यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 4:57 am

Copyright Notice
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody. - U.G.

मिसळपाववर यापूर्वी माझ्याकडून यु.जी. कृष्णमूर्तींवरून सुचलेल्या माझा दोस्त युजिनी वाचा आणि शोधा या लिखाणात दोनवेळा काही अंशी (म्हणजेच अगदी शंभरातला दशलक्षावा टक्का) यु.जी. कृष्णमूर्तींवर लिहून झालंय. खरोखर माझा असा कुठलाही दोस्त कधी नव्हता. पण यु.जीं.चे रंग वापरून एक पात्र रंगवण्याचा विचार आला आणि ते लिहून काढलं होतं. त्या पात्राच्या तोंडून यु.जी. कृष्णमूर्तींनी सांगितलेल्या गोष्टी अर्थात भारतीय आध्यात्मिक संचिताबद्दल खडे बोल वदवून घेण्याचा विचार होता - तो बारगळला. कारण असं पात्र उभं करायला मी काही लेखक नाही.


यु.जी. कृष्णमूर्ती

पण कधीकाळी रजनीशांच्या सोफास्टीकेटेड बाबागिरीच्या आधीन जाऊन आयुष्यातील काही काळ मी घालवला आहे; त्यात सगळं काही माझ्यापुरतं जवळून अभ्यासलं आहे आणि तेच असं कधीतरी बाहेर पडत राहातं. मला वाटतं हेच जगातल्या सगळ्या लोकांबद्दल होत असतं. कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. तोच उपजिवीकेचा मार्ग देखील बनतो. हे जगात असलेल्या सगळ्या अभ्यासविषयांना आणि त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना लागू आहे - पण एका क्षेत्राचे अभ्यासक यात मोडत नाहीत ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. कारण आध्यात्माच्या प्रदेशात पाऊल टाकलेला माणूस आणि त्याचं तिकडे वळलेलं पाऊल हा त्याला या लौकिक जगतातलं काही नकोय, त्याची रूचि जगाच्या पार जे आहे त्यात आहे याचा स्वयंसिध्द पुरावा आहे असं हजारो वर्षांपासून या भूमीत मानण्यात आलं आहे - यामुळेच भगव्या वस्त्रांना आणि संन्याशांना आदर मिळत आलेला आहे.

रजनीश उर्फ ओशो

अगदी अलिकडे म्हणजे ६२-७२ च्या दशकात रजनीश:ओशो यांनी "सगळं काही सोडून गिरीकंदराच्या दिशेने जाणे आणि स्वत:चा शोध घेत राहाणे" ही संन्यासाची व्याख्या बदलली आणि "कुठंही न जाता जिथे आहोत तिथेच, सगळ्या सुखोपभोगांच्या सान्निध्यात राहून संन्यासी असणे" असं नवं रूप संन्यासाला दिलं तोच त्यांचा "नव-संन्यास." पुढे मग गोष्टी वाढत गेल्या आणि "सेक्सगुरू" या उपाधीपर्यंत रजनीशांचा प्रवास झाला. ६२-७२ पासून सन १९९० मध्ये रजनीशांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी निर्माण केलेल्या नव-संन्यासाच्या वातावरणातून आजच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेळीअवेळी प्रवचनं देणार्‍या बहुतांशी बाबा/गुरू लोकांचे भरण-पोषण झाले आहे. आध्यात्माचं क्षेत्र देखील एक धंदा बनला आहे हे आजचं वास्तव आहे.
धंदा बनलेल्या आजच्या आध्यात्म या क्षेत्राची आणखी एक खूबी म्हणजे इतर धंद्यांसारखी यात खर्‍याखुर्‍या वस्तूंची डिलेव्हरी द्यावी लागत नाही. जे काही असायचं ते गुलदस्त्यातच असतं - ते तसंच गुलदस्त्यात राहातं. आणि कशाचीही डिलेव्हरी न देता हा धंदा जोरात चालू असतो. त्यामुळंच आध्यात्माबद्दल जो बोलतो तो ढोंगबाज बाबाचा चेला असला पाहिजे किंवा "तसा होण्याचा त्याचा प्रयत्न असावा" असा एक समज जगभरात पसरलेला आहे; या पार्श्वभूमीवरच "वाचा आणि शोधा" या लिखाणावरील प्रतिक्रियेत इथल्या सन्माननीय ३_१४ सदस्यांनी मला मारलेला "बाबागिरीची सुरूवात अशीच होत असावी बहुधा" हा टोमणाही खाऊन झाला आहे. तरीही पुन्हा मी यु.जी. कृष्णमूर्तीं हा मुख्य धागा पकडून आज लिहायला बसलो आहे. पुढे जाईल तसं इतर अनेक धाग्यांनाही हातात घ्यावं लागणार आहे - सोडावं लागणार आहे कारण त्यांची विशिष्ट अशी विचारसरणी नाही - तर यु.जी. कृष्णमूर्ती हा भारतात उदयाला आलेल्या समस्त आध्यात्मिक विचारसरणींच्या विरूध्द, अगदी टोकाचा परिणाम आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांमुळे आध्यात्मच नव्हे तर मानवी बुध्दीमत्तेशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्राच्या वैधतेवारच प्रश्नचिन्ह लागतं.


