आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(२) (अंतिम)

वर्षा's picture
वर्षा in जनातलं, मनातलं
9 Jun 2009 - 11:52 pm

जपानी शिकायला लागल्यावर लगेचच या साम्यस्थळाशी गाठ पडली होती....मला वाटतं आमच्या पहिल्या धड्यात ’आनाता वा निहोन्जीन देस का’ (तू जपानी आहेस का?) असं काहीसं वाक्य होतं आणि तेव्हाच आमच्या सेन्सेईंच्या* ’जपानी बोली बरीचशी आपल्या मायबोलीशी मिळतीजुळती आहे’ या सांगण्यावर आम्ही शिक्कामोर्तब करुन टाकलं होतं!

खाऊन बघ ना!

मराठीत आपण अनेकदा सहज बोलतो...’हे खाऊन बघ ना जरा’...आता या ’खाऊन बघण्याच्या’ क्रियेत अर्थातच त्या एखाद्या पदार्थाची चव घेणे वगैरे अपेक्षित आहे. पण इंग्लिशमध्ये ही क्रिया आपण अगदी अशीच म्हणत नाही. आपण या क्रियेला ’taste it' किंवा ’try it’ म्हणतो. (Eat and see असं तर नाही म्हणत!) पण अर्थाने अगदी सारखी असणारी अश्शीच दोन क्रियापदं एकत्र वापरणारी ही ’खाऊन बघण्याची’ क्रिया जपानीत मात्र आहे. ’खाऊन बघ ना’ ला जपानीत ’ताबेते मिते (कुदासाइ)’ म्हणतात ज्यात 'ताबेते'(मूळ क्रियापद ’ताबेरु’) आणि 'मिते' (मूळ क्रियापद ’मिरु’) यांचा अनुक्रमे अर्थ चक्क ’खाणे आणि बघणे’च आहे! त्यामुळे जपानी शिकताना गाडी जेव्हा ’ताबेते मिरु’ या क्रियेशी आली तेव्हा चटकन वाटलंच ’अरे! हे तर आपलं ’खाऊन बघणे’! (आमच्या सेन्सेईंनी याला नाव ठेवलं होतं ’खाके देखो पॅटर्न’ :)) (खाऊन बघण्यावरुन आठवलं, जपानीत ’चवी’ला काय म्हणतात माहित्ये? जपानीत ’चव’ म्हणजे ’आजी’!:) आम्हाला लक्षात ठेवायला सोपं गेलं. ’आजी’च्या हातची चव आपण विसरु शकतो काय?)

या ’खाके देखो’ पॅटर्नमुळे अश्या प्रकारच्या मराठीतल्या इतरही जोड्या आपोआप जपानीतून एकेक करुन समोर येऊ लागल्या आणि अभ्यासातला रस वाढला. येताजाता मग आम्ही ’कीईते मीमास’ (मूळ क्रियापद ’किकु=विचारणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’विचारुन बघते/बघतो हं”, इत्ते मिते ने’ (मूळ क्रियापद ’इकु’=जाणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’जाऊन बघ ना”, यात्ते मियोs का (मूळ क्रियापद ’यारु’=करणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’करुन पाहूया का?’ असं जपानी सांडायचो! तेव्ह्ढीच प्रॅक्टीस!! परकीय भाषेत असे काही समान दुवे आढळले तर खरोखर ती भाषा शिकणं केवळ ’शिकणं’ राहत नाही तर तो एक ’अनुभव’ ठरतो! ’अभ्यासाला’ अभ्यासाचा कोरडेपणा रहात नाही तर तो एक रंगतदार, मजेशीर प्रवास होतो. असं काही साम्यस्थळ शिकलो की आम्हाला वाटायचं, मग आपण मराठीत अमुक अमुक असं म्हणतो, त्याला जपानीत काय बरं म्हणत असतील? अशी विचार प्रक्रीया चालू झाली की मग होतं ते ’सेल्फ़ लर्निंग’. स्वत:लाच मनाशी विचार करुन एकातून एक, एकातून एक अशी त्या भाषेतील शब्दसंपत्ती वाढवत नेता येते! त्यासाठी मग तुमचं मन आणि एक शब्दकोष इतकीच आयुधं लागतात! असो.

