द स्केअरक्रो भाग १६

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
9 Aug 2015 - 12:25 am

द स्केअरक्रो भाग १५

द स्केअरक्रो भाग १६ (मूळ लेखक मायकेल काॅनेली)

शनिवारी सकाळी मी क्योटो ग्रँडमधल्या माझ्या खोलीत बसून लॅरी बर्नार्डने लिहिलेली पहिल्या पानावरची स्टोरी वाचत होतो. अलोन्झो विन्स्लोची अखेरीस अल्पवयीन गुन्हेगारांच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि तीही सरकारने सगळे आरोप मागे घेतल्यामुळे. त्या वेळी मला हॉलीवूड डिव्हिजनमधल्या एका माझ्या ओळखीच्या डिटेक्टिव्हचा फोन आला. तिने मला सांगितलं की मी आता परत माझ्या घरी जाऊ शकतो कारण फोरेन्सिक डिपार्टमेंटमधल्या लोकांनी आपला तपास संपवलेला आहे.

“मी परत जाऊ शकतो?”

“हो. आत्ता या क्षणी तुझ्या घराचा ताबा तुझ्याकडे परत देतोय आम्ही.”

“म्हणजे तुमचा तपास संपलाय?मला असं म्हणायचंय की माझ्या घरातून तुम्हाला त्याच्याबद्दल जे हवं होतं ते सगळं मिळालंय, जरी या खुन्याला अजून अटक झालेली नसली तरी?”

“नाही. अजूनही बरेच धागेदोरे तपासायचे आहेत आम्हाला.”

“कुठले?”

“मी या केसबद्दल तुझ्याशी कुठलीही चर्चा करू शकत नाही.”

“ठीक आहे. मग मी अँजेलाबद्दल तुला विचारू शकतो का?”

“तिच्याबद्दल काय?”

“तिचा मृत्यूदेखील इतरांप्रमाणेच...”

तीसुद्धा बोलता बोलता थांबली. बहुतेक मला किती आणि काय सांगावं याचा विचार करत होती.

“दुर्दैवाने हो. तिच्यावरही बलात्कार झालेला आहे, तोही बाह्य साधनाने. तिलाही इतरांप्रमाणेच हळूहळू घुसमटवून मारण्यात आलेलं आहे. तिच्या गळ्यावर दोरीने बांधल्याच्या खुणा आहेत. त्याने तिला वारंवार बेशुद्ध केलं आणि नंतर परत शुद्धीवर आणलं. आता तो हे तुम्हा दोघांना किती माहिती मिळालेली आहे हे तिच्याकडून काढून घेण्यासाठी करत होता की दुसऱ्या एखाद्या कारणासाठी, ते अजून आम्हाला स्पष्टपणे कळलेलं नाही. जेव्हा आम्ही त्याला अटक करू, तेव्हाच आपल्याला ते कळेल.”

अँजेलाच्या शेवटच्या क्षणांबद्दल ऐकून मी सुन्न झालो.

“अजून काही? आज शनिवार आहे आणि मला तो माझ्या मुलीसोबत घालवायचा आहे.”

“नाही. अजून काही नाही.”

“ठीक आहे मग. आता घरी जाऊ शकतोस तू. हॅव अ नाईस डे!”

तिने फोन ठेवला आणि मी विचार करायला लागलो. आता त्या घराबद्दल मला काहीच आपुलकी वाटत नव्हती. मला तिथे खरोखर परत जावंसं वाटत होतं का याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. गेल्या दोन्हीही रात्री मी झोपू शकलो नव्हतो. अँजेलाचे भीतीने थिजलेले निष्प्राण डोळे, तिचा चेहरा आणि तिच्या खुन्याने मला ऐकवलेला तिचा तिच्या शेवटच्या क्षणीचा आवाज या सगळ्या गोष्टी मला दिसत होत्या आणि माझी झोप उडवून टाकत होत्या. प्रत्येक गोष्ट मला पाण्याखाली असल्यासारखी दिसत होती. तिचे हात बांधलेले नव्हते आणि ती जीवाच्या आकांताने माझा हात पकडण्याचा प्रयत्न करत होती. तिचा शेवटचा चीत्कार एखाद्या बुडबुड्यासारखा ऐकू येत होता आणि तो जेव्हा मला एल्विसने ऐकवलेल्या आवाजासारखा यायला लागला, तेव्हा मी खडबडून जागा झालो.

आता मला या एल.ए. डिटेक्टिव्हने अँजेलाच्या खुनाबद्दल सांगितल्यावर तर त्या घरात जाऊन तिथे झोपणं ही अशक्य गोष्ट होती माझ्यासाठी. मी खिडकीवरचा पडदा बाजूला केला आणि बाहेर पाहिलं. समोर एल.ए.चं वैभव समजलं जाणारा सिटी हॉल दिसत होता. त्याच्या शेजारी क्रिमिनल कोर्टाची तितकीच कुरूप इमारत होती. रस्ते रिकामे होते. शनिवार-रविवारी शहराच्या या भागात, डाऊनटाऊनमध्ये फार कमी लोक असायचे. मी पडदा परत ओढून घेतला.

जोपर्यंत या खोलीचे पैसे ऑफिसकडून दिले जात होते, तोपर्यंत इथे राहायचं मी ठरवलं होतं. एकदा घरी जाऊन माझे कपडे आणि इतर काही जरुरीच्या गोष्टी आणायला लागल्या असत्या. दुपारी एखाद्या इस्टेट एजंटला फोन करून हे घर लवकरात लवकर विकून टाकता येईल का ते मला पाहायचं होतं.

