शास्त्रीय संगीत आणि मियॉ तानसेन

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Nov 2011 - 11:05 pm

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

पंड्त बिरेंद्र किशोर रॉय यांच्या लेखावर आधारीत.

हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. अर्थात ज्या राजांच्या आश्रयाला हे ऋषीमूनी होते, ज्यांचा सक्रीय आधार या गुरूकूलांना लाभला होता, त्यांनाही या परंपरेचे श्रेय द्यायलाच लागेल.

पुराणकाळाच्या शेवटी शेवटी देवळात पूजेसाठी संगीताचा वापर चालू झाला आणि संगीताची आणि इतर कलांची एक संस्कृती निर्माण झाली. हीच संस्कृती राजदरबारांतून पूढे जनताजनार्दनात पसरली कारण हे राजे स्वत: या देवळातल्या त्यांच्या कुलदैवतांची पूजा करण्यात धन्यता मानत असत आणि त्यावेळी या संगीताचा पुरेपूर केला जाई. या संगीताला “मार्ग संगीत” असे संबोधले जाऊ लागले कारण हे संगीत साधकाला मार्ग दाखवत असे. नैसर्गिकरित्या या संगीताचा पूढचा प्रवास हा त्या देवळांच्या पूजारी वर्गाच्या हातात होता आणि अर्थातच त्याला राजाश्रय होता. या संगीताचा वापर पूढे पुढे देवालयात होता होता राजदरबारीही मनोरंजनासाठीही होऊ लागला.

या देवळांच्या स्थापत्यामधे त्यामुळे एक वैशिष्ठ्य होते, ते म्हणजे प्रत्येक देवळात कला सादर करण्यासाठी असलेली प्रशस्त जागा. गाणे, प्रार्थना, नृत्य अशा विवीध कला येथेच सादर केल्या जात आणि त्यासाठी लागणार्‍या कलाकरांना राजांचा व सरदारांचा उदार राजाश्रय असायचा. हा राजाश्रय रहायला जागा, वेतन, बिदागी, उदरनिर्वाहासाठी जमीन इ. या स्वरूपात दिला जायचा आणि या कलाकारांच्या पिढ्यानपीढ्य़ा याच्यावर उपजिवीका करत आपल्या कलेची परंपरा अखंड जपत या देवळात आपली कला सादर करण्यात धन्यता मानत असत. उदा. हे खालचे देऊळ बघा –

हे हंपीतील एक देऊळ आहे. डावीकडे दिसतो आहे तो देव्हारा आणि पूढे कला सादर करण्यासाठी सभामंडप. अर्थात हे तसे तुलनेने नवीन आहे. आपण बोलतोय ते यापेक्षाही प्राचीन आहे.

ही जी संगीताची व कलेची परंपरा होती त्याचे मनोरंजनाचे मुल्य ओळखून पठाण बादशहांनी बंद न करता चालू ठेवलीच, पण त्यात फारसी कलाकारांचीही भर घातली. उदा. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी नायक गोपाल नावाचा एक गायक ध्रूपद सादर करायचा तर अमीर खूस्रो आपली परमेश्वराची प्रार्थना कव्वाली गायन करून सादर करायचा.

आणि हा महाल –

ही कला या कलेचे जाणकारांमोर सादर केली जायची, त्यात ना केवळ दरबारी अमीर उमराव असायचे तर गावातील जाणकार मंडळीही असायची. उत्तरेची पहिली संगीतसभा ही जौनपूरच्या सुलतान हुसेन साक्री याने आयोजीत केली होती आणि त्यात त्याने अनेक ध्रूपदीये, कव्वाल, संगीततज्ञ यांना आमंत्रण होते. या त्याच्या दरबारातील संगीत तज्ञांनीच या सुलतानाने गायलेल्या दोन रागांना “राग” म्हणून मान्यता दिली होती. त्या रागांची नावे आपल्या परिचयाची आहेत -जौनपूरी तोडी आणि हुसेनी कानडा आणि त्यानीही ती मान्यता या तज्ञांकडून घेतली होती.