यु.जी. कृष्णमूर्ती - तारूण्यातील

ते कसं लागतं हे पाहाण्यापूर्वी यु.जी. कृष्णमूर्तींच्या पार्श्वभूमीबद्दल एकदा थोडक्यात आटपून घेतो. यु.जी. कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) हे जे. कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) यांचे समकालीन. यु.जीं.चे आजोबा हे सी.डब्ल्यू. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफिकल सोसायटीमधील कारकिर्दीदरम्यान सोसायटीला उदारपणे आर्थिक मदत देणारी असामी होते; व्यवसायानं ख्यातनाम वकील होते. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी जे. कृष्णमूर्तींची त्यांच्या बालपणापासूनच ते नव्या युगाचे "मैत्रेय" बनून जगापुढे यावेत या इराद्याने निवड केली होती. जे. कृष्णमूर्ती हे नव्या युगाचे बुध्दपुरूषच व्हावेत (ते पुढे बुध्दपुरूष म्हणून जगासमोर आलेही, पण थोडासा यू टर्न घेऊन ), थोडक्यात बुध्दत्व प्राप्ती हेच ध्येय समोर ठेऊन जे.कृष्णमूर्तींचे पालन-पोषण केले जात होते. या पालन पोषणात ध्यान, साधना आणि तसलेच सर्व प्रकार आले. जे.कृष्णमूर्तींबद्दल हे होत असतानाच कुमारवयीन यु.जी. कृष्णमूर्तीदेखील थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य बनले. दुसरीकडे युजींना त्यांच्या कर्मठ घरातच लहानपणापासून साधु, बैरागी, साधक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना जवळून पाहायला मिळत होते; कारण त्यांच्या पंगती युजींच्या आजोबांच्या घरी सतत उठत असत.
या कुमार वयातच कुठेतरी, मोक्ष खरोखर आहे काय, ती अवस्था कशी असते, ती मला मिळवायचीय ही ओढ युजींच्या मनात निर्माण झाली. पौगंडावस्था ते एकविशी या दरम्यानच्या कालखंडात युजींनी ब्रम्हचर्य पालनासह सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्या. कुणीतरी स्वामी शिवानंद नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी हिमालयात सात वर्षे घालवली. मोक्षाची तीव्रतम तहान लागलेली असताना, साधना चालू असताना आणि आजूबाजूचे पूरक वातावरण या सर्व पार्श्वभूमीवर खरोखर मोक्ष मिळवलेली कुणी व्यक्ती हयात आहे काय? ती कशी आहे? ती आपल्याला मोक्ष देऊ शकेल काय? हे प्रश्न मनात असतानाच युजींनी ऋषि मानल्या जाणार्‍या, अरूणाचलम या पर्वताच्या सान्निध्यात राहाणार्‍या रमण महर्षींची भेट घेतली. या भेटीदरम्यान युजींचा रमण महर्षींना थेट सवाल होता "हा जो काही मोक्ष म्हणतात, तो तुम्ही मला देऊ शकता काय?" रमण महर्षींनी साशंकपणे उत्तर दिले, "मी देऊ शकतो, पण तु तो घेऊ शकतोस काय?" या उत्तरामुळे युजींचा आध्यात्मिक साधना आणि साधक याबद्दलचा संपूर्ण दृष्टीकोनच पलटला आणि त्यानंतर त्यांनी कधीच आध्यात्मिक बाबतीत कुणाच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली नाही; पण मोक्षाचा त्यांचा शोध मात्र सुरूच राहिला.