’खाऊन बघणे’ प्रमाणेच आपलं ’जाऊन येणे’ सुद्धा जपानीत आहे. ते इंग्लिशमध्ये नाही! ’जाऊन येते’ ला इंग्लिशमध्ये ’I will go and come (back)' असं म्हणण्यापेक्षा ’I'll be back!' असंच म्हटलं जातं नाही का! पण जपानीसुद्धा पटकन आपल्यासारखे ’इत्ते किमास’ म्हणजे अक्षरश: ’जाऊन येते/येतो’ म्हणून मोकळे होतात. यात मूळ क्रियापदे अनुक्रमे ’इकु’=जाणे व ’कुरु’=येणे आहेत!

यासारख्या साधर्म्याच्या बर्‍याच गोष्टी आजही भाषांतराची कामे करत असताना जाणवतात आणि तेव्हा अगदी वाटतंच की अमुक एखादं वाक्य मी इंग्रजीपेक्षा मराठीमध्ये अगदी तंतोतंत अर्थाने चपखल शब्द वापरुन भाषांतरीत करु शकेन. पण क्लायंटला मराठी कुठे येतंय!

नावात काय आहे!
आता तुम्ही म्हणाल, दोन भाषांमध्ये नावं/आडनावं सारखी असण्यात असं काय ते विशेष? असं साम्य असू शकतं की. खरंय. पण कोणी काहीही म्हणो, योगायोगाने काही जपानी आणि मराठी नावांमध्ये मजेशीर साम्य दडलंय.

’दाते’ हे असंच एक जपानी आडनाव. मला आठवतंय मी नोकरी करत असताना त्यावेळी ’दाते’ नावाच्या एका जपानी असामीचं आमच्या कंपनीत काही समारंभाच्या निमित्ताने येणं झालं होतं. (मला वाटतं तेव्हा ते मुंबईचे जपानी कॉन्स्युलर जनरल होते किंवा कॉन्स्युलेटमधील कुणी बडे अधिकारी होते) तेव्हा आमच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यक्तिने ’दाते’ हे जपानी नाव कसं असू शकेल असा विचार करुन त्यांच्या नावाचा उल्लेख चक्क ’डेट’ केला होता. अजून एक उदाहरण काकूंचं. काकू म्हणजे आपल्या बिल्डींगमधल्या काकू नाहीत बरं! ’काकू’ हेसुद्धा एक जपानी आडनाव आहे. आम्ही शिकत असतानाच्या सुमारास मुंबईत ’काकू’ नावाचे कॉन्स्युलर जनरल कार्यरत होते. त्यांच्या सौ. जपानी शिकवत असत असं ऐकलं होतं. त्यांचं आम्ही 'काकू'काकू आणि मिस्टरांचं 'काकू'काका असं नामकरण केलं होतं. :D

उमा! मराठीतलं किती सुंदर नाव! (उमा म्हटल्यावर मराठी चित्रपटांमधल्या उमाबाईंचा सुंदर चेहेरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो) माझ्या बॅचला एक ’उमा’ नावाची मुलगी होती. योगायोगाने ती उमाबाईंची मुलगीच शोभावी अशी सुस्वरुप होती. पण तिचं हसणं मात्र चमत्कारिक होतं. थोडंफार खिंकाळल्यासारखं. आम्ही आपापसात तिच्या हसण्यावरुन चेष्टा करत असू आणि त्यातच जपानीत घोड्याला ’उमा’ म्हणतात हे ज्ञान प्राप्त झालं. मग काय! आम्हाला आयतंच हत्यार मिळालं उमाला जेरीस आणायला! :) तर सांगायचा मुद्दा हा की जपानी नावांत/आडनावांतही गंमती दडलेल्या आहेत. ’उमा’ हे एक उदाहरण झालं. अशी अजूनही आहेत.

ऑफिसमध्ये एकदा एका सिनियर हुद्द्याच्या व्यक्तिचं आगमन होणार होतं. मी रिसेप्शनिस्टला विचारलं, "कोण गं"? ती म्हणाली "नाकानिशी". हे नाव ऐकताक्षणीच मला जाम हसायला आलं पण मुश्किलीने मी ते आवरलं. तरी पोरीच्या नजरेतून माझं दबलेलं हसू सुटलं नव्हतंच. तिने विचारलंच मला त्याबद्दल पण ’नाकानिशी’तली मराठी मजा त्या ख्रिश्चन पोरीला कशी मी समजावणार आणि काय तिला कळणार!

