राणी ताराबाई

sneharani's picture
sneharani in जनातलं, मनातलं
9 Jun 2012 - 1:47 pm

महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित! अशा थोर पराक्रमी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!

---------------------------------------------------------------------
इतिहास घडला तो कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर, त्यातही कर्त्या स्त्रियांची नावं थोडीच!असचं एक कर्तबगार व्यक्तिमत्व ज्यांचं नाव भद्रकालीची आठवण करुन देतं ते म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई! भोसले घराण्यातील एक मनस्विनी!!
नेसरीच्या खिंडीत बहिलोल खानाशी लढताना प्रतापराव गुजर मृत्यु पावले अन् मराठ्यांचे सेनापतीपद रिक्त झाले मग चिपळूणच्या लष्कर मेळाव्यातून शिवाजी राजांनी संभाजी मोहीते (सावत्रआई तुकाबाई यांचे बंधु/सोयराबाईंचे वडील) यांचा पुत्र हंसाजी मोहीते यांची सेनापतीपदी निवड केली, हंबीरराव हा किताब दिला. अन् याच शूर सेनापतीच्या पोटी सुमारे १६७५ साली तेजस्वी तारा जन्मला. ताराबाई! अशा लढाऊ तळबीडकर मोहीते घरण्यात जन्म झाल्याने सहाजिकच त्यांना घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालविणे, मुळाक्षर ओळख इ. शिक्षण मिळाले होते.शुर सेनापतीची मुलगी पुढे शिवरायांची सुन झाली...अन् तिने स्वातंत्र्ययुध्दाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचा यत्न केला अगदी शुरपणाने.
शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापना केली, वृध्दीही केली त्याच बरोबर स्वराज्य संरक्षणही सुरु होतं पण त्यांच्या मृत्युनंतर स्वराज्याचं संरक्षण करणं दिवसेंदिवस खडतर होत चाललं कारण एकतर प्रधानमंडळाच अन् संभाजीराजांच पटत नव्हत...अन् त्यात भर म्हणून सोयराबाईंनी संभाजीराजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न केला (अर्थात तो यशस्वी झाला नाही). पण हा विषप्रयोगाच कट उघडकीस येताच संभाजीराजेंनी कणखर भुमिका घेत सोयराबाई अन् त्यांचा मुलगा राजाराम राजे यांच्यावर नजरकैद बसवली. पुढे सोयराबाईंचा मृत्यु ऑक्टोबर १६८१ साली झाला, त्यानंतर त्यांनी राजारामावर फारकाळ नजरकैद ठेवली नसावी. संभाजी राजांनी पुढाकार घेऊन राजाराम यांचा विवाह हंबीरराव मोहिते यांच्या कन्येशी म्हणजेच ताराबाईंशी करून दिला अन् भावी लढाईचा वारसा चालवणारी एक शूर मनस्विनी भोसले घराण्यात आली. लग्नाच्या वेळचं त्यांचं वय ९-१० वर्ष असावं, पण सख्या आत्याचा म्हणजे सोयराबाईंचा झालेला मृत्यु, चाललेल राजकारण यांचाही प्रभाव पडला होता.राजाराम राजेंचा हा दुसरा विवाह.पहिला विवाह जानकीबाई याच्यांशी झाला.ताराबाईंशी विवाह झाल्यानंतरही राजाराम राजांचे आणखी दोन विवाह झाल्याचे आढळते, राजसबाई अन् अंबिकाबाई यांच्याशी!!शिवाय त्याच्या नाटकशाळेतील सगुणाबाई ही पत्नीसम रक्षा होती.
ताराबाईंच्या लग्नाला ५-६ वर्षे सरली न सरली तोच मराठेशाहीला मोठा धक्का बसला तो संभाजीराजांच्या औरंगजेबाकडून क्रुर वध! १६८९ साली संभाजीराजांना पकडलं गेलं. संभाजीराजे कैदेत असताना त्यांची पत्नी येसुबाई यांनी मराठ्यांची बाजू सावरण्यासाठी स्वतःचा पुत्र शाहूराजे यांना पुढे न आणता राजाराम राजे यांना पुढे आणले. मंचकारोहण विधी नंतर राजाराम राजेंनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली.इकडे संभाजीराजांचा क्रुरपणे वध केला. अन् राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. येसुबाईनी शक्य तितका काल किल्ला लढवला...अन् अखेर औरंजेबाने रायगड घेतला.शाहूराजे, येसुबाई, अन्य सरदार कैद केले.