ग्वाल्हेरचे राजे “राजा मान तोमार” यांनी तर एका संगीत विद्यालयाची स्थपना केली होती आणि त्यात चार थोर नायक संगीत शिकवायचे काम करत होते. राजा मान हे कायम संगीतसभा भरवत आणि वेगवेगळ्या संगीततज्ञांमधे चर्चा घडवून आणत. या चर्चांमधून अनेक शोध लागत व अनेक नवीन राग रचले जात. यानंतर सम्राट अकबर याने हीच परंपरा चालू ठेवली आणि हिंदूस्तानी संगीताचे सुवर्ण युग अवतरले असे म्हणायला हरकत नाही. अकबराने राजा बाघेला यांच्या दरबारातून मियॉं तानसेन यांना आपल्या दरबारात आमंत्रण देऊन एक गायकांची मैफिल जमवली. त्यात तानसेन सोडून अजून आठ गायक व वादक होते.

अकबराबद्दल अनेक प्रवाद असतील. काही चांगले तसेच काही इतर अनेक मुगल बादशहांबाबत असतात तसे वाईट. पण त्याचे संगीताबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणी शंका व्यक्त केलेली आढळत नाही. या बाबतीत तरी त्याची सर्वधर्मसमभाव हीच वृत्ती दिसून येते. त्याने सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींना उत्तेजनच दिले होते. अर्थात काही लोकांचे म्हणणे याच्या उलट आहे. ते म्हणतात त्याने फक्त मुसलमान धर्मियांनाच उत्तेजन दिले. पण संगीताच्या बाबतीत तसे वाटत नाही. अकबराने देवळात चालणार्‍या या संगीत व नृत्य यांचा जो अभ्यास चालत असे, जी परंपरा निर्माण होत होती त्याचा चांगला अभ्यास केला होता आणि याचाच चांगला परिणाम म्हणून त्याच्या दरबारात ध्रूपद गायकीला मानाचे स्थान देण्यात आले. संगीतातील अनमोल खजिने मियॉ तानसेन बादशासमोर दिवान-ए-खास मधे खाली करायचा पण सामान्यजनही या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून त्यातील काही मोजके पण उत्कृष्ट दिवान-ए-आम मधे सादर केले जायचे. संगीतदरबारांचा हा सिलसीला मोगलांचा शेवटच्या बादशहा “मोहम्मद” पर्यंत चालू राहीला. ही परंपरा मोगल दरबारापुरती सिमीत न राहता इतरही दरबारातून जोपासली गेली, त्याची उदाहरणे पुढे येतीलच. जयपूर, लखनौ, बनारस, बेतीया, बिशनपूर, ग्वाल्हेर आणि रामपूर या संस्थानामधे आधार मिळाल्यामुळे उच्च दर्जाच्या संगीताची जपणवूक झाली हे नाकारण्यात अर्थ नाही. याच संस्थानिकांमुळे हे संगीत जिवंत राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेचे व या संस्थानिकांचे लक्ष शिक्षणाकडे व इतर बाबींकडे ( जे योग्यच होते) अधिक वळल्यामुळे जरी संगीताकडे जनतेचे दुर्लक्ष झाले नाही तरी या कला जोपासण्यासाठी जी आर्थिक मदत लागते त्याचाच झरा आटल्यामुळे दुर्दैवाने या परंपरेवर जबरदस्त आघात झाला. अनेक बुजूर्ग गायक, कलाकारांचे मृत्यू झाल्यावर त्यांची परंपरा चालवायला कोणीच नव्हते. सरकारलाही या कलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. (आणि दुर्दैवाने सध्याही नाही). जे काही सध्या शिल्लक आहे त्याचे श्रेय एका महान व्यक्तीला दिले पाहिजे. ती म्हणजे पंडीत भातखंडेजी. या थोर माणसाने संगीताचे जे काही अवशेष इतस्तत: भारतात विखरून पडले होते, ते गोळा करून त्यातून आपल्या महान संगीत परंपरेला एक मूर्त स्वरूप दिले. त्यांनी अनेक संगीत शाळा काढल्या आणि घराण्याच्या परंपरा व त्यांची वैशिष्ठ्ये जपून ठेवली. ज्या गायकांना दोन वेळच्या खायची भ्रांत होती त्यांना मदत केली अथवा मिळवून दिली. त्यांचे हे तळमळीचे कार्य बघून रामपूरचे नवाब, बडोद्याचे गायकवाड आणि काही इतर यांनीही संगीत दरबार परत चालू केले आणि या कलाकारांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर त्यांनी पंडितजींना अखिल भारतीय संगीत सभा भरवायला भरघोस आर्थिक मदतही केली आणि संगीतसभेचा नवीन पायंडा पडला. समाजाला भारतीय संगीताची फेरओळख करून देणे हे या संगीतसभांचे मुळ उद्दिष्ट असायचे. बडोदा, बनारस, लखनौ, इ. शहरातून या सभा व्हायच्या आणि त्यात बाप माणसे आपले गाणे सादर करायची. त्यांची नावे ऐकलीत तर आपण त्या काळात का जन्माला आलो नाही असे आपल्याला निश्चित वाटेल. बघा त्यांची नावे – अलबोंडेखान, नसरुद्दीनखान, राधिका गोस्वामी, गोपेश्वर बॅनर्जी, अल्लादिया खान, अब्दूल करीम खान, बरकतूल्लाखान, जमालुद्दीन व चंदा चौबे, इ..... त्यातच केसरबाई केरकर आणि हिराबाई ऐन उमेदीत होत्या..

