रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
13 Feb 2016 - 5:03 pm

सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.
चि. इशानला दिलेल्या १५ इन्जेक्शन्सच्या कोर्सला रु. दीड लाख खर्च आला. हेच औषध बाहेर अधिकृत विक्रेत्याकडे रु. ७५०००/- ला उपलब्ध असल्याची माहिती आमच्या फॅमिली डॉक्टरांकडून आम्हाला मिळाली. त्यामुळे ते बाहेरून आणण्याची परवानगी आम्ही हॉस्पिटलकडे मागितली असता आम्हाला ती नाकारण्यात आली. इतकेच नाही तर आम्ही बाहेरून औषध आणण्याचा आग्रह धरला तर रुग्णाला लगेच डिस्चार्ज देऊ अशी धमकीवजा सूचनाही तेथील प्रशासकीय संचालकांनी दिली. नातवाची परिस्थिती गंभीर असल्याने उपचारात दिरंगाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हॉस्पिटलमधून दुप्पट किंमत देऊन औषध खरेदी करावॆ लागले. परंतु या बाबतीत आपल्यावर अन्याय झाला ही भावना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात त्याविषयी एक लेख लिहिला. त्याला प्रतिसाद म्हणून डॉ. मनीषा जितुरी यांनी त्यांचा अनुभव कळवला. त्या स्वतःच या दुर्धर रोगाने आजारी असताना पुण्यातील जोशी हॉस्पिटलने त्यांना बाहेरून औषधे आणण्याची परवानगी दिली. यामुळे धीर येऊन आम्ही पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यात आम्हाला इन्जेक्शन्सच्या खर्चापोटी झालेला सुमारे ४८०००/- चा जादा खर्च ( हॉस्पिटलने आंम्हाला औषधाच्या किमतीत अखेरीस ८% सूट दिली होती) व मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल फक्त रु. १/- अशी भरपाई हॉस्पिटलने आम्हाला द्यावी अशी आमची माफक मागणी होती. तरीही शुल्लक तांत्रिक मुद्दे उपस्थित करून, आम्हाला मंचाचे हेलपाटे घालायला लावून, जेरीला आणायचे हाच हॉस्पिटलच्या वकिलांचा हेतू होता असे लक्षात आले. परंतु आमचे प्रतिनिधीत्व करणारे ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते प्रा. पुरुषोत्तम गोखले यांनी शांतपणे त्यांचा सामना केला व आम्हालाही धीर दिला. तब्बल अडीच वर्षांनी मंचाने निकाल देऊन सह्याद्रीने निर्बंधित (restrictive) व अनुचित (unfair) व्यापारी प्रथा (trade practice) यांचा अवलंब करून आमच्यावर अन्याय केला आहे हे मान्य केले. पण होस्पिटलने औषधाच्या छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारलेली नाही, उलट ८% सूट दिली याला महत्व देऊन, आम्हाला फक्त रु.३००१/- देण्याचा आदेश दिला. मात्र औषधांसाठी जास्त खर्च झालेल्या रु.४८०००/- ची भरपाई अमान्य केली. याबाबत वृत्तपत्रात उलटसुलट चर्चा झाली व आम्ही महाराष्ट्र राज्य आयोगाकडे अपील केल्यास नक्कीच न्याय मिळेल असे सुचवण्यात आले. पण मुंबईचे हेलपाटे, वकिलाचा खर्च इत्यादींचा विचार करून आम्ही पुढे गेलो नाही .
विशेष म्हणजे सह्याद्री हॉस्पिटलने त्यांच्यावर अन्याय झाला या कारणाने अपील केले. काही तारखा पडल्यावर, त्यांचे वकील गैरहजर राहिल्यामुळे आयोगाने अपील डिसमिस केले. (आमच्या वकिलाने त्यांची फी आगाऊ घेतली होती ती वाया गेली) त्यानंतर हॉस्पिटलने राष्ट्रीय आयोगाकडे सुधारणा अर्ज दाखल केला. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाचे एक चांगले वकील पुण्यात भेटले. त्यांनी रास्त फी घेऊन आमची बाजू आयोगापुढे मांडली. ७ मे २०१४ रोजी राष्ट्रीय आयोगाने आमच्या प्रवास व इतर खर्चासाठी हॉस्पिटलने आम्हाला रु. १०,०००/- द्यावेत असा अंतरिम आदेश देऊन आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला व हॉस्पिटलने त्याचे पालनही केले. १० नोव्हेंबर रोजी अर्जाचा निकाल लागून प्रकरण पुन्हा राज्य आयोगाकडे सुनावणीसाठी पाठवण्यात आले. १६ जून २०१५ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये अध्यक्षांनी सह्याद्रीच्या वकीलांना त्या औषधाच्या तीन वर्षांच्या खरेदी विक्रीच्या तपशिलाचे आकडे सादर करण्याचा आदेश दिला. हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला. वकीलाने ही माहिती देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. मात्र पुढच्या तारखेला माहिती देण्याऐवजी केस मागे घेण्याची परवानगी मागितली! उल्लेखनीय बाब अशी की या टप्प्यावर आमची बाजू आयोगासमोर समर्थपणे मांडणारे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी यास खालील मुख्य मुद्यांवर हरकत घेतली. १) राष्ट्रीय आयोगाने अंतिम आदेशाने राज्य आयोगाकडे प्रकरण परत पाठवताना तक्रारदाराला रु. ५०००/- देण्याचा दिलेल्या आदेशाचे हॉस्पिटलने पालन केलेले नाही व न्यायालयाचा अवमान केलेला आहे. (contempt of court) २) ग्राहक न्यायासाठी झगडणाऱ्या तक्रारदारास वर्षानुवर्षे विविध मंचांवर फिरायला लावून त्रास दिलेला आहे. ३) औषध खरेदीत तक्रारदाराच्या झालेल्या जादा खर्चाची भरपाई मिळालेली नाही. आयोगाने वरील मुद्द्यांची योग्य दखल घेतली व सह्याद्री हॉस्पिटलने आम्हाला रु. ४०,०००/- व आयोगाच्या Legal Aid Fund ला रु.१०,०००/- द्यावेत असा आदेश देऊन आम्हाला न्याय दिला. थोडक्यात आमची रु. ४८०००/- भरपाई देण्याची मागणी धुडकावून लावणाऱ्या हॉस्पिटलला एकूण रु. ६८०००/- दंड द्यावा लागला. शिवाय वकीलांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च निराळाच! हॉस्पिटलने आमची रक्कम दोन हप्त्यात दिली.

