द स्केअरक्रो भाग १ (मूळ लेखक - मायकेल काॅनोली )
कार्व्हर कंट्रोल रूममध्ये येरझा-या घालत होता. सगळे डेटा टाॅवर्स त्याच्यासमोर नीटपणे एका ओळीत उभे होते. त्यांचं काम अगदी शांतपणे आणि वेगाने चालू होतं. त्यांच्याविषयी सगळं माहित असूनही कार्व्हरच्या मनात एक प्रकारची भारावून गेल्याची भावना आली. त्याच्यासमोर माहितीचा ओघ नव्हे तर धबधबा वाहत होता आणि तोही दर दिवशी. त्याच्यासमोर असलेल्या या पोलादी टाॅवर्समधला प्रत्येक टाॅवर म्हणजे माहितीचा खजिना होता. त्याने तापमान दाखवणा-या स्क्रीनकडे एक नजर टाकली. सगळं काही अपेक्षेप्रमाणे आणि व्यवस्थित चाललं होतं. त्याची नजर त्याच्या समोर असलेल्या वर्कस्टेशन्सकडे गेली. तिघेही इंजिनियर्स आत्ताच्या, नवीन आलेल्या प्राॅजेक्टवर काम करत होते. कुणीतरी इथली कडेकोट सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, नाही, चूक केली होती. त्याला ते तर जमलं नव्हतंच पण त्या प्रयत्नात त्याने आपले बरेच ' ठसे ' इकडेतिकडे ठेवले होते. कार्व्हरचे इंजिनियर्स त्या ठशांच्या आधारे त्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या चेह-यावर एक हलकी स्मितरेषा उमटली. आता थोड्याच वेळात ह्या ' शेतावरचे ' दाणे टिपायची हिंमत करणारं हे ' पाखरू ' कोण आहे ते कळेल आणि मग कार्व्हर त्याचं काम सुरु करेल, जे संपल्यावर या पाखराचे पंख कापले गेले असतील आणि त्याचे अवशेष सगळीकडे विखुरले जातील. कार्व्हरच्या शब्दकोशात दया या शब्दाला किंवा भावनेला जागा नव्हती, कधीच नव्हती.
अचानक वरुन एक आवाज आला.
" ब्रेक! " कार्व्हर म्हणाला. त्याक्षणी तिघाही इंजिनियर्सनी काम थांबवलं आणि आपापल्या काँप्युटर्सचे स्क्रीन बदलले. बाहेरून येणा-या कोणत्याही आगंतुक माणसाला आपलं काम दाखवण्याची त्यांची इच्छा नव्हती.
कंट्रोल रुमचं दार उघडून मॅकगिनिस आत आला. त्याच्याबरोबर सूट घातलेला अजून एक माणूस होता. कार्व्हरने त्याला याआधी कधीच पाहिलं नव्हतं.