पंडीत भातखंडेजींनंतर या संगीतसभांना श्रीमंत उद्योगपतींचा व धनिकांचा आश्रय लाभला व सुदैवाने ही परंपरा कशीबशी का होईना चालू राहिली हे आपले नशीब.
नंतर क्रांती झाली ती आकाशवाणीमुळे. आकाशवाणीमुळे जनतेला थोर लोकांचे गाणे फुकट ऐकायला मिळू लागले तसेच कलाकारांचीही काही प्रमाणात आर्थिक विवंचना मिटली. आकाशवाणीवरून जनतेचे संगीताचे शिक्षणही होण्यास मदत झाली ते वेगळेच. दिल्ली आकाशवाणीकडे अशा कार्यक्रमाचा मोठा म्हणजे खूपच मोठा खजिना आहे. आणि त्याची किंमत किती हे जाणकारच सांगू शकतील. या ठेव्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना निश्चितच होणार याची मला खात्री आहे फक्त तो बाहेर यायला पाहिजे. सरकारही आता नवीन नवी कलाकारांना खुपच प्रोत्साहन देत आहे, पण ते पुरेसे नाही. शास्त्रीय संगीताची एक वेगळी वाहीनी वा रेडिओ केंद्र त्वरीत चालू करून लोकांना चांगले संगीत ऐकवायला पाहिजे आणि या कामाला प्राधान्य देवून ते पूरे केले पाहिजे. या आपल्या कलेचा वारसा पुढे चालावा असे वाटत असल्यास चांगले गायक आणि गाणे समजण्यासाठी चांगले कानसेन तयार करणे ही आपली जबाबदारी आहे...