माझा फोन वाजला आणि मी या विचारांतून बाहेर आलो. माझा नेहमीचा फोन. आदल्या दिवशीच मी तो दुरुस्त करून घेतला होता. कॉलर आयडीवर PRIVATE NUMBER असं आलं होतं. मी कॉल घेतला. पलीकडच्या बाजूला रॅशेल होती.

“हाय!” मी म्हणालो.

“तू जरा उदास आणि वैतागलेला वाटतोयस! काय झालं?”

तिच्या प्रोफाईलिंग कौशल्याबद्दल मला आदर होताच पण तो आता द्विगुणीत झाला. केवळ माझ्या एका शब्दावरून तिने माझा मूड बरोबर पकडला होता. पण मला तिचा मूड खराब करायचा नव्हता.

“नाही, काही विशेष नाही. तू सांग. तुझं काय चाललंय? आजपण काम करते आहेस तू?”

“हो.”

“जरा त्यातून ब्रेक घेऊन कॉफीसाठी भेटता येईल का? इथे डाऊनटाऊनमध्ये?”

“नाही. जमेल असं वाटत नाही.”

अँजेलाचा मृतदेह माझ्या घरात आम्हाला मिळाला आणि त्यानंतर तिने पोलिसांना फोन केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला वेगळं करून प्रश्न विचारले होते. त्यावेळी मी तिला शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर जरी फक्त अठ्ठेचाळीस तासच उलटले असले तरी मला ते खायला उठले होते. मी माझ्या जागेवरून उठलो आणि येरझाऱ्या घालू लागलो.

“बरं. मग कधी भेटू शकतो आपण?”

“ नाही माहित जॅक. नाही सांगू शकत मी. जरा धीर धर. इथे टांगत्या तलवारीखाली काम करतेय मी.”

मला माझ्या अधिरेपणाची जरा लाज वाटली, म्हणून मी विषय बदलायचं ठरवलं.

“त्यावरून आठवलं. मला सशस्त्र संरक्षणाची गरज आहे.”

“कशासाठी?”

“एल.ए.पी.डी.ने माझ्या घराची फोरेन्सिक तपासणी संपवली आहे. त्यांचा मला फोन आला होता की मी परत घरी जाऊ शकतो. पण तिथे मी आता राहू शकेन असं मला वाटत नाहीये. मला तिथे जाऊन माझे कपडे आणि इतर जरुरीच्या गोष्टी आणायच्या आहेत पण तिकडे एकटं जायचा माझा धीर होत नाहीये.”

“सॉरी जॅक. मी स्वतः नाही येऊ शकत. पण जर तुला खरंच तिथे एकटं जायला भीती वाटत असेल तर मी तुला संरक्षण देण्याची व्यवस्था करू शकते.”

माझ्या डोळ्यासमोर आता चित्र उभं राहात होतं. याच्याआधीही तिच्याबरोबर मला असाच अनुभव आला होता. ती कधीही एका मर्यादेपलीकडे माझ्या जवळ आली नव्हती. जर मी कधी प्रयत्न केलाच, तर एखाद्या मांजरीसारखी तिची नखं बाहेर आलीच म्हणून समजा. आत्ताही तेच चाललं होतं.

“जाऊ दे रॅशेल. मी फक्त तुला भेटण्याचा प्रयत्न करत होतो.”

“खरंच शक्य नाहीये मला जॅक.”

“तू फोन का केला होतास?”

उत्तर देण्याआधी ती जरा थांबली.

“मला तू कसा आहेस ते तर बघायचं होतंच आणि शिवाय तुला काही गोष्टीही सांगायच्या होत्या, जर तुझी ऐकण्याची इच्छा असेल तर!”

“अच्छा. म्हणजे हा बिझिनेस कॉल आहे तर! बोल. मी ऐकतोय.”

मी पलंगावर बसलो आणि माझी छोटी वही आणि पेन घेऊन ती सांगतेय त्याच्या नोट्स घेऊ लागलो.

“काल त्यांनी हे शोधून काढलं की ती वेबसाईट – trunkmurder.com हीच कॅप्चर साईट होती, जिच्यावरून या खुन्याला अँजेला आणि तुझ्याबद्दल समजलं. पण अजूनतरी हा डेड एंड आहे.”

“डेड एंड? पण इंटरनेटवरच्या कुठल्याही गोष्टीचा माग काढता येतो ना?”

“ही साईट होस्ट करणारी कंपनी मेसा, अॅरिझोना इथे आहे. वेस्टर्न डेटा कन्सल्टंट्स. एफ.बी.आय. एजंट्स तिकडे सर्च वॉरंट घेऊन गेले होते आणि त्यांना या साईटबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे. ही साईट सीअॅटलमधल्या सी जेन रन नावाच्या एका कंपनीमार्फत रजिस्टर झालेली आहे. सी जेन रन ही कंपनी अशा साईट्स चालवते आणि वेस्टर्न डेटाच्या माध्यमातून या सगळ्या साईट्स चालवल्या जातात. सी जेन रनचं स्वतःचं ऑफिस किंवा प्रत्यक्ष सेट-अप वगैरे नाहीये. ते काम वेस्टर्न डेटाचं आहे. सी जेन रन त्यांच्या क्लायंटसाठी वेबसाईट्स बनवतात आणि वेस्टर्न डेटाला त्या साईट्स होस्ट करण्यासाठी पैसे देतात.”