" ही आहे आमची कंट्रोल रूम आणि हे आमचे डेटा टाॅवर्स. या खिडक्यांतून तुम्हाला ते दिसू शकतील. आम्ही त्यांना ' फ्रंट फोर्टी ' असं म्हणतो, " मॅकगिनिस त्या माणसाला म्हणाला, " ज्या को-लोकेशन सेवा आम्ही पुरवतो त्यांचं हे मुख्य केंद्र आहे. तुमच्या फर्मचा सगळा डेटा हा इथे साठवला जाणार आहे. आत्ता आमच्याकडे ४० टाॅवर्स आहेत आणि जवळजवळ १००० सर्व्हर्स या टाॅवर्सवर कार्यरत आहेत. शिवाय नवीन टाॅवर्ससाठीही भरपूर जागा आहे. तो प्रश्न आम्हाला कधीच येत नाही. "
त्या सूटमधल्या माणसाने मान डोलावली, " तो प्रश्न मलाही पडलेला नाही. माझा मुख्य हेतू आहे सुरक्षितता. "
" अर्थातच! म्हणून तर आपण इथे आलोय. तुम्ही वेस्ली कार्व्हरला भेटावं अशी माझी इच्छा होती. वेस्ली इथे ब-याच जबाबदाऱ्या सांभाळतो. तो आमचा चीफ टेक्नाॅलाॅजी आॅफिसर तर आहेच, शिवाय चीफ थ्रेट इंजीनियरही आहे. हे सगळं डेटा सेंटर त्याच्याच संकल्पनेनुसार उभं राहिलेलं आहे. तुमच्या माहितीच्या सुरक्षिततेच्या संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील, त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला वेस्ली देईल. "
" अजून एक बिनडोक गि-हाईक! " कार्व्हरच्या मनात विचार चमकून गेला. त्याने त्या सूटवाल्याबरोबर हस्तांदोलन केलं. त्याचं नाव होतं डेव्हिड वाईथ आणि त्याची लाॅ फर्म सेंट लुईसमधली एक प्रतिष्ठित लाॅ फर्म होती - मर्सर अँड गिसाल. वाईथच्या टायवर बार्बेक्यू साॅसचा डाग पडला होता. मॅकगिनिस अशा पाहुण्यांना नेहमीच रोझीज बार्बेक्यूमध्ये घेऊन जात असे.
कार्व्हरने वाईथला सगळी माहिती दिली. त्याला स्वतःला ती तोंडपाठ होती, अगदी झोपेतही तो ते करु शकला असता. वाईथलाही त्या माहितीमध्ये बार्बेक्यूपेक्षा कमीच रस होता. तोही सेंट लुईसमध्ये जाऊन हेच सांगणार होता की या कंपनीकडे त्यांची माहिती एकदम सुरक्षित आहे आणि मग मॅकगिनिसला नवीन काँट्रॅक्ट मिळालं असतं.
वाईथशी बोलत असताना कार्व्हर एकीकडे ज्याने कंपनीतून माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा विचार करत होता. त्या बिचाऱ्याला हे माहीतही नव्हतं की तो कशा प्रकारे आणि अनपेक्षितपणे आयुष्यातून उठणार आहे. कार्व्हर आणि त्याचे इंजिनियर्स त्या माणसाचे बँक अकाउंटस् रिकामे करणार होते आणि त्याची डिजिटल ओळख घेऊन लहान मुलामुलींच्या ब्लू फिल्म्स त्याच्या काँप्युटरवर डाऊनलोड करणार होते. मग एका काँप्युटर व्हायरसच्या द्वारे त्याचा काँप्युटर क्रॅश होणार होता. जेव्हा तो माणूस दुरूस्तीसाठी एखाद्या तंत्रज्ञाला बोलावेल तेव्हा ह्या फिल्म्स उघडकीला येऊन त्या माणसाला अटक होणार होती आणि अजून एक यशस्वी कामगिरी कार्व्हरच्या नावावर जमा होणार होती.
" वेस्ली? " मॅकगिनिसच्या आवाजाने कार्व्हर भानावर आला. त्या सूटवाल्या माणसाने काहीतरी प्रश्न विचारला होता. कार्व्हर त्याचं नावही विसरून गेला होता.
" एक्स्क्यूज मी? "
" मि. वाईथ असं विचारताहेत की कधीकाळी इथली सुरक्षाव्यवस्था भेदली गेली आहे का? "
हे विचारत असताना मॅकगिनिस हसत होता. त्याला कार्व्हरचं उत्तर माहीत होतं.
" नाही सर. कधीच नाही. प्रयत्न झाले आहेत हे मी मान्य करतो पण कोणीही यशस्वी झालेलं नाही. आणि ज्यांनी असं करण्याची हिंमत केलेली आहे त्यांना आम्ही जन्माची अद्दल घडवलेली आहे. "
वाईथने मान डोलावली.
