हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ५ शेवटचा)

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Dec 2011 - 11:21 pm

भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४

स्वामी हरिदास
दिल्लीवर जेव्हा मोहम्मद अली राज्य करत होता तेव्हा त्याच्या दरबारात जवळजवळ शंभरच्यावर कलाकार हजेरी लावत. अर्थात यात भरणा होता तो कव्वाल, मिराशी आणि धाडी यांचाच. पठाणांची सत्ता लयास गेल्यावर या उलट चित्र दिसू लागले. बैजू बावरा यांच्या ध्रुपद गायकीमधे राग आलाप आले आणि ते संगीत अधिक कर्णमधूर झाले आणि त्याची राजमान्यता व लोकमान्यता वाढीस लागली. स्वामी हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली राजा मानसिंग यांच्या दरबारात भानू, चर्जू, धुंडी आणि चंचल शशी यांनी कलावन्त घराणे खर्‍या अर्थाने स्थापन केले. अकबराच्या काळात तानसेन यांना जे पद मिळाले होते त्यामुळे स्वामी हरिदास यांचे संगीत दरबारात प्रस्थापित झाले. तानसेनच्या अधिपत्याखाली दरबारात संगीत सभा स्थापन झाली. हीच ती नऊ रत्ने. यातील बाकीच्यांची नावे विशेष प्रचलित नाहीत. ती होती – खुदाबक्ष, मसनद अली, रामदास, चांद खान, सुरज खान, सुरज्ञान खान, जगपत–हे मृदुंगी होते.

स्वामी हरिदास यांचा सगळ्यात प्रसिद्ध शिष्य अर्थातच तानसेन होता पण बाकीचेही काही कमी नसावेत. तानसेन अकबराच्या दरबारात गेल्यामुळे त्याचे संगीत जगतात खूपच वजन होते. त्यानेही या आपल्या दबदब्याचा उपयोग इतर कलावंतांसाठी मुक्तहस्ते केला. त्यांचे इतर शिष्य होते – ब्रिज चांद, गोपाल लाल, व अजमेरचे महाराजा सामोखान सिंग हे त्याकाळातील सर्वश्रेष्ठ वीणा वादक होते. या सगळ्या गायकांची घराणी त्या काळी अस्तित्वात होती पण तानसेनच्या प्रभावाखाली त्यानी (तानसेननी) स्थापन केलेली घराणीच तग धरून राहिली. त्याने स्थापन केले त्या घराण्याचे नाव सेनी/सेनिया घराणे.

तानसेनच्या मृत्यूनंतर सेनी घराणे तीन ठिकाणी प्रस्थापित झाले. दिल्लीदरबारात बिलासखान याने बस्तान बसवले. यांनी गौडबानीची परंपरा चालू ठेवली. दुसरा मुलगा सुरत सेनी हा जयपूर दरबारात स्थायिक झाला आणि त्याने डागोरबानी आपलीशी केली. तिसरे घराणे स्थापन केले तानसेनच्या जावयाने - मिस्रिसिंग याने.