“म्हणजे आता सीअॅटलला काय ते कळेल?”

“तिथल्या फील्ड ऑफिसमधले लोक ते हाताळताहेत.”

“आणि?”

“ही जी साईट आहे – trunkmurder.com, ती पूर्णपणे अज्ञात साईट आहे. सी जेन रनमधल्या कोणत्याही माणसाने ज्याने कोणी ही साईट बनवायला त्यांना पैसे दिले, त्याला पाहिलेलं नाही. दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी ही साईट बनवली तेव्हा जो प्रत्यक्ष पत्ता त्यांना मिळाला होता, तो म्हणजे सीअॅटल एअरपोर्टजवळ असलेला एक पोस्ट बॉक्स होता आणि तो आता अस्तित्वातच नाहीये. आम्ही त्यावरून काही मिळतंय का ते पाहायचा प्रयत्न करतोय पण तोही डेड एंडच आहे. हा जो कोणी आहे, तो पक्का मुरलेला आहे या खेळात!”

“तू आत्ता साईट्स असं म्हणालीस. एकापेक्षा जास्त आहेत का अशा साईट्स?”

“अच्छा, ते तुझ्या लक्षात आलं तर! हो. दोन साईट्स. पहिली ही – trunkmurder.com आणि दुसरी denslow data. तेव्हा आम्हाला त्याने या दोन्ही साईट्स तयार करताना जे नाव वापरलं ते मिळालं – बिल डेन्स्लो. दोन्ही साईट्सचे पाच वर्षांचे पैसे त्याने भरलेले आहेत आणि तेही मनी ऑर्डरने. हा अजून एक डेड एंड.”

हे सगळं लिहिण्यासाठी मला थोडा वेळ लागला.

“अच्छा. म्हणजे हा डेन्स्लो जो आहे तो आपला अनसब आहे का?”

“ज्याने हे नाव घेतलं आहे, तो आपला अनसब आहे. तो आपलं खरं नाव देण्याएवढा मूर्ख तर अजिबात नाहीये.”

“मग याचा अर्थ काय आहे? D-E-N slow. हे कशाचं तरी संक्षिप्त रूप वगैरे आहे का?”

“असू शकेल. आम्ही त्याच्यावर काम करतोय. या दोन्हीही पर्यायांबद्दल विचार चालू आहे. एक म्हणजे हे खरोखरच कुणाचं तरी नाव आहे आणि दुसरं म्हणजे कशाचं तरी संक्षिप्त रूप आहे. पण आम्हाला बिल डेन्स्लो नावाचा कोणीही गुन्हेगार किंवा त्याच्या जवळपास येणारं टोपणनाव असलेला कोणीही गुन्हेगार अजून मिळालेला नाही.”

“कदाचित हा अनसब जो असेल, तो या नावाच्या कोणावर तरी खार खाऊन असेल. कदाचित त्याचा कटकट्या शेजारी किंवा त्याला शाळेत छळणारा एखादा बरोबरचा विद्यार्थी किंवा शिक्षक.”

“असू शकेल.”

“पण मग दोन वेबसाईट्स कशाला?”

“एक कॅप्चर साईट आणि दुसरी OP साईट.”

“OP?”

“ऑब्झर्वेशन पॉइंट.”

“नाही, काही समजलं नाही.”

“ओके. trunkmurder.com या साईटचा उद्देश आयपी अॅड्रेस मिळवणं हा होता. जो कोणी ही साईट बघेल, त्याचा आयपी अॅड्रेस या साईटवर यायचा. अँजेलाने तेच केलं. बरोबर?”

“हो. तिने गुगलवर जेव्हा सर्च केलं तेव्हा ही साईट तिला मिळाली आणि तिने ही साईट पाहिल्यावर त्याला तिचा आयपी अॅड्रेस मिळाला.”

“बरोबर. आता ही साईट आयपी अॅड्रेस गोळा करून ते पुढे एका दुसऱ्या साईटवर पाठवत होती. ही दुसरी साईट म्हणजे डेन्स्लो डेटा. ही अगदी नेहमी वापरली जाणारी पद्धत आहे. तू एका साईटवर जातोस, तिथे तुझा आयपी अॅड्रेस त्यांना मिळतो, जो मग मार्केटिंगसाठी इतर साईट्सना पाठवला जातो. ज्याला आपण स्पॅम मेल म्हणतो, त्याच्यामागे हेच तर कारण आहे.”

“ओके. मग आता जर डेन्स्लो डेटावर तिचा आयपी अॅड्रेस आला, तर मग पुढे काय? त्याचं पुढे काय होतं तिथे?”

“काही नाही. तो तिथेच राहतो.”

“मग कसा काय.....”

“ सांगते. डेन्स्लो डेटाचं काम हे trunkmurder.com च्या बरोबर उलटं आहे. तिच्यावर आलेल्या कोणाचाही आयपी अॅड्रेस मागे राहात नाही. कळलं आता?”

“नाही.

“ओके. याच्याकडे आता या अनसबच्या दृष्टीकोनातून बघ. त्याने trunkmurder.com ही साईट तयार केली. कशासाठी? तर जर कुणी त्याबद्दल काही माहितीच्या शोधात असेल, तर त्याला ते ताबडतोब समजेल. आता यात प्रश्न असा आहे की जेव्हा तो स्वतः ही माहिती गोळा करायला या साईटवर जाईल, तेव्हा त्याचा स्वतःचा आयपी अॅड्रेसही तिथे नोंदवला जाईल. आता तो कुणा दुसऱ्याचा काँप्युटर वापरू शकतो पण तरीही तो प्रत्यक्षात कुठे आहे, याची नोंद राहीलच. त्यामुळे त्याच्याच साईटद्वारे त्याला शोधता येण्याची शक्यता वाढेल.”

