कविता

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
4 Nov 2022 - 10:31 am

टिकली
मंगळसूत्र
जोडवी
बाईचं बाईपण
घराला घरपण
रूढी परंपरा
संस्कृतीचा हाकारा
पोरीची जात
सातच्या आत घरात
दिवसाउजेडी बलात्कार
तुझ्याच छातीचे उभार
हसलीस, तर दुर्योधन चिडेल
फसलीस, तर रावण पळवेल
रेषेच्या आत
सगळं काही चालेल
रेषेच्या पलीकडे
अग्निपरिक्षा लागेल
तुझ्या नावानंच सगळे
देतील शिव्या
तुझ्या अंगी मात्र
सोशिकपणा हवा
आपले आदर्श महान
आपली संस्कृती महान
तुला दिलंय की आम्ही त्यात
महत्वाचे स्थान
तू देवीचे स्वरूप
शिवाय भारतमातेचं रूप

कविता

योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
2 Nov 2022 - 12:43 pm

https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-d...

वजीर केला प्यादा

योगी आदित्यनाथांची सापशिडी
डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी

पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई
पोलीस डिएसपी स केला शिपाई

सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स
चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स

महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी
जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी

मुक्त कविताकविता

सांजावता दाटते का तुझी आठवण?

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
2 Nov 2022 - 10:46 am

सांजावता दाटते का तुझी आठवण?
जीवास या जाळते का तुझी आठवण?

होते तुझे गोड ते लाजणे ही
होते तुझे गोड ते हासणे ही
गेल्या सुखा माळते का तुझी आठवण?

वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे
पर्णातुनी वाटते नांदती हे
गंधापरी वाहते का तुझी आठवण?

येती जशी पाऊले चांदण्याची
होते कशी काहिली ही मनाची
रातीस या भाळते का तुझी आठवण?

दीपक पवार.

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

जगणे

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
1 Nov 2022 - 9:33 pm

आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही
मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही.

जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा
सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही.

करार मदार सजावट कागदावरची
जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही.

होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे
पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही

हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी
नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही.

----- अभय बापट
३१/१०/२०२२

जीवनकविता

शहरातले गाव

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 Oct 2022 - 2:22 pm

रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात

त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो

- पाभे
२१/१०/२०२२

मुक्त कविताशांतरसकविताजीवनमानराहती जागा

दुपार

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Oct 2022 - 8:13 am

झोपली होती दुपार
घेऊन कोवळ्या उन्हाला
आवाज शांत स्पंदनांचा
ऐकू येई मनाला

तिरीप कोवळ्या उन्हाची
जणू दुपारची एकदाणी
झोपण्या आधी दुपारं
गात होती बडबड गाणी

पहुडली सुखाने अलवार
पांघरून पदर थंडगार
विसरून मध्यान्हीचा ताप
निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

जाणिवभावकविताकवितामुक्तक

कुणा न कळता.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
18 Oct 2022 - 9:11 am

कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण
शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण.

नुकता वसंत आला झाड झाड मोहरले
नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले
नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण.

भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर
पळभर दूर होता का उठते मनी काहूर
मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण.

तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने
नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे
जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण.

दीपक पवार.

कविता माझीगाणेकविता

कुण्या देशिचा असेल वारा??

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
2 Oct 2022 - 2:36 pm

दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा,
धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा.
विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती?
वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा..

सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा,
थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा?
किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची?
रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा?

कविता

वेडा वेडा पाऊस..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
24 Sep 2022 - 8:07 am

वेडा वेडा पाऊस..

वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..

छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!

भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!

पाऊसकविताप्रेमकाव्यमुक्तक

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक