अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल
काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत.
आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे. लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारला गेला अथवा नाही, हे लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येईल.
-दिवाळी अंक समिती
नमस्कार मिपाकरहो...
मिसळपाव या 'मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती'ला वाहिलेल्या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकासाठी आम्ही लेख मागवत आहोत.
यंदाचा दिवाळी अंक मुक्त स्वरुपात असेल, म्हणजे दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे.
लेखाबरोबर प्रकाशचित्रं द्यायची असल्यास ती शक्यतो स्वतः काढलेले फोटो, स्वतः काढलेली चित्रं किंवा जालावर मुक्त उपलब्ध असलेली असावीत, अशी अपेक्षा आहे. प्रकाशचित्रं स्वतंत्रपणे स्टोअर करून लेखात समाविष्ट केली जातील. काही अडचणी असल्यास तुम्ही प्रकाशचित्रं आम्हाला ईमेलने पाठवू शकता. आम्ही ती लेखात समविष्ट करू.
...आणि काही सूचना :-
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंकात आलेलं साहित्य फक्त मिपाच्याच दिवाळी अंकात (एक्सक्ल्युजिवली) वाचायला मिळावं असं आम्हाला वाटतं. म्हणून, अंकासाठी पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. तसंच, मिपाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर १५ दिवसांच्या आत ते लेखन ब्लॉग, फेसबुक किंवा अन्य संस्थळांवर / सामाजिक माध्यमांवर प्रकाशित करू नये. (मिपा आपल्या फेसबुक+ट्विटर अकाउंटवर प्रसिद्धी करतंच. ती पोस्ट शेअर करायला अर्थातच हरकत नाही. तसंच, मिपाची लिंक व्हॉट्सअॅपवरून पाठवायलाही काहीच हरकत नाही.)
३) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
४) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये.
याव्यतिरिक्त काही प्रश्न, शंका असल्यास अथवा तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
लेखन देण्याची मुदत : २४ ऑक्टोबर, २०२१.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak . mipa @ gmail . com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. ईमेलने लेखन पाठवताना ईमेलमध्ये लिहून, किंवा MS Word docx फाइल attach करून पाठवू शकता. फाईल attach करताना फोटो (असल्यास) ते वर्ड फाइलमध्ये न देता, स्वतंत्रपणे attach करावेत. कृपया पीडीएफ फाइल स्वरूपात लेखन पाठवू नका.
काही प्रश्न, अडचणी, शंका असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा.
दिवाळी अंक १ नोव्हेंबरला प्रकाशित करण्याचे नियोजन आहे, तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.
२० ऑक्टोबरला केवळ तीस दिवस राहिलेत.
तेव्हा, लागा लिहायला!
- टीम दिवाळी अंक
प्रतिक्रिया
18 Sep 2021 - 7:29 am | प्रचेतस
व्वा..! दिवाळीच्या फराळासारख्याच विविधांगी लेखांनी नटलेल्या दिवाळी अंकाचे वाचन करण्यास उत्सुक.
18 Sep 2021 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार
या वेळी दिवाळी अंक जोरदार होणार असे दिसते आहे.
या अंका करता काम करणार्या सर्व दृष्य व अदृष्य हातांना मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखक लोक हो लागा कामाला, आपल्या प्रतिभेला ढोसण्या मारुन जागे करा आणि उधळूद्या तिला चौखुर मिपा मैदानात...
होउ दे खर्च, मिपा आहे घरच...
पैजारबुवा,
18 Sep 2021 - 1:00 pm | ॲबसेंट माइंडेड ...
दिवाळी अंक वाचण्याची ऊत्सुकता आहे.
18 Sep 2021 - 11:47 pm | पाषाणभेद
दिवाळी अंकास शुभेच्छा!!!
दुसरे असे की फोटो नसावेत.
कारण त्यामुळे अकारण फाईलची साईज वाढेल अन फॉरवर्ड करण्यात, जतन करण्यात अडचणी येतील. तसेच आजकाल कॅमेर्यांपेक्षा मोबाईल कॅमेरे अन त्याहीपेक्षा तो वापरणारी व्यक्ती सुजाण झाली असल्याने या फोटो विभागाला उदंड प्रतिसाद मिळेल अन संपादकांची अडचण होईल.
(तसेच फोटोग्राफी ही कला आहे की तंत्रमाध्यम हा वादाचा नवा धागाही काढता येईल. जूना धागा आहेच येथे. शोधा.)
:-)
19 Sep 2021 - 8:25 am | श्रीरंग_जोशी
दिवाळी अंकाच्या प्रकल्पाचे स्वागत व दिवाळी अंक चमूस शुभेच्छा!!
पाषाणभेद साहेब - २०-२२ वर्षांपूर्वी साइझच्या कारणामुळे फोटो नकोत हे समजू शकतो. पण आजच्या काळात लोक रोजच्या सुप्रभात / शुभरात्रीच्या संदेशांसाठी सुद्धा खच्चून फोटो व्हिडिओजचा वापर करत असताना दिवाळी अंकात फोटोज नकोत ही सुचवणी पटत नाही. मिपावर पहिले पासून फोटो नाही तर पाकृ नाही असा प्रतिसादकांचा सूर राहिला आहे. पाककृतींखेरीज, प्रवास / स्थल वर्णने, माहितीपर लेख यांच्यात फोटोज (काही वेळा व्हिडिओजही) महत्त्वाची भूमिका बजावतात.
पिडिएफ फॉरमॅटमधे दिवाळी अंकाची प्रत काढण्याचा तोटा असा की नवे वाचक प्रत्यक्ष मिपापर्यंत पोचत नाहीत अन लेखनावरच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा त्यांना आस्वाद घेता येत नाही. मिपावर प्रकाशित होणार्या ऑनलाइन दिवाळी अंकामुळे अशा नव्या वाचकांना 'आपणही मिपाकर व्हावे' अशी इच्छा निर्माण होऊ शकते. आज आंतरजालाची जोडणी जवळपास प्रत्येकाकडे असताना ऑनलाइन अंकाच्या जोडीला ऑफलाइन अंक लगेच न काढलेला बरा. काही महिन्यांनी किंवा पुढच्या दिवाळी अंकाच्या वेळी अगोदरच्या वर्षीचा दिवाळी अंक पिडिएफ स्वरुपात प्रकाशित करणे अधिक उपयुक्त ठरु शकते. बादवे ही केवळ सुचवणी आहे. याबाबतचे धोरण ठरवायला संबंधीत मंडळी सक्षम आहेत.
19 Sep 2021 - 11:16 pm | पाषाणभेद
आता आपणाशी सहमत झालो आहे. मुद्दे पटलेत आपले.
20 Sep 2021 - 2:20 am | श्रीरंग_जोशी
__/\__.
19 Sep 2021 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ताच तर गणेशलेखमालिका सुरु झाली होती की आलीच दिवाळी. पण मस्त आवाहन. दिवाळी अंकात काय असावे त्याबद्दलच्या भावना पोहचल्या.
काही चांगलं सुचलं तर लिहीनच. साहित्य संपादक, संयोजक, दिवाळी अंकाचे पै पाहुणे, तंत्रज्ञ, संपादक, जवाबदारी घेणारे सर्वांना शुभेच्छा.
सर्वांना आपलं पूर्ण सहकार्य राहील. काही लागलं सवरलं तर बिंधास्त हाक मारा. आम्ही इकडेच पडिक असतो.
-दिलीप बिरुटे
29 Sep 2021 - 1:53 pm | नावातकायआहे
प्रा.डॉ. नक्की लिहा!
28 Sep 2021 - 9:18 am | कर्नलतपस्वी
दिवाळी अंकाची प्रतीक्षेत आहे. मीपाकरांचे दर्जेदार लेखन दिवाळीच्या फराळाची गोडी नक्कीच वाढवेल.
29 Sep 2021 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली
दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी व्यक्तीचित्रेच्या नावाखाली कृपया नको. आमचा काळ असा होता नी आता असंय वगैरे छाप जिलब्या कृपया टाळाव्यात.
29 Sep 2021 - 10:15 pm | नावातकायआहे
आपण एक फर्मास, ताजोतरार्र, रापचिक मैलाचा दगड लेख लिहावा हि नम्र विनंती!