पुढे राजारामाने ताराबाईंच्या साथीने मोघलांना कडवी झुंज दिली. वास्तविक संभाजीराज्यांच्या वधानंतर मराठ्यांची सत्ता नामशेष करायला जास्त वेळ लागणार नाही अशी अटकळ औरंगजेबाने बांधली होती. पण राजाराम राजेंनी ती फोल ठरवली.ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जाणं, शत्रुशी लढणं, अशी सततची धावपळ अन दगदग यामुळे मुळचे नाजुक प्रकृतीचे असणारे राजाराम राजे आजारी पडले. तब्येत ढासळली अन् १७०० साली सिंहगडावर त्यांनी आपला देह ठेवला. यानंतर एकट्या स्त्रीने मोघलांना दिलेली झुंज ही मराट्यांच्या दुसर्‍या स्वातंत्र्ययुध्दातील अतिशय कठीण काळ होय.
पुढे राजाराम राजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी आपला मुलगा 'शिवाजी'' याची मुंज व राज्याभिषेक करण्याची सुचना रामचंद्रपंत अमात्य यांनी केली पण पंतांनी संभाजीपुत्र शाहूराजे यांची आठवण करून दिली (त्यांची मुंज व्हायची होती) पण ताराबाईंनी "यांची मुंज अगत्यमेव मला कर्तव्य" असे बजावून सांगितलं अन् दुसर्‍या शिवाजीचा मुंज आणि राज्याभिषेक जुन १७०० च्या दरम्यान विशाळगडावर पार पडला.इकडे बादशहाने पन्हाळा काबीज करण्यासाठी आपलं सैन्य शहजादा बेदरबख्त व जुल्फिकारखान यांच्यासमवेत पाठवलं पण ५० हजार पायदळ आणि ३० हजार घोडदळ असून ही पन्हाळ्याचा वेढा यशस्वी झाला नाही हे पाहून दस्तुरखुद्द औरंगजेब पन्हाळ्याकडे आला. पण पन्हाळा तसा काबीज न झाल्याने वाटाघाटी झाल्या व रोख ५५ हजार रुपये मराठ्यांनी वसूल करून किल्ला दिला, पुढे विशाळगडासारखा भव्य गड लढून नाही मिळत म्हणल्यावर मोघलांनी वाटाघाटी करून तब्बल दोन लाख रुपये मोजून किल्ला ताब्यात ठेवला. अशाच रितीने मोघलांनी चंदन्-वंदन, सिंहगड, राजगड, तोरणागड असे ९-१० किल्ले काबीज केले. इ.स. १७०० साली सुरु केलेली ही मोहीम १७०४ संपली ती तोरणागड घेऊनच. यातला तोरणाच काय तो फक्त लढून मिळाला, बाकीचे किल्ले वेढा घालूनसुध्दा सर न झाल्याने त्यांना भरभक्कम रकमा मोजूनच घेतले.
इकडे ताराबाई स्वस्थ नव्हत्या, किल्लेदारांना पत्र लिहून शक्य तितका काळ किल्ला लढवा, मनुष्यहानी जास्त होऊ देऊ नका अशा आशयाची पत्रे पाठवत, प्रसंगी रसदही पाठवत अन् इकडे लष्कर मोहिमेचाही विचार करत.थोडक्यात बचावात्मक धोरण त्यांनी राबविले पण १७०२ सालानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. इकडे किल्ले लढत होतेच तर दुसरीकडे त्यांनी गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक, तमीळनाडू अशा लष्करी मोहिमा उभारल्या.एकीकडे बादशहा किल्ले घेण्याच्या मागे लागला होता पण त्याच बरोबर मराठी फौजा मुसलमानी राज्यांवर आक्रमणे करीत होत्या, त्यामुळे कित्येकदा त्याने जुल्फिकारखानास वेढ्याच्या कामातून काढून मराठ्यांचा बंदोबस्त करायला पाठवले. मोघली फौजा आपले तळ हलवून दुसरीकडे जायला लागल्या की मराठे त्यांच्यावर हल्ले करीत. भरीस भर निसर्गही पावसाळ्याच्या रुपाने मोघली फौजांवर अवकृपा करायचा.तरीही बादशहाने मोहिम सुरुच ठेवली.
शक्य तितका काळ किल्ला लढवायचा, मनुष्यबळाची नुकसानी टाळायची, किल्ल्यावरची शिबंदी, दिलेली रसद संपत आली की वाटाघाटीच्या बोलण्यात शत्रुला गुंतवुन आणखी वेळ काढायचा अन् किल्ला शत्रुला देताना भरभक्कम रक्कम उकळूनच द्यायचा हेच धोरण ताराबाईंनी ठेवले. कारण पुढे शत्रुची पाठ वळली की हे किल्ले पुन्हा हस्तगत करुच हा विश्वास त्यांना होता. अन् तो सार्थ ठरलादेखील.