वर नावांबद्दल लिहिताना मला एकदा नावामुळे झालेला गोंधळ आठवला. (झालेला म्हणजे मी केलेला गोंधळ). तेव्हा मी नुकतीच भाषांतरकार म्हणून नोकरीस लागले होते. फ्रेशर असल्याने कामाचं जाम प्रेशर वाटायचं आणि त्या प्रेशरखालीच माझा गोंधळ झाला. आमची कंपनी जी मशिन्स बनवायची, त्यासंबधित सर्व टेक्निकल मजकूर (मग त्यात Drawingsपासून Manualsपर्यंत सर्वकाही मोडायचं) मी जपानी<->इंग्रजीत भाषांतरीत करत असे. एक दिवस एका डॉक्युमेंटमध्ये डिझाईन स्पेसिफिकेशन्समध्ये ’Usagi' असा शब्द आला. जपानीत ’Usagi’ म्हणजे ससा. आता त्या सर्व टेक्निकल जंजाळात सशाचा संबंध काय ते मला कळेना. बरं मागेपुढे धड संदर्भही नव्हता. मग मी सर्व शब्दकोश पालथे घातले, इंटरनेटवर शोध घेऊन बघितला पण कुठेही तसल्या टेक्निकल माहितीमध्ये सशाचा मागमूसही दिसला नाही. मग नंतर अचानक सुचलं, अरेच्चा! कदाचित ही लिहिणार्‍याची साधी स्पेलिंग मिस्टेक असेल. ही स्पेसिफिकेशन्स ’Usami' नावाच्या जपान्याने लिहिली आहेत. तर टाईप करताना ’उसामी’चं चुकून ’उसागी’ झालेलं दिसतंय.! हुश्श! म्हणजे सशाचा खरोखरीच संबंध नाहीये म्हणायचा!’

मी सुटकेचा नि:श्वास टाकला खरा पण मला वाटलं एकदा विचारुन खात्री करुन घ्यावी. मग मी सरळ जपानला फोन फिरवला आणि सांगितलं की माझ्या मते अशी अशी अशी नावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. यावर पलिकडल्या व्यक्तिच्या चेहेर्‍यावरचे भाव संभाषण फोनवरुन झाल्यामुळे मला बघता आले नाहीत पण मला त्याचा अंदाज आहे. शक्य तितक्या नम्रतेने त्याने सांगितलं. ’डॉक्युमेंटमध्ये ’ससा’च आहे. कारण आपल्या ग्राहकाला बाटलीवर सशाचं चित्र engrave करुन हवं आहे.’ हे ऐकून मी शक्य तितक्या त्वरेने फोन संभाषण आवरतं घेतलं :))

हो जा ’शुरु’!
जपानी शिकताना मला अजून एका क्रियापदाची गंमत वाटली होती. या क्रियापदाचं मराठीतल्या क्रियापदाशी थेट साम्य नसलं तरी मराठीतल्या त्या क्रियेशी जवळचं नातं मात्र नक्कीच आहे. जपानीमध्ये ’करणे’ किंवा ’To do' या क्रियेसाठी ’सुरु’ हे क्रियापद आहे. त्यामुळे त्यामुळे, "चला! परीक्षा जवळ येत चाललीय! आता अभ्यास ’सुरु’ करायलाच हवा" असं आपण म्हणावं आणि याच क्रियेला जपान्याने म्हणावे ’बेन्क्योs (अभ्यास) ’सुरु’! आहे की नाही!! आता अभ्यास हे एक उदाहरण झालं पण जपानीत इतरही असंख्य गोष्टी ’सुरु’च होतात. त्यात उठल्यापासून झोपेपर्यंतच्या असंख्य क्रियांचा समावेश होतो. मग ते ’सोजी’ (स्वच्छता करणं) असो किंवा ’काईमोनो’ (खरेदी) असो, जे काही आहे ते ’सुरु’च होणार. अर्थात जपानीतलं ’सुरु’ हे त्या क्रियापदाचं मूळ रुप असलं आणि काळानुसार त्यात बदल होत असला तरी एकंदरीत तोच मतितार्थ आहे.

