न्यू यॉर्क : २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
11 Jan 2017 - 9:39 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

काँझरवेटरीतील फुलोर्‍यांच्या आकारांची आणि रंगांची विविधता केवळ वेड लावणारी होती ! काय बघू आणि काय नको असे झाले होते. तेथून पाय निघायला मागत नव्हते. पण, अजून बरेच काही बघायचे होते त्यामुळे बाहेर पडून पुढे निघालो.

काँझरवेटरीतून बाहेर पडून तिला एक फेरी मारली. तिच्या आजूबाजूच्या परिसराची निगा तर उत्तम रितीने राखलेली होतीच पण तेथेही काही अनवट वनस्पती व फुलेही पाहायला मिळाली...


काँझरवेटरीचा परिसर ०१


काँझरवेटरीचा परिसर ०२

  
  
काँझरवेटरीचा परिसर ०३ : काही अनवट फुले

तेथून उजवीकडे वळून एका उपाहारगृहाला वळसा घालून पुढे निघालो आणि पाचेक मिनिटांत उंच वृक्षाच्या रांगांच्या मधून एक रस्ता जाताना दिसला. नकाश्यावर तिचे नाव टुलिप ट्री अ‍ॅली आहे असे समजले. इतक्या महाकाय वृक्षांचे हे नाव जरासे धक्कादायक होते. :) या उत्तर अमेरिकेतील भरभक्कम आकाराच्या स्थानिक वृक्षाला टुलिप सारख्या दिसणार्‍या त्याच्या फुलांमुळे टुलिप ट्री ( Liriodendron tulipifera) हे नाव पडले आहे हे नंतर गुगलबाबाच्या कृपेनेच कळले...


टुलीप ट्री अ‍ॅली


टुलीप ट्री चे फूल (जालावरून साभार)

त्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागल्यावर गर्द झाडीत लपलेली एक भव्य इमारत हळू हळू नजरेत येऊ लागली...


टुलीप ट्री अ‍ॅलीतून झालेले लायब्ररीच्या इमारतीचे प्रथमदर्शन

लु-एस्थर टी मेर्ट्झ लायब्ररी

न्यू यॉर्क राज्याच्या विधानसभेने १८८१ साली सर्वोत्तम सार्वजनिक वनस्पतीशास्त्रिय उद्यान निर्माण करण्यासाठी जमीन संरक्षित करून बांधकाम सुरू केले त्यावेळी या लायब्ररीचे आणि काँझरव्हेटरीचे बांधकाम सर्वप्रथम सुरू केले गेले. अँड्र्यु कार्नेजी, कॉर्नेलियस वँडरबिल्ट आणि जे पी मॉर्गन या त्या काळाच्या प्रसिद्ध सामाजिक कार्य करणार्‍या धुरिणांनी पुढे येऊन हे काम सर्वोत्तम प्रतीचे व्हावे यासाठी सरकार जेवढा खर्च करेल त्याच्या एवढाच पैसा भेट देण्याचे जाहीर केले. अश्या रितीने सरकारी व खाजगी सहकार्यातून "लु-एस्थर टी मेर्ट्झ लायब्ररी" हे उत्तर-दक्षिण अमेरिका खंडातले सर्वात मोठे शास्त्रीय वाचनालय उभे राहिले.

गर्द झाडीचा अडसर दूर झाली की ही इमारत किती भव्य आहे हे स्पष्ट होते. एकंदरीत या इमारतीचा भव्य आकार, तिचे कलापूर्ण बांधकाम आणि तिच्या समोरचे आकर्षक कारंजे यांचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही...