मधे मी एका पाश्चात्यसंगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी डेनमार्कचे एक पथक आले होते. पिआनो, चेलो, आणि व्हायोलीन असा कार्यक्रम होता. त्याच्या प्राथमिक भाषणात त्यांनी डेनमार्कच्या राणीचे आभार मानले. याचे कारण ऐकल्यावर मी खरोखरच आश्चर्यचकीत झालो. राणी दर वर्षी संगीताच्या स्पर्धा भरवते. प्रत्येक वाद्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा. मग प्रत्येक वाद्यस्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना एकत्र वाजवायची संधी देऊन जगभर त्यांचे कार्यक्रम भरवण्यासाठी पूर्ण आर्थिक मदत देण्यात येते. पुढचे ऐकून मी चाटच झालो. राणीने एक मोठी गाडी तयार केली आहे ज्यात साधारणत: ३० मुले बसू शकतात आणि उच्च दर्जाच्या साऊंड सिस्टीमवर ते शास्त्रीय संगीत ऐकू शकतात. त्याच गाडीत एक छोटेसे व्यासपीठःइ आहे ज्यावर एखाद्या वाद्याचा कार्यक्रमही होऊ शकते. ही गाडी रोज एखाद्या शाळेत जाते आणि त्यातील सर्व मुलांना हे संगीत ऐकवते आणि ते कसे ऐकावे हेही शिकवते...कारण ते त्यांचे उद्याचे श्रोते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचे संगीत व परंपरा जिवंत राहणार आहेत...

चांगले काय हे कळण्याचेही प्रशिक्षण द्यावे लागते या मताचा मी आहे........
जयंत कुलकर्णी.
क्रमश:.............
पुढच्या भागात संगीताचा इतिहास..........

संस्कृतीइतिहाससमाजआस्वादलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मानस्'s picture

26 Nov 2011 - 11:20 pm | मानस्

<कारण ते त्यांचे उद्याचे श्रोते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचे संगीत व परंपरा जिवंत राहणार आहेत >>अगदी अगदी.
सुदैवानं भारतातली नविन पिढी अजूनही शास्त्रीय संगीत शिकते ए॓कते.

अन्या दातार's picture

26 Nov 2011 - 11:47 pm | अन्या दातार

>>चांगले काय हे कळण्याचेही प्रशिक्षण द्यावे लागते या मताचा मी आहे
अगदी मान्य. पण प्रशिक्षण याचा अर्थ इंटरप्रिटेशन असा न होता हळू हळू "चांगले म्हणून जे ऐकवले तेच चांगले. बाकीचे वाईट" असा होण्याची शक्यता असते. आणि कदाचित त्यामुळेच भारतात रॉक-जाझ संगीताचा प्रसार जितक्या चांगल्या प्रकारे व्हायला हवा होता तो झाला नाही (याचे बरेचसे श्रेय आपल्याकडे "इतके चांगले शास्त्रीय संगीत असताना कशाला हवीत ही पश्चिमेची थेरं" या अ‍ॅटीट्युडला जाते)

(जे जे चांगले वाटेल ते ते ऐकणारा कानसेन) अन्या.

जयंत कुलकर्णी's picture

27 Nov 2011 - 11:17 am | जयंत कुलकर्णी

// "चांगले म्हणून जे ऐकवले तेच चांगले. बाकीचे वाईट" //

याचाच दुसरा अर्थ - 'वाईट' सारखे ऐकवले की तेच चांगले वाटू लागते हा आहे. सध्या तेच चालले आहे.

प्रशिक्षणात Interpretation ही येते. मुद्दा असा आहे की सगळे नुसते हवेवर सोडून देता येत नाही. काही ठोस प्रयत्न करावेच लागतात आणि ते समर्पीत असावे लागतात.

मन१'s picture

26 Nov 2011 - 11:52 pm | मन१

लेख आवडला. विशेषतः अकबराबद्दल लिहिताना अगदि संतुलित लिहिल्यासारखे वाटले.

( जे योग्यच होते)
ह्या वाक्याने संगीतप्रेमी,जाणकार आहात तसेच वास्तवाचे भानही राखून आहात म्हणून आदर वाढला.
लेखाच्या शेवटी तुम्ही डेन्मार्कचा किस्सा सांगितलाय. कुठलयाही अशा गोष्टींत ते पुढे असणे अशक्य नाहिच. जगातील सर्वाधिक मानवी विकास दर हा स्कँडीनेविअन देशातच आहे.(डेन्मार्क्,नॉर्वे,स्वीडन). व्यक्ती, व्यक्तीचे स्वातंत्र्य, विकास, पोषण हे सर्वोत्तम राखले जाते ते इथेच. ब्रिटन्,अमेरिकेत नव्हे.