याच ’सुरु’वरुन आठवलेलं अजून एक साम्यस्थळ म्हणजे ’सेवा’. आपल्या मराठीत ’सेवा’ शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो अगदी त्याच अर्थाने उच्चारासकट जपानी लोक जपानीत वापरतात. फक्त आपण एखाद्याची ’सेवा करतो’ तर जपान वर दिल्याप्रमाणे ’सेवा सुरु’ करतात. :) पण त्या सेवेमागची भावना एकच आहे. काळजी घेणे! मदत करणे! इतकंच काय, बर्‍याच जपान्यांचा इमेल ’इरोइरो ओ-सेवा नी नारीमाश्ता’ ने सुरु होतो. म्हणजे काय तर, "खूप काही केलंत हो माझ्यासाठी, धन्यवाद बरं का’. (बाकी जपानी पद्धतीने कमरेत लवून आभारप्रदर्शन करायची स्मायली अजून कुण्या जपान्याने कशी काय तयार केली नाही कुणास ठाऊक. समोरच्याकडून इरोइरो सेवा घेतल्याबद्दल थॅंक्यू टायपल्यावर ठोकायला बरी पडली असती. :))

परवा कुठलातरी लेख वाचताना त्यात ’मज्जा येत्ये नै?’ मधल्या ’नै’ ची एकसारखी भेट होत होती. मला स्वत:ला यातल्या ’नाही?’ ला ’नै’ म्हणणे किंवा ’काहीच्या काही’ ला ’कैच्याकै’ म्हणणे इत्यादी प्रकार बोलण्यात तर दूरच पण लिहायलाही फारसे जमत नाहीत पण कुठे वाचण्यात आले तर मात्र वाचायला आवडतात. गंमतीशीर वाटतात. आणि मग हमखास यातल्या ’नै’च्या जपानी भावंडाची आठवण येतेच. :) खरोखर, इथेही साम्य आहेच. कसं बघा हं. उदा. आपण खूपवेळा उदगारतो, अमुक एक गोष्ट ’मस्त आहे ना!’ त्यालाच जपानी म्हणतील ’सुगोइ ना!’. या ’ना’ चा उच्चार, अर्थ अगदी अगदी सारखा आहे आणि त्यामागची भावनासुद्धा! पण या ’ना’ व्यतिरिक्त जपानी कधीकधी ’ने’ पण वापरतात. हा ’ने’ आपल्याला आपल्या प्रश्नार्थक/उद्गारवाचक ’नाही?!’ ( आणि पर्यायाने ’नै’च्याही) जवळ नेतो. उदाहरणार्थ, ’कोरे वा ताकाई देस ने!’ म्हणजे ’हे महाग आहे नाही!’ (महाग आहे नै!). :)

मी ज्या कंपनीत काम करत असे तिथे एकंदरीत बिगर मराठी जनता जास्त होती. त्यातही बिहारी, उत्तरप्रदेशी जास्तच. त्यापैकी काहीजण ट्रेनिंगनिमित्त जपानवारी करुन आले. तर आल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की जपानी बोली भाषा त्यांना त्यांच्या मातृभाषेसारखीच वाटतेय. हे त्यांनी मला बोलून दाखवलं. मला वाटलं म्हणजे जपानीचं केवळ मराठीशीच साम्य नाहीये तर! उदाहरणार्थ? मी गंभीरपणे विचारलं. तर एकजण म्हणाला, "हमार भासामें हम ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है, लालूजींका भाषण तो सुना होगा आपने वर्साजी?" (या व्यक्तीने मला कधीही ’वर्षा’ म्हटलेलं नाही! कायम आपलं ’वर्साजी’च! असो.)
’जी हा सुना है". मी.
"बस्स्स! तो जापानीभी ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है. जैसे की ’कोरे वा नान देस्का?’"
हे उदाहरण ऐकलं मात्र आणि बिहारी आणि जपानी भाषांतला शाब्दिक सारखेपणा गंभीरपणे जाणून घ्यायला आतुर झालेल्या मला हसूच आलं एकदम. वातावरण सैलावलं.
’कोरे वा नान देस्का?’ म्हणजे ’हे काय आहे?’ खरंतर. यात ’वा’ हा एक topic/subject indicating particle (अव्यय) आहे आणि ’नान’ म्हणजे ’काय’.
पण या बहाद्दरांना त्यातला ’वा’ हा त्यांचा बिहारी ’वा’ वाटला आणि ’नान’ म्हणजे काय ते सांगायला नकोच!:)

मनात म्हटलं शेवटी प्रत्येकजण परकीय भाषेचे मातृभाषेशी कितपत लागेबांधे आहेत हेच शोधत असतो. मी तरी दुसरं काय करतेय!!!