आता माझ्या लक्षात आलं.

“अच्छा, “मी म्हणालो, “म्हणजे हे आयपी अॅड्रेसेस या दुसऱ्या साईटकडे जात होते, जिच्यावर असा कुठलाही प्रोग्रॅम नाहीये आणि तो त्या साईटवर जाऊन मग ते कोणाचे आयपी अॅड्रेसेस आहेत ते बघू शकतो.”

“बरोबर.”

“म्हणजे अँजेलाला गुगलवर सर्च करताना ही trunkmurder.com साईट सापडली. तिने तिच्यावर शोधायचा प्रयत्न केला पण तिला काहीही मिळालं नाही. या दरम्यान तिचा आयपी अॅड्रेस या साईटने पकडला आणि पुढे डेन्स्लो डेटाकडे पाठवला. या खुन्याने तो पाहिला, आणि एल.ए.टाइम्स बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी पत्रकाराने त्याची साईट बघितलेली आहे. त्यावरून त्याने हा अंदाज बांधला की ही साधीसुधी उत्सुकता नाहीये. त्याने टाइम्सची सिस्टिम हॅक केली, त्यावरून त्याला माझ्याबद्दल, अँजेलाबद्दल आणि आमच्या स्टोरीजबद्दल समजलं. त्याने माझे इमेल्स वाचले आणि त्यावरून आम्हाला काहीतरी सापडल्याचं त्याच्या लक्षात आलं. मी वेगासला जाणार आहे, हेही त्याच्या लक्षात आलं.”

“बरोबर. आणि मग त्याने हा सगळा प्लॅन केला, अँजेलाचा खून आणि तुझी आत्महत्या.”

मी एक क्षणभर निःशब्द झालो. हे सगळं बरोबर जुळत होतं. या जिग सॉ कोड्याचे तुकडे एकमेकांमध्ये बरोबर बसत होते.

“म्हणजे माझ्या इमेलमुळे तिचा जीव गेला.”

“नाही जॅक. असा विचार करू नकोस. तिचे दिवस तिने त्या trunkmurder.com वर क्लिक केलं, त्याक्षणीच भरले. तू तुझ्या एडिटरला पाठवलेल्या इमेलमुळे या गोष्टींना वेग मिळाला पण तू स्वतःला दोष देऊ नकोस.”

मी काहीच बोललो नाही. माझ्या मनातली अपराधी भावना कितीही आणि कुणीही समजवायचा प्रयत्न केला, तरीही जाणार नव्हती. याच्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग होता. या अनसबवर लक्ष केंद्रित करण्याचा.

“हॅलो जॅक! हॅलो...”

“मी विचार करतोय रॅशेल. म्हणजे आता या अनसबचा कुठल्याही प्रकारे माग काढू शकत नाही आहोत आपण?”

“नाही. पण जेव्हा आम्ही त्याला अटक करू, तेव्हा त्याच्या काँप्युटरवरून आम्हाला त्याचं trunkmurder.com आणि डेन्स्लो डेटा या दोघांशी असलेलं कनेक्शन मिळेल आणि तो एक जबरदस्त पुरावा असेल.”

“म्हणजे जर त्याने स्वतःचा काँप्युटर वापरला तर.”

“हो.”

“पण तशी शक्यता फार कमी आहे. तूच तर म्हणालेलीस की त्याचं कौशल्य हे फार वरच्या दर्जाचं आहे. त्याला हे सगळं माहित असेलच.”

“ कदाचित. तो कितीवेळा त्याचा हा आयपी ट्रॅप तपासतो, त्याच्यावरही ते अवलंबून आहे. अँजेलाने त्याची साईट बघितल्यापासून चोवीस तासांच्या आत त्याने तिच्यावर झडप घातली होती. त्यावरून हे समजतं की तो दररोज हा ट्रॅप तपासत असणार. किमान एकदा तरी. त्याच्यासाठी हे एक नियमित काम आहे. याचा अर्थ तो त्याचा स्वतःचा काँप्युटर वापरतोय किंवा तो जो काँप्युटर वापरतोय तो त्याच्या जवळपास आहे.”

मी हे ऐकताना डोळे मिटून घेतले. मला प्रचंड नैराश्य येतंय असं वाटायला लागलं होतं.

“मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे,” रॅशेल म्हणाली.

“काय?”

“आम्ही हे शोधून काढलंय की त्याने अँजेलाला तुझ्या घरी कसं बोलावलं?”

“कसं?”

“तूच केलंस ते.”

“म्हणजे?”

“म्हणजे तसं भासवलं त्याने. आम्हाला तिच्या अपार्टमेंटमध्ये तिचा लॅपटॉप सापडला. तिच्या इमेल अकाउंटमध्ये तू पाठवलेला एक इमेल होता. मंगळवारी संध्याकाळी हा मेल पाठवण्यात आला होता. त्यात असं म्हटलं होतं की तुला म्हणजे जॅकला विन्स्लो केसच्या संदर्भात काही अजून जास्त माहिती मिळालेली आहे. पुढे असं पण म्हटलेलं आहे त्या मेलमध्ये की ही माहिती खूप महत्वाची आहे आणि तिला ती बघायला तू तुझ्या घरी बोलावलंस.”