29 Sep 2021 - 10:39 pm | गॉडजिला
जास्त प्रोत्साहन देउ नका…
उगा दिवाळीत एम्पिएसिचा पेपर टाकतील ते…
बर्लिन ची भिंत, जागतीक महायुध्द… आप चा उदयास्त वगैरे वगैरे वगैरे
11 Oct 2021 - 9:42 pm | बिपीन सुरेश सांगळे
मिपा
सर्व सदस्य, दिवाळी अंकासाठी सक्रिय असलेले सभासद , वाचक , लेखक , संपादक मंडळ
साऱ्यांना दिवाळी अंकासाठी आत्ताच शुभेच्छा !
सहभागी होऊन मुदतीआधी लेखन पाठवतो आहे .
आभार .
11 Oct 2021 - 10:20 pm | चौथा कोनाडा
अरे व्वा, खुप छान.
+१
तुमचे साहित्य वाचायची उत्सुकता आहे !
12 Oct 2021 - 11:24 am | श्रीगुरुजी
दिवाळी अंकासाठी एक लेख लिहितोय. अंतिम दिनांकापूर्वी देण्याच्या प्रयत्नात आहे.
12 Oct 2021 - 12:53 pm | सुरिया
वा. वॉटरगेटसारखे काही वाचनीय मिळणार म्हणजे. छान.
मी पण लिहिणार आहे.
17 Oct 2021 - 7:15 pm | चॅट्सवूड
दिवाळी अंकासाठी एक कथा पाठवली आहे कृपया नोंद घ्यावी.
17 Oct 2021 - 7:20 pm | चित्रगुप्त
दिवाळी अंकासाठी सचित्र लेख आत्ताच पाठवला आहे.
24 Oct 2021 - 7:04 pm | पाषाणभेद
तुमची जागा पक्की असते हो.
रुमाल टाकून ठेवायची गरज नाही तुम्हाला!
खॅ खॅ खॅ....
19 Oct 2021 - 10:49 am | अनिंद्य
दिवाळी अंकाच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा, अंक वाचण्याची उत्सुकता आहे.
19 Oct 2021 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढीव मुदत वगैरे काही असल्यास कळविणे. लोकांना तसे सांगायला.
-दिलीप बिरुटे
19 Oct 2021 - 8:31 pm | श्रीगुरुजी
व्यनि करून लेख पाठविलाय.
19 Oct 2021 - 11:29 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
मिपा,
दिवाळी अंक .
सस्नेह नमस्कार .
आपल्या सगळ्यांच्या दिवाळी अंकासाठी ' पहिली रात्र ' ही कथा पाठवीत आहे .
स्वीकारावी ही नम्र विनंती .
खूप आभार आणि खूप शुभेच्छा !
24 Oct 2021 - 7:05 pm | पाषाणभेद
>>> पहिली रात्र
अं...अं...अं!!!
25 Oct 2021 - 10:50 am | जेम्स वांड
संपादक मंडळाचे आग्रहाचे पत्र पण मिळाले होते, बरेच दिवस काही लिहिलेले नाही, नोकरी अन इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रच बोकांडी बसल्या होत्या हल्ली हल्ली पर्यंत, असो, ह्यावर्षी वाचन करणार मनसोक्त दिवाळीत. सालाबादप्रमाणे मिपा दिवाळी विशेषांकाच्या आगमनाची उत्कंठा अन त्यातील कंटेंट उत्तमच असणार ही हमी आहेच.
25 Oct 2021 - 12:28 pm | अनन्त्_यात्री
ठेवण्याचा निर्णय आवडला.
"थीम" कडे लक्ष्य ठेवून केलेल्या लेखनात जे एक अवघडलेपण असते ते यंदा टाळले जाईल
29 Oct 2021 - 9:05 am | aschinch
दिवाळी अंकासाठी एका वेगळ्या विषयावरील लेख पाठवला आहे.
संपादकांना आणि वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
1 Nov 2021 - 2:54 pm | सोत्रि
दिवाळीअंकाची आतुरतेने वाट पाहत आहे.
- (मिपाकर) सोकाजी