या मिस्रिसिंगची एक कथा प्रचलित आहे. ती अशी -
(एकदा सम्राट अकबर एका जंगलात शिकारीसाठी गेला होता. एका ठिकाणी त्याला देवळातून विणेचे अत्यंत मधूर स्वर ऐकू आले. त्याने आत्तापर्यंत अशी जादू ऐकलीच नव्हती. जेव्हा तो बाकीच्यांना बाहेर थांबवून आत गेला तेव्हा त्याला एक साधू अत्यंत तल्लीन होऊन वीणा वाजवत असलेला दिसला. सम्राट स्तब्ध होऊन त्या वादनाचे रसग्रहण करत होता. काही तास गेल्यावर त्या वादकाने आपले वादन थांबवले व त्या देवळातल्या मुर्तीसमोर त्याने नमस्कार घातला. त्याचवेळी त्याच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू अकबराला दिसले. अधिक चौकशी करता त्याला असे कळाले की हा वादक मिस्रिसिंग होता. अत्यंत उर्मट, डोक्याने भडक, अविचारी असा हा माणूस त्याच्या वडिलांच्या हत्येला जबाबदार होता. त्याचा अतोनात पश्चात्ताप होऊन त्याने भगवी वस्त्रे धारण करून या जंगलात मुक्काम टाकला. अकबराला हे रत्न त्या जंगलात टाकणे जिवावर आले. त्याने त्याला आपल्याबरोबर दिल्लीला नेले. त्याच्या वीणा वादनाची किर्ती दुरवर पसरली होतीच. एकदा असेच दरबारात त्याची व तानसेनची जुगलबंदी चाललेली असताना मिस्रिसिंगला तानसेनची बरोबरी न करता आल्यामुळे त्याची थोडी चेष्टा झाली असावी..पण तेवढ्याने त्या माथेफिरुने तानसेनवर हल्ला चढवला. अर्थात त्याला पकडण्यात आले. पण तो त्या कैदेतूनही पळून गेला. अकबराला आता कळेना हे प्रकरण कसे निस्तरावे ? मिस्रिसिंगला तर अभय दिले होते आणि एका सम्राटाने दिलेले अभय....... दुसरीकडे तानसेन्ही मिस्रिसिंगच्या जिवावर उठलेला. शेवटी अकबराने एक प्रयत्न करायचा ठरवला. त्याने तानसेनला सांगितले की एक स्त्री बीनकार दिल्लीत आली आहे आणि ती अप्रतीम वीणा वाजवते. ती मैफील ठरल्यावर मिस्रिसिंगला पडद्याआड बसवून वीणा वाजवायला सांगण्यात आले. ते ऐकून तल्लीन झालेल्या तानसेनला अर्थातच तो मिस्रिसिंग वाजवतोय हे कळाले. त्याचा राग अनावर होऊन तो ती मैफील सोडणार एवढ्यात अकबराने त्याला थांबवले आणि तो म्हणाला " तानसेन, जर तू मला याच्यापेक्षा चांगला बीनकार दाखवलास तर मी याला मृत्यूदंडाची शिक्षा देईन. पण असा दुसरा कोणी नसेल तर तू त्याला उदार अंतःकरणाने क्षमा कर आणि तुझी मुलगी त्याला दे." तानसेनने त्याची मुलगी सरस्वतीदेवी मिस्रिसिंगला देऊन त्याच्याशी नाते जोडले.)

तानसेनची मुलगी सरस्वतीदेवी याला दिली होती आणि तो वर उल्लेख केलेल्या महाराजा सामोखान यांचा मुलगा होता. हे घराणे मुख्यत: वीणावादनासाठी प्रसिद्ध झाले अर्थात ते ध्रुपदही गायचे. या तीन सेनी घराण्यांव्यतिरिक्त मथुरेला ब्रीजचांद आणि सुरदास यांचेही एक घराणे होते. या घराण्यात मथुरेचा ब्राह्मण पुजारी वर्ग मोठ्या संख्येने सामील झाला होता. चांदखान आणि सुरज खान यांनी पंजाबची वाट धरली आणि त्यांनी तेथे तलवंडी घराणे स्थापन केले.

शहाजहानच्या काळात धमार पद्धतीचे गायन हाज़ी सुजान खान यांनी प्रथम संगीतजगतात पेश केले आणि ते या बादशहाच्या दरबारात व जनतेत फारच लोकप्रिय झाले. औरंगजेबाच्या काळात त्याच्या
कडव्या धर्मांधतेमुळे सगळ्याच कलांची जबरदस्त पिछेहाट झाली हे आपणा सर्वांना माहीत आहेच. नशिबाने मोहम्मदशहा रंगीले यांनी दिल्ली दरबाराचे पुनरूज्जीवन केले आणि परत एकदा सगळे मातब्बर कलाकार दिल्लीला जमले.
मोहम्मदशहा रंगिले -

तानसेनचे जावई मिस्रीसिंग यांचा एक वंशज होता नियामत खान. हा तानसेन नंतर दुसर्‍या क्रमांकाचा संगीत तज्ञ म्हणून ओळखला जातो. यालाच काही काळानंतर शाह सदारंग असा सन्मान देण्यात आला. याने वीणा वादनात बरीच सुधारणा केली. ख्यालही याचीच निर्मिती. जेव्हा याचे शिष्य ख्याल शिकायला लागले व मैफिली गाजवू लागले तेव्हा यांचेही एक घराणे तयार झाले, त्याचे नाव कवाल. ख्याल गायकीत पुढे उदयास आली ती घराणी म्हणजे ग्वाल्हेर आणि आग्रा घराणे.

