किनखापी आभाळाने
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला
भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ
त्याची बहीण मुक्ताई
सार्या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय
"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे
गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||
इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||
कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||
सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||
फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||
धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर
चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी
रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट
झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी
भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची
लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल
चाल चाल चालत गेलास
वणवण भटकून थकून गेलास
हाच क्षण मोलाचा
रोवून पाय
थांबायचा
दार दार ठोठवत गेलास
उंबरा उंबरा झिजवत राह्यलास
हाच क्षण मोलाचा
तोडून दार
घुसायचा
वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
काय निवडावं लोकांनी
बॅड कि वर्स ?
कसला लागला आहे हा
महाराष्ट्राला कर्स
कितवा स्वातंत्रदिन आहे
हे विसरणारा मुख्यमंत्री
कि कानाखाली वाजवण्याची
भाषा करणारा मंत्री
तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं,
मिडीयाला चघळायला नवं हाडूक
कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा
सर्वच मूळविषय झाले गूडूप
किती उर्जेचा होतो विध्वंस
मनातल्या हिंसा-द्वेषाने
कीव येते चूकीचे समर्थन
करुन लढणा-यांचे त्वेषाने
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"