केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ३

पद्मावति's picture
पद्मावति in भटकंती
11 Sep 2016 - 1:28 am

कॅॅपस्टॅड, द मदर सिटी अर्थात केप टाउन!!!

अगदी आटोक्यात, हाकेच्या अंतरावर आणि सतत नजरेच्या टप्प्यात असणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही या शहराची खासियत आहे. समशीतोष्ण हवामान, समुद्र, डोंगर रांगा, मुबलक वन्यजीवन आणि त्याचबरोबर उत्तम कुझीन, शॉपिंग साठी असंख्य प्रकारचे पर्याय, मुलांसाठी सुद्धा झू, अक्वॅरियम्स.... जगभरातील पर्यटकांच्या बकेट लिस्ट मधे हे शहर नक्कीच खूप वरच्या नंबर असते. वेळ कसा जाईल हा प्रश्न नाहीच इथे उलट असलेला वेळ नेहमी कमीच पडतो मग ते चार दिवस असोत किंवा चार महिने....

केप टाउनचे मूळ रहिवासी खोई या जमातीचे लोक होते. साधारणपणे पंधराव्या शतकाच्या शेवटी युरोपियन दर्यावर्दींची या भागावर नजर पडली.
मग पुढे पोर्तुगीझ, स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटीश जहाजं इथे थांबू लागली. हे खलाशी लोखंड आणि इतर धातूंच्या मोबदल्यात स्थानिकांकडून मांस विकत घ्यायचे. भौगोलिक दृष्ट्या या भागाचे महत्व युरोपियन देशांच्या लक्षात यायला लागलं होतं. युरोपातुन पुर्वेकडे जातांना मधे त्यांना एखाद्या मध्यवर्ती जागेची गरज वाटायला लागली होती.... अशी जागा किंवा तळ कि जिथे साधनसामुग्री, अन्नपाणी तसेच टपाल या सर्व गोष्टी भरून घेता येतील आणि पुढचा प्रवास ताज्या दमाने करता येईल.
हाच हेतू घेऊन सोळाशे बावन्न मधे डच ईस्ट इंडिया या कंपनीने स्वत:चे प्रतिनिधी इथे पाठविले. या डच लोकांनी वसाहतीला सुरूवात केली. कामासाठी मजुरांची गरज पडू लागली तशी इंडोनेशिया, मादागास्करहून मजुरांना बोलावण्यात आले. हळूहळू शहर वाढायला लागले. आधी डच मग नंतर ब्रिटीश वसाहतींनी इथे राज्य केले.

केप टाउन पासून अर्धा तास बोटीच्या अंतरावर समुद्रात रॉबेन आयलंड नावाचे बेट आहे. डच वसाहत काळापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत या बेटाचा उपयोग हा गुन्हेगार, राजकीय विरोधक, बंडखोर यांचा तुरुंग म्हणून केला जायचा. सभोवताली खवळणारा समुद्र, भयंकर वादळी वारे, कायम पाउस असे हवामान म्हणजे सुटुन पळून जाण्याची शक्यता शून्य. जवळ जवळ साडे तीनशे वर्षे हा तुरुंग जुलमी, अभेद्य अशा साम्राज्यवादाचे प्रतीक म्हणून ओळखला जायचा.

राजकीय कैद्यांना आणि विरोधकांना रॉबेन आयलंड वर सगळ्या जगापासून दूर या एकांतावासात वर्षानुवर्षे ठेवले जायचे. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करून त्यांचे साहस आणि मनोधर्य मोडून टाकणे हा हेतू. नंतर इंग्रज राजवटीत तर कैद्यांबरोबरच इथे कुष्ठरोग आणि अशाच गंभीर आजाराने ग्रासलेले लोक आणि मोकाट प्राणी यांना बाकी समाजापासून दूर ठेवण्यासाठी उपचाराचे कारण देऊन या बेटावर आणले जायचे. त्यांना इथून परत जायला बंदी असायची.

एकोणीसशे साठ नंतर साऊथ आफ्रिकेत वर्णभेद तसेच वांशिक भेदाविरुद्ध जी चळवळ चालवल्या गेली होती त्यामधले बहुतेक करून सर्व कैद्यांना याच तुरुंगात ठेवल्या गेले होते. नेल्सन मंडेलांनी इथे सत्तवीस वर्षे काढली. साऊथ आफ्रिकेच्या आत्तापर्यंतच्या तीन राष्ट्रपतींनी रॉबेन आयलंड वर राजकीय तुरुंगवास भोगला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मात्र रॉबेन आयलंड वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित झाले आहे आणि तुरुंगाचे रुपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करण्यात आले आहे.