मुघल सत्तेच्या अंत:समयी त्यांची सत्ता खिळखिळी झाली आणि ते नामधारी सत्ताधीश राहिले. या सत्तेची आर्थिक परिस्थिती ढासळल्यावर बरेचसे कलाकार दिल्लीतून विस्थापित झाले आणि त्यांनी इतर पण आता शक्तिशाली झालेल्या छोट्या छोट्या राजांच्या दरबारी आश्रय घेतला. या स्थलांतरामुळे या कलाकारांचे दोन गट पडले. बिलास खान आणि निआमत खान हे बनारसला स्थाईक झाले पण त्यांनी आपली सेवा लखनौच्या दरबारी रूजू केली त्यांना म्हणत पुर्वेचे कलाकार. दुसरा गट होता सुरत सेन यांच्या वंशजांचा. ते स्थाईक झाले जयपूरला आणि त्यांनी आपली सेवा जयपूर दरबारी रुजू केली त्यांना म्हणत पश्चिमेचे कलाकार. पूर्वेचे कलाकार ध्रुपद गात व रबाब आणि वीणा वाजवत तर पश्चिमेचे कलाकार द्रुपध गात व सतार आणि वीणा वाजवत.

१८व्या शतकाच्या मंध्यतरी सेनी घराण्यातून जी घराणी निर्माण झाली त्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले, ते खालीलप्रमाणे –

सेनी घराणे – ध्रुपद, रबाब. हे स्थापन केले जाफर खान, प्यारे खान, बसत खान या तीन भावांनी आपण हे बघितलेच की यांचे वास्तव्य लखनौ आणि बनारसला असे.

सेनी वीणावादक – हे स्थापन केले निर्मल शाह यांनी.

कवाल घराणे – बडे मोहम्मद खान, लखनौ आणि ग्वाल्हेर

ग्वाल्हेर घराणे (ख्याल) – हे स्थापन झाले हुद्दू खान, हस्सू खान आणि नथ्थू खान. हेही तिघे सख्खे भाऊ होते.

आग्रा घराणे – (ख्याल आणि धमार) – हाजी सुजन खान (धमार). याने नंतर शाह सदारंग यांचे शिष्यत्व पत्करले.

बेतीया घराणे – ध्रुपद – हैदर खान (लखनौ सेनी) यांच्या शिष्यांनी स्थापन केले. याच्यात बनारस मधील कथक नर्तक व कल्पीचे काही मुसलमान कलाकारही होते.

विष्णूपूर घराणे –(ध्रुपद) – हे स्थापन केले सेनी घराण्याचे बहादुर खान आणि त्यांचे शिष्य रामशंकर भट्टाचार्य यांनी.

तलवंडी घराणे – (पंजाबी ध्रुपद) – पंजाब मधील ध्रुपद गायकांनी स्थापन केले. अधिक माहिती उपलब्ध नाही.

लाहोर घराणे –(पंजाबी ख्याल) - हे शाह सदारंग यांच्या शिष्यांनी स्थापन केले असे ते मानतात.

आत्रौली घराणे – (ध्रुपद, ख्याल) – हे घराणे मथुरेच्या ब्राह्मणांनी स्थापन केले असे म्हणतात. यांनीही अर्थात नंतर मुसलमान धर्म स्विकारला.

डागर घराणे – हे बैराम खान याने स्तापन केले. वर उल्लेख केलेल्या पुजार्यां चा हा वंशज होता.

जयपूर सेनी घराणे –(सतार) – हे पसिद्ध अमृत सेन यांनी स्थापन केले.

सहराणपूर सरोद घराणे – निर्मल शाह यांचे चिरंजीव उमराव खान यांच्या शिष्यांनी स्थापन केले.

लखनौचे सतार घराणे – हे स्थापन केले गुलाम मोहम्मद खान यांनी. हे उमराव खान सेनी यांचे शिष्य होते.

वज़ीद अली शहा.