भारतीय शास्त्रीय संगीत हा आपला अनमोल ठेवा आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पं वटखांदेजींना त्यासाठी लाख लाख प्रणाम. पण लोकसंगीताचे काय? त्यांचाही समृद्ध वारसा नष्ट व्हायच्या मार्गावर वाटतो. हृदयनाथ मंगेशकर, भूपेन हजारिका ह्या दिग्गजांचा संग्रह, लोकसंगीताचा अभ्यास थक्क करून सोडणारा आहे. पण तरीही ते पुधे कसे जाइल, अधिकाधिक समृद्ध कसे होइल व उपलब्ध लोकसंगीत कसे कव्हर होइल ह्याची चिंता वाटते. लोकसंगीतासाठीही असे पं वटखांदेजी उपलब्ध होतील तो सुवर्णदिन.

कुलकर्णी सर,
पंडीत वटखांदे म्हणजे तुम्हाला पंडित विष्णु नारायण भटखांदे (भातखंडे ) म्हणायचे आहे का ?
त्यांचे नाव मी आमच्या खालाजान (मावशी) कडून ऐकले होते कारण ती ही खुप छान गायची.
भटखांदे (भातखंडे ) यांचे 'स्वर मालिका' म्हणून एक पुस्तकही होते ज्यात प्रत्येक रागाबद्धल अगदी डिटेलवारी माहीती होती.

त्यांचे शिक्षण मुंबई अन पुण्यात झाले पण ते कराची (सध्या पाकीस्तान) ला काही दिवस वकीलही होते अन त्यांच्या नावाने भटखांदे / भातखंडे संगीत संस्थान लखनऊ ला आहे

तुमचा लेख नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर !!

पैसा's picture

27 Nov 2011 - 12:36 am | पैसा

मी पण विचार करत होते. हे वाटखांदे कोण म्हणून! पं. भातखंडेच ते!

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 1:00 am | चिंतामणी

लेख वाचल्यावर मी हेच म्हणणार होतो.

तुमची पोस्ट येथे होतीच.

अन्या दातार's picture

27 Nov 2011 - 1:01 am | अन्या दातार

माझ्या मनातही हाच प्रश्न होता.
पं. भातखंडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला लिपी दिली. गुरुमुखी विद्या असा लौकिक असूनही संगीताला साजेशी लिपी हुडकुन काढणे हे त्यांच्या पुरोगामित्वाचेच लक्षण म्हणावे लागेल. आजही मुख्यत्वे हीच लिपी वापरली जाते.

विनोद१८'s picture

27 Nov 2011 - 10:53 pm | विनोद१८

वहिदा....

पंडित विष्णु नारायण भटखांदे (भातखंडे ) यानी कराचीला काही काळ वकीलीसुद्धा केली.

खरेच आश्चर्य आणी कौतुक वाट्ले पन्डितान्चे.

नवी महिती दिलीस.

*विनोद१८*

सहमत.

त्या काळी आमच्या घरी रेडीओ होता. त्यावर कायम संगीत असलेले कार्यक्रम चालु असायचे. त्याकाळातील दर्जेदार संगीत आपोआप कानावर पडत गेले आणि संस्कार होत गेले.

आमच्या पिढीचे प्रशीक्षण असे झाले ते आमच्या वाडवडीलांमुळे. पण आजकालचे बरेचसे पालक या बाबतीत जागरूक आहेत आणि मुलांवर हे संस्कार होण्यासाठी खूप परीश्रम घेतात.

(अवांतर- थोडा अतीरेक करणारेसुद्धा असतात. पण ते अपवाद आहेत.)