वाचनालय ०१


वाचनालय ०२ : दर्शनी भागातले कारंजे


वाचनालय ०३ : प्रवेशद्वारातून दिसणारे दर्शनी भागातले कारंजे आणि टुलीप ट्री अ‍ॅली

येथे ५,५०,००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. वनस्पतिशास्त्र व फलोत्पादनशास्त्रासह येथे इतिहास, मानववंशशास्त्र, लँडस्केपिंग, स्थापत्यशास्त्र, आर्किटेक्चरचा इतिहास, एथ्नोबॉटनी, वनस्पतिशास्त्राचे अर्थशास्त्र, नागरी समाजाचा इतिहास, पर्यावरण, इत्यादी अनेक विषयांवरचे ग्रंथ आहेत. केवळ आधुनिक शास्त्रीय पुस्तके व नियतकालिकेच नाहीत तर औषधी वनस्पतींवरची मध्ययुगीन पुस्तके; १७व्या व १८व्या शतकातल्या युरोपियन उद्यानतंत्रावरची पुस्तके; चार्ल्स डार्विन व कार्ल फोन लिन्ने इत्यादींची पुस्तके, यासारखी दुर्मिळ ग्रंथसंपदाही येथे जतन करून ठेवलेली आहे.


वाचनालयाच्या स्वागतगृहातली भलीमोठी पुष्परचना

वाचनालयाच्या एका दालनात डोकावून आणि नावाजलेल्या कलाकारांनी विविध ऋतूत बागेच्या रंगवलेल्या चित्रांचे दालन पाहून पुढे निघालो.

मी काही वनस्पतिशास्त्रज्ञ नाही किंवा त्या विषयांत मला सौदर्यदृष्टीने पाहण्यापलीकडे रस नाही. त्यामुळे, शास्त्रीय मुद्दे सोडून देऊन, पुढचे एकमेकाला लागून असलेले अनेक छोठेमोठे बगिचे केवळ डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवत पुढे निघालो. त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोर्‍यांचे फोटो खाली देत आहे...


वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०१


वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०२


वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०३


वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०४

    
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०५ व ०६

आता मात्र चालून चालून दमलेल्या पायांनी तक्रार करायला सुरुवात केली होती. कर्मधर्मसंयोगाने तोपर्यंत बस-ट्रेनच्या एका थांब्यावर पोहोचलो होतो. बस पकडून, आरामात बसून, बागेच्या सौंदर्याचे निरीक्षण करत आणि चांगले दृश्य दिसले की कॅमेर्‍याचा वापर करत फेरी पुढे चालू झाली...


बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०१


बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०२


बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०३


बसट्रेनचा थांबा

पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका (Peggy Rockefeller Rose Garden)

या गुलाबपुष्पवाटीकेचे विशेष म्हणजे १९१६ साली, जेव्हा अमेरिकन स्त्रियांचे विश्व घरापुरते मर्यादित होते त्या काळी, बियाट्रिक्स फेरांड नावाच्या लॅंडस्केप कलावतीने हिची निर्मिती सुरू केली. पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या लोखंडाच्या अभावामुळे वाटिकेचे कुंपण अपूर्ण अवस्थेत ठेवावे लागले होते ! १९८८ साली वाटिकेचे व्यवस्थापन करणार्‍या बोर्डाच्या एका सभासदाने मूळ आराखडे शोधून काढले व डेविड रॉकंफेलरला दाखविले. रॉकफेलरच्या उदार मदतीने फेरांडच्या मनातली वाटिका पूर्णरूपाने अस्तित्वात आली. तिला गुलाबांची आवड असणार्‍या डेविडच्या पत्नीचे, पेगीचे, नाव दिले गेले. आजच्या घडीला या बागेत वेगवेगळ्या आकार-रंग-गंध-रूपांच्या ७०० पेक्षा जास्त प्रकारच्या गुलाबांची ३००० पेक्षा जास्त झुडुपे आहेत. जगातल्या सर्वोत्तम गुलाबाच्या बगिच्यांमध्ये हिची गणना केली जाते.

उंचीवर असलेल्या रस्त्यावरून दरीत वसलेल्या या बागेचे विहंगम दर्शन होते...


पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीकेचे विहंगमावलोकन ०१


पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीकेचे विहंगमावलोकन ०२

ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनला भेट दिली तेव्हा गुलाबांचे खूप ताटवे दिसले होते. त्याचबरोबर अनेक झुडुपांवर शेकडो कळ्यांचे झुबकेही दिसले होते. त्या वेळेस, आपण जरासे अगोदर तेथे गेलो आहोत असे काहीसे चुकचुकल्यासारखे वाटले होते. त्यानंतर तीनेक आठवड्यांनी या वाटिकेची फेरी झाल्याने इथली गुलाबांची सर्व झुडुपे अक्षरशः शत-हजारो फुलांच्या झुबक्यांनी भरून गेलेली होती. त्यामुळे ती जुनी खंत पुरेपूर भरून निघाली !


पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०१


पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०२


पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०३

इथली विविध आकार-रंग-गंध-रूपांच्या गुलाबांची उधळण अक्षरशः वेड लावणारी होती. तेथे घेतलेले ताटव्यांचे आणि फुलांचे खालील निवडक फोटो मी काय म्हणतो आहे त्याची कल्पना देऊ शकतील...

  
  
  
  
  
  
वैशिष्ट्यपूर्ण ताटवे ०१

  
  
  
  
  
  
वैशिष्ट्यपूर्ण ताटवे ०२

    
    
    
वैशिष्ट्यपूर्ण फुले व ताटवे ०३

आज लिहिताना जेव्हा मी हे फोटो पाहत आहे, तेव्हा त्यांनी त्या वाटिकेतील अनुभवाला पुरेसा न्याय दिला नाही असे जाणवते !

बागेतून बाहेर पडून परत बसट्रेन पकडली आणि उद्यानाची सफर परत सुरू केली.


बसने बागेत फिरताना ०१


बसने बागेत फिरताना ०२


बसने बागेत फिरताना ०३


बसने बागेत फिरताना ०४

इतके मोठे उद्यान बघताना होणारी बरीच पायपीट वाचवल्याबद्दल या गाडीला आपल्या पायाकडून अनेक धन्यवाद मिळतात ! बागेला फेरी घालून गाडीने आम्हाला प्रवेशद्वारापर्यंत आणून सोडले.


आतल्या बाजूने दूरवर दिसणार्‍या प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग


आतल्या बाजूने दिसणारे प्रवेशद्वार

प्रवेशद्वाराच्या आकर्षक इमारतीच्या एका बाजूला फुलझाडे व इतर झाडांच्या रोपांचे विक्रीकेंद्र आहे, तर दुसर्‍या बाजूला उपाहारगृह आहे. चारपाच तासाच्या फेरफटक्याने भूक मस्तपैकी खवळली होती. अर्थातच उपाहारगृहाला राजाश्रय देण्यात आला !

परत निघण्यापूर्वी झाडे विक्रीकेंद्र आणि त्याच्या प्रांगणाला धावती भेट दिली. तेथेही फोटो घेण्याचा मोह व्हावा असे बरेच काही होते...

  
  
प्रवेशद्वार परिसर आणि विक्रीकेंद्रातील नजारे ०१

    
प्रवेशद्वार परिसर आणि विक्रीकेंद्रातील नजारे ०२

उद्यानातून बाहेर पडून परतीची बस पकडली आणि हार्लेमनदीला ओलांडून आमच्या गल्लीत प्रवेश केला...


हार्लेम नदी आणि पलीकडील मॅनहॅटनचा किनारा


हडसन हाईट्स, मॅनहॅटन

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2017 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी धन्यवाद !

पैसा's picture

22 Jan 2017 - 2:30 pm | पैसा

तिथे कृष्णकमळाचं फूल बघून अगदी बरं वाटलं!

पद्मावति's picture

22 Jan 2017 - 2:48 pm | पद्मावति

वाह. मस्तच.