“बाप रे!”

“तिनेही त्याला उत्तर पाठवलेलं आहे. त्यात ती येतेय असं तिने सांगितलेलं आहे. ती तुझ्या घरी आली आणि आयतीच त्याच्या तावडीत सापडली. तू वेगासला गेल्यावर हे झालेलं आहे.”

“याचा अर्थ तो माझ्या घरावर पाळत ठेवून होता. मी घरातून निघताना त्याने पाहिलं असणार.”

“तू निघाल्यावर तो तुझ्या घरात घुसला आणि त्याने तुझा काँप्युटर वापरून हा मेल तिला पाठवला. मग तो तिची वाट पाहात थांबला. तिला मारल्यावर मग तो तुझ्यापाठोपाठ वेगासला आला. तुझा मृत्यू आत्महत्या म्हणून भासवण्यासाठी.”

“पण माझ्या गनचं काय? तो माझ्या घरात घुसला, नंतर त्याला माझी गन अगदी सहजपणे सापडली. नंतर तो माझ्या मागे वेगासला आला – फ्लाईटने किंवा मग तू म्हणालेलीस तसं पूर्ण रात्रभर गाडी चालवत. पण अजूनही मी ती गन वेगासला कशी नेली असती हे समजत नाहीये. मी विमानाने गेलो आणि माझ्या सामानाची तपासणी झाली, जरी माझ्याकडे फक्त एक बॅग होती तरीही.”

“आम्ही तेही शोधून काढलंय जॅक.”

मी माझे डोळे मध्यंतरी उघडले होते, ते परत एकदा घट्ट मिटून घेतले.

“कसं?”

“अँजेलाला तुझ्या घरी बोलावल्यावर त्याने तुझा काँप्युटर
आणि प्रिंटर वापरून एका गो कार्गो शिपिंग फॉर्मचा प्रिंट आऊट काढला.”

“गो कार्गो? हा काय प्रकार आहे?”

“ही एक छोटी लॉजिस्टिक्स कंपनी आहे. फेडेक्स आणि इतर मोठ्या कंपन्यांची स्पर्धक. त्यांचा लोगो म्हणजे G आणि O ही अक्षरं आणि पुढे उद्गारचिन्ह असा आहे. त्याचा अर्थ आहे गॅरंटीड ओव्हरनाईट. ही कंपनी एअरपोर्ट ते एअरपोर्ट अशी सेवा देते. त्यांचा व्यवसाय आता भरभराटीला येतोय कारण एअरलाइन्स आता प्रवाशांनी न्यायच्या सामानावर भरपूर पैसे आकारतात. तू त्यांचा फॉर्म त्यांच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतोस. या आपल्या खुन्याने तेच केलं. त्या फॉर्मनुसार एक पार्सल पाठवलं गेलं होतं. ते त्याने तुझ्या नावाने पाठवलं होतं आणि त्याचा पिक अप लास वेगासच्या एअरपोर्टवर होता. तुझी सही किंवा इतर कुठल्याही ओळखपत्राची गरज नाही. तू फक्त तुझ्याजवळ असलेली शिपिंग फॉर्मची एक प्रत त्यांना दाखवायची असते. तू लॅक्स किंवा व्हॅन नाईजवर रात्री अकरा वाजेपर्यंत तुझं पार्सल नेऊन देऊ शकतोस.”

मी हे ऐकून अवाक् झालो.

“आम्हाला असं वाटतंय की त्याने सर्वप्रथम अँजेलाला तुझ्या घरी बोलावलं आणि मग ती येईपर्यंत जो वेळ होता, त्या वेळात हा फॉर्मचा प्रिंट आऊट कढून घेतला. मग ती आल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केले. मग तिला मारलं. आपल्याकडे तिच्या मृत्यूची निश्चित वेळ नसल्यामुळे आपण फक्त तर्क करू शकतो. मग तो एअरपोर्टवर गेला, आणि त्याने तुझी गन, जी पार्सलमध्ये होती, ती गो कार्गोच्या काउंटरवर दिली. देशांतर्गत पार्सल असेल तर त्याची एक्स-रे तपासणी होत नाही. मग तो गाडीने किंवा विमानाने वेगासला गेला. कदाचित तुझ्या फ्लाईटनंतरची फ्लाईट असेल त्याची. तिथे पोचल्यावर त्याने पार्सल उचललं आणि तुझी गन त्याच्या हातात आली. मग त्याने तुझा एलीपर्यंत पाठलाग केला किंवा तो तिथे आधीच पोचला आणि तुझी वाट पाहात थांबला.”

“पण हे सगळं इतकं कट-टू-कट आहे! त्याने जराजरी वेळ घालवला, तरी त्याचा पुढचा प्लॅन फिसकटू शकतो.”

“बरोबर आहे तुझं पण असं घडलेलं आहे किंवा असं घडलेलं असण्याची शक्यता ९० टक्क्यांहून जास्त आहे.”

“स्किफिनोचं काय?”

“त्याला वेगास फील्ड ऑफिसमधल्या लोकांनी सावध केलंय पण त्याला त्याच्या जीवाला धोका आहे, असं वाटत नाहीये. तिथल्या एजंट्सनी त्याला संरक्षण द्यायची तयारी केली होती पण त्यानेच ते नाकारलं. पण आम्ही त्याच्यावरही लक्ष ठेवून आहोत.”

स्किफिनोला कल्पनाही नसेल की मृत्यू त्याच्या किती जवळपास येऊन गेला.