रमण महर्षी

यु.जी. कृष्णमूर्ती हे भारतातील थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष बनलेल्या जिनराजदास यांचे सहायक म्हणून काम करू लागले. यादरम्यानच त्यांनी मद्रास विद्यापीठात मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि गूढवाद हे विषय घेऊन पदवीचे शिक्षण सुरू केले; ते त्यांनी पूर्ण केले नाही. थिऑसॉफिकल सोसायटी ही वंश, वर्ण, जात यांचा भेदभाव न करता विश्वबंधुत्वाचे माहेरघर उभे करणे - धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासाला प्रोत्साहन देणे -निसर्गाच्या अदभुत नियमांचा आणि माणसातील सुप्त शक्तीचा तलास घेणे या उद्देशाने १८७५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये अस्तित्वात आलेली आणि नंतर अड्यार, चेन्नईमध्ये मुख्यालय स्थापन झालेली सोसायटी. युजींची आध्यात्मिक क्षेत्रातील तोपर्यंतची पार्श्वभूमी, थिऑसॉफिकल सोसायटीतील नोकरी आणि त्यांना उपजत मिळालेली वक्तृत्वाची देणगी यांतून यु.जी. थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणून पुढे आले. या काळात भारतातील आघाडीच्या जवळपास प्रत्येक महाविद्यालयांत थिऑसॉफीवर व्याख्याने दिली. युजींनी पुढे सोसायटीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याख्यान मोहीमेत नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी आणि अमेरिकेला भेटी दिल्या. या व्याख्यान मोहिमेपूर्वीच युजींचा कुसूमकुमारी या नावाच्या तरूणीशी विवाहदेखील झाला. यु.जी कृष्णमूर्तींचा हा प्रवास सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती हे एप्रिल १९११मध्ये इंग्लंडला जाऊन तिथे पाश्चिमात्य जग, रितीरिवाज, भाषा, तत्वज्ञान आणि त्यांची "मैत्रेय" बनण्याची साधना करीत असतानाच थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणूनही पुढे आले होते. स्वत:च्या आध्यात्मिक साधनेत निराश झालेले, सर्व प्रकारचे गुरू आणि साधनेबद्दल निराश झालेले युजी थिऑसॉफीशी जुळवून घेतात आणि त्या तत्वज्ञानाचा व्याख्याता का होतात? हा प्रश्न आहे. युजींनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे उपजिवीका चालविण्यासाठी तोच एक लाभदायक मार्ग होता. पण थिऑसॉफीकल सोसायटीचा व्याख्याता म्हणून काम करीत असताना सातव्या वर्षी थिऑसॉफीबद्दल त्यांच्या मनात तिटकारा निर्माण झाला. (थिऑसॉफीकल सोसायटीच्या सदस्यांची बैठक होत असे तेव्हा एकमेकांची ओळख करून घेताना लोक म्हणत- "नमस्कार, मी अमुक-तमुक, मी पूर्वीच्या जन्मात इंग्लडची राणी होते, मी राजा अशोक होतो")

