे ऐकल्यावर मला जरा बरं वाटलं. आजच्या दिवसात असं पहिल्यांदा वाटलं होतं. पण याचा अर्थ तिचा माझ्यावर विश्वास बसला होता असं अजिबात नव्हतं.

“पेपरमध्ये छापून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस रॅशेल. मी आता खरं काय आहे ते शोधून काढायला जातोय आणि मला पोलिस किंवा एफ.बी.आय.मधल्या कुणाचातरी पाठिंबा हवाय.”
“ मी आता बिहेवियरलमध्ये नाहीये. माझा या असल्या गुन्ह्यांशी आता काहीही संबंध नाहीये. आणि हे तुला माहित आहे. तरीही तू मला फोन का केलास?”
“कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे रॅशेल.”

आता आम्ही दोघेही गप्प बसलो.

“असं कसं म्हणू शकतोस तू? आपण गेल्या पाच वर्षांत एकमेकांना भेटलोसुद्धा नाही आहोत.”
“:त्याने काहीही फरक पडत नाही. आपण पहिल्यांदा भेटलो, तेव्हा जे काही घडलं, त्यानंतर मी.... माझा तुझ्यावर नेहमीच विश्वास होता आणि राहील. आणि मला हेही माहित आहे की तू मला आत्ता मदत करशील. आणि गेल्या पाच वर्षांची भरपाईसुद्धा करशील.”
ती हे ऐकून उसळली, “ काय मूर्खासारखं बरळतोयस तू! थांब, काहीही बोलू नकोस. त्याची गरजही नाहीये. मी तुला विनंती करतेय जॅक, की यापुढे मला फोन करू नकोस. मी तुला कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही. ऑल द बेस्ट, काळजी घे आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न कर.”

तिने फोन कट केला. मी त्यानंतर जवळजवळ एक मिनिटभर तो माझ्या कानाला लावून ठेवला होता. न जाणो, तिचं मन बदललं आणि तिने मला परत फोन केला तर? पण अशा गोष्टी सिनेमातच घडतात, खऱ्या आयुष्यात नाही. तिचा फोन काही आलं नाही आणि मी फोन ठेवून दिला. आता कोणाशीही बोलायची माझी इच्छा नव्हती.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

जाळ्यात??? पुढे काय घडणार असेल याची उत्कंठा आता ताणली गेली आहे. पुभाप्र!

आता पुढे काय?
पुभाललटा!!

प्रीत-मोहर's picture

13 Jul 2015 - 8:32 am | प्रीत-मोहर

अडकला रिपोर्टर.. अब क्या होगा?

मृत्युन्जय's picture

13 Jul 2015 - 11:01 am | मृत्युन्जय

वाचतोय. पुभाप्र.

अर्धवटराव's picture

13 Jul 2015 - 9:49 pm | अर्धवटराव

मूळ पुस्तकापेक्षा (मी वाचलं नसलं तरीही :) ) हा अनुवाद भयंकर थ्रीलींग वाटतोय.

प्रचेतस's picture

14 Jul 2015 - 4:08 pm | प्रचेतस

भन्नाट अनुवाद,

मोहन's picture

16 Jul 2015 - 5:43 pm | मोहन

ज ह ब रा ट

स्रुजा's picture

16 Jul 2015 - 5:45 pm | स्रुजा

सुरेख चालु आहे लेखमाला.. अधाशासारखी वाचते आहे प्रत्येक भाग.

जुइ's picture

16 Jul 2015 - 6:11 pm | जुइ

कथा खूपच छान चालू आहे!

नाखु's picture

17 Jul 2015 - 11:28 am | नाखु

फक्त इतकाच शब्द दुसरा नाही.

शेवटचा सुरस अनुवाद देव्धर कथांमध्ये वाचला होता त्याची प्रकर्षाने आठवण आली.

पु भा प्र.

पैसा's picture

17 Jul 2015 - 4:52 pm | पैसा

एकदम मस्त वेगात चालू आहे!

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 10:12 am | शाम भागवत