केळकर कुटुंबीयांनी न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा वृत्तांत त्यांच्याच शब्दात आपण वर वाचला. या कहाणीचा उत्तरार्धही तितकाच महत्वाचा आहे. या संपूर्ण प्रकरणाला वृत्तपत्रांनी उत्तम प्रसिद्धी दिली. त्यानिमित्ताने अशा प्रकारे औषध खरेदीची सक्ती करण्याच्या योग्य-अयोग्यतेवर विचारमंथन झाले. रुग्णांच्या आप्तांकडून स्वस्त म्हणून अप्रमाणित औषधे खरेदी केली जाण्याचा धोका टाळण्यासाठी करावयाच्या उपायांवरही चर्चा झाली. जन आरोग्य अभियानाने हा विषय उचलून धरला. समाधान याचे वाटते की यातून ग्राहकांच्या निवड करण्याच्या हक्काचे संरक्षण करणारा आदेश पुणे महापालिकेने काढला व "हॉस्पिटलच्या औषध दुकानातून खरेदी करण्याची सक्ती नाही" असे फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. मात्र अजूनही संलग्न औषध विक्री केंद्रे असलेल्या अनेक रुग्णालयांनी असे फलक लावलेले नाहीत असे आढळते. तसेच काही रुग्णालयात अजूनही औषध खरेदीबाबत सक्ती केली जाते अशी तक्रार आहे. त्यांची माहिती म.न.पा. च्या आरोग्य विभागाकडे कळवणे ही जागरूक ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे. बाजारपेठेच्या व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणणे (system correction) हा ग्राहक चळवळीचा मुख्य हेतू आहे. तो साध्य करणारा वरील लढा म्हणूनच विशेष महत्वाचा आहे.

आभार -- श्री ग. ना. केळकर

मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

हे ठिकाणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवमतशिफारससल्लाचौकशीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

गरिब चिमणा's picture

13 Feb 2016 - 5:38 pm | गरिब चिमणा

छान ,हे डॉक्टर लोक हल्ली फारच माजोरी झाले आहेत.पुर्वी यांची वैयक्तीक प्रॅक्टीस असायची ,आता हे टोळ्या करुन दरोडा टाकायच्या तयारीत असतात,CT MRI घेऊन त्यातूनही पैसा छापतात.मेडीकलचे म्हणाल तर यांच्याच नात्यातल्या सोम्यागोम्याला डी.फार्म करुन तिथे लुबाडायला बसवलेले असते.अनेक ठीकाणी पेशंटच्या नातेवाईकांनी यांना रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे पण ही लोक सुधारायचे नाव घेत नाहीत.