तिमा's picture

27 Nov 2011 - 11:06 am | तिमा

लेख आवडला. दर्जेदार संगीत ऐकायला जो कान तयार व्हावा लागतो त्यासाठी जाणकार मार्गदर्शकाची आवश्यकता असते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. आमच्या घरात, मी २-३ वर्षांचा असल्यापासून,, 'रविवारची सकाळ' भरायची. दादरपासून ते बोरिवलीपर्यंतचे स्थानिक कलाकार यायचे, मनसोक्त गायचे. माझे वडील पेटीची साथ करायचे. दुपारी १.३० वाजता पाहुण्यांना वाडीच्या दारापर्यंत वडील पोचवायला गेले की, पसरलेल्या वाद्यांवर आम्ही हात फिरवायचा प्रयत्न करायचो. पेटी वाजवताना भात्याला हात पुरायचा नाही. त्या वयापासून जे कानावर पडले त्याचा मोठे झाल्यावर मला खूपच फायदा झाला.

जयंत कुलकर्णी's picture

27 Nov 2011 - 11:21 am | जयंत कुलकर्णी

संपादक यांना,

वटखांदेजी असे त्यांना कलकत्ता/लाहोर्/कराची भागात संबोधले जायचे असे म्हणतात, ( खात्री नाही) पण विनंती आहे की कृपया ते भातखंडे असे बदलावे.

धन्यवाद.

कुलकर्णी सर हा इतिहास फार कमी जणांना माहीत आहे. लेखासाठी खरेच धन्यवाद !

भातखंडे यांना घडविण्यात नवाब वजिरखान रामपूर अन लखनऊचे नवाब हमिद अली खान अन नवाब चमन साहेब यांचा फार मोठा हात आहे. त्यांनी भातखंडे यांना एक चालते फिरते संगीत विद्यापिठ म्हणूनच घोषित केले होते. कारण हिर्‍याची कदर जवाहिरच करतात. भातखंडे हे संगीत क्षेत्रातील अमुल्य हिराच होते.

अन भातखंडे ज्यांना पाकीस्तानात पंडीत वटखांदे असे संबोधले जाते त्यांना अजूनही पाकिस्तानात खुप मान आहे.

WAZIR KHAN OF RAMPUR

Thus Wazir Khan and Chhamman Saheb were the successors in the line of music of Amir Khan and Bahadur Hussain. Wazir Khan by musical teachings built up the musical career of the following outstanding musicians.

1. Allauddin Khan (Sarod)

2. Hafiz Ali Khan (Sarod)

3. Mehdi Husssain Khan (Dhrupad & Kheyal)

4. Mustaque Hussain Khan (Kheyal)

5. Pramathanath Bandopadhya (Ruddraveen)

6. Jadabendra Mahapatra (Surbahar)

7. Pandit Vatkhandeji (The great Musicologist)

It may be noteworthy that Wazir Khan who was in Calcutta in his youth, had special liking for the Bengalees and helped a good deal for the development of classical music in Bengal. Nawab Chhamman Saheb also gave lessons to Pandit Vatkhandeji. Among the Nawab's other disciples we may cite the names of :

1. Raja Nawab Ali Khan of Lucknow-(Sitar).

2. Girija Sankar Chakrabarty of Bengal-(Dhrupada, Kheyal and Thumri)

In conclusion, we should not forget the fact that the Vatkhande College of Music, Lucknow, which is now the Centre of Vatkhande University, got tremendous support from Nawab Hamid Ali Khan of Rampur, and Nawab Chhamman Saheb, who helped this great institution both financially and also with the precious teachings of the Rampur Gharana. For every song and each Tana and each Dhrupad he (Raja) gave a crore of rupees to this musician (Kalavid), namely Tansen, who was the embodiment of the art of music. Though these statements of Badaoni and that of the author of the Virabhanudaya Kavyam seem to be exaggeration, to some extent, yet it is clearly understood that Rewa and even its adjacent places were famous for the culture of classical type of Prabandha-Gitis.