हवामानाच्या बाबतीत आमचं नशीब पुन्हा जोरदार निघालं. बाहेर स्वच्छ उन पडलं होतं आणि वारा अजिबात नाही. बोट प्रवासासाठी हे आयडियल होतं कारण वारा भरपूर असेल तर बोटी निघतच नाहीत त्यामुळे आयलंडला जाणे अर्थातच कॅन्सल होते.

दुपारनंतर समुद्र जरा रफ होतो असे आम्ही ऐकलं होतं त्यामुळे पहिलीच फेरी घेण्याच्या इराद्याने आम्ही सकाळी व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट वॉटरफ्रंट ला जायला निघालो. सकाळची वेळ होती तरी खूप रहदारी नव्हती. सिग्नल ला थांबल्यावर द्राक्ष, केळी वगैरे विकायला काही लोकं गाडीजवळ येत होते.

आमचा टॅक्सी ड्रायवर त्याचा रॉबेन आयलंडचा अनुभव आम्हाला सांगत होता. त्याला तिथे जायची खूप उत्सुकता होती. पोहोचल्यावर सगळा तुरुंग बघेपर्यंत तो ठीक होता. मग थोड्यावेळाने मात्र तिथल्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर असा झाला की त्याला छातीत धडधडायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं. इतका जबरदस्त पॅनिक अटॅक की तो सांगत होता की आयलंड वरुन समोर केप टाउन शहर दिसत होते. त्याला अक्षरश: त्या समुद्रात झोकून देण्याचा मोह झाला एक क्षण...जणू काही तो कैदी आहे आहे आणि काहीही करून त्याला या कैदेतून सुटून पुढे दिसत असलेल्या मुक्त समाजात परत जायचंय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या आयलंडच्या वातावरणात एकप्रकारचा ताण आहे, दु:ख आहे जे तीथे जाणार्या प्रत्येकाला कमीजास्ती प्रामाणात का होईना पण जाणवतं. तुरुंगवासात असलेल्या लोकांचे अश्रू, शाप, निश्वास, संताप, हतबद्धता या सर्वांचा परिणाम वातावरणावर होणारच.....

टूरचे ऑनलाइन बुकिंग करता आले तर चांगलेच आहे पण आम्ही वेळेवर जाऊन तिकीट काढले. तिकिटाच्या किमतीत बोटचे तिकीट इंक्लूडेड असतं. रांग सुद्धा फार काही लांब नव्हती. तिकीट काढून झालं की तिथेच तुमची पर्स, बॅकपॅक सुरक्षिततेच्या कारणाने तपासतात आणि मग बोटीत चढा. एकूण सगळा प्रकार शिस्तबद्ध आणि वेळेवर. कुठेही गोंधळ नाही किंवा कुठे उशीर होतोय असे कधीच झाले नाही.

.

अर्धा तासाचा प्रवास करून आमची बोट आयलंडला जाऊन पोहोचली. तिथे जवळच बसेस उभ्या होत्या त्यापैकी एका बस मधे जाऊन बसलो. बस मधे गाइड होता तो सगळ्या आयलंडची आणि तिथल्या इमारतींची, अवशेषांची चांगली माहिती देत होता.

.

कुष्ठरोगी आणि अन्य रुग्णांची दफनभुमी

.

दुसरया महायुद्धाच्या काळात या बेटावर लष्करी तळ बनवला होता. तेव्हाच्या बराकी.

.

तुरुंगवासीयांना या चुन्याच्या खाणीत काम करावे लागायचे. दिवसभर उन्हातान्हात कैदी अर्धपोटी काम करायचे. नेल्सन मंडेला यांच्या सहित कित्येक लोकांना उन्हाच्या तीव्र प्रकाशात सतत काम करून पुढे गंभीर दृष्टीदोष निर्माण झाले.

.

