गंधभारल्या रात्री होत्या...
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!
केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा...
फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते!
विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना...
लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते!
मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते!
निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा...
पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते!
—सत्यजित