" आमची लाॅ फर्म सेंट लुईसमधली सर्वात प्रतिष्ठित लाॅ फर्म आहे. आमच्या फाईल्स, त्यांच्यामध्ये असलेली माहिती आणि आमच्या क्लायंट्सचं हित हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. म्हणून तर मी स्वतः इथे आलो. "
आणि शिवाय मॅकगिनिस तुला कॅबेरे दाखवायला घेऊन गेला हेही एक कारण आहेच - कार्व्हरच्या मनात हा विचार आला पण तो त्याने बोलून दाखवला नाही. तोही हसला. मॅकगिनिसने त्याला सूटवाल्याचं नाव सांगितलं असल्यामुळे.
" काळजी करु नका मि.वाईथ. तुमची पिकं या शेतावर सुरक्षित आहेत! "
आता वाईथही हसला, " मला हेच ऐकायचं होतं. "
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Jun 2015 - 4:41 pm | अमोघ गाडे
मी पहीला... सुरवात जबराट. पुभाप्र
13 Jun 2015 - 4:56 pm | प्रचेतस
जबराट एकदम. पहिल्या भागापासूनच उत्सुकता ताणली गेलेली आहे.
बाकी स्केअरक्रो नाव वाचून ब्याटमन बिगिन्स ची आठवण झाली.
13 Jun 2015 - 5:26 pm | मुक्त विहारि
अशा जर मालिका येत असतील तर त्या, बिनडोक मालिका कोण बघत बसणार?
13 Jun 2015 - 5:34 pm | अद्द्या
लैच छोटा वाटतोय भाग . .
पण जबरदस्त आहे सुरुवात . .
येउन्द्या लवकर
13 Jun 2015 - 5:38 pm | एक एकटा एकटाच
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
13 Jun 2015 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
चांगली सुरुवात. पुढचे भाग भरभर टाका.
13 Jun 2015 - 6:58 pm | पुणेकर भामटा
पुढील भागान्च्या प्रतीक्शेत...
लवकर येउद्यात...
13 Jun 2015 - 7:08 pm | स्पा
दणकाच एकदम, आंदो, वर मुवी आणि वल्ली शी सहमत
13 Jun 2015 - 7:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्केअरक्रो वाचुन मलाही बॅटमॅनची आठवण झाली. सुंदर सुरुवात. येउद्या पटापट आता. :)
13 Jun 2015 - 7:25 pm | अजया
जबरदस्त सुरुवात.पुभाप्र.
13 Jun 2015 - 8:55 pm | अत्रन्गि पाउस
आणि काही अंदाजपत्रक कि ते पुढचे भाग कधी कधी मिळतील ?
हे तुकड्यांनी वाचणे म्हणजे ब्लडप्रेशर वाढणार !!!
13 Jun 2015 - 9:25 pm | एस
पुभाप्र. पण 'अंधारक्षण' ही चालू ठेवा अशी विनंती.
13 Jun 2015 - 9:32 pm | चिगो
जबरा सुरुवात.. पु.भा.प्र.
14 Jun 2015 - 12:02 am | सानिकास्वप्निल
भारी सुरुवात ह्या जबरद्स्त लेखमालेची.
पुढचा भाग लवकर लिहा :)
मायकेल कॉनोलीचे दी लिंकन लॉयर पुस्तक / चित्रपट दोन्ही वाचुन, बघून झालेय. दी लिंकन लॉयर अतिशय आवडत्या चित्रपटांपैकी एक.
14 Jun 2015 - 8:47 am | द-बाहुबली
अॅटर्नी-क्लायंट प्रिवीलेज...!
14 Jun 2015 - 10:11 am | पैसा
मस्त सुरुवात आहे!
15 Jun 2015 - 12:49 pm | अभिरुप
उत्कंठावर्धक सुरुवात...
16 Jul 2015 - 1:57 pm | नाखु
हा पहिला वाचला आणि कसा(वाचनातून) सुटला याची खंत वाटली.
पुलेशु.
27 Dec 2015 - 10:21 am | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग २
13 Jun 2018 - 5:11 pm | महासंग्राम
आज स्केअरक्रो ला ३ वर्ष पूर्ण झाले अजूनही वाचतांना तितकीच रोचक वाटते आहे.