खटपट्या's picture

19 Feb 2016 - 3:34 am | खटपट्या

क्रुपया सरसकटीकरण करु नका. कमीतकमी पैशांमधे जास्तीत जास्त सेवा देण्याची इच्छा असणारे डॉक्टरही परीचयाचे आहेत.

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:26 am | सुबोध खरे

रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे
अगदी अगदी
ठाण्यातील धर्मादाय चाललेले सिंघानिया रुग्णालय असेच बंद पाडलेले आहे. जय महाराष्ट्र
फक्त गरीब ठाणेकर आता स्वस्तात उपचारासाठी कुठे जातात ते विचारू नका.

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2016 - 5:43 pm | टवाळ कार्टा

हे नक्की आहे का? मिपावरच्या डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

गरिब चिमणा's picture

13 Feb 2016 - 5:50 pm | गरिब चिमणा

मिपावरचे डॉक काय ,त्यांच्याच लोकांची बाजू घेणार .रुग्णाने जागरुक असणे गरजेचे आहे.सातार्यात एखाद्या डॉक्टरने /हॉस्पीटलने जास्त बिल लावले तर लोक थेट उदयनराजेंकडे जातात,तिकडून फोन आला की मग बिल अर्ध्यावर करतात म्हणे.

अन्नू's picture

13 Feb 2016 - 6:06 pm | अन्नू

सातार्‍याचे का? छान, मग आमचेच बंधू! ;)
सातारा हॉस्पिटल हे नाव ऐकले आहे का? रोजचे किती पैसे छापतात ते लोक, हे जरा तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विचारुन बघा जरा. :)

अवांतर- याच उदयनजींचा वरदहस्त आहे म्हणे यांना, (खरं खोटं अलाहीदा) ;)

अभ्या..'s picture

13 Feb 2016 - 6:34 pm | अभ्या..

तीन दिवसाची सोय झाली. :)

डांगे असते तर ५ दिवसाची.

सुबोध खरे's picture

13 Feb 2016 - 6:58 pm | सुबोध खरे

बहुसंख्य मोठ्या रुग्णालयात स्वतःचे औषधालय असते. तो एक रुग्णसेवेचा भाग असतो तसाच रुग्णालयाच्या नफ्याचा भाग असतो. कोणत्याही औषधाच्या किमती पैकी १५-२० % हा औषधालयाचा/ कोणत्याही केमिस्टचा नफा असतो. यात तेथे काम करणाऱ्या डॉक्टरला नफ्याचा भाग काही मिळत नाही तर ती "रुग्णालयाकडे" जातो. असे "मोठे" रुग्णालय पूर्ण खाजगी( तेथे काम करणाऱ्या डॉक्टरच्या मालकीचे) असेल तर गोष्ट वेगळी पण तसे क्वचित असते.
पण म्हणून कोणत्याही रुग्णालयाने औषध आमच्याच औषधालयातूनच घेतले पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. हे एखाद्या लग्नाचा हॉल आमच्याच कंत्राटदाराचे कंत्राट घेतले पाहिजे म्हणून सर्रास आग्रह धरतात तसेच आहे.
जर "लिहून दिलेलेच" औषध रुग्ण बाहेरून चांगल्या केमिस्ट किंवा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कडून आणत असेल तर तसे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसावी.
काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात.
भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात.
Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM
http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
औषध बनावट निघाले तरी चूक "डॉक्टर"चीच असते. कारण ते "लुटायलाच" बसलेले असतात. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे डॉक्टर बेफाट आरोप करणारे रुग्ण आणि तेथील व्यवस्थापन यांच्या कात्रीत सापडलेला असतो.
बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे.

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2016 - 7:50 pm | प्राची अश्विनी

"बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे."
सहमत!

आनन्दा's picture

15 Feb 2016 - 9:26 am | आनन्दा

खरेकाकांशा सहमत. पण तरीही दुप्पट किंमत आकारणे असमर्थनीय. मुद्दा बाहेरून औषधे आणण्याचा तर आहेच, पण त्याबरोबरच जास्त किंमत आकारण्याचा पण आहे.
(त्यांनी एम आर पी पेक्षा जास्ती घेतले नाहीच म्हणा. नाहीतरी एमआरपी म्हणजे हल्ली टाईमपासच झालेला आहे.

अजया's picture

18 Feb 2016 - 8:42 am | अजया

सहमत.

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा

काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात.
भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात.
Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM
http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...