जे. कृष्णमूर्ती

सन १९४७ ते ५३ या कालखंडात यु.जी. कृष्णमूर्ती जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांत उपस्थित राहात होते; जेकेंचे तत्वज्ञान पटत नसले, ते तत्वज्ञान स्वत:च्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत नसले तरी. जेकेंसोबत त्यांच्या सतत चर्चेच्या फैरी झडत होत्या. सरतेशेवटी इथेही युजींची जेकेंशी असहमती झाली - तो किस्सा युजींच्याच भाषेत पाहाण्यासारखा आहे -
"होता होता, शेवटी मी आग्रह धरलाच, "खरे सांगा तुम्ही माझ्यावर फेकीत असलेल्या या आध्यात्मिक गुंत्यामागे खरोखर काही आहे का?"
आणि तो पोट्टा म्हणाला "तु स्वत:होऊन हा गुंता समजून घेण्याचा तुझ्याकडे कोणताच मार्ग नाही"
संपलच! आमच नात तिथेच संपलं - "मला स्वत:होऊन ते जर समजून घेण्याचा मार्ग नसेल, तुमच्याकडे जर देण्याचा मार्ग नसेल, तर मग आपण ही झक नेमकी कशासाठी मारतोय?" मी यात सात वर्षे मातीत घातलीत. रामराम, तुम्हाला पुन्हा भेटण्याचीदेखील माझी इच्छा नाही. यानंतर मी तिथून चालता झालो.
जेकेंसोबत असा काडीमोड झाल्यानंतर, युजींनी त्यांची थिऑसॉफिकल सोसायटीची व्याख्याने चालूच ठेवली. इथेच त्यांना स्वत:तील गूढ शक्तींची सतत जाणीव होऊ लागली होती अशा नोंदी आहेत. या काळापर्यंत युजींना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली होती. त्यापैकी सर्वात मोठ्या वसंत या मुलाला पोलीओसदृश्य आजार झाला होता. जे. कृष्णमूर्तींनी असा विश्वास होता की त्यांनी मसाज केल्यास मुलाचे पाय बरे होतील; त्यांनी मोजक्याच वेळा पण दुर्धर आजार झालेल्या रूग्णांना हिलींग करून बरे केले आहे असा समज होता; पण युजींना ते पटत नव्हते. शेवटी युजींच्या पत्नीच्या आग्रहामुळे जेके त्या मुलावर मसाजमधून हिलींगचे प्रयोग करू लागले. त्याने काही फरक पडला नाही; युजींच्या मुलाची परिस्थिती बिघडत चालली होती. शेवटी युजींनी पुढील उपचारासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला आणि मुलावर उपचार करण्यासाठी गेलेले श्री आणि सौ. युजी पाच वर्षे अमेरिकेत राहिले. वर्षाभरात मुलगा पायावर उभा राहिल अशी डॉक्टरांनी खात्री दिली होती. युजींनी सोबत घेतलेला पैसा फक्त मुलाच्या उपचारांसाठीच पुरेल एवढा होता. पुढे वर्ष उलटले तसा तोही संपू लागला आणि पैसा कमावणे आवश्यक बनले. काय करायचे? व्याख्यान. ते व्याख्यान देऊ शकत होते. अमेरिकेतील व्याख्याने भारतातील व्याख्यानांसारखी फुकट नसणार होती. एका व्याख्यानाला शंभर डॉलर मिळू शकत होते. युजींनी व्याख्याने द्यायला सुरूवात केली; पुढे त्यासाठी एक व्यवस्थापिकाही नेमली.
वैद्यकिय उपचार होत गेले तशी वसंत या त्यांच्या मुलाच्या पायात बरीच सुधारणा दिसू लागली. तो कुबड्या न वापरता उभा राहून, एक पाय घासत का होईना पण चालू लागला. युजी या काळात उभ्या-आडव्या अमेरिकेत व्याख्यानांसाठी फिरत होते. कौटुंबिक आयुष्यात युजी हे वाईट पिता किंवा पती नसले आणि झक्कीपणा व दुसर्‍या बाजूला सुरू असलेला त्यांचा आध्यात्मिक शोध जमेस धरूनही सर्वकाही व्यवस्थित होते. पत्नीशी वाद होत असत ते फक्त पैसा या गोष्टीवरून - कारण युजी पैशाच्या बाबतीत बेफिकीर बंदा होते. त्यांनी पहिल्या वर्षात साठ व्याख्याने दिली आणि दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस त्या व्याख्यानाच्या धंद्याबद्दल त्यांना तिटकारा निर्माण झाला. व्याख्यानांच्या काळातील दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत. मिनींग अ‍ॅण्ड मिस्टरी ऑफ पेन या शीर्षकाचे व्याख्यान देऊन झाल्यानंतर खुद्द युजींनाच गालफुगीचा विकार उद्भवला. त्यामुळे होणारी गैरसोय आणि वेदना असाह्य असल्या तरी त्यांनी डॉक्टरांना भेटायला नकार दिला. कितीही काही झाले तरी वेदनेची रचना जाणून घेण्याचे औत्सुक्य असल्याने आणि नुकतेच त्याच विषयावर व्याख्यान दिल्याने स्वत:ला होत असलेल्या वेदनांवरच ते प्रयोग करू लागले आणि त्यात आत-आत शिरू लागले. शेवटी वेदना वाढत गेल्या आणि शुद्ध हरपली. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांच्यावर नेमके काय उपचार आवश्यक आहेत हे डॉक्टरांना ठरवता येईना - कारण शरीर थंड पडत चालले होते आणि ते मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत असे दिसत होते. अर्धा तास उलटला. अचानक त्यांना शुध्द आली आणि वेदना नाहीशा झाल्या होत्या. शरीराने स्वत:च स्वत:वर उपचार केले होते.
यानंतर त्यांची व्याख्यानांतील रूचि निघून गेली आणि कमाईचा दुसरा एखादा मार्ग मिळतो काय याचा ते शोध घेऊ लागले. हे पाहुन इर्मा नावाच्या त्यांच्या व्यवस्थापिकेला झीटच यायची बाकी होती. कारण आतापर्यंत व्याख्यानांमुळे युजी एक महत्वाची असामी बनले होते आणि व्याख्यानांची चहुकडून मागणी होत होती; व्याख्यान दिल्यावर बरेच पैसे मिळत होते. पण युजींनी नकार दिला. अचानक, त्यांना काम करण्याची इच्छा राहिली नव्हती.