रामपूर घराणे – वज़ीर खान यांनी स्थापन केले. हे सगळ्यात नवीन घराणे म्हणता येईल.१८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य युद्धात वज़िद अली शहांनी लखनौ सोडून कलकत्याची वाट धरली आणि त्यांनी त्यांच्या बरोबर काही गवैय्ये नेले. त्यात सादिक अली खान, कासम अली खान जे तानसेनच्या घराण्याचे होते आणि मुराद अली खान व ताज खान हे कल्पी घराण्याचे होते. सोबत अजून काही ख्याल गायक होतेच.
सादिक अली शेवटी बनारसला स्थाईक झाले आणि त्यांनी मिठाइलालजी आणि बाजपेयी यांना गाणे शिकवले. रामपूरच्या नबाब कालवे अली खान यांनी दोन दिग्गज गायकांना रामपूरला यायचे आमंत्रण दिले. ते होते विष्णूपूरचे बहादूर हुसेन खान आणि अमीर खान. हे जे हुसेन खान होते ते प्यारे खान (सुरसिंगार) याचे पुतणे होते तर अमीर खान हे उमराव खान सेनी (वीणा) यांचे सुपुत्र होते. त्यामुळे बहादूर खान हे सुरसिंगार वाजवायचे तर अमीर खान वीणा. दोघेही ध्रुपद गायनातले दादा होतेच. बहादूर हुसेन हे सुरसिंगार असे वाजवायचे की त्यांच्या बोटांना लोकांनी हिर्‍याची उपमा दिली होती आणि सामान्य जनतेलाही त्यांच्या वादनाची भुरळ पडली. त्यांनी वाद्यसंगीत हे अलंकारयुक्त केले आणि झाला वादनात अनेक प्रयोग केले. आजही सरोद आणि सतार वादनात त्याचा उपयोग केला जातो.

अमीर खान, जे वीणा वाजवायचे त्यांचा गळा गोड होता आणि वीणेपेक्षा त्यांचे लक्ष गाण्याकडे जास्त होते. दरबारात ते क्वचित वीणा वाजवायचे पण ध्रुपद आणि धमार ते नेहमीच गायचे. याच काळात कादर पिया, सादर पिया आणि सनद पिया या तीन भावांनी ठुमरी हा गायन प्रकार संगीतात आणला होता. याच्यातील सनद पिया हे वज़ीद अली बरोबर कलकत्याला आले. या गायनाच्या प्रकाराला अमीर खान हे आपल्या धमाराने उत्तर देत आणि जुगलबंदीत प्रभाव पाडीत. गंमत म्हणजे त्यात ते मींड, मुरकी आणि फिरक यांचा वापर करत. अर्थात त्या काळी या प्रकाराला या नावाने ओळखत नव्हते किंबहुना हे लौकिक अर्थाने हे प्रकार अस्तित्वात नव्हते असे म्हटले तरी चालेल. या दोघांनी नबाबाच्या भावाला म्हणजे हैदर अली खान यांना आपली सर्व विद्या प्रदान केली. या भावाने ते सर्व लिखीत स्वरुपात जतन केले आणि आजही ते रामपुरच्या संस्थानात आहे असे म्हणतात. बहादूर खानाने याच काळात अनेक तराणे रचले, जे आज ही गायले जातात.
तानसेन घराण्याचे काही प्रसिद्ध कलाकार –
मोहम्मद हुसेन – वीणा
नबी बक्ष – वीणा
कुतुबौद्दला – सतार
इनायत खान – सुरसिंगार
अली हुसेन – वीणा
बकर अली खान – ख्याल
असद खान – सुरसिंगार
फिदा हुसेन खान – सरोद
बोनियत हुसेन खान – सारंगी

सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमीरखान यांच्या मुलाने म्हणजे वज़ीर खान याने दिल्ली दरबाराप्रमाणे एक कलाकारांची एक सभा स्थापन केली आणि त्यांना यात साथ दिली नबाब हैदर अली खान यांच्या चमनसाहेब या मुलाने.
वज़ीर खान आणि चमनसाहेब यांनी जी शिष्यपरंपरा तयार केली ती आपल्याला ओळखीची वाटेल –अल्लाउद्दीन खान – सरोद
हफिज अली खान – सरोद
मुस्ताक हुसेन खान – ख्याल
बंडोपाध्याय – रुद्रवीणा
पंडीत भातखंडे – संगीत तज्ञ. यांना संगीताचे चालते बोलते विद्यापीठ असे ओळखले जायचे.
महापात्रा – सुरबहार.

वृंदावन हे प्रबंध गायकीसाठी पसिद्ध होते हे आपल्याला आता माहीत आहेच. बंगालमधील सर्व वैष्णव संत व त्या परंपरेतील इतर संत हे भजने म्हणण्यासाठी या गायनाचा उपयोग करत.

अजून एका शहराचा उल्लेख आपल्याला या संगीत प्रवासात करावा लागेल आणि ते म्हणजे विजापूर. सुलतान इब्राहीम अदिलशहा-दुसरा हा अकबराच्या समकालीन होता.