याबाबत एक शंका...मोठ्ठी हॉस्पिटल्स कदाचित त्यांच्याकडच्या केमिस्टकडे ठेवली जाणारी औषधे पारखून घेत असतील...as a part of quality control...जी हॉस्पिटल्स लहान आहेत...ते लोक स्वतःच कदाचित जाणतेपणे अथवा अजाणतेपणे डुप्लिकेट औषधे ठेवत असतील तर???

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Feb 2016 - 8:38 pm | माम्लेदारचा पन्खा

मलाही हा अनुभव वडिलांच्या आजारपणात मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात आलेला आहे. त्यांना १ महिना रोज एक इंजेक्षन सकाळ संध्याकाळ घ्यायचे होते २१०० रु चे एक असलेले ते इंजेक्षन मी बाहेरुन ९०० रु. मध्ये आणले होते म्हणून व्यवस्थापनाबरोबर खूप वाद झाला होता पण आमचा डॉक्टर माझ्या बाजूने उभा राहीला आणि ते प्रकरण मिटले...

ग्राहक पंचायत इथे लिहती झाली आहे याचा विशेष आनंद आहे. असेच लिखाण आणि माहिती देणे चालु राहु दे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

कपिलमुनी's picture

18 Feb 2016 - 7:40 am | कपिलमुनी

हॉस्पिटलचेच स्टेंट अँजिओप्लास्टीला वापरायचे
याच्यासारखी लूट नसेल

सुबोध खरे's picture

18 Feb 2016 - 9:43 am | सुबोध खरे

मुनिवर
आपले हे विधान अज्ञानजन्य आणि पुर्वग्रहदुषित किंवा अपुर्या माहितीवर आधारित आहे यात शंका नाही.
यात दोन भाग आहेत. एक म्हणजे जेंव्हा आपली अँजिओ ग्राफी होते तोवर आपल्याला कोणत्या आकाराचा आणि किती लांबीचा स्टेंट लागेल हे समजणे शक्य नाही. प्रत्येक माणसाचा आंगठ्याचा ठसा दुसर्याशी मिळत नाही मग त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा मिळणार हा मुलभूत फरक लोक समजावून घेत नाहीत. त्यातून रक्तवाहिन्यांचे जाळे आणि त्यात आलेले अडथळे हे कसे सारखे असणार म्हणजेच स्टेन्ट बसविण्यासाठी तितक्या जाडीचा त्याच आकाराचा आणि त्याच लांबीचा स्टेन्ट प्रत्येकाला वेगळा असतो. साधे कापडाच्या दुकानात गेलात तर प्यान्टचे रंग,लांबी, कंबर आकार हे वेगळे असतात. एवढे सगळे स्टेंट रुग्णालयाच्या औषधालयात ठेवावे लागतात. त्याच्या इन्व्हेंटरी ची किंमत कोण देणार? मोठ्या कापडाच्या दुकानात मिळणारे कापड महाग का असते याचे उत्तर शोधा.
दुसरी गोष्ट-- आपण हॉटेलात बाहेरचे पदार्थ आणून खाऊ शकता का? किंवा होंडा च्या शो रूम मध्ये बाहेरून आणलेले सुटे भाग लावून मिळतील का? येथे तर तुमच्या शरीराच्या आत बसवलेला भाग एकदा बसवला कि काढता येत नाही अशा परिस्थितीत कोणते रुग्णालय बाहेरून आणलेला स्टेंट वापरून
धोका पत्करतील?
राहिली गोष्ट त्याच्या एम आर पी ची. डोळ्यात मोतीबिंदू नंतर बसवायचे भिंग रुपये ३०००/- पासून ३५०००/- पर्यंत मिळते कारण ते कमी दर्जाचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून भारतीय उत्पादक त्याचे उत्पादन करतात. स्टेंट हे अजून तरी आयात केले जातात. त्याची एम आर पी एक ते सव्वा लाख असून ते रुग्णालयांना ६५ हजार ते एक लाखाला मिळतात. यासाठी सरकारने ते जीवनावश्यक औषध किमत नियंत्रण कायद्याखाली आणायला पाहिजे.म्हणजे उत्पादन किमतीच्या १५- ३० % पेक्षा जास्त किंमत कंपन्यांना लावता येणार नाही.
एका कॅथ लैब ची किंमत कमीत कमी ५ कोटी रुपयाच्या आसपास असते त्याशिवाय त्याला लागणारी जागा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, बाकी उपकरणे, तंत्रज्ञ यांचे पगार याचा खर्च १० कोटीच्या पुढे जातो. तो करणे सामान्य सोडाच असामान्य डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून हे उपचार महागडे होत जातात. रुग्णालये चालविणारे डॉक्टर नसून एम बी ए किंवा उद्योगपती आहेत आणि ते नफ्यासाठीच रुग्णालये चालवितात. औषध कंपन्या चालविणारे हि डॉक्टर नसतात. त्यांना आमिषे दाखवून गळाला लावणारे हि डॉक्टर नसतात.
"गळाला लागणारे" डॉक्टर यांचे येथे समर्थन नाही परंतु असे डॉक्टर या साखळीतील एक सर्वात "कमजोर कडी" आहेत ज्यांना कुणीही उठावे आणि कसेही ठोकावे. कारण आरोग्य आणि जीव हि एक पूज्य गोमाता आहे आणि डॉक्टरने रुग्णासाठी आपले आयुष्य आणि जीव ओवाळून टाकावा अशी समाजाची अपेक्षा आहे. बाकी औषध कंपन्या, विमा कंपन्या, कोर्पोरेट घराणी यांनी काहीही केलेले चालते.
जालावर मोबाईल, टीव्ही किंवा क्यामेरा घेतला तर एम आर पी च्या ४० % स्वस्त का मिळतो आणि शोरूम मध्ये एम आर पी लाच का मिळतो.याचे उत्तर सर्वाना माहित आहे. पण त्यांना(शोरूमला ) कुणी लुटारू म्हणताना आढळले नाही. एवढेच कशाला चेन्नैला पूर आला तेंव्हा चेन्नई ते हैदराबाद तिकीट विमान कंपन्यांनी २८ हजार रुपयाला विकले.
अँजिओप्लास्टी सरसकट आवश्यक आहे का किंवा आवश्यक नसताना ती केली याचा टाहो फोडणारे आणि त्यांना उद्युक्त करणारे बालाजी ताम्बेन्सारखे/ केरळ आयुर्वेद लोक आहेत. त्याचा ९०%( अँजिओप्लास्टी केली नाही तरी काही होणार नाही) आणि १०%( जे रुग्ण रुग्णालयात पोहोचणारच नाहीत) या सांख्यिकीचा प्रतीवाद मी इतर कुठे तरी केला आहे. कुणाला हवा असेल तर तो त्यांनी शोधावा.
असो.
कुणीही उठावे आणि वस्तुस्थिती माहित नसताना डॉक्टरना लुटारू म्हणावे याचा प्रतिवाद करायचा आता मला उद्वेग ही आला आहे आणि कंटाळा सुद्धा.
मी यावर आता कोणताही वाद करणार नाही किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हि करणार नाही. प्रत्येकाने आपल्या(गैर) समजुतीप्रमाणे मत बनवावे.
इति लेखनसीमा