(थोडक्यात पार्श्वभूमी म्हणताम्हणता बरंच लांबत चाललंय आणि मुख्य विषय बाजूला पडलाय, पण ही पार्श्वभूमी आवश्यक आहे असे वाटते. युजींचं त्रोटक "चरित्र" रेखाटून पुढे जाणार होतो. पुढच्या भागात हे लवकर आवरून असली पिक्चर सुरू होईल! )

संदर्भ: इंग्लिश विकीपिडीया, युजी रीडर - संकलन मुकूंद राव, ए टेस्ट ऑफ डेथ- महेश भट, युट्यूबवरील युजींच्या क्लिप्स, युजी कृष्णमूर्ती डॉट ऑर्ग, आणि अर्थातच माझी समज ;-)

धर्ममुक्तकसमाजप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

>> कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. >>

बीडकर महाराज त्यांच्या गुरूंना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना म्हणाले "मी परमार्थाचं ज्ञान सर्वांना वाटेन" त्यावर स्वामी समर्थ म्हणाले - "राम्या भुकेल्याला खाऊ घाल नाहीतर अन्नाचा चिवडा होईल"

सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.

लेख आवडला.

मूकवाचक's picture

4 Oct 2010 - 5:54 pm | मूकवाचक

थोडक्यात, रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही.

सगळ्या परम्परा झुगारून देणारे ओशो, जे. आणि यु.जी. 'मीच शहाणा आणि माझेच खरे' ही मूळ भ्रान्ति काही सोडून देउ शकले नाहीत. या तिघान्चे परस्पर धुलाई केन्द्र तसेही चालू होतेच. आता या तिघान्चे शिष्य आपले बुवा सोडून बाकी दोघे, आणि तथाकथित 'जुन्या वळणाचे' अध्यात्म यान्चे धुलाई केन्द्र चालवतील. चालायचेच.