गेलेले गडकिल्ले त्यांनी मोठ्या हिकमतीने हस्तगत केले जे की औरंगजेबाने फारमोठ्या प्रमाणात वित्तहानी, मनुष्यहानी अन् खूप मोठा काळ खर्च करुन घेतले होते.
किल्ले हस्तगत केल्यानंतर बादशहा वाकिणखेड्याची मोहिम संपवून अहमदनगरला आला अन् अखेरचे दिवस कंठू लागला.तरीही त्याच्या फौजा लढतच होत्या ताराबाईंच्या लष्करी मोहिमाही अर्थात सुरुच होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच औरंगजेबाच्या राज्यात फौजा पाठवण्याचे धोरण ठेवले परिणामतः मराठ्याना कुठे कुठे प्रतिकार करावा हेच बादशहाला उमजत नव्हते. बादशहाचे पारडे खचत चालले तर उलटपक्षी शत्रु आरीस येण्याला आणखी थोडाच काळ लागेल हे दिसताच ताराबाईंनी मोघली प्रातांवर प्रचंड लष्कर मोहिमा उभारल्या अन् मराट्यांचा आपल्या प्रातांतील धुमाकुळ पाहण्याशिवाय बादशहाला गत्यंतर नाही राहिले.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औंरगजेबाचा मृत्यु झाला. १६८१ साली दक्षिणेत उतरलेला बादशहा १७०७ साली दक्षिणेतच गेला अन् तब्बल २७ वर्षांची ही लढाई मोहिम संपुष्टात आली.अन् तो काळ एक तेजस्वी इतिहास बनला. या काळात संताजी-धनाजी यांसारखे शूर सेनानी चमकले, ताराबाईंसारखी एक रणरागिनी तार्‍यासारखी चमकली.
राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर म्हणजे इ.स. १७०० पासून ते औरंजेबाचा मृत्यु होईपर्यंत म्हणजे फेब्रु. १७०७ पर्यंत म्हणजे ७ वर्षे ताराबाई मराट्यांना सोबतीस घेऊन मोघलांशी झुंजत होत्या. मनुष्यहानी टाळण्यासाठी कधी बचावात्मक धोरण अवलंबित होत्या तर कधी चढाईचं! लष्करी मोहिमेत प्रसंगी त्या तळावर घोड्यावरून रपेट मारत, मुक्कामी राहात, सैन्यांचं मानसिक बळ वाढवत अशा अनेक गोष्टींमुळे सैन्यात उत्साह येई अन् याचा परिणाम युध्दभुमीत दिसे.
पन्हाळ्याचे किल्लेदार गिरजोजी यादव हे त्यांचे अत्यंत विश्वासु माणूस, बर्‍याचदा त्यांच्याकडूनच आपले आदेश त्या मराठ्यांना सांगत. धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक, रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण अशा अनेक शुरांची साथ त्यांना लाभली.
बादशाहाच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी तंटे निर्माण झाले अन् त्यासाठी उत्तरेकडे जात असताना त्याच्या पुत्राने शहजादा आज्जम ने शाहू राजांची (संभाजी पुत्र)सुटका केली. शाहू राजे स्वराज्यात परत आल्यानंतर सेनेतील अधिकारी त्यांच्यांकडे जाऊ लागले. पुढे त्यांनी छत्रपतीपदावर आपला हक्क सांगिताच भोसले घराण्यात झगडा निर्माण झाला. त्याच्यां अन् ताराबाईंच्यामध्ये कधेमधे प्रसंगी चकमकी सुध्दा झाल्या अन् दुफळी निर्माण झाल्याने सातारा व पन्हाळा अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या, इथून पुढे त्यांच्या कारकिर्दीला उतार लागला.
अवघ्या २५-२६ वर्षाच्या विधवेने मोघलांचा जो मुकाबला केला, रणसंग्राम केला तोच इतिहासात आज तिचं नाव अजरामर करतो आहे. लष्करी कारभारावर पुर्ण मदार ठेवून त्यावर जी जरब महाराणीनी बसवली त्यास तोड नाही. दरम्यान संताजी-धनाजी वितुष्ट, धनाजी-नेमाजी वितुष्ट, घोरपडे घराण्याची बंडखोरी, सरदारांची वतनासक्ती, सरंजामशाही अशा छोट्या मोठ्या घरच्या संकटांना तोंड देत औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुला दिलेली झुंज हे अशक्य असं राष्ट्रकार्य ज्या तडफदारपणे, जिद्दीने पुर्णत्वास नेले त्यास तोड नाही.