पैसा's picture

27 Nov 2011 - 12:56 pm | पैसा

आंतरजालावर शोधाशोध केली असता "वाटखंडे" असा उल्लेख आणखी काही ठिकाणी दिसतो. ग्वाल्हेरच्या संगीत विद्यालयाचं नाव वाटखंडे आहे म्हणजेच भातखंडे नावाबरोबर उत्तर भारतात"वाटखंडे" ही प्रचारात असावं. तेव्हा लेखातील तो उल्लेख तसाच राहू दे ही जयंतरावाना विनंती.

पूर्ण लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे, पुढील लेखांची वाट पहात आहेच!

कपिलमुनी's picture

27 Nov 2011 - 12:29 pm | कपिलमुनी

हा महाल शास्त्रीय संगीता करता वापरला जायचा का?
स्थानिक गाईड्ने दिलेल्या माहितीनुसार हा राणी महाल होता ..वैषिट्य असे कि याच्या भिंतीमधे पाणी सोडुन थंडपणा राखला जायचा ..

जरा डिटेलवारी माहीती दिली तर छानच

(तसं आम्ही ही खुप काही गुणगुणतो ..आम्ही ही सिंगर आहोत पण बाथरुम सिंगर तोच आमचा संगीत महाल ;-) )

जोक्स अपार्ट - पण खरेच या महाला बध्द्ल जरा विस्तृत माहीती देणार का ?

जयंत कुलकर्णी's picture

27 Nov 2011 - 2:27 pm | जयंत कुलकर्णी

स्थानिक गाईड खरेच सांगतो काय वाट्टेल ते सांगतात. ही इमारत खरेतर सल्लमसलत आणि करमणूकीसाठी वापरला जायचा. जो पोर्तुगीज अधिकारी येथे काही महिने मुक्कामास होता त्याने ज्या आठवणी लिहिल्या आहेत त्याही मी येथे लिहिणार आहे पण नवीन फोटो टाकून.... कशी वाटते कल्पना ?

श्री. जयन्तराव,

एक अप्रतिम अभ्यासपुर्न लेख वाचून माझ्या मनाचे समधान झाले बरीच नवी माहिति दिलित... असेच लिहा.

तुम्हाला हया लेखाबद्दल धन्यवाद..

.......विनोद१८.........

प्यारे१'s picture

28 Nov 2011 - 12:22 pm | प्यारे१

>>>>डावीकडे दिसतो आहे तो देव्हारा

गाभारा म्हणायचंय का?
बाकी आम्ही औरंगजेब 'संगीता'बद्दल काय बोलणार?

चैतन्य दीक्षित's picture

28 Nov 2011 - 12:52 pm | चैतन्य दीक्षित

वाह!
पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहतो आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत यांच्याबद्दल (म्हणजे या दोन्ही पद्धतीत काही रागांचे आदान-प्रदान झालेले आहे इ. विषयक) काही माहिती मिळाली तर अजून छान होईल!
या लेखाच्या निमित्ताने,
भातखंडेंसारखीच पलुसकरांनीही संगीतलिपी तयार केल्याचे वाचल्याचे स्मरले. नक्की कुठे ते आठवत नाही, पण पलुसकरांची काही वेगळी पद्धत होती का? की भातखंडे पद्धतीचं 'अपग्रेडेड व्हर्जन'?

वाटाड्या...'s picture

28 Nov 2011 - 10:02 pm | वाटाड्या...

लेख छान आहेच..थोडी दुरुस्ती केली तर चालेल काय?

१. "हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. अर्थात ज्या राजांच्या आश्रयाला हे ऋषीमूनी होते, ज्यांचा सक्रीय आधार या गुरूकूलांना लाभला होता, त्यांनाही या परंपरेचे श्रेय द्यायलाच लागेल."