समाप्त

*कांजी- जपानी भाषेत वापरल्या जाणार्‍या मूळच्या चिनी अक्षरांना ’कांजी’ म्हणतात.

भाषाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवमाहितीभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 12:15 am | बिपिन कार्यकर्ते

मजाच आली वाचायला. पण भाग २ नंतर ते अंतिम असं चुकून पडलं का? अहो लिहा ना अजून ....

बिपिन कार्यकर्ते

अरुण मनोहर's picture

10 Jun 2009 - 2:32 am | अरुण मनोहर

खूप मजा आली वाचायला. जपानी कंपनीत काम करतांना टोकीयोमधे काढलेले दिवस आठवले. वर्साजी, आठवणी जाग्या केल्या म्हणून धन्यवाद.

’कोरे वा नान देस्का?’ ची एक मजा आठवली. माझा एक कझीन जपानमधे स्थायीक झाला आहे. त्याची बायको जपानी. मुले जपानीच बोलतात. अजून लहानच आहेत. इंग्लीश दोनचार शब्दांपुढे येत नाही. पण वडील मराठी असल्याने मुलांना काही काही भारतीय, मराठी शब्द माहीत आहेत. एकदा मुले घरी आली असतांना जेवतांना मी पाच वर्षे वयाच्या मुलाला गमतीने विचारले-
(मी ताटातल्या 'नान' कडे बोट दाखवून) 'कोरे वा नान देस्का?'
(तो गालातल्या गालात हसून) 'कोरे वा नान देस्स!!!'
(मी पुन्हा मोठ्याने-) 'कोरे वा नान देस्का?'
(तोही मोठ्याने ठसक्यात-) 'कोरे वा नान देस्स!!!'

आमची सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली होती.

रेवती's picture

10 Jun 2009 - 2:42 am | रेवती

दुसरा भाग जास्त मजेशीर होता.
अशी साम्यस्थळं शोधताना मजा येते.

रेवती

Nile's picture

10 Jun 2009 - 3:12 am | Nile

असच म्हणतो!
मी ही तमिळ मध्ये (नविन?) मराठी शोधुन काढली होती. ;) अजुन येउद्या!

सुबक ठेंगणी's picture

10 Jun 2009 - 7:08 am | सुबक ठेंगणी

असंच मला 'lost in translation'चा अनुभव देणारं दुसरं एक जपानी व्याकरण म्हणजे...'मिरु मिरु उचिनि' मिरु=बघणे म्हणून 'मिरु मिरु उचिनि' म्हणजे बघता बघता...'बघता बघता अंधार पडला नै!' म्हणजे ' मिरु मिरु उचिनि कुराकुनात्ता ने'
वर्षासान्...दोsमो ओत्सुकारेसामा देशिता...आरिगातो ओझाइमाशिता...

भाग्यश्री's picture

10 Jun 2009 - 7:22 am | भाग्यश्री

मस्त झालाय हा पण भाग! येऊदे ना अजुन..
बाकी, ते ऑनलाईन जॅपनिज शिकवणीचे घे ना मनावर! :)

www.bhagyashree.co.cc

सहज's picture

10 Jun 2009 - 7:33 am | सहज

दुसरा भाग जास्त छान होता. वर बिपीनदा म्हणाले तसे अजुन येउ द्या हो.

क्रान्ति's picture

10 Jun 2009 - 8:42 am | क्रान्ति

आवडला लेख. खरंच अजून गमतीजमती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

वर्षा's picture

10 Jun 2009 - 11:28 pm | वर्षा

सर्वांना धन्यवाद,

सुबक,
>>' मिरु मिरु उचिनि कुराकुनात्ता ने'
अगदी अगदी.:)