मांडणीसंस्कृतीधर्मइतिहासकथासमाजराजकारणप्रकटनविचारलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

9 Jun 2012 - 2:04 pm | नाना चेंगट

परिचयात्मक लेखन आवडले.

सुहास..'s picture

9 Jun 2012 - 10:38 pm | सुहास..

व्हेरी वेल बॅलॅन्स्ड !!

पुढचा भाग ??

श्रावण मोडक's picture

9 Jun 2012 - 2:05 pm | श्रावण मोडक

लिहित रहा. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2012 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार

लेखन, संयम आणि सरलता आवडली.

आणि मुख्य म्हणजे ट्यार्पीसाठी कुठलेही भडक विधान केलेले नाही हे सगळ्यात जास्ती आवडले.

पु.भा.प्र.

jaypal's picture

9 Jun 2012 - 2:17 pm | jaypal

आवडला. अजुन येउद्यात :-)

जोयबोय's picture

9 Jun 2012 - 2:18 pm | जोयबोय

ताराबाईंचे कार्य रानी लक्ष्मीबाई पेक्षा जास्त थोर वाटत आहे

शैलेन्द्र's picture

12 Jun 2012 - 10:53 pm | शैलेन्द्र

आहेच...

छान
संयत शब्दात लिहीलेला परिचय आवडला

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Jun 2012 - 2:28 pm | निनाद मुक्काम प...

तुलना करणे योग्य नाही
पण माझा असा ठाम मत आहे.
ताराबाई ह्यांचे कार्य व कर्तुत्व झाशीच्या राणीपेक्षा नक्कीच जास्त आहे.
पण दुर्दैवाने ताराबाई ह्यांच्या वाट्याला झाशीच्या राणी एवढी लोकप्रियता मिळाली नाही.

दोन्ही शूर होत्या.
पण इंग्रजांशी अयशस्वी झुंज देऊन झाशीची राणी तिच्या धाडस , शौर्य , ह्यामुळे भारतभर लोकप्रिय आहे.
तर आलामगीरास अल्लाकडे पाठवण्यास मोठा वाटा असणारी व १२ व्या शतकापासून भारतभर पसरलेले मोगल साम्राज्य खीळखीळ करणारी
ताराबाई मात्र त्या मानाने ....

येथे लेखात एक उल्लेख करायच्या राहून गेला असे वाटते.
ताराबाई ह्यांनी नुसते मैदानात नाही तर राजकारणात सुद्धा चमक दाखकावली.
उदा आलमगीर जेव्हा पैशाच्या जीवावर मराठी इमान विकत घेऊ पाहत होता.
ताराराणीने सरदारांना वतने देण्याचा निर्णय घेतला. जो शिवरायाच्या धोरणाविरुद्ध असला तरी त्या वेळी अक्सीर ठरला.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2012 - 2:55 pm | मुक्त विहारि

आवडली..

पैसा's picture

9 Jun 2012 - 2:57 pm | पैसा

रणरागिणी ताराराणीची छान ओळख करून दिलीस! आणखी जरूर लिही.

किसन शिंदे's picture

9 Jun 2012 - 2:59 pm | किसन शिंदे

लेख आवडला.