कपिलमुनी's picture

18 Feb 2016 - 7:40 pm | कपिलमुनी

डॉक्टर,
मी कुठेही डॉक्टरना लुटारू म्हणालो नाही . मला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचे होते.
हॉस्पिटलची मॅनेजमेंट या गोष्टी करू देत नाही.
पुण्यातल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमधला वैयक्तीक अनुभव सांगतो , तिथल्या भल्या डॉक्टरनेच हा सल्ला दिला होता , इथे स्टेंट घातलात तर महाग पडेल कारण मला यांचेच ईक्विपमेंट वापरावे लगतात. तुम्ही अमूक ठिकाणी ऑपरेशन करा. मी स्वतः येउन करतो.
कारण बहुतांश सर्जन हे व्हिजिटींग असतात.

बाकी माझा स्वतःच् माधव बाग , किलेशन थेरेपी , तांबे यां सारख्या गोष्टींवर विश्वास नाही. ( तो मुद्दा का लिहिला हेच कळला नाही ).

आणि डॉक्टरांवर राग , आरोप नाही. पण स्टेंट ची प्रॉडक्शन कॉस्ट, इंपोर्ट कॉस्ट आणि सेलींग कॉस्ट यात खूप फरक आहे .

पेशंट असो कि डॉक्तर , चांगल्या -वाईट प्रवृत्ती दोन्हीकडे असतात.
सरसकटीकरण नको हीच इच्छा!

चिगो's picture

19 Feb 2016 - 4:24 pm | चिगो

ह्या व्हिडीयो मध्ये दाखवलेली पद्धत वापरात आहे का? किंवा आपल्यामते ह्याप्रकारची सर्जरी होणे शक्य आहे का?

मिपावरील अन्य डॉक्टरांनी/तज्ञांनी आपली मते मांडावीत, ही विनंती..

Vasant Chavan's picture

19 Feb 2016 - 12:47 pm | Vasant Chavan

हल्ली खुप प्रकार वाढले आहेत.