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 6:04 pm | यशवंतकुलकर्णी

सगळं चालूच आहे मूकवाचक. तुम्ही वेगळं काय सांगताय? चालायचेच.

मूकवाचक's picture

4 Oct 2010 - 7:30 pm | मूकवाचक

की रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही.

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 7:46 pm | यशवंतकुलकर्णी

जाऊ द्या हो - तेलकट, मळकट कागदात बांधलेला चिवडा असो की केळीच्या पानाभोवती रांगोळ्या काढून, नंदादीपांच्या प्रकाशात, श्लोक म्हणत, जानव्याने पाठ घासत खाल्लेली पंचपक्वान्ने असोत - ते पाहुन भूक भागणे किंवा लागणे महत्वाचे...कसं?

मूकवाचक's picture

4 Oct 2010 - 8:05 pm | मूकवाचक

भूक काय आणखी काही काय 'लागणे' आणि 'भागणे' हे ठार वेडा माणूस, बैलाला, डुकराला पण समजते. सात्विक आहार, आचार, विचार असल्याने मन कसे शान्त, स्थिर आणि प्रसन्न राहते हे समजणे, उमजणे आणि तसा अनुभव येणे थोडे वेगळेच. ज्याचे त्याचे प्रारब्ध. असो.

सहज's picture

4 Oct 2010 - 6:18 am | सहज

गालफुगी म्हणजे नेमके काय व ती बाह्य उपचाराशिवाय बरी होते की नाही? ह्याचे उत्तर कोणी वैद्यकशास्त्री देउ शकेल काय?

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 7:13 am | यशवंतकुलकर्णी

सहज-साध्य गोष्टीला डाक्टर कशाला पायजे हो?
From
हे घ्या: http://en.wikipedia.org/wiki/Mumps
हा आजार किमान महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या (शहरातल्या पण) लहान लेकरांना होतो आणि तो अगदी सर्वसामान्य समजला जातो. चार-आठ दिवसांत गाल उतरतो (गालफुगीने फुगला असेल तर! इतर धंदे करून फुगवून घेतला असेल तर ते येगळे..)
युजींची गालफुगी व्याख्यानं देऊन-देऊन झाली होती.
त्यांचा रोख आहे तो "शरीर आपोआप स्वत:ला दुरूस्त करून घेत असतं, पण थोडी कळ काढावी लागते..." त्यांनी जादू करून वेदना नाहीशा केल्या किंवा गाल उतरवले असा दावा नाही.
"ऑल डॉक्टर्स शुड बी शॉट डेड, थर्टी टू स्क्राऊंड्रल्स हू केम टू ट्रीट मी आर नाऊ रेड्यूस्ड टू अ‍ॅशेस..." - युजी
एवढं म्हणूनही युजी म्हणतात फक्त मी म्हणतोय म्हणून लगेच ट्रीटमेंट थांबवू नका - मी माझा अनुभव सांगतोय. तुम्ही तुमच्या अनुभवाला चिकटून राहा आणि अ‍ॅपेंडिक्स ठणकत असेल तर जरूर कापून घ्या. ;-)

सहज's picture

4 Oct 2010 - 7:43 am | सहज

अनेक लोकांना डास चावतो. एखाद्या युजीला डास चावल्याने मरण आले नाही पण दरवर्षी लाखो माणसे त्यात अनेक निरोगी लोक देखील आली डेंगी, मलेरियाने मरण पावतात. त्यामुळे डॉक्टरांना नावे ठेवण्यात व अंगावर आजार काढण्यात प्रत्येक केस मधे एक तत्व अंगीकारता येणार नाही.

असो ह्या आणी अश्या मुद्यावरुन युजी काय सांगत आहेत व काय नेमके सांगायचे आहे ते हरवायला नको.

