मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!
रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही
मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो!
चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा...
मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो!
लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता
मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो!
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो...
—सत्यजित