रिक्त प्याल्याच्या तळाशी...
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!
ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!
तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!
तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!
केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!
नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!
—सत्यजित