चतुरंग's picture

4 Oct 2010 - 6:22 am | चतुरंग

वाचतोय. वाचत राहीन. प्रश्न सगळ्यात शेवटच्या भागात असतील.

रंगा

भाऊ पाटील's picture

4 Oct 2010 - 2:59 pm | भाऊ पाटील

असेच म्हणतो.
अवांतरः ओशोंवर लेख टाकाच्...इकडे धुलाई करायची मजा वेगळीच ;)

वात्रट's picture

4 Oct 2010 - 6:37 am | वात्रट

ओशो वर एक पूर्ण लेख टाका कि साहेब

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 6:53 am | यशवंतकुलकर्णी

आमचे ओशो धुलाई केंद्र इथे आहे ;-) http://www.yekulkarni.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2010 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे त्या वाचनखुणा चालू करा रे!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Oct 2010 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लेख. प्रवास छान रेखाटला आहे. शेवट काय झाला याची वाट पाहतो आहे.
अवांतरः ते ओशो अंबळ आमच्या विजुभाऊंसारखे दिसत आहेत.

विनायक प्रभू's picture

4 Oct 2010 - 6:35 pm | विनायक प्रभू

३.१४ काळजी करु नका.
तुम्ही चालु ठेवा हो तुमचे लिखाण.
पुपेंशी सहमत.
आजकाल विजुभौ पण पुण्यात आहेत असे कळाले.

पैसा's picture

4 Oct 2010 - 8:10 pm | पैसा

आमच्यासारख्या अनेक सामान्य वाचकाना युजी फारसे ओळखीचे नाहीत. मी तत्त्वज्ञान काय वाचलंय? शून्य! पण रजनीश एक लेखक म्हणून मला निश्चित आवडतात. त्यांच्या "सॉफिस्टिकेटेड बाबागिरीशी" आपला काही संबंध नाही. आम्ही त्याना भगवान म्हणत नाही. पण जसे पुल, गंगाधर गाडगीळ मला आवडतात, तसेश ओशो पण लेखक म्हणून आवडतात. त्यांची भाषा अगदी साधी, सोपी आहे. लिखाणात नर्मविनोद सगळीकडे भरलेला असतो. कबीर, झेन, मीराबाई इ वर त्यानी सुंदर पुस्तकं त्यानी लिहिली आहेत. ते त्यांचं श्रेय त्याना द्यायलाच हवं नाही का? बाकी त्यांच्याच काय कोणच्याही बाबागिरीची धुलाई वाचायला मला आवडेल!

युजींच्या शिकवण्याची ओळख करून द्यायचं मोठं काम तू स्वीकारलं आहेस. पहिला भाग तर रंगतदार झालाय. आणखी येऊ दे. शंका येतील तशा विचारत जाईनच!

त्यांच्या गुरूच्या शोधाबद्दल वाचताना वाटलं, अरे, ही तर "काहीतरी" शोधणार्‍या प्रत्येकाची कहाणी आहे! आणखी असं, की तुमच्या आंतरिक प्रवासात गुरू हे वाटेवरच्या मैलाच्या दगडासारखे असतात. तुम्हाला अजून किती अंतर जायचय याची माहिती देतात. पण त्या दगडाला मिठी मारून बसलं तर तुम्ही कुठेच पोचणार नाही. तेव्हा त्या त्या वेळी त्या गुरूकडून जे मिळेल ते घ्यावं आणि पुढे चालू लागावं. जसं दगडाला मिठी मारून बसू नये, तसंच एखाद्या नावडत्या दगडाला हातोडे पण मारत बसू नये. नाहीतर तुमचा प्रवास तिथेच संपेल!

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 10:14 am | शिल्पा ब

हे असले बाबा किंवा त्यासम याविषयी मला काही माहिती नाही...हे युजी नावसुद्धा पहिल्यांदाच ऐकतेय...
बाकी हे बाबा लोक : एक म्हणतंय मीच देव तर दुसरं म्हणतंय देव नाहीच..वगैरे...बाकी वाचायला म्हणून लेख छानच.

पुढचे भाग येऊ द्या.