मुन्तजिर
राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.