इकडे रॅशेल बोलत होती, “जर या अनसबने तुला परत फोन केला असता, तर तू मला फोन करून सांगितलं असतंस. पण तुझा फोन आलेला नाही, याचा अर्थ...”

“त्यानेही फोन केलेला नाही. आणि शिवाय तो फोन आता तुमच्याचकडे आहे. त्याने केला होता परत फोन त्याच्यावर?”

“नाही.”

“त्याने मला केलेल्या कॉलचं काय?”

“त्या कॉलचा जो टॉवर आहे तो लास वेगासच्या मॅककॅरन एअरपोर्टच्या जवळ आहे. त्याने कॉल केला त्यावेळी तो यूएस एअरवेजच्या टर्मिनलजवळ होता. तुला त्याने कॉल केल्यापासून दोन तासांच्या आत या टर्मिनलवरून अमेरिकेतल्या २४ वेगवेगळ्या शहरांसाठी फ्लाईट्स होत्या.”

“सीअॅटलसाठी होती का फ्लाईट?”

“नाही. सरळ फ्लाईट नव्हती पण तो तिथून सान फ्रान्सिस्को आणि मग तिथून सीअॅटलला जाऊ शकतो. आजच आम्ही एक अजून सर्च वॉरंट बजावतोय. त्यामुळे आम्हाला या सगळ्या फ्लाईट्सनी गेलेल्या प्रवाशांची नावं मिळतील. आम्ही ही नावं आमच्या डेटाबेसशी पडताळून पाहू आणि मग काही मिळतंय का ते बघू. ही त्याने केलेली पहिली चूक आहे आणि अशी आशा आहे की त्यामुळे तो पकडला जाईल.”

“चूक?”

“त्याने तुला फोन करण्याची काहीही गरज नव्हती. तसं करून त्याने त्याच्याबद्दल माहिती दिलीय आणि त्याचं ठिकाणही समजलंय आपल्याला. त्याने आधी ज्या प्रकारची खबरदारी घेतली होती त्याच्याशी हे पूर्ण विसंगत आहे.”

“पण तूच तर मला म्हणाली होतीस ना की हा खुनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. तू पैज लावली होतीस माझ्याशी. मग तुला आता ही त्याने केलेली चूक का वाटतेय?”

“मी जेव्हा ते तुला बोलले होते तेव्हा यापैकी कुठल्याही गोष्टी माहित नव्हत्या मला. त्याचं जे प्रोफाईल आम्ही बनवलंय त्यानुसार त्याने तुला फोन करणं ही विसंगती आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे तो.”

मी पुढे काही विचारण्याआधी हे सगळं नीट लिहून ठेवलं.

“अजून कुठल्या दिशेने तपास चालू आहे तुमचा?”

“आम्ही डेनिस बॅबिट आणि शेरॉन ओग्लेव्ही या दोघींचंही प्रोफाईल बनवतोय. या खुन्याच्या प्रोग्रॅममध्ये त्या आहेत हे तर आपल्याला माहित आहेच. आता त्यांच्यात काय समानता आहे आणि त्या या खुन्याच्या संपर्कात कशा आल्या, ते बघायचं आहे. आम्ही अजूनही त्याच्या स्वाक्षरीचा शोध घेतोय.”

“त्याची स्वाक्षरी किंवा सिग्नेचर आणि त्याचा प्रोग्रॅम या दोन्हीमध्ये काय फरक आहे?”

“प्रोग्रॅम म्हणजे तो त्याच्या सावज झालेल्या स्त्रियांना जे करतो ते. म्हणजे बाह्य साधनाने बलात्कार वगैरे. स्वाक्षरी म्हणजे तो जे आपल्यासाठी मागे ठेवून जातो ते. उदाहरणार्थ तू विन्सेंट व्हॅन गॉग किंवा लिओनार्डो दा विन्ची यांच्या एखाद्या चित्राला नुसतं त्याच्याकडे बघून ओळखू शकतोस. पण या चित्रकारांनी त्यांची स्वाक्षरीदेखील त्यांच्या चित्रांवर सोडलेली आहे. अर्थात, इथे त्या कलाकारांची आणि या खुन्याची तुलना होऊच शकत नाही. पण हा एक मुद्दा आहे. त्याची स्वाक्षरी इतकी सरळ आणि सहजसोपी असेल अशी माझी अपेक्षा नाहीये. पण एकदा ती काय आहे हे आपल्याला कळलं, की त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो."

“अच्छा! म्हणजे तुला त्यांनी हे काम दिलंय तर!”

“हो.” हे बोलताना ती जरा अडखळली.

“आणि माझ्या फाईल्सवरून तू ज्या नोट्स काढल्या होत्यास त्याच वापरत असशील!”

“हो. त्याच वापरतेय.”

आता मी जरा अडखळलो.

“खोटं बोलतेयस तू रॅशेल. नक्की काय चाललंय?”

“कशाबद्दल बोलतोयस तू?”

“तुझ्या नोट्स इथे आहेत रॅशेल. माझ्याकडे. जेव्हा त्यांनी मला गुरुवारी दुपारी सोडलं तेव्हा मी माझ्या फाईल्स आणि नोट्स परत मागितल्या. तेव्हा त्यांनी मला तुझ्या नोट्सपण दिल्या. कदाचित त्यांना त्या माझ्याच वाटल्या असतील. पण त्या माझ्याकडे आहेत. तुझ्या हस्ताक्षरातल्या. तुझ्या लीगल पॅडवर काढलेल्या. आता मला सांग की तू माझ्याशी खोटं का बोलते आहेस?”