बस फेरीच्या मधे एक वीस मिनिटांचा ब्रेक देतात. तिथे स्वच्छ प्रसाधनगृहे आहेत. जवळंच छोटासा कॅफे पण आहे. समुद्र सपाटीपासून हे बेट अगदीच कमी उंचीवर आहे त्यामुळे तिथे समुद्र अगदी जवळ आलेला वाटतो.
बस आपल्याला तुरुंगाच्या दाराशी आणून सोडते.
दारावरच तुरुंग दाखविण्यासाठी गाइड असतो तो सर्वांना आत घेऊन जातो. हे गाइड्स म्हणजे तुरुंगातील माजी कैदिच असतात. त्याना तुरुंगाची, त्याच्या इतिहासाची अतिशय चांगली माहिती असते आणि उत्तम इंग्रजी भाषेत हे गाइड्स आपल्याला माहिती देतात.

.

.

ही नेल्सन मंडेला यांची कोठडी. अशा महत्वाच्या राजकीय कैद्यांसाठी वेगळे स्वतंत्र सेल्स असत. हेतू असा की ही माणसं सामान्य कैद्यांमधे मिसळायला आणि त्यांच्यावर प्रभाव पडायला नको. एक झोपण्यासाठी सतरंजी, छोटं टेबल आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे टाय्लेटच्या जागी फोटोत दिसतेय ती लाल बकेट :(

.

ही सामान्य कैद्यांसाठी सार्वजनिक झोपण्याची खोली.

.

टूर पूर्ण करायला सुमारे दोन तास लागतात. सकाळी टॅक्सी ड्रायवरने सांगितल्याप्रमाणे तेथील वातावरणात एकप्रकारचा उदासपणा म्हणा किंवा गांभीर्य जाणवतं हे खरंय. बाहेर आल्यावर सर्वच लोक अत्यंत शांत अंतर्मुख झाले होते.. जड मनाने आम्ही बोटीत बसलो.

केप टाउनला पोहोचताच तिथल्या मुक्त, मोकळ्या वातावरणात आल्यावर जरा बरं वाटलं. सहजतेने गृहीत धरत असलेल्या स्वातंत्र्याची किंमत त्यादिवशी मला खरोखर जाणवत होती.....वॉटरफ्रंटच्या त्या मुक्त, उत्साहाने रसरसणार्या वातावरणात येऊन मी मोकळेपणाने श्वास घेतला आणि देवाला अगदी मनापासून थॅंक यू म्हणाले....

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

11 Sep 2016 - 1:43 am | अभिजीत अवलिया

हा भाग उत्तम झालाय. ही छायाचित्रे अमूल्य आहेत. कधीही 'Delete' करू नका.

बोका-ए-आझम's picture

11 Sep 2016 - 1:45 am | बोका-ए-आझम

हे बघायला मिळणं म्हणजे भाग्यच! पण अशी स्थळं पाहिली की विचित्र खिन्नता येते मनाला!

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2016 - 12:25 pm | स्वाती दिनेश

हा भाग छानच झाला आहे. फोटो आणि वर्णन दोन्हीही..
स्वाती

अजया's picture

11 Sep 2016 - 12:54 pm | अजया

नेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण भाग.पुभाप्र

यशोधरा's picture

11 Sep 2016 - 1:12 pm | यशोधरा

उत्तम भाग. लिही पुढे..

प्रचेतस's picture

11 Sep 2016 - 6:48 pm | प्रचेतस

हा भागही आवडला.
नेहमीच्या ठिकाणांपेक्षा वेगळी भटकंती.

पाटीलभाऊ's picture

11 Sep 2016 - 9:26 pm | पाटीलभाऊ

मस्त...केपटाऊनमध्ये असुनही रॅाबिन आयलँडला जाण हुकतय...लवकरच भेट देण्यात येईल.

सुहास बांदल's picture

11 Sep 2016 - 9:30 pm | सुहास बांदल

रॉबेन आयलंड बद्दल पुर्वी वाचण्यात आले होते. फोटो पाहुन जरा खिन्नता आली . बाकी सफर झकास चालू आहे.

ट्रीप चांगलीय पण हे असलं काही बघु वाटत नाही. :(

वाचतिये. अशी ठिकाणे पाहणे हे क्लेशदायक असते.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 8:00 am | पिलीयन रायडर

हा भाग वाचुनही उदास व्हायला झालं.. तुला कसं वाटलं असेल ते पहाताना..

पुभाप्र..

या खेपेचा भाग थोडा नेहमी पेक्षा हटके वाटला. पण लिखाण अप्रतिम,
पुलेप्र।