अधिक माहीती: आपल्याकडे ४ वेदांमधे एक सामवेद आहे. सामवेदामधे गायन/वादन/नर्तन याबद्दल बरीच माहीती आहे. यालाच 'साम गायन' असा शब्द आहे आणि ज्यांना आपण देवळात गायन करणारे म्हणत आहात किंवा आजच्या काळात शास्त्रीय गायक म्हणलं जातं त्यांनाच (त्या काळात ते शास्त्रशुद्ध विश्लेषण वगैरे नव्हतं) ते 'सामग' म्हणजे साम गायन करणारे असं म्हणलं जायचं.

२. "उदा. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी नायक गोपाल नावाचा एक गायक ध्रूपद सादर करायचा तर अमीर खूस्रो आपली परमेश्वराची प्रार्थना कव्वाली गायन करून सादर करायचा."

दुरुस्ती: नायक गोपाल हे गोपाल नायक असे नाव आहे. ध्रूपद गायनानंतर ते ख्याल गायनाकडे वळाले आणि आपल्या अण्णांच्या किराणा घराण्याचे हे आद्य पितामह होत. पुर्वी ते दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्यांनी यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला. त्यामुळं ह्या घराण्याला नावं 'किराणा घराणं' असं पडलं. त्यानं पुढे जाऊन 'इस्लाम' धर्माचा स्विकार केला होता असं मानलं जातं. शिवाय ते अमिर खुस्त्रोचा शिष्य म्हणुन प्रसिद्ध होते.

३. “राजा मान तोमार” :
दुरुस्ती: ह्यांच नाव राजा मानसिंग तोमर असं आहे. ते उत्तम ध्रूपदिये होते. अगदी असं म्हणलं तरी चालेल की ह्यांच्यामुळे ध्रूपद गायन जिवंत आहे.

४. अलबोंडेखान
दुरुस्ती: अल्लाबंदे खाँ साहेब. उस्ताद माणुस.

५. केसरबाई केरकर ह्या अल्लादिया खाँच्या शिष्या..त्या वेळचा शब्द आहे शागिर्द.

"चांगले काय हे कळण्याचेही प्रशिक्षण द्यावे लागते या मताचा मी आहे........"अतिशय बरोबर मत आहे असं मी मुद्दाम नमुद इच्छितो.

भातखंडे आणि पलुस्कर द्वयींच्या संगीत लिपींमुळे आजही संगीत पुस्तक स्वरुपात मांडणे शक्य होत आहे. फार उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. त्यांच्या लिप्या ह्या एकमेकांना पुरक आहेत. आज संगीत परिक्षांमधे ह्या लिप्या वापरल्या जातात.

ईच्छुकांसाठी: आपल्या महाराष्ट्रात संगीताची ही गंगा बाळकॄष्णबुवा इचलकरंजीकर बुवांनी आणली. ते भारतातील (कदाचीत) पहिल्या संगीत विद्यालयाचे शिष्य होते ज्याच नाव हद्दु-हस्सु खाँ विद्यालय होतं.

बाकी माहीती नंतर वेळपडल्यास..

- वाटाड्या...

जयंत कुलकर्णी's picture

29 Nov 2011 - 7:03 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

आपण दिलेली काही माहिती नंतरच्या भागात येणार होती पण आपण ती इथे लिहिल्यामुळे जरा मदतच होईल. बाकी चुकांची दुरूस्ती "Right Spirit" मधे आपण करत आहात त्यामुळे आपले आभार मानायला हवेत. चुकांची दुरुस्ती जरूर करावी ही विनंती.

क्रान्ति's picture

28 Nov 2011 - 10:08 pm | क्रान्ति

लेख तर माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहेच, तसंच प्रतिसादांतून सुद्धा खूप माहिती मिळाली.

भातखंडे आणि पलुस्कर ... ह्यांना आधुनिक काळातील शास्त्रीय संगीताचे पुनर्स्थापक म्हणवे की अध्वर्यू, हे समजत नाही.
असो. हा भातखंडेंचा परिचय उत्तम.
पलुसकरांचा परिचय आजच प्रकाशित झालेला दिसतोयः- http://www.misalpav.com/node/19900