“जॅक, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. तुझ्याकडे माझ्या नोट्स असल्या म्हणून काय झालं? मी काही...”

“कुठे आहेस तू आत्ता? मला खरं सांग.”

ती परत एकदा अडखळली, “ मी...मी वॉशिंग्टनमध्ये आहे.”

“ओके. म्हणजे तुला हा सी जेन रनचा अँगल बरोबर वाटतोय? ठीक आहे. मी पण येतोय सीअॅटलला.”

“त्या वॉशिंग्टनमध्ये नाही जॅक.”

मी गोंधळात पडलो आणि एकदम मला काय चाललंय ते समजलं. तिने या अनसबला जगासमोर आणलं होतं. त्याचा वापर करून ती परत एकदा बिहेवियरल सायन्सेसमधली तिची हक्काची जागा मागून घेणार होती बहुतेक.

“तू परत एकदा बिहेवियरलसाठी काम करायला लागली आहेस का?”

“तसं झालं असतं तर आणखी काय हवं होतं? मी इथे एफ.बी.आय. हेडक्वार्टर्समध्ये आले आहे. सोमवारी सकाळी ओपीआर समोर माझी सुनावणी आहे.”

ओपीआर सुनावणी म्हणजे काय ते मला व्यवस्थित माहित होतं. ऑफिस ऑफ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी.
एफ.बी.आय.च्या अंतर्गत व्यवहारांवर नजर ठेवणारी यंत्रणा.

“तू त्यांना आपल्याबद्दल सांगितलंस?म्हणून ते तुझ्यापाठी लागलेत?”

“नाही जॅक. मी त्यांना काहीही सांगितलेलं नाही. हे त्या जेटच्या संदर्भात आहे, जे घेऊन मी इथून नेल्लीसला गेले आणि नंतर त्याच जेटने आपण एल.ए.ला परत आलो.”

मी इतका वेळ बसलो होतो पण आता मीही अस्वस्थ झालो आणि येरझाऱ्या घालायला लागलो.

“काय वेडेपणा आहे हा त्यांचा! काय करणार आहेत ते?”

“काही कल्पना नाहीये जॅक.

“याने त्यांना काही फरक पडत नाही का की तू किमान एका माणसाचा जीव वाचवलास – माझाच – आणि इतके दिवस किंवा वर्षे पोलिसांच्या किंवा ब्युरोच्या नजरेआड राहून बिनबोभाट खून करणाऱ्या एका खुन्याला जगासमोर आणलंस? त्यांना याची कल्पना आहे का की तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याने न केलेल्या गुन्ह्याच्या आरोपातून सुटका झालेली आहे? हे त्यांना माहित आहे का की जर एक माणूस ज्याने निरपराध असतानाही एलीसारख्या भयानक तुरुंगात एक वर्ष खितपत पडून काढलं तो आज मुक्त होऊ शकणार आहे आणि तुझ्या प्रयत्नांमुळे हे झालेलं आहे? त्यांनी तुझा एखादं पदक देऊन सत्कार करायला हवा. ते सुनावणी करताहेत तुझ्याविरुद्ध?”

माझा उद्रेक ऐकून ती बराच वेळ शांत राहिली आणि मग तितक्याच शांत आवाजात म्हणाली, “आणि तुझ्या ऑफिसने काय करायला हवं जॅक? तुला किमान पगारवाढ द्यायला हवी. पण तेही तुझी नोकरीवरून हकालपट्टीच करताहेत ना? तू जे म्हणतो आहेस ते मला मान्य आहे पण खरी गोष्ट ही आहे की मी काही चुकीचे निर्णय घेतले आणि त्यांना त्याने आणि त्यामुळे जे सरकारचे पैसे खर्च झाले त्याने जास्त फरक पडतो.”

“हे पहा रॅशेल, एकदा त्यांनी तुझ्याबाबतीत असं केलेलं आहे. आता परत जर का ते असंच वागले ना, तर ही बातमी पेपरच्या पहिल्या पानावर असेल, आणि हा माझा शब्द आहे.”

“जॅक, मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते. तू स्वतःचा विचार कर आता. माझा नाही. ओके?”

“नाही. अजिबात नाही. किती वाजता आहे तुझी ही सुनावणी?”

“सोमवारी सकाळी नऊ वाजता.”

मी कीशाला, माझ्या माजी पत्नीला ही टिप देणार होतो. अशा गोष्टी बंद दरवाज्यामागे होत असल्यामुळे तिला त्यांनी ही सुनावणी पाहू देणं अशक्य होतं पण जर टाइम्सची एक रिपोर्टर आणि तीही कीशासारखी प्रसिद्ध, बाहेर उभी आहे आणि या सुनावणीचा निकाल काय लागतो याच्यावर बातमी देणार आहे, हे जर त्यांना समजलं तर ते कदाचित रॅशेलचा बळी देण्याआधी दोनदा विचार करतील असं मला वाटत होतं.

“तू काय विचार करतो आहेस ते मला समजतंय जॅक. पण जरा शांत हो आणि मला या सुनावणीला सामोरं जाऊ दे. शेवटी हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. ओके?”

“मला माहित नाही रॅशेल. जेव्हा माझ्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर असा अन्याय होत असेल तेव्हा फक्त शांत राहणं आणि काहीही न करणं निदान माझ्यासाठी तरी अशक्य आहे.”