आपल्या सत्तेचा आणि आयुष्याचा उपयोग त्याने संगीतासाठी केला. दिल्लीवरून असद बेग नावाचा एक सरदार किंवा वकील म्हणा या दरबारात आला होता त्याने दरबाराला भेट दिली असता त्याने असे नमूद केले आहे की तो बोलत असताना सुलतानाचे त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो आपला संगीतात मश्‌गूल होता. इब्राहीम स्वत: ध्रूपद गायनात तरबेज होता आणि त्याने त्यावर एक पुस्तकही लिहिले होते “किताब-ए-नौरस” या पुस्तकाची किर्ती दिल्लीदरबारी पोहोचली आणि हे पुस्तक काव्य स्वरूपात जतन करावे असे अकबराने आदेश काढले.

या पृथ्वीवर जे संगीताच्या विश्वात जे काही तारे चमकून गेले त्यांची आपण ओळख करून घेतली. दुर्दैवाने आज आपण त्यांच्याबाबत अजून माहिती मिळवू शकत नाही. काय सांगावे कदाचित ती कुठेतरी असेल आणि केव्हातरी उजेडात येईलही पण तोपर्यंत आपल्याला याच्यावरच समाधान मानावे लागेल. शेवटी आत्ता प्रसिद्ध असलेल्या काही घराण्यांचे गायन आपल्यासाठी खाली देत आहे.

आग्रा : फैयाझ हुसेन खाँसाहेब - राग ललित

बनारस : राजन साजन मिश्रा - राग पुरिया

भेंडीबझार : बशीर अहमद खाँ - राग मारवा.

दिल्ली : बुंदूखाँ - राग - भैरवी.

ग्वाल्हेर : उ.हमीद अली फतेह खान - ललित.

इंदोर : अमीर खॉसाहेब - मारवा.

जयपूर : सुरश्री केसर्बाई केरकर - राग बागेश्री.

किराणा : फहीम मजहर - राग काफि कानडा.

मेवाती : पं. जसराज - राग भिमपलास

पतियाळा : उस्ताद फतेह अलीखान - राग मेघ

कासूर पतियाळा : बदे गुलाम अली खॉसाहेब - ठुमरी

कव्वाल : नासिरुद्दीन खान - राग खंबावती

रामपूर : निस्सार हुसेन खान - राग मालकंस.

शामचौरसी : हुसेन बक्श -राग ललित

तलवंडी : हफिज खान/ अफजल खान - मियाँकी तोडी.

मित्रहो याच बरोबर ही लेखमाला संपवत आहे. आशा आहे ही आपल्याला आवडली असेल. वरील संगीत ऐकायला विसरू नका.

या मैफिलीचा शेवट एका अप्रतीम भजनाने करत आहे.

ज्या सगळ्यांनी ही लेखमाला धीर धरून वाचली त्या सर्वांचे आभार मानतो. आणि ज्यांनी आवडली हे कळवले आहे त्यांना धन्यवाद !
जयंत कुलकर्णी. 
समाप्त.

संस्कृतीकलासंगीतइतिहासकथाआस्वादलेखमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

27 Dec 2011 - 10:26 am | अन्या दातार

अजुन काय बोलणार??
वाचनखूण साठवली आहे, हे पुरेसे असावे. :)

मन१'s picture

27 Dec 2011 - 11:33 am | मन१

संपूर्ण मालिका रंजक वाटली.

रणजित चितळे's picture

27 Dec 2011 - 12:42 pm | रणजित चितळे

छान माहिती व सुंदर मालिका. जयंत साहेब आपल्याला प्रणाम.

चैतन्य दीक्षित's picture

27 Dec 2011 - 5:45 pm | चैतन्य दीक्षित

जयंतजी,
इतके छान माहितीपूर्ण लेखन वाचून खूप छान वाटलं.
मनापासून अनोकोनेक धन्यवाद.

सुधांशुनूलकर's picture

27 Dec 2011 - 8:23 pm | सुधांशुनूलकर

जयंतजी, धन्यवाद.
खूप सुंदर लेखमाला. सर्व भाग आवर्जून वाचले, अतिशय आवडले.
वाचनखूण साठवली आहे.

जयंत कुलकर्णी's picture

29 Dec 2011 - 9:18 am | जयंत कुलकर्णी

वरील सर्व वाचकांना धन्यवाद !
वैदिक संगितावर दोन भाग लिहायचा मानस आहे.

पैसा's picture

29 Dec 2011 - 8:03 pm | पैसा

खूपच माहितीप्रद लेख. सोबतच्या गाण्याच्या लिंकाही फार आवडल्या. सावकाशीने ऐकेन!