कवितानागेश's picture

9 Jun 2012 - 3:56 pm | कवितानागेश

लेख आवडला. अजून येउ दे.

दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

- कवी गोविंद (समकालिन कवी)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Jun 2012 - 5:21 pm | निनाद मुक्काम प...

वीरश्री युक्त कविता आहे.

प्रचेतस's picture

9 Jun 2012 - 5:59 pm | प्रचेतस

लेख आवडला.

ताराबाईंविषयी फारशी महिती नसल्याने त्यांच्या कार्याची ओळख झाली.

स्पंदना's picture

9 Jun 2012 - 6:23 pm | स्पंदना

अगदी टाकोटाक लिहिल आहे. थोडक्यात पण पुर्ण माहिती.

५० फक्त's picture

9 Jun 2012 - 6:58 pm | ५० फक्त

अतिशय उत्तम लिखाण, इतिहासाबद्दल कसं लिहावं याचा एक उत्तम नमुना. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2012 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा

चांगली ओळख करवुन दिलित... :-)

खेडूत's picture

9 Jun 2012 - 8:06 pm | खेडूत

आवडले. संदर्भ ग्रंथ असतील तर कृपया सांगावेत ...

sneharani's picture

12 Jun 2012 - 1:51 pm | sneharani

पुस्तके

महाराणी ताराबाई - जयसिंगराव पवार
मराठेशाहीतील मनस्विनी - देशपांडे
ताराबाईकालीन कागदपत्रे (विद्यापीठ प्रकाशित)

अशोक पतिल's picture

9 Jun 2012 - 9:04 pm | अशोक पतिल

खुप छान माहिति . एका कर्त्वुतवान रानीचा लढा व जीवनपट फारच आवडला . मराठ्यांच्या इतिहासात अश्या पुष्कळ झुझांर व्यक्तिरेखा अप्रकाशीत असतील . आजच्या पिढीने वाचावा असा हा लेख !

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2012 - 2:59 am | श्रीरंग_जोशी

ताराराणींच्या कार्याची ओळख परिणामकारकरित्या करून देणारे लेखन!!

पुढील लेखनास शुभेच्छा!!

चांगली ओळख ,लेख आवडला:)
कालच एका पुस्तकात ताराबाईंच्या कार्याबद्द्ल थोडी माहीती वाचायला मिळाली अन आज तुझा लेख सोने पे सुहागा :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखन आवडले. ताराबाईंबद्दल खूप जास्त काही वाचलं नव्हतं. ही छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. नेहमी का नाही लिहित?

सुनील's picture

11 Jun 2012 - 10:24 pm | सुनील

चांगली ओळख करून दिली आहे. ताराबाई ह्या मराठा इतिहासात थोड्या दुर्लक्षित राहिल्या हे मात्र खरे.

शिवाजीने बंद केलेली वतनदारीची प्रथा पुन्हा सुरु करणे ह्यात तात्पुरता फायदा झाला असे दिसले तरी, शेवटी त्याने मराठा साम्राज्याचे नुकसानच झाले असावे.

शैलेन्द्र's picture

12 Jun 2012 - 11:01 pm | शैलेन्द्र

कोणती प्रथा कधी वापरायची व कधी बदलायची याची जाण राज्यकर्त्यांना असायला हवी..

शैलेन्द्र's picture

12 Jun 2012 - 11:03 pm | शैलेन्द्र

कोणती प्रथा कधी वापरायची व कधी बदलायची याची जाण राज्यकर्त्यांना असायला हवी..

लेख आवडला.

बिपिनदा सारखच म्हणतो. नियमित लिहीत रहा.
या पुढेही वाचायला आवडेल.

मृत्युन्जय's picture

16 Jun 2012 - 11:19 am | मृत्युन्जय

छान ओळख. नंतरच्या काळात मात्र ताराराणीने खुपच जहाल अंतर्गत राजकारण खेळले ज्यामुळे कोल्हापुरची गादी खिळखिळी झाली.

शैलेन्द्र's picture

16 Jun 2012 - 12:02 pm | शैलेन्द्र

बाळाजी विश्वनाथाने जर शाहुऐवजी ताराबाईचा पक्ष घेतला असता तर मराठी राज्य कदाचीत वेगळे असते.

मदनबाण's picture

16 Jun 2012 - 6:14 pm | मदनबाण

लेख आवडला. :)