“थँक यू जॅक, पण जर तुला माझी खरोखर काळजी वाटत असेल तर मी सांगते म्हणून शांत राहा. मला काहीही समजलं तर मी लगेच तुला कळवेन.”

“नक्की?”

“नक्की!”

मी खिडकीवरचा पडदा बाजूला केला. सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश आत आला.

“ठीक आहे.”

“अच्छा, तू तुझ्या घरी जाणार आहेस का? तुला जर जीवाला धोका वाटत असेल तर मी कुणालातरी तिथे पाठवू शकते.”

“नाही. मी ठीक आहे. तुला भेटण्यासाठी मी ते बोलत होतो. पण तू जर देशाच्या दुसऱ्या टोकाला आहेस तर....”

ती हसली.
“अच्छा, मला एक सांग,”मी म्हणालो, “तू गेलीस कधी वॉशिंग्टनला?”

“आज पहाटेच्या फ्लाईटने. मी हे टाळण्याचा किंवा निदान पुढे ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, कारण मला या केसवर काम करायचं होतं पण ब्युरोमध्ये असं चालत नाही.”

“बरोबर.”

“आता मी इथे आलेले आहे आणि माझ्या वकिलाला भेटणार आहे. तो आता इथे कुठल्याही क्षणी येईल आणि मग आम्हाला सोमवारच्या सुनावणीसाठी काम करावं लागेल.”

“हरकत नाही. कुठे राहते आहेस तू वॉशिंग्टनमध्ये?”

“हॉटेल मोनॅको. एफ स्ट्रीट.”

आम्ही दोघांनीही एकाच वेळी कॉल बंद केला. मी खिडकीतून बाहेर बघत होतो पण माझं समोरच्या दृश्याकडे लक्ष नव्हतं. बारा वर्षांपूर्वी माझ्यामुळे रॅशेलची करीअर जवळजवळ धुळीला मिळाली होती. आता परत तीच परिस्थिती होती. मी तिला तेव्हाही विचारलं होतं की तिच्यासारख्या हुशार आणि धडाडीच्या स्त्रीला कॉर्पोरेट क्षेत्रात काही करता येणार नाही का?ब्युरोमध्ये राहायची काय गरज आहे? तेव्हा तिने सांगितलं होतं की हे सोडून दुसरं काहीही करण्याचा विचारही तिच्या मनात कधी आलेला नाही.

त्या बाबतीत आम्ही दोघेही अगदी सारखे होतो. कदाचित म्हणूनच बारा वर्षांनंतरही आम्हाला एकमेकांविषयी काहीतरी वाटत होतं.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

सतोंष महाजन's picture

9 Aug 2015 - 9:55 am | सतोंष महाजन

मस्त.
मागच्या रविवारची भरपाई केलीस त्या बद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 10:27 am | मुक्त विहारि

सविस्तर प्रतिसाद, कथानक संपल्या नंतर.

पैसा's picture

9 Aug 2015 - 10:27 am | पैसा

जबरदस्त कथा आहे! जंगलात घुसल्यासारखं वाटतंय.

वा! नेहमीचाच प्रतिसाद समजावा. हजर सदस्यांमध्ये 'बोका-ए-आझम' हे नाव दिसलं की 'द स्केअरक्रो' चा पुढचा भाग आलाय का हे मेन बोर्डावर लगेच पाहिले जाते.

ऋतुराज चित्रे's picture

9 Aug 2015 - 10:56 am | ऋतुराज चित्रे

रविवार सार्थकी लागला.

हजर सदस्यांमध्ये 'बोका-ए-आझम' हे नाव दिसलं की 'द स्केअरक्रो' चा पुढचा भाग आलाय का हे मेन बोर्डावर लगेच पाहिले जाते.

खरं आहे.

अजया's picture

10 Aug 2015 - 9:39 am | अजया

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Aug 2015 - 10:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली :). नेहेमीप्रमाणे खिळवुन ठेवणारं लेखन आणि तितकाच सरस अनुवाद. _/\_ बोका साहेब.

नाखु's picture

10 Aug 2015 - 9:55 am | नाखु

बाडीस !

पुभाप्र.

प्रचेतस's picture

9 Aug 2015 - 11:25 am | प्रचेतस

मूळ कथाही जबरदस्त आणि अनुवादही तितक्याच ताकदीचा.

लवकर संपला भाग.पुभालटा!

अद्द्या's picture

10 Aug 2015 - 11:15 am | अद्द्या

किती मोठा भाग टाकला तरी कथा आणि त्याचा अनुवाद इतका जबरदस्त आणि मस्त फ्लो असलेला आहे कि पटकन संपतोय .

आजकाल शनिवार रविवार सुट्टी साठी नाही तरी बोक्या साठी वाट बघावी लागतेय . .

किती इफेक्ट करतं मिपा आयुष्यात . :)

सिध्दार्थ's picture

10 Aug 2015 - 12:20 pm | सिध्दार्थ

सहमत

gogglya's picture

10 Aug 2015 - 3:10 pm | gogglya

येउ द्या. श श क च्य मार्‍या मध्ये आपली अनुवादीत कथा एकदम सुखाउन जाते.

मास्टरमाईन्ड's picture

10 Aug 2015 - 5:31 pm | मास्टरमाईन्ड

जबरदस्त!!
एकावेळी २ तरी भाग टाका प्लीज.
आख्खा आठवडा वाट बघावी लागते राव.
त्यात रविवारी रात्री बराच वेळ ERROR.

सुंदर! पुढचा भाग लवकर लिहा.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 12